जर्मनीशी जुळवून घेताना…

मृण्मयी परचुरे

नाशिकमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यावर पुढचं शिक्षण हे एकतर भारतातल्या आयआयटीमधून नाहीतर पदेशात जाऊन घ्यायचं हे फार आधीपासून मनाशी पक्कं ठरलं होतं. दरम्यान अभियांत्रिकीच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षात एक सॉफ्ट-स्किल म्हणून मी नाशिकमध्येच जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली होती आणि ती भाषा फार आवडायलाही लागली होती. त्याच वेळी मी परदेशात शिकायला जाण्यासाठी आवश्यक त्या प्रवेश-परीक्षाही देत होते. जर्मनीमधील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्याकरता पदवीपर्यंत सरसकट चांगले गुण असणं आवश्यक असतं, त्यामुळे तिथं प्रवेश मिळवणं कदाचित थोडं अवघड वाटू शकतं. पण इथल्या विद्यापीठांमध्ये ट्युशन फी आकारत नाहीत किंवा बाकीच्या देशांच्या तुलनेत कमी आकारतात. त्यामुळे शिक्षणाचा भरमसाठ खर्च होत नाही. या सगळ्यामुळे अमेरिकन विद्यापीठांत अर्ज केले असले तरी जर्मनीला माझं झुकतं माप होतं. तसंच ज्या देशाची भाषा आपण शिकतोय, त्या देशात शिक्षणाच्या निमित्तानं दोन-अडीच वर्षं राहता येईल; हे एक छुपं कारणही होतंच! त्यामुळे दोन्हीकडे प्रवेश मिळूनसुद्धा मी जर्मनीची निवड केली. आज कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल, पण मी जर्मनीला यायच्या आधी परदेश प्रवास तर सोडाच पण साधा विमानप्रवासही केला नव्हता. त्यामुळे मनात उत्सुकता आणि भीती असं दोन्ही होतं. त्यात पुन्हा हजार सूचना देऊन आणि अनुभव सांगून अनेक लोक भंडावून सोडत होते आणि अनेक लोक टेन्शन कमीही करत होतेच. शेवटी १ सप्टेंबर २०१५ हा दिवस उजाडला आणि या दिवसानंतर सगळं काही अक्षरश: घुसळून निघाल्यासारखं झालं.

फ्रॅन्कफर्टला पोचले तेव्हा मला आणि त्याच वेळी पोचलेल्या इतर विद्यार्थ्यांना एयरपोर्टवर घ्यायला एक सिनियर स्टुडंट-कोऑर्डिनेटर आला होता. त्याच्याबरोबर आम्ही सगळे डार्मश्टाड्टला युनिव्हर्सिटीत गेलो. ही अशी पद्धत जर्मनीतल्या बहुधा सगळ्या विद्यापीठांत आहे. आमचे प्रोग्रॅम-हेड विद्यार्थ्यांची व्यवस्था जातीनं पाहत होते आणि स्वतः उठून आमच्यासाठी ‘पाणी भर, फळं आणून ठेव’ अशी कामं करत होते. मला तेव्हा केवढं आश्चर्य वाटलं होतं! आपल्याकडच्या लहानातल्या-लहान शिक्षण संस्थेत किंवा कचेरीत असणारा ‘चपरासी’ हा प्रकार इथं नाहीच. सगळी कामं सगळे करत असतात आणि त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. सध्या मी इंटर्नशिप करतेय त्या कंपनीमध्येसुद्धा कॉफी-मशीन रिफील करणं, साफ-सफाई करणं, डिश-वॉशर लोड करून सुरू करणं ही कामं ऑफिसमधलंच कोणी ना कोणीतरी करत असतं.

2
१९३६ च्या बर्लिन ऑलिंपिकसाठी हिटलरने बांधून घेतलेलं ऑलिंपिआश्टाडिऑन

अर्थातच आता जर्मनी म्हणल्यावर अद्ययावत शैक्षणिक सुविधा, हवेशीर आणि भरपूर प्रकाश असलेले वर्ग आणि प्रयोगशाळा, वर्गात चार-चार स्लायडिंग व्हाइट बोर्ड्स, २-२ प्रोजेक्टर्स… मूडलवरती सगळ्या नोट्स आणि रेफरन्सेस असायचे. आमच्या कुठल्याही प्रोफेसरने आम्हांला तासाला उपस्थित राहण्याची सक्ती केली नाही. पण उपस्थित राहिलं नाही तर परीक्षेचा अभ्यास करणं खरोखर कठीण जायचं. आमच्या वर्गात फक्त २५ विद्यार्थी! संपूर्ण कोर्सला मिळून जवळ-जवळ १३०-१४० विद्यार्थी असावेत- ४ मेजर्समध्ये विभागलेले. पहिली सेमिस्टर संपल्यावर शेवटच्या तासाला प्रत्येक प्रोफेसरनं आम्हांला आम्ही शिकलो त्या अभ्यासक्रमाबद्दल सजेशन्स विचारल्या होत्या. आम्हांला जे अपेक्षित होतं ते आम्ही या अभ्यासक्रमात शिकलो का, हेसुद्धा जाणून घ्यायला ते उत्सुक होते. ते ऐकून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसलाच होता, पण काय सांगावं, हेसुद्धा पटकन सुचत नव्हतं. आत्तापर्यंत हा असा विचार कधीच केला नव्हता. अभ्यासक्रमात काय बदल हवेत, हे कधी आपल्या देशात विद्यार्थ्यांना विचारत नसतात. जसा अभ्यासक्रम डिझाइन केलाय तसाच तो स्वीकारायचा असतो, एवढंच आत्तापर्यंत माहीत होतं.

आम्हांला असाइनमेंट्स असायच्या पण त्यात कधीही आपण एकमेकांचं कॉपी करून कारकुनी करतोय असं वाटलं नाही. उलट तसं केलं, तर युनिव्हर्सिटीच्या सॉफ्टवेअरमध्ये लगेच कळायचं आणि त्या असाइनमेंटमध्ये नापास केलं जायचं. आमचे सगळे प्रोफेसर हे पीएचडी होल्डर तर आहेतच, पण प्रत्येकाला कमीतकमी ६-७ वर्षांचा इंडस्ट्रीमधला अनुभव आहे. आम्ही जेव्हा जर्मनीमध्ये परीक्षेचा पेपर पहिल्यांदा लिहिणार होतो, तेव्हा विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की, कृपया लांबलचक उत्तरं लिहू नयेत. प्रिसाइज आणि टु-द-पॉइंट उत्तरं लिहा. एका शब्दात अचूक उत्तर दिलंत तरीही चालेल. तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहात! परदेशात शिकलेल्या इतरांना यात कदाचित काही नवं वाटणार नाही पण त्या वेळी माझ्यासाठी हे सगळंच नवं आणि वेगळं होतं.

3
ब्रान्डेनबुर्गर गेट- मी बर्लिनला गेले त्याच्या आदल्या रात्री पॅरिसमध्ये हल्ला झाला होता(नोव्हेंबर २०१५). त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ इथे अशी रोषणाई केली होती

हे फक्त अभ्यासात आणि शिक्षण पद्धतीत झालेले बदल होते. रोजच्या आयुष्यात झालेले बदल, नव्या गोष्टी, नवी साधनं, त्यांची सवय होणं हे पुन्हा वेगळंच! जर्मनीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींचंसुद्धा प्लॅनिंग करावं लागतं. रविवारी सगळ्या दुकानांना-सुपरमार्केट्सना पूर्ण सुट्टी असते. साधं चिटपाखरूही दिसत नाही. रात्री आठ किंवा जास्तीतजास्त नऊ वाजता सगळी दुकानं बंद होतात. ख्रिसमस किंवा ईस्टरमध्ये किंवा न्यू-इयरला जोडून २-३ सुट्ट्या येतात आणि तेव्हा त्या दिवसांत तुम्हांला काहीही मिळत नाही. काय लागणार असेल ते आधीच आणून ठेवावं लागतं. आपल्याला काय आणि किती सामान लागणार आहे, याचं चांगलं प्लॅनिंग असावं लागतं. पण या सगळ्यामुळे बऱ्याच गोष्टींमधली स्पॉन्टेनीटी हरवते असंही वाटतं मला कधीकधी! भारतात कसं आपण कधीही बाहेर पडलो, तरी कोपऱ्यावरच्या दुकानातून काहीही पटकन घेऊन येऊ शकतो. तसं इथं होत नाही! किंवा स्कुटरवर टांग मारून पटकन काहीतरी आणलं जातं. इथं स्कुटर वगैरे काही नाही फारसं! विद्यार्थ्यांकडे फार तर फार सायकल सापडेल. थंडीत सायकलचा फारसा उपयोग नसतो. त्यामुळे सगळीकडे चालत फिरण्याचा उत्साह आणि एनर्जी असावीच लागते. अमेरिकेत जसं विद्यार्थी लवकरात लवकर ड्रायव्हिंग लायसन्स काढून विद्यार्थिदशेतच कार घेऊ शकतात तसं जर्मनीमध्ये नाही. इथे आम्ही विद्यार्थी सेकंड-हॅन्ड सायकली विकत घेतो. त्या मिळणंसुद्धा अवघड असतं, कारण लहान मुलांपासून ७०-८० वर्षांच्या माणसांपर्यंत सगळे सायकली चालवत असतात. त्यामुळे अर्थातच मागणी खूप असते. उन्हाळ्यात आमच्या युनिव्हर्सिटीतले काही प्रोफेसर्ससुद्धा सायकलनं युनिव्हर्सिटीमध्ये येतात. इथं ट्रेन, ट्राम आणि बस वाहतूक एकतर चांगली आहे आणि ट्राम्स आणि ट्रेन यांमध्ये आपण सायकल चढवून लांब कुठेही नेऊ शकतो. त्यामुळे कारची गरज भासत नाही.

15.jpg

जर्मनीत पोचले त्या दिवशी युनिव्हर्सिटीतून आम्हांला आमच्या घरी पोहोचवलं! आम्हांला प्रत्येकी एक स्वतंत्र खोली दिली होती आणि चार जणांत मिळून एक स्वयंपाकघर आणि बाथरूम! पण रूममध्ये गेले तर फॅनच नव्हता तिथे! त्या क्षणी त्या घराविषयी इतकं वाईट फिलिंग आलं मला- ‘अरेरे! हे कुठं आलो आपण!?! साधा एक फॅन नाही आपल्या खोलीत!!’ पण नंतर कळलं इथं फॅन, एसी काहीही नसतं. उन्हाळ्यात काही मोजके दिवस तापमान बरंच असतं. पण बाकी कधी फॅनची गरज नसते. तेवढ्या दिवसांची सोय म्हणून काही लोक टेबल फॅन किंवा स्टॅन्ड फॅन विकत घेतात. बहुतांश घरांमध्ये एसी नसल्याने वायुविजन, ज्याला जर्मनमध्ये ‘लुफ्टुंग’ म्हणतात, हा फार महत्त्वाचा भाग आहे. थंडीमध्येसुद्धा रोज सकाळी आणि संध्याकाळी १०-१५ मिनिटं घराच्या खिडक्या उघड्या ठेवणं फार गरजेचं असतं. नाहीतर भिंतीवर बुरशीसारखं-ज्याला जर्मनमध्ये ‘शिमेल’ म्हणतात, तयार व्हायला लागतं, जे आपल्या प्रकृतीकरतासुद्धा वाईट असतं. हे तयार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. जर्मनीतली आणखी एक सांगितलीच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे इथलं कचऱ्याचं विभाजन. इथं घरातच कचऱ्याची विभागणी ४-५ प्रकारांत करणं ‘मस्ट’ आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रंगांच्या पिशव्या, कचरा-पेट्या असतात. सुरुवातीच्या दिवसांत सगळ्या कामांत अजून ही एक गोष्ट अंगवळणी पडेपर्यंत जरा वैताग येतो. अर्थात या कचरा व्यवस्थापनामुळेच इथं स्वछता आहे आणि निसर्गाचा समतोल आहे. इथं रविवार हा ‘रुहऽटाग’-शांतता पाळण्याचा दिवस असतो. या दिवशी व्हॅक्युम-क्लिनर तर नाहीच पण काही भागांत आपल्या इंडियन प्रेशर-कुकरची शिट्टी झालेलीसुद्धा चालत नाही.

जर्मनीमध्ये लोक कधीही आणि कुठंही बीअर पिऊ शकतात-अगदी कुठल्याही प्रहरी, कुठल्याही वारी आणि कुठल्याही ठिकाणी! इथं सार्वजनिक ठिकाणी- पार्क, ट्रेन, ट्राम, रेल्वे-स्टेशन अगदी कुठंही खुलेआम बीअर पिताना आपल्याला दिसतात. अर्थात, असं असलं तरी, लोक पिऊन धिंगाणा घालताहेत, इतरांना त्रास देताहेत असं कधी फारसं दिसत नाही. इथला बीअर फेस्टिवल्स म्हणजे या सगळ्यांवर चढवलेला कळस असतो! म्युनिकमधलं ऑक्टोबर-फेस्ट हे जगप्रसिद्ध आहे. पण असे अनेक फेस्टिवल्स इथं दर मोसमात गावा-गावांत होत असतात. अशा फेस्टिवल्समध्ये एका भल्या मोठ्या मैदानात त्या-त्या भागातल्या प्रसिद्ध ब्रुअरीजचे भले मोठे तंबू टाकलेले असतात. जत्रेसारखे अनेक खेळ असतात. खाऊची दुकानं असतात. स्टुटगार्टला आम्ही मित्र-मैत्रिणी गेलो असताना तिथं असंच फ्र्युलिंग फेस्ट चालू होतं. या ब्रुअरीजच्या तंबूमध्ये नक्की कसं वातावरण असतं हे पाहायला आम्ही एका तंबूमध्ये शिरलो आणि १०-१५ मिनिटांनी तंबूतून गोल चक्कर मारून बाहेर आलो तेव्हा आम्हाला १०-१५ मिनिटं आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगात जाऊन आल्यासारखं वाटत होतं. बीअरचा पूर आल्यासारखं वाटत होतं. तिथे मोठी टेबल्स आणि बाजूने अनेक स्टूल्स-खुर्च्या टाकलेल्या. लोक त्यावर बसण्याऐवजी स्टूल किंवा टेबलवर उभं राहून, बीअरचा ग्लास हातात घेऊन, धुंद होऊन नाचत होते. कुठल्याशा म्युझिक-बँडचे कलाकार स्टेजवरून मोठमोठ्यानं गाणी गात होते, खाली असलेले लोक त्या कलाकारांच्या बरोबरीनं गात होते, मोठमोठ्यानं ओरडत होते. बीअर सगळीकडे जमिनीवर सांडून जमीन चिकट झाली आहे, हे आमच्या शूज घातलेल्या पायांनासुद्धा जाणवत होतं. लोकांना अक्षरश: आपण कुठे आहोत, आपल्या आजूबाजूला कोण आहे; याचं भान राहिलं नव्हतं. बाहेर रोज शहाण्यासारखं आणि सगळं ठरल्याप्रमाणे वागणारी हीच का ती जर्मन माणसं असं एक क्षण वाटून गेलं!

18
स्टुटगार्ट फ्र्युलिंग-फेस्टच्या तंबूमधले बीअरचे मास.

इथं आमच्यापैकी अनेकांना नेहमी खटकणारी एक गोष्ट म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणं किंवा न करणं हा अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे! पण, आपण कधी ट्राम/बस/ट्रेनसाठी थांबलेलो असतो आणि एखादी व्यक्ती आपल्या शेजारी येऊन सिगरेट ओढायला लागते. धुराचा त्रास होतोय म्हणून आपण जरा लांब दुसरीकडे जाऊन थांबावं तर तिथं अजून दुसरीच व्यक्ती येऊन धुम्रपान सुरू करते- हे असं दर दुसऱ्या दिवशी होतंच! या गोष्टीचा वैताग येतो. जर्मनीमध्ये लोकसंख्या इतकी कमी, पण तरी इतके लोक सिगरेट ओढताना रोज दिसतात, यावरून इथं लोक किती प्रमाणात धुम्रपान करत असतील याचा अंदाज येतो! आरोग्याच्या बाबतीत सजग असलेल्या लोकांचा हा देश, पण धुम्रपानाच्या बाबतीत इथं असं कसं असा प्रश्न मला नेहमी पडतो!

युरोपमध्ये बहुधा सगळीकडेच भारतीयांना येत असलेली अडचण म्हणजे इथली भयाण शांतता आणि एकटेपणा! हे विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतं. कारण दिवसभर थंडी असतेच आणि खिन्न, उदास वातावरणही असतं. मला इथं पहिल्या वर्षी जे घर मिळालं ते स्टुडंट-हाउसिंगमध्ये नव्हतं. मुख्य शहरापासून किंचित लांब होतं. माझ्या जवळपास मोजकेच विद्यार्थी राहत होते आणि बरेचसे माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं बरेच मोठे आणि विचारांनी खूपच स्वतंत्र होते. माझ्यासारखी पदवी-शिक्षण झाल्या-झाल्या इथं आलेली समवयस्क मंडळी माझ्या जवळपास नव्हतीच. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा युनिव्हर्सिटीतून घरी आल्यावर मी एकटी-एकटीच असायचे. पहिल्या सेमिस्टरमध्ये असलेले थंडीचे दिवस आणि त्यात पुन्हा विद्यार्थिदशा त्यामुळे तेव्हा फारसं फिरायला जाणं शक्य नसतं आणि परवडतही नसतं. या सगळ्यामुळे फार मानसिक त्रास व्हायचा. कशासाठी आलो इथं जर्मनीमध्ये, तिथं भारतातच नोकरी केली असती किंवा शिकलो असतो, असं त्या दिवसांत अनेक वेळा वाटून गेलं.

4
बॉनला मी गेले त्यावेळी शरद ऋतू होता. बॉन युनिव्हर्सिटी समोर टिपलेलं छायाचित्र.

भारतात एकटं राहणं वेगळं असतं. शेजारी-पाजारी बोलायला असतात, बाहेर पडल्यावर रस्त्यावर दहा माणसं दिसतात, घरी येणाऱ्या मोलकरणी असतात, रस्त्यावरचे-आजूबाजूच्या घरांमधले आवाज ऐकू येत असतात. इथं शहराजवळ राहूनसुद्धा नीरव शांतता काय असते ते अनुभवलं मी! त्या शांततेचं, एकटेपणाचं दडपण यायचं, त्या सुरुवातीच्या दिवसांत. सुट्टी नकोशी व्हायची! त्यात पुन्हा त्याच दिवसात मी इथं आजारी पडून एक छोटंसं ऑपरेशनही करायला लागलं माझं! बरं, इथं अमेरिकेसारखी खूप मराठी/भारतीय मंडळीही नाहीत, की प्रत्येक स्टेटमध्ये एखादा ओळखीचा मित्र अथवा नातलग भेटतोच तसंसुद्धा नाही. तरीसुद्धा जवळपास राहणारी काही मराठी कुटुंबं माझ्या ओळखीची झाली आणि त्या काळात त्यांनी मला खूप मदतही केली आणि अजूनही वेळोवेळी करत असतात. पण या सगळ्यामध्ये एक मात्र झालं, मी माझी स्वतःची कंपनी एंजॉय करायला शिकले. गाणं, ओरिगामी, वाचन यांसारख्या माझ्या छंदांचा मला इथं खूप उपयोग झाला. माझ्यात केवढी मानसिक क्षमता आहे, हे मला माहीतच नव्हतं इतकी वर्षं, त्याची जाणीव मला झाली.

जर्मन लोक मोकळे-ढाकळे नाहीत. त्यांच्याशी मैत्री करणं अवघड असतं. पण रोजच्या आयुष्यात कुठं गरज लागली तर मनापासून मदत करणारे मात्र आहेत. जर्मनीमध्ये आल्यावर बहुतेक प्रत्येकालाच पहिली अडचण ट्रेन किंवा ट्रामचं तिकीट काढताना येते. इतकी क्लिष्ट असतात इथली तिकीट मशिन्स! पहिल्यांदा तिकीट काढताना ५-१० मिनिटं माझे निष्फळ प्रयत्न सुरू होते. मला जायच्या असलेल्या ठिकाणाचं नाव त्यात सापडेना. माझी बस निघून जाणार आणि मला आता पहिल्याच दिवशी उशीर होणार, असं वाटायला लागलं. शेवटी रस्त्यावर एक सायकलस्वार दिसला त्याला थांबवून मी विचारलं. त्या माणसानं चक्क सायकल बाजूला लावली आणि माझ्याबरोबर येऊन मला कसं तिकीट काढायचं ते अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. इथं कुठं नव्या ठिकाणी गेलं आणि फोनवरचं इंटरनेट बंद असेल तर एखादं ठिकाण शोधणं अवघड जातं. अशा वेळी एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला पत्ता विचारला, तर अनेक वेळा ती व्यक्ती वाट वाकडी करून आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणापर्यंत सोडायला येते, असा अनुभव मला ३-४ वेळा तरी आलाय!

7
हायडलबर्गमधली जुनी दगडी रस्ता असलेली गल्ली

इथं कधी प्रवास करताना किंवा अगदी ऑफिसला-युनिव्हर्सिटीला जाता-येताना काही लोक स्वतः पुढे येऊन गप्पा मारायला लागतात. कोण-कुठले विचारपूस करतात. काही स्वतःच इंग्लिशमध्ये संभाषण सुरू करतात तर काही जर्मन भाषेतूनच बोलायला लागतात. त्यांच्याशी जर्मनमधून गप्पा मारण्यात वेगळीच मजा असते. एकदा इंडियन एम्बसीच्या कुठल्याश्या सांस्कृतिक कार्यक्रमात एका गायिकेला मी हार्मोनियमवर साथ केली होती. त्यानंतर प्रेक्षकांमधली एक जर्मन बाई माझ्याशी बोलायला आली. कौतुक वगैरे केलं आणि त्यानंतर ती माझ्याशी भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय गायक, भारतीय शास्त्रीय नृत्याचे वेगवेगळे प्रकार ते अगदी भारतीय चित्रपट यांवर जवळ-जवळ अर्धा तास गप्पा मारत होती. सत्यजित रे यांचे सगळे चित्रपट तिनं पाहिले होते! हे सगळं ऐकून मी अवाक झाले होते! एकदा म्युनिकहून फ्यूसेनला ट्रेननं जाताना शेजारी बसलेली बाई गप्पा मारायला लागली. ती मुळात रशियन पण तिनं रशियातच भेटलेल्या जर्मन माणसाशी लग्न केलं. ती तिच्या रशियाच्या आठवणी सांगत होती. कम्युनिस्ट रशियामधून तिचं कुटुंब नंतर जर्मनीला आलं हे तिच्या चार मुलांच्या दृष्टीनं किती बरं झालं याबद्दल समाधान व्यक्त करत होती.

एका प्रवासात बव्हेरियामधल्या एका छोट्या गावात योगासनं शिकवणारी तरुण मुलगी भेटली होती. मला संस्कृत वाचता येतं आणि थोडंफार समजतं हे ऐकून तिला माझं फारच कौतुक वगैरे वाटत होतं! भारतात-मुंबईत येऊन गेली होती ती एकदा आणि बर्लिनपेक्षा मुंबई तिला जास्त का आवडली हे मला सांगत होती. मी जिथं इंटर्नशिप करते तिथं माझ्या एका जर्मन सहकाऱ्याची बायको कधी-कधी स्टुडन्ट-जॉब करायला येते. तिचं माहेर किरगिजस्तानचं आहे आणि अकरा वर्षांपूर्वी एक्सचेंज-स्टुडंट म्हणून ती जर्मनीमध्ये आली. रशियन तिची मातृभाषा आणि जर्मनसुद्धा आता मातृभाषेइतकीच जवळची. ती पहिल्यांदा आली तेव्हा सलग तीन-चार दिवस आम्ही फक्त जर्मनमध्ये अनेक विषयांवर गप्पा मारत होतो. किरगीजस्तान नावाचा देश पृथ्वीवर आहे, हेसुद्धा मला माहीत नव्हतं. तिच्यामुळे मला तो देश, तिथली राजवट, व्यवस्था, हवामान, तिचं तिच्या देशाशी असलेलं नातं, रशियन भाषा या सगळ्याबद्दल कित्येक गोष्टी समजल्या. आमची छान मैत्री झाली. नंतर ईस्टरमध्ये तिनं स्वतः बेक केलेले, खसखस आणि दालचिनी घातलेले रोल्स तिच्या नवऱ्याबरोबर माझ्याकरता आठवणीनं पाठवले होते.

25
श्पार्गेल सूप- शतावरीचं सूप. वसंत ऋतूत आणि उन्हाळ्यात शतावरीचे विविध पदार्थ करून लोकं त्याचा आस्वाद घेतात.

आमच्या ऑफिसमध्ये एक अफगाणी इंजिनियर आहे. मध्यंतरी तो भारतात येऊन गेला आणि त्यानंतर भारताचं फार कौतुक करत होता. तो म्हणे १२-१५ वर्षांपूर्वी निर्वासित म्हणून जर्मनीमध्ये आला. पुढे बरंच स्ट्रगल करून, शिकून आता जर्मनीत सेटल झालाय. असे अनेक निर्वासित इथं मला आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना दिसत असतात. एवढंच नाही तर एखाद-दुसरा कोणाच्या वर्गातही असतो. युनिव्हर्सिटीकडून या मुलांना आर्थिक मदत मिळते. यांतले अनेक जण त्यांच्या आई-वडिलांना तीन-चार वर्षांत भेटले नाहीयेत. काहींना हेसुद्धा माहीत नाहीये की कुटुंबातले बाकीचे सदस्य जिवंत आहेत की नाहीत. असं असूनसुद्धा हे सगळे कष्ट घेत ते पुढे सरकताहेत, कधीतरी चांगला दिवस उगवेल अशी आशा ठेवून! असं पाहिलं की वाटतं, आपण किती भाग्यवान आहोत. आपला देश भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा आहे!

जर्मनीमध्ये मी आवर्जून प्रवास करते. त्याविषयी लिहायलाच हवं. पहिल्या वर्षांत फार प्रवास जमला नाही. कारण वेळ आणि पुरेसे पैसे नसायचे. तरी सेमिस्टरमध्ये २-३ ट्रिप्स असायच्याच माझ्या! आता इंटर्नशिप सुरू झाल्यापासून बहुतेक दर महिन्यात एखादी ट्रिप करायला सध्यातरी जमतंय. जर्मनीमधल्या युनिव्हर्सिटीजमधली मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथे इंटरनॅशनल स्टुडन्ट्ससाठी ब्रिजिंग कोर्सेस असतात. त्याकरता त्यांना महिनाभर आधी बोलावतात. आम्हांलासुद्धा असंच महिनाभर आधी बोलावलं होतं. या ब्रिजिंग कोर्सेसमध्ये जर्मन भाषा, अभ्यासक्रमातल्या काही विषयांची पूर्वतयारी हे असतंच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जवळपासची ठिकाणं दाखवायलाही घेऊन जातात. आम्हांला आमच्या विद्यापीठानं हायडलबर्ग, बॉन आणि माइन्झ या तीन शहरांत नेलं होतं. त्या तीनही रितसर गाइडेड टूर्स होत्या. आमच्याबरोबर प्रत्येक वेळी आमचे प्रोग्रॅम-हेड आणि काही असिस्टंट्स होते. प्रवासात ते सतत आम्हां विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. आम्हांला इथल्या रेल्वे, बस व्यवस्थेबद्दल, खासगी बसनं प्रवास करण्याबद्दल माहिती देत होते. आम्हांलाही प्रश्न विचारायला उद्युक्त करत होते. आम्ही कमी खर्चात युरोपमध्ये कशा प्रकारे प्रवास करू शकतो याबद्दल टिप्स देत होते. आणि दुसरं म्हणजे इथले गाईड्स! भारतात कुठल्याही पर्यटनस्थळावर मी इतके चांगले गाइड्स अजून पाहिले नाहीत!

माइन्झमध्ये वेंडेलिन आणि रोझमेरी श्पार्स हे एक म्हातारं जोडपं आम्हांला गाइड करत होतं. म्हातारे असले तरी टुणटुणीत आणि फार गोड होते दोघं! दोघंही फार लहानपणापासून माइन्झमध्ये राहतात आणि म्हणून माइन्झवर प्रचंड प्रेम आहे दोघांचंही! त्यांच्याकडे एक जाड-जुड फोल्डर होता. त्यात माइन्झची जुनी छायाचित्रं, काही हस्तलिखितांच्या कॉपीज, माइन्झचे बदलत गेलेले नकाशे, आलेख आणि अजून काय-काय होतं. तो फोल्डर बाळगत, मधूनच त्यातले नकाशे, फोटो दाखवत, आलेखांवरून दाखले देत दिवसभर ते आमच्या बरोबर फिरत होते, न दमता! आपल्या शहराचा केवढा तो अभिमान! पदोपदी जाणवत होतं ते आम्हांला!

हायडलबर्गमधला आमचा गाईड मुळात फ्रेंच होता. तो जर्मनीमध्ये नंतर आला. त्यामुळे त्याची बोलण्याची पद्धत जरा वेगळी होती. छोट्या-छोट्या गोष्टींत पटकन फ्रान्सशी तुलना करत वेगळं काहीतरी सांगून जायचा तो! एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जर्मन माणसाचा दृष्टिकोण आणि फ्रेंच माणसाचा दृष्टिकोण यांतला फरक मधूनच गमतीत सांगायचा! आणि भारतीय माणसांचा असायचाच- ऍट दि बॅक ऑफ माय माइंड! गंमतच सगळी!

बोनमध्ये ‘हाउस देर गेशिष्टऽ-म्युझियम ऑफ जर्मन हिस्टरी’ नावाचं फार मोठं म्युझियम आहे. जर्मनीचं एकत्रीकरण व्हायच्या आधी बॉन ही पश्चिम जर्मनीची राजधानी होती. बीथोवनचा जन्म बॉनमधलाच! त्यामुळे बॉनला विशेष महत्त्व! बॉनच्या या म्युझियममधला गाइडसुद्धा चांगला होता. इथले गाइड्स पाठ केल्यासारखं एकसुरी बोलत नाहीत त्यामुळे एवढं मोठं म्युझियम असूनसुद्धा कुठंही कंटाळवाणं झालं नाही.

मी मित्र-मैत्रिणींबरोबर स्वतंत्रपणे बऱ्याच ठिकाणी फिरले. बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ट यांसारखी मोठी शहर झाली. फ्रांकफर्ट फार जवळ असल्यानं अनेक वेळा तिथे जात असते. रेगेन्सबुर्ग कासल, ग्योटींगन, बँबर्ग यांसारखी छोटी-छोटी शहरं झाली. जर्मनी ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते लेक्स आणि कॅसल्स पाहिले. कार म्युझियम्स झाली. बराच जर्मनी पाहून झालाय! हळूहळू जर्मनीबाहेरचीही काही ठिकाणं होतायत. हॉलंडमधलं ट्युलिप गार्डन तर आवडलंच. पण त्या गावात सायकल चालवत मनसोक्त हिंडायला जास्त मजा आली. आजूबाजूला लांबवर पसरलेले ट्युलिपचे मळे आणि मधून काढलेल्या रस्त्यावरून आपण सायकल चालवत हिंडतोय, त्या सायकलवरच्या भटकंतीमुळे ती सहल कायम लक्षात राहील. साल्झबुर्ग पाहणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मी ‘साउंड ऑफ म्युझिक’ पहिल्यांदा पाहिला तेव्हापासूनचं! तिथंही जाऊन आले. माझी अजूनही अशी प्रवासाची अनेक स्वप्नं आहेत. मित्र-मैत्रिणींबरोबर नेहमी फिरत असतेच मी, एखादा प्रवास एकटीनं करायची इच्छा आहे, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून रोड-ट्रिप करायची आहे. आई-बाबांना-बहिणीला युरोप दाखवायचाय. स्वप्नांना अंत नाहीये!

युरोप आणि प्रवास या समीकरणाबद्दल मी वेगळं काय सांगणार ? पण टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीच्या रेडिमेड टूर्सपेक्षा इथले लोक स्वतःच अभ्यास करून सहलीचं नियोजन करतात, असं माझं निरीक्षण आहे. प्रत्येक ठिकाणाची व्यवस्थित माहिती देणारी ऑफिशिअल वेबसाइट, राहण्यासाठी एअरबीएनबी किंवा युथ-हॉस्टेल यांसारखे चांगले पर्याय, हल्ली इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात असलेले ट्रॅव्हल-ब्लॉग्स, कार/सायकल/बाइक रेंटिंगचे मुबलक असलेले पर्याय; हे सगळं असल्यामुळे युरोप ट्रिप तरी लोकांनी स्वतः नियोजन करून स्वतंत्रपणे करावी, असं मला वाटतं. म्हणजे मग मनासारखं फिरताही येतं, जिथं जास्त वेळ घालवावासा वाटतोय तिथं घालवता येतो आणि मुख्य म्हणजे त्या-त्या ठिकाणची पर्यटन स्थळं आणि आपली हॉटेलची रूम यांपलीकडे जाऊन अनेक गोष्टी आपल्याला कळतात आणि त्या देशातल्या स्थानिक माणसांशी, तिथल्या व्यवस्थेशी संबंध येतो.

अवघ्या दोन वर्षांत जर्मनीनं इतकं शिकवलंय मला! जगाविषयी, जगण्याविषयी वेगळी समज दिली, माणसांकडे पाहायचा वेगळा दृष्टिकोण दिला! काही कारणांमुळे मनात तयार झालेले अनेक पूर्वग्रह मोडून काढले. आले तेव्हा जवळ-जवळ पहिले सहा-आठ महिने मी इतकी होमसिक झाले होते की सगळं सोडून परत मायदेशी परतावं असं वाटत होतं; आणि आज एम.एस. पूर्ण व्हायच्या उंबरठ्यावर असताना जेव्हा मी पुढच्या शक्यतांचा विचार करते, तेव्हा जर्मनी सोडून दुसऱ्या एखाद्या देशात किंवा परत मायदेशी नोकरीसाठी जाण्याच्या नुसत्या विचारानंसुद्धा पोटात कालवाकालव होते. जर्मनीनं एवढा आत्मविश्वास दिलाय की तेव्हाची आणि आत्ताची मी एकच का, असा मला प्रश्न पडतो कधीकधी! अर्थात भारताची ओढ आहेच. भारतीय सण, नातलग, मित्रमंडळी आणि खाद्यपदार्थ यांतून मिळणाऱ्या आनंदाची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. भारतात घरी असते तेव्हा एक उबदार प्रेमळ आवरण माझ्याभोवती आहे, अशी भावना असते मनात! पण जर्मनीमधली स्वतःची स्वतःवर असणारी जबाबदारीसुद्धा हवीहवीशी वाटते. आयुष्यभर जर्मनीमध्ये राहण्याचा माझा अजिबातच विचार नाही. इथं नोकरी मिळाली, तर कदाचित काही वर्षं इथं राहीन, कदाचित भारतात परत येईन, कदाचित दुसऱ्याच कुठल्या देशात जाईन! भविष्य इथं कोणी जाणलंय, नाही का! पण माझ्यासाठी जर्मनी हा देश अगदी नेहमीच आणि कायम स्पेशल असेल हे मात्र नक्की!

मृण्मयी परचुरे

hdr

मूळची नाशिकची. सध्या, डार्मश्टाड्ट युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्समध्ये इलेक्ट्रिकल अँड आयटी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. २०१६-१७ मध्ये जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्विस अंतर्गत भारताची एक यंग अँबॅसेडर म्हणून निवड झाली होती. याशिवाय संगीत, वाचन, ओरिगामी यांची आवड आहे. अधूनमधून mrunmayiparchure.wordpress.com या ब्लॉगवर लेखनही करते.

7 thoughts on “जर्मनीशी जुळवून घेताना…

  1. Very nicely written while was reading the blog I could actually visualise the whole picture in my mind that powerful ur writing was and love from my family members too

    Liked by 1 person

  2. Mrunmayee; while readinng the blog i felt as if im studying in Germany. This is the characteristic of your writing. You can even make a career in writing. Keep getting such new experiences in life and keep sharing. God bless….

    Liked by 1 person

  3. मस्तच नेमसेक. तुझ्यासोबत जर्मनी फिरायला किती मजा येईल, असं वाटतंय.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s