ये है बाॅम्बे मेरी जान….

अंजली अंबेकर

मुंबईचं माझं पहिलं वहिलं एनकाउंटर कुठलं?

थोडंफार आठवतं त्या वयापासून मुंबई माझ्या सोबतच वावरत आहे. कधी दृश्य माध्यमांतली अबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज किंवा प्रतीकं आणि प्रतिमा ह्यांच्या स्वरूपात नजरेसमोर असायची, कधी अदृश्य माध्यमांतून पार्श्वसंगीतातल्या अनवट वाद्याच्या नादासारखी कानात मधूनच वाजायची, तर कधी कथा-कादंबऱ्यांतल्या एखाद्या अजोड पात्रासारखी मनात सतत नांदायची. अशा विविध माध्यमांतून ती माझ्या नेणिवेत होती. तिची जाणिवेतील पहिली आठवण म्हणजे माझ्या आजीनं सांगितलेल्या एका घटनेची. माझी आजी स्वातंत्र्यपूर्व काळात आजोबांसोबत काही वर्षं मुंबईत होती. सन १९४२ च्या चले जाव चळवळीच्या काळातलं मुंबईच्या आझाद हिंद मैदानावरलं महात्मा गांधींचं भाषण तिनं ऐकलं होतं आणि त्याबद्दल ती आम्हांला भारावून सांगायची. तिचं ते सांगणं ऐकून मुंबई अशी भारावलेल्या अवस्थेत डोळ्यासमोर यायची, ते ऐकूनच मुंबई मला spiritual की काय अशीच वाटायला लागली होती. महात्मा गांधींच्या व्यक्तित्त्वानं भारावून जाण्याची सुरुवात ही माझ्यासाठी मग मुंबईशीच संबंधित झाली. असा मुंबईसंदर्भातल्या जाणीव-नेणिवेतल्या सगळ्या गोष्टींचा कोलाज माझ्या मनात प्रत्यक्ष भेटीआधीपासूनही नांदता होता.

तरीपण या सगळ्या धूसर प्रतिमांच्या visualise करण्यात आलेल्या आठवणींपेक्षा मुंबईच्या आणि माझ्या एनकाउंटरची स्पष्ट स्वरूपाची आठवण ही या सर्वांपेक्षा वेगळीच आहे.

सन १९८८ ला मीरा नायर चा ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट प्रकाशित झाला, तेव्हा लगेच किंवा त्यानंतर कधीतरी मी तो मोठ्या पडद्यावर बघितला. त्या चित्रपटात शफीक सईद नावाचा बालकलावंत मुंबईतील अस्ताव्यस्त रस्त्यांवर धावतानाची काही दृश्यं दिसतात आणि ती दृश्यबद्ध करण्यासाठी अमेरिकन सिनेमॅटोग्राफर सँडी सियोलचा कॅमेरा मुंबईतल्या काटकोन त्रिकोणातल्या अणुरेणूंना दृश्यबद्ध करत पुढे-पुढे सरसावत जातो आणि त्याचा परिणाम अधिक गडद करणारा एल.सुब्रम्हण्यम यांचा अप्रतिम साउंडट्रॅक मागे वाजत राहतो. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजेच मुंबईची दृश्य स्वरूपाची ठळकपणे मनावर ठसलेली गडद आठवण.

त्यानंतर कैक वर्षांनी मुंबईत प्रत्यक्ष पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर मात्र अनेक प्रतिमा आणि प्रतीकं ह्यांचे संदर्भ त्याला असूनही मुंबईचं आणि माझं आजपर्यंतचं नातं सदासर्वकाळ सुखेनैव किंवा कलाभिमुख राहिलं आहे असं नाही. त्यात आता कितीतरी अर्थांचे, भावनांचे आणि वास्तवाच्या विविध रंगांचे पदर येऊन मिसळले आहेत. ते कधी सरळ पोताचे भासतात तर कधी अनंत गाठींचे झाले आहेत असंही जाणवतं.

त्याचं आकलन करून घेण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीलाच मुक्कमल कराव्या लागणार आहेत. त्यांपैकी एक म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्या प्रत्यक्ष भेटीत माझं मुंबईबाबतचं झालेलं इम्प्रेशन. व्यावसायिक कारणानी मी पहिल्यांदा मुंबईत आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माझी वयाच्या बाविसाव्या वर्षी वित्त अधिकारी म्हणून निवड झाली होती आणि त्या संदर्भातलं दोन महिन्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवलं. औरंगाबादहून येणाऱ्या ट्रेनमधून मुंबईत उतरले तेच मुळी प्रचंड गर्दीच्या दादर स्टेशनवर आणि तेव्हा पहाटेचे साडेतीन वगैरे वाजले असावेत. दादरच्या सुप्रसिद्‌ध फूट ओव्हर ब्रिजवरून चालताना, त्यावर झोपलेल्या अनेक माणसांमधून वाट काढत पुढे जात असताना काही अस्फुटसे आवाज आले म्हणून वळून बघितलं तर तिथे उघड्यावर रतिक्रीडा करणाऱ्या एका स्त्री -पुरुषाची जोडी होती. काय चाललं आहे ते क्षणभर कळालं नाही. क्षणभरानं भानावर आल्यावर ते दृश्य बघून मनाचा थरकाप झाला. मुंबईचा हा पहिलावहिला शारीर अनुभव. त्याच मनःस्थितीत दादर स्टेशनच्या बाहेर पडलो, तेव्हा राहण्यासाठी नक्की असा कुठला आसरा नव्हता. सोबत एक मैत्रीण आणि तिची आई. त्या दोघींना मुंबईचा थोडासा अनुभव होता आणि त्यांनी वरळीच्या शासकीय विश्रामगृहात आमची राहण्याची व्यवस्था केली होती. पण त्याचा नीटसा पत्ता त्यांना ठाऊक नव्हता आणि त्यांनी आमच्या खोलीचं आरक्षण झाल्याची खात्रीही केली नव्हती. त्या काकू सोबत आहेत म्हणून मी किंवा माझ्या घरच्यांनीही फार खोलात जाऊन त्याची काळजी घेतली नव्हती. वयाच्या बाविसाव्या वर्षातलं ते धाडस. त्या अनुभवाचा घेतलेला धसका म्हणा किंवा मनाचं वरचेवर कमी होत गेलेलं धाडस यांपैकी काहीही. पण असं काही करण्याचं धाडस मी पुन्हा केलं नाही.

वरळी शासकीय निवासस्थानात आमचं आरक्षण झालंच नव्हतं. ज्या व्यक्तीला आरक्षणासंदर्भात फोन केला होता, त्या व्यक्तीनं ती गोष्ट व्यवस्थापनाला कळवलीच नव्हती आणि त्या दिवशी ती नेमकी व्यक्ती हजरही नव्हती. या गोंधळात आम्ही मात्र अक्षरशः रस्त्यावर होतो. आम्ही विनंती केल्यावर त्या रात्रीपासून आमच्या तिघींमधे तीन दिवसांसाठी एक खोली द्यायला ते कसेबसे तयार झाले. दिवसभर ट्रेनिंगच्या ठिकाणी होतो, पण ताजंतवानं होण्याचा मुद्दा होताच. पैसे असले, तरी सरसकट हॉटेलमध्ये रहायला जाण्याचं चलन तेव्हा अस्तित्वातही नव्हतं, म्हणून तसं काही करण्याचा पर्याय सुचला नाही एवढं खरं. मग तिथल्याच सार्वजनिक प्रसाधनगृहात कसेबसे तयार झालो आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाऊन तिथे सामान दिवसभर बरोबर बाळगलं. सगळ्या प्रशिक्षणार्थी असताना ते सामान सोबत घेऊन फिरणं लाजिरवाणं वाटत राहिलं, तेव्हा ठरवलं की आता आपण आपली राहण्याची व्यवस्था मुंबईततरी करायला हवी. कुणावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. त्या घटनेनं माझी त्या बाबतीतली भूमिका कायमची ठरली गेली. त्यामुळे मुळात असलेली स्वतंत्र वृत्ती अधिकाधिक स्वतंत्र होत गेली. मुंबईत पहिलं पाऊल टाकल्या क्षणी मिळालेला मोठा धडाच होता तो.

 तीन दिवसांच्या वरळी शासकीय विश्रामगृहातल्या अनुभवानंतर मी दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत बांद्रा पूर्व इथल्या कार्डिनल स्कूलच्या बाजूला असणाऱ्या श्रम साधना या वर्किंग विमेन हॉस्टेलला पुढच्या कालावधीसाठी राहिले. सोळा ते पंचावन्न अशा वयोगटांतल्या महिला त्या हॉस्टेलमध्ये राहायच्या.

मुंबईत काम करणाऱ्या विविध स्तरांतल्या सिंगल विमेनसाठीचं ते हॉस्टेल होतं. योगायोगानं माझं एक दूरचं नातेवाईक कुटुंब हॉस्टेलपासून हाकेच्या अंतरावर राहत होतं. त्यामुळे अधूनमधून त्यांच्याकडे जाणं व्हायचं. त्यांच्या मुली माझ्याच वयाच्या होत्या. मला मुंबईच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचं सर्वाधिक आकर्षण होतं, म्हणून मी काकांकडून आणि त्यांच्या मुलींकडून शिवाजी मंदिर, ऱ्हिदम हाउस, एन. सी.पी.ए. किंवा जहांगीर आर्ट गॅलरी अशा ठिकाणांचे पत्ते, तिथं जायचं कसं हे विचारून, ते डायरीत लिहून घ्यायचे. मोबाइलचं युग अजून अवतरलं नव्हतं, म्हणून डायरीची महत्त्वाची सोबत असायची आणि ट्रेनिंग संपलं की शासकीय गदारोळात न अडकता माझी मुंबईतली भटकंती सुरू व्हायची. त्या दोन महिन्यांतल्या साठ दिवसांच्या कालावधीत मी १५-१७ मराठी आणि दोन हिंदी नाटकं बघितली आणि एक शास्त्रीय संगीताची मैफल ऐकली होती. ती बहुधा बेगम परवीन सुलताना यांची होती. अनेक पुस्तकं आणि सीडीज खरीदल्या होत्या. तेव्हा टाइम्स बिल्डिंगमध्ये प्लॅनेट एम नुकतंच सुरू झालं होतं आणि सीएसटी स्टेशनसमोरचं मॅकडोनाल्डही त्याच काळातलं. मला मात्र शेवटपर्यंत ऱ्हिदम हाउस हेच संगीतातल्या तीर्थस्थानासारखं वाटत राहिलं. तीच गोष्ट स्ट्रॅन्डबद्दलही म्हणायला हवी. हुतात्मा चौकातल्या रस्त्यावरल्या पुस्तकांच्या दुकानातून कितीतरी पुस्तकं घेतली आणि ती कितीतरी वर्षं मला पुरली. ऱ्हिदम हाउसमधून आणलेल्या वीणा सहस्रबुद्धे, कुमार गंधर्व, मालिनीताई राजूरकर ह्यांचं संगीत अजूनही पुरतंय. सोबतच मुंबई शहरातल्या गर्दीचा, प्रवासाचा अव्यक्त ताण सकाळी बाहेर निघाल्यापासूनच सतत मनावर असायचा आणि तो दिवसभर जाणवायचा. एवढी वर्षं झाली तरी त्यात अजून बदल नाही.

प्रशिक्षण काळात माझे वडील मला एकदा मुंबईत भेटायला आले होते. मग माझी ओळख करून देण्यासाठी ते मला मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या काकांकडे घेऊन गेले. ते काका राहायचे अंधेरीतल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये. आम्ही ट्रेननं बांद्रा ते अंधेरी असा प्रवास गर्दीच्या वेळी केला आणि अंधेरी स्टेशनवर पोचलो. अंधेरी स्टेशनवरची ती गर्दी भयावह होती आणि त्यानंतर तासाभराच्या झटापटीनंतर ऑटो मिळाला. या सगळ्याचा सामना करून आम्ही काकांकडे पोचलो. काही वेळ आम्ही त्यांच्याकडे होतो, त्याच दिवशी माझे पिरिअड्स संपत आले होते. त्यांच्या घरून निघताना मी वॉश रूमला जाऊन आले आणि या सगळ्या ताणामुळे की अजून कशामुळे माहीत नाही, पण मी माझं सॅनिटरी पॅड त्यांच्या वॉश रूममध्ये विसरले आणि आम्ही तिथून तसेच निघालो. रात्री परत येताना ट्रेनमध्ये मला ते आठवलं आणि जाम ताण आला. बांद्रा स्टेशनवर उतरल्यावर पब्लिक बूथवरून त्या काकूंना फोन केला आणि सॉरी म्हणाले. ते ऐकून ‘होतं गं असं कधीकधी’ म्हणाल्या पण वरनं ‘तुम्हा गावाहून आलेल्या मुलींना अशा सवयी नसतात ना, मुंबईतल्या मुली या बाबतीत पर्टिक्युलर असतात’ वगैरे ऐकवलंच. या घटनेला वीस वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दरम्यान मीही मुंबईच्या गर्दीचा भाग झालेच. त्या काकूंची आणि माझी पुन्हा कधी भेटही झाली नाही. तशीही माझी जनरलाईज मेमरी चांगली नाहीच, पण मला ही घटना अद्याप विसरता आलेली नाही. त्यानंतर मी मुंबईतली पब्लिक टॉयलेट्स अनेकदा वापरते, म्हणजे त्याला काही पर्यायही नसतो. ती पब्लिक टॉयलेट्स वापरणाऱ्या बहुसंख्य महिलाही मुंबईच्याच असतात. तिथं अनेकदा सॅनिटरी पॅड्स इतस्ततः पडलेली असतात सार्वजनिक ठिकाणच्या डस्टबिन्समधला कचरा जिथंतिथं ओथंबून वाहत असतो आणि त्यातून प्रामुख्याने व्यवस्थित पॅक न केलेले पॅड्स डोकावत असतात. तेव्हा मला आवर्जून त्या वेगळ्याच मुंबईत राहणाऱ्या काकूंची आठवण येते. मुंबईत राहणाऱ्या लोकांचा दांभिक दर्प अजूनही जाणवत राहतोच.

माझं मुंबईतील प्रशिक्षण संपल्यावर परभणीत पोस्टिंग झालं आणि मी तिथे रुजू झाले. तिथे मी प्राथमिक शिक्षणाच्या प्रकल्पावर काही वर्षं काम केलं. त्याचं मुख्य कार्यालय मुंबईत होतं. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मुंबईत बैठकांच्या आणि वर्कशॉप्सच्या निमित्तानं येणं व्हायचं आणि अशा पद्धतीनं मी पुन्हा मुंबईशी जुळल्या गेले. या वेळची मुंबई माझ्यासाठी अधिक मोकळीढाकळी होती. दीर्घ काळ वास्तव्याचं भूत मानगुटीवर बसलेलं नव्हतं आणि एक-दोन दिवसांसाठीची ती मजाच असायची. मुंबईतल्या बैठका अनेकदा शुक्रवारी असायच्या. बैठक झाली की मी अनेकदा अंधेरीतल्या माझ्या मित्रांकडे, श्यामल -मंगेश ह्यांच्याकडे जायचे. मग आमची मुंबईतस्वान्तसुखाय केलेली एकत्रित भटकंती, सांस्कृतिक उपक्रमांना भेटी असे कार्यक्रम व्हायचे. दोन दिवसांच्या धावपळीतही अशोक जैन सरांना त्यांच्या घरी भेटायला जाणं व्हायचं. मग त्यांच्याशी झालेल्या चर्चेतूनही मुंबई एक्सप्लोर करण्याच्या माझ्या उपक्रमाला वेगळं परिमाण लाभायचं. अशाच भेटींमधून माझा प्रभात चित्र मंडळाशी संपर्क झाला आणि मी जागतिक चित्रपट अधिक जाणतेपणानं बघायला लागले. मग त्यानंतरची तीन -चार वर्षं मी नेमानं, पंढरीच्या वारीसारखे थर्ड आय (आशियाई चित्रपट महोत्सव ) आणि मामि (मुंबई मुविंग इमेजेस) ) यांच्यातर्फे आयोजित केले जाणारे जागतिक चित्रपट महोत्सव सुटी टाकून बघायला लागले आणि त्यासाठी माझी मुंबईची वारीही ठरलेलीच होती. या सांस्कृतिक उपक्रमांसोबत मुंबईचीही ओळख एक शहर म्हणून, एक कॅरेक्टर म्हणून होत होतीच. त्यांतल्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक संदर्भांसोबतच प्रत्येकाचा वैयक्तिक असा संदर्भ त्याला चिकटून आहे, हेही हळूहळू लक्षात येत गेलं.

मी मुंबई सोडून परभणी, पुणे आणि औरंगाबाद ह्या शहरांतही दीर्घकाळ वास्तव्य केलं आहे. परंतु मुंबईचं जसं समूहातलं बहुतांश जगणं असूनही प्रत्येक माणसासोबतचं एक असं स्वयंभू नातं जुळतं तसं इतर शहरांचं झालेलं दिसत नाही. मुंबईतला प्रत्येक जण सतत समूहाचा भाग असल्यामुळे त्यातूनही स्वतःची स्पेस शोधण्याचं कसब साधलंय. त्यातच मुंबईच्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या नात्याचं मूळ धरून असलं पाहिजे. प्रत्यक्षात मुंबईत येण्यापूर्वी ही माझं जे मुंबईशी नातं तयार झालं होतं, त्यात अशा पद्धतीनं साहित्यातून, चित्रपटांतून व्यक्त झालेल्या अनेकांच्या अभिव्यक्तीचाही मोठा सहभाग होता. विक्रम चंद्राचं Love and longing in Mumbai, किरण नगरकर आणि भाऊ पाध्ये ह्यांच्या लिखाणातून अव्याहत वाहणारी मुंबई, गंगाधर गाडगीळांचं ‘प्रारंभ’, जयवंत दळवींच्या लिखाणातून डोकावणारी खानावळी संस्कृतीची मुंबई, श्री.दा.पानवलकरांच्या कथांमधून दिसणारी कडेकपारीतील मुंबई, मेघना पेठेंच्या कथांमधून बाहेर येणारी गर्दीतील अकेली मुंबई, के.ए. अब्बास यांचा ‘बम्बई’ हा लेख आणि त्यातून भटकत जाणारी पत्रकारीतेतील मुंबई. लाइफ इन अ मेट्रो, स्लमडॉग मिलिनेअर, धोबी घाट, लंच बॉक्स अशा अनेकचित्रपटांतून जाणवत गेलेली मुंबई. अशा एक ना अनेक मुंबईच्या प्रतिमा मनात वावरत होत्या. सुरुवातीच्या काळात या मनातल्या प्रतिमा मी शोधत असायचे, पण असं करता-करता माझ्या स्वतःच्या प्रतिमा तयार होत गेल्या आणि त्यांत मी इतरांचे रंग न शोधता स्वतःचे रंग मिसळायला लागले आणि माझं मुंबईचं चित्र नव्यानं आकार घ्यायला लागलं.

PICTURE BY GAJANAN DUDHALKAR (6)

काही वर्षांनी माझी बदली परभणीहून औरंगाबादला झाली. या पोस्टिंगमध्ये मात्र मुंबईत यायचं अधिकृत असं काही कारण नव्हतं. माझं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादला झालं होतं. तेव्हा मी बरीच वर्षं औरंगाबादला होते त्यामुळे तसा माझा औरंगाबादला जुना गोतावळा होताच. या पोस्टिंगच्या निमित्तानं मधल्या काही वर्षांच्या खंडानंतर वेगळ्या परिवेशात पुन्हा नव्यानं भेटला. औरंगाबादला आमची सांस्कृतिक घोडदौड जोरात चालू होती. आम्ही औरंगाबादमधला पहिला पुलोत्सव घेतला, दृष्टांत फिल्म सोसायटीची स्थापना केली. असं बरंच काही सांस्कृतिक आम्ही करत होतो. मी माझं स्वतःचं असं घरही घेतलं आणि मी खरंच मध्यमवर्गीय परिभाषेत शेटल झाले. :-). औरंगाबाद हे शहर माझ्यासाठी कायम कोझी असं राहिलं आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी आवाक्यातल्या वाटतात. मुंबईत तो कोझीनेस नाही. तुमच्या नजरेच्या किंवा श्वासाच्या टप्प्यात इथं काहीच नाही. औरंगाबादच्या mindful असण्याच्या काळात माझ्या मुंबईच्या फेऱ्या मात्र कमी झाल्या होत्या. मी मुंबईपासून काही काळ दुरावलेच.

त्यानंतर कधीतरी सतीशची (नवरा) आणि माझी ओळख झाली, आम्ही एकमेकांना भेटत होतो. तो मुंबईचा आणि टेलीग्राफ या वृत्तपत्रात काम करत होता. मग मुंबईचं आणि माझं नातं खंडानंतर पुन्हा जुळलं. सतीशमुळे मुंबई पाहायला आणि अनुभवायला आगळं परिमाण लाभलं. मी आत्तापर्यंत फिरत होते त्या मुंबईपेक्षा त्याचं मुंबईतलं विश्व वेगळंच. मी अधिकारी म्हणून कार्यरत असले, तरी मुंबईत पटकन टॅक्सी करायचा माझा धीर व्हायचा नाही. त्याच्यासोबत मात्र मी टॅक्सीवाली मुंबई अनुभवत होते. सतीश आणि मुंबई माझ्यासाठी समानार्थीच होते. सतीशशी लग्न करण्याचा निर्णय म्हणजे मी औरंगाबाद सोडून मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेणं होतं आणि अर्थात ते माझ्यासाठी सोपं नव्हतंच. औरंगाबादमुळे आलेली स्थैर्याची भावना मला खूप महत्त्वाची वाटत होती. इतक्या वर्षांच्या धावपळीनंतर मिळालेलं मनःस्वास्थ्य मला घालवायचं नव्हतं. माझी शासकीय नोकरी असल्यामुळे मला इथं बदली करून घेणं शक्य होतं आणि सतीश इंग्लिश पत्रकारितेत असल्यामुळे त्याला व्यावसायिकदृष्ट्या औरंगाबादला येणं शक्य नव्हतं. हा व्यवहार्य भाग निर्णय घेताना शेवटी महत्त्वाचा झाला. तो मुंबईचा असूनही संयुक्त कुटुंबात राहायचा आणि मी औरंगाबादसारख्या छोट्या शहरातही स्वतंत्र राहायचे.

PICTURE BY GAJANAN DUDHALKAR (31)

मी रूढ अर्थानं एकटी राहायला लागूनही तेव्हा सात वर्षांहून अधिक काळ झाला होता. मला एकटेपणाचं व्यसनच जडलं होतं, दिवसभर माणसांच्या गोतावळ्यात राहून संध्याकाळचा तो एकान्त मला हवाहवासा वाटायचा. माझी पुस्तकं, सीडीज, फिल्म्स माझी आवर्जून वाट बघायचे. इथं तो मुंबईसारख्या भयावह गर्दीच्या ठिकाणी राहायचा तर मी औरंगाबादसारख्या तुलनेत कमी गर्दीच्या शहरात राहायचे. त्यामुळे लग्नाचा निर्णय घ्यायला इतर कारणांसोबत मुंबई या कारणामुळेही आम्हांला विलंब झाला. आम्ही लग्न केल्यावरही सहा महिने मी औरंगाबादलाच होते, त्यानंतर माझी ठाण्यात बदली झाली. ठाणे हे शहर कांदिवली किंवा मुलुंड यांसारखा मुंबईचाच भाग आहे. प्रशासकीयदृष्ट्या त्याचं वेगळं अस्तित्व असलं, तरी त्याला मुंबईपासून वेगळं असं अस्तित्व नाही. आमचं घर जरी ठाण्यात असलं, तरी आम्ही फक्त काही काळासाठीची सोय म्हणून ठाण्याकडे बघणार आहोत याची आम्हांला पूर्ण कल्पना होती. सुरुवातीची दोन-तीन वर्षं घरापासून ठाण्यातलं ऑफिस जवळ असल्यामुळे प्रवासाचा त्रास नव्हता आणि माझा मुलगा तेव्हा तान्हा असल्यामुळे ते सोयीचं झालं. तीन वर्षांनी माझी बदली थेट नरिमन पॉइंटच्या ऑफिस मध्ये झाली आणि तेव्हा माझं आणि मुंबईचं रोजचं अफेअर खऱ्या अर्थानं सुरू झालं.

पहिला भाग अर्थातच लोकल ट्रेनचा प्रवास. गेली आठ-दहा वर्षं मी ट्रेननं ऑन/ऑफ असा प्रवास करायचे परंतु त्यात ठरावीक वेळेचा प्रवास असं काही टार्गेट नसायचं. त्यामुळे ती प्रवासाची दाहक वास्तविकता माझ्यावर कोसळली नव्हती. आता रोज ऑफिसला ठरावीक रश अवर्समध्ये जाणं भाग होतं आणि त्याचा खूप ताणही यायचा मनावर. मला आठवतं, सुरुवातीच्या काळात आमच्या सोसायटीतल्या या प्रवासासाठी सराईत असणाऱ्या मैत्रिणींसोबत मी प्रवास करायला लागले होते. एकदा कल्याण फास्ट पकडल्यावर त्या मैत्रिणी दिसल्या म्हणून मी फक्त माझ्या हातातली बॅग बाजूच्या सीटवर ठेवली. तिची जागा पकडावी असंही एकदम डोक्यात आलं नाही किंवा लोकल संस्कृतीमध्ये हे चालत नाही, हे काही मला ठाऊकही नव्हतं. अर्थात त्यांना हे माहीत होतंच, म्हणून त्या जागेवर त्या बसल्या नाहीत परंतु या एका गोष्टीवरून बायकांनी एकदम कल्ला सुरू केला. अर्वाच्य शिव्या आणि प्रकरण माझ्या शिक्षणापर्यंत आणि आई-वडिलांपर्यंत पोचलं. मी काही स्पष्टीकरण देणार तितक्यात मैत्रिणीनं पटकन गप्प बसण्याची खूण केली. पण पुढचा चाळीस-पन्नास मिनिटांचा प्रवास humilation या शब्दाचा काय अर्थ असतो, हे आयुष्यात पहिल्यांदा मला कळालं. काही कारण नसताना मला ते सहन करावं लागलं. कल्याण फास्टमधला वेग माझ्यापुरता कमी झाल्यासारखा वाटला. त्या ट्रेनमधला एकेक क्षण युगासारखा भासत होता. दोन स्टेशन्समधला निश्चित वेळ अकारण वाढलेला वाटत होता. ठाण्यात पोचल्यावर एकाच ऑटोमध्ये आम्ही मैत्रिणी बसलो होतो, पण एकमेकींशी एक शब्दही न बोलता घरापर्यंत पोचलो. या प्रसंगानंतर कितीतरी दिवस मी त्या मैत्रिणींना टाळायचे. नेहमीची ट्रेन मुद्दाम सोडून प्रवास करायचे. या सगळ्यांत माझा काहीच दोष नव्हता, पण मी शरमेनं बराच काळ थिजून गेले होते.

PICTURE BY GAJANAN DUDHALKAR (18)

त्यानंतर वर्षभर मी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ऑफिसमध्ये पोस्टिंगला होते. प्रवासाच्या दृष्टीनं ते तसं कमी ताणाचं होतं. तो प्रवास मी एसी बसेसनं करायचे, ट्रॅफिकमध्ये बराच वेळ जायचा. हे कारण सोडलं तर एकुणात मुंबईच्या इतर प्रवासाच्या मानानं ते फारंच सुखावह होतं. त्यानंतर प्रवासाच्या धबडग्यात स्वत:ला झोकून दिलंच. त्याबाबतची कुरकुर कमीकमी होत गेली. ती पूर्णपणे थांबली किंवा थांबेल असं नाही. मुंबई हा विषयच लोकल ट्रेनच्या प्रवासाशिवाय सुरू होऊ शकत नाही आणि संपूही शकत नाही. पन्नास-पन्नास वर्षं प्रवास करूनही त्याविषयी अटीतटीनं चर्चा करणा-याचं मात्र अजूनही कौतुक वाटतं. तीनच वर्षांत मी नरिमन पॉइंट, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स करून पुन्हा प्रभादेवी इथे पोचले. पहिलं पाऊल जिथं ठेवलं त्या दादर स्टेशनातूनच आज मी रोज प्रवास करते. नैसर्गिक बदलांचा थोडासाही ताण सहन न होणारं हे शहर पाहिलं की औरंगाबादची आठवण हटकून येते. जेव्हा माझा ट्रेनचा नवीन प्रवास सुरू झाला, तेव्हा एक दिवस ट्रेनच्या अलोट गर्दीत स्फुंदून-स्फुंदून एकटीच रडणारी मुलगी बघितली. ते पाहून तिला कुणीही काही विचारलं नाही, मी फार अस्वस्थ झाले होते. दिवसभर त्या मुलीचा विषयच डोक्यात होता. अशा अनेक प्रसंगी माझ्या जुन्या जाणत्या कनवाळू शहराची, गावाची आठवण यायची. माझ्या शहरात तर सहृदयता सतत नांदती होती, असं उगीचच वाटून जायचं. मन मग मुंबईला कोसायचं आणि मुंबईचा द्वेषद्वेष करायचं. शहरातल्या सरत्या दिवसांसोबत माझी मीही बदलत जातेय. अजूनही दोन-तीन दिवसांनी सकाळच्या वेळी डोळ्यात पाणी येणारी एकाकी पडत गेलेली कुणीतरी प्रवासात भेटतेच. तिला बघून, मी दोन क्षण अस्वस्थ होते आणि ती अस्वस्थता प्रवास संपल्यावर विरूनही जाते. मुंबईतल्या सराईतासारखं मीही माझं आयुष्य जगायला पुढं निघून जाते.

कधीतरी आभाळ भरून आलेल्या संध्याकाळी धावत्या ट्रेनमधून miss you असा मेसेज कळवळून कुणालातरी करावासा वाटतो. मुंबईतले माझे सुहृद त्यात्या वेळी प्रवासात असतील, असं मनात येऊन त्यांच्याशी होऊ घातलेला संवाद मनातच खुंटतो. अवाढव्य पसरलेल्या शहरात माझ्या बिंदूएवढ्या अस्तित्वाची जाणीव तशीच आतल्या आत विरघळून जाते आणि मग मी लगेच दुस-या क्षणात उडी घेते.

प्रत्येक वेळी आर्थिक गणितंच असतात असं नाही. पण मुंबईत माणसं एकमेकांच्या निर्हेतुक संपर्कात फार काळ राहत नाहीत. त्याचं फार कुणाला गम्य वाटतं असंही दिसून येत नाही. अशीच कितीतरी माणसं आठ वर्षांत माझ्या आयुष्यात आली आणि पावलांचे ठसेही न उमटवताही निघून गेली आहेत. वर्तमानातल्या क्षणाचं उपयुक्तता मूल्य जोखून दुस-या क्षणात पोचण्याची अपरिहार्यता त्यामागे असावी. नक्की सांगणं कठीण आहे. अशा वेळी मुंबई माझ्यासाठी एकदम परकीपरकी होऊन जाते.

कधीतरी मुंबईच्या फोर्ट भागात आम्ही चार-पाच मैत्रिणी ड्रिंकसाठी एखादी संध्याकाळ गाठतो. फोर्ट परिसरातली सातनंतरची संध्याकाळ आपल्याभोवती शांत पहुडलेली दिसते. ती अनुभवण्यासाठी कधीतरी सहा महिन्यांतून एकदा ती संध्याकाळ गाठवीशी वाटतेच. समोर असणारा बडवाईजरचा फेसाळता ग्लास आमच्या मनातला कल्लोळ त्याच्या गोल्डन ब्राउन रंगाच्या द्रवामध्ये शोषून घेतो. त्यानंतर  आम्ही एका वेगळ्याच तंद्रीत सीएसटी स्टेशनवर येतो आणि त्यापुढच्या घरापर्यंतच्या थकवणाऱ्या प्रवासाचं काहीच वाटत नाही.

तल्लिनतेचे अनेक क्षण मुंबईतल्या एन.सी.पी.ए., नेहरू सेंटर आणि षण्मुखानंद इथल्या मैफली ऐकतानाही मिळत असतात. रि्‌हदम हाउस आणि सामोवार ह्यांचं कालौघात नाहीसं होणं वेदनादायी होतं. ती मला माझ्या एखाद्या जवळच्या सुहृदासारखीच होती. मुंबईत येऊन मी अशा ब-याच सांस्कृतिक उचापती करायला शिकले. संजना कपूरचे जुनून उपक्रम, पृथ्वीचे थिएटर फेस्टिवल्स, बॅनियन ट्री/पंचम निषादच्या मैफली, थर्ड आय /मामि चित्रपट महोत्सव ह्या उपक्रमांना मी पंढरीच्या वारीसारखी नियमित हजेरी लावणं हे सगळं माझ्या रुटीनचा भाग झाला आहे. लोकलच्या/रस्त्यावरच्या भयावह गर्दीत षण्मुखानंदमध्ये नुकतीच ऐकलेली मैफल कानाशी येते आणि गर्दीचा, घामानं भिजलेल्या शरीराचा श्वासोच्छ्‌वासाच्या भाऊगर्दीचा क्षणभर विसर पडतो. मग लक्षात येतं की दिवसाउजेडीच्या आणि गडद रात्रअंधाराच्या कुठल्याही प्रहरात जसा राग छायानट आपल्यात भिनत जातो, तशी मुंबई माझ्यात हळूहळू भिनत जातेय.

शहर आणि माणसं या दोघांमध्येही आपण गुंतायला लागलो की त्याचं अधिक आणि उणे असं काही करायचं नसतंच आणि केलं तरी त्याचं आणि आपलं हातचा शिल्लक नातं राहतंच. मुंबईचं आणि माझं नेमकं हेच झालंय.

अवचित एखादी संध्याकाळ चुकारपणे अशीही येते, पुन्हा औरंगाबाद, परभणी आणि गंगाखेड ह्यांच्या वाटांकडे डोळे लागतात आणि थोडं वळून बघितलं की लक्षात येतं की वाटा पुसट झाल्या आहेत. आता परतीचा लख्ख रस्ता इतक्यात तरी मिळणार नाही आणि मी थांबते.

Youtube वर ऐकलेलं Rita McNeil या अमेरिकन संगीतकार/गीतकाराच्या नुकत्याच ऐकलेल्या you can’t go home again या गाण्यातल्या ओळी आठवतात..

You can’t go home again

You can’t go home again

And trying to hold yesterday

Is like arms around the wind

घरी गौरी देशपांडेच्या अनेक कथा-कादंब-यांमध्ये रेखाटलं गेलं आहे असं नव-यासारखं कुठल्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहू शकणारं पात्र असतं, झ-यासारखं खळाळतं मूल असतं आणि सोबत अनेक मित्र-मैत्रिणी या शहरात विखुरलेले असतात. असं सगळं असतानाही माझं आणि मुंबईचं नातं मात्र वरचेवर स्वयंभू, स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशी होत असल्याची जाणीव होते आहे.

मृणाल सेन यांनी, त्यांच्या ‘Always being born’ या आत्मचरित्रात कोलकाता शहराविषयी जे लिहिलंय, तेच मला मुंबईबाबत आलटून-पालटून किंवा सतत म्हणावंसं वाटतं,

Mercilessely maligned, dangerously loved city.

अंजली अंबेकर

profile picture

इ-मेल –  anjaliambar@gmail.com  मोबाइल – 9820900242

गेली अठरा वर्षं महाराष्ट्र शासनानंतर्गत लेखा व वित्त अधिकारी म्हणून विविध विभागांत काम. सध्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे वित्तीय सल्लागार म्हणून कार्यरत. अकादमीच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग. वाचन, शास्त्रीय संगीत, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि भटकंती हे अधिक आवडीचे विषय. आत्तापर्यंत ऋतुरंग, उद्याचा मराठवाडा, मित्रांगण, अयान, वेगळा अनुभव, यक्ष या दिवाळी अंकांत विविध विषयांवरचे लिखाण प्रसिद्ध. ज्येष्ठ कवी/गीतकार/लेखक गुलजार ह्यांच्या काही कथांचे व बालकथांचे मराठी अनुवादही प्रसिद्ध.

छायाचित्रं – गजानन दुधाळकर  व्हिडिओ – YouTube

 

2 thoughts on “ये है बाॅम्बे मेरी जान….

  1. छान जमलाय. वेगळ्याच अँगलने मुंबई दिसते यात

    Like

  2. I can only say this is Best article in this Diwali issue. Keep writing.. You know how to write.
    Thanks Sayali Madam to include this article in your magazine.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s