अमेरिका आ-गमन

लोपा राजदेरकर

अमेरिकेला येण्याचा माझा निर्णय तसा बेधडक होता. आपण नेमके काय ठरवले आहे, ते नीटसे शब्दांत पकडता येण्याआधीच मी तो निर्णय प्रत्यक्षात राबवलासुद्धा होता. बीडीएस झाल्याझाल्या काही वर्षं पुण्यात प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली. ते सगळे छानच चालले होते. तरीसुद्धा त्यातला साचेबंद भाग खटकत होता. शिक्षण झाले होते, व्यवसाय सुरू केला होता; तरी काहीतरी नवीन करावेसे वाटणे हा विशीतल्या वयाचा परिणाम असणार.  धोपटमार्गे एकदम सेटल होण्याऐवजी वेगळे काही करण्यासाठी मिळतील त्या संधी चाचपडून बघणे आणि आवाक्यात असेल ते प्रयत्न करणे सुरू होते.  मध्यमवर्गीय, पांढरपेक्षा वर्गात हे घडतच असते. उत्कर्षाच्या संधी किंवा लौकिक अर्थाने यशाचा मार्ग मी शोधत होते. त्याच दरम्यान एक नको असलेली पण अनिवार्य अशी वैयक्तिक, कौटुंबिक स्वरूपाची लढाईदेखील लढत होते. त्याचे तपशील देण्याची ही जागा नाही. आणि ते महत्त्वाचेही नाहीत. सारांश इतकाच, की मला जे साध्य करायचे होते त्यासाठी एक नवीन सुरुवात करायची होती. तीही ताज्या, अलिप्त वातावरणात. म्हणून परदेशी जायचे ठरवले आणि बरेच काही जुळून आल्यावर अमेरिकेत शिक्षणाने पुन्हा सुरुवात केली.

हे लिहिताना गेल्या ९-१० वर्षांतल्या आठवणींच्या फाइल्स एकएक करत उघडत गेल्या. मास्टर्सला प्रवेश मिळालेल्या ठिकाणांपैकी कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीची निवड मी केली.  मुंबईहून न्यू यॉर्कमार्गे पिट्सबर्गला (पेन्सिल्व्हेनियाला) निघाले. पुण्यामुंबईच्या माझ्या खास गोतावळ्याने मिळून मला प्रेमाने निरोप दिला. डेल्टाच्या त्या विमानात अनेक भारतीय विद्यार्थी होते कारण त्या सुमारास विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू  होणार होते. अमेरिकेची ही माझी पहिली वारी नसली तरी  एक वेगळी उत्सुकता होतीच. चिंताही होती. माझ्या शैक्षणिक कर्जाची रक्कम विद्यापीठात प्रत्यक्ष हजेरी लावल्यावरच दिली जाणार  होती.  हेही सगळे नेहमीच्या प्रक्रियेप्रमाणेच होते. तरी तिथे पोचल्यावर एक आठवडाभर मी स्वतःला सांगत होते – परतीच्या तिकिटाचे पैसे आहेत तेव्हा कर्जाची रक्कम काही कारणाने मिळाली नाही, ट्यूशन फी वेळेत भरता आली नाही; तरी माघारी फिरून भारतात जाता येईल नक्कीच. आज हे लिहिताना फार तीर मारल्यासारखे वाटते. पण माझ्याकडे परतीचा पर्याय तरी होता. अनेक लोकांचे तितके नशीब नसते हे अख्ख्या जगाने गेल्या २-३ वर्षांत नव्याने बघितले आहे.

SR2
क्राऊस कॅम्पो ही कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी च्या एका इमारतीच्या टेरेस वर असलेली कल्पक बाग.

युरोपीय देशांच्या दाराशी अगतिकपणे चालत आलेल्या लाखो निर्वासितांचे चित्र डोळ्यासमोर तरळते. जगभर व्हायरल झालेल्या, आलेपो-सीरियाच्या रणधुमाळीत सापडलेल्या लहानग्या ओमारचा धुळीने/रक्ताने माखलेला चेहेरा आठवतो. त्या हलाखीच्या परिस्थितीतून पळवाट म्हणून भूमध्य समुद्र पार करण्याची जोखीम उचलणारी कुटुंबे, टर्की देशाच्या समुद्रकिनारी वाहत आलेले चिमुकल्या मुलाचे प्रेत हे सगळे आपण नाइलाजाने बघतो. खरे घर-दार रातोरात सोडतात ते हे लोक. देशाची मातीच काय, रक्ताचे माणूस जिवंत असेल का आणि पुन्हा मागे वळून कधी दिसेल का, याची कोणतीही खातरी नसताना जिवाच्या आकांताने दूर जाण्याला देश सोडणे म्हणतात. अमेरिका (वा तत्सम कोणताही प्रगत देश) आणि भारत – या दोन्ही देशांचे best of both worlds अनुभवणा-या आमचे  देश सोडणे या प्रकारचे नाही.

माझ्यासारखीला भारतात जगणे कठीण किंवा धोक्याचे होते असे काहीच नव्हते.  उलट तिथून इथे येणे एक स्वप्नभरारी होती. गरजेपेक्षा स्व-केंद्रित महत्त्वाकांक्षा जास्त. प्रस्थापित होण्याचा, भौतिक भरभराटीचा सोस अधिक. त्या अनुषंगाने कधीतरी वाचनात आलेला एक संदर्भ आठवला. दुस-या महायुद्धात एका मुलाची स्वतःच्या आई-वडिलांपासून ताटातूट होते. तो काही वर्षे अनाथ म्हणून इटलीतल्या रस्त्यांवर ब्रेडचे तुकडे आणि चिकोरी कॉफी यांवर कसेबसे जगतो. कुपोषणाने थेट मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन पोचतो. पण कर्मधर्मसंयोगाने अमेरिकेत येऊन पोचतो आणि पुढे आपल्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवतो. अशी उदाहरणे ऐकली-वाचली की ‘तुम्ही काय ठरवून परदेशी गेलात’ या प्रकारच्या भाबड्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची, ते कळत नाही.  सोशल मीडियावर चेक-इन करायला, लाइक्स गोळा करायला आणि खाता-पिता-झोपता फोटो प्रसारित करायला तर इथे आलो नाही ना असेही मनोमन वाटून गेले.

SR4
ऍन आर्बर वासियांचे आवडते indie अर्थात स्वतंत्र, स्थानिक पुस्तकांचे दुकान – Dawn

शिक्षणासाठी दर वर्षी भारताबाहेर जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे, बहुतांश विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी-गणित या क्षेत्रांतील (STEM fields) आहेत. आज अमेरिकेत स्थायिक असलेल्या इंडियन-अमेरिकन लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या साधारण १% आहे. इंडियन-अमेरिकन लोक या देशातले आदर्श अल्पसंख्याक (आयडियल मायनॉरिटी) मानले जातात. आपल्या लोकांची सरासरी शैक्षणिक पातळी आणि प्रति कुटुंब आर्थिक मिळकत अमेरिकेतल्या इतर कोणत्याही देशाच्या/वंशाच्या आणि अमेरिकन कुटुंबांपेक्षा जास्त आहे. यातही काही विशेष नाही. कारण मुळात भारतातून इथे येणार्‍यांत बहुतांश उच्चशिक्षित, सुखवस्तू आणि उच्च मानल्या गेलेल्या जातींत जन्मलेले आहेत.  इथे येऊन स्थायिक होण्यात आता नावीन्य उरलेले नाही.  आपल्या लोकांचे कौतुक नाही असे सुचवायचा हेतू नाही.  फक्त इथपर्यंत पोचले त्यात खरे कर्तृत्व किती आणि अनुकूल परिस्थितीचा वाटा किती, याची जाणीव स्वतःलाच अधूनमधून करून देण्याचा हा प्रयत्न.

SR3
ऍन आर्बर चे विलक्षण देखणे चार ऋतू. 

थोडे पुढे जाऊन तटस्थपणे मांडायचे तर पश्चातबुद्धी…?  नेहमीच सगळे निखालस व परिपूर्ण असते. परदेशात येण्याचे काही उदात्त कारण आज पुढे करता आले तरी माझ्यापुरते प्रत्यक्षात तसे नव्हते. पैसा-नाव कमावण्यापलीकडे उत्कृष्टतेचे वेड, एखाद्या ध्यासाने झपाटून जाऊन अडथळ्यांशी सामना करत ध्येयपूर्ती करण्याचे भाग्य एखाद्यालाच मिळते. बाकी यशाची व्याख्या, यशाची फूटपट्टी व्यक्तिगणिक बदलते.  चोख नियोजन करून वाटचाल करताना प्रगतीचे एकूण एक टप्पे एका सरळ रेषेत पडावेत अशा व्यक्ती दुर्मीळच असतात. सामान्यत्व डोळसपणे स्वीकारून, मिळालेल्या संधीचे मूल्य जाणून त्याचे चीज होईल, स्वतःपलीकडे किंचितसे बघता येईल; असे प्रयत्न सतत करत राहणे महत्त्वाचे, एवढेच मी कायम मानत आले आहे.

इथे शिकायला आले तेव्हा खूप जवळचे असे कोणीही या देशात नव्हते, मग मित्रमैत्रिणी जमत गेले. कोर्स-वर्क नसले की एकत्र मिळून जेवायला जाणे, कधी पॉट-लक जेवण, कधी डाउनटाउन किंवा कुठे समर फेस्टिवलला हजेरी लावत एकत्र वेळ घालवत असू.  शॉपिंग मॉल्समध्ये आवडेल ते घेण्याची ऐपत सुरुवातीला नव्हती. पण मजा म्हणून जायचो. खाण्या-पिण्याच्या, राहण्याच्या नवीन सवयी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे अकाउंट, टॅक्सची कामे असे सगळे नव्याने करताना त्या लहान-मोठ्या अनुभवातून वेगळा आत्मविश्वास मिळत गेला.  पहिली दोन वर्षे खूपच पटकन गेली.  आमच्यापैकी काही नोकरीनिमित्त, काही आणखीन पुढे शिकायला, काही जण लग्न होऊन किंवा इतर कारणांनी इथेच वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झाले.

त्याच एक-दोन वर्षांत अमेरिकेतील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची झळ नोक-या शोधणा-या अनेकांना झेलावी लागली, काही जण मायदेशी परतले. मी पिट्सबर्गनंतर  ॲन आर्बरला (मिशिगनला) सहा वर्षे राहिले. पीएच.डी. करतानाची, युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगनमधली ती वर्षे करियरसाठी आणि व्यक्तिगत जीवनातदेखील  संस्मरणीय ठरली. त्या वास्तव्यात हा देश ख-या अर्थी कुठेतरी आपलासा वाटू लागला. नवीन नात्याचा गोडवा त्या आपलेपणाच्या भावनेला कारणीभूत ठरला असावा असे नवर्‍याचे म्हणणे. गोडवा हा शब्द त्याचा नाही, तर माझा.

इथे समरसून जाण्यासाठी अनेक बरे-वाईट अनुभव कारणीभूत आहेत. बरे व उत्तम अनुभव जास्त. मी सध्या बर्कली (कॅलिफोर्निया) येथे तर कौस्तुभ सध्या फिनिक्स (ॲरिझोना) ला असतो.  गेली ६-७ वर्षे आम्ही दोघं आपापली  वैयक्तिक करियर सांभाळून हे दोन ध्रुवांवरचे नाते प्राधान्याने जपतो. नॅशनल पार्क्समध्ये भटकणे, सायकलिंगसारखे उनाड उद्योग आमच्या आवडीचे. प्रत्येक ठिकाणी आम्हांला चांगल्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभला – त्यात मराठी, अमराठी भारतीय तसेच अमेरिकन व आंतरराष्ट्रीय लोक यांचा समावेश आहे. इथली कुटुंबव्यवस्था कशी डळमळीत असते असे देशी लोकांचे एक ढोबळ निरीक्षण असते.  पण आमच्या ओळखीची, शेजारची अनेक अमेरिकन कुटुंबे अगदी आपल्यासारखीच आहेत. एकमेकांचे सण उत्साहाने साजरे करणे, कधी आयत्या वेळी ठरवून वीकएंडला अनौपचारिकपणे कट्टा टाकणे, वेळप्रसंगी मदतीला येणे; हे आपल्याकडे सोसायटी/कॉलनीमध्ये असते त्याच धाटणीचे. आपल्याकडे चहाचे जे महत्त्व ते इथे बिअरचे. त्यात फुटबॉल, विशिष्ट फुटबॉल टीम्सचे चाहते असे समीकरण जमले की बस्स. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

SR10
बिअर – अमेरिकन जीवनशैलीचा एक केंद्रबिंदू .

हे सांगताना इथे सगळे यूटोपिअन म्हणावे तसे आदर्श, गुलाबी आहे असे भासवण्याचा प्रयत्न नाही. इथे पैसा फेकला की काय वाट्टेल ते मिळते. ॲप्सच्या जमान्यात तर सोयी एका ‘टच’च्या अंतरावर उपलब्ध आहेत. सीव्ही  तयार करून देण्यापासून तुमच्याकरता कुठे लायनीत उभे राहणे, आयकियाचे फर्निचर जोडून देणे, वॉर्डरोब लावून देणे, एवढेच काय तुम्ही डेटवर कुणाबरोबर जावे याची निवड करून देण्यापर्यंतच्या सगळ्या कामांसाठी मदतनीस सज्ज आहेत. ग्राहकपण पक्के भिनलेले. धडधाकट असताना अणि शक्य असताना आपली रोजची  कामे आउटसोर्स केली तर ते आपले घर कसले आणि आपले जगणे  तरी कसले?

बे एरियात राहायला आल्यापासून अमेरिकेतला हा कृत्रिमपणा नक्कीच भेडसावतो.  गेल्या १-२ वर्षांत इमिग्रंट लोकांबद्दल उघडपणे राग व्यक्त होताना दिसतो. जगात ब-याच ठिकाणी एका विशिष्ट विचारधारेची लाट आलीय, त्याचे हे पडसाद. त्यात इथे आपण नकोसे वाटू शकतो, हे अनेक देशी लोकांना झेपत नाही. हेच लोक मायदेशी मात्र वेगळे वागतात. संकुचित होऊन जातात. परप्रांतियांच्या मुंबईत येण्याने किंवा विदर्भातल्या लोकांच्या पुण्यात स्थायिक होण्याने  अस्वस्थ होतात. असे काही प्रश्न सार्वत्रिक असतात.  त्यांची सोपी उत्तरे नाहीत. या समस्यांवर जलद उपाय नाहीत.

SONY DSC
आम्ही! Grand Canyon (ऍरिझोना) या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ठिकाणी.

एरवी भारताची आठवण येते, तेव्हा कधी मराठी-हिंदी सिनेमे बघतो, मराठी पदार्थ आवर्जून करतो. मराठी वर्तमानपत्र व ब्लॉग्स ऑनलाइन वाचतो.  भारतातील कुटुंबाशी, मित्रमंडळाशी तंत्रज्ञानामार्फत संपर्क ठेवतो. इथे भारतीय ग्रोसरी  मुबलक मिळते हे खरे असले, तरी काही खास वस्तू गेल्या १० वर्षांत नजरेस पडलेल्या नाहीत. फार्मर्स मार्केटला गेले की कधीतरी वाटते जांभळे किंवा बकुळीचे, सोनचाफ्याचे वाटे घेऊन एखादी मावशी बसली असेल या गर्दीत.  इथे आलो नसतो तर आज काय करत असतो, कुठे असतो असे विचार येतात मनात. पण हे नॉस्टॅल्जियात रमणे,  भूतकाळात जगणे झाले.

देश सोडून का गेलात, हा प्रश्न भावनिक कमी आणि व्यावहारिक जास्त आहे. आपली अवाढव्य लोकसंख्या, त्यात डिग्र्या छापणारे कॉलेज-कारखाने, विकसित देशांच्या तुलनेत राहणीमानाचा कमी दर्जा, संशोधन कार्याकरता लागणा-या पायाभूत सुविधांचा अभाव, जातीचे राजकारण, भ्रष्टाचार, लबाड मानसिकता ही तेव्हाची काही कारणे. जागतिकीकरणामुळे आकांक्षांची क्षितिजेसुद्धा रुंदावली आहेत. मनुष्यप्राणी तर मुळात संधीसाधू आहेच, त्यामुळे ही स्पर्धा दार्व्हिनिअन आहे. स्वरूप आणि प्रमाण बदलले असले तरी व्यापारमार्ग, राजकीय हेतू, आर्थिक/सामाजिक उत्कर्ष, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे दूरदेशी जाणे, स्थलांतर करणे हे पूर्वापार चालत आले आहे. त्यात खूप हुरळून जाण्यासरखे किंवा दुःखी होण्यासारखेही काही नाही. पक्ष्यांची पिले घरटे सोडून जातात तेव्हा त्यांना अपराधी वाटते का?

भारतात येतो, तेव्हा ओळखीच्या रस्त्यांवरून जाताना तिथे झालेले बदल टिपले जातात. मग इथे कसे सगळे अमेरिकेसारखेच ग्राहकवृत्तीचे झाले आहे अशी नोंदही केली जाते. आपल्या मनाच्या कुपीतला भारत देश हा नाही, अशी पुसट जाणीवही तेव्हा होते. तोपर्यंत सुट्टी संपत आलेली असते आणि तिकडे बॅकयार्डमधले ते अमुक झाड तगले असेल का, गेल्यागेल्या तमुक डेडलाइन आहे; असे करत या घराचे वेध लागतात. मग परतीच्या विमानप्रवासात जरा कुठे विचारांना विराम मिळतो.

SR1
कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी ची प्रसिद्ध “बग्गी” स्पर्धा, या बग्गीत च्या आत एक व्यक्ती आहे हे खरे वाटेल का?!

आपण जे काही मिळविण्यासाठी भारतातून इकडे झेप घेतली, ते सगळे आता भारतात झपाट्याने उपलब्ध होत आहे. राहणीमान कितीतरी पटींने सुधारले आहे. नव्या पिढीचे विचारही मोकळे आहेत. तरीही आपण शोधतो आहोत तो आपला देश सापडत नाही. असे का? एक तर तिथे होणार्‍या बदलांचे आपण प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे मनाला ते सुसंगत वाटत नाहीत. दुसरे म्हणजे काळानुरूप झालेली मायदेशाची उन्नती ही आपल्या परदेशगमनाच्या मूळ प्रयोजनाला काही अंशी कमी आकर्षक बनवते. वर्षे सरतात, जवळचे लोक काळापलीकडे जातात आणि कौतुक करणारे कमी होतात तेव्हा ती तफावत अधिक जाणवते. मागे वळून पाहता वाटते की आपण परदेशी येऊन इथल्यासारखे जगणे हिरिरीने आत्मसात केले, भविष्यकाळाकडे आतुर झेप घेतली. ही निवड आपण स्वतंत्रपणे केली. निर्णय फक्त आपला होता. मग आपल्या भूतकाळाचे संदर्भ तरी अबाधित राहावेत अशी अपेक्षा आपण का करावी?

अमेरिकेनं मला एक्सप्लोर करायला शिकवले.  उपजत आवड आणि एखाद्या विषयात गती असल्यास दोन्हीची सांगड घालणारा करियरचा मार्ग कसा शोधायचा हे शिकवले. तशी मोकळीक दिली. कोणीतरी सांगितलेली उत्तरे आणि तयार तोडग्यांच्या पलीकडे जाऊन figure it out हा महत्त्वाचा कानमंत्र दिला.  ध्यानीमनी नसताना मनासारखा जोडीदार इथेच सापडला. मुशाफिरीला सध्या एक दिशा मिळाली आहे. ती काही विशेष कारणाशिवाय बदलावीशी वाटत नाही. गंमत अशी की परदेशातच स्थायिक होणार का, हा प्रश्न जितका भारतातल्या आमच्या मित्रमंडळींना आम्हांला विचारावासा वाटतो तितका तो आम्हीसुद्धा स्वतःला पर्याप्तपणे आजपर्यंत विचारलेला नाही. रोजच्या धांदलीत तो विषय अहेतुकपणे सायडिंगला टाकला गेला आहे खरा.  समजा भारताबाहेर न पडता स्वतःचे शहर सोडून बंगलोर, नोएडा असे कुठे राहिलो असतो, तर तिथेच स्थायिक होणार का असा प्रश्न किती वेळा विचारला गेला असता? तेव्हा कायमचे का ते माहिती नाही, पण अनपेक्षित अपवाद वगळल्यास निदान दीर्घकाळ तरी परदेशात राहावे लागणार ही सद्यस्थिती आहे.

दूर आलो असलो तरी शोध, प्रवास संपलेला नाही. उत्तम प्रवाशाकडे पक्के नकाशे नसतात आणि त्याचे आगमन हे उद्दिष्ट नसते असे लाओ-झी या चिनी तत्त्ववेत्त्याने अनेक शतकांपूर्वी लिहून ठेवले आहे. किती मार्मिक आहे हे!

लोपा राजदेरकर

10551116_10204590799999449_2684700414648552611_n

इ-मेल – lopa.rajderkar@gmail.com

सध्या बर्कली (कॅलिफोर्निया, USA) येथील राष्ट्रीय प्रयोशाळेत Functional Genomics या क्षेत्रात पूर्णवेळ संशोधन करते. मानवी आजार, विशेषतः उपजत विकृतींची जनुकीय व अनुवांशिक यंत्रणा हा अभ्यासाचा विषय. त्याव्यतिरिक्त फावल्या वेळात वाचन तसेच चित्रकलेची आवड.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s