मातृभूमी आणि कर्मभूमी

मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर

“तुला कोणता देश जास्त आवडतो. भारत की अमेरिका?” हा प्रश्न अधूनमधून माझी दोन्ही मुलं मला विचारतात. काहीही उत्तर दिलं, तरी उपप्रश्न असतात मग त्यावर चर्चा, वाद आणि नेहमीप्रमाणे  एक प्रश्न  लेक विचारतो. उत्तर अर्थात आम्ही चौघांनी द्यायचं.

“भारत आणि अमेरिका या दोन देशांत युद्ध झालं, तर तू कुठच्या देशाच्या बाजूनं लढशील?”  प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात आणि कारणंही. मुलं अमेरिकेच्या बाजूनं, मी तटस्थ आणि ‘वेळ आली की बघू’ असं उत्तर देऊन नवरा वेळ निभावतो.

मुलांनी ‘अमेरिकेच्या बाजूनं लढू’ असं म्हटल्यावर मला अनेक प्रश्न पडतात. म्हणजे मुलांकडून मिळालेलं हे उत्तर मला खरंच अपेक्षित उत्तर आहे का? मी त्यांना भारतात जसं महाराष्ट्रीयन मूल वाढेल तसंच किंबहुना अधिकच ‘मराठी’ घडवलं. माझी मुलं अस्खलित मराठी बोलतात किंबहुना आम्ही बोलण्यात इंग्लिश शब्दांचा अतिवापर करतो, ही त्यांची तक्रार असते.  पण म्हणून ती भारतीय आहेत का? नक्कीच नाहीत. ती स्वत:ला अमेरिकनच मानतात, पण आपल्या आई-वडिलांचा देश म्हणून त्यांचे भारताबद्दलचे बंधही तितकेच घट्ट आहेत. मी अमेरिकन नागरिकत्व घेतलं असलं, तरी मनानं भारतीय आहे असंच वाटतं मला, मला अमेरिकेबद्दलही प्रेम वाटतं आणि भारताइतकाच हा देशही मला माझाच वाटतो. माझ्या मुलांना दोन्ही देश जसे आपले वाटतात तसेच मलाही. एकदा का हे विचारचक्र सुरू झालं की, माझ्या मनातल्या पाटीवर असंख्य प्रश्नांचा सडा पडायला लागतो. एकेक करत मी उत्तरं गोळा करत राहते. कधी ती उत्तरं हवीहवीशी वाटणारी, कधी आंबटगोड, कधी सत्य दर्शविणारी तर कधी पुन्हा प्रश्न निर्माण करणारी असतात.

OurBackyard
आमचं बॅकयार्ड

आमचं लग्न ठरलं, तेव्हा विरेनच्या कंपनीचं नाव ऐकल्यावर जो-तो म्हणायचा, ’अरे वा, अमेरिकेला जायची संधी मिळणार.’ सर्वांच्या दृष्टीनं अपूर्वाईच्या अमेरिकेबद्दल मला खरंच आकर्षण नव्हतं. विरेनची, त्याच्या घरच्यांची भेट झाली; तेव्हा मी सांगितलं होतं, ‘अमेरिकेत जायचा विचार असेल तर माझा नकार आहे.’ आता या वाक्यावरून मला घरातले सर्व चिडवतात. कारण तेव्हा विरेननं ठामपणे सांगितलं होतं की, ‘गेलो तरी दोन वर्षासाठी.’ इकडचे तिकडचे परदेशात असलेले एक-दोन नातेवाईक, दूरदर्शनवर अधूनमधून दिसणारे बिल क्लिंटन आणि शाळेत शिकलेला भूगोल इतक्या तुटपुंजा बळावर दोन वर्षं अमेरिकेत जायला तयार झालेली मी आज २२ वर्षं या देशात आहे.

WhatsApp युग आलं, तेव्हा माझ्या शाळकरी मित्राचा प्रश्न होता की, ‘तुला खरंच अमेरिका आवडते की तडजोड म्हणून राहतेस?’ किंवा भारतात गेल्यावर नातेवाईक, मित्रमैत्रिणी हमखास प्रश्न विचारतात, ‘परत येणार की तिकडेच राहणार?’ या सगळ्या प्रश्नांना खरंच एक असं उत्तर नाही. विचार केल्यावर असं वाटतं की, गावाकडून शहराकडे गेलेला माणूस जसा तिथंच गुंततो तसं होत असावं. आयुष्याच्या एका टप्प्यावर काय गमावलं, काय कमावलं हा प्रश्न तर जिथं कुठं राहतो तिथं राहूनही प्रत्येकाला पडतोच की.

मला नेहमी वाटतं की, हे सारे निर्णय त्या-त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतले जातात. मोह सोडवत नाही. भारतातले नातेवाईक आणि घरचे यांना आर्थिक मदत करायची असते. बसत चाललेली घडी विस्कटणं नको वाटायला लागतं. मिळालेली संधी गमवायची नसते. स्वदेशात आलेल्या  कटू अनुभवांनी देश सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. सासरच्या माणसांशी संबंध ठेवायचे नसतात. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी अविश्वसनीय, पण त्या-त्या कुटुंबाच्या दृष्टीनं महत्त्वाची कारणं असतात. आणि `कशासाठी? पोटासाठी!’  हे  मुख्य कारण तर असतंच असतं.

निर्णय घेऊन स्थिरावेपर्यंत कारणांचा ऊहापोह होतो. मग अधूनमधून सारेच कधीतरी परत जाण्याचा मनसुबा बोलून दाखवत असतात, पण ते तेवढ्यापुरतंच. परत जाण्याची सुप्त इच्छा असेलही, पण त्यामुळे जीव कासावीस होण्यासारखं किंवा एक शोकांतिकाच झाल्यासारखं काही नसतं. कारण इतक्या वर्षांत भारताइतकंच जिथं राहतो आहोत त्या देशाच्या प्रेमात पडायला झालेलं असतं. सवय होते राहण्याची जिथं असू तिथं. आता सांगायचंच तर अमेरिकेतल्या अमेरिकेत दुस-या ठिकाणी गेलं की आधीचं गाव बरं होतं, अशी कुरकुर आम्ही सारे करतोच की.

आम्ही ज्या काळात इथं आलो त्या काळात इथं येणा-यांची आणि परत जाणा-यांचीही संख्या तुलनेनं कमी होती. जे भारतात परत जात त्यांतले बहुतांशी अमेरिकेत परत येत.  पण आता इथं येणा-या तरुण मुलांच्या बाबतीत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पिढीपिढीतला हा फरक ठळकपणे जाणवतो. आता भारत सोडताना ब-याच जणांना ‘आपल्याला नक्की काय हवं आहे’ हे कळलेलं असतं त्यामुळे त्यांचे निर्णय ठाम असतात. काही ठरवून लवकरच परत जातात तर काही भारत सोडायचा या विचारानंच आलेले असतात. किंबहुना एक अख्खी पिढी ‘जिप्सी’ होत चालली आहे असं वाटतं कारण या तरुण मुलांच्या मते कोणता देश हे महत्त्वाचं राहिलेलं नाहीच. कर्तृत्वाला वाव मिळवण्याची,  कामाची, फिरण्याची, संधी महत्त्वाची वाटते त्यांना. त्यामुळेच भारत सोडून फक्त एकच कुठलातरी देश हेही बदललं आहे.

वेगवेगळ्या देशांत ‘बदली’ झाल्यासारखं फिरणारे खूप जण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आणि निर्णयही सहजसुलभ झाले आहेत पूर्वीच्या मानानं. याचं कारण तंत्रज्ञान, संपर्कात राहण्याची साधनं, बदललेला भारत, सुधारलेली आर्थिक स्थिती हे असावं आणि पालकांची दृष्टीही आता बदललेली दिसते. मुलांनी परदेशात जावं असं आता त्यांना वाटतं. मला आठवतंय जेव्हा आमची मनःस्थिती दोलायमान होती, तेव्हा दोन्हीकडच्या पालकांनी आम्हांला ‘तुमच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घ्या’ असा सल्ला दिला होता. इथं येणा-या तरुण मुलांच्या पालकांना जेव्हा आम्ही कुतूहलानं विचारतो की, ‘तुम्हांला काय वाटतं, तुमच्या मुलांनी इथं राहावं की भारतात परत यावं?’ तर जवळजवळ सर्वच पालकांनी मुलांना परदेशात राहायचा सल्ला दिला आहे. परिस्थिती आणि कारणं अशीही बदलत जातात हे आजूबाजूची स्थित्यंतरं पाहताना, भूतकाळात डोकावताना जाणवतं.

१९९५ साली भारत सोडला तो नव-याला कंपनीनं पाठवलं आहे म्हणून दोन वर्षं आपणही दुसरा देश बघू एवढाच विचार मनात होता, दोघांच्याही. मी रत्नागिरीची. विरेन पुण्याचा. अमेरिकेतल्या सॅटारोझासारख्या अगदी छोट्या गावात आलो आणि दोन वर्षांतलं मुंबईतलं वेगवान आयुष्य मागे पडलं. माझ्या जगात शांतपणानं अचानक प्रवेश केला. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती, तशीच इथं कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्यानं नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्यात्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. भारतीय कंपनीनं दोनच वर्षांसाठी पाठवलं होतं आणि कशाची फारशी चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमी दैनिकासाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ‘तरुणाई’ सदर, अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाइम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरूपांत कागदावर उतरायला लागले. त्या वेळी लेखन पोस्टानं किंवा तत्कालीन घडामोडींवरले लेख वर्तमानपत्रांना फॅक्सनं पाठवणं हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान विरेनच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यांमधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही वेगवगळे पैलू असलेलं आहे, ते जाणवायला लागलं. आपल्याकडे जशी कोसाकोसांवर भाषा बदलते तसेच इथंही उच्चारांत फरक झालेला जाणवतो. लहान गावात गेलं तर अजूनही आपल्याकडच्या ग्रामीण भागात गेल्यासारखंच वातावरण, विचारसरणी आढळते.

10310540_10205685627131544_1458577522921028307_n
ग्रँड कॅनियनचा प्रवास

जाऊ तिथलं होणं, हे वाटतं तितकं सोपं नसतं. नवीन देश आणि मराठी माध्यमात झालेलं शिक्षण यांमुळे इंग्लिशचा न्यूनगंड आणि विविध देशांतल्या लोकांबरोबर, त्यांच्या उच्चारांबरोबर जवळीक साधत संवाद साधण्याचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरत आणि फटफजितीचे असंख्य प्रसंग. पण हळूहळू अमेरिकन मित्र-मैत्रिणींबरोबरच इतर देशांतल्या लोकांशीही मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. विचारातला संकुचितपणा कमी व्हायला लागला.

पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्षं झाली आणि अजून काही वर्षं इथंच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी लागणा-या शिक्षणाचे वेध लागले. वयाच्या तिशीनंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानंच बेचैन व्हायला झालं होतं. अस्वस्थ मनानं वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई-वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खातरी झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व, शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा स्वीकार. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो.

अजूनही एक आठवण मनात ताजी आहे. मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी स्मिथना घाबरत घाबरत विचारलं.  त्यांनी तात्काळ होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि  स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं. ‘आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे,’ पूर्ण वर्गाला स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षांच्या माझ्या मुलानं लाजतलाजत ‘हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष १८ ते ६५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला.

13445661_10208713292981298_1767679419762793765_n
मुलगा ऋत्विकचं ग्रॅज्युएशन

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं आली. मी शिकताशिकता बदली शिक्षिकेची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं टीव्हीवर सतत आवाहन असायचं. आणि शिक्षणक्षेत्रातली पदवी नसली तर प्रशिक्षण दिलं जायचं. म्हटलं, जमलं तर करून पाहू. पण इथल्या मुलांमध्ये वावरणं नक्कीच सोपं नाही. नियमांचं, कायद्याचं काटेकोर पालन करावंच लागतं. अगदी सुरुवातीलाच मला जो वर्ग मिळाला तो ‘नाठाळ’ प्रकारात मोडणा-या मुलांचा. वर्गात पाऊल टाकलं तेव्हाच स्टुपिड, बास्टर्ड अशा शब्दप्रयोगांची खैरात चालू होती. घसा ताणून ओरडलं तरी ऐकतंय कोण? खेळाचा तास आला आणि मी सुटकेचा श्वास सोडला.

‘नीट खेळा, मी बसले आहे इथं बाकावर.’ एका दिशेनं माना हालल्या.

मी निवांत वेळेची स्वप्न पाहत बाकाच्या दिशेनं मोहरा वळवला. कुठलं काय, माझी पाठ वळल्यावळल्या झोडपलं त्यांनी एकमेकांना बास्केटबॉलनं. जेनीफर तर बेशुद्ध होऊन खाली पडली. माझी पाचावर धारण बसली. सगळे नियम, कायदे एका क्षणात आठवले. जेनीफरला काही झालं तर माझं काय होईल, हे दृश्य डोळ्यांसमोर तरळलं. दोन्ही खांदे धरून तिला उभं केलं. गदगदा हलवलं.

‘आय कॅन्ट ब्रीद…आय कॅन्ट ब्रीद’ डोळे गरगरा फिरवत ती तेवढं मात्र म्हणू शकत होती.

‘मी टू….’ मी पुटपुटले. पण एकदम झाशीची राणी संचारली अंगात.

‘जेने, तुझ्या शिक्षिकेनं नोट लिहिली आहे या तुझ्या वागण्याची. नाटक करू नकोस.’

डोळे गरगरा फिरवले तिनं. वाटलं हिच थोबाडीत देतेय की काय माझ्या मी तिला नाटकी म्हटलं म्हणून. पण जादू झाल्यासारखी जेनीफर तरतरीत झाली. माझा अंदाजे टाकलेला खडा उपयोगी पडला. पण ती खरंच बेशुद्ध पडली असती तर? प्रकरण कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकलं असतं पण थोडक्यात वाचले.

इथल्या सगळ्याच मुलांचा तोंडवळाही सारखाच वाटतो नवीन असताना. एकदा खेळाच्या तासाला मी सर्वांना बाहेर घेऊन गेले आणि परत आले तेव्हा माझ्याबरोबर वेगळीच मुलं होती. अर्थात मला कळलं नव्हतंच. मुलंच म्हणाली, ‘यु आर नॉट अवर टिचर.’ मी वेगळ्याच मुलांना परत आणलं होतं तर मैदानावरून. मग माझ्या वर्गातली मुलं गेली कुठे? त्यांची शिक्षिका शोधून ती मुलं तिच्या ताब्यात दिली आणि भांबावलेली माझी मुलं मी परत आणली. आता सारं गमतीचं वाटतं, पण त्या क्षणाला भीतीनं हातपाय गळले होते. इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातला पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा यांचा सुखद अनुभव घेतानाच असे बरेच  गमतीदार प्रसंग घडले आणि त्यातूनच संवाद साधण्याचं कौशल्यही निश्चितच वाढलं.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथं शिकत होते तिथंच उमेदवारी करून वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयाचे जवळजवळ १८० विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानंच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते. एकमेकांना सांभाळून, वैयक्तिक अडीअडीचणींचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढणं इथली लोकं फार सहज करतात. मला ते अतिशय महत्त्वाचं वाटलं.  कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन, कागदावर सारा आराखडा करणं हे भारतात फारसं सवयीचं नसल्यानं सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो; हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं. जसं काम अंगवळणी पडायला लागलं तसा आपसूकच हा देशही.

11934999_10206773586649852_5191327342546624519_n
वेशांतर या एकांकिकेतलं एक दृश्य

नोकरीबरोबरच लेखन चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ‘अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. इथल्या अद्ययावत नाट्यगृहात प्रयोग सादर करण्याचा अनुभव आगळाच.

सगळ्याचा धांडोळा घेताना लक्षात येतंय की मनुष्य जिथं जातो तिथं आवडीनिवडी जपत मुळं रुजवतो. स्वत:बरोबर आपसूक आलेल्या गोष्टींची जपणूक करण्याचा प्रयत्न करतो तर काही नवीन गोष्टी स्वीकारतो. तरुण वयात आपण कुठं आहोत याला खरंच फार महत्त्व दिलं जात नाही आपल्याकडूनच. आहोत तिथं आपल्याला काय करता येईल किंवा मिळवता येईल याचाच विचार करत मार्ग शोधले जातात. आमचंही तेच झालं. तरुणाईतला उत्साह होता, आव्हानं पेलण्याची इच्छा होती, स्वत:ला सिद्ध करण्याची खुमखुमी होती. आपण कोणत्या देशात आहोत हे महत्त्वाचं नव्हतंच. भारतातल्या जीवलगांची दोन वर्षांनी होणारी भेट त्या वेळेस पुरेशीच वाटायची.  त्यामुळेच इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेताना नक्की काय विचार असावा ह्याचा विचार केला तर एकच एक मुद्दा निश्चितच सांगता येणार नाही. आमच्यासारखे लोक पैसा आणि आराम ह्या दोन गोष्टींसाठी मायदेश सोडतात, असं भारतात म्हटलं जातं. पण तेही कारण नाही. खूप सा-या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे हे स्थलांतर असं म्हणेन मी. आणि हे असं सर्वांच्याच बाबतीत होत असावं. आम्ही भारत सोडताना तात्पुरताच सोडला होता. आमचं स्वत:चं असं काही नव्हतं. मुख्य म्हणजे घर नव्हतं. मग काही वर्षं राहून घर घेण्याइतके पैसे साठवू आणि जाऊ परत हेदेखील इथं आल्यावरच मनात आलं. पुण्यात घरही घेतलं. मग आम्ही इथंच का राहिलो, ह्या प्रश्नाचं ठोस असं उत्तर आम्हांला अजूनही सापडलेलं नाही असं म्हणावं लागेल.

दर दोन वर्षांनी भारतात आलं की ओळखीच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न आपसूकच होतो. पण भारत किती बदलला आहे, ते इथं राहूनही आधुनिक तंत्रज्ञानामुळे आम्ही रोजच पाहत असतो त्यामुळे नवल वाटत नाही. भारतात झालेले बदल कधी खूप छान वाटतात तर चुकीच्या कल्पना मनात ठेवून ऐकीव माहितीचं केलेलं अनुकरण पाहिलं की त्रास होतो. जसं ‘लिव इन रिलेशनशिप’. इथं लोक लग्न करू शकतो का, हे पाहण्यासाठी एकत्र राहण्याचा पर्याय स्वीकारतात तर भारतात लग्न करायचं नाही या कारणाकरता तरुण मुलं ‘लिव इन रिलेशनशिप’ला प्राधान्य देऊ लागले आहेत. वाढत चाललेला जातीयवाद क्लेशकारक वाटतो. ही वानगीदाखल दिलेली उदाहरणं. पण इतक्या वर्षांनी ज्या बाबतीत सकारात्मक बदल झालेला असेल असं वाटायचं, तो बदल झालेला नाही हे पाहिल्यावर वाईट वाटतं.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की १९९५ साली आम्ही अमेरिकेत आलो, तेव्हा नक्कीच हा आमच्यासाठी ‘परदेश’ होता. इथं मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आत्तासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की उत्तराची आतुरतेनं वाट पाहण्यात ३ आठवडे जायचे. पण हा परका देश ‘आपला’ कधी होऊन गेला, तेच समजलं नाही. आता तर आम्ही परदेशात असतो, हा शब्दप्रयोगच मला चुकीचा वाटतो. स्वत:चा देश, परदेश कसा असेल? त्यामुळेच मी भारताला मातृभूमी आणि अमेरिकेला कर्मभूमी असं मानते. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की आम्ही ख-या परिस्थितीची जाणीव तळमळीनं करून देतो आणि इकडे आमच्या सहकार्यांनी, अमेरिकेन मित्र-मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीनं गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर

Mohana

mohanajoglekar@gmail.com

व्यवसायाने वेब प्रोग्रॅमर. अभिनयाची आत्यंतिक आवड. स्वत:च्या ‘अभिव्यक्ती’ संस्थेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय. कथाकथनाचे कार्यक्रम. ‘मेल्टिंग पॉट’ या कथासंग्रहाला कोमसापचं उत्कृष्ट कथासंग्रहाचं पारितोषिक. विविध वर्तमानपत्रं, मासिकं आणि दिवाळी अंक यांसाठी लेख, कथालेखन. लोकसत्ता वर्तमानपत्र, बृहन्महाराष्ट्रवृत्त, श्री. व सौ. मासिकासाठी सदर लेखन.

One thought on “मातृभूमी आणि कर्मभूमी

  1. छान लिहिला आहेस लेख. प्रामाणिक आहे. आत्म परीक्षण करणारा आहे. मला मनापासून आवडला.
    – मुकुंद टाकसाळे

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s