मोकळीढाकळी मुंबई

अमिता नायगांवकर

सुरुवातीला शिक्षण आणि मग नोकरीनिमित्ताने जवळपास अडीच ते तीन वर्षे मुंबईत राहायला मिळाले जे आयुष्य बदलवायला पुरेसे ठरले. वाईसारख्या लहान गावातून आल्यावर सुरुवातीला मुंबई एकदम अंगावर आली. म्हणजे रस्त्यावर डिव्हायडर, फ्लायओवर्स, माणसांची तोबा गर्दी, वाहनांचा सतत राबता वगैरे बघून गरगरायला व्हायचे. अर्थात लहानपणापासून तीन काकांकडे सुट्टीत यायचो त्यामुळे मुंबईचे दर्शन झाले होते. पण ते मजा करण्यापुरते. तेव्हा बसमधून मुंबई पाहायला मिळाली तरी खूप आनंद व्हायचा. ट्रेनमधला प्रवास म्हणजे पर्वणी वाटायची.

गावात कसे रस्त्यावरून चालताना सारखे कोणी ना कोणी ओळखीचे भेटायचे. मुंबईच्या गर्दीत सुरुवातीला कोणीतरी ओळखीचे दिसावे म्हणून डोळे शोध घेत राहायचे. आता तर गावालापण इतकी गर्दी झाली आहे की तिकडेपण कोणी ओळखीचे दिसत नाही. आजकाल लहान गावातदेखील सहज म्हणून चालणे अवघड झाले आहे. लहानपणी मुंबईच्या चुलत भावाने शिकवलेला ‘रस्ते ओलांडताना पहिल्यांदा उजवीकडे पाहायचे, अर्धा रस्ता पार केल्यावर मग डावीकडच्या वाहनांचा अंदाज घेत उरलेला रस्ता ओलांडायचा’ हा धडा कायम लक्षात राहिला आणि मुंबईत व्यवस्थित गिरवला.  पुण्यात चालताना मात्र वेगळे धडे गिरवावे लागले. तिथे दोन्ही वेळा दोन्हीकडे पाहावे लागते, तरीही चालणारा जागोजागी तडमडतो.

मुंबई शहर तुम्हांला एकाच वेळी उच्चभ्रू जीवनाची ओढ लावते आणि गरिबीचे दर्शन येताजाता  देऊन तुमचे पाय  जमिनीवर ठेवते.  तुम्हांला जगभराचे भान देण्याचा अवकाश मुंबई देते. सुरक्षित वातावरणात राहून आमचे कसे छान असे वाटणा-यांनी या गर्दीत एक तरी डुबकी मारावीच. सर्व क्षेत्रांतील बरेचसे प्रथितयश लोक इथे राहतात. कदाचित दिल्लीखालोखाल? त्यामुळे देशातील सर्वोत्तम असेल ते इथेच असावे असे वाटते.  मुंबईत यायचे स्वप्न वगैरे नव्हते. पण जे शिकायचे होते त्यातील सर्वोत्तम संस्था मुंबईतच होती आणि मृण्मयीने तसा आत्मविश्वास दिल्याने पुण्यापेक्षा मुंबईला प्राधान्य दिले. दोन वर्षे हॉस्टेलला होते. पण फिल्डवर्क व इतर शैक्षणिक उपक्रम यांमुळे खूप भटकंती झाली. मुंबईतल्या चांगलं काम करणा-या बऱ्याच संस्थांचा परिचय झाला. कामाठीपुऱ्यापासून चित्ता कॅम्पपर्यंत अगदी डंपिंग ग्राउंडसुद्धा पालथे घातले. जव्हार-वाड्यातला आदिवासी भाग अभ्यासला. टीस संस्थेचा लौकिक मोठा होता, आहे. उत्तम प्राध्यापक होते. त्या वेळी इन्स्टिट्यूटमध्ये कोर्सेस कमी असल्याने ९०% विद्यार्थी कॅम्पसवरच राहायचे. हॉस्टेलमधले वातावरण एकदम सुरक्षित होते. भारतभरातून विद्यार्थी आलेले असल्याने समग्र भारताची प्रथमच ओळख झाली. आपले ते चांगले असले अभिमान गळून पडले. पुढे परदेशातील वास्तव्यात भारताची ओळख सांगताना त्याचा उपयोग झाला.  इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव कॅम्पसवर आपोआप झाला. मराठी बोलणारे अगदी हातावर मोजण्याइतके होते. त्यांच्याशी आवर्जून मराठीत बोलले जायचे. प्रत्येकाला आपल्या गावाचा आणि कसलाकसला अभिमान असतो. पण त्यापलीकडे जाऊन पाहण्याचा अवकाश आणि आपले मर्यादित विश्व व्यापक करण्याची दृष्टी मुंबईने दिली.

PICTURE BY GAJANAN DUDHALKAR (10)

मुंबईत येताना इथेच रहायचे वगैरे विचार केलेला नव्हता. पण गाव सोडल्याची जाणीव पक्की होती आणि ती अस्वस्थ करायची. पण अगदी केरळपासून मेघालयपर्यंतचे सहाध्यायी पाहिले की ते स्थित्यंतर सोपे वाटायचे. शिवाय मुंबईत तीनही काका, चुलत बहीण मृण्मयी रानडे, वाड्यातली दीपाली कुलकर्णी-गुहागरकर, अशी मायेची उबदार घरं होती. दीपालीकडे खास सीकेपी साग्रसंगीत जेवण वाट पहात असायचे. अशोककाकाने आणि मृण्मयीने तर माझे पालकत्वच घेतले होते. त्यामुळे होमसिकनेस खूप सुसह्य झाला. काकाकडे केव्हाही मुक्कामाला गेले तर हास्यकल्लोळ चालू असायचा. काका काहीतरी पदार्थ हमखास करायचा आणि ‘हे दे गं, ते त्या डब्यातलं आणून दे गं’ करून मला कामं सांगायचा. काकू रागवायची, ‘तिला कशाला कामं सांगता?’ तर काका खट्याळपणे म्हणायचा, ‘अगं, त्याशिवाय तिला घरी आल्यासारखं कसं वाटेल?’  पहिल्या वर्षी वाढदिवसाच्या नेमक्या दुसऱ्या दिवशी परीक्षा होती.  गपगुमान लायब्ररीत अभ्यास करत बसले होते आणि अचानक मृण्मयी शोधतशोधत आली आणि मला हळूच जेवायला बाहेर घेऊन गेली. फारच भारी सरप्राइझ. तिच्याकडे मुक्कामाला गेले की तिचे छान इस्त्री केलेले, भरतकाम, पेंटिंग केलेले ड्रेस, प्रसंगी साड्या घेऊन जायचे. बोरिवलीला गेले की काकू निघताना भरपूर खाऊ बांधून द्यायची. आईने तर एकदा लाडू कुरियर केले. आपलाच खाऊ डॉर्ममध्ये चोरून खाण्यासाठी फार कौशल्य मिळवावे लागले.

गाव आणि घर सोडल्यानंतरचा तुमच्याबरोबर एकटेपणा कायम राहतो. पुन्हा पुन्हा गावी जात राहिलात तरी. ‘यू कॅन नेवर गो होम अगेन’ म्हणतात तसे काहीतरी. सुरुवातीला गावाला जाणारी नुसती बस दिसली तरी मन ­उचंबळून यायचं. पहिल्या वर्षी रूरल कॅम्पहून येताना ट्रेन पुण्यातून जाणार होती. रात्री अगदी थोडा वेळ पुणे स्टेशनवर थांबणार होती. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. घरची खूप आठवण येत होती. आयत्या वेळी विचार केला चला शेवटच्या बसने गावाला जाऊ या. बस स्टेशनपण शेजारीच. प्राध्यापक आणि ग्रूप ह्यांना सांगून बाहेर पडले खरी पण माझी बस थोडक्यात हुकली. ती शेवटची बस. चडफडत आणि रडतरडत परत प्लॅटफॉर्मवर आले. ट्रेन होतीच. सगळे हळहळले. एवढ्यात माझे बाबा मला शोधत दत्त म्हणून समोर उभे. मला अक्षरश: धन्यधन्य झाले. त्यांना माझा बेत माहीत नव्हता ना मला त्यांचा. मोबाइलचा तर सवालच नव्हता. कॅलेंडरवर रेल्वेचे टाइम-टेबल शोधून मला केवळ पंधरा मिनिटे भेटण्यासाठी म्हणून ते तिथपर्यंत आले. सगळेच जण तेव्हा हेलावून गेले होते.

हॉस्टेलच्या डायनिंगला सुट्टी असताना सर्वांना पैसे वाचवायची हुक्की आली. अख्खा ग्रूप दोनदा बी.ए.आर.सी.च्या हॉस्पिटल कॅँटिनमध्ये जेवायला गेलो, केवळ पाच रुपयात जेवण म्हणून. हॉस्टेल लाइफवर एक स्वतंत्र लेख होईल. कल्चर शॉक इन्स्टिट्यूटमध्येच जास्त बसला. त्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेची माझी तयारी मृण्मयीताईने छान केली होती. मेक ओव्हरही तिनेच केला. अर्थात हे वरवरचे बदल. विचारांत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. अभिरुची बदलली. साहित्याशी परिचय होताच. कपडे, सिनेमा, नाट्य यांतील अभिजाततेशी परिचय झाला. लायब्ररीने भारताबाहेरचे जग दाखवले. उदारमतवाद जगण्यासाठी मुंबई उत्कृष्ट जागा आहे. तसा तो कोणीही कुठेही जगावाच, जगता येतोच. पण तसे समविचारी, समान मूल्य बाळगणारे लोक इथे सहजपणे भेटू शकतात. त्यातून होणारे वैचारिक आदानप्रदान तुमची प्रगल्भता वाढवत नेते.  मुंबईच्या वातावरणात एक सहजपणा, मोकळेपणा आहे. अर्थात शहरी राहणीमान आणि आधुनिक आचारविचारांशी परिचय होत असूनही टाकाऊ रुढी परंपरा पाळणारे कर्मठ लोक इथेही आहेतच.

PICTURE BY GAJANAN DUDHALKAR (1)

फिल्डवर्कमुळे आठवड्यातले दोन दिवस धारावी, मुंब्य्रात पडीक असायचो. पापड, जरीकाम, चर्मोद्योग यांसारखे वेगवेगळे उद्योग तिथे पाहिले. धारावीतले चिंचोळे बोळ आणि टिचभर खोल्यांत, पोटमाळ्यावर मांडलेले संसार पाहून सुरुवातीला धक्का बसला. गावाकडचे वाडे, ऐसपैस घरे आठवायची. नंतर सवय होऊन गेली. रात्रीच्या धारावीचे दर्शन मात्र दारुडे, गर्दुले असे शहारा आणणारे होते. पावसाळ्यात तिथल्या छोट्या गटारांचे बघताबघता मोठे नाले व्हायचे आणि आपण आता त्यात वाहून जातो का काय असे वाटायचे. भारतभरातील खेडी इथल्या वस्त्यांमध्ये एकवटलेली सापडतात. त्यात्या ठिकाणची संस्कृती त्यांनी मुंबईत जपलेली असते. गावाकडची बंधने इथेही कायम ठेवायचा अट्टाहास ठेवतात. त्यामुळे धारावीतून अगदी दादरपर्यंतसुद्धा न गेलेल्या कितीतरी मुली पाहिल्या. ग्रामीण भागात जपले जाणारे आदरातिथ्य मुंबईतील वस्त्यांमध्येही असोशीने पाळले जाते. मुंबईतील लोक जागेचा कधीच बाऊ करत नाहीत. कमी जागेतदेखील पुष्कळ माणसांना सामावून घेण्याचा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे असतो.  शहरीकरण, नियोजन, नागरी वस्त्यांमधील समस्या हे विषय अभ्यासाला असल्याने त्याचा जवळून अभ्यास करता आला.

मुंबईच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठी भूमिका पार पाडणारा अल्प उत्पन्न वर्ग विशेषत: स्थलांतरित गरीब वर्ग किमान मूलभूत सुविधांपासूनदेखील वंचित राहतो. हे सर्व अभ्यासताना, काम करताना प्राध्यापकांबरोबरच भाऊ कोरडे, ज्युलिओ रिबेरो, नीला लिमये यांसारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळाले. चळवळीतल्या लोकांची तळमळ जवळून पाहता आली. आपल्या छोट्या आयुष्यापलीकडे एक फार मोठे जग आहे ज्याच्याशी आपण जोडून घेऊ शकतो, याची जाणीव अभ्यासामुळे झाली. दारिद्र्याचे वेगवेगळे स्तर अभ्यासता आले. कॉलेजमधे उत्तमोत्तम अभ्यागत व्याख्याते बोलावले जात. अरुणा रॉय, हरीश शेट्टी, विवेक पंडित, आनंद पटवर्धन, मेधा पाटकर अशा नामवंत लोकांना सहजपणे ऐकता आले. कै. डॉ. धनागरेंची पुस्तकं अभ्यासाला होती. त्यांना एका परिषदेत भेटल्यावर फार छान वाटले. नोकरीत असताना एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. ती काही पुस्तके देणार होती. ती आणि तिचा मित्र लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांच्या नात्यातील सहजता आणि स्पष्टता हे प्रेमाची एक छान व्याख्या शिकवून गेले. या महानगरात नाती सहज जुळतात, काही काळ रेंगाळतात, काही टिकतात, काहींची मोडतोड होते, काही नव्याने बदलास तयार होतात. या सगळ्यामागची अपरिहार्यता आणि अगतिकता पाहून कधीकधी सुन्न व्हायला व्हायचे.

मुंबईत मराठी संस्कृती कमी जाणवली. संस्कृती हा शब्दच आता खरे तर वादग्रस्त झाला आहे, कारण जग आता खूप जवळ आले आहे किंबहुना एकमेकांत बेमालूमपणे मिसळले आहे. परप्रांतीय मित्रमैत्रिणींना अस्सल महाराष्ट्रीय असे इथे काय दाखवावे हा प्रश्न पडायचा. अर्थात असे अस्सल विचारणारे पण तुरळकच. लोणावळा पाहणे, पुरणपोळी-वडापाव खाणे, गणपतीत नाचणे आणि ‘ढगाला लागली कळ’ चा अर्थ समजून घेण्यातच बऱ्याच जणांना रस असायचा. मुंबईचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असे आहे की त्यामुळे ती केवळ मराठी माणसांची असत नाही. बहुप्रांतीय, बहुभाषिक आणि बहुसंस्कृत असण्यातच तिचे सौंदर्य आहे आणि त्यामुळेच ती सर्वांना सहज सामावून घेते.  पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेंसीमधे येणाऱ्या बडोदा, बेळगाव यांसारख्या भागातील लोक मुंबईला अजूनही बॉम्बेच म्हणतात.

विद्यार्थी असल्याने मुंबईत खाद्यभ्रमन्ती फारशी केली नाही. त्याची चुटपुट आहे. बडे मियाँ मात्र लक्षात राहिले. लहानपणापासून पुण्यात खरेदी व्हायची. मुंबईतील वैविध्य आणि नावीन्य पाहून पुणे हळूहळू मिळमिळीत आणि फार टिपिकल वाटू लागले. दक्षिण मुंबईत भटकल्यावर तिची खरी भव्यता, ऐतिहासिकता आणि नजारा कळतो. ‘अरे ते तर मुंबईचं डाउन टाउन होतं’ असा परदेशात गेल्यावर साक्षात्कार झाला. मुंबईला एक ग्लॅमर आहे ज्याचा कायम मोह पडतो. मुंबई आठवली की क्रॉफर्ड मार्केट, जहांगीर आर्ट, खादी भांडार, गेट वे, एशियाटीक सोसायटी, फ्लोरा फाउंटन, फोर्ट, कुलाबा या भागात केलेली भटकंती हटकून आठवते. नेहरू सेंटर, हाजी अली, महालक्ष्मीला बऱ्याचदा गेले. अर्थात हे सर्व विद्यार्थी असल्याने शक्य झाले.  ट्रेनचा प्रवास खूप एन्जॉय केला. डबा मोकळा आहे म्हणून चुकून पहिल्या वर्गात जाऊन बसण्याचा बालिशपणाही करून पाहिला. ट्रेनमध्ये छुटकुमुटकू खरेदी करायला फार मजा यायची. म्हाडाजवळून जाताना साहित्य सहवासमध्ये डोकवावेसे वाटायचे. पण कुणाकडे, कशाला व कोणत्या निमित्ताने ते न कळल्याने पाय मागे फिरायचे. मुंबईत तेव्हा वर्ल्ड सोशल फोरम झाले होते. त्यात भाग घ्यायला मिळाला. शिवाजी नाट्य मंदिर आणि पृथ्वी थिएटरला मोजकी पण उत्तम नाटके पाहिली. आपले आवडते कलाकार मुंबईत सहज वावरताना दिसतात. सुरुवातीला त्याचे खूप अप्रूप वाटायचे.  हिंदू कॉलनीत किंवा पारसी कॉलनीत एकदा तरी राहायला मिळावे असे वाटले. एकदा मात्र पावसात लांबच्या ट्रेनमध्ये अडकले आणि रुळांवरून सामानासकट बरेच चालत जावे लागले, तेव्हा एरवी सुरक्षित वाटणारे हे शहर भेसूरही होऊ शकते याची खाडकन जाणीव झाली.

रात्रीची मुंबई अनुभवल्याशिवाय मुंबईत राहिलो असे म्हणता येणार नाही. हॉस्टेलमधल्या ग्रुपबरोबर डिस्कला जाऊन थिरकणे, येताना रात्रीच्या समुद्राचा गार वारा अनुभवणे आणि डोक्याची चंपी करून घेऊन हॉस्टेलला येऊन झोपण्याचा अरभाटपणाही करून बघितला. अर्थात मुंबईच्या बीचचे कसले कौतुक? कोकण पाहिलेल्या माणसाला तर नाहीच नाही. पण समुद्र न पाहिलेल्या, उत्तरेकडून आलेल्या तमाम जनतेला त्याचे साहजिकच अपार प्रेम. भारतात दुर्दैवाने बऱ्याच राज्यांत मुलींना संध्याकाळी बिनधास्त फिरण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे मुंबईत आल्यावर बऱ्याच जणींना त्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असायचा. त्यामुळे दिल्लीपेक्षा मुंबईला प्राधान्य दिले जाते. अर्थात अशा स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत बहकत जाणारेही खूप होते. इथल्या जगण्यातली असुरक्षितता माणसाला कोणत्याही थराला नेऊ शकते, हे जवळून पाहिले. एक रूममेट शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठीच्या संस्थेत फिल्डवर्कला जायची. सुरुवातीला त्यांच्याबद्दल खूप भावुक होऊन बोलायची. मुंबईच्या स्वतंत्र आयुष्याला आणि चैनीत राहायला ती हळूहळू इतकी चटावली की मुंबईत राहणे परवडावे ह्यासाठी ही शरीरविक्रय करायला लागलीये का काय, असा आम्हां बाकीच्या रूममेट्सना दाट संशय यायला लागला. नव्हे नंतर आमची खातरीच झाली. प्रबोधन कोणी कोणाचे केले कोण जाणे.

हॉस्टेलवर आणि मग पेइंग गेस्ट म्हणून राहिल्यामुळे मुंबई जास्त चांगली अनुभवता आली. पेइंग गेस्ट असताना वीकएन्डला ब्रेकफास्ट कधी घरी केला, तर घरमालकीण अर्थातच त्याचे वेगळे पैसे लावायची. तरी हे ठीकच म्हणायचे, कारण पुण्यात मोबाइल चार्जिंगचे महिन्याला पन्नास रुपये वेगळे आकारले जातात असे आणि तत्सम भन्नाट अनुभव मैत्रिणींकडून ऐकले होते. तर या घरमालकिणीला श्रवणदोष होता. एकटीच असल्याने सोबत म्हणून पेइंग गेस्ट ठेवायची. आपल्या मस्तीत मस्त जगायची. राहायची उत्तम. टाइट फिटिंगचे कपडे शिवण्याचा मला सारखा आग्रह करायची आणि मी त्याकडे दुर्लक्ष केले की मला ओल्ड फॅशन्ड म्हणायची. टीव्ही एवढ्या जोरात लावून ठेवायची की ऑफीसमधून घरी आल्यावर बऱ्याचदा गॅलरीतून हाका मारायला लागायच्या. त्यावर कडी करत बाईसाहेब म्हणायच्या, ‘कितनी जोर से चिल्लाती हो तुम?’ आणि सुदैवाने श्रवणयंत्र लावलेले असेल, तर गल्लीत लांब भूंकत असलेला कुत्रासुद्धा तिची झोप उडवायचा.

मुंबईला प्रचंड वेग आहे. वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. संधींची उपलब्धता आहे.  इथे मिळणारे एक्स्पोजर, अनुभव एकदम ताजे असतात. स्वतःला छान मोल्ड करता येते. आपापल्या क्षेत्रात सहजपणे अपडेट राहणे शक्य होते. तरुण वयात याचे खूप आकर्षण वाटते. मुंबईत वाढलेल्यांना यातील बऱ्याच गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात याचा हेवाही वाटतो. मुंबईतील वास्तव्य आपली जीवनदृष्टी बदलून टाकते. प्रोफेशनलिझम शिकावा तर मुंबईतच.  वैविध्यतेचा आदर करावा, त्याला प्रोत्साहन द्यावे हेही इथेच समजले. कठीण प्रसंगाचा सामना करण्याचे धैर्य मिळाले.  तुमच्या कर्तृत्ववान पूर्वजांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगून इथे तुम्ही जगू शकत नाही. तुम्हांला स्वत:ला सतत सिद्ध करावे लागते.  इथल्या अनोळखी जगात वावरताना तुम्ही स्वत:ला हळूहळू नीट ओळखू लागता. शिष्टाचार शिकण्यासाठी मुंबईलाच जायला हवे असे नाही. पण लोकांच्या वेळेची किंमत असते, त्याचे भान ठेवावे, उगाच अचानक न सांगता, न ठरवता कोणाकडे पाहुणा म्हणून धडकू नये; या साध्या गोष्टीचे महत्त्व मुंबईकरांचा दिनक्रम पाहिला की आपसूक लक्षात येते आणि चांगल्या सवयी अंगी बाणवल्यावर त्या कुठेही उपयोगी पडतातच.

या सगळ्या आकर्षणांमुळे मुंबई माझ्यात भिनायच्या आतच दोन वर्षे सरली आणि मी पास आउट झाले. म्हणजे प्रेमात नीटपणे पडायच्या आतच प्रेमभंगाचे दु:ख झाल्यासारखे झाले. पण तरीही आयुष्याच्या उमेदीच्या काळात मुंबईने जे दिले, शिकवले त्याला तोड नाही. नंतर खेडेगावात राहून नोकरी करताना मिटिंग्ससाठी बॉम्बे हाउसला वरचेवर जाणे व्हायचे.  पंचवीस उंबऱ्यांचे गाव ते मुंबई असा प्रवास फार विस्मयकारक वाटायचा.  शहराची ओढ लागलेली असायची. नंतर पुण्यात आल्यावर जग फारच लहान व संकुचित वाटू लागले. मनातल्या मनात कायम पुण्याची मुंबईशी तुलना व्हायला लागली. अर्थात मुंबईत वैविध्य असल्याने पुण्यासारखा एकजिनसीपणा नाही. त्यामुळे आमची मुंबई असे कितीही म्हणालो, तरी पुणे अजूनही जसे आपले वाटते तसे मुंबईचे होत नाही.

नोकरीनिमित्ताने राहताना नोकरदार मुंबईकराच्या रोजच्या आयुष्याची आणि आव्हानाची ओळख झाली. अनेक मुंबईकरांना पर्याय नाही म्हणून ते रेटत राहतात.  जगण्याचा प्रचंड वेग, धावपळ, बकालपणा, स्पर्धा, ट्रॅफिक, ताणतणाव, अति वेगाने येणारा शीण हेही इथे आहे; जे जास्त त्रासाचे ठरते. नोकरी करताना जाणवले की या शहरात डोक्यावर छप्पर असणे ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि ती आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात राहिलेली नाही. नव्याने मुंबईत येणाऱ्यांना घर विकत घेणे ही फार अवघड गोष्ट आहे.  पुढे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताना आपण कधी काळी या शहरातला एक बारीकसा तरी ठिपका होतो का या, विचाराने भरून आले. परदेशात राहताना मनात कायम एक उपरेपणाची जाणीव मनात असते. आपण तिथे कितीही स्थानिक झालो, मिसळलो तरी. कधीकधी ती जाणीव स्थानिक लोकांच्या नजरेतून व्यक्त होऊन ठळकदेखील होते. मुंबईत मात्र ट्रेनमधल्या रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांच्या नवख्या मुलींकडे पाहण्याच्या नजरा सोडल्या तर अशी उपरेपणाची जाणीव कधी होत नाही. कारण सर्व प्रांतांतले लोक असले, तरी सगळे एकाच समूहाचे भाग असतात, एकाच बोटीचे प्रवासी असतात. वरील सर्व निरीक्षणे वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत. त्यामागे आकस नाही.

आता तर मुंबई खूप दूर राहिली. असे म्हणतात की तुमचे जन्मगाव तुम्हांला कायम ओढ लावते, तुम्हांला कायम साद घालत असते. त्यामुळेच बहुतेक ती ओढ आणि ते आकर्षण अजूनही कायम आहेच.

अमिता नायगांवकर

20170430_080932

लेखिकेला व्यावसायिक सामाजिक क्षेत्रात काम करायला मनापासून आवडते आणि तशी संधी नसते तेव्हा ती वाचते, फिल्म्स पाहते आणि झोप पूर्ण करते.  कामाचा भाग म्हणून वाचन करायचे असते, तेव्हा ती अशी संधी सोडत नाही.

फोटो – गजानन दुधाळकर

One thought on “मोकळीढाकळी मुंबई

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s