वो ख्वाबों के दिन…

दिनेश गुणे

हा लेख लिहायचं ठरवलं, तो दिवस आणि मी प्रत्यक्षात आत्ता लिहायला बसलो, तो दिवस यांमध्ये तीन आठवड्यांचं अंतर आहे. या तीन आठवड्यांत मी काहीसा तळमळत होतो. लेख लिहायचाय, पण ‘सिच्युएशन’ सापडत नाहीये असं काहीसं झालं होतं. आज नकळत सगळं जमून आलं, आणि बोटं चालायला लागली…

एखाद्या चांगल्या सिनेमातल्या प्रसंगांसोबत पुढे सरकणारा प्रत्येक क्षण तसाच जगायचा असेल, तर तो सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्येच जाऊन बसावं लागतं, तसं काहीसं माझं झालं. जवळपास ३५ वर्षांपूर्वी, मुंबईत पहिलं पाऊल ज्या घरात टाकलं, त्या घरी, अंधेरीला मी आत्ता मुद्दाम आलोय. त्या वेळी ज्या जागेवर बसून बेडरूमच्या बाल्कनीच्या दरवाज्यातून समोरची, रस्त्यापलीकडच्या बंगलीच्या आवारातली झाडं निरुद्देशपणे न्याहाळत तासन्‌तास घालवलेत, त्याच जागेवर बसलोय, आणि बाल्कनीच्या दरवाज्यातून बाहेर पाहत तीच, पस्तीस वर्षांपूर्वीपासूनची झाडं पुन्हा एकदा जुन्याच नजरेनं न्याहाळतोय…

हा अनुभव विलक्षण आहे. हा लेख लिहायला घेण्याआधी याच जागेवर बसून मी काही मिनिटं डोळे मिटून स्वस्थ झालो, आणि पस्तीस वर्षं मागे गेलो. पस्तीस वर्षांपूर्वीच्या त्या, पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या आठवणीचा प्रत्येक क्षणाचा पट मनात जिवंत होत गेलाय. बेडरूममधली ही जागा मला पस्तीस वर्षं मागे घेऊन गेली, आत्ता मी पस्तीस वर्षांपूर्वीच्या त्या, पहिल्या दिवसाची सफर करतोय… रिमझिमता पाऊस अंगावर झेलत बाहेरची झाडं डोलू लागली आहेत. तेव्हा लहानशी, तरुणाईनं सळसळणारी आणि हिरवाईनं बहरलेली तीच झाडं आज वयोमानाप्रमाणे काहीशी अस्ताव्यस्त झाली आहेत, पण ओळख विसरलेली नाहीत… पंधरावीस वर्षांपूर्वी रस्त्याकडेला लावलेलं बकुळीचं रोपटंही आता मोठ्ठं झाड झालंय… म्हणूनच, त्या, मागे गेलेल्या काळातल्या एकटेपणातल्या त्यांच्या सोबतीचा पुनरानंदही आज मला अनुभवता येतोय…

हे सगळं जमून आलं, आणि मला वाटलं.. लेख लिहिण्यासाठीची ‘सिच्युएशन’ म्हणतात, ती हीच!…

IMG_6206

आणि मी लॅपटॉप उघडला… आसपासच्या वर्तमानाला मनातल्या मनात मागे टाकून मी पुन्हा डोळे मिटलेत. त्या दिवशी, याच वेळी मी काय करत होतो, ते मला मिटल्या डोळ्यांपुढे लख्ख दिसतंय…

… खरं तर आपण कधीकाळी मुंबईत येऊन स्थिरावू असं मला त्याआधी कधी स्वप्नातही मान्य नव्हतं. सकाळी पळापळ करत उठायचं, धावत बस पकडायची, आणि आठ सत्तेचाळीस, नऊ तेरा, अशा काट्याच्या हिशेबीपणानं धावत फलाटावर उभं राहून जिवाच्या आकांतानं ट्रेन पकडून घामाघूम होऊन कामावर जायचं, संध्याकाळी तशीच कसरत करत घरी परतायचं आणि दुस-या दिवशीच्या धसक्यानं रात्र तळमळत घालवायची. आपल्याला हे कधीच जमणार नाही, म्हणून चुकूनही मुंबईकडे फिरकायचं नाही याची पक्की खूणगाठ मी गावाकडे असतानाच मनाशी बांधून टाकली होती. तसं त्याआधी एकदोन वेळा मुंबई दर्शन घडलं होतं, पण ते ‘पाहुणा’ म्हणून… मे महिन्याच्या एखाद्या सुट्टीत, मी गिरगावातल्या भटवाडीत मावशीच्या घरी यायचो. माझी मावसभावंडं, आम्हां भावंडांच्याच वयाची, त्यामुळे मे महिना सुरू होण्याआधीच सुट्टीचा प्लॅन ठरलेला असायचा, आणि ‘जिवाची मुंबई’ करायची हे नक्की झालं की गावाकडच्या कुणा मुंबईकराची सोबत बघून आमचं ‘पार्सल’ मुंबईला रवाना केलं जायचं. ते इथं घरपोच झालं, की सुट्टीचा उपभोग सुरू व्हायचा. पण ते सारं डोळे मिटूनच… म्हणजे, सकाळ-संध्याकाळी, कधीही घराबाहेर पडायचं झालं, तर मावसभावाचा हात पकडायचा, तो नेईल त्या रस्त्यानं जायचं, सांगेल त्या बसस्टॉपवर थांबायचं, ‘उतर’ म्हणाला की उतरायचं, थोडंफार चालून काहीतरी पाहायचं, आणि पुन्हा हाच क्रम उलटा करून घरी परतायचं!… असं दोनतीन आठवडे केलं की जिवाची ‘मुंबई मुंबई’ होऊन जायची, आणि आमचं पार्सल पुन्हा कुणातरी ओळखीच्याच्या सोबतीनं गावाकडे रवाना केलं जायचं. तेव्हा मुंबईच्या धकाधकीची ओळख व्हायचं काहीच कारणही नव्हतं, म्हणून मुंबईची मजा वाटायची. पुढे मात्र, गावाकडे येणा-या चाकरमान्यांकडून त्यांची ‘हालत’ ऐकायला मिळू लागली, आणि आम्ही भविष्याच्या नियोजनातून मुंबईवर फुली मारून टाकली…

गौरी-गणपतीला, शिमग्याच्या सणाला गावात मुंबईकर चाकरमान्यांची गर्दी दिसायची. चकचकीत कापडाची बेल बॉटम पँट, रंगीबेरगी शर्ट, खास बॉम्बे स्टाइलचं बोलणं आणि अगदीच भारी म्हणजे, गळ्यात अडकवलेल्या ट्रान्झिस्टरमधे मोठ्या आवाजात गाणी वाजवत गावभर फिरणं,  यामुळे गावात आलेला हा चाकरमानी सहज ओळखू यायचा, लक्ष वेधून घ्यायचा… पण त्याची गंमतही वाटायची. असा चाकरमानीपणा आपल्याला जमणारही नाही आणि करायचाही नाही, हेही ठरवून टाकलं…

… पण कोकणातल्या प्रत्येक माणसाला त्या काळी तसं करता येत नव्हतंच. शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा कुटुंबाची निकड वाढल्यावर, थेट मुंबई गाठावीच लागायची. मीही कोकणातल्याच गावातला, त्यामुळे आपल्याला मुंबईचा आसरा अपरिहार्य आहे, हे कळायला, शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा आणि नंतरच्या काही दिवसांतल्या स्थिरावण्याच्या धडपडीचा काळ जावाच लागला…

आणि आपल्याला जे काही करावंसं वाटतंय, ते गावात करताच येणार नाही हे जाणवल्यानंही अखेर मुंबईचा रस्ता धरावाच लागला.

पस्तीस वर्षांपूर्वी, एका दिवशी मी मुंबईला यायला निघालो, आणि मी गाव सोडून मुंबईला जाणार, ही बातमी बघताबघता गावात पसरली. काखोटीला मारलेली कपड्यांची पिशवी घेऊन मी आईवडिलांसोबत एसटी स्टॅन्डवर आलो, तेव्हा किमान पंधरावीस जण अगोदरच तिथं आले होते; निरोप द्यायला!… तेव्हा मुंबईला जाणा-या एसटीभोवती असाच गराडा असायचा. गाडी सुटेपर्यंत प्रत्येक प्रवाशाचे नातेवाईक बाहेरून निरोपाचे उपचार पार पाडताना हमसून जात असत… गाडी सुरू झाली की पुन्हा गलका व्हायचा, आणि ‘पोचल्यावर पत्र पाठव’, हा संदेश जणू सामूहिक आवाजात गाडीभोवती घुमायचा.

त्या संध्याकाळी तो माझ्याही कानात घुमला, आणि मी मुंबईसाठी गाव मागं सोडलं…

गावातल्या शाळेच्या शिपायाचा मुलगा मुंबईला कुठल्या तरी दुकानात ‘काट्यावर’ काम करायचा. त्याच्या सोबतीनं मी मुंबईला यायला निघालो होतो. पहाट फटफटायच्या आधीच कधीतरी आमची गाडी दादरला थांबली आणि त्या चाकरमान्याच्या पाठोपाठ मीही गाडीतून उतरलो. हे काय आहे, कुठलं स्टेशन आहे, आता इथून कसं जायचं, हेही मला माहीत नव्हतं. त्याच्या पावलावर पाऊल टाकत मी दादरला पोचलो, त्यानंच तिकीट काढून माझ्या हातात दिलं आणि आम्ही फलाटावर आलो. मला अंधेरीला जायचं होतं. मुंबईत पत्रकार असलेला माझा भाऊ आदल्याच वर्षी पत्रकारिता करण्यासाठीच मुंबईहून अमेरिकेत गेला होता, आणि मी कोकणातल्या गावातून पत्रकार होण्यासाठी मुंबईत दाखल झालो होतो. आमच्या घरातली ही तेव्हाची दोन मोठी स्थलांतरं!… मुंबईतलं भावाचं घर रिकामंच होतं, त्यामुळे राहण्याच्या सोयीचा सवालच नव्हता. सोबतीच्या चाकरमान्यानं मला त्या पहाटे फलाटावरच्या इंडिकेटरची पहिली ओळख करून दिली. फाफटपसारा न लावता तो म्हणाला, ‘ए’ म्हणजे अंधेरी. या इंडिकेटरवर ‘ए’ लिहिलेलं दिसलं की अंधेरी गाडी येणार.. त्यात चढायचं, म्हणजे, उतरायचा गोंधळ नाही… मी मान हलवली, आणि इंडिकेटरवर ‘ए’ दिसेपर्यंतच्या सा-या गाड्या सोडून अंधेरीला जाणारी गाडी पकडली. हा माझा पहिला ट्रेनप्रवास… त्याआधीच्या मुंबई भेटीत बस हेच प्रवासाचं साधन होतं…

FullSizeRender_1

गाडी अंधेरीला रिकामी झाली, तरीही बाहेर उजाडलेलं नव्हतंच… मी खिशातला पत्त्याचा कागद काढला, गाडीतून उतरून स्टेशनवरच्याच स्टॉलवाल्याजवळ गेलो, आणि ‘पूर्व-पश्चिम’ ही काय भानगड असते त्याचा उलगडा करून घेतला. आपण पश्चिमेच्याच बाजूला आहोत, आणि इथूनच रिक्षा केली की घर गाठता येईल, याची खात्री पटल्यावर मी स्टेशनवरून बाहेर पडलो, आणि समोरच्याच एका रिक्षात बसून त्याला आदेश दिला… ‘चलो अनिता अपार्टमेंट! ’…

पहाटेपहाटे ‘असा’ पहिलाच प्रवासी भेटल्यानं त्याला बहुधा तेव्हा आनंद झाला असावा. – हे मला पुढे खूप वर्षांनंतर, मुंबईत हळुहळू रुळतोय असे वाटू लागल्यानंतर – उमगलं. त्यानं काहीसं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं, आणि शरीराला पीळ देत मान मागे करून त्यानं माझ्या हातातला पत्त्याचा कागद पाहिला. ‘मतलब, चार बंगला जाना है…’ तो म्हणाला, आणि मी मान हलवून होकार दिला. बरेच गल्ल्याबोळ पालथे घालत, उलटसुलट चकरा मारत त्यानं मला चार बंगलाच्या सिग्नलला सोडलं, तेव्हा उजाडलं होतं. पैसे देऊन मी उतरलो. कोप-यावरचा पानवाला उघडला होता. दोनचार गि-हाईकंही पानाची ऑर्डर देऊन ताटकळली होती. मी तिथं गेलो, आणि पुन्हा त्यांच्यासमोर पत्त्याचा कागद मोठ्यानं वाचला… एकानं तोंडातली पानाची पिंक पिचकारीनं थुंकून मला हातानंच दिशादर्शन केलं, आणि त्याचे आभार मानून मी रस्ता पकडला.

पुढच्या तीन मिनिटांत मी ‘अनिता अपार्टमेंट’मधल्या आमच्या घराच्या बाहेर उभा होतो…

मी पिशवीतून किल्ली काढली. त्याच क्षणी मला काहीतरी वेगळं जाणवू लागलं… आता आपण मुंबईकर झालो. गाव सुटला, या जाणिवेनं गलबलून आलं, आणि गाडीत बसण्याआधीची गावाकडची ती शेवटची संध्याकाळ झर्रकन माझ्या मनातून समोर आली…

मुंबई गाठण्याच्या आदल्या दिवशीची ती संध्याकाळ… मी गावाकडच्या मित्रमंडळींसोबत शाळेच्या माळावर गप्पा छाटत बसलो होतो. त्या वेळी तसा ‘रिकामटेकडा’च असल्यानं, घरी जायचीही फारशी घाई नव्हती. तिन्हिसांजेचा उजेडही हळूहळू कमी कमी होत गेला, तरी आमच्या गप्पा रंगतच चालल्या होत्या… त्याच वेळी, एक अनोळखी मानवी आकृती आमच्या दिशेनं येत असल्याचं आमच्या लक्षात आलं, आणि गप्पांचा सूर थोडा खाली आला. ती आकृती जवळ आली. आमच्या कोंडाळ्यात बसली आणि त्यानं आपली ओळख करून दिली… ते नाव आम्ही ऐकलेलं होतं. रत्नागिरीचा एक पत्रकार होता. दोन मिनिटं ओळखीचा उपचार पार पडल्यावर त्यानं मला बाजूला घेतलं आणि तो कानाशी कुजबुजला… ‘तुला उद्याच्या उद्या मुंबईला जायचंय. गडकरींचा निरोप आहे… उद्या ऑफिसात भेटायला त्यांनी सांगितलंय’…

आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा हाच क्षण आहे, हे मी लगेचच ओळखलं आणि गावाकडच्या त्या जिवाभावाच्या मित्रांचा निरोप घेऊन मी ताडकन उठलो.

प्रसंगाचं गांभीर्य बहुधा मित्रांनाही कळलं असावं… तेही माझ्यासोबत उठले. आम्ही घराकडे चालू लागलो. माझ्या घरी पोचेपर्यंत कुणीच एकमेकांशी काहीच बोलत नव्हतं…

एक धागा तुटणार, हे आम्ही सर्वांनीच ओळखलं होतं.

IMG_6208

मुंबईला जाणारी गाडी सुटायला तासभराचा अवधी होता. तेव्हा रोज रात्री एक गाडी गावातून मुंबईला यायची. रोजच्या रोज मुंबई गाठणारी ही बस रोजच भरलेली असायची. मुंबईत दररोज हजारोंचे लोंढे दाखल होतात,आणि ही महानगरी त्यांना सहजपणे सामावून घेते, हे वास्तव त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा अनुभवायला मिळत गेलं, तेव्हा गावाकडून येणारी ती गाडी रोज भरलेली कशी, या प्रश्नाचं उत्तरही मिळालं… तर, मी घरात गेलो, आणि आईवडिलांना गडकरींच्या निरोपाविषयी सांगितलं. अनपेक्षितपणे समोर आलेल्या त्या क्षणाचा त्यांना काहीसा धक्का बसला, पण बहुधा, माझ्या भविष्याचा विचारही त्याच क्षणी त्या दोघांच्याही मनात आला असावा. आईनं भराभरा घरातला चिवड्याचा डबा काढला, एका लहान डब्यात माझ्यासाठी चिवडा भरला, घरात शिल्लक होते ते सारे लाडू दुस-या डब्यात भरले, आणि पाणावलेल्या डोळ्यांनी तिनं ते डबे माझ्या पिशवीत भरले. दोन पॅन्ट, दोन शर्ट, आणि शंभर-दोनशे रुपये सोबत घेऊन मी मुंबईला निघायला सज्ज झालो होतो… आम्ही सारे एसटी स्टँडवर आलो, निरोपाचा सोहळा झाला, आणि गाडी सुटली…

… गेल्या बारापंधरा तासांतलं हे सारं मला झर्रकन मिनिटभरात आठवून गेलं आणि मी कुलूप काढून घरात प्रवेश केला… बाहेरच्या खोलीच्या खिडकीच्या फुटलेल्या तावदानातून काही कबुतरं तातडीनं फडफडत बाहेर उडाली… जणू त्यांनी ते घर त्या क्षणी माझ्यासाठी मोकळं केलं होतं…

मी पिशवी भिंतीजवळ ठेवली, आणि रेलून खुर्चीत बसलो… माझं नवं आयुष्य सुरू झालं होतं. कधीतरी मागे लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी आमच्या गावाला आलेले असताना, ‘मला पत्रकारिता करायची इच्छा आहे’, असं मी त्यांना सांगितलं होतं. माझा मोठा भाऊ, रमेश, तेव्हा ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये पत्रकार होता… त्यामुळे गडकरींशी सहज बोलता आलं होतं. पुढे काही वर्षं गेली. रमेश मुंबई सोडून अमेरिकेत गेला होता आणि गडकरींचा निरोप अनपेक्षितपणे मला मिळाला. त्या दिवशी ते रत्नागिरीत होते. तिथं कुणाशी तरी गप्पा मारताना रमेशचा विषय निघाला आणि त्यांना माझीही आठवण झाली. तिथल्या स्थानिक वार्ताहराला त्यांनी खुणेनंच बोलावलं आणि मला मुंबईला येण्याचा त्यांचा निरोप घेऊन त्या वार्ताहरानं पुढच्या दोन तासांत माझ्या गावी मला गाठलं…

हे सारं मला नंतर कधीतरी कळेपर्यंत चमत्कारासारखं वाटलं होतं.

खुर्चीत रेलल्यावर मला पुन्हा ते सारं आठवलं, आणि काही वेळ तसाच घालवून मी उठलो…

आता मी मुंबईकर होणार होतो…

मग गावाकडचा निवांतपणा सोडून मी स्वतःचं मन आणि शरीर झटकलं आणि घर साफ करायला घेतलं. गॅस संपला होता. टेलिफोनही ‘डेड’च होता. बहुधा बिल थकलं होतं… त्या दिवशी मला घरात काहीच करता येणार नव्हतं. घर साफ करून मी सिग्नलजवळच्या टपरीवर आलो आणि चहा घेतला. ताजातवाना झालो. पुन्हा घरी आलो, आवरलं, आणि ‘लोकसत्ता’च्या ऑफिसात जाण्यासाठी सज्जही झालो. मनातल्या मनातच गावाकडच्या आईवडिलांना नमस्कार केला, गावाकडच्या घरातलं देवघरही डोळ्यासमोर आणून हात जोडले, आणि ‘स्लीपर’ पायात घालून बाहेर पडलो…

मुंबईच्या रस्त्यावर यानंतर रोज आपल्या पाऊलखुणा उमटणार आहेत, हे त्या क्षणी पहिल्यांदाच जाणवलं… भविष्यात काय असेल, हा विचारही क्षणात मनाला शिवून गेला. मी मुख्य रस्त्यावर आलो आणि पानवाल्याला गाठलं. स्टेशनवर जाणारी बस कोणती, तिथून नरीमन पॉइंटला कसं जायचं, सारं त्यालाच विचारलं. आपण मुंबईत रुळेपर्यंत या पानवाल्याशी दोस्ती करायची, हे मी पक्कं ठरवून टाकलं होतं… तशी गावाकडे मी अधूनमधून मित्रांसोबत सिगरेट वगैरेही ओढायचो. त्याचा फायदा झाला. एकदोन दिवसाआड पानवाल्याकडे थांबून एखादी सिगरेट ओढत गप्पा मारू लागलो, मुंबईची ओळख करून घ्यायला तो मोठा आधार आहे, हे मला जाणवलं होतं… शेकडो मैल लांबवरच्या, परक्या मुलुखातला, परक्या भाषेचा हा पानवाला, पोरगासा असतानाच गावाकडचं घरदार सोडून मुंबईत आला होता आणि स्थिरावलाही होता. खूश होता. त्याची कथा ऐकली आणि पहिल्या काही दिवसांतच माझाही हुरूप वाढला… ‘मुंबईत राहायचंच, आणि टिकून राहायचं!’… मी ठरवलं…

तर, पहिल्याच दिवशी बाहेर पडून मी बस पकडली, स्टेशनवर आलो, तिकीट काढलं, इंडिकेटरवर ‘सी’ बघून चर्चगेटची गाडी पकडली, चर्चगेटला उतरून विचारत विचारत ‘एक्स्प्रेस टॉवर’लाही पोहोचलो…

रमेशचे अनेक पत्रकार मित्र मला माहीत होते. काही तर ओळखीचेही होते. लोकसत्तातच रिपोर्टर असलेल्या त्याच्या एका मित्राची भेट तिथे झाली. ‘तुला काही पैसेबिसे हवे असतील तर सांग,’… तो म्हणाला आणि मला देव पावल्याचं समाधान झालं. टेलिफोनचं बिल भरून फोन सुरू करून घ्यायचा होता, गॅसचा सिलिंडर आणायचा होता. मी त्याला हे सांगितलं आणि त्यानं काहीही न बोलता शंभराच्या चारपाच नोटा काढून माझ्या खिशात ठेवल्या.

FullSizeRender

घराबाहेर पडल्यानंतर मुंबईतल्या या पहिल्याच दिवसाच्या अनुभवानं सुखावूनच मी घरी आलो आणि फोन-गॅसच्या बिलांचं कसं करायचं, हे विचारायला पुन्हा पानवाल्याला गाठलं. बिलं भरली. पुढच्या दोन दिवसांत गॅस आला, फोनही सुरू झाला. लोकसत्तातल्या रमेशच्या मित्रानं तिकडूनच फोनाफोनी करून हे जमवून दिलं, हे मला नंतर कळलं. मी खूश होतो. मुंबईत आपल्याला फारशी अडचण येणार नाही, याची हळूहळू खात्री वाटू लागली होती. फक्त सकाळ-संध्याकाळच्या त्या प्रवासाची धाकधूक मात्र मनात पक्की घर करून होती…

पुढे एकदोन दिवस गेले, तरी काहीच निरोप आला नाही, म्हणून मी त्या मित्राकडेच चौकशी केली… काहीतरी माशी शिंकली होती. लोकसत्तातलं काम झालं नव्हतं. मी पुन्हा गडकरींना भेटलो आणि उलगडा झाला.

‘आज पेपरची हेडलाइन काय आहे?’ असा प्रश्न त्यांनी मला पहिल्याच भेटीत विचारला आणि मी पुरता गांगरलो होतो… रात्रभरचा प्रवास, घराची आवराआवर करून शिणलेलो, आणि इतक्या सकाळी पहिल्यांदा उठून पेपर वाचायचा असतो हे गावाकडे माहीतच नसल्यानं, मला तर वर्तमानपत्राची आठवणही झाली नव्हती. मी मख्ख राहिलो, आणि ‘ठीक आहे, मी कळवतो’… असे गडकरींचे शब्द कानावर पडल्यावर उठून बाहेर आलो, हे मला आठवलं…

पत्रकारिता करायला निघालेला हा पोरगा पेपर वाचत नाही, हे पाहून ते बहुधा नाराज झाले होते.

नंतरच्या भेटीत मी हे कारण त्यांना सांगितलं आणि त्यांना ते पटलं… पण ती वेळ निघून गेली होती. मग त्यांनीच मला काही सुचवलं आणि मी लोकसत्तात नाही, तरी मुंबईच्या पत्रकार विश्वात दाखल झालो…

हळूहळू मुंबई ओळखीची होत होती. मुरलेल्या मुंबईकरालाही क्वचितच जायला, पाहायला मिळेल अशा ठिकाणी जाण्याची, पाहण्याची संधी मला मिळत होती, आणि मुख्य म्हणजे, सकाळच्या धबडग्याच्या वेळात ट्रेन पकडून जिवाच्या आकांतानं ऑफिस गाठायचं बंधन नव्हतं. हे तर क्वचितच कुणा मुंबईकराच्या वाट्याला येतं, ते आपल्या नशिबात सहज आलं, असं समजून मी स्वतःवरच खूशही झालो होतो.

पत्रकारितेचं जग अद्भुत असतं. ते अंगवळणी पडलं, की कुठल्याही जगात आपण सहज वावरू शकतो; हे याच काळात उमगत गेलं, आणि विश्वासही वाढू लागला. मित्रमंडळी वाढत गेली. पुढे लोकसत्तात रुजू होण्याआधीचा काळ आर्थिकदृष्ट्या काहीसा खडतर असला, तरी या विश्वातल्या नव्या मित्रांच्या सहवासात तेही दिवस आनंदाचेच वाटत होते. रात्रपाळी संपल्यानंतर पहाटेची पहिली ट्रेन येईपर्यंत दादर स्टेशनबाहेरच्या बबन चहावाल्याकडे गोळा होऊन मारलेल्या गप्पांतून पत्रकारितेचं आणि बातमीदारीचंही भान येत होतं.

आपल्याला आपला नेमका ‘ट्रॅक’ सापडला, हे मला उमगलं होतं आणि ‘कधीच मुंबईत यायचं नाही’ असं गावाकडे असताना म्हणणारा मी, ‘मुंबईकर’ व्हायचा असोशीनं प्रयत्न करू लागलो. गावाकडच्या, आईवडिलांच्या, मित्रांच्या आठवणीनं कधीतरी व्याकूळ व्हायला व्हायचं… पण याच काळात मुंबईत झालेल्या नव्या मित्रांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ मनाला समजावत असायच्या. लहानपणीच मुंबईत येऊन स्वतःच्या हिंमतीवर शिकलेला आणि एका नामांकित जाहिरात कंपनीत डायरेक्टर झालेला शंकर खंडागळे हा रमेशचा जिवाभावाचा दोस्त… तो कधीतरी अंधेरीला यायचा… मी एकटाच राहत असल्यानं, रात्री झोप अनावर होईपर्यंत आम्ही गप्पा मारायचो, आणि गप्पांचा शेवट त्याच्या एका सल्ल्यानं व्हायचा… ‘दिनेश, नेव्हर थिंक ऑफ गोइंग बॅक… स्टिक हियर इन बॉम्बे… हियर इज अ फ्यूचर फॉर यू…’

मीदेखील, निर्धारानं मान हलवायचो, आणि ‘गुडनाइट’ म्हणून झोपी जायचो. ती रात्र शांत झोपेत संपायची. मी नव्या उत्साहानं मुंबईकर होण्याच्या मार्गावर पाऊल टाकायचो आणि दिवस संपला की वाटायचं, जमतंय आपल्याला… मुंबईनं आपल्याला स्वीकारलंय… आता आपणही मुंबईकर व्हायचं…

असं प्रत्येक दिवशी व्हायचं… हळूहळू, गावाकडच्या आठवणी पुसट झाल्याचं जाणवत गेलं… आता त्या आठवणींनी हळवं, व्याकूळ व्हायला होत नाही, हेही लक्षात येत गेलं…

आणि आपण कधी मुंबईकर होऊन गेलो, ते मला कळलंच नाही…

— —- —-

… बाल्कनीतून दिसणारी ती झाडं अजूनही भुरुभुरु पावसात डोलतच होती. आता आपण वर्तमानात आहोत याची मला जाणीव झाली आणि मी बाल्कनीचा दरवाजा चक्क बंद करून घेतला. कारण, त्या भूतकाळातून बाहेर येणं, ही माझी त्या क्षणाची गरज होती.

मग मी आठवणीतल्या एकेका दिवसाचं मनातलं पान उलटून मागे सारू लागलो. पस्तीस वर्षांच्या काळाचं ते पुस्तक फक्त चाळतच पुढे सरकू लागलो आणि खूपदा मलाच माझी गंमत वाटू लागली. नोकरीच्या पहिल्या दिवशी, ट्रेनमधून उतरल्यावर इरॉस आणि ओव्हलच्या मधल्या रस्त्यानं सरळ जाऊन बराच वेळ चालत उजवीकडे वळून, मंत्रालयाची इमारत उजव्या अंगाला घेत एक्स्प्रेस टॉवर्सची उंच इमारत गाठायचो, तेव्हाचं एकटेपण कमी होत कधी संपून गेलं, हे कळलंच नाही. काम संपल्यावर स्टेशन गाठणारी सहका-यांची टीम तयार झाली, आणि चर्चगेटला जाणारा जवळचा रस्ता आहे, हे लक्षात आलं.

कधीकधी, एकट्यानं चालत असताना, शॉर्टकट लक्षातच येत नाहीत. कुणी अनुभवी, माहीतगार सोबत असला की खूप रस्ते सोपे होतात, तसंच तेव्हा झालं होतं. घरापासून ऑफिसपर्यंतच्या प्रवासाचा सुरुवातीला लागणारा वेळ आपोआपच कमी झाला होता, आणि एकटेपणही संपलं होतं…

मग मला लोकल ट्रेनचा प्रवासही आवडू लागला होता. वेळेचा हिशेब करून आणि पुरेसा वेळ हाती ठेवून घर सोडलं की विंडो सीट मिळवता येईल अशी गाडी पकडणंदेखील आपल्याला शक्य आहे, असा शोधही त्याच काळात लागला आणि पुढे कितीतरी वर्षं मी तो पाळलादेखील! मुंबई नकोशी वाटण्याचं जे महत्त्वाचं कारण, प्रवासाची कटकट, तेच पुसलं गेल्यानं मला मुंबई हवीहवीशी वाटू लागली. आपण नवखे आहोत, ही जाणीव प्रत्येक सरत्या दिवसासोबत पुसली जाऊ लागली आणि पत्रकार परिषदा, वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी, यांमुळे मुंबईच्या आत दडलेल्या एका वेगळ्या मुंबईची ओळखही होऊ लागली.

आपण पत्रकार आहोत, ही जाणीव वेगळा विश्वास देणारी असते, हेही जाणवू लागलं. खिशातलं एक ओळखपत्र आपल्याला वेगळा आत्मविश्वास मिळवून देऊ शकतं, याची पावलोपावली खात्री होऊ लागल्यानं, मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनेकांनी पाहिलीदेखील नसेल अशा दुनियेची सफर सहजपणे शक्य झाली. जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असं धारावीचं वर्णन खूप पूर्वीपासून वाचलेलं असल्यानं मला धारावीविषयी प्रचंड कुतूहल होतं. ही वस्ती कधीतरी पालथी घालायचीच, या ध्यासानं मला पछाडलं आणि मी तशी मोर्चेबांधणी सुरू केली. पुढे काही मित्रांच्या मदतीनं धारावीची ओळख झाली आणि जगातील ही सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणजे एक स्वयंभू उद्यमनगर आहे, हे लक्षात आल्यावर तिच्याविषयी मनात तयार झालेले गलिच्छ चित्र आपोआपच पुसलं गेलं.

ब-याचदा रात्रपाळी संपल्यानंतर पहिल्या गाडीपर्यंतच्या वेळात दक्षिण मुंबईत एखाद्या नाक्यावर रेंगाळायचं आणि सहजपणे दिसेल अशी रात्रीची रस्त्यावरची मुंबई अनुभवायची, असं मुद्दामच ठरवून आम्ही रात्रपाळीनंतरचा बराचसा वेळ भटकण्यात घालवला. आता मध्यरात्रीनंतरच्या मुंबईचे ते दिवसही मागे गेले आहेत. पण त्या काळात, रात्रीच्या आधारानं जगणा-या अनेकांच्या व्यथा, वेदना अगदी सहजपणे जाणवून गेल्या. मुंबईच्या एका वेगळ्या विश्वातला कोपरा तरी या भटकंतीत अनुभवता आला. मुंबई ही अनुभवांची खाण आहे, जमेल तेवढे, शक्य होतील तेवढे अनुभव उकरून काढून आपल्या पोतडीत भरले पाहिजेत, असं वाटू लागलं, आणि आम्ही काही सहका-यांनी दिवसरात्र तेदेखील केलं.

असेच दिवस जात असताना, कधीतरी वर्तमानपत्राच्या पुरवणीत आपल्या नावानं एखादा लेख प्रसिद्ध झाल्याचा आनंद सोबत घेऊन घर गाठलं आणि आता आपण पुरेपूर मुंबईकर झालो, याची खातरी पटली. मुंबईचा आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाच्या वस्तीत फिरून लिहिलेल्या ‘खरा मुंबईकर’ नावाच्या त्या लेखाचं कात्रण पुढे कितीतरी वर्षं मी जपून ठेवलं होतं…

मुंबई हे एक छोटं जग आहे. या जगात अनेकांची आपली-आपली स्वतंत्र अशी विश्वं आहेत, आणि त्या विश्वात आपला-आपला आनंद शोधणारी, अनुभवणारी आणि उपभोगणारी माणसं आहेत… त्यांतली दोन विश्वं, म्हणजे, जगणा-यांचं जग, आणि जगविणा-यांचं जग… जगणा-यांचं जग म्हणजे, कष्टक-यांचं, श्रमिकांचं जग, आणि जगविणा-यांचं जग म्हणजे, मालक लोकांचं, सत्ताधीशांचं जग! ही दोन्ही जगं एकमेकांपासून पुरेपूर भिन्न आहेत, तरीही त्यांचं एकमेकांशी नातं आहे आणि ती एकमेकांच्या आधारानंच जगताहेत, हेही इथं अनुभवायला मिळतं… या काळात पंचतारांकित महालांमध्येही वावरता आलं, जगविणा-यांचं जगही पाहता आलं आणि जगणा-यांचं, झोपडपट्टीचं जगही पाहता आलं. रस्त्यावरच्या, निराधार मुलांचं जग तर आणखीनच वेगळं असतं. मुंबईच्या आकर्षणामुळे किंवा घर सोडून पळून गेलेली व चुकतमाकत, फसवून मुंबईत आणली गेलेली अनेक मुलं या रस्त्यावरच्या जगात जगत असतात. त्यांचं जग तर तुमच्याआमच्या जगाहूनही वेगळं असतं. आपल्या जगाचे कायदे ज्या गोष्टीला गुन्हा समजतात आणि त्या गोष्टी हेच त्यांचं जगण्याचं साधन असतं, हे जाणवलं.

अशा अनुभवांच्या पोतडीतले अनेक अस्वस्थ अनुभव तर आठवणींच्या तळाशी कायमचे चिकटून राहणारे!… मागे एकदा मराठवाड्यात लातूरला गेलो होतो. संजय कांबळे नावाच्या एका तरुण सामाजिक कार्यकर्त्यानं तिथं कुष्ठरोग्यांसाठी पुनर्वसन केंद्र कष्टपूर्वक सुरू केलंय. त्याच्याबरोबर त्यांच्या वस्तीत गेलो. एका घराच्या अंगणात सारे जमले होते आणि मी त्यांचं जगणं जाणून घ्यायचा प्रयत्‍न करत होतो. त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना बोलतं करत होतो. गप्पांच्या ओघात एका वृद्धेनं मला विचारलं, ‘मुंबईत तुम्ही कुठं राहता?’ मी म्हणालो, ‘अंधेरी… चार बंगला!’

तिचा चेहरा खुलला. ‘मग मला ओळखलं नाहीत?’ तिन विचारलं, आणि मी उगीचच ओशाळून गेलो. नाही म्हणायचं होतं, पण ते तिनं माझ्या चेह-यावरूनच ओळखलं असावं.

‘अहो मी तुमच्या सिग्नललाच भीक मागायचे!’ ती म्हणाली, अन्‌ माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी नजरेत उगीचच ओळखीच्या खुणा आणायचा प्रयत्‍न करत काहीच न बोलता मान हलवली आणि ती बोलती झाली… मुंबईत भीक मागून जगणार्‌या कुष्ठरोग्यांचं जगही माझ्यासमोर उघड होत गेलं… भीषण!

महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत वावरताना राजकारणाची अनेक रूपं आणि आतले पदरही जवळून अनुभवता आले आणि पत्रकार नसतो, तर मुंबईत राहण्यात आपल्याला काडीमात्र रस राहिला नसता, हे पटत गेलं. या पेशानं आपल्याला मुंबईशी नातं जोडून दिलं, याची जाणीव ठेवत हे नातं घट्ट करायचा प्रयत्‍न करत राहिलो, आणि तसं ते जमतही गेलं…

माझ्या लहानपणी, आमच्या घरात एक पत्रांची तार होती. तळाशी लाल लाकडी चकती असलेली तार. टपालानं आलेलं प्रत्येक पत्र, चिठ्ठी वाचून झाल्यावर त्या तारेत अडकवून ठेवली जायची. पुढे कधी निवांत वेळ सापडला, की ती तार काढून त्यातली जुनी, कित्येकदा वाचलेली पत्र पुन्हा वाचायचा मला छंद होता… पुढे ती तार काळाबरोबर नाहीशी झाली, पण ईमेलच्या रूपाने तिचा पुनर्जन्म झाला. आता मी जुने, अनेक ईमेल डिलीट करतच नाही. निवांत वेळ मिळाला, की मी ही ‘ई-तार’ काढतो, आणि वाचत बसतो… पोष्टाच्या तारेला लगडलेल्या पत्रांइतकाच जिव्हाळा त्यातही आहे, हे जाणवतं. प्रवासाचा मागे पडलेला प्रत्येक टप्पाही पुन्हा पाहता येतो, आणि आपण कुठून निघालो, कुठवर पोहोचलो, याचीही जाणीव होते…

आता, मी मुंबईकर आहेच. मुंबईत एकटा आलेला मी कालौघात ‘कुटुंबवत्सल’ झालो. माझ्या मुली तर मुंबईतच जन्मल्या, त्यामुळे त्या तर, ‘बॉर्न मुंबईकर’च आहेत. गावाकडनं येऊन मुंबईकर झालेला माझ्यासारखा माणूस, ‘ओरिजिनल मुंबईकर’ पिढीचा पालक बनला आहे…

मी लेख पूर्ण केलाय. पुन्हा बाल्कनीचा दरवाजा उघडलाय, आणि पलीकडच्या बंगलीभोवतीच्या झाडांच्या गर्दीकडे पाहातोय. त्या वेळच्या त्या टुमदार बंगलीची आता पडझड झालीय.  पण तिथे बहुधा नवी बंगली, नवी इमारत उभी राहणार…

नक्कीच!!

दिनेश गुणे

IMG_5610

इ-मेल – dineshgune@gmail.com   मोबाइल – 9870339101

लोकसत्ता या दैनिकात वरिष्ठ सहसंपादक. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तमानाचा अभ्यास हा आवडीचा विषय. सामाजिक मानसिकतेचा अभ्यास हा आवडीचा विषय राहिला. त्यातूनच राज्याच्या विविध भागांतील विधायक कामे करणा-या व्यक्ती आणि संस्था ह्यांचा परिचय देणारे ‘ध्यासपंथ’ हे ललित शैलीतील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. ‘शून्यप्रहर’ नावाचे दुसरे ई-पुस्तकही ‘बुकगंगा’ने अलीकडेच प्रकाशित केले आहे. विश्व संवाद केंद्राचा प्रतिष्ठेचा ‘नारद पुरस्कार’ही मिळाला आहे.

फोटो – दिनेश गुणे   व्हिडिओ – YouTube

 

2 thoughts on “वो ख्वाबों के दिन…

  1. दोन दशकापूर्वीचा पत्रकारपूर्व स्वमुंबईकर ताजा झाला.

    Like

  2. Dinesh you write so well. It brought back memories of my first day in Ahmedabad after leaving Devrukh for the first time

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s