स्थलांतराचा जगप्रवास

अमृता गंगातीरकर

अनेक वर्षांपूर्वी मी वी.एस. नायपॉल ह्या नोबेल पारितोषिकानं सन्मानित केलेल्या मूळ भारतीय वंशाच्या, त्रिनिदादमध्ये जन्मलेल्या ब्रिटिश लेखकाच्या काही पुस्तकांची पारायणं केली होती. ती पुस्तकं खूप आवडली होती म्हणून नाही तर त्या पुस्तकांमधले अनेक संदर्भ आणि घटना समजून घ्यायला त्या वेळचे माझे अनुभव फार थिटे पडत होते म्हणून. माझी आवडती लेखिका झुंपा लाहिरी किंवा जगप्रसिद्ध लेखक अमिताव घोष हे आपल्या लेखनातून नक्की काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत, हे आता मला थोडं अधिक उमजत गेलंय. एखाद्या घटनेचा अर्थ लावताना आपण तिच्याकडे आपल्या अनुभवांच्या चष्म्यानं बघतो.

जागतिक पातळीवर घडलेल्या कोणत्याही महत्त्वपूर्ण घटनेचं विश्लेषण करताना आपण सहसा चूक की बरोबर, काळे की पांढरे अशी एक ढोबळ विभागणी करतो. काळ्या आणि पांढऱ्या यांमधल्या ग्रे एरियाचा विचार आपण कधी अनवधानानं तर कधी मुद्दाम टाळतो. पण खरंतर जगाचा इतिहास हा केवळ एका चष्म्यातून बघितला जाऊ शकत नाही. तो अनेक अंगांनी अभ्यासावा लागतो. जगाच्या एका कोपऱ्यातल्या व्यक्तींसाठी घडलेली एखादी चांगली घटना त्याच जगाच्या दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या माणसाचं आयुष्य बदलायला कारणीभूत तर ठरली नाही ना? एखाद्या समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यामुळे दुसऱ्या समाजाचं स्वातंत्र्य धोक्यात तर आलं नाही ना? असे अस्वस्थ करणारे प्रश्न टाळून आपण स्थलांतराचा इतिहास लिहू किंवा समजून घेऊ शकत नाही. हा इतिहास एकसुरी किंवा एकपदरी नाही. त्याला अनेक अर्थ आहेत आणि आपण घातलेल्या चष्म्यानुसार ते बदलताहेत, जत्रेत मिळणाऱ्या कलाइडोस्कोपसारखे. त्याला जसं-जसं फिरवत जाऊ, तसतसं नवनवं रूप घेणाऱ्या कचकड्यांच्या रंगीबेरंगी तुकड्यांसारखे.

migrant-crisis

मला नेहमी असे वाटतं की, आपल्या मातृभूमीला सोडून नव्या जगात, नव्या लोकांसोबत आपलं नशीब आजमावण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या सगळ्या प्रवासी भारतीयांमध्ये एक जास्तीचा मेंदू तर नाही ना? जो त्यांना हे नवं पाणी चाखून बघायला भाग पाडत असावा. तसं नसेल तर आपल्या प्रियजनांना, आपल्या मातृभाषेला सोडून अज्ञाताच्या शोधात कोण भटकेल? स्थलांतराची कारणं ही नेहमीच सारखी नसली, तरी एक समान सूत्र त्यात जाणवतं. ते म्हणजे आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या आयुष्याची आस. ह्या आशेपायी नवीन संधींच्या शोधात निघालेल्या अनेक भारतीयांच्या जगभ्रमणाचा अनेक पिढ्यांचा इतिहास जगाच्या इतिहासाच्या पानात लिहिला गेलाय. चांगला आणि वाईट अशा दोन्ही रूपांत.

२०१२-१३ साली मी मुंबईत एका माहितीपट मालिकेवर काम करत होते. विषय माझ्यासाठी अगदी नवीन आणि लक्षवेधी होता, तो म्हणजे इंडियन डायास्पोरा म्हणजे प्रवासी भारतीयांच्या स्थलांतराच्या इतिहासाचं आणि त्यांच्या आजच्या काळातल्या जीवनाचं चित्रीकरण करणं. भारतीयांच्या युगानुयुगं घडत आलेल्या स्थलांतराच्या बऱ्या-वाईट गोष्टींचं संकलन करून माहितीपट स्वरूपात त्यांचं सादरीकरण करणं हा ह्या मालिकेचा एक महत्त्वाचा उद्देश होता. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यानं पुरस्कृत केलेल्या ह्या माहितीपटांद्वारे भारताच्या एका वेगळ्या इतिहासाची नोंद करायची संधी आम्हांला मिळाली होती.

परराष्ट्र खात्याकडून आमच्या मालिकेला हिरवा कंदील मिळाल्यावर आमचा अभ्यास जोरात सुरू झाला. अनेक जुने संदर्भ तपासून, इंटरनेटवरचे अनेक किस्से-कहाण्या वाचून झाल्यावर आमच्या टीमनं तेरा देशांची निवड केली आणि हे सर्व देश मिळून एकूण आठ माहितीपट बनवायचं नक्की केलं. त्यात ह्या देशातून भारतात आपलं मूळ शोधायला येणाऱ्या लोकांवरच्या अशा दोन माहितीपटांची भर पडली. प्रत्येक देशातल्या स्थलांतरांची कारणं वेगळी, परिस्थिती वेगळी आणि भारतीयांची मानसिकताही वेगळी. ह्या मालिकेवर काम करणारी आमची टीमसुद्धा अगदी वेगळी. देशाच्या कानाकोपऱ्यांतून मुंबईत आलेल्या आम्हां सर्वांचीच स्थलांतराची गोष्टच वेगळी होती. काहीशी ह्या माहितीपटांतल्या पात्रांसारखीच, पण त्यांच्याएवढी नाट्यपूर्ण मात्र नाही. भारताबाहेर गेलेल्या प्रवासी भारतीयांची गोष्ट सांगण्याआधी आमच्या आगळ्यावेगळ्या टीमची गोष्ट वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल. किंबहुना आम्ही बनवलेल्या माहितीपटांबद्दल एक वेगळी दृष्टी देऊन जाईल असं मला वाटतं.

Old-sikh-man-carrying-wife1947

 

अनेक वर्षांपूर्वी गोव्याहून दक्षिण मुंबईत स्थलांतरित झालेल्या लोबो कुटुंबातली रुथ आणि कोलकात्याहून एनआयडीच्या वाटे मुंबईत दाखल झालेला ओनीर ह्यांनी सिंगापूर आणि मलेशिया इथल्या भारतीयांची गोष्ट सांगायची जबाबदारी उचलली. डेहराडूनमध्ये शिकलेली, फाळणीनंतर भारतात आलेल्या पंजाबी कुटुंबातली भावना आणि तिच्यासारख्याच पाकिस्तानमधून निर्वासित होऊन भारतात येऊन उल्हासनगरला आपलं घर मानलेल्या एका भल्या मोठ्या सिंधी कुटुंबातली पूजा ह्यांनी कॅनडाच्या भारतीय शिखांच्या स्थलांतराची गोष्ट सांगायचं ठरवलं. केरळच्या एका छोट्या गावातून मुंबईत आलेल्या सिरीयन ख्रिश्चन कुटुंबातल्या प्रियानं इंग्लंड, अमेरिका आणि करीबिअन बेटांवरच्या भारतीयांची कहाणी चित्रित करायचं ठरवलं आणि त्यात तिला साथ दिली अदितीनं जी अहमदाबादच्या एका गुजराती कुटुंबातून मुंबईत नुकतीच स्थलांतरित झाली होती. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या अनेक पंडित कुटुंबांपैकी एका कुटुंबातला नवीन हा मॉरिशस आणि रियुनियन आयलंडमधल्या भारतीयांच्या गोष्टी सांगायला सरसावला. महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरातून कामासाठी मुंबईत स्थिरावलेल्या मला आणि तमिळनाडूतल्या इरोडमध्ये एक छोटेखानी उपहारगृह चालवणाऱ्या कुटुंबातून मुंबई फिल्म इंडस्ट्रीची स्वप्नं पाहत थेट मुंबई गाठलेल्या धनाला आखाती देशातल्या भारतीयांची जबाबदारी सोपवण्यात आली. आपापल्या शहरांतून पोटापाण्यासाठी मुंबईत विसावलेल्या आम्हां सर्वांची कथा वेगळी आणि व्यथाही. पण आम्ही सगळे एकाच धाग्यानं बांधले गेलो होतो, तो म्हणजे आमच्यासारखीच स्वप्नं घेऊन, आपलं चंबूगबाळं पाठीवर बांधून जगाच्या प्रवासाला निघालेली आपली माणसं.

भारतात राहणारे नागरिक भारताबाहेरच्या आपल्या बांधवांच्या जीवनाबद्दल किती जागरूक असतात असं तुम्हांला वाटतं? मला विचाराल तर फारसं नाही. आपला एखादा काका, मामा, मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी देशाबाहेर गेल्याशिवाय आपण ह्या प्रवासी भारतीयांबद्दल फारसं स्वारस्य दाखवत नाही. त्यांच्या परदेशातल्या जीवनाबद्दल खऱ्याखोट्या अनेक कथा आपण ऐकत आणि पसरवत असतो. ही आजची कथा झाली, तेव्हा शेकडो वर्षांपूर्वी व्यापारासाठी देशाबाहेर पडलेल्या किंवा उसाच्या शेतात काम करण्यासाठी गुलाम म्हणून विकत गेलेल्या भारतीयांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? मला तरी नव्हती. ह्या सर्व भारतीयांच्या प्रवासकथा ऐकून आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून मला आपल्या बंदिस्त, ठराविक जगण्याची फारच कीव आली. आपण काही जगलोच नाहीये आणि काहीच जग पाहिलं नाहीये असं राहूनराहून वाटून गेलं.

मॉरिशसच्या उसाच्या शेतात कामासाठी गुलाम म्हणून नेलेले, गिरमित्या म्हणवले गेलेले बिहारी कामगार म्हणा किंवा व्यापार-उदिमासाठी भारतातली उंची वस्त्रं, मसाल्याचे पदार्थ आणि इतर गोष्टी घेऊन मध्य-पूर्वेच्या मार्गानं युरोप गाठलेले भारतीय व्यापारी घ्या, बहुतेक वेळा स्थलांतराचं कारण हे अर्थकारणाशी निगडित असतं. कधीकधी ती निव्वळ आपलं आणि आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची लढाईसुद्धा असते. तर कधी हे स्थलांतर होतं नवीन संधीच्या शोधात, मग त्या रोजगाराच्या असू देत किंवा जगण्याच्या. साता समुद्रापलीकडे दिसणाऱ्या क्षितिजाच्याही पलीकडच्या बाजूला नक्की काय आहे, हे जाणून घ्यायच्या कुतूहलापोटीही असतं. कधी आपण स्वीकारलेल्या कर्मभूमीत बस्तान बसवता-बसवता ते उद्ध्वस्तही केलं जात. मग ह्या निर्वासितांना अजून एखाद्या देशाचा आधार घ्यावा लागतो. मग त्यांना म्हटलं जातं twice banished किंवा twice migrated. कारण काहीही असो स्थलांतरितांच्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नेहमीच भुरळ घालतात हे नक्की.

तर अशा शतकानुशतकांची बरी-वाईट परंपरा असलेल्या भारतीय स्थलांतराच्या गोष्टींनी आम्हांला नक्कीच वेड लावलं होतं. कधीही न पाहिलेल्या आणि जगलेल्या अशा अनेक नवीन अनुभवांना आम्ही सामोरं जात होतो. आमची टीम त्यातल्या सदस्यांच्या पार्श्वभूमीमुळे जितकी वेगळी होती तितकीच एकरूपता ह्या नव्या अनुभवांनी आम्हांला दिली होती. आम्हां सर्वांना ह्या नव्या भेटलेल्या भारतीयांनी एका समान प्रतलावर आणून ठेवलं होतं. इथं आम्ही सगळेच त्या चेहरा नसलेल्या भारतीयांना शोधात होतो. त्यांच्या गोष्टी वाचत होतो. त्यांना जाणून घायचा प्रयत्न करत होतो. रोज सापडणाऱ्या नवनवीन गोष्टी आणि अनुभव आम्ही सतत एकमेकांबरोबर वाटून घेत असू. टीमचा प्रत्येक सदस्य ह्या गोष्टींचा अर्थ आपल्या परीनं लावायचा प्रयत्न करीत होता. एकमेकांशी चर्चा करताना आपण कल्पनाही करणार नाही, अशा अनेक अनुभवांना आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. कधीकधी आपल्या स्वतःच्या जाणीवनेणिवेच्या पलीकडच्या घटनांचं अर्थ लावणं किती अवघड असतं हे आम्हांला अगदी जाणवत होतं.

 

स्थलांतराविषयी बोलत असताना धर्मप्रसार ह्या विषयावर न बोलून कसं चालेल? स्थलांतरातून झालेला धर्मप्रसार, दुसऱ्याच्या प्रदेशावर आधिपत्य गाजवताना बळजबरीनं केलेलं धर्मांतर किंवा खास स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी केलेलं स्थलांतर आणि स्थलांतरानंतर दुसऱ्या धर्माचा केलेला स्वीकार ह्या सर्वांचा इतिहास पाहिला, तर मानवी इतिहासाच्या एका वेगळ्याच दालनात आपण प्रवेश करू. काय योग्य आणि काय अयोग्य ह्यापलीकडे जाऊन जर आपण ह्या इतिहासाचं निरीक्षण केलं तर धर्म आणि संस्कृती ह्यांमधली पुसट रेषाही नष्ट होते. भारतीयांनी हिंदू आणि बौद्ध धर्म पूर्वेकडे पोचवले. इस्लामही अरबस्तानातून भारतामार्गे पूर्वेकडे गेला. इस्लाम धर्म मानणारे पण सांस्कृतिकदृष्ट्या रामायणाला आपलं मानून त्याचं जतन व संवर्धन करणारे मलेशियन व इंडोनेशियन लोक सांस्कृतिक देवाण-घेवाणीचं जिवंत प्रतीक तर नाहीत ना?

आजच्या घडीला आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यांत मूळ भारतीय वंशाचे अनेक नागरिक वसलेले दिसतात. पण त्या सर्वांचाच इतिहास सुखद नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतली गुलामगिरी संपुष्टात आल्यामुळे ब्रिटिशांनी बिहारमधून अक्षरशः कवडीमोलानं विकत घेतलेल्या, प्रसंगी अपहरण करून मॉरिशस किंवा फिजीमधल्या शेतीवर राबवलेल्या मजुरांनी तिथंच आपलं बस्तान बसवलं. १९१४ साली ब्रिटिश इंडियाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी कॅनडाच्या दिशेनं निघालेल्या कोमागाता मारू नावाच्या जहाजावरच्या भारतीयांना कॅनडानं प्रवेश नाकारला आणि त्यांना परत फिरावं लागलं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सिंगापूरमध्ये ब्रिटिशांच्या तळ उभारणीच्या काळात हजारो भारतीय कैदी गुलाम म्हणून कामाला जुंपले गेले. तर १९७२ साली इदी अमीन नावाच्या युगांडातील हुकुमशहानं ब्रिटिशकाळात युगांडात आलेल्या आणि आता आफ्रिकेलाच आपली कर्मभूमी मानणाऱ्या हजारो भारतीयांना अगदी नेसत्या कपड्यानिशी हाकलून लावलं. युरोपियनांनी भारतीयांकडे एक ह्युमन रिसोर्स म्हणूनच पहिलं आणि आपल्या गरजेप्रमाणे त्या रिसोर्सचं स्थलांतर आपल्या इतर वसाहतींमध्ये केलं. भारतीयांचं हे स्थलांतर ही ब्रिटिशांच्या वसाहतवादाची आपण चुकवलेली किंमत तर नाही ना? शाळेत वाचलेल्या इतिहासात कोणाच्या इतिहासाला स्थान आहे आणि कुणाला नाही ह्याचा अंदाज लावायला कुणा इतिहासकाराची नक्कीच गरज नाही. तेव्हा स्थलांतराविषयी बोलताना ह्या अनोळखी इतिहासाची जाणीव आम्हांला पदोपदी ठेवावी लागत होती.

आम्ही काम करत असलेल्या माहितीपटांपैकी मध्य-पूर्वेच्या माहितीपटाची जबाबदारी मी माझ्या डोक्यावर घेतली होती आणि त्यामुळे ह्या अनुभवांविषयी मी जरा विस्तारानं बोलू शकते. दंतकथांचा भाग बनलेल्या इराण, इराक आणि सौदी अरेबिया यांसारख्या अतिशय लक्षवेधी देशांना भेट देण्यासाठी मी उतावीळ झाले होते. पण ह्या देशातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता मला तिथं न जाण्याचे फुकटचे सल्ले मात्र भरपूर मिळाले. खरंखोटं कुणास ठाऊक. शेवटी हो-नाही करता-करता आम्ही संयुक्त अरब अमिराती आणि ओमान ह्या दोन देशांची निवड केली. आम्ही लाख निवड करू पण ह्या दोन देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांनी मात्र आम्हांला चांगलंच रडवलं. एरवी शाहरुख खान आणि अक्षय कुमार ह्यांसारख्या सुपर स्टार्सच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी पायघड्या अंथरणारे हे दोन देश, माहितीपटाच्या नावानं फारच अस्वस्थ झाले. लोकशाहीत जन्माला आलेल्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल नेहमी भाषणबाजी करणाऱ्या आमच्यासारख्यांसाठी आखाती देशांतल्या हुकूमशाहीची ही पहिली झलक होती. शेवटी अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर, हजारो फोन कॉल्स आणि शेकडो इमेल्सनंतर, तब्बल एका वर्षानं ह्या दोन देशांनी आम्हांला शूटिंगची परवानगी दिली आणि सुटकेचा निश्वास टाकतच आम्ही पुढली तयारी सुरु केली. आमच्या शूटिंगमध्ये फारसे अडथळे आले नाहीत पण कॅमेऱ्यासमोर अत्यंत सावधपणे बोलणारे आणि दर दुसऱ्या वाक्यानंतर आपल्या अन्नदात्या शेख आणि सुलतानांचा उदोउदो करणारे भारतीय पाहून परवानगी मिळण्यास एवढा वेळ का लागला असावा, ह्याचा अंदाज आम्हांला आला.

th

ह्या माहितीपटांसाठी संशोधन सुरू केल्यापासूनच भारताच्या प्राचीन आणि अर्वाचीन व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे अनेक पुरावे आम्हांला सापडले. कराचीहून व्यापारासाठी आखाती देशांमध्ये स्थलांतरित झालेले, समुद्रात पर्ल डायविंगमधून मिळालेल्या मोत्यांचा व्यापार करणारे सिंधी व्यापारी आणि गुजरातमधल्या मांडवीच्या किनाऱ्यावरून अरबांसोबत व्यापारासाठी निघालेले कच्छी बनिया व्यापारी ह्यांच्या तिसऱ्या किंवा चौथ्या पिढ्यांतल्या अनेक व्यापाऱ्यांना मी भेटले. आपल्या मातृभूमीबद्दलचे प्रेम आणि कर्मभूमीविषयीची कृतज्ञता अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. असं म्हणतात की, माणूस आपलं खाणपिणं जेव्हा बदलतो, तेव्हा तो खऱ्या अर्थानं बदलला असं समजावं. अरबी भाषा अस्खलित बोलणाऱ्या आणि त्यांचेच कपडे घालणाऱ्या पण अनेक शतकांपासून भारताबाहेर राहूनही भारतीय खाण्याशिवाय जगू न शकणाऱ्या व्यापारी मंडळींकडे बघून त्याची प्रचिती आली हेच खरे. हा विरोधाभास जरी असला, तरी तो नीट समजून घेण्यासाठी ह्या व्यापाऱ्यांच्या गृहिणी-सखी-सचिवाकडे लक्ष वळवावं लागेल.

स्थलांतराच्या इतिहासाची नोंद करताना दुर्लक्षिलेली बाब म्हणजे स्त्रियांचं त्यातलं स्थान आणि योगदान. मध्य पूर्वेत व्यापारासाठी नवनवीन प्रदेशांत भटकत असताना ह्या व्यापाऱ्यांच्या बायका काय करत होत्या ह्याची नोंद मला तरी सापडली नाही. त्यामुळे काही दुर्मीळ अपवाद वगळता मला ह्या गोष्टी चित्रित करण्यात अपयश आलं हेच खरं. गेल्या दोन शतकांपासून मस्कतला आपलं घर मानणाऱ्या खिमजी कुटुंबियांच्या घरी, कल्पना आजींच्या छोट्याशा मुलाखतीवर मला समाधान मानावं लागलं खरं, पण त्या छोट्या संभाषणातून का होईना पण मला त्या काळच्या स्त्रियांच्या आयुष्याबद्दल काही पुरावे मिळाले हे नक्की.

कनकसी खिमजींच्या पत्नी, कल्पना खिमजी लग्न होऊन गुजरातहून मस्कतला आल्या तेव्हा आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. आपला नवरा जिथं नेईल तिथं गुपचूप जाऊन आपला संसार थाटायचा एवढंच त्यांना शिकवलं होतं आणि त्यांच्या मते ते पुरेसं होतं. वाळवंटात पाऊल टाकल्यावर त्यांना काय वाटलं, असा प्रश्ना विचारला असता त्यांचे डोळे जरासे पाणावले. बोलायच्या ओघात त्यांनी मला त्यांच्या सासूबाईंचा एक किस्सा ऐकवला. त्यांच्या सासूबाईंच्या काळात भारतीय भाज्या मस्कतमध्ये सहजासहजी मिळत नव्हत्या. पूर्णपणे शाकाहारी असलेल्या खिमजी कुटुंबाला फक्त वरण खाऊन आला दिवस ढकलावा लागायचा. अशा वेळी भूक तर भागायची पण मनाचं समाधान नक्कीच व्हायचं नाही. तेव्हा त्या अशिक्षित पण हुशार बाईनं एक शक्कल लढवली. डाळ शिजल्यावर ती त्यात बारीकबारीक दगड टाकत असे. खाताना तोंडात आलेले ते दगड चावूनचावून त्यांना भाजी खाल्ल्याचं समाधान द्यायचे. अशा काय काय क्लृप्त्या लढवून भारतीय बायकांनी आपल्या नवऱ्याना खंबीर साथ दिली आणि जग पादाक्रांत करण्याचे बळ दिलं ह्याची कुठं नोंद असती, तर ते वाचायला काय मजा आली असती!

जगाच्या इतिहासात आणखी एका घटनेनं जबरदस्त वादळ उठवलं ते म्हणजे मध्य पूर्वेतल्या वाळवंटात सापडलेले तेल. ह्या तेलानं मध्य-पूर्वेतल्या देशांना संपन्न तर केलंच पण भारतातल्या अनेक डॉक्टर-इंजिनियरपासून ते कामगार-नर्सेसना उत्पन्नाचं साधनही मिळवून दिलं. १९६०नंतर आखाती देशांत स्थलांतरित झालेल्या भारतीयांचं त्या-त्या देशातलं योगदान हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अगदी अल्प काळात आखाती देशांची झालेली भरभराट आणि तिथल्या पायाभूत सुविधांचा झालेला विकास ह्यांमागे ज्या लाखो भारतीय लोकसंख्येचा मोलाचा वाटा आहे त्यांना भेटल्या- बोलल्याशिवाय हा माहितीपट बनवणं अशक्य होतं. ह्या लोकसंख्येपैकी अनेक कामगारांच्या आणि नर्सेसच्या दुर्दैवी कहाण्या आपल्या माहितीपटामध्ये सामावून घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण ह्या गोष्टींचा पाठपुरावा करणं म्हणजे स्थलांतराच्या इतिहासातल्या नकोशा वर्मावर बोट ठेवण्यासारखं आहे, ह्याची मला पदोपदी जाणीव करून दिली गेली. ह्या गोष्टींचा समावेश माहितीपटामध्ये होऊ शकला नाही हे वेगळं सांगायला नकोच. तसं का? हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारणं गरजेचं आहे.

इतिहास हा नेहेमी व्यक्तिनिष्ठ आणि समाजनिष्ठ असतो हेच खरं. तो कुणी, कधी आणि कुणासाठी लिहिला आहे, ह्यावरून त्याचा स्वीकार करायचा की नाही हे ठरतं. ह्या इतिहासातून अनेक घटना गाळल्या जातात किंवा बदलल्या जातात, कारण कोणत्याही समाजाला स्वतःच्या अस्मितेसाठी आपलाच इतिहास पुन्हापुन्हा लिहिणं भाग असतं. भारताच्या इतिहासातल्या अशा अनेक ज्ञात- अज्ञात घटनांचं दस्तऐवजीकरण करण्याचं काम आमच्या मालिकेनं केलं. ते करत असताना अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटनांचा ओझरता उल्लेख करण्यात आम्ही यशस्वी झालो. पूर्णपणे सत्य पचवण्यास व निर्भीडपणे ते लोकांपुढे आणण्यास तयार असलेल्या कुणालाही ह्या मालिकेमधून प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.

ह्या माहितीपटासाठी केलेल्या संशोधनामधून एक गोष्ट मला अगदी नक्की जाणवली ती ही, की शेकडो वर्षांपूर्वी व्यापार-उदिमासाठी आपलं घरदार सोडून जगप्रवासाला निघालेल्या भारतीय व्यापाऱ्यापासून ते आजच्या काळातल्या अमेरिकास्थित आयटी इंजिनियरपर्यंत सगळ्या स्थलांतरांच्या गोष्टींत एक साम्य आहे. ते म्हणजे नावीन्याची ओढ, अधिक चांगल्या जीवनाचा ध्यास आणि कष्ट करायची ताकद आणि इच्छाशक्ती. ह्या गुणांच्या जोरावरच भारतीय प्रवासी आज यशस्वीरीत्या नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहेत आणि ह्यापुढेही करतील ह्याबद्दल तिळमात्रही शंका नाही.

अमृता गंगातीरकर

20247763_10155083171947862_4238233782514016666_o

रिसर्चर आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर. अनेक वर्षं मुंबईत काम केल्यानंतर काही काळ पुण्याच्या सिम्बायोसिस इन्स्टीट्यूट ऑफ डिझाइनमध्ये नॉन-फिक्शन फिल्ममेकिंग शिकवलं. सध्या नाशिकला, मूळ गावी स्थायिक असून फ्री-लान्स लेखनाचं व संशोधनाचं काम करते.

कधीमधी ब्लॉगवर पोस्ट करते. https://storiesbyamu.wordpress.com/

फोटो- अमृता गंगातीरकर, विकिपीडिया आणि फ्लिकर    व्हिडिओ – इंडियन डिप्लोमसीचे यू ट्युब चॅनल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s