अश्विनी गावडे
बेल्जियम नावाचा एखादा देश आहे, हे मला स्वतःला ८-९ वर्षांपूर्वी माहीत नव्हतं. मी इंजिनीरिंगला असताना उच्च शिक्षणासाठी मुख्यत्वे अमेरिका किंवा इंग्लंड याच देशांची निवड व्हायची आणि त्याचं कारण म्हणजे भाषेची सोय. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्यामुळे मेकॅनिकल इंजिनीअरिंगची मुलं जर्मनीची निवड करत असत. माझी बेल्जियमशी पहिली ओळख झाली ते माझा तेव्हाचा मित्र आणि आता नवरा असलेला अमेयनं मला विचारलं की, त्याला मास्टर्स झाल्यावर बेल्जियममधे नोकरी मिळाली आहे. मला लग्नानंतर तिकडे थोडी वर्षं राहायला आवडेल का?’ त्यानं विचारल्यावर मग माझा बेल्जियमचा ई-शोध सुरू झाला आणि अनेक कारणांमुळे तो अजूनही चालूच आहे. फरक इतकाच की आता तो प्रत्यक्ष अनुभवांतून घेते आहे.
आमचं लग्न ठरल्यावर नातेवाईक मंडळींना ‘मी युरोपात जाणार’ एवढंच सांगायचे. क्वचित कोणी तपशिलात विचारलं तरच बेल्जियमचा उल्लेख करायचे. एका शेजा-यांनी काय ऐकलं होतं कोण जाणे पण त्यांनी खातरी करून घेण्यासाठी मला विचारलं, ‘काय मग लग्नं झाल्यावर बेळगाव का?’ त्यावर उत्तर म्हणून मीही म्हटलं ‘हो, या मग आमच्याकडे बेळगावचा कुंदा खायला’. ब-याच माहीतगार लोकांनी ‘जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स जवळ असताना बेल्जियम कशाला’ असंही विचारलं. अर्थातच त्याचं पहिलं कारण म्हणजे नोकरी आणि आम्हाला माहीत होतं की आमच्यासाठी ती नवीन आणि काहीतरी वेगळं करण्याची संधी होती. एक नवीन जग अनुभवण्याची आणि जगण्याची संधी.

बरेच युरोपिअन्स हसत का होईना पण ‘बेल्जियम हा देशच नाही’ असंच म्हणतात. याचं कारण म्हणजे बेल्जियम हा देश फ्रान्स, नेदरलँड्स आणि जर्मनी अशा भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या देशांनी वेढलेला आहे. बेल्जियम हा मुख्यत्वे द्विभाषक देश आहे. डच बोलणा-या भागास फ्लॅण्डर्स म्हणतात तर फ्रेंच बोलणा-या भागास वलुनिया. बेल्जियमच्या जन्माबद्दलचा गंमतीशीर किस्सा इथे हसतहसत कथन केला जातो. फ्रान्सचा मुलगा होता वलुनिया आणि नेदरलँड्सचा मुलगा होता फ्लॅण्डर्स. आई-वडिलांशी भांडण झाल्यावर वलुनिया आणि फ्लॅण्डर्स यांनी आपापसांत मांडवली करायची ठरवली आणि ते एकत्र राहायला लागले. अशा त-हेनं बेल्जियमचा जन्म झाला.
अशाच प्रकारे बेल्जियममधल्या काही बॉर्डर्स- सीमाभागही मजेशीर आहेत. ‘बॉर्डर’ शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यांसमोर भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमा येतात आणि सोबतच काही कडवट आठवणीही. इथे मात्र आपल्या अगदी विरुद्ध, `मजेशीर बॉर्डर` आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड्स बॉर्डर परिसरात काही लहान enclaves आहेत. Enclave म्हणजे थोडक्यात विदेशी क्षेत्रं. बेल्जियममध्ये नेदरलँड्सचे enclaves आहेत आणि नेदरलँड्समध्ये बेल्जियमचे. आणि त्यामुळे काही सीमारेषा कधी रेस्टॉरंटमधून, कधी रस्त्यातून जातात तर कधी इमारतींतून जातात. मी तर असंही ऐकलंय की १-२ बॉर्डर्स तर घरांमधून क्रॉस होतात. अर्थात यात सत्यता किती आणि किती अतिशयोक्ती हे मला माहीत नाही. कारण मी अजून तिथं गेले नाही. पण हे किती मजेशीर आहे बघा. म्हणजे एखाद्याच्या घरातून दोन देशांमधली सीमारेषा जाते. म्हणजे बेडरूम बेल्जियममध्ये असेल आणि बाथरूम नेदरलँड्समध्ये, तर झोपेतून बेल्जियममध्ये उठायचं आणि नेदरलँड्समध्ये अंघोळ करायची. समजा नवर्याशी भांडण झालं तर सरळ उठून दुस-या देशात निघून जायची धमकी द्यायची… तेही फक्त १० सेकंदांत. गंभीर परिस्थिती निवळण्यासाठी आणि गरमागरमी थंड करण्यासाठी इथे असे विनोद बरे पडतात. शेवटी चर्चेसाठी डिम्प्लोमसी ही विनोदातून सुरू झालेली बरी.

असा हा `मजेशीर बॉर्डर्स` असणारा छोटासा देश. हा देश विविधतेनं नटलेला आहे. ती विविधता बघितल्याशिवाय दिसत नाही आणि अनुभवल्याशिवाय कळत नाही. राजधानीचं शहर ब्रसेल्स हे द्विभाषिक असलं तरी इथं बोलीभाषा ही मुख्यत्वे फ्रेंच आहे. ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. ब्रसेल्सचं एक महत्त्व म्हणजे इथं युरोपियन युनिअनचं मुख्यालय आहे. त्यामुळे ब्रसेल्सला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे. एक्स्पो ५६, या engineering marvels प्रदर्शनासाठी बांधलेले प्रसिद्ध ॲटोमियम हे ब्रसेल्समध्ये आहे. यामागची संकल्पना म्हणजे लोखंड धातूचा युनिट सेल (unit cell) आणि प्रत्येक गोल म्हणजे एक अणू. हे ॲटोमियम आयफेल टॉवरसारखेच संध्याकाळी दिव्यांनी लखलखत असते, तेव्हा सुंदर दिसते.
ब्रसेल्समध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा मान असणारा एक प्रसिद्ध पुतळा आहे. तो म्हणजे Manneken Pis (मॅनकीन पिस). २४ इंचांचा सूसू करणा-या लहान मुलाचा पुतळा. याबद्दल अनेक परीकथा रंगवल्या जातात. त्यातली माझी आवडती म्हणजे, लुवन या बेल्जियममधील शहराचा राजा गॉडफ्रे दुसरा हा १९४२च्या ग्रिमबर्गनच्या राजाबरोबरच्या युद्धात मरण पावला. तेव्हाच्या राजदरबाराच्या नियमानुसार राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाकडे अधिकृतरीत्या सूत्रे दिली जातात. परंतु गॉडफ्रेचा मुलगा हा अवघा २ वर्षांचा होता. तेव्हा गॉडफ्रेचं सैन्य त्यांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी बाळराजांना युद्धभूमीवर घेऊन गेलं. तिथे बाळराजेंनी युद्धभूमी मूत्रविसर्जनाने पवित्र केली आणि विरोधी पक्ष युद्धात हरला.

बिकटप्रसंगी संताप व्यक्त करण्यासाठी हीच विनोदबुद्धी वापरताना मी बेल्जियन्सना पहिले आहे. ब्रसेल्स विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा Manneken Pisचा फोटो आणि त्याची tagline ‘Terrorist, Belgium pisses on you’ सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि क्षणभर का होईना अनेक बेल्जियन्सच्या चेह-यावर हसू उमटलं.
ब्रसेल्समधल्या आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे टिनटिन या प्रसिद्ध कॉमिकचा जन्म. बेल्जियन कार्टूनिस्ट जॉर्ज रेमी हा टिनटिन कॉमिकचा निर्माता. ब्रसेल्समध्ये अनेक भिंतींवर कॉमिक स्ट्रिपच्या ग्राफिटी दिसतात. जॉर्ज रेमी हा Herge हे टोपणनाव वापरत असे. फ्रेंच यत्किंचितही माहीत नसणा-या वाचकांनी Hergeचा उच्चार करण्याचा प्रयत्न जरूर करावा. अगदी सर्व परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स करावेत…. जमलं का? नाही? थोडी वाईन घेऊन, जरा झिंगून परत प्रयत्न करा… जे काही उच्चार बरळले जातील त्यातून कुठला योग्य उच्चाराशी मॅच होतोय का बघा… झाला? Hergeचा उच्चार अर्जे असा आहे. जॉर्ज रेमीचे इनीटीअलस G. R. आणि तो लोकप्रिय झाल्यावर त्याने त्याचे टोपण नाव त्याच्या इनिशिअल्सचा फ्रेंच उच्चार वापरून अर्जे म्हणजेच Herge हे स्वीकारलं.
बेल्जियमच्या उत्तरेला ब्रुग आणि गेंट अशी लहान कालव्याची सुंदर शहरं आहेत. या मध्ययुगीन शहरांमध्ये फिरताना थोडा वेळ का होईना भूतकाळात गेल्यासारखा वाटतं. यांना पश्चिम युरोपचं व्हेनिस म्हटलं जातं. तर दक्षिणेकडे किल्लेदारी असलेली दिनांत आणि नमुर अशी सुंदर शहरं आहेत. जगातले सगळ्यांत छोटे शहर डरबी हेपण बेल्जियममध्येच आहे. दक्षिणेकडे आणखी काही सुंदर गोष्टी म्हणजे Han-sur-Lesseच्या नैसर्गिक stalagmite गुहा. Stalagmite म्हणजे कॅल्साइटचं प्रमाण जास्तं असणारं पाणी वर्षानुवर्षं झिरपून तयार झालेले शंख आणि अनेक आकारांचे थर. या गुहांची अतिशय व्यवस्थित काळजी घेतली जाते. योग्य ठिकाणी अतिशय सुंदर लाइट्स वापरले असल्यामुळे या गुहा सुंदर दिसतात. या गुहेच्या टूरच्या शेवटी ५ मिनिटं बसून बघण्याचा एक लाईट शो असतो. हा अतिशय सुंदर दृक्श्राव्य अनुभव असतो. इथं टूर घेताना एकदा एक गाइड अगदी सहजच म्हणाला की, या गुहा जवळजवळ २००० वर्षं जुन्या आहेत, जवळजवळ माझ्याच वयाच्या.

आम्ही राहतो त्या शहराचं नाव आहे Leuven, लुवन. लहान असलं तरी हे विद्यापीठाचं शहर आहे. KULeuven ही जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी इथं आहे. इथं दर वर्षी अनेक देशांचे विद्यार्थी शिकायला येतात. इथं भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण दर वर्षी वाढतं आहे. KULeuven युनिव्हर्सिटीनं मागच्या वर्षी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनात विविध देशातल्या जुन्यानव्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार नुसतेच भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे असे नसून भारतीय विद्यार्थिनींचे प्रमाण दर वर्षी वाढते आहे असं सांगण्यात आलं.
ISAL दर वर्षी एक किंवा दोन सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करते. त्यात सहभागी झाल्यानं मला लिखाणाशी आणि रंगमंचाशी माझं नातं कायम ठेवता आलं आहे. इथं आम्ही अनेकविध संकल्पना साकारल्या. त्यातल्या काही प्रमुख म्हणजे भारतीय विवाहपद्धती, भारतीय सिनेमा, भारतीय खाद्य संस्कृती. इथं राहताना या लोकांना भारताबद्दल अजूनही किती गैरसमज आहेत हे कळतं. मला नेहमी विचारले गेलेले प्रश्न म्हणजे की, तू मुलाला ना भेटता त्याचाशी लग्न केलं का? किंवा इंडियन सिनेमा म्हणजे फक्त गाणीच असतात का? इंडियन फूड-ओह येस, आय लव्ह चिकन टिक्का मसाला. अर्थातच अशा पार्श्वभूमीवर हे सांस्कृतिक कार्यक्रम अनेकांसाठी भारताची खरी ओळख करून देणारे ठरतात.
लुवनमध्ये पाहण्यासारख्या ठिकाणांपैकी खास म्हणजे Stella beer ची brewery, लुवनची प्रसिद्ध लायब्ररी आणि लायब्ररीचा टॉवर, विद्यापीठाचा परिसर आणि बेगीनाज (beginauge). बेगीनाज म्हणजे स्वतंत्रपणे आयुष्य जगणा-या स्त्रियांसाठी त्यांच्याच इच्छेतून आणि कष्टांतून झालेली राहण्याची सामूहिक सोय. किती पुरोगामी कल्पना आहे ही. मध्ययुगात संपूर्ण जगातच स्त्रियांना विशेष स्थान आणि अस्तित्व नव्हतं. आणि या परिस्थितीत लग्न न करता आणि कुठलेही धार्मिक दीक्षासोहळे न करता काही स्त्रियांना समाजसेवेसाठी जीवन जगायचं होतं. अर्थात त्याबरोबर वैयक्तिक आंतरिक आध्यात्मिक समृद्धीही आलीच. अशा स्त्रियांची संख्या वाढायला लागल्यावर बेगीनाजची निर्मिती झाली, जिथं काही ठरावीक नियमांचं पालन करून अपेक्षित जीवन जगता येणं शक्य होतं. माझ्या वाचनात असंही आलंय की कधीकधी विधवा स्त्रियाही इथं राहत असत. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये असे बेगीनाज अजूनही जतन केलेले आहेत. बेल्जियममध्ये, ब्रुग इथले बेगीनाज तर युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट आहे.

पाहण्यासारखं असंच सुंदर ठिकाण म्हणजे लुवन लायब्ररी आणि लायब्ररी स्क्वेअर. जर्मनीनं पहिल्या महायुद्धात युनिव्हर्सिटीची मुख्य लायब्ररी जाळून टाकली होती. नंतर ती पुन्हा बांधण्यात आली. या लायब्ररीला आतून भेट दिल्यावर मला आपलं उगाचच हॅरी पॉटरच्या हॉग्वार्ट्समध्ये पोचल्यासारखं वाटलं. कारण लायब्ररीचे जिने म्हणजे जणू काही हॉग्वार्ट्सचेच दिशा बदलणारे जिने वाटले आणि लायब्ररीमध्ये हॉग्वार्ट्ससारखेच छताला लटकणारे दिवेपण आहेत.
इथल्या उन्हाळ्यात म्हणजे जुलै-ऑगस्टच्या महिन्यांत लायब्ररीमध्ये अगदी वर टॉवरपर्यंत जाता येतं. इथून संपूर्ण शहराचं विहंगम दृश्य दिसतं आणि ठोक्यांबरोबर वाजणारे कारिलीऑन नावाचं वाद्यही बघता येतं.
लुवन मध्ये प्रसिद्ध अशी Stella Artois बीअरची brewery आहे.

माझे सासू-सासरे आले होते, तेव्हा आम्ही या brewery ला भेट दिली होती आणि टूरही घेतली होती. त्या दोघांनाही बीअर आवडते त्यामुळे त्यांना अर्थातच टूर आवडली. या टूरमध्ये बीअर बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवतात. त्यात माल्ट्स आणि हॉप्स कसे निवडतात, फरमेंटेशन कसं होतं, साखर किती प्रमाणात वापरली जाते अशी सर्व प्रकारची माहिती होती. हॉप्स काय असतात असा प्रश्न कोणीतरी विचारताच आमच्या टूरगाइडमधला डॉक्टर म्हणा वा कॉमेडियन जागा झाला आणि त्यानं उत्तर दिलं की, ‘hops, you know women use it to grow their breast size ‘. असं खरं आणि विनोदी उत्तर भारतात पब्लिक टूरमध्ये मिळणं मात्र दुर्मीळच.
बीअर्सबद्दल मात्र बेल्जियन्सना प्रचंड अभिमान आहे, आणि का नसावा? कारण त्यांच्याकडे १००० पेक्षा जास्त बीअर व्हरायटी आहे. बेल्जियममध्ये १८० किंवा कदाचित जास्तच breweries आहेत. आणि याशिवाय घरातल्या लहान सेटअपमध्ये बीअर ब्रू करणारे अनेक हौशी लोक असतात. इथे ब्रू होणा-या बिअर्सपैकी सॅझॉ, दुपल, ट्रिपल, पिल्सनर, लेफे, होगार्डन अशा काही महत्त्वाच्या बीअर्स. त्या-त्या बीअरनुसार त्यांचे ग्लासही वेगवेगळे असतात. यातही काही विनोदी किस्से आहेतच. इथं ट्रॅपिस्ट बीअर अतिशय प्रसिद्ध आणि आवडीच्या आहेत. ट्रॅपिस्ट बीअर्स म्हणजे साधुंनी आश्रमात ब्रू केलेल्या बीअर्स. असं म्हणतात की, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रेंचांच्या la grand trappe या मठातल्या साधूंना बेल्जियममध्ये हाकलून दिलं. बेल्जियममध्ये आल्यावर त्यांनी त्यांच्या बीअर्स ब्रू करण्याची परंपरा चालूच ठेवली.
बीअर ऑर्डर करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे इथे. साधारण बॅटमॅन सारखी खूण केली (मूठ बंद करून पहिले बोट, करंगळी आणि अंगठा बाहेर काढणं) तर दुवेल (duvel) म्हणजेच डेविल बिअर येते. मूठ बंद करून करंगळी फक्त बाहेर काढली की टॅपमधून मिळणारी पिल्सनर बीअरची ऑर्डर काही न बोलता जाते. म्हणजे चुकून एखाद्या भारतीयाने टॉयलेटला जातो असं कुणाला सांगताना वेटर अथवा बार टेंडरने बघितलं तर पिल्सनर टेबलावर आलीच समजा.
आम्हाला ब-याचवेळा विचारलं जायचं की, भारतीय भाषांमध्ये cheersला काय म्हणतात. आपल्याकडे तर कोणत्याही भारतीय भाषेत असा शब्द नाहीये. ?? बोलणारे लोक cheersला कधीकधी प्रोस्ट तर कधी Gezondheid म्हणतात. Gezondheid म्हणजे चांगलं आरोग्य. मग आम्हीही सांगायला लागलो की, आम्ही ‘आरोग्य’ असं म्हणतो.
असं म्हणतात की फ्रान्सप्रमाणे बेल्जियममध्ये वाईट जेवण मिळणं अतिशय कठीण. कारण एवढ्या छोट्या देशात पाककृतीमात्र भरपूर आहेत. ठरावीक पद्धतीनं शिजवलेले शिंपले – मसल्स, स्टोफलेझ (stoofvlees) म्हणजेच बीफ आणि बीअरच्या स्ट्यूमध्ये शिजवलेला पदार्थ, वॉल-अ-वॉ (vol au vent ) म्हणजे पेस्ट्रीमध्ये चिकन भरून केलेला पदार्थ, असे अनेक पदार्थ आहेत. बेल्जियन आर्टिसनल चॉकलेट्स तर जगप्रसिद्ध आहेतच. परंतु एवढं सगळं असून बेल्जियमचा राष्ट्रीय पदार्थ मात्र फ्रेंच फ्राइज. मला नंतर समजलं की, हा फ्रेंच पदार्थ नसून मुळात बेल्जियन डिश आहे आणि फ्रेंचिंग म्हणजे बटाटे कापण्याची पद्धत.

अशीच आणखी एक विनोदी गोष्ट म्हणजे बेल्जियमनं अमलात आणलेले २.५ युरोचं नाणं. याची गोष्ट थोडक्यात अशी. २०१५ साली वॉटर्लूच्या लढाईला म्हणजेच नेपोलिअनच्या पराभवाला २०० वर्षं पूर्ण झाली. बहुतेकांना माहीत असेल की फ्रेंच राज्यकर्ता नेपोलिअन हा नुसता महत्त्वाकांक्षी नव्हता तर युरोपातल्या लढायांमध्ये जवळजवळ एक दशक त्याला कोणीही हरवू शकलं नव्हतं. १८८५ मध्ये वॉटर्लूच्या (आजच्या तारखेत बेल्जियम भूमीत ) लढाईत ब्रिटिश सेनापती वेलिंग्टनच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सर्वेसर्वा नेपोलिअनचा अखेर पराजय झाला. २०१५ साली या विजयाच्या स्मरणार्थ वॉटर्लू लढाईचं चिन्ह असलेले २ युरोचं नाणं बनवण्याचा प्रस्ताव बेल्जियमनेनं युरोपिअन युनियनसमोर ठेवला. परंतु आपल्या देशाच्या सगळ्यांत मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाचा उत्सव करू पाहणारा हा प्रस्ताव फ्रान्सनं अर्थातच फेटाळून टाकला. युरोपियन युनियनच्या नियमानुसार कुठलाही सदस्य देश हे कुठल्याही डिनॉमिनेशनचे (denomination ) अनियमित (म्हणजे जे बाकी युरोपीय देशांत लागू नाही ते ) चलन आपल्या देशात अमलात आणू शकतो. त्याची अट इतकीच की ते चलन/नाणं फक्त त्याच देशात वापरता येऊ शकतं आणि इतर सदस्य देशांत वापरण्याची परवानगी नाही. या नियमाला धरून २०१५ साली बेल्जियमने आपले २.५ युरोचे नाणे खरोखरच निर्माण केलं. नाण्याच्या एका बाजूवर वॉटर्लूचे स्मारक चिन्ह म्हणजेच एका प्लिंथवर उभा असलेला सिंह आहे.
बेल्जियन्स विनोदी आहेत. परंतु त्यांची अन्य रूपंही मी पहिली आहेत. कामात ते अतिशय चोख असतात. IT मध्ये मुली फार कमी असतात. परंतु ज्या व्यवसायात असतात, ते काम अतिशय चोख करतात. हल्ली टेक्नॉलॉजीमध्ये आणि IT मध्ये मुलींचे प्रमाण वाढते आहे. परंतु मार्केटिंग, एचआर, नृत्य, चित्रकला आणि इतर कला या क्षेत्रांमध्ये मुली जास्त आहेत. कुठल्याही क्षेत्रात काम करताना ‘चलता है ‘ वृत्ती इथं फार कमी आढळते. ठरल्या वेळात जास्तीत जास्त समर्थपणे आणि परिणामकारकतेनं काम करायला मी इकडे शिकले.
बेल्जियनांना अनेकविध प्रकारचे छंद असतात. माझी एक मैत्रीण आहे, लॉरा (नाव बदललं आहे). व्यवसायानं ती लॅब असिस्टंट आहे. तिचा एक आवडीचा छंद म्हणजे घोडेस्वारी. ती नुसतीच घोडेस्वारी करत नाही तर तिच्याकडे तिचा स्वतःचा घोडा आहे. आणि शिवाय ती लोकांना शिकवतेही. याशिवाय फक्त डच नाही तर फ्रेंच, इंग्लिश, जर्मन अशा भाषांचं तिला उत्तम ज्ञान आहे. तिचा मित्रपरिवार जागतिक आहे. ती शाकाहारी आहे. अशा एक-दोन कारणांमुळे काही लोकांना ती जरा वेगळी किंवा खरं सांगायचं तर त्यांच्या नेहमीच्या साच्याच्या व्याख्येत न बसणारी वाटते. ३ वर्षांपूर्वी ती तिच्याहून १९ वर्षांनी मोठ्या असणा-या पुरुषाच्या प्रेमात पडली. त्याचा प्रमुख व्यवसाय म्हणजे पिग फार्मिंग. त्याच्याकडे रोज २५०० पिलं जन्माला येतात. असतात. शिवाय त्याची थोडी शेती आहे. या व्यवसायात तो लहान वयात अडकल्यानं बाहेरच्या जगापासून थोडा दूर आहे. इथं जेव्हा सर्रास इंग्लिश बोललं जातं तेव्हा त्याला येणारी एकमेव भाषा म्हणजे डच. त्याचे मित्र अगदी २-३ मोजके आणि तेही स्थानिक. पण या दोघांची गाठ जुळण्याची काही कारणं म्हणजे लॉरा कितीही ग्लोबल नागरिक असली, तरीही ती निसर्गप्रेमी आहे आणि टिव्ही वगैरे अशा गोष्टींमध्ये ती रमत नाही. तिचा आवडता डान्स प्रकार म्हणजे साल्सा आणि इथलं लोकनृत्य. अशाच एका डान्सच्या वर्कशॉपमध्ये ते दोघं भेटले. त्यानिमित्तानं भेटत राहिले आणि तेव्हा तिलाही आपसूकच कळलं की तिच्याबरोबर आयुष्य जगणारा पार्टनर हाच आहे. फक्त जगाच्या राजकारणावर रोज गप्पा मारणारा पार्टनर तिला नको होता. तिला तिच्या बरोबरीनं निसर्गाची आणि प्राण्यांची आवड जोपासणारा, तिच्या शाकाहाराची चिकित्सा न करणारा, तिच्याबरोबर कधीतरी लोकसंगीतावर स्वच्छंद नृत्य करणारा पार्टनर हवा होता. अर्थात हे सगळं इतक सोपंही नव्हतं. तिच्या घरी समजल्यावर घरातून विरोध झाला. कारण अर्थातच घरच्यांना सामाजिक प्रतिष्ठेला साजेसा, बिझिनेस करणारा माणूस हवा होता. अशा वेळेस मात्र भारतापेक्षा युरोपात स्वतःचे निर्णय थोडे सरळपणे घेता येतात. लॉरानं सरळ तिचा निर्णय सांगितला आणि तिच्या पार्टनरबरोबर अपेक्षित आयुष्य जगायला सुरुवात केली. अशा आणि अनेक अनुभवांतून बेल्जियन्सनी मला जगरहाटी सोडून लहानलहान गोष्टींमध्ये आयुष्य दिलखुलास पद्धतीनं जगायला शिकवलंय. शेवटी आपण जिथे असतो तिथे कुतूहल बाळगून, सकारात्मक गोष्टी शोधून नव्याचा शोध घेत राहणं यापेक्षा जगण्याचा मोठा पुरावा काय असू शकतो.

हे एक व्यक्तिगत उदाहरण झालं. परंतु युरोपच्या ह्या आधुनिक, प्रागतिक विचारांमुळे युरोपीय देश हे राहण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि मॉडर्न देशाशी तुलना केली तरी काही बाबतींत अमेरिका युरोपचा हात धरू शकत नाही. तसं पहिलं तर मोजके काही देश वगळता अनेक देशांत लोकशाही राज्यव्यवस्था आहे. परंतु अनेक लोकशाही देशांत नैतिकतेचे निकष वापरून कायदे करण्यात येतात. त्यामुळे बेकायदेशीरपणा फोफावतो. नेदरलँड्स, बेल्जियम अशा देशांमध्ये मारीवना (marijuana, एक प्रकारचे नशेचे ड्रग ) सेवन ठरावीक मात्रेपर्यंत कायदेशीर आहे. त्यामुळे बेकायदेशीर तस्करी रोखली जाते. इथं वेश्याव्यवसाय काही अंशी कायदेशीर आहे. इथं सेक्स वर्कर्सकडे कायदेशीर परवाना असावा लागतो. सेक्स वर्करनं इमर्जन्सी बटण दाबल्यावर त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस येतात. वयात येणा-या मुलांची वेगवेगळ्या अल्कोहोलिक ड्रिंक्सबरोबरची ओळख त्यांचे आई-वडील स्वतःच करून देतात आणि ते सभ्यपणे कसं प्राशन करायचं हेही सांगतात. थोडक्यात काय तर निवडीचं स्वातंत्र्य आहे.
अशा आणि अनेक कारणांमुळे मला वाटतं आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहावं. अगदी राहायला जमत नसेल तर प्रवास करावा. माझा हा अखंड प्रवास माझ्यासमोर माणसांचा आणि संस्कृतींचा असा पंडोरा बॉक्स उघडावा तसा उघडतो. माझ्या घरी आलेला युरोपियन पाहुणा ज्या वेळेस फोर्क आणि स्पून बाजूला ठेऊन हातानं जेवतो, त्या वेळेस मी त्या माणसाबद्दल किती पूर्वग्रह बाळगले होते, हे मला समजतं आणि मीसुद्धा फोर्क आणि स्पून बाजूला ठेवते. ह्या प्रवासामुळे आणि शोधामुळे मला सतत समजतं की सगळीकडचे लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी अगदी सारखेच हळवे असतात. फ्रेंच लोक गोट, चीझ आणि वाइनसाठी असतील तर बेल्जियन्स बीअरसाठी. मुंबईकर पाणीपुरीसाठी असतील तर पुणेकर बाकरवडीसाठी. या प्रवासात समजतं की जशी आपली स्वप्नं असतात तशीच अनेक लोकांची विविध स्वप्नं असतात. आणि ती सर्व अगदी हृदयातून अंकुरलेली असतात. थोडक्यात काय?
जिकडं जावं तिकडं माझी भावंडं आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत… हेच खरं.
अश्विनी गावडे
इ-मेल – ashwini.gavde@gmail.com
सध्या बेल्जियम मध्ये स्थायिक आहे. सध्या GuardSquare या बेल्जियन कंपनी मध्ये इंडिया sales & relationships बघते. या व्यतिरिक्त रंगभूमी, नृत्य, लिखाणाची, प्रवासाची आवड आहे.
Superb!!!
LikeLike
हा लेख एखाद्या साहित्यीकाने लिहिला आहे असे दिसते.
LikeLike