आनंदीच्या गावात, आनंदाच्या शोधात

मुग्धा पाडळकर – कुलकर्णी 

फिलाडेल्फिया या शहराबद्दल मनात पहिल्यांदा उत्सुकता निर्माण झाली ती त्यावेळी माझ्या होणा-या आणि आता झालेल्या नव-याच्या, नीरजच्या निमित्तानं. पुढं लग्न ठरल्यानंतर या शहराबद्दल मा‍झ्या मनात कायमचा ‘सॉफ्ट-कॉर्नर’ निर्माण झाला. नीरजबरोबरच्या सगळ्या गप्पांत तिथल्या आजूबाजूच्या निसर्गाचा उल्लेख यायचा. त्याच्या फोटोंतून अधून-मधून फिलाडेल्फिया डोकावत असायचं. त्या नव्या नवलाईच्या दिवसांत मला जिथून-जिथून फिलाडेल्फियाबद्दल मिळेल ती माहिती मी चातकासारखी शोषून घेत असे. ‘आपलं’ होणारं गाव, माझा होणारा नवरा इथं राहतो म्हणून मला हे शहर इथं येण्याआधीच आवडलं होतं. फिलाडेल्फियाचं पहिलं ओझरतं दर्शन झालं ते ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात. या चित्रपटात राणी मुखर्जी फिलाडेल्फियाला येते असा एक छोटासा सीन होता. त्यात फक्त फिलाडेल्फियाच्या 30th स्ट्रीटच्या स्टेशनाचा एक शॉट होता. चित्रपट अतिशय टुक्कार होता, पण फिलाडेल्फियाचं तेवढे दर्शनदेखील मला रोमांचकारी वाटलं होतं.

फिलाडेल्फिया हे अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. एके काळी हे शहर अमेरिकेची राजधानीचं शहर होतं. यामुळे या शहरानं खूप ऐतिहासिक गोष्टी पहिल्या आहेत. जुन्या काळातलं व्हाइट हाउस इथं होतं. अमेरिकेचं ‘युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका’ झालं ते इथेच. इथल्या Independance Hall मध्ये अमेरिकेच्या फाउंडिंग फादर्सनी एकत्र जमून अमेरिकन घटना लिहिली. शिक्षणाच्या दृष्टीनंही हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. अमेरिकेतलं पहिलं विद्यापीठ ‘युनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया’ इथंच आहे. टेम्पल, ड्रेक्सल, जेफरसन विद्यापीठ आणि युनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया अशी चार नावाजलेली विद्यापीठं  इथं आहेत. उद्योगधंद्याच्या बाबतीतही हा भाग चांगलाच विकसित आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी हे शहर मोठ्या बाजारपेठेचं आणि कारखान्याचं आणि उद्योगधंद्याचं मुख्य केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग हब) होतं. (विकिपीडियाच्या सौजन्याने) आणि हो… ‘रॉकी’ या प्रसिद्ध चित्रपटाचं चित्रीकरण इथंच झालं. यातला सर्वांत महत्त्वाचा सीन जिथं रॉकी इथल्या आर्ट म्युझियमच्या  पाय-या चढत वर जातो, जिथून त्याला सगळं शहर दिसतं आणि तो आपले दोन्ही हात वर करून जल्लोष करतो. म्युझियमच्या पायर्‍यांच्या पायथ्याशी रॉकीचा मोठा पुतळा बनवण्यात आला आहे. फिलाडेल्फियाला येणारा प्रत्येक जण या आर्ट म्युझियमला जातो आणि तिथं फोटो काढतो. (हा सिनेमा मी इथं आल्यावर पहिला!)

आमच्या पहिल्या भेटीनंतर दीड वर्षांनी आमचं लग्न झालं आणि २ महिन्यांनी मनातली सगळी ताणलेली उत्सुकता घेऊन मी साधारण १० वर्षांपूर्वी फिलाडेल्फियाला दाखल झाले. नीरज मला नेण्यासाठी विमानतळावर आला होता. कॉलेज कॅम्पसमधलं आमचं छोटंसं घर (studio apartment) मला खूपच आवडलं होतं.  एका खोलीचं घर, त्यातच स्वयंपाकघर,  हॉल आणि बेडरूम. घर जरी छोटं असलं तरी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. जिना चढून वर आलं की घरात दोन मोठ्या खिडक्या, त्यातून संध्याकाळी सूर्यास्त दिसायचा. घराच्या बाहेर पाच मिनिटांच्या अंतरावर ट्रेन स्टेशन. कॉलेज कॅम्पसमध्ये राहत असल्यानं आजूबाजूला विद्यार्थ्यांची चहलपहल सतत असायची. फिलाडेल्फियाचा शहरी भाग मात्र माझा अपेक्षाभंग करणारा होता. जुन्या काळी इथं मोठ-मोठे कारखाने होते. पण आता सगळ्या गोष्टी चीनमधून आयात केल्या जात असल्यानं हे सगळे धंदे बंद पडले आहेत. या कारखान्याच्या मोठ्या आणि भग्न इमारती बघून अतिशय वाईट वाटतं. तसेच इथं सगळे गरीब लोक शहरात राहतात आणि श्रीमंत लोक शहराच्या जवळपास; जिथं ऐसपैस जागा घेऊन घर आणि बागबगिचा करता येईल अशा ठिकाणी राहतात. त्यामुळे शहरी भागात गुन्हेगारीच्या घटना जास्त होतात.

IMG_5138
मी आणि नीरज

पहिल्या छोट्या घरानंतर आम्ही शहराच्या थोडं बाहेर राहायला गेलो. फिलाडेल्फियाचा आपल्या इतिहासाशीपण खूप जवळचा संबंध आहे, ते मला आमच्या नव्या घराजवळ राहायला आल्यावर कळलं.  नीरज ज्या कॉलेजामध्ये Ph.D. करत होता ते कॉलेज पूर्वी  Woman’s Medical College of Pennsylvania अशा नावानं ओळखलं जायचं (आता हे कॉलेज Drexel University College of Medicine म्हणून ओळखलं जातं.) आणि या कॉलेजमधूनच भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली, आनंदीबाई जोशी. आमच्या नव्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर Woman’s Medical College of Pennsylvania होतं. म्हणजे इथंच कुठंतरी आनंदीबाई राहिल्या असणार. भारतातली पहिली महिला डॉक्टर एवढीच त्यांची माहिती असते आपल्याला. त्यांच्या या प्रवासाची कथा फारच उत्सुकतावर्धक आहे. त्या काळी स्त्रियांना पाहण्यासाठी स्त्री डॉक्टर उपलब्ध नसत त्यामुळे स्त्रियांची अत्यंत गैरसोय होत असे. आपल्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आनंदीबाईंनी डॉक्टर व्हायचं ठरवलं.  आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यावं याकरता त्यांचे पती गोपाळराव जोशी यांनी अनेक प्रयत्न केले. या प्रयत्नांची गोष्ट अमेरिकेत त्या काळी प्रसिद्ध होणार्‍या मिशनरी मासिकात प्रकाशित झाली. ती कथा न्यू जर्सीमध्ये राहणार्‍या मिसेस कारपेंटर  यांनी वाचली आणि या धडपडीनं त्या अतिशय भारावून गेल्या. मग बराच काळ आनंदीबाई आणि मिसेस कारपेंटर यांचा पत्रव्यवहार झाला.

anandibai joshi graduation
पदवीदान समारंभात आनंदीबाई जोशी

सुरुवातीला कुतूहलापोटी एकमेकांची माहिती मिळवणं सुरू झालं. कारपेंटरबाईंना भारताविषयी काहीच माहिती नसल्यानं त्यांनी आनंदीबाईंना त्यांचा फोटो पाठवण्यास सांगितलं. नऊवारी साडी आणि अंगभर दागिने घातलेला फोटो पाहून त्यांचा विश्वासच बसेना की जिच्या इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वानं आपण एवढे प्रभावित झालो आहो ती  अवघी १८ वर्षांची तरुणी आहे. मिसेस कारपेंटर यांनी Woman’s Medical College of Pennsylvania इथल्या शिक्षिका रेचल बोडली यांना आनंदीबाईंविषयी सांगून त्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात यावा अशी विनंती केली. आनंदीबाईंनी या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी जे पत्र लिहिलं होतं आणि मिसेस कारपेंटर यांचा रेचल बोडली आणि आल्फ्रेड जोन्स यांच्याशी झालेला पत्र व्यवहार Drexel University archives मध्ये  (http://archives.drexelmed.edu/) आजही उपलब्ध आहे. मी Drexel  University archives धुंडाळत असताना मला त्यांचा एक फोटोपण मिळाला. त्या फोटोत त्यांच्या चेहर्‍यावर विद्वतेचेचं तेज आणि आत्मविश्वास दिसतो. त्यांचं प्रवेश मिळवण्यासाठी लिहिलेलं पत्र वाचताना जाणवतं ते त्यांच्या इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि त्याची विचारांची प्रगल्भता. हे पत्र खरं तर मूळ इंग्लिशमधूनच वाचायला हवं. “Dear Sir….I ask nothing for myself, individually, but all that is necessary to fit me for my work. I humbly crave at the door of your College, or any other that shall give me admittance.”

आनंदीबाई अमेरिकेत आल्या ख-या पण इथली हवा त्यांना सहन झाली नाही. थंडीमुळे त्यांना खोकल्याचा त्रास होऊ लागला. तो काळ १८८४–१८८६ चा आहे. तेव्हाचं फिलाडेल्फिया आणि आत्ताचं फिलाडेल्फिया यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. अनेक हाल सहन करून आनंदीबाई अखेर १८८६ साली डॉक्टर झाल्या. त्यांच्या पदवीदान सोहळ्याला पंडिता रमाबाई प्रमुख पाहुण्या होत्या. भारतातली पहिली महिला आज इथं पदवी ग्रहण करत आहे, असं त्या वेळी घोषित करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि जमलेल्या सगळ्यांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलं.  इंग्लंडच्या राणीनं त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलं. पण त्याच काळात त्यांचा TB चा त्रास वाढला. अमेरिकेतलं थंड वातावरण त्यांना सहन झालं नाही. त्यांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. भारतात परत येताच त्यांनी कोल्हापूरला डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण दुर्दैव असं की २२ वर्षांच्या कोवळ्या वयात आनंदीबाईनी या जगाचा निरोप घेतला. जे शिक्षण घेऊन लोकांची सेवा करण्याचा त्यांचा मानस होता, ते वापरण्याची त्यांना संधी काही मिळाली नाही.

मा‍झ्या लग्नानंतर मा‍झ्या आयुष्यालाही वेगळं वळण लागलं आहे. मी नीरजला पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यानं मला एकच प्रश्न विचारला होता, ‘तुला पुढं शिक्षण घेण्यात रस आहे का?’ मी लहानपणापासून फारशी महत्त्वाकांक्षी नाही. मला अभ्यासाचा कंटाळा नाही, पण परीक्षांची मात्र प्रचंड भीती वाटायची. तस पाहिलं तर मी मेकॅनिकल इंजिनीअर होते आणि भारतात असताना नोकरीही करायचे. पण इथं सगळ्या गोष्टी नवीन होत्या. शहर नवीन, आम्ही दोघं एकमेकांना नवीन! त्यात आणखीन कॉलेज-अभ्यास सांभाळायचं याचा मला खूपच ताण आला होता. मी पहिल्यांदा अमेरिकेत आले तेव्हा मी खूप बुजरी होते. माझा सर्वांत मोठा, एकटीनं केलेला प्रवास म्हणजे माझी पहिली अमेरिका वारी! या नव्या ठिकाणी माझं कसं होणार याची मला आणि मला ‘ओळखून’ असणार्‍या सगळ्यांना फारच काळजी होती.  मी घरापासून इतकं दूर पहिल्यांदाच राहायला आले होते. याआधी मी इंजिनियरिंगसाठी औरंगाबादला आत्याकडे राहायचे त्यामुळे अगदी शनिवार–सोमवार अशी सुट्टी असली, तरीही मी घरी पळायचे. नीरजचं म्हणणं होतं की सुरुवातीचे काही दिवस तुला इथं मजा वाटेल, पण नंतर घराची आठवण येत राहील. तो त्याच्या रिसर्चमध्ये व्यग्र असणार मग मी मला व्यग्र ठेवण्यासाठी काहीतरी शोधलं पाहिजे.

मला स्वयंसिद्ध बनवण्यात आणि मा‍झ्या जडण-घडणीत या शहराचा फार मोठा वाटा आहे. फिलाडेल्फियाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप छान आहे. त्यामुळे मला कॉलेजला किंवा सामान आणायला जाणं खूप सोपं जायचं. ट्रेन, बस आणि ट्रॉली यांनी हे शहर आणि आजूबाजूचे भाग मस्त जोडलेले आहेत. अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्टची फारच मारामार आहे. पेट्रोल आणि डीझेल अतिशय स्वस्त असल्यानं सगळे लोक आपापली गाडी चालवण्याला प्राधान्य देतात. स्वत:चं वाहन असलं की मनात आलं की कधीही घराबाहेर पडता येतं पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहावं लागत नाही. कार चालवता येत नसेल किंवा विकत घेण्याची आणि मेंटेन करण्याची ऐपत नसेल तर घराबाहेर पडणं अवघड होऊन जातं. पण आमच्या जुन्या आणि नव्या घराच्या अगदी जवळ पायी चालण्याच्या अंतरावर ट्रेन स्टेशन होतं. तसंच शहरातले उभेआडवे रस्ते आलेखातल्या ग्रीडप्रमाणे आहेत. त्यामुळे दोन रस्त्यांच्या साहाय्यांनं एखादा पत्ता शोधणं सोपं होतं. कधी काही अडलंच तर आजूबाजूच्या लोकांना विचारायचं. कधी चुकून थोडं पुढे-मागे गेलंच तर एक-दोन बोळ ओलांडल्यावर गोष्टी सहज सापडायच्या. नीरज त्याच्या परीनं मला मदत करायचा, पण मा‍झ्यात हळूहळू आत्मविश्वास आला.

इथं आल्यावर मी इथल्या जवळपासच्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. मा‍झ्या आवडीच्या विषयात रिसर्च करणारे प्राध्यापक शोधायचे, त्यांचा रिसर्च वाचायचा आणि त्यांना इमेल करून भेटायला येऊ का, असं विचारायचं. सुरुवातीला कित्येकांनी इमेलला उत्तरही दिलं नाही. काही जणांनी त्यांच्याकडे रिसर्चसाठी फंड नाहीत असं सांगितलं. या सुरुवातीच्या नकारानंतर मी अतिशय नाराज झाले होते. एकदा टेम्पल विद्यापीठात एका प्रोफेसर बाईंना भेटायला गेले होते. त्यांनी माझा resume घेतला, त्याच्याकडे एकदा पहिलं आणि बाजूला ठेवून दिला आणि त्या चक्क माझ्याशी ‘इथं कुठे राहतेस? भारतातून कधी आलीस?‘ अशा इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा मारायला लागल्या. मी त्यांना म्हणाले की, माझं आत्ताच लग्न झालं आहे. तर मला म्हणाल्या,‘म्हणजे तू एकाच वेळी अनेक बदलांतून जाते आहेस!’ मा‍झ्या मनाची अवस्था त्यांनी अगदी नेमक्या शब्दांत व्यक्त केली होती. आत्तापर्यंत प्रत्येक प्रोफेसर माझ्याकडे एक नवा विद्यार्थी म्हणून बघत होता. पण त्या दिवशी पहिल्यांदा कोणीतरी माझ्याशी माणूस म्हणून बोललं होतं. त्यांच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. जाताना मला म्हणाल्या की, त्यांच्याकडे सध्या नवीन विद्यार्थ्यासाठी पैसे नाहीत; पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील, तेव्हा त्या पहिल्यांदा माझ्याशी संपर्क साधतील. दोनच महिन्यांत त्यांनी लक्षात ठेवून मला फोन केलाही आणि माझं टेम्पल विद्यापीठात मास्टर्स सुरू झालं!

IMG_5211
माझं सुंदर फिली!

 

कॉलेज सुरू झालं आणि मी मा‍झ्या कामात व्यग्र राहायला लागले. शहर हळूहळू ओळखीचं झालं. नीरजचं फिलाडेल्फिया माझी ‘फिली’ झालं. फिलीच्या प्रेमात पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथला निसर्ग. या शहरातून दोन नद्या वाहतात, स्कुकील आणि डेलावेयर नदी. तसंच शहराच्या जवळ दोन मोठे पार्क आहेत. आमच्या नव्या घराच्या आजूबाजूला बरीच दाट झाडी होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात झाडांची पानगळ झाल्यानं थोडं रखरखीत वाटायचं पण मार्चमध्ये चेरीची फुलं, जूनमध्ये गुलाबाची फुलं, जुलैमध्ये लिलीची फुलं ह्यांनी आसपासचा परिसर नटून जायचा. इथून मला कॉलेजामध्ये जाण्यासाठी ट्रेन घ्यावी लागायची. ही ट्रेन स्कुकील नदी ओलांडून फिलाडेल्फियाला जायची. नदीच्या दोन्ही बाजूंना फेअरमाउन्ट पार्क पसरलं आहे. या नदीच्या बाजूनं शहराकडे जाणारा नागमोडी रस्ता आहे. या रस्त्याला ‘केली ड्राइव’ असं म्हणतात. नदीच्या एका बाजूला सगळीकडे चेरीची झाडं आहेत. (ही झाडं जपाननं अमेरिकेला भेट म्हणून दिली होती.) हा माझा फिलाडेल्फियातला सर्वांत आवडता भाग आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सगळे ऋतू पाहायला मिळतात. जसा-जसा ऋतू बदलतो, तशी ही झाडं बदलतात. वसंत ऋतूत ही झाडं पांढर्‍या आणि गुलाबी रंगाच्या छोट्या-छोट्या फुलांनी गच्च भरून जातात. फुलांचा बहार उतरल्यावर या झाडांना पानं येतात. मग पूर्ण उन्हाळा ही झाडं हिरव्या आणि पोपटी रंगांच्या पानांनी भरून जातात. हिवाळ्याच्या सुरुवातीला हळूहळू हिरवी पानं लाल, पिवळी, तांबडी, जांभळी होतात. या रंगांना इथं Fall colors (पानगळीचा रंगोत्सव) म्हणतात. थंडी जास्त वाढल्यावर मग पानगळ सुरू होते आणि काही दिवसांत ही झाडं फांद्याचे सापळे घेऊन परत वसंत ऋतूची वाट पाहत उभी राहतात. माझी गाडी नदी ओलांडून जात असल्यानं मी सगळ्या ऋतूंत ही झाडं पहिली आहेत आणि कॅमे-यातून टिपली आहेत.

साध्या–साध्या गोष्टींमध्ये किती आनंद आहे, हे इथं आल्यापासून जाणवायला लागलं. सुरुवातीला आम्ही दोघंही कॉलेजामध्ये शिकत असल्यानं आमच्याकडे मनोरंजनासाठी जास्त पर्याय उपलब्ध नसायचे. मग चालत नदीवर जाणं किंवा नदीच्या बाजूचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं आमच्या नव्या घरापासून ते फिलाडेल्फिया शहरापर्यंत चालत जाणं अशा अनेक गोष्टी आम्ही करायचो. दर ऋतूमध्ये निसर्गाशी निगडित असणारे बदल बघायला आम्ही जात होतो. आमच्या घराजवळ एक छोटं विद्यापीठ होतं. या विद्यापीठाच्या आवारात हिवाळ्याच्या सुरुवातीला हरणं यायची. घराजवळच ससे, खारी आणि रंगीबेरंगी पक्षी यायचे, त्यामुळे फिलाडेल्फियासारख्या मोठ्या शहरात राहूनसुद्धा निसर्गाशी अगदी जवळून संबंध यायचा.

भारतापासून आपण लांब आलो आहोत, हे पहिल्यांदा जाणवलं ते आईच्या हातच्या जेवणाच्या आठवणीनं आणि सणावाराच्या निमित्तानं! घरी असताना जे नेहमीचं म्हणून नाक मुरडलं जायचं, ते आता मेजवानी वाटायला लागलं. सकाळी गरमगरम आल्याचा चहा प्यावा वाटायचा किंवा नाश्त्याला बेगलऐवजी पोहे किंवा उपमा असता तर, असं सहज वाटून जायचे. मध्येच कधीतरी तव्यावरची गरम पोळी ताटात पडावी असं वाटायचं तर कधी रात्री कंटाळा आला आहे म्हणून गरम( किंवा शिळीही चालेल!) भाकरी आणि पिठलं खावं वाटायचं. घरी असताना आईला मदत म्हणून भाजी चिरणं किंवा तांदूळ निवडून देणं अशी छोटी-मोठी कामं मी करत असे. कधी-कधी एखादा नवा पदार्थ करून पाहिला होता, पण पूर्ण स्वयंपाक करणं हे तसं नवीनच होतं. कधी-कधी मनात यायचं की चला आज मस्त पाव-भाजी किंवा वडा-पाव खाऊन येऊ किंवा मस्त चालत जाऊन टपरीवर चहा पिऊन येऊ. पण मनासारखं खायला काही मिळायचं नाही. पैसा वाया जायचा आणि समाधान काही मिळायचं नाही. काही दिवसांनी लक्षात आलं की, इथं आपल्यासारखे सगळं समान मिळतं, अगदी कढीपत्ता, कोथिंबीर ते चमकु-याची (अळूची) पानं! मग स्वत: नवीन पदार्थ करायला शिकले. इंटरनेटवर कृती पाहायची आणि करून बघायचं किंवा आई आणि सासूबाई यांना विचारायचं. असं करत पोहे-उपमा-पासून अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक शिकले. इथं भाकरीचं पीठ काही चांगलं मिळत नाही. मग भारतातून कुणी इथं येत असेल त्याच्यासोबत भाकरीचं पीठ हमखास पाठवलं जायचं.

IMG_5172
फिलाडेल्फियातला फॉल

सणासुदीच्या दिवसात मात्र भारताची खूप आठवण येते. सणवार हे आपल्या रोजच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतात. फक्त घरीच नाही तर बाहेर बाजारपेठेतही सणाच्या दिवसांत उत्साही वातावरण असतं आणि सणाचा फील येण्यात या वातावरणाचा बराच हात असतो.  इथं सर्व सणांना एकच स्वरूप येतं. जवळपासचा शनिवार–रविवार पकडायचा आणि सगळ्यांनी एकत्र जमायचं.  दिवाळी, दसरा किंवा गणपती असे सण सगळ्या मित्र-मैत्रिणी सोबत साजरे करायचो, पण छोटे सण कधी आले कधी गेले ते कळायचंही नाही. बरेचदा माझी परीक्षा नेमकी दिवाळीच्या जवळपास यायची मग कशाची दिवाळी न्‌ कसचं काय.

मास्टर्सची पदवी मिळाल्यानंतर मी टेम्पल विद्यापीठात डॉक्टर प्लेश्को यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. इथल्या शिक्षणपद्धतीत एक चांगली सोय आहे. इथे तुम्हांला तुमच्या विषयाव्यतिरिक्त दुसरे क्लासही घेता येतात. असंच एका सेमिस्टरमध्ये आणखी कोणता विषय घ्यावा असा विचार करताना एक क्लास घेतला ज्यात मला दर आठवड्याला एका विषयावर ब्लॉग लिहायचा होता. सुरुवातीला मला वाटलं होतं की, आपण कशाला या फंदात पडलो. पण हा मा‍झ्या आयुष्यातला सर्वांत चांगला निर्णय होता. या क्लासमुळे मला लिहायची आवड निर्माण झाली. क्लास चालू असताना फक्त इंग्लिशमध्ये ब्लॉग लिहायचे. पण क्लास संपल्यावरही मी माझा ब्लॉग चालू ठेवला. इथं देशापासून दूर असल्यानं, भारतातल्या सगळ्या आठवणी, सगळा नॉस्टाल्जिया लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागला. महाराष्ट्रीय जेवण आणि आपली खाद्यसंस्कृती हे माझे लिखाणाचे आवडते विषय आहेत. वाचकांकडूनही मा‍झ्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद मिळाला.

या सप्टेंबरमध्ये इथं येऊन १० वर्षं होतील. मागच्या वर्षी मला बायोइंजिनिरिंग या विषयात पीएचडी मिळाली. या सर्व प्रवासात जसा माझा नवरा आणि माझे कुटुंबीय यांचा वाटा आहे तेवढाच वाटा या शहराचा आहे. खूप चांगले-वाईट अनुभव आले. जीव लावणारी माणसं मिळाली. नवा आत्मविश्वास, नवी ओळख मिळाली. म्हणूनच मा‍झ्या पीएचडीच्या अर्पणपत्रिकेत मला मा‍झ्या ‘फिलीचा’ उल्लेख आवश्यक वाटला. आता नीरजच्या जॉबमुळे आम्ही न्यूयॉर्कला शिफ्ट झालो पण “where are you from?” असं कुणी जर विचारलं तर ‘मी फिलाडेल्फियाची’ असं तोंडातून सहज बाहेर पडतं.

मुग्धा पाडळकर-कुलकर्णी

mugdha

इ-मेल – mantramugdha@gmail.com

मी एक ब्लॉगर आहे. ( माझा ब्लॉग: https://mugdhapadalkar.wordpress.com/) महाराष्ट्रीय जेवण आणि आपली खाद्यसंस्कृती, चित्रपट आणि पुस्तके हे माझे लिखाणाचे आवडते विषय आहेत.

3 thoughts on “आनंदीच्या गावात, आनंदाच्या शोधात

 1. मुग्धा,
  खूप सुंदर लेख. तुझ्या भावना छान उतरल्या आहेत शब्दात. विशेषत: आनंदीबाईचं छायाचित्र पाहताना अंगावर काटा उभा राहिला. मी त्यांच्याबद्दल खूप वाचलं आहे. आकाशवाणीत असताना एका नभोनाट्यात त्यांची भूमिकाही केली त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावलेला. हे छायाचित्र मी आधी पाहिलं नव्हतं त्यामुळे फारच आवडलं आणि अर्थातच तुझा लेखही.

  Liked by 1 person

  1. Thank you, Mohana! I am truly amazed by Anandi bai’s story. Glad to share this journey with everyone. Please do check Drexel archives to read her letter that she wrote to get admitted to the medical school.

   Like

 2. I had visited Philly few years back and had stayed at youth hostel ( Chamounix mansion ) in Fairmount park ! I had enjoyed the stay in the rustic surroundings.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s