मुक्त तितकीच सक्त मुंबई

अमृता शेडगे

कॉलेज संपलं आणि मला माझा पहिलाच जॉब मुंबईत मिळाला. एका मोठ्या न्यूज चॅनेलमध्ये सबएडिटर म्हणून मी वयाच्या एकविसाव्या वर्षी जॉइन झाले आणि माझं बस्तान पुण्याहून मुंबईला हलवलं. तिथून सुरू झाला माझा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मुंबईतला प्रवास. माझ्या वेगळ्या जॉब फील्डमुळे असेल किंवा माझ्यातल्या कुतूहलामुळे असेल, मला मुंबई नेहमीच खूप वेगळी दिसली. माझ्यासाठी ‘मुंबई’ हे केवळ एक नाव कधीच नव्हतं, आणि नसेल. मुंबईनं मला घडवलं! एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून. लहानपणी बाबा म्हातारीचा बूट पाहायला, राणीच्या बागेत फिरायला घेऊन आले होते, तेव्हा मुंबई म्हणजे काहीतरी खूप मोठ्ठं आणि अद्भुत आहे असं वाटायचं. सगळे हिरो-हिरोईन याच मुंबईत राहतात म्हणून मुंबईचं एक वेगळंच अप्रूप! लहानपणीचा माझा आवडता गेम होता ‘व्यापार’ ज्यात दिवसभर मी भायखळा, मुंबादेवी, जुहू बीच आणि अगदी सगळ्या मुंबईची खरेदी विक्री करत बसायचे. हे सगळं आता रोज बघायला मिळणार होतं. ही मुंबई अगदी रोज जगायला मिळणार होती. म्हणून खूप उत्साहानं मी या मुंबईत राहायला, स्वतःला घडवायला घरातून बाहेर पडले and there started an affair between me and the magical city Mumbai!

पहिल्या चॅनेलचं ऑफिस विक्रोळीला होतं आणि मी ठाण्यात एका काकूंकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायचे. रूममध्ये आधीच दोन मुली होत्या. काकूंनी त्यांच्या हॉलमधल्या गॅलरीची एक छोटीशी रूम केली होती जी माझ्या वाट्याला आली. पुण्यात घरी माझी स्वतंत्र रूम होती आणि इथे या जेमतेम एक छोटा बेड मावेल अशा रूममध्ये राहणं मला जरा अवघडच झालं होतं. सकाळी एक ग्लास दूध पिऊन, त्याच काकूंकडून डबा घेऊन मी निघायचे आणि ठाणे स्टेशनला लोकल पकडायच्या युद्धासाठी तयार व्हायचे. दिवसभर काम करून थकून आल्यावर गाचागच भरलेल्या त्या लोकल ट्रेनमधून उतरणं म्हणजे एक टास्क असायचं. आणि ते केल्यानंतर ठाणे स्टेशनच्या बाहेर रिक्षाची भली मोठी रांग! ती रांग बघूनच मी मनाचा निर्धार करून चालतच घरी जायला निघायचे. पुण्यात राहून कधी बसनंही प्रवास न केलेल्या मला हे सगळं अगदी जीवघेणं वाटायचं. मला ते आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो. कित्येकदा तर मला रडू यायचं. आईची आठवण यायची, घरचं जेवण, अगदी सगळ्या गोष्टींची आठवण यायची. वाटायचं नको हे सगळं, सोडून द्यावं आणि जावं परत घरी. पण करिअर करायची जिद्द होती जिनं मला मुंबईत टिकवून ठेवलं. एकएक दिवस असा सरकत गेला आणि कदाचित या सगळ्याची मला सवय होत गेली. काही दिवसांनी मला एक फ्लॅट भाड्यानं मिळाला. आई बाबा येत जात राहतील म्हणून मी तो घेतला. फ्लॅट घेतल्यावर ताईपण म्हणाली की ती माझ्याबरोबर मुंबईत शिफ्ट होईल आणि मला जरा बरं वाटलं. पुण्याहून आम्ही दोघींना लागणारं सगळं सामान शिफ्ट केलं आणि दोघींनी राहायला सुरुवात केली. पण कसलं काय? दोन आठवडे राहिल्यावर ताईला काही केल्या मुंबईचा स्पीड पकडायला जमेना आणि शेवटी कंटाळून तिनं मुंबईतून पळ काढला आणि पुण्याला गेली. परत माझ्यावर एकटं राहायची वेळ आली. पुढचे काही महिने मी त्याच फ्लॅटवर राहिले.

FB_IMG_1500963268722

पुढे काही महिन्यांतच मी एबीपी माझामध्ये न्यूज अँकर म्हणून जॉईन झाले आणि बस्तान दादरला हलवलं. तिथे पण एका आजींकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली पण त्या आजी अंघोळीला फक्त एक पातेलं गरम पाणी द्यायच्या आणि ते काही करून मला पुरायचं नाही म्हणून इथं जास्त काळ राहता येणार नाही हे कळलं आणि नवीन जागेचा शोध सुरू झाला. दादरच्या त्या गर्दीत छोटीछोटी घरं. त्यात मला कोणतंच घर राहण्यासाठी आवडत नव्हतं. दरम्यान दादरच्या तांबे आरोग्य भुवनमध्ये मी नाश्ता आणि जेवण करायला जाऊ लागले आणि त्या तांबे काकूंशी चांगली ओळख झाली. मी पुण्याची हे कळल्यावर त्या माझ्याशी छान गप्पा मारायला लागल्या आणि त्यांनीच जवळच्या एका वर्किंग वीमेन्स हॉस्टेलबद्दल सांगितलं. ते हॉस्टेल लगेच शोधलं आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव लिहून आले. काही दिवसांत बस्तान हॉस्टेलला हलवलं.

हॉस्टेल खूप मोठं नव्हतं, पण अगदी घरच्यासारखं होतं. हॉस्टेल चालवणाऱ्या जोशी काकू समोरच राहायच्या. हॉस्टेल लाइफचा अनुभव कधीच नव्हता, पण तरी सगळ्या मुलींमध्ये मी पटकन मिसळले आणि ते हॉस्टेल, माझी रूम आणि त्या मुली हे सगळं  माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग कधी बनल्या ते कळलंच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यांतून करिअर करण्यासाठी, या अजस्र शहरात आपली ओळख बनवण्यासाठी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक मुली इथं होत्या. चारू, स्नेहल आणि मी एक रूम शेअर करायचो. चारू मूळची रत्नागिरीची. इंटिरियर डिझायनर होती. स्नेहल जे.जे. स्कूल ऑफ आट्‌स मधून मास्टर्स करत होती. त्या काळात मी एबीपी माझामध्ये मॉर्निंग शिफ्ट बुलेटिन्सचं anchoring करायचे. पहिलं बुलेटिन ६ वाजताचं आणि त्यासाठी मला ४.३० ला ऑफिसची गाडी घ्यायला यायची. रोज पहाटे ३.३० ला उठून रूममेट्सची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत मी पटापट आवरायचे आणि ऑफिसला निघायचे. रोज साधारण ४ ते ५ बुलेटिन्सचं anchoring करून मग घरी यायला 5 वाजायचे आणि येऊन मी झोपायचे. हेच routine जवळपास ८ ते ९ महिने सुरू होतं. होस्टेलच्या मुली कित्येकदा सिनेमा पाहायला रात्रीच्या शोला जायच्या. होस्टेलच्या समोरच नक्षत्र मॉलमध्ये थिएटर होतं. पण मला मात्र पहाटे उठायच्या भीतीनं कधीच सिनेमाला जाता यायचं नाही. लहानपणी शनिवारी सकाळची शाळा असायची आणि सकाळी उठायची सवय नसलेली मी हमखास शनिवारी शाळेला दांडी मारायचे आणि आता जणू कोणीतरी माझी परीक्षा घेत असल्यासारखं रोज पहाटे ३.३० ला उठून ऑफिसला जाणं मात्र माझ्यासाठी काहीतरी भयंकर होतं. रोज झोपताना माझं एक वाक्यं ठरलेलं असायचं, ‘इस रात की सुबह ना हो!’ माझं हे वाक्यं ऐकून चारू खूप हसायची आणि मला चिडवत म्हणायची, तू नक्की anchor आहेस ना की सिक्युरिटी गार्डचं काम करतेस इतक्या सकाळी जाऊन?

दादरला राहत असताना शिवाजी पार्क ही माझी अगदी आवडती जागा. जवळपास रोज संध्याकाळी मी शिवाजी पार्कला चक्कर मारायला जायचे. घरची आठवण आली, एकटं वाटलं की मी हॉस्टेलमधून खाली उतरायचे आणि चालत १० मिनिटांत शिवाजी पार्कला पोचायचे. तिथली गर्दी, ग्राउंडवर खेळणारी मुलं बघून बरं वाटायचं. मुंबईची ही एक मज्जा वाटायची मला, या शहरात एकटं वाटतं, घरची, आपल्या लोकांची आठवण येते पण तरीही हे शहर तुम्हांला कधीच थांबू देत नाही. तुम्ही पळत राहता… हे शहर तुम्हांला पळवत राहतं! शिवाजी पार्कमध्ये चक्कर मारून मग मी रूमवर यायचे, तोपर्यंत चारू ऑफिसहून आलेली असायची आणि मग आम्ही सगळ्या जेवण करायचो.

FB_IMG_1500962358553

रोज सलग ८,९ महिने मॉर्निंग बुलेटीनचं anchoring करून मला खूप कंटाळा आला होता. मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा मी एबीपीचे संपादक राजीव खांडेकर सरांचं डोकं खाल्लं होतं मला रिपोर्टिंगला शिफ्ट व्हायचंय म्हणून. रोज रोज teleprompter वाचून मी बोर झालीये आणि मला रिपोर्टिंग  करून प्रश्न समजून घ्यायचे आहेत, ग्राउंड रिपोर्टिंग करायचं आहे हा माझा हट्ट होता. राजीव सरांनी मला समजवायचा खूप प्रयत्न केला की मुंबईत रिपोर्टिंग वाटतं तितकं सोपं नाही, पण माझ्या हट्टीपणासमोर ते काहीच करू शकले नाहीत आणि मी रिपोर्टिंगला शिफ्ट झाले. Anchor होण्यासाठी लोकं धडपडतात आणि मी ते सोडण्यासाठी धडपडत होते. अखेरीस मी चॅनेलच्या स्टुडिओमधून बाहेर पडले आणि मुंबईच्या रियल स्टुडिओत उतरले!

रिपोर्टिंग सुरू केल्यावर मला खरी मुंबई समजत गेली. धारावीच्या झोपडपट्टीपासून ते गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या आलिशान घरातल्या लोकांशी माझा थेट संबंध आला. एकीकडे रातोरात तुटणाऱ्या झोपड्या तर दुसरीकडे बेकायदेशीर बांधकाम केलेल्या पण त्यांच्या केसालाही धक्का न लागणाऱ्या south मुंबईच्या अतिश्रीमंत लोकांच्या गगनचुंबी इमारती पाहिल्या. पावसाळ्यात कमरेइतक्या पाण्यात हिंदमाता आणि दादरला दिवसदिवस उभं राहून रिपोर्टिंग केल्यावर, घराघरात शिरलेलं पाणी आणि त्याच चिखलात राहणारं कुटुंब पाहिल्यावर मला पावसाळा काय असतो ते समजलं. मरीन ड्राइव्हवरून high tideचं कव्हरेज करताना मला पाऊस नव्यानं समजला. अशा अनेक घटनांमधून मला मुंबई कळत गेली.

C360_2017-07-25-11-24-35-883मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाची काही न काही स्टोरी आहे. हे शहर अशा असंख्य storiesचं आहे. मला भेटलेल्या अशा अनेक stories पैकी एक ८० वर्षांच्या टॅक्सी ड्रायवर लालसिंगची. ऑफिसला जाताना उशीर झाला होता आणि दादारहून परेलला जायला काही केल्या टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एक जुनाट टॅक्सी थांबली आणि त्या टॅक्सीमधल्या म्हाताऱ्या ड्रायव्हरला बघून मला त्याची दयाही आली आणि आधीच उशीर झालाय आणि या ड्रायव्हरच्या वेगानं मी उद्याच ऑफिसला पोचेन या विचारानं चिडचिडही झाली.  नाइलाजानं मी टॅक्सीत बसले आणि सवयीप्रमाणे ड्रायव्हरशी गप्पा सुरू झाल्या. लालसिंग मूळचा उत्तर प्रदेशचा कामाच्या शोधात ३० वर्षांपूर्वी मुंबईत आला आणि गेली ३० वर्षं ही टॅक्सी त्याच्या उपजीविकेचं साधन बनली. ८० वर्षांचा लालसिंग आणि त्याची बायको दोघंच घरात. मुलांची लग्नं झाली आणि ती आपापल्या वाटेला निघून गेली. म्हातारपणी दोन वेळचं खायला मिळावं म्हणून लालसिंग सकाळी ६ ते रात्री १२ मुंबईत टॅक्सी चालवतो. त्याची टॅक्सीपण अगदी त्याच्यासारखी, जुनाट आणि खंगलेली. ‘बच्चे बडे हुए तो अपनेअपने घर मे चले गये। अब जिंदा रहने के लिये कुछ ना कुछ तो करना पडेगा ना मॅडम’, असं सगळं लालसिंग बोलत होता. मुंबईत जगण्याचा लालसिंगचा संघर्षच मुळात वेगळा होता. त्याची लढाईच मुळात अवघड होती. ज्या वयात घरात बसून आराम करावा, नातवंडांशी खेळावं आशा वयात ८० वर्षांचा हा माणूस अफाट वेगानं धावणाऱ्या, ट्रॅफिकनं भरलेल्या या शहराच्या गतीशी जुळवून घ्यायची भयानक धडपड करत होता. ऑफिस आलं आणि लालसिंगचा निरोप घेऊन मी टॅक्सीतून उतरले आणि पुढच्या भाड्याच्या शोधात सुरकुतलेल्या शक्तिहीन हातानं गाडीचा गियर टाकत जाणाऱ्या लालसिंगला बघत राहिले.

अशीच एकदा दादरहून अंधेरीला ऑफिसला जाताना लोकलमध्ये भेटलेली सोनाली. खचाखच भरलेली लोकल आणि अंधेरीला उतरण्यासाठी दाराशी येऊन गर्दी केलेला तो लेडीज डबा. मी पण त्याच गर्दीत उतरण्याची धावपळ करत कशीतरी उभी होते. आणि माझ्यापुढे उभ्या असलेल्या एका २२, २३ वर्षांच्या मुलीकडे माझी नजर गेली. तिनं तिच्या पर्समधून फोल्ड केलेली काठी काढली आणि उतरायला तयार झाली, तेव्हा मला कळालं की ती अंध आहे. हे कळताच मला तिची खूपच काळजी वाटली. इतक्या गर्दीत मला उतरायला भीती वाटतीये तर ही कशी उतरणार ह्या विचारानं मीच तिला सांगितलं की तू माझा हात पकड आणि माझ्या बरोबर उतर. ती हसून हो म्हणाली आणि त्या गर्दीतून आम्ही अंधेरीला उतरलो. ती मला हसून-हसून थँक्स म्हणतं होती आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला तिची कमाल वाटत होती. मग गप्पा मारत आम्ही थोड्या वेळ स्टेशनलाच थांबलो. अंधेरी वेस्टला एक अंध मुलींचं वसतिगृह आहे, तिथं सोनाली राहत होती आणि बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. काळजीपोटी मी तिला विचारलं की, ‘तुला एवढ्या गर्दीच्या लोकलमधून प्रवास करताना भीती नाही का वाटत?’ त्यावर ती हसून म्हणाली, ‘आता सवय झालीये. मी रोजच हे करते’. मी रिपोर्टर आहे, हे ऐकल्यावर तर ती अजूनच खूश झाली. अगदी मनमोकळ्या गप्पा मारत होती. ‘जवळच माझं हॉस्टेल आहे. कधी वेळ काढून नक्की ये,’ असं अगदी हक्कानं म्हणाली. तिचा तो उत्साह मला खरच लाजवत होता. ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून नाइलाजानं मी तिला बाय म्हणाले आणि मी अंधेरी ईस्टला आणि ती वेस्टला चालायला लागलो. मी पुन्हापुन्हा वळून सोनालीकडे बघत होते आणि ती शांतपणे जिना उतरून चालत होती. तो संपूर्ण दिवस माझ्या विचारात सोनाली होती. मुंबईसारख्या प्रचंड वेगवान शहरात पळताना माझ्या नाकी नऊ येत होते, पण सोनाली मात्र हस-या चेह-यानं सगळं किती सहज करत होती. मुंबईनं तिला आणि तिनं मुंबईला जणू सांभाळून घेतलं होतं.

अशीच एक धडपडणारी होस्टेलवर भेटलेली अँजलिना. माझ्याच वयाची, बांद्र्याच्या एका फॅशन ब्रॅन्डच्या कॉल सेन्टरमध्ये काम करणारी. २ वर्षांची असताना आई-वडील वारले, मग आजीनं सांभाळलं आणि नातेवाइकांसोबत राहिली. आपला खर्च उचलायला नातेवाईक आता नाकं मुरडतायेत हे जसं कळत गेलं तसं १२वी झाल्यावर शिक्षण सोडून जॉबला लागली आणि नंतर हॉस्टेलला शिफ्ट झाली. मूळची मंगलोरची. मागेपुढे कोणीच नाही, थोड्याशा पगारात भागवायचं ऑफिसनंतर होस्टेलवर यायचं, हॉस्टेलमधल्या कोणाशीच फारसं न बोलता एकटंच जेवायचं आणि झोपायचं. माझ्याशिवाय ती जास्त कोणाशीच बोलायची नाही. कोणाला ती शिष्ट वाटायची तर कोणाला अजून काही. पण आमच्या दोघींची अगदी मस्त मैत्री झाली. ती मला सगळं मनमोकळेपणानं सांगायची. लहानपणीच्या आठवणी, आई-बाबांच्या आठवणी. अगदी सगळं. तिचे future प्लॅन्स, तिला कसा नवरा हवाय, तिला कुठे फिरायचंय आशा सगळ्या गप्पा मारायची ती माझ्याशी. पगार कमी असल्यामुळे आहे त्या पैशात भागवताना होणारी तिची तारांबळ मी जवळून पहिली होती. कमी पैशात साधंच जेवण करण्यापासून ते आजारी पडले तर मला कोण बघेल म्हणून स्वतःची काळजी घेण्यापर्यंत सगळं ती जमवायची. एका मोठ्या फॅशन ब्रॅन्डमध्ये काम करताना तिला फेस्टिव्हल्समध्ये जी काही गिफ्ट्स मिळायची त्यातूनपण ती मला आवडतील म्हणून माझ्यासाठी आणायची. ‘मी आयुष्यभर कष्ट पाहिले आहेत आणि आत्ताही मी कष्टच करतीये, पण लग्नानंतर मला चांगला नवरा हवाय जो मला चांगलं आयुष्यं देईल,’ असं अँजी मला सारखं सांगायची. सतत हसणारी, सरळ पण स्वतःत राहणारी अशी होती ती. मुंबईत एक मुलगा भेटला, मग तो जॉबसाठी कॅनडाला गेला आणि लग्नाचं आश्वासन देतदेत शेवटी २ वर्षांनी मागे फिरला आणि तिला नाही म्हणाला. तिला रोजरोज समजावून मी थकून जायचे. शेवटी तिनं ते स्वीकारलं आणि आता मुंबईत राहायचं नाही या विचारानं अखेरीस मुंबई सोडून दुबईला जायचं ठरवलं. नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं यांत स्वतःला घडवायचं या विचारानं अँजी अखेरीस दुबईला गेली. आता तिथं जॉब शोधतीये, कोणा लांबच्या नातेवाइकांकडे काही दिवस राहून मग जागा बघेन म्हणाली. तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं, किती वेगळा संघर्ष आहे या मुलीचा.. प्रेमाचे नातेवाईक नाही, रक्ताची नाती नाहीत, काही झालं तर विचारणारी माणसं नाहीत. पण ती लढतीये. आजपेक्षा उद्या अधिक चांगला असेल या आशेनं. एक चांगला मुलगा मिळेल, चांगलं आयुष्य देईल या विचारानं. मी होस्टेलवर आजारी पडले की दुसर्‌या दिवशी आई होस्टेलवर हजर असायची. सुट्टी मिळाली की आतुरतेनं जाता यावं असं एक घर होतं मला;पण अँजलिनाकडे यातलं काहीच नव्हतं.

 

त्या रात्री भेटलेले देशपांडे आजोबा अजून आठवतात. रात्री ११.३० झाले होते. डबा नव्हता म्हणून दादरच्या तृप्तीमधून जेवण करून मी चालत हॉस्टेलला जात होते. बस स्टॉपला एक अतिशय म्हातारे, पाठीला बाक येऊन वाकलेले पण चांगले कपडे आणि हातात एक कापडी पिशवी घेतलेले आजोबा उभे होते. टॅक्सीला हाक मारत होते, पण कोणीच टॅक्सीवाला थांबत नव्हता. मी त्यांना विचारलं तेव्हा म्हणाले ‘मला माटुंग्याला जायचं आहे. टॅक्सी मिळत नाहीये. अगदी शांत आवाजात सहज बोलले. मी त्यांना सांगितलं मी देते टॅक्सी करून. मग टॅक्सी मिळेपर्यंत मी त्यांची विचारपूस केली. म्हटलं इतक्या उशिरा का घराबाहेर पडलात. तर म्हणाले, “मी रोज १०.३० ची बस पकडतो याच बस स्टॅन्डवरून पण आज जर उशीर झाला. बस चुकली. इथं माझी बहीण राहते, तिच्याकडे रोज रात्रीचं जेवण करून मी निघतो.’ देशपांडे नाव होतं त्या आजोबांचं. वय ८५ वर्षं. क्रॉफर्ड मार्केटच्या जवळ एका दुकानात ते अकाउंट्स पाहायचं काम करायचे आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्यांच्या धाकट्या बहिणीकडे दादरला येऊन जेवायचे आणि मग बसने घरी. बहिणीचे मिस्टर वारले, ती ८० वर्षांची एकटीच राहते आणि देशपांडे आजोबा पण बायको वारली म्हणून एकटे राहायचे. हे सगळं बोलणं चालू होतं आणि एक टॅक्सी थांबली, तू नातीसारखी भेटलीस, मदत केलीस म्हणून सारखे धन्यवाद देत ते टॅक्सीत बसून निघून गेले; आणि पुन्हा एकदा मी शांत आणि सुन्न झाले.

हे शहर वेगळंय. या शहरातल्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे शहर शिकवतं, घडवतं. फक्त ते बघायला जमलं पाहिजे. मी रोज शिकत होते, घडत होते. कामाच्या शोधात कित्येक वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या आणि इथे टॅक्सी चालवणा-या भैयांशी बोलून मला मुंबई कळत गेली. होस्टेलमध्ये उरलेलं अन्न रोज रात्री स्टेशनवर बसणा-या भिका-यांना द्यायला गेल्यावर मला एक नवीन मुंबई दिसली. दिवसभराची धावपळ संपल्यावर रात्री त्याच फूटपाथवर रांगा लावून झोपणारे, थंडीत कुडकुडणारे लोक पाहिल्यावर मला मुंबई कळत गेली. नाइट शिफ्ट करताना मुंबईच्या रस्त्यांवर रात्रभर फिरताना मला एक वेगळी आणि गूढ मुंबई कळत गेली. लालसिंग, सोनाली, अँजलिना आणि देशपांडे आजोबा या सगळ्यांची स्टोरी वेगवेगळी होती. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा होता, पण एक दुवा कायम होता, तो म्हणजे मुंबई! या शहरानं त्यांना हा संघर्ष दिला होता आणि त्याचबरोबर त्या संघर्षासाठी लागणारी ताकदपण दिली होती; आणि याच मुंबईनं मला या सगळ्यांशी भेटवलं होतं, मला आयुष्य नव्या अर्थानं शिकवलं होतं.

FB_IMG_1500963285470

मुंबईनं मला स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याबरोबर येणा-या जबाबदारीची जाणीवही. घरापासून लांब राहताना पदोपदी येणा-या अडचणींशी लढण्याची ताकद दिली. आजारी पडल्यावर बेडजवळ बसून राहणा-या आणि काळजी घेणा-या मैत्रिणी दिल्या. पैसे संपत आल्यावर घरातून पैसे मागायचे नाहीत असं ठरवल्यावर करायची काटकसर शिकवली. पुढे आजतक आणि इंडिया टुडे चॅनेलला जॉइन झाल्यावर मला अनेकदा महाराष्ट्राबाहेर शूटसाठी जावं लागायचं. मध्यरात्रीची फ्लाइट पकडताना एअरपोर्टला टॅक्सीनं एकटं जाताना नकळत वाटणारी भीती आणि त्या वेळी भेटलेले सगळे चांगले टॅक्सी ड्रायव्हर, वरळी सी फेसला मोग-याचे हार विकणारा ६ वर्षांचा गप्पीष्ट राजू, आणि रात्री ११ वाजता काम संपवून घरी जाण्यासाठी रोड क्रॉस करायला वाट पाहणारे ८५ वर्षांचे देशपांडे आजोबा! मुंबई क्षणाक्षणाला तुम्हांला शिकवते, सतत धावणा-या या शहराची गती पकडताना आपण इतके दमून जातो की आजूबाजूच्या कित्येक गोष्टींकडे आपलं लक्षं जात नाही. मुंबई जितकी मुक्त आहे तितकीच ती सक्त पण आहे. ती तुम्हांला जितकं देते त्याहून कितीतरी अधिक ती तुमच्याकडून घेते.

मुंबईनं मला बरंच काही दिलं, चांगली-वाईट माणसं भेटली, इतक्या मोठ्या शहरात एकटं राहताना येणा-या अनुभवातून मला हे शहर शिकवत गेलं. घडवत गेलं. जिवाला जीव देणारे संकल्प आणि सुशांत ह्यांच्यासारखे मित्र मिळाले. पण दिवस संपला की रोज काही प्रश्न पडायचे, का करतोय आपण हे सगळं? ही इतकी जीवघेणी धावपळ, दिवस कधी सुरू होतो कधी संपतो, याचा पत्ताच लागत नाही. असं किती काळ पळायचंय? आणि का? यातून मी किती कमावतेय आणि किती गमावतेय याचा हिशोब जेव्हा मी लावायला लागले, तेव्हा वाटलं आता कुठेतरी थांबायची गरज आहे. या वेगातून बाहेर पडायची गरज आहे. हे कधीच न थांबणारं चक्र आहे. यातून बाहेर पडलंच पाहिजे आणि अखेरीस आता स्वतःला वेळ द्यायचाय आणि quality life जगायचंय या विचारातून काही महिन्यांपूर्वी मी मुंबई सोडली. गुलजार यांची एक खूप सुंदर कविता आहे,

‘तुझको बेहतर बनाने की कोशिश में

तुझे ही वक्त नहीं दे पा रहे हम,

माफ करना ए जिंदगी

तुझे ही नहीं जी पा रहे हम’

असंच काहीसं माझं झालं होतं आणि असं आयुष्य जगणं मला शक्य नव्हतं.

मुंबई सोडून आता जवळपास एक वर्ष होईल. मी घरी आले. पुण्यात नवीन जॉब घेतला. आता ऑफिस संपलं की मी घरी जाते. आई-बाबांना भेटते. हा खूप वेगळा आनंद आहे. मुंबईत इतकी वर्षं राहून आल्यावर मला सुरुवातीला पुण्यात खूप slow वाटायचं. कंटाळा यायचा. पण आता मला माझा स्वतःचा असा वेळ मिळतोय आणि ते एक सुख आहे. आयुष्य एकदा मिळतं आणि ते quality जगायला मिळणं महत्त्वाचं. हे खूप कमी लोकांना कळतं, आणि मला ते कळालं याचा मला आनंद आहे. मला फिरायला खूप आवडतं आणि मी ते करतेय. मुंबई सोडल्यावर मी सोलो ट्रिप केल्या. राजस्थानला डेझर्ट ट्रेकला जाऊन आले. लग्नासाठी मुलगा निवडला आणि लग्नानंतर पण खूप फिरायचं आणि काम करत राहायचं असं ठरवून मी त्या दिशेनं मोर्चा वळवलाय.

मुंबईनं मला जे काही दिलंय, मला जे बनवलंय ते माझ्याजवळ आयुष्यभर राहील. मुंबईबरोबरचं माझं एक रोमँटिक नातं आहे आणि हे अफेअर कधीच संपणार नाही. मी अजूनही मुंबईला जाते, माझ्या आवडत्या साउथ मुंबईमध्ये मस्त एकटी फिरते, जहांगीर आर्ट गॅलरीत चक्कर टाकते आणि मरीन ड्राइव्हला बसून सूर्यास्त पाहते. मी जगाच्या कानाकोप-यात कुठेही गेले तरी हे सगळं नित्यनियमानं होत राहील. After all, Mumbai is not a name, it’s a feeling for me!!

अमृता शेडगे

FB_IMG_1500963213292

पत्रकार. पहिली नोकरी मुंबईत. आयबीएन लोकमतला उपसंपादक म्हणून रूजू. त्यानंतर एबीपी माझाला वृत्त निवेदक आणि बातमीदार म्हणून काम केलंय. आज तक आणि इंडिया टुडे इथे बातमीदार म्हणून काम केले आहे. सध्या पुण्यातल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेडसाठी कॉर्पोरेट अफेअर व्यवस्थापक म्हणून काम करते आहे.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s