मानसी विष्णुपुरीकर
Mumbai – one station that makes you halt forever!
तसंच काहीसं झालं माझ्याबाबतीत.
२००४ची घटना .. “चला-चला लास्ट स्टॅाप दादर टी.टी.!” कंडक्टरनं घोषणा केली. आयत्या वेळी बस थांबल्यावर पुढे आदळायला नको म्हणून मी तयारीतच उभी होते सामान घेऊन. संमिश्र भावनेनं मी बसमधून उतरले. खूप उत्साह. थोडसं दडपण, मुंबईची भीती आणि त्याच्या भेटीची उत्सुकता घेऊन.
समोरच पंकज त्याच्या गोल्डन रंगाच्या एस्टीम गाडीला टेकून उभा असलेला दिसला, आणि माझ्या जीवात जीव आला. मी त्याला हात उंचावून ‘हाय’ केला. मला जिथं संपूर्ण आयुष्य घालवायचं तो हाच लास्ट स्टॅाप होता की काय??
माझी मुंबईची मावशी नेहमी गमतीनं म्हणायची, ‘मुंबईचा मुलगा नको, असं म्हणू नको हं. मग खरंच मिळतो. आणि तसंच झालं खरं. मुंबई सोडून कुठंही राहीन असं ठाम मत असूनही मी आलेच इथे! पंकजशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी जुजबी ओळख झाल्यावर त्याला भेटायला मला एकटीला मुंबईला यायचं होतं. याआधी मी कधीही एकटीनं प्रवास केला नव्हता आणि आता तडक मुंबईला एकटी जाणार म्हटल्यावर आई जरा धास्तावलीच. पण एकंदर माझा हट्ट पाहून मग आईबाबांनी परवानगी दिली.
मुंबईची वाटणारी एक भीती माझ्या मनातही होती. एकतर मुंबई इतकी पसरली आहे की नवखा माणूस गोंधळून जातोच.
…तर मी बसमधून उतरले आणि पंकजनं विचारलं, ‘तुला कुठं बोलायला आवडेल?” मी त्याला समुद्रावर जाऊ आणि गप्पा मारू असं म्हटलं. भर दुपारच्या कडक उन्हात ‘वरळी सी फेसवर’ चालत आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग ‘विवा पश्चिम’ नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये मनसोक्त गप्पा मारत एकमेकांबद्दल जाणून घेतलं. संध्याकाळी पुण्याच्या बसमध्ये चढताना मनात पक्कं करून टाकलं होतं, “मला याच्याबरोबर इथं राहायचं आहे. ”
लग्न होऊन मुंबईत आले ती हाजीअलीच्या गर्व्हमेंट कॅालनीतल्या प्रशस्त घरी. ते घर म्हणजे माझ्यासारख्या ‘समुद्रवेडी’करता एक पर्वणीच होती. हॅालच्या खिडकीतून हाजीअलीचा दर्गा आणि घराच्या पाठीमागे महालक्ष्मी रेस कोर्स. उठल्याउठल्या पहिलं व्हायचं ते समुद्रदर्शन आणि रात्र व्हायची ती तो सुंदर रात्रीच्या प्रकाशात चमचमणारा दर्गा आणि शांत समुद्र बघतच! सकाळी रेसकोर्सवर मॅार्निंग वॅाक हा आमचा आवडता उपक्रम असायचा. मला आठवतं, एकदा आई-बाबा पुण्याहून आले असताना आम्ही त्यांना घेऊन सकाळी रेसकोर्सला फिरायला गेलो. आणि फिरता-फिरता समोर प्रख्यात गझल गायक साक्षात जगजित सिंग दिसले. काय दैवी योग होता तो! आम्ही भारावून गेल्यासारखे झालो. पुढचे खूप दिवस मग मी आणि बाबा त्यातून बाहेरच आलो नाही. तिथं फिरताना मग हे गाणं आपोआपच तोंडात यायचं – बहोत पहेलेसे उन कदमों की आहट जान लेते हैं।
हाजीअलीचा सहवास संपेपर्यंत आम्ही आसपासचा एरिया अगदी पिंजून काढला. मुळात पंकजला आणि मला फिरायची, खाण्यापिण्याची, कलेची आवड असल्यामुळे दादर, ताडदेव, माहीम, परळ, लालबाग, नरिमन पॅाइंट, फोर्ट, कुलाबा अशी बरीच भटकंती झाली. सरदार पावभाजी, अॅम्बेसेडर रिव्हॅाल्विंग रेस्टॅारंट, हाजी अली ज्यूस सेंटर, नूरानी, फोर्टातलं खैबर, दादरचं जिप्सी, प्रकाश ‘मुच्च्छड पानवाला’ अशा अनेकांशी मग कायमचं नातं जुळलं.
पुण्यात असताना कॅफे गुडलकच्या खिमा-पावची मी भक्त होते. माझं हे इराणी कॅफेप्रेम बघून पंकजनी माझी कॅफे माँडेगार आणि लिओपोल्डशी ओळख करून दिली. लिओपोल्डचं वातावरणच पाहूनच मन प्रसन्न होतं. मर्लिन मन्रो, बीट्ल्स, बॅाब मार्ले, एल्विस प्रिस्ले या लाडक्या मंडळींची पोस्टर्स निरखत बीअरची चवही अधिकच रंगते.
मुंबईतल्या विविध आर्ट गॅल-या, म्युझिअम्स, एनसीपीए थिएटर, पृथ्वी थिएटर, कालाघोडा फेस्टिवल या ठिकाणांनाही वेळोवेळी भेट देणं होतंच.
मुंबईत आल्यापासून मी तीन नोक-या बदलल्या. पण माझ्या नशिबानं सगळी ऑफिसेस घराजवळच असल्याने टॅक्सी आणि बस यांचाच प्रवास घडला. लोकल ट्रेनचा संबंधच आला नाही. मुंबईत घराजवळ ऑफिस असणं यासारखं दुसरं भाग्य नाही आणि त्यात मी पुण्याची! त्यामुळे कायनेटिकचं बटणं दाबून कुठंही पटकन पोचायची सवय… प्रभादेवीला ऑफिस असताना आठवड्यातून दोन-तीनदा पंकज घ्यायला यायचा आणि मग आमची स्वारी थेट ‘सी फेस’ला ! आता कांदिवलीला आल्यापासून तिथल्या वा-या कमी झाल्या. मग आता याला पर्याय म्हणून मढ आयलंडचा समुद्र आणि अंधेरीत गेलो की पुढे वर्सोव्याला एक चक्कर मारून येतोच.
कधीकधी ठाण्याला सासूरवाडीला गेलो की मुलांना घेऊन मुद्दाम घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचा प्रवास करण्यात मजा येते. असंच एकदा लोकल ट्रेनमध्ये बसायचा अनुभव घेण्यासाठी मी हट्टानं पंकजला नेलं आणि काहीच माहीत नसल्या कारणानं त्याच्याबरोबर ‘जेन्टस’ डब्यात चढले. चढले म्हणजे आपोआप ढकलली गेले. त्याचं न ऐकल्यामुळे अशरक्षः रडकुंडीला आले. मग कानाला खडा लावला, परत या डब्यात चुकूनही चढणार नाही पण काही गोष्टी थोडीच आपल्या हातात असतात. असंच एकदा, हिंमत करून मैत्रिणींना भेटायला कांदिवली ते लोअर परळ जायचं म्हणून ट्रेन पकडली. मी एकटी ट्रेनमधून चाललेय हे वेगळचं प्राउड फिलिंग आणून चढले खरी… पण चढले ते ‘जेन्ट्स’ फर्स्ट क्लासमध्ये आणि मग मात्र माझ्या पोटात गोळा आला. पण या वेळी मात्र अनुभव अगदी उलट. एका माणसानं मला ‘बिनधास्त बसा, आता गर्दी होणार नाही फारशी, पुढच्या स्टेशनला उतरा आणि ‘स्लो’ ट्रेन पकडा असं सांगितलं. त्यातही गडबडून गेल्यामुळे या डब्यातूनच लेडिज डब्यात चालत जाता येईल का, असा अत्यंत बावळट प्रश्नही मी विचारला. पंकजला मी आधी विचारायचे, लवकर पोचण्याकरता फास्ट्र ट्रेन घ्यायची सोडून ‘स्लो’नं जाण्यात काय पॉइंट वगैरे वगैरे ….
तसाच प्रकार ईस्ट आणि वेस्ट यात व्हायचा. पंकजनी त्यातल्या त्यात सोपं करून वेस्ट म्हणजे तुझ्या आवडत्या समुद्राची साईड असं सांगितलं. हे समजायला बरेच महिने गेले. त्यामुळे मी आणि माझे मुंबईतले अनुभव हा माझ्या मैत्रिणींसाठी एक हास्याचा विषय आहे.
पुण्यात कुठंही फिरताना आता प्रकर्षानं जाणवतं की, मी मुंबईत किती प्रवास करते. पुण्यात कितीही लांब जायचं असलं तरी ते स्थळ किती लवकर आलं असंच वाटतं. मुंबईत जीव नकोसा होतो, दोन-दोन तास गाडीत बसून नैराश्य येतं.
तरी काही म्हणा, पण मुंबईत आल्यावर एक प्रकारचा मोकळेपणा, बिनधास्तपणा, माझ्यात आला. वेळेची शिस्त पाळणं, कामाचा प्रोफेशनॅालिजम मला इथं जास्त जाणवला आणि भावला. मुंबईतल्या ‘कॅास्मो’ कल्चरमुळे मला अनेक ख्रिश्चन, मुस्लीम, पारसी मित्र-मैत्रिणी मिळाले आणि अगदी जिवाभावाचे झाले. ईद असताना आमीर मटन बिर्यानी आणणार, ख्रिसमसला स्टेसी माझे आवडते प्लम केक आणि मार्झिपॅन आणि पारसी न्यू इयरला झहानची बायको सली-बोटी आणि सली-पार-इडु (अंड्याचा प्रकार) पाठवायची त्याची चव अजून जिभेवर रंगाळतेय. मी एका नामवंत एयरलाइन्समध्ये काम करत असताना मला काही वर्षं रात्रपाळ्याही कराव्या लागल्या. एक शिफ्ट संध्याकाळी ०७.३० ते पहाटे ०४.०० असायची. ती शिफ्ट संपली की एरवी कधीही पहाटे बाहेर न पडलेली मी बिनदिक्कत, गाणी गात कायनेटिकवर घरी यायचे. पहाटे कामावर निघालेलया दूधवाल्या भैयांची सोबत असे तर कधी रस्त्यावरचे कुत्रे मागे लागायचे. पण त्याचीही सवय झाली. अशा धाडसाचीपण कधीतरी मजा येते नाही का ?
पण काही मजा जिवावर बेतू शकतात आणि भीषण स्वरूप घेऊ शकतात, हे मी अनुभवलं ते २६ जुलै २००५ रोजी. त्या दिवशी पावसानं असा काही तडाखा लावला आणि संपूर्ण मुंबई अस्वस्थ झाली. माझ्या आयुष्यातला सर्वात भीषण आणि रोमांचक दिवस होता तो! मी दादरच्या IMRB Corporate Officeला होते. संततधार पावसानं पाणी इतकं भरलं की सगळी मुंबईत जलमय झाली होती.
बाहेर पडणार कसं, घरी पोचणार कसं, टॅक्सी, बस, ट्रेन बंद. वीज नाही. आम्ही सगळे जण ऑफिसमध्येच थांबलो होतो. काही डोंबिवली-विरारला रहाणा-या लोकांची तिथंच सोय केली गेली. घरी फोन लागेना. कसाबसा पंकजशी संपर्क झाला. पंकज आमच्या हाजीअलीच्या घरापासून छातीएवढ्या पाण्यातून चालत IMRBला आला. त्यात मध्ये त्याची चप्पल वाहून गेली. काही विचारू नका. बिचारा वा-यानं उलटी झालेली छत्री, मोबाईल आणि अनवाणी अवस्थेत धडपडत खाचखळग्यातून ऑफिसला पोहचला. माझी तर बोलतीच बंद झाली होती. पाऊस आणि समुद्र यांची इतकी भीती वाटलेला तो एकमेवाद्वितीय दिवस!
मी ट्रू ब्लू पुणेकर आणि पंकज पक्का मुंबईकर असल्यामुळे पुणे-मुंबई वादविवाद, चर्चा, थट्टा या अटळ असतात; पण त्याचीही आम्ही मजा घेतो. मुंबईचं हवामान मला अजूनही मानवत नाही. दमट, चिकट वातावरण आणि ३६५ दिवस येणारा घाम. मग माझी चिडचिड होतेच आणि मग पुण्याची हवा किती सुखद, थंड अशी तुलना होते. पाऊस आणि भजी याचं एक अतूट नातं सर्वांनाच माहिती आहे. माझ्या मते पुण्याच्या रसिक पावसात भजी खाणं औरच! मुंबईच्या मुसळधार पावसात आणि तरीही आपण घामेजेललेच असताना भजी खाणं यात काय आनंद? यावर मतभेद होतातच. याला ‘चितळे’ही अपवाद नाहीच. चितळ्यांवर जोक्स, १ ते ४ बंद इ.इ. तीच-तीच वक्तव्य होतात. पण मग पुण्याहून मुंबईला जाताना आंबा बर्फी, मटार करंजी घ्यायचा पंकजला काय सोस, समजत नाही.
असो… पुणे हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तिथं मिळणारा वेळही पुण्यात असताना माझं ऑफिस, माझा जर्मनचा क्लास, जिम, संध्याकाळी मित्रमैत्रिणींना भेटणं सगळं कसं मस्त मॅनेज व्हायचं. तो उत्साह मात्र मुंबईत मला कधीही जाणवला नाही. ऑफिस करून घरी येईपर्यंतच मी अर्धमेली झालेली असायचे. तसाच इथल्या ट्रॅफिकचाही अंदाज यायला मला बराच काळ गेला. पंकजचं शूटिंग रात्री ९ ला संपून तो ११.३०ला आला की मी अजूनही ‘तुला अडीच तास कसे लागले?’ हा प्रश्न विचारतेच. आता अशा प्रश्नांचीही त्याला सवय झाली आहे.
मुंबईचं जीवघेणं ट्रॅफिक, हवा, कमी मिळणारा वेळ आणि भाषा या चार गोष्टी जरी मी अंगवळणी पाडून घेतल्या असल्या, तरी त्या मला अजिबात आवडत नाहीत. ‘पाठी’ ‘गेलेलो’, ‘बोललो’, हे शब्द आसपास रोज कानावर पडूनही मी झोपेतही ते आत्मसात करू शकणार नाही असो…. हे पुणेकरांनाच पटेल. वाद नको.
बाकी मुंबई माझ्यात भिनली नसली; तरी या शहराचा वेग, कामाची शिस्त, सर्वांना सामावून घेण्याची क्षमता, कुठेतरी पोचण्याची जिद्द आणि लगबग आणि अर्थात माझा लाडका ‘समुद्र’ यांची नशा काही वेगळीच.
मागच्या आठवड्याचाच प्रसंग ठाण्याहून सासूसास-यांचा निरोप घेऊन आम्ही घरी कांदिवलीला येत होतो. घोडबंदर रोडला ट्रॅफिकचा खोळंबा. रात्रीचे पावणे बारा झाले होते. दोन्ही मुलं मागच्या सीटवर एकमेकांच्या खांद्यावर डोकी टेकून गाढ झोपली होती. एफएमवर गाणी चालू होती. गाडी मात्र ठप्प, Standstill ! हताश अवस्था. पंकज म्हणाला, ‘नको झालीय ही मुंबई.’ क्षणभर शांतता… अन् म्हणाला, ‘हे ट्रॅफिक!’ मी काहीच बोलले नाही… रिटायरमेन्टनंतरच आयुष्य आपण पुण्यात घालवायचं ही इच्छा पंकजनं ब-याचदा बोलून दाखवली आहे.. तेच आठवलं एकदम! मी मंद स्मित करत एफएमचं गाणं गुणगुणत खिडकीतून बाहेर पहात बसले.
मानसी विष्णुपुरीकर
मूळची पुण्याची. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायकॉलॉजी घेऊन बी.ए. केलं. ट्रॅव्हल आणि टूरिझमचा आयएटा डिप्लोमा, मॅक्समुलरचे जर्मन भाषेचे कोर्स केले. मुंबईत लग्न होऊन स्थायिक झाले. नामवंत एयरलाईन्समध्ये नोकरी केली. सध्या स्वतःचा ब्लॉक प्रिंटिंगचा व्यवसाय. पुणे-मुंबई या दोन्ही शहरांचं मी कॉकटेल झाले आहे.
फोटो – मानसी विष्णु
Too Good Dear Manasi… Keep it Up… Just Lived those moments with you…
Radhikandighe@gmail.com
LikeLike
Thank u so mch
LikeLike