अगला स्टेशन मुंबई …

राहुल निर्मला प्रभू

गावाकडच्यांनी मुंबईत पोहोचल्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं अशा धमकीवजा केलेल्या सूचना आणि सल्ले डोक्यात घोळवतच दादरला उतरलो तसा दादर स्टेशनवरच्यात्या वाहत्या गर्दीकडे पाहत बराच वेळ उभा राहिलो. आयबीएन लोकमत चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून माझी निवड झाली होती. आयबीएन लोकमतचं ऑफीस लोअर परेलला आहे. ब्रीजवर चालत असलेली इतकी माणसं एकत्र पाहून खरंतर मी भांबावून गेलो होतो. बावचळत आणि १० जणांना विचारत एकदाचा प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आणि दादरहून लोअर परेलला जाण्यासाठी लोकलची वाट पाहू लागलो.

मी थांबलो असताना २-४ लोकल ट्रेन आल्या आणि गेल्या पण ट्रेनमध्ये चढायचं तर सोडाच त्यांतला एकाही ट्रेनच्या दरवाज्यापर्यंतही मला पोचता आलं नाही. माझी ही कसरत पाहून एक अनुभवी कार्यकर्ता मला म्हणाला,‘अय मित्रा, इथं ट्रेनमध्ये चढायला मिळत नसतंय कधीच, इथं डायरेक्ट घुसावं लागतंय जिथंतिथं. असं चढत बसायचा विचार करत राहशील तर दिवसभर घुसता नाय येणार तुला. मी सांगतो तसं कर आणि घूस माझ्यासोबत,’ असं म्हणत त्यानं मला चार सूचना दिल्या. ‘आधी ती तुझ्या पाठीमागची बॅग काढून म्होरं घे अशी पोटावर, मागच्या खिश्यातलं पैश्याचं पाकीट बॅगंच्या आतल्या कप्प्यात ठेव सरळ आणि काय रं मोबाइल कुठं हाय तुझा? तोबी ठेव जमलं तर बॅगमधी नायतर म्होरल्या खिश्यात ठेव आणि शेवटचं, ट्रेन आली की फक्त तिच्या दरवाज्याकडं बघायचं बाकी गर्दीला इसरून जायचं, मंजी जणू काय तू एकटाच हाय आणि ही ट्रेन तुलाच घ्यायला आलीय असं मनातल्या मनात तरी वाटलं पायजे…’ एवढं सगळं एका दमातच बोलून त्यानं एकदाचा पूर्णविराम घेतला.

उतरल्यापासून एकही जण माझ्याशी किंवा मी कोणाशी मराठीत बोललोच नव्हतो, पण अचानकपणे मिळालेल्या या मित्राच्या भाषेवरून नकळतपणेच माझ्यातली प्रादेशिक अस्मिता लगेच जागी झाली. हे बेणं आपल्याकडचंच कुठचंतरी आहे, हे लगेच जाणवलं. पण तरीही एक घोळ झालाच! कारण एवढी मेहनत करून मी माझ्या आयुष्यात पकडलेली पहिलीच लोकल चुकीचीच पकडली. मला उतरायचं असणार्‌या करी रोड किंवा लोअर परेलला फास्ट लोकल थांबत नाही, हे ट्रेनमध्ये बसल्यावर कळालं. मग त्याच मित्रानं दिलेल्या सल्ल्यावरून भायखळ्याला उतरलो आणि स्लो ट्रेन पकडायचं ठरलं. येणारी ट्रेन आता एकट्यानं पकडायची होती आणि ट्रेन कशी पकडायची याचं प्रॅक्टिकल आणि थिअरी असं दोन्ही ५ मिनिटांपूर्वी पार पडलं होतं. दुस-याच मिनिटाला आलेली स्लो लोकल मी एकदम फास्टमध्ये पहिल्याच झटक्यात पकडली. आतातरी योग्य स्टेशनला उतरता यावं यासाठी माझी धडपड सुरू झाली. स्टेशन लगेच आलं, पण ते कोणत्या दिशेला येणार यात परत घोळ झाला आणि चुकीच्या दिशेला उभा राहिलो त्यामुळे चढणा-यांच्या गर्दीत अडकलो. परत जोर लावून धक्का देत खाली उतरलो आणि मागे अडकलेली नवी कोरी बॅग खसकन ओढली. योग्य स्टेशनला उतरल्याचं समाधान असल्यानं तुटलेल्या बॅगेचं क्षणभर काही वाटेनासं झालं. मुंबईतली लोकलची गर्दी, घामाचा वास, ट्रॅफिक, झोडपून टाकणारा पावसाळा यांना मी हळूहळू सरावलो आणि मी मुंबईकर कधी झालो हे कळलंच नाही…

2017-06-30-PHOTO-00000561

मी मूळचा मराठवाड्यातल्या कायम तत्त्वावर दुष्काळी भाग म्हणून मोजल्या जाणा-या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातला. आमचं हे कळंब म्हणजे एकदम सुधारित खेडं म्हणायला काहीच हरकत नाही. चांगली मोठी बाजारपेठ, चांगल्या शाळा, ३-४ मोठी महाविद्यालयं. गावाकडच्या प्रत्येकाच्या मनात कमीअधिक प्रमाणात मुंबईबद्दल एक सुप्त असं आकर्षण असतंच असतं. मीही याला अपवाद नव्हतो. आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, याची कसलीही समज नव्हती आमच्या सुधारित खेड्यात याबद्दल समजून सांगायलाही कुणी नव्हतं. २००८ला वडिलांच्या एका अपघातानं पुण्यात आल्यानंतर योगायोगानं पत्रकारितेत आणि पर्यायानं मुंबईत आलो. या ग्लॅमरस दुनियेबद्दल मला कायम एक वेगळंच आकर्षण होतं.

मुंबईत आल्यानंतर केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नवीन सुरुवात मला बरंच काही शिकवणारी ठरली. आयबीएन लोकमतच्या निमित्तानं आता इथंच राहायचं आहे या हेतूनं मुंबईत पहिल्यांदाच पाय ठेवला खरा, पण इथं आल्यावर आता राहायचं कुठं, हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न मलाही सतवू लागला. माझे काही पत्रकार मित्र वरळीत कुठंतरी राहतात या भांडवलावर आणि त्यांच्यावर विसंबून राहत मी वरळीची वाट धरली. कसलीही धावपळ न करता, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लोकलचा प्रवास न करता, तुमच्या कामाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर निवारा मिळणे हे मुंबईत जरा स्वप्नवतच होतं. वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मित्रांच्या खोलीतला एक कोपरा मी आनंदानं माझ्या नावावर केला. तुलनाच करायची झाली, तर आमच्या गावाकडच्या बाथरूमपेक्षा आकारानं थोड्या मोठ्या असलेल्या त्या खोलीत हक्काचे ५ जण आणि आठवड्यातले निदान दोन-तीन दिवस तरी हक्कानं राहणारे आमच्यापैकी कोणाचे ना कोणाचे पाहुणे.

2017-06-30-PHOTO-00000562

इथवर तर मी सगळं पचवलं कसंतरी, पण आयुष्यात पहिल्यांदाच सार्वजनिक शौचालय दररोज वापरायचं होत, केवळ या विचारानं मला रात्रभर झोपच आली नाही. एक-दोन दिवस मी डायरेक्ट ऑफिसला गेल्यावरच पोट रिकामं केलं पण तिस-या दिवसापासून मात्र सकाळी-सकाळी टॉयलेटला तंबाखू मळत जाणा-यांच्या पाठीमागं टमरेल धरून उभा राहण्याशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला बीडीडी चाळीत माझा श्वासच गुदमरायचा, पण त्याच खोलीत सोबत राहणा-या इतर पोरांकडे बघितलं की माझी पाटीलकी जागच्या जागीच जिरून जायची. आता बाकीचे रूममेट्‌स इतक्या सहजतेनं आणि आनंदानं कसलीही तक्रार न करता इथं राहत असतील; तर मग यापेक्षा दुसरी चांगली जागा असू शकत नाही, यावर माझा खूप लवकर विश्वास बसला. कामावरून जातायेता माझी नजर चाळीत राहणा-या  सारखी फिरायची.

चाळीतल्या प्रत्येक घरात कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १०-१२ माणसं आणि त्यातही कमीजास्तीला कुत्र्या-मांजराचं एखादं पिल्लू, अशी एकूण लोकसंख्या असते असा शोध मी लावला. या प्रत्येक कुटुंबाकडे बघितलं की मला भारीच कमाल वाटायची. यांच्या नैसर्गिक गुणसूत्रांमध्ये ॲडजेस्टमेन्ट नावाचं खास गुणसूत्र जन्मजातच आलेलं असायचं. एकाच घरात आई-वडील आणि लग्न झालेले दोन भाऊ एकमेकांच्या गरजा ओळखून एकाच बेडरूमचा सुनियोजित वापर करत न कुरकुरता राहायचे. कुठल्या जोडीनं आत किंवा बाहेर कधी झोपायचं याचे अलिखित असे नियम केवळ नजरेतच ठरवले जायचे. इतकंच काय तर गावाकडं आम्ही ज्यांना हेमल्या किंवा हिजड्या म्हणून हिणवायचो असं एक तृतीयपंथी जोडपं याच बीडीडी चाळीत माझ्याच खोलीसमोर राहायचं. गावाच्या वेशीबाहेर असणारा महारवाडा तर मला माहीत होता, पण गावच्या महारवाड्यातही आजवर जागा न मिळालेला हा हिजडा इथं माझ्याच खोलीसमोर राहतोय हा माझ्यासाठी खरंच एक मोठा सामाजिक धक्काच होता. हे तृतीयपंथी जोडपं इतरांप्रमाणेच चाळीतल्या प्रत्येक कार्यक्रमात बिनधास्तपणे सहभागी असायचं. कुणाचं लग्न, कुणाची हळद तर कुणाचं बाळंतपण या सगळ्यामध्ये या तृतीयपंथीयांना इथल्या प्रत्येकानं सर्वार्थानं स्वीकारलं होतं.

गावात लहानाचे मोठे झालो, तरी असल्या गोष्टी इतक्या जवळून कधी पाहताच आल्या नाहीत, पण हळूहळू मीसुद्‌धा या जोडप्याशी जिज्ञासेपोटी तासन्‌तास गप्पा मारत बसायला लागलो. यातूनच कधीही माहीत नसलेल्या त्यांच्या शरीराविषयी, समाजाविषयी, कामाविषयी, कमाईविषयी मला बरीच माहिती मिळाली. थोडक्यात सांगायचं तर अठरा पगड जातींच्या माणसांबरोबरच, ज्यांना सगळ्यांनीच टाकलंय असे ख-या अर्थानं दलित, भंगी, कचरा कामगार आणि हिजडेही या एकाच चाळीत एकत्र असल्यागत राहायचे. ही सगळी माणसं एकमेकांत विरघळलेली बघितल्यावर मला ती जातीपातींनी बरबटलेली गावची वेस पहिल्यांदाच ओलांडल्यागत वाटलं. या चाळीतल्या खोल्या जरी लहान असल्या तरी इथं राहणा-यांनी, जातीपातीच्या, भेदभावाच्या सगळ्या चौकटी कधीच बाजूला सारल्या आहेत. मुंबईचा हा चेहरा बघितल्यानंतर ख-या अर्थानं वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या एका शहरात आपण आलोय असं वाटायला लागलं.

2017-06-30-PHOTO-00000557

2017-06-30-PHOTO-00000552आयबीएन लोकमतला काम करणारा पत्रकार ही माझी ओळख माझ्या कायमच पथ्यावर पडायची. स्वतःचं सांगावं असं काडीचंही काम नसताना केवळ पत्रकार म्हणून एक वेगळीच स्पेशल ट्रीटमेन्ट मिळायची. आत्तापर्यंत केवळ वाचनातून आणि हिंदी चित्रपटांमधून पाहिलेली मुंबई आता प्रत्यक्षात फिरायला सुरुवात झाली होती. शिवसेना आणि वरळी हे पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेलं समीकरण मी जवळून पाहत होतो. मुंबईतली शिवसेना, शिवसेनेचा कार्यकर्ता आणि मराठी माणूस या ऑरगॅनिक रिलेशनचा अनुभव हिंदूंच्या प्रत्येक सणात येतच होता. त्यात मी राहात होतो तो भाग गिरणी कामगारांच्या पिढ्यांचा होता. त्यामुळे गिरण्यांचा संप, त्यात उद्ध्वस्त झालेली एक पिढी आणि त्यांच्या जिवावर आलेला पैसा आणि लागलेलं मुंबईतलं घर यांच्या जिवावर चैन करणा-यांची आत्ताची तरुण पिढी हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. घरात खंगलेले म्हातारे, केईएमच्या रागांमध्ये तासन्‌तास उभ्या राहणा-या त्यांच्या सुना, तुटपुंज्या पगारावर १५ ते १८ तास काम करणारा कर्ता पुरुष आणि घरातला ऐन विशीत गेलेला, शिक्षणाचा आयचा घो, म्हणत थेट शिवसेनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालेला, इकडेतिकडे दमदाटी करत फिरणारा, दमडीही न कमावता बाइकवर फिरून पोरी पटवणारा मुलगा; असं चित्र घरोघरी दिसत होतं.

चाळीतल्या अशा मराठी पोरांच्या अड्ड्यावर मी मिसळायला लागलो. यातच मला एक हक्काचा पानाचा कट्टा मिळाला तो म्हणजे दूरदर्शनजवळचा राजू पानवाला. राजू वरळीतला शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. त्याचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे, हे त्या अड्ड्यावरच्या गर्दीवरून लगेच नजरेत भरायचं. राजूच्या पानटपट्टीवर येणारे हे तरुण लालबाग, परळ, बीडीडी चाळ, प्रभादेवी आणि वरळी ह्या भागांतलेच असायचे. यातला कुणी नोकरदार, कुणी पोलीस दलात, कुणी केबलचा धंदा, कुणी वडापावची गाडी तर कुणी काय असा मध्यमवर्गच. पण यांतली ८० टक्के पोरं ही कोणत्या ना कोणत्यातरी पक्षाचे कार्यकर्तेच, त्यात खास करून शिवसेना तर आहेच आहे. भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणा-या, गाडीवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून ट्रॅफिक हवालदारशी हुज्जत घालणा-या, कॅरम खेळणा-या या पोरांच्या नजरेतली मुंबई मला वेगळ्या अंगानं उलगडत होती.

मुंबईतले सर्व रेडलाइट एरिया, धारावीसारखी झोपडपट्टी, ग्रँन्ट रोड, तेलगीनं एका रात्रीत जिथं तरन्नुम या बारगर्लवर ८३3 लाख रुपये उधळले तो डान्सबार, डॅडीची दगडी चाळ, दाऊदची डोंगरी, भेंडीबाजार, छोटा राजनचं चेंबूर असं सगळं आणि ज्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं अशा सगळ्या ठिकाणी मी पायी फिरलो. ३ वर्षं आयबीएन लोकमतला कोर्ट आणि क्राइम बीट कव्हर केलं, तेव्हा अनेक खब-यांशी, पोलिसांशी, गुन्हेगारांशी भेटणं बोलणं व्हायचं फरक इतकाच की कधी ते पडद्याआड व्हायचं तर कधी ते पडद्यासमोर. या काळात मुंबईत ज्यांचा एके काळी दबदबा होता, असे कुख्यात अरुण गवळी, अश्विन नाईक यांना प्रत्यक्ष भेटण्याचाही योग आला. अबु सालेमशी एका कोर्टात काही मिनिटं बोललोही होतो. आर्थर रोड जेलमध्ये ज्याची आजही दहशत आहे असं म्हणतात, त्या मुस्तफा डोसालाही तिथंच पाहिलं होतं. पण अंडरवर्ल्ड वगळताही मुंबईचं गुन्हेगारी क्षेत्र आणि गुन्हेगारी मानसिकता ही इतकी भयानक होती की, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.

2017-06-30-PHOTO-00000554

वरळीतल्या झोपडपट्टीत राहणारी आणि सुरुवातीला खाणावळ चालवणारी एक बाई अंडरवर्ल्डमधल्या कोणाच्याही मदतीशिवाय मुंबई पोलिस आणि अधिका-यांना हाताशी धरून एकटीच मुंबईतली सगळ्यांत मोठी लेडी ड्रग्स माफिया बनते ही स्टोरी मी केली होती. तेव्हा तपशिलात जाताना या बाईनं जमावलेली शेकडो कोटींची माया, तिची पोलिसासोबत असणारी एक प्रेमकहाणी सगळंच अंचबित करणाऱं होतं. ती विकत असलेल्या MD नावाच्या नशेमुळं मुंबईतली लाखो घरं उद्ध्वस्त झाली होती. याच MDमुळे नशा करणा-यांच्या वयोगटाचं सरासरी प्रमाण १६ वरून थेट १०-११ वर्ष वयोगटात आलं होतं. नुकत्यात वयात येणा-या कित्येक मुलींनी या नशेपायी आपलं शरीरच बहाल केल्याचा अनेक केस स्टडीज मी स्वतः कव्हर केल्या होत्या. एक पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक मोठ्या स्टोरीज मिळाल्यानंतर होणा-या समाधानापेक्षा समोर आलेल्या मुंबईच्या गुन्हेगारी जगातल्या या जळजळीत वास्तवानं मला पुढे त्रासच व्हायला लागला.

एरवी दिसणारी प्रचंड वर्दळ रात्री सहसा कुठं दिसत नाही, पण मी ज्याज्या ठिकाणी फिरायचो तिथं काही ना काहीतरी धावपळ चालूच असायची. म्हणजे रात्रपाळीवर असणा-यांसाठी खास तयार झालेले अड्डे, भुर्जी-पावचे गाडे, तव्यावर होणा-या ठोक्याचा आवाज आणि त्या परिसरात घुमणारा भुकेचा जगप्रसिद्ध सुवास आणि या वासानंच या गाडीकडं झक मारून खेचले जाणारे हमाल, रात्रपाळीचे वॉचमन, मायानगरीत मेहनत करणारा नोकरदार असे सगळेच गर्दी करायचे. कधीच न विसावणा-या मुंबईत रात्रीचं निरीक्षण करताना आपल्यातलीच एक वेगळी नजर खुलायची. दिवसभर धावपळ करणा-या मुंबईकरांचं ओझं वाहणारे रस्ते रात्री निपचीत पडलेले असतात. कुठंतरी ४-५ जणांचं टोळक गोल्ड फ्लॅकमध्ये भरलेला गांजा झिंगाटत थांबलेलं असतं तर एखाद्या स्थलांतरित फासेपारध्याचं संपूर्ण कुटुंब पुलाखाली गजरे ओवत बसलेलं दिसायचं. दिवसभर काम करूनही रात्रपाळी करणारे लालबाग, परळ, वरळी इथली मराठी पोरं कुठल्यातरी एटीएमच्या किंवा एखाद्या हाय प्रोफाइल सोसायटीच्या बाहेर खुर्चीवरच पेंगलेली दिसायची. ही मराठी पोरं तशी मूळ इथलीच, पण बाहेरून आलेल्या गुजराती-मारवाड्याच्या घराबाहेर रात्रपाळी करण्यात किंवा मिलच्या जागी तयार झालेल्या मॉलमध्ये दिवसरात्र शिफ्ट करण्यातच यांची हयात जाईल असंच काय ते चित्र. मराठी माणसाच्या कल्याणाचा ठेका घेतलेल्या शिवसेनेनं या मराठी पोरांच्या रोजीरोटीचा प्रश्न तर सोडवला, पण बाहेरून आलेल्या लोकांच्या तुलनेत दररोजच्या जगण्यातली कसरत अजूनही सुरूच आहे.

2017-06-30-PHOTO-00000556

गुजराती आणि मारवाडी ह्यांच्यानंतर मुंबईत केवळ पैसा कमवायला आलेला भैय्या आणि इडलीवाला अण्णा यांना पाहून मला कायमच हेवा वाटायचा. मी मराठीच असल्यानं तसा म्हणावा इतका स्थलांतरित नव्हतो. पण हे टॅक्सीवाले भैय्या, पान टप-या, रद्दी-भंगाराची दुकानं म्हणजे शून्य टक्के गुंतवणूक आणि १०० टक्के नफा, असा यांचा सरळ सरळ हिशोब. रात्री अनेकदा सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर जवळ-जवळ दोन-एकशे टॅक्सीवाले भैय्या आपापलं पार्किंग शोधून दिवस उजाडायची वाट बघत सावधच झोपलेले असायचे. ही टॅक्सी म्हणजेच त्यांचं घर होतं. दिवसभर टॅक्सी चालवायची, मिळेल तिथं एखादी स्वस्तातली थाळी खायची आणि टॅक्सीतच आराम करायचा; म्हणजे पैशांची बचतच बचत. त्यांच्याकडे पाहिलं की मला माझी वरळी चाळीतली खोली आठवायची. कारण माझ्या १० बाय १२च्या त्या खोलीपुढे त्यांची ३ बाय ४ची टॅक्सीच त्यांना निवारा वाटायची. इडलीवाले अण्णाही असेच. कोणत्याही रस्त्यावर ४ तास धंदा करून महिना लाख रुपये आरामात शिलकीत टाकायचे. सांगण्याचा उद्देश एवढाच की या मुंबईनं कमावणा-या हाताला प्रांतवादाचा शिक्का कधीच लागू दिला नाही. परप्रांतीयतेचा जातीयवाद बाजूला ठेवत ह्या मुंबईनं नोकरदाराच्या ब्रेड-बटरची तर कष्टक-यांच्या रोजीरोटीची तजवीच केलीय ती अगदी कायमचीच.

गावाकडच्या कंफर्ट झोनमध्ये वाढलेला साधारण माणूस शहरात कायम बुटकाच ठरतो, असं कायम बोललं जायचं. आपण काय करू शकतो यापेक्षा जास्त काय नाही करू शकत, याचाच जास्त विचार तो करत असतो. आपली पोच कुठपर्यंत आहे, आपला तोल कुठपर्यंत टिकू शकतो याचं भान तो आवर्जून घेत असतो. उंच माणसाप्रमाणेच आपल्या क्षमतेबद्दल त्याचे काहीच गैरसमज नसतात त्यामुळे तो आपल्या क्षमतेबाहेर पडून कोणाताही प्रयोग करायला कधीच धजावत नाही..

पण ही मायानगरी मुंबई त्या प्रत्येक बुटक्या माणसाला अपवाद ठरते, जशी ती मला ठरलीय…कारण या मुंबईनंच मला माझी स्वतःची अशी एक ओळख दिली. अजूनही जेव्हा केव्हा मी गावाकडे जातो, तेव्हा असं वाटतं की तिथली वेळ पुढे सरकलीच नाही. गेल्या १० वर्षांत गावाकडच्या रिक्षा, ट्रॅक्टरवर, टमटम यांमध्ये वाजणा-या गाण्यांपासून ते चौकाचौकांत कुठल्यातरी पक्षाचा गमचा गळ्यात घालून कपाळी टिळा, तोंडात माव्याचा तोबरा भरलेली तीच पोरं तशीच थांबलेली दिसतात. गावातली तरुण पिढी व्यसनाधिनता आणि मोसमी राजकारण्यांच्या नादाला लागत बरबाद होतेय. माझ्याबरोबर आणि माझ्यामागून आलेल्यांपैकी एकही जण मुंबईत टिकला नाही किंवा मुंबईनं त्यांना टिकू दिलं नाही. मुंबईची ही नशा वेगळीच आहे. ती सगळ्यांनाच झेपते असं नाही; पण मुंबईला ज्यानं आपलं मानलं, त्या प्रत्येकाला ती आबादच करते. पण या शहरानं माझीच मला नव्यानं आणि सर्वार्थानं सर्वमान्य अशी ओळख दिली. हाताला काम आणि त्या कामाचं मनाला समाधानंही दिलं. जगण्यासाठी लागणारा पैसा, मानसन्मानही दिला. एवढं सगळं भरभरून मिळाल्यानंतर मुंबई सोडण्याचा विचार आजवर कधीच डोक्यात आला नाही.

2017-06-30-PHOTO-00000560

या शहरानं मला फक्त स्वप्नंच दाखवली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी लागणा-या सगळ्या वाटा, दिशा, पर्यायही माझ्यासमोर खुले केले. आजवर या मायानगरीनं १९९३ चे बाँबस्फोट, त्यानंतर उसळलेली जातीय दंगल, याच दंगलीनंतर स्वतःचे झालेले तुकडे, २००६ चे ट्रेन बाँबस्फोट, २६ जुलैचा महाप्रलय आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला असं खूप काही पचवलंय. पण काहीही झालं तरी न खचता न धडपडता कायमच कसं चालत राहावं हे मुंबईनं आणि मुंबईकरांनी मला शिकवलंय. मुंबईत येण्याचा रस्ता हा महाकाय धबधब्याखाली वाहणा-या कपारीसारखाच असल्याचं मला अनेकदा वाटतं. धबधब्याखाली पोहताना या कपा-यांमध्ये कायम आत जायचाच रस्ता दिसत असतो मात्र आत गेल्यावर परत बाहेर येण्याचा रस्ता शंभरांतून एखाद्यालाच सापडतो. ही मुंबई अगदी अशीच आहे. या कपा-यांसारखचं ती प्रत्येकाला इथं येण्याची भूल घालते, इथं आल्यावर ही अगोदर स्वप्नं दाखवते, ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या मायानगरीतली दुनियादारी जगायला शिकवते. इथं आलेला प्रत्येक जण आपापली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो आणि कधी मुंबईचा होऊन जातो, हे कोणालाच कळत नाही. जो इथं टिकला तो जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात टिकू शकेल हेच खरं.

राहुल निर्मला प्रभू

10672297_729086323839227_8102260928016530384_n

इ-मेल – write4rahul262@gmail.com  मोबाइल – 09930413176

गेल्या सहा वर्षांपासून मुंबईत पत्रकार म्हणून कार्यरत. रिपब्लिक टीव्हीसाठी वरिष्ठ बातमीदार म्हणून काम केलेलं आहे. त्याआधी आयबीएन लोकमत, महाराष्ट्र वन अशा वहिन्यांसाठी काम केलं आहे.

 

 

 

One thought on “अगला स्टेशन मुंबई …

  1. आवडला. तुम्हाला दिसली ती मुंबई अनेकांना ठाऊक नसते फारशी.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s