फोर्ट, कोर्टची मुंबई

सविता प्रभुणे

अनेक वकिलांचं स्वप्न असतं आपण उच्च न्यायालयात वकिली, करावी. तसं ते माझंही होतं. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करणं म्हणजे कायदा करणार्‌या (लॉ मेकर्स) ज्येष्ठांसमोर आपली बाजू मांडता येणं. त्यात जबाबदारी, मान, प्रतिष्ठा या सर्व भावना असतात. कायदा करण्याच्या प्रक्रियेत आपल्या युक्तिवादानं आपल्याला सहभागी होता येतं. मी नऊ वर्षांपासून ते स्वप्न उराशी बाळगलं होतं ‘डबक्यापेक्षा समुद्रात पोहणं आव्हानात्मक असतं’ वगैरे म्हणी म्हणणं ठीक आहे पण त्यासाठी तशा संधी मिळायला हव्यात तालुक्याच्या ठिकाणी ‘ट्रायल’ची वकिली करण्याचे वेगळे फायदे असतात मुळात वकिलीत ‘ट्रायल’ माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला पर्यायानं वकिलीला वेगळी धार येऊ शकते, हे जाणकारांच्या पटकन लक्षात येईल.

वकिलीचं शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर, माझ्या वडिलांनी बारामतीला त्यांच्या हाताखाली वकिली सुरू करायची इच्छा प्रदर्शित केल्यावर मी या विचाराला लगेच दुजोरा दिला. मी नऊ वर्ष त्यांच्या हाताखाली वकिली केली. त्यांच्या कार्यालयात काम केलं. पण दर वेळेस मला हे ऐकायला लागायचं की ‘वडील मोठे वकील आहेत त्यामुळे तिचं यशस्वी होणं आश्चर्यकारक नाहीच्चे’. त्याच दरम्यान मी मराठी चित्रपटातूनही भूमिका करत होते. ‘शांघाय’ (हिंदी), ‘सलाम’, ‘किल्ला’, ‘हाय वे’ हे मी बारामतीत असताना केलेले सिनेमे होते. शनिवार-रविवारची सुट्टी, उन्हाळा, नाताळ, दिवाळी या सुट्टया, कोर्टाच्या इतर सुट्टया असं सगळं त्रैराशिक सांभाळून मी ही छोटी मोठी कामं केली. अभिनयक्षेत्र पेशा म्हणून न पाहता मी आवड म्हणूनच पाहत होते, आजही आहे. ‘वडिलांच्या जोरावर हिचे सिनेमे’ असंही म्हणणारे म्हणालेच होते.

14611008_10153852660841516_306096411399347440_n
जाऊद्या ना बाळासाहेब या चित्रपटातलं एक दृश्य. सविता प्रभुणे आणि अक्षय टाकसाळे

बारामतीच्या कोर्टात माझा सगळ्यांत आवडता उपक्रम मोफत कायदेविषयक सल्ला केंद्रात सहभागी होणं होता. वाड्या-वस्त्यांवर खेडोपाडी जाऊन गावकऱ्यांना सोप्या भाषेत कायदा समजावताना समाधान मिळायचं. पक्षकारांशी होत असणा-या संवादामुळे, देवाणघेवाणीमुळे मला अनेक लेखनबीजं सापडायला लागली. यातूनच काही कथा आणि लेख ‘अंतर्नाद’ नावाच्या मासिकात छापूनही आले.

पण मनातून मी स्वत: अनेक नकारात्मक लोकांमधून, आवाजांमधून वाट काढत होते आणि ते मला खूप कष्टप्रद होतं. मला माझ्याप्रमाणे जगू देणारं फारसं कोणी नव्हतं. वयाची तिशी ओलांडली तरी लग्न करायला मला थोडा वेळ हवा होता. माझ्या वडिलांच्या ऑफिसमधले एक वकील मला म्हणाले होते की, ‘वकिली हे क्षेत्र मुलींसाठी नाहीये’. नऊ वर्षांच्या या सगळ्या कोंदटलेपणाला कंटाळून एक दिवस मी माझ्या एका वकील मित्राला म्हणाले. “मला नाही राहायचं इथे, मला कुठेतरी निघून जायचंय. मला माझं आयुष्य आजमावायचंय माझ्या वडिलांच्या छत्रछायेशिवाय; नाव, बिरुद टाळून एकटं उभं राहायचंय.

माझ्या या बारामतीच्या वकील मित्राचा एक वकील मित्र इंदापूरचा होता. तो मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होता. एके दिवशी तो मुंबईहून बारामतीला आला होता. माझ्या बारामतीच्या मित्रानं माझी आणि त्याची ओळख करुन दिली. ‘माझं ऑफिस वापरा तुम्ही’ तो उत्स्फूर्तपणे म्हणाला. मला एका पाय-या नसलेल्या विहिरीत पडलेल्या माणसाला काठावर उगवलेल्या झाडाच्या फांदीचा आधार मिळाल्यासारखं वाटलं.

आता प्रश्न राहण्याचा होता. माझ्या मैत्रिणीनं माझ्यासाठी वर्किंग विमेन्स हॉस्टेल शोधलं, जे कुलाब्यामध्ये होतं. कोर्टापासून ते अगदीच जवळ असणार होतं. त्यामुळे मुंबईकर करतो तसा रोजचा प्रवास मला करावा लागणार नव्हता. माझ्या काही नातेवाइकांनी हा निर्णय कळल्यावर ‘एकुलत्या एका मुलीनं असलं काहीतरी करण्याची गरजच काय आहे’ असं अनावश्यक मतही दिलं. आपल्याला हवं अथवा नको असताना आपल्या आयुष्याबद्दल मुद्दे, प्रश्न आणि मतं असणारे अनेक लोक असतात हे मला पक्कं कळलंय. ‘गरज’ ही फक्त आर्थिकच असते आणि त्यामुळे ती मला नसायला हवी हे बारामतीचं ‘जागतिक’ मत मला समजलंय. ‘आता घर सोडून जायचं ते लग्नानंतरच’ असा त्यांतल्या एकांनी हुकूमही सोडला. भावनिक, व्यक्तिमत्त्वाची, बौद्धिक, आत्मिक आत्मविश्वास यांचीही गरज असते; हे मानणारे खूप कमी लोक आहेत.

Rajabhai Towerमला वसतिगृहात राहण्याचा अनुभव नवा नव्हता. मी पुण्यात शिक्षण घेतल्यानं बारावीनंतर वसतिगृहातच राहिले होते. मला मुंबई नवीन होती. मी मुंबईत कधी राहिले नव्हते, एकटीनं वकिली केली नव्हती, एकटीनं वकिली करता-करता आवड म्हणून सिनेमे, लिखाण केलं नव्हतं.

माझ्या वडिलांनी त्यांच्या अनेक मोठ्या वकिलांशी, डेसिग्नेटेड सिनीयर काउन्सिलशी ओळखी असून-देखील माझ्यासाठी शब्द टाकायला नकार दिला होता. तेव्हा त्या क्षणी मला त्यांचा फार राग आला होता. पण आता मी त्याकडे फार वेगळ्या पद्धतीनं पाहते. मैत्रिणीनं शोधलेलं हॉस्टेल वगळून त्यांनी मला दुस-या एका हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायला लावला, जे हायकोर्टाच्या अधिक जवळ होतं. त्याचा मेस चालवणारा त्यांच्या ओळखीचा होता. सर्व करूनसवरून मला मे महिन्यात हॉस्टेल मिळालं आणि मी आई-वडील, गाडी, ड्रायव्हर आणि सामानासकट दाखल झाले. माझे आई-वडील सोडून गेल्यावर प्रवासभर वडिलांचे डोळे वाहत होते आणि मला रिक्त वाटत होतं, असं आई आता मला सांगते. प्रत्येक आपला माणूस संपूर्णत: आपल्यापासून फटकून किंवा संपूर्णत: आपल्याशी सहमत नसतो. तो ह्या दोन्हीची सरमिसळ असतो हे भान मुंबईनं मला दिलंय.

मी आले त्याच संध्याकाळी पहिल्यांदा चालत आपल्याला हायकोर्टात जायला किती वेळ लागतो हे जाऊन पाहिलं होतं. एकाच वेळी ज्युरॅसिक पार्क आणि डिस्ने लँड यांमध्ये फिरल्यासारखं मला वाटलं कारण मी फोर्ट भागात चक्कर मारत होते. वकिलांच्या नावाच्या पाट्या, मोठाल्या फर्म्स, ऑफिसेस, इमारती, हायकोर्टाची अतिशय भव्य आणि देखणी इमारत म्हणजे या सगळ्यांला आपल्याला उद्यापासून सामोरं जायचंय ही भावना आणि जाणीव भयावहही होती आणि त्याचं मला अप्रूपही वाटत होतं.

मला कोणी बॉस नव्हता, मला कोणत्याही ऑफिसला वेळेवर पोचायचं नव्हतं. मला कसलंही बंधन नव्हतं. माझी मी एकटी होते. दुस-या दिवसापासून मला माझे पक्षकार आणि कामं मिळवण्यापासून कोर्टात चार लोकांनी मला ओळखण्यापर्यंतची जागा निर्माण करायची होती. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी तो मी माझ्यासाठी मिळवलेला एक कॅनव्हास होता आणि मुंबई त्यात रंग भरणार होती.

मी मित्राच्या मदतीनं आल्यामुळे जेन्ट्‌स बार-रूममध्ये बसायला लागले. पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोप-यांतून मुलं नशीब आजमावायला आली होती. आटपाडी, सातारा, सांगली, सोलापूर, फलटण, बारामती, कोल्हापूर, नाशिक, सावंतवाडी. संपूर्ण कोर्टात वकिलांमध्ये जसे प्रांतिक, जातीय, धार्मिक, वैविध्य होतं तसंच ते त्यांच्या रोजच्या जेवणाच्या डब्यातही असायचं. अनेक कायद्यांत आम्ही वाचायचो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, सिंधी, जैन. मी या सर्व जातीधर्मांची हाडामांसाची माणसं पाहायला लागले. मुंबईच्या मित्राचं ऑफिस फोर्टमध्येच असल्या कारणानं, तिथल्या अग्यारी, चर्चेस, मशिदी, सिनेगॉग जवळ-जवळ असल्यानं मला ते पाहून कायदा जगल्यासारखं वाटायला लागलं. प्रार्थनेच्या वेळेत त्यांच्या पेहेरावातलं वैशिष्ट्‌य आणि वैविध्य लक्षात यायचं आणि मौज वाटायची. आषाढी कार्तिकीला अनेक हिंदू डब्यांमधली खिचडी, व-याचे तांदूळ, साबुदाणा वडे, बटाट्याचे पापड आणि दाण्याची आमटी इतर धर्मियांच्याही पोटात जाई नव्हे, त्यासाठी घरून डबा जरा जास्तच आणला जाई तर रमजानमध्ये संध्याकाळी उत्तम मांसाहारासाठी अनेक मुस्लीम मित्रांबरोबर महंमद अली रस्त्यावर वा-या होत.

A view from Oval ground

हायकोर्ट, स्टॉक-एक्स्चेंज, फर्म्स, कार्यालये, बॉम्बे हाउस या विविधतेमुळेच फोर्टमध्ये केरळी, गुजराती, दाक्षिणात्य, बोहरी, पंजाबी थाळी मिळण्याची उत्तम ठिकाणं आहेत. मला वेळ मिळाला तसं सर्वांत पहिल्यांदा मी जहांगीर आर्ट गॅलरी-मधल्या ‘समोवर’मध्ये जाऊन आले होते. या सगळ्याबरोबर मॅकडोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज, स्टार बक्स आहेच. प्रत्येक वाढदिवस कुठल्या ना कुठल्या ठिकाणी साजरा झालाय आणि विविध सणांचे विविध पदार्थ डब्यांमध्ये आलेत. अनेक मुलं-मुली, मोठे-मोठे वकील काही न्यायाधीशही अविवाहित आहेत. वैविध्य हेच ठळक वैशिष्टय असलेलं हे ठिकाण आहे. बारामतीत आजही मॅकडोनाल्ड आलं नाहिये. चार वर्षांपूर्वी डॉमिनोज आलं पण ते कसंबसं तग धरून आहे. आजही तिशी गाठलेल्या अविवाहीत मुला-मुलींना बोलून, प्रश्न विचारून भांडावून सोडणारे लोक आहेत.

बारामतीत ऑनलाइन बघता येणारी पण ऑनलाइन मागवलं तर पंधरा दिवस थांबावं लागणारी किंवा मग पुण्यातल्या एखाद्या परिचिताचा पत्ता द्यावा लागणारी चुंबक, फॅन इंडिया, वेस्ट साइड क्रोमा, खादी भांडार, बॉम्बे स्टोअर, ऑन्सॉम्ब्ल, ग्लोबल देसी, ॲन्ड; हे सगळं इथं अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मला बसमधून फिरताना स्वप्नात असल्यासारखं वाटलंय. मी अनेकदा स्वत:ला चिमटा काढलाय. मला अनेकदा एकटं वाटलंय, रडू आलंय. पण आपण परत जायचं नाही असं मी स्वत:ला अट्टाहासानं बजावलंय.

मी बारामतीत ९ वर्षं वकिली केल्यानं अनेक वकिलांनी हायकोर्टातल्या अॅपलेट बाजूची कामं मला दिली. ही कामं मला बारामती, इंदापूर, दौंड भागातून आली. काही वकिलांनी माझ्या नावावर पक्षकारांकडून वारेमाप पैसे घेतले. माझी फी त्यांनीच ठरवली त्यातल्या काहींनी त्यासाठीच मुंबईला येण्याबाबत मला मदत केली. एका जामीन अर्जात बारामतीतल्या एक वकिलानं माझ्या नावावर म्हणजे मी माझी फी पाच लाख रुपये सांगितली आहे असं सांगून पक्षकारांकडून पाच लाख रुपये घेतले आणि मला देताना मला न विचारता दहा हजार रुपये दिले. असे मला अनेक अनुभव आले त्यात माझा तो बारामतीचा मित्रही होता. मला नऊ वर्षं काम करुन कामाची किंमत आणि मूल्य यांतला फरक करता येत होता तसं पक्षकाराच्या क्रयशक्तीचंही आकलन होतं. पण ‘आम्ही तुला काम देतोय’ म्हटल्यावर गुलाम म्हणून लाचारीनं वागणं मला पसंत नव्हतं. माझ्या श्रमाची किंमत आणि मूल्य मलाच ठरवायचं होतं.

Church near Horniman Circleकट प्रॅक्टीस माझ्या वडिलांनी कधीच केली नव्हती, मी ती कधी पाहिलीही नव्हती. वडिलांनी कधी कोणाला कट दिलाही नव्हता आणि कधी कोणाकडून कट घेतलाही नव्हता. लोक त्यांच्याकडे मोठ्या विश्वासानं कामं सुपुर्द करत आणि त्याच विश्वासानं अगदी दिल्लीतले त्यांचे वकिल मित्रही त्यांच्या पक्षकारांची कामं करत, आजही करतात. वडील प्रसंगी गरीब पक्षकारांच्या स्टॅम्पचे पैसेही भरत आणि यावरून आमच्यात अनेकदा मतभेदही होत.

या सगळ्याच्या विपरीत गोष्टी मुंबईनं मला दाखवल्या आणि मुंबईमुळेच मला दिसल्या. बारामतीत मी ज्यांच्याबरोबर नऊ वर्षं काम केलं, त्यांचं खरं रूप आणि नाव कसं आहे हे मुंबईतून मला दिसलं. गावीच राहिले असते, तर ते मला कधीच दिसलं नसतं. माणसाच्या स्वार्थाचं डायनॅमिक्स (व्याप्ती) परिस्थितीनुरूप कसं बदलतं हे मला दिसलं. या ‘कट’चा भार शेवटी पक्षकारावरच पडत होता ही जाणीव माझ्यासाठी दु:खदायक होती. मुंबईच्या वकिलांशी हायकोर्टाच्या वकिलांनी जोडलेला हा दुवा, हा स्वार्थ-व्यवहार एका बाजूला तर पक्षकाराचा न्याय-अन्याय अधिकार दुस-या बाजूला आणि याची सरमिसळ ही बाब धक्कादायक होती. वकिलीत साधेपणा राहिला नव्हता.

या दरम्यान मला ‘जाऊद्या ना बाळासाहेब’ नावाच्या चित्रपटात ब-यापैकी भूमिका साकारायला मिळाली.  या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा कालावधी मोठा होता. पहिल्यांदाच मला वकिली आणि चित्रपटाचं शुटिंग या दोन्ही डगरी एकटीनं सांभाळायच्या होत्या. माझ्या मुंबईच्या सर्व मित्रांच्या मदतीनं मी त्या सांभाळल्या. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटनंही माझं वकिलीचं काम समजून घेऊन मला मदत केली. मुंबईतल्या माझ्या आजपर्यंतच्या साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात दर सुट्टीत मिळून मी पाच सिनेमांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या.

मुंबईतला पाऊस सातसात दिवस उघडत नाही. पाऊस वरून पडत असला तरी वा-याच्या दिशेनंच छत्री धरण्याचं कसब केवळ मुंबईतच अवलंबावं आणि आजमावावं लागतं. रोज सकाळी मरीन ड्राइव्हला चालायला जाणं आयुष्याला एक वेगळीच श्रीमंती देतं. मंत्रालयाजवळच वसतिगृह असल्यानं बारामतीचा किमान एक तरी माणूस आठवड्यातून एकदातरी भेटतोच. मंत्रालयाजवळ भरणारा आठवडी शेतकरी बाजार आणि गावाकडं शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतात अक्षरश: कितीतरी वेळा वाळून गेलेली संत्री, लिबं, डाळिंबं, मधल्या दलालांना मिळणारा कट हे सगळं मला इथले भाव बघून डोळ्यांसमोरून तरळून जातं.

Marine Drive

एकदा वसतिगृहात केरफरशी करणा-या मावशींना वसतिगृहातल्याच एका मुलीमुळे त्वचारोग झाला. मुंबईत येणा-या अतीव घामामुळे, कोरडेपणाच्या अभावामुळे तो झाला. वसतिगृहातील अधिका-यांनी वेळीच घेतलेल्या दक्षतेमुळे त्याचा प्रादुर्भाव पुढे टळला. काम, धावपळ, प्रवास घामेजलेले कपडे, कार्यालयांमध्ये नैसर्गिक खेळत्या हवेचा अभाव. या गोष्टी गावाकडे पाहिल्याच नव्हत्या. इतकी सारखी सतत टाल्कम पावडर लावायची सवय नसते, कारण तेवढा घामच गावाकडे यायचा नाही. आलाच घाम तर श्रमानं येतो, वातावरणामुळे नाहीच. त्यामुळे मुंबईत अन्न-वस्त्र- निवा-याच्या बरोबरीनं टाल्कम पावडर ही दैनंदिन मूलभूत गरज आहे असा माझा निष्कर्ष आहे.

मुंबईतला माणूस नव्या गोष्टी स्वीकारतो, माणसंही. तो प्रयोगशील आहे. मुळात त्यातला बहुतांशी स्थलांतरित आहे. आपल्याला भेटणा-या फार कमी जणांपैकी काहीच इथे तीन पिढ्यांपासून राहत आहेत. बाकी स्थलांतरित आहेत. सुटीत गावी जाणारे आणि त्यावेळेस क्रॉर्फड मार्केटमधून भरपूर खरेदी करणारे. मुंबईतला माणूस पत्ता विचारल्यावर तत्परतेनं मदत करतो. तो एकटाच नाही त्याच्या आजूबाजूचे चार-पाच जण हिरिरीनं पत्ता सांगायला सरसावतात. गाडी कोणती पकडावी ती कुठून सुटेल, कुठला मार्ग जवळ पडेल, कुठं ट्रॅफिक लागेल, कुठे दादरा चढावा लागणार नाही, इकडून स्लो पकडून कुठं उतरून कुठली फास्ट गाठता येईल आणि त्यात जागा मिळेल या सगळ्याचा अंतर्भाव ‘ज्ञानात’ होतो आणि हे सांगणारे ४-५ लोक. त्यांतला एक कोकणी मराठी तर दुसरा हरियाणवी किंवा लखनवी हिंदी तिसरा गुजराती तर चौथा आंग्ल आणि पाचवा दाक्षिणात्य लहेजातल्या हिंदी किंवा मराठीत हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवतो.

एनसीपीए, पृथ्वी थिएटर, ककु क्लब, पिटारा, सितारा स्टुडिओ यापासून ते शिवाजी मंदिरपर्यंत मित्रमैत्रिणींची नाटकं पाहण्याची संधी मुंबईत मिळाली. स्थळानुरूप त्यांची धाटणी वेगवेगळी होती. इथला मामी फिल्म फेस्टिव्हल मी धावपळ करून दरवर्षी पाहिला. मित्रांमधल्या वैविध्यामुळेच मी युएस क्लब, बॉम्बे जिमखाना, पाली हिल क्लब डोळ्यांत साठवले. गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, भाऊ दाजी लाड म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय इथे काम करणा-या, क्युरेटर्स असणा-या माझ्या मैत्रिणी मला इथंच मिळाल्या आणि ही संग्रहालयं मला जरा जास्त कळली. कॅफे लिओपोल्डमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या खुणा, मानानं पुन्हा उभं राहिलेलं ताज, बधवार पार्कची कोळी वसाहत, सीएसटी स्टेशनवरचा हल्ला इथपासून ते हायकोर्टात त्यावर झडणा-या चर्चा मी बारामतीत असताना टीव्हीवर पाहायचे. ही सगळी ठिकाणं इथं आल्यावर मी प्रत्यक्ष पाहिली, कधी बस-टॅक्सी मधून कधी पायी जाताजाता.

ज्यांची पुस्तकं, ज्यांनी चालवलेले खटले आम्हांला अभ्यासाला होते ते राम जेठमलानी, हरीश साळवे, पी. चिदंबरम्‌ यांसारखे दिग्गज मी उच्च न्यायालयात पाहिले. मला त्यांचा युक्तिवाद ऐकता आला. सलमान खानच्या सुनावणीपासून अनेक संवेदनशील कोर्ट सुनावण्या पाहता आल्या. लोकमान्य टिळकांवरचा खटला ज्या कोर्टात चालला, ते ऐतिहासिक स्थळ जिथं ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच’ असं त्यांनी ठणकावून सांगितलं, त्या खोलीसमोरून जाताना काळजाचे ठोके किंचित वाढल्यासारखे वाटले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. टिळकांची जामीन अर्जाची प्रकरणं बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी चालवली ही माहिती मला हायकोर्टातल्या संग्रहालयात मिळाली. मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, हायकोर्टाच्या इमारतीवरची आणि आतली कलाकुसर पाहायला परदेशी पर्यटक प्रसंगी कोर्टात येतात. इथले हेरिटेज वॉक्स, फूड वॉक्स प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगून त्या स्थळांना भेट देण्या-या फे-याही प्रसिद्ध आहेत.

नातेवाईकांकडे मुलुंड, वांद्रे, वरळी, पार्ला, डोंबिवली इथं नित्यनेमानं लोकलनं फिरताना, बायका त्यांच्या पर्समध्ये काय-काय बाळगतात आणि त्यांचे न्याहरीसाठी ठेवलेले विविध डबे हे माझ्या अपूर्वाईचा विषय झालेले आहेत. आपणच आपली काळजी घ्यायला हवी म्हणत एका बाईनं मला तिच्या पर्समध्ये काय काय आहे, ते दाखवलं. फुटाणे, गाजर-काकडीच्या फोडींचा छोटा डबा, जेवणाचा डबा, पेप्पर स्प्रे, सॅनिटरी नॅपकीन, छत्री, पाण्याची चपटी बाटली, पैशाचं-कार्डांचं अशी वेगवेगळी पाकिटं, पास, गॉगल, सनस्क्रीन, डिओ, कंगवा……….. एका टेंटचीच कमतरता आहे असं पहिल्यांदा मला वाटलं होतं. पण मुंबईतल्या मुंबईत फिरणं, उपनगरातून मुंबईत जाणं येणं म्हणजे एका गावाहून दुस-या गावाला जाण्यासारखं आहे. इथं माणूस माणसाला ओळखत नाही.

 

अख्खी बारामती पाच किलोमीटरच्या परिघात संपते. बारामतीत कित्येकदा पैशाचं पाकीट जवळ न बाळगता मी आठवडा-आठवडा फिरू, काम करू शकले आहे. गावी कोर्ट आणि माझं घर यात अर्धा किलोमीटरचं अंतर होतं. पैशाची अगदीच गरज लागली तर भेटणारा प्रत्येक माणूस ओळखीचा होता. मुंबईत मला अनेकदा पैशाचं पाकीट जवळ बाळगण्याची सवय लावावी लागली आहे. नसले तर कोणाला मागणार पैसे? कोणीच ओळखीचं नाही. काही राहिलं तर प्रवासाचं दिव्य त्रासदायक आहे. आता माझ्या पर्समध्ये स्टेपलरपासून छोट्या सुरीपर्यंत, पाणी गरम करण्यासाठी मगमध्ये बसणा-या छोट्या कॉइलपासून ग्रीन-टीच्या पाकिटापर्यंत सगळं असण्याची मला सवय लागली आहे. माझा मुंबईतला एक वकील मित्र चेष्टेनं माझ्या त्या पर्सला वन रुम किचनचा फ्लॅट म्हणतो…. खरंच फक्त एका टेंटचीच कमतरता आहे. माझंच वाक्य मला आता आठवतं!

मुंबईत मला स्वयंपाक करता येत नाही कारण वसतिगृहात त्याची परवानगी नाही. मला इथं बागकामही करता येत नाही. बारामतीत मी हे दोन्ही आवडीनं करत असे. माझे हात अक्षरश: कधीकधी शिवशिवतात. मेसमध्ये पोह्यातला कांदा कच्चा राहिला तर आपणच पुढच्या वेळी थोडा जास्त परतूया का? असं वाटतं. डोसा सोडवायची घाई करू नकोस, पीठ नीट आंबलं असेल तर डोसा आपोआप सुटतो हे मी आमच्या स्वयंपाक्याला अनेकदा सांगितलं आहे, बजावलं आहे. शनिवार-रविवार नातेवाइकांकडे गेल्यावर मात्र ‘मला टीव्ही बघू द्या’ असं सुट्टीला आलेली लहान मुलं कशी आर्जव करतात तसंच मी ‘मला स्वयंपाक करू द्या’ असं आर्जव करते त्यावर ते हसतात.

मी एकदा जेवणाच्या सुटीत कोर्ट हॉलमध्येच बसले होते. मुंबईचा डबेवाला आमच्या इथंही कर्मचा-यांचे डबे घेऊन येतो. कोर्ट कर्मचारी बायका एकत्र जेवायला बसल्या होत्या. मी झोपेचं सोंग आणलं. त्यांचा तो दिवसा सँडविचचा होता. त्यांतल्या एकीनं सकाळी येतायेता येझदानी बेकरीतून ताजा ब्रेड आणला होता तर दुसरीनं चटणी, तिसरीनं घरून पांढरं लोणी आणि अमूलचं पाकीट तर चौथीनं आतल्या सॅलेडसाठी भाज्या, पाचवीनं चीज आणि केचप तर सहावीनं चक्क कॉफी करून आणली होती. एकमेकींना आग्रहानं खाऊ घालणं ‘आली का नाहीस खायला/जेवायला वेळेवर’ ही सहृदय देवाणघेवाण मला गावी न्यावीशी वाटली. त्यांच्या बोलण्यात कागाळ्या, लावालाव्या यांचा अभाव होता. वेळेच्या बंधनात साजरं करणं होतं. मुळात आयुष्यच खडतर आहे, तर सहवास कशाला खडतर करायचा ही त्यामागची समंजस भूमिका मला मोलाची वाटली. इथं प्रत्येक जण एकमेकाला मदत करताना दिसतो, कारण प्रत्येकाला कष्टाची जाणीव आहे आणि प्रत्येकाला तेच हवंय जे इतरांना हवंय. आयुष्याला वेळेच्या बंधनात साजरं करता येण्याची कला म्हणजेच जगणं याची जाणीव सर्वांना आहे. अडलेल्याला दुसरा मदत करतो कारण तोही कधीतरी अडणार असतो, तेव्हा त्यालाही मदतीची गरज असणार असते. इथल्या माणसामध्ये रक्ताच्या बरोबरीनं वेग धावतो. मुंबईत पैसा, सुबत्ता आणि वेग आहे. गावाकडे स्वास्थ्य आहे.

Fort

ऑक्सफर्ड, स्ट्रँड, किताबखाना, पीपल्स बुक हाउस, वेवर्ड अँड वाईज या पुस्तकांच्या दुकानांत नुसती चक्कर जरी मारली तरी टवटवीत वाटतं. एशिअॅटिक लायब्ररीतून चर्चगेटकडे जाताना हॉर्निमन सर्कलजवळची बाग बघितली की या रस्त्यावरुन एशिअॅटिकमधून दुर्गाबाई भागवत रोज घरी जायच्या आणि वेळ असला तर या बागेत बसायच्या असं मनात आलं म्हणून ती बाग मला बघावीशी वाटली आणि एकटीनंच तिथं बसावसं वाटलं.

पॉल ऑस्टर, मार्टीन अमिस यांचं सर्व साहित्य मिळण्याचं ठिकाण म्हणजे वेवर्ड अँड वाईज हे पुस्तकांचं दुकान. चेक-टर्किश-ब्राजिलीयन लेखकांची इंग्रजी भाषांतरं मिळण्याचं ठिकाणही हेच, साल्वादोर दालीची चित्रं असलेलं ॲलिस इन वंडरलँड मी इथं पाहिलं, एसेज ऑफ टी.एस.इलियटही. ऑक्सफर्डमध्ये मी एकदा ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणात सक्रिय असलेल्या कपिल सिब्बल यांचं कवितांचं पुस्तक वाचलं. एखाद्या विषयाला वाहिलेलं पुस्तक, साहित्य विचार, चळवळी, माणसं हे सगळं मुंबईत उपलब्ध आहे आणि त्यांच्या निश्चित जागा आहेत. फक्त तुम्हांला शोधता आलं पाहिजे. गावाकडे असं दुकान चालेल का? मुळात तसं सुरू करण्याचं कोणाच्या मनात येईल का?  तीच गोष्ट विषयाला वाहिलेल्या किंवा प्रयोगशील असलेल्या विचाराची, चळवळीची आणि माणसांची आहे. ती गावाकडे फारशी ‘चालत’ नाहीत.

मी युक्तिवाद केल्यानंतर अनेकदा अनेक वकिलांनी तर काही न्यायाधीशांनीही पावती दिली. काही वकिलांनी तर बाबांना ‘ती चांगलं काम करते’असं आवर्जून फोन करून सांगितलं. या सर्व क्षणी मी आता मुंबईत नाही राहिले तरी चालेल असं मला वाटलंय.

मी मुंबईत स्वत:ला आश्वस्त करायला आले. मला कोणाला काही सिद्ध करायचं नव्हतं. आपण सामान्य आहोत, पण आपलं काही चुकतही नाहीये आणि आपल्यापेक्षा खूप प्रकारची माणसं जगात अस्तित्वात आहेत या विचारानं मी आले. मला माझीच गरज होती. मीच माझ्याशी बोलण्याची आवश्यकता होती. मला कोणालाचा काही दाखवायचं नव्हतं. माझं मलाच पाहायचं होतं आणि आपल्या दृष्टीवर पुनर्विश्वास प्रस्थापित करायचा होता. ‘मोठ्या गाडीतून येणारी अजिबात वेळ नसलेली वकील’ अशी ओळख मला प्रस्थापित करायची नव्हती. आयुष्यात थोडासा श्वास घ्यायला उसंत घ्यायला मी मुंबईला आले आणि इथल्या वेगवान जगानं ती मला दिली. गावाकडचं स्वास्थ्य मुंबईत जपायचा मी आजतागायत कसोशीने प्रयत्न केला आणि मुंबईचं वैविध्य अंगी बाणवायचाही! जुनं हॉस्टेल तीन वर्षांनी सोडावं लागलं तेव्हा मी दुस-या हॉस्टेलमध्ये उच्च न्यायालयाजवळच दाखल झाले. मुंबईत घर घेईन की नाही माहीत नाही. मुंबईचा जावई आई-वडिलांना मिळेल की इतर कुठला, की ते व्हॅल्यू ॲडिशन होणारच नाही माहीत नाही. मुंबई मला कायमची आपलंसं करेल की नाही माहीत नाही.

15966320_10154119587166516_4889478004898172532_n

गावाकडची अनेक जुनी मी माझी म्हटलेली माणसं इथल्या ‘कट’ च्या गर्दीत या मुंबईत हरवली. पण लोकलमध्ये तीन प्रवासी बसलेले असताना चौथ्याला सरकून जागा करून देतात तसे काही निरलस मला इथल्या गर्दीत सापडलेही. इंदापूरचा तो मित्र त्यातलाच एक. कदाचित मोठ्या ऑफिसला शिफारसीनं कामावर रुजू झाले असते, तर नऊ वर्षांच्या गावाकडच्या वकिलीनंतर सिनेमा, नाटक, लिखाण करायला वेळही मिळणार नाही म्हणून माझं मला हवं तसं जगू देणारे, कधीही कट न घेणारे वा देणारे, पक्षकारांविषयी आस्था असणारे माझे वडील मला नव्यानं कळले तसे कळले नसते. पक्षकार म्हणजे मदत मागण्यासाठी आलेला माणूस असतो आणि वकिली म्हणजे मदत इतकी साधी व्याख्या असणारी त्यांची वकिलीही या समुद्रसपाटीपासून जरा जास्त उंचीची दिसली.

मुंबईत माझी मी मला सापडले. बारामतीत ती मी हरवले होते. मी वकिली करीन की अभिनय की लेखन की काहीच नाही की सगळंच हे मला माहीत नाही, पण कुठलाही माणूस जगात कुठंही काहीही करू शकतो, रुजू शकतो, बहरू शकतो यावर आता माझा विश्वास आहे आणि तो विश्वास मला मुंबईनं दिला.

सविता प्रभुणे

Savita Ashok Prabhune

इ-मेल – savitaprabhune@gmail.com

२००५ पासून वकिली करतेय. काही कथा आणि लेख ‘अंतर्नाद’ मध्ये प्रकाशित. ‘दर्प’ या कथेला ‘मिळून साऱ्याजणीच्या’ रेऊ कथा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार. किल्ला, शांघाय, जाऊं दया ना बाळासाहेब, सलाम, हायवे, रंगा पतंगा या चित्रपटातून अभिनय.

 

8 thoughts on “फोर्ट, कोर्टची मुंबई

 1. Superb Savita ! I am Speechless here !! As I know how true your words are and o know how this transition has given strength to your wings. Keep up the good work!

  Like

 2. अप्रतिम लेखन सविता, लिहिण्याचे अफाट कौशल्य, गुणवत्ता तुझ्यात आहे तू एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहेस ते आणखी बहरो याच शुभेच्छा…

  Like

  1. खूप आभार! ही प्रतिक्रीया खरंच मोठी पावती आहे! आपले आभार

   Like

 3. मस्त. तुमचे अंतर्नादमधले लेख लक्षात आहेत अजून.

  Like

  1. अनेक आभार! आपण आवर्जून वाचलंत यासाठी, व आवर्जून कळवल्याबद्दल

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s