प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला

तेजल राऊत

गेल्या जवळपास चार वर्षांपासून जर्मनी ही आमची, म्हणजे माझ्या नवऱ्याची आणि माझी कर्मभूमी आहे. ह्या चार वर्षांचा प्रवास तर रंजक आहेच पण त्याचबरोबर जर्मनीला जाण्याचा प्रवासही गंमतीशीर आहे. कारण तो म्हणावा तसा ´प्लॅन्ड´ नाहीये.

मी मुंबईची. २००६ ते २००८ दरम्यान मुंबईतल्या वेलिंगकर कॉलेजमधून मी MBA केलं. MBA संपायच्या ६ महिने आधी, म्हणजे डिसेंबर २००७ मध्ये कॅम्पस प्लेसमेंट्स सुरू झाल्या आणि आम्हां काही जणांची निवड IBM मध्ये झाली. निवड करतानाच कंपनीनं ‘तुम्हांला जर्मन प्रोजेक्ट्सवर टाकणार आहोत’ असं जाहीर करत जॉइन करण्याच्या आधी, जर्मन भाषेच्या ३ लेव्हल्सपर्यंत शिकून येण्याची अट ठेवली. कॉलेजनं कंपनीची ही अट मान्य केली आणि जून २००८ पर्यंत आमची B1 झाली. ह्या लेव्हलपर्यंत जर्मन भाषा बऱ्यापैकी समजू शकते, बोलता येऊ शकते. आम्ही IBM जॉइन करण्यास सज्ज होतो. पण, २००८ साली जागतिक मंदी आली. मंदीची झळ आयटी कंपन्यांना सर्वांत आधी आणि सर्वांत जास्त सोसावी लागते. २००८ मध्ये नेमकं तेच झालं. आमच्या नोक-या गेल्या नाहीत, पण ज्या जर्मन प्रोजेक्ट्ससाठी आम्हांला कंपनीनं जर्मन शिकून या, म्हणून सांगितलं होतं, ते रद्द झाले. त्यामुळे ना जर्मनीला जाणं झालं, ना जर्मन बोलणं झालं.

पण तोवर मी जर्मन भाषेच्या प्रेमात पडले होते. अनेक जणांना मी जेव्हा हे सांगते, तेव्हा गंमत वाटते कारण जर्मन भाषा ऐकायला, बोलायला त्यांना हार्श वाटते. पण मला ती भाषा, शब्द, त्यांचे उच्चार खूपच भावले. शाळेत मी ३ वर्ष संस्कृत शिकले होते. संस्कृत येत असेल तर जर्मन शिकायला सोपी कारण दोन भाषांत काही साम्य आहे म्हणतात. उदाहरणार्थ संस्कृतमधला भ्रातृ म्हणजे भाऊ आणि जर्मनीमधील ब्रुडर (Bruder) तोच. तसाच मातृ आणि मुटर (Mutter). ह्याबाबतीत मला सखोल माहिती नाही, पण मला जर्मन आवडली हे मात्र नक्की. त्यामुळे जर्मनीला जाणं झालं नाही तरीही चालेल, पण मला जर्मन बोलायचं होतं. कुठलीही परदेशी भाषा जर तुम्ही फार काळ बोलला नाहीत आणि त्यातही जर तुम्ही फक्त बेसिक लेव्हल्स शिकला असाल, तर तुम्ही ती हळूहळू विसरू लागता. IBM जॉइन करून दीड वर्ष होत आलं, पण जर्मन प्रोजेक्ट्सचा पत्ता नव्हता. शेवटी मनात विचार आला की जर्मन प्रोजेक्ट्स नाहीत म्हणून मला जर्मन शिकता येणार नाही असं थोडंच आहे? आणि दीड वर्षांच्या ब्रेकनंतर मी वीकएंडचे (कारण नोकरी होती) जर्मन क्लासेस जॉइन केले. २००९ च्या दिवाळीत सुरुवात करून २०१२ फेब्रुवारीला माझ्या B2, बिझनेस डिप्लोमा आणि C1 पूर्ण झाल्या आणि मी C2 शिकायला सुरुवात केली. भाषा शिकणं म्हणजे नुसती लिपी शिकणं नाही तर त्याचबरोबर एखाद्या देशाची संस्कृती, इतिहास आणि बऱ्याच गोष्टींची माहिती होते. त्यामुळे ओघानं मी जर्मन भाषेच्याच नव्हे तर जर्मनीच्या प्रेमातही पडले.

11737939_10152931535821472_5979429989122283852_nत्याच दरम्यान आमच्या लग्नाच्या गोष्टी चालू होत्या. होणारा नवरा बंगलुरूमध्ये होता आणि मी मुंबईत. मला बंगलुरूमध्ये जॉब मिळाला आणि C2 अर्धवट राहिली, ज्याची खंत आजही आहे. बंगलुरूमधली रॉबर्ट बॉश ही कंपनी जर्मन आहे आणि प्रामुख्यानं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असली, तरीही तिची एक आयटी विंगदेखील आहे. मी तिथं जॉइन झाले. जर्मन येत असल्यामुळे, जर्मन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली आणि माझ्या जर्मनीच्या फेऱ्या सुरू झाल्या.

माझा नवरा आणि मी, दोघंही SAP टेक्नॉलॉजीमध्ये आहोत. त्यामुळे दोघांच्याही पायाला भिंगरी. त्याचं अमेरिका, स्वीडन आणि माझं जर्मनी. आम्हांला एकत्र वेळच मिळेना. सहा-सहा महिने वेगवेगळ्या देशांत राहून शेवटी ‘तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय’ अशी परिस्थिती उद्भवली तर? अशी भीती वाटायला लागली. अर्थात ‘प्रवास करणार नाही’ असं सांगून चालत नाही कारण कन्सल्टिंग कंपनीचा पहिला नियम म्हणजे ‘जिथं क्लायंट तिथं प्रोजेक्ट आणि तिथं तुम्ही’. करीयर आम्हां दोघांसाठी महत्त्वाचं. मग काय करायचं? जर्मनीतल्या फेऱ्यांमुळे मला तिथली आयटी कन्सल्टिंगची पद्धत कळली होती. म्हणजे तुम्ही जर्मनीतल्या आयटी कन्सल्टिंग कंपनीत काम करत असलात तर तुमचा प्रोजेक्ट अख्ख्या जर्मनीभर किंवा अगदी युरोपात कुठंही असू शकतो. पण युरोप खंडातले बहुतेक देश जवळजवळ असल्यामुळे प्रोजेक्ट अगदी दुसऱ्या देशात असला तरीही तिथं विमानानं पोचायला दोनेक तास लागतात. त्यामुळे सोमवारी सकाळी घरून निघायचं ते तुमच्या प्रोजेक्टच्या स्थळी जायचं, तिथंच ३ रात्री राहायचं कारण रोजचा प्रवास शक्य नाही आणि गुरुवारी रात्री परत. शुक्रवारी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम आणि शनिवार, रविवार सुटी. आयटी कन्सल्टिंगमध्ये हे रुटीन आयुष्य आहे. त्यामुळे अगदी रोज घरी येता आलं नाही, तरीही कामामुळे ६-६ महिने एकमेकांना न भेटणाऱ्या आम्हांला निदान दर वीकएंड एकमेकांसोबत घालवता येईल म्हणून हा पर्याय बराच बरा वाटला आणि आम्ही जर्मनीत आलो.

ते म्हणतात ना, ‘the dots get connected’. माझं तसंच काहीसं झालं. SAP चा जन्म जर्मनीतला. त्यामुळे SAP जॉब्ससाठी इथं भलं मोठं मार्केट आहे. त्यातून जर तुम्हांला जर्मन भाषा येत असेल, तर जॉब मिळण्यासाठी ते एक हमखास कॉम्बिनेशन आहे. २००८ मध्ये जर्मन शिकायला झालेली सुरुवात, त्यानंतर निवळ त्या भाषेची आवड म्हणून ती शिकणं हे ठिपके २०१३ मध्ये जोडले गेले आणि आम्ही इथं स्थलांतरित झालो.

आधीही जर्मनीला येणं-जाणं चालू होतं, पण आम्ही स्थलांतरित झालो ते २०१३ साली आणि आमच्या वास्तव्याचं पहिलं शहर म्हणजे Friedrichshafen (फ्रिडरिक्सहाफन). जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड ह्या तिन्ही देशांच्या सीमेवर स्थित हे शहर, बोडनसे (Bodensee) नावाच्या युरोपमधल्या सर्वांत मोठ्या नैसर्गिक तलावाच्या काठी वसलेलं आहे. आमच्या घरापासून १० मिनिटं पायी अंतरावर हा तलाव होता. तलावाच्या काठी उभं राहिलं की एखाद्या स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी पलीकडले आल्प्स पर्वत ठळक दिसायचे. निसर्गानं ह्या शहराला भरभरून दिलंय. त्या तलावाकाठी अगदी रोज गेलं तरी मन आणि डोळे भरायचेच नाहीत. इतक्या सुंदर शहराच्या प्रेमात कोण पडणार नाही? ते एक पर्यटनस्थळ आहे आणि तिथं माझा पहिला प्रोजेक्ट होता. मन आनंदानं आणि उत्साहानं भरून गेलं होतं. सुरुवातीचा एक महिना मी एकटीच होते, नवरा नंतर आला. अगदी दोन दिवसांतच मी तिथं सरावले.

Friendrichshafen
फ्रिडरिक्सहाफन

तिथलाच एक मजेशीर प्रसंग. आम्ही दोघंही अस्सल खवय्ये. आमच्या मते भारतीय जेवणाची दुसऱ्या कुठल्याही cuisine ला सर नाही आणि जर्मन जेवणात तर आम्हांला अजिबात (आणि तसाही) रस नाही. तिथं मित्रमंडळ नसल्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांचं सोशल सर्कल होतो. त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकघरात मस्त बेत जमायचे. असं तीन महिने चाललं आणि नवऱ्याला फ्रांकफर्टमध्ये प्रोजेक्ट मिळाला. साधारण पाच तासांचा ट्रेनप्रवास. त्यामुळे तो सोमवार ते गुरुवार तिथंच एका हॉटेलमध्ये राहणार होता आणि शुक्रवारी रात्री घरी परतणार होता. आठवडाभर फोनवर आमच्या गप्पा. गप्पा नव्हे गायन आणि त्यात फक्त ‘हे जेवण माझ्या गळी उतरत नाही’ हा एकच तक्रारीचा सूर. त्यामुळे शुक्रवारी त्याच्यासाठी खास बेत करायचा असं ठरवलं. तो केरळचा आहे त्यामुळे मत्स्यप्रेमी. अर्थात पापलेट, सुरमई यांसारखे मासे तिथं मिळत नाही. पण आम्हांला तिथं पर्यायी आणि अत्यंत रुचकर असा salmon (उच्चार सामन असा, ल-चा उच्चार म्हणे करायचा नसतो, आणि खाताना तर आम्ही कसलाही उच्चार करत नसतो) मासा सापडला. आणि त्याला आम्ही भारतीय रंगात आणि मसाल्यात बुडवला. Overnight मॅरिनेशन तर अति उत्तम. त्याला साधारण दोन तास 150 C ओव्हन मध्ये बेक केलं की अवधूत गुप्ते म्हणतो तसा ´चाबूक´लागतो.

तर त्या शुक्रवारी नवरा परतण्याच्या वेळेच्या अंदाजानं मी सामनला त्याच्या सामानासकट ओव्हनमध्ये ढकलला. दीड तास झाला आणि नवऱ्यानं दारावरची बेल दाबली. मी लगबगीनं दार उघडलं आणि त्याला आठवड्यानंतर बघून आनंदानं मिठी मारली. माझ्यापेक्षा तो सव्वा फुटानं उंच आहे. त्यामुळे त्याला मिठी मारताना मला टाचा उंच कराव्या लागतात. तश्या मी उंच केल्या आणि घराची लक्ष्मणरेषा ओलांडली. नकळत माझा पाय दारातून निघाला. आणि मला हर्षोल्हास आणि hydraulic door closure दोघंही नडले. दार धपकन बंद झालं. तो त्याची किल्लीसुद्धा मला देऊन गेला होता. दोन्ही किल्ल्या घरात, मी आणि नवरा दारात आणि मासा ओव्हन मध्ये! आई गं! माझ्या गळ्यात घास नाही, मासा अडकला. रात्री साडेदहाची वेळ. फेब्रुवारी महिना. -1 डिग्री तापमान आणि घरातल्या कपड्यात घराबाहेर मी. मी रडायलाच लागले. ‘आपण आज रात्र कुठल्यातरी हॉटेल मध्ये राहू या, उद्या पाहू’ अशी समजूत काढायचा प्रयत्न नवऱ्यानं केला. तेव्हा मी त्याला ओव्हनमध्ये ´तो´ असल्याची बातमी दिली आणि त्याचे समजुतीचे हावभाव ‘तुला खाऊ कि गिळू’ मध्ये पालटले. त्यानं दरवाजा ढकलायचा (निष्फळ) प्रयत्न केला. पण जर्मन quality असा घात करू शकते, त्याचा प्रत्यय आला (आता उपहास सुचतोय तेव्हा बोबडी वळली होती).

तळमजल्यावर घर होतं, त्यामुळे तो भोवताली फिरून खिडकीतून आत जाता येईल का ते पाहात होता. पण थंडीचे दिवस, मी खिडक्या करकचून आवळल्या होत्या. मला तेवढ्यात एक वयस्क बाई दिसली. तिला रडतरडत किस्सा सांगितला आणि तिनं तिच्या नवऱ्याला आमच्या मदतीस धाडलं. त्यानं दार पाहून मान डोलावली. नंतर माझा रडवेला चेहरा पाहून, ‘माझ्याकडे एक टूल किट आहे ते घेऊन येतो, पाहू या काही होतं का’ असं काहीतरी आश्वासनपूर्वक बोलून गेला. मला तर काहीच सुचेना. नवरा फायर ब्रिगेडचा नंबर गुगल करायला लागला. ओव्हन चालू राहिला तर काय विध्वंस होऊ शकतो ह्याची कल्पना करवत नव्हती आणि आमच्याकडे ‘करवत’सुद्धा नव्हती. तेवढ्यात आमचे शेजारी समोरून येताना दिसले. मला इतक्या थंडीत, अशा कपड्यांत आणि अवस्थेत पाहून लगेचच आमच्याकडे आले. मला हुंदका आवरेना. मी कसंबसं त्यांना सांगितलं आणि…लता दीदी, आशा ताईच्याहूनही मंजुळ स्वर कानावर पडले ‘we have a spare key’, आणि माझा जीव ओव्हनमधून भांड्यात पडला. सुमारे अर्धा तास ही एकांकिका चालली आणि आम्ही दार उघडून पडदा पाडला. मी एकदाचा ओव्हन उघडला आणि तयार मासा आ वासून माझ्याकडे पाहत होता.

17022170_10154245785646232_3857083788866921094_n

तुम्ही खाण्याच्या बाबतीत चोखंदळ असाल तर जर्मनीत पार निराशा होऊन जाते. ब्रेड्स, सूप्स, सॅलड्स, मांस, मासे (पण मसाल्याशिवाय) आणि मुख्यत्वे बटाटा इत्यादींवर इथं भिस्त आहे. परंतु जर तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल (असाल नव्हे करावाच लागतो) तर तुम्ही तरू शकता.

ही बाब सोडली तर जर्मनी फार सोयीस्कर आहे. ह्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे जर्मन्समध्ये भिनलेलं वेळेचं आणि शिस्तीचं महत्त्व. प्रत्येकाच्या जॉबमधे दिवसा किती तास काम करायचं हे ठरलेलं असतं. एखाद्या आठवड्यात तुम्ही ते अड्जस्टही करू शकता. पण ते ठरलेले तास संपले की तुम्ही घरी. इथं तुम्ही तुमचे ठरावीक तास संपल्यावर उगीच थांबत नसता किंवा कोणी तुम्हाला थांबवतही नसतं. वर्कर्स काउन्सिल ही कर्मचाऱ्यांच्या ह्या हक्कांबद्दल जागरूक आणि सतत कार्यरत असते. त्यामुळे अगदी इमर्जन्सी असेल तरच आणि तेही वर्कर्स काउन्सिलची परवानगी काढून तुम्हाला एक्सट्रा काम करता येतं आणि त्याचाही सुट्टीरूपी मोबदला मिळतो.

जर्मनीतली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. ट्रेन्स, बसेस, ट्राम्स, सिटी ट्रेन्स, इंटरसिटी ट्रेन्स, अंडरग्राउंड ट्रेन्स इत्यादींनी जर्मनीतील कोपरा न्‌ कोपरा जोडलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या वाहनाशिवायही तुम्ही जर्मनीत आरामात राहू शकता. आम्हांला चार वर्षं झाली, पण आम्ही कार घेतलेली नाही, कारण गरजच भासली नाही. आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टची फ्रिक्वेन्सीही जास्त आहे. त्यामुळे जर्मनीत तुम्ही तुमचं डेली आयुष्य व्यवस्थित प्लॅन करून त्याप्रमाणे वागू शकता आणि म्हणून जर्मनी सुखकर आहे.

अर्धा तास पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्याने भरलेलं हॅनोव्हर मुख्य स
अर्धा तास पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्याने भरलेलं हॅनोव्हरचं मुख्य स्टेशन

जर्मनीतल्या वास्तव्याचं आमचं पाहिलं शहर फ्रिडरिक्सहाफन. तिथली लोकसंख्या कमी त्यामुळे तिथं एक अजब शांतता होती. मुंबईहून आलेल्या मला, विशेषतः एकटी असताना सुरुवातीला ही शांतता भयाण वाटे. घरात असताना दिवसाढवळ्याही जास्त आवाज नाही आणि रात्री शब्दशः पिनड्रॉप सायलेन्स. माझ्या पोटातले आवाज ठळक ऐकू येत. हळूहळू सवय झाली म्हणा.

तिथली लोकसंख्या फार कमी आणि त्यातून इतर देशांतले लोक तर आणखीनच तुरळक. तिथं फिरताना औषधालाही भारतीय माणूस दिसला नाही. नंतर आम्ही जवळपास दीडेक वर्षं फ्रँकफर्ट शहरात होतो. फ्रिडरिक्सहाफनच्या तुलनेत हे शहर कचरा वाटत असे. खूप माणसं, अनेक देशांतले अनेक लोक. फ्रँकफर्ट मेन स्टेशनवर तर गर्दुल्ले आणि भिकारी यांचा एक घोळका कायमस्वरूपी असतो. ते चित्र पाहून तर मला धक्काच बसला होता, कारण इथं असं काही असेल अशी कल्पना नव्हती. नेमकं त्याच ठिकाणी एक मोठं श्रीलंकन मार्केट आहे जिथं भेंडी, शेवग्याच्या शेंगा, कढीपत्ता, सांबारसाठी लागणारे छोटे कांदे, भारतीय मसाले आणि बराच ‘आपला माल’ मिळतो जो इथल्या सुपरमार्केटमध्ये मिळत नाही. त्यामुळे तिथं जावंच लागायचं. हळूहळू त्या घोळक्याचीही सवय झाली. तिथं पोलीसही फिरत असतात. त्यामुळे काही खुट्ट झालं की लगेच कारवाई होते. एक प्रकारचा कुबट, विचित्र दर्प येतो त्या जागेला. त्यामुळे फ्रँकफर्ट शहर मला कधीच आवडलं नाही.

सुपरमार्केटमधली रिकाम्या बाटल्या जमा करायचं मशीन. याचे पैसे तुम्ही एनकॅश करू शकता.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही राहत असलेलं शहर म्हणजे हॅनोव्हर. मला खूप आवडतं. शांत आणि लो प्रोफाइल. वर्दळ/गडबड/शांतता ह्या बाबतींत फ्रिडरिक्सहाफन आणि फ्रँकफर्ट दोन टोकं होती. हॅनोव्हर सुवर्णमध्य साधतं. इथं नद्या आहेत, तलाव आहेत, घराच्या मागे जंगल आहे. छान हिरवळ आहे. हिरवळ आणि बागा तर जर्मनीभर आढळतात. पर्यावरणाचं महत्त्व इथं सांगावं लागत नाही तर ते लोकांच्या वागणुकीतून ठिकठिकाणी दिसतं.

जर्मनीत एक गोष्ट मी फार मिस करते ते म्हणजे मित्रमैत्रिणी. ह्याला अर्थात माझ्या कामाचं स्वरूप जबाबदार आहे. कारण आम्ही एका शहरात राहतो, तर माझा प्रोजेक्ट नेमका दुसऱ्या शहरात असतो. त्यामुळे मी सोमवारी सकाळी हॅनोव्हर सोडते आणि गुरुवारी रात्री परतते. माझ्या कामाच्या ठिकाणी काही मित्र झालेत, पण ते वीकएंडला एकमेकांना भेटतात आणि मी तेव्हा घरी असते. नवऱ्याचे त्याच्या ऑफिसात काही मित्र आहेत, पण आम्हां दोघांना एकमेकांसोबत फक्त वीकेंडलाच वेळ मिळत असल्यामुळे आम्ही तो एकमेकांसोबत घालवणं अधिक पसंत करतो. त्यामुळे भारतासारखा इथं मित्रमैत्रिणींचा गोतावळा नाही. जर तुम्ही शिक्षणासाठी इथं येत असाल, तर हाच मोठा फरक पडतो. कारण शिकत असताना युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे मित्र आपसूक होतात. तुमचं वय लहान असल्यामुळे कोणाशी मैत्री करायची, असा क्रायटेरियाही नसतो त्यामुळे अगदी कोणाशीही मैत्री होते आणि ती मैत्री टिकतेसुद्धा. आम्ही वयानं थोडे मोठे असताना इथं आलो. त्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी नाही. ‘कोणाशीही’ मैत्री होत नाही, कारण एक अदृश्य फिल्टर आधीच लागलेला असतो.

भारतातून इथं येण्याचा आमचा निर्णय ‘प्रॅक्टिकल’ होता. इथं स्थायिक व्हायचं नव्हतं. काही काळ इथं राहायचं (जो किती ते अजूनही माहीत नाही) आणि बॅक टू पॅव्हिलियन. आता चार वर्षं इथं राहूनही त्या निर्णयात बदल नाही. कारणं बरीच आहेत. ह्या देशाबद्दल आदर आणि कर्मभूमी असल्यामुळे वाटणारी कृतज्ञता असली, तरीही मला हा देश आपलासा वाटत नाही. कदाचित भारतातून उशिरा बाहेर पडलो त्यामुळे तिथली मुळं जरा जास्तच घट्ट असावीत. त्यातून इथले उन्हाळ्याचे चारेक महिने सोडल्यास, इथं सूर्यप्रकाश जास्त नसतो आणि थंडीही खूप असते. आम्हां दोघांच्याही आईवडिलांना ती मानवणारी नाही त्यामुळे ते आमच्याकडे कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळदेखील येऊ शकत नाहीत. म्हणून इथं स्थायिक व्हावं असं अजूनही वाटत नाही. सध्या जागतिक समीकरणं बदलताहेत. अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या काही निर्णयांचे पडसाद भारतातल्या आयटी क्षेत्रावर पडताहेत. त्यामुळे सध्या परतणं आमच्या दृष्टीनं सोयीचं नाही. सो राइट नाऊ वी स्टे पुट.

हॅनोव्हर मधली आमच्या घराजवळची नदी Noltemeyerbrücke
हॅनोव्हरमधल्या आमच्या घराजवळची नदी

आमची इथं येण्याची, राहण्याची आणि स्थायिक न होण्याची कारणं वैयक्तिक आहेत. पण, इतरांनी इथं स्थायिक व्हावं का, ह्यावर मला असं वाटतं की स्थायिक होण्यासाठी हा देश खरंच खूप चांगला आहे. तुम्ही मुलांना जर्मन शाळेत शिकवत असाल तर फी शून्य आहे, होय, शाळेची फी शून्य आहे. मॅटर्निटी लिव्ह एक वर्षाची आणि तीही पेड, त्या दरम्यान तुम्हांला तुमच्या पगाराच्या ६५% मिळतात. अधिक दोन महिन्यांची पॅटर्निटी लिव्ह. बाळाच्या संगोपनासाठी इतक्या सढळ हातानं सुट्टी देणारा देश निराळाच. दर मुलामागे सरकार तुम्हाला ‘किंडरगेल्ड’ म्हणजे मुलांसाठी काही रक्कम देते. इथं लोकसंख्या उतारावर असल्यामुळे, लोकसंख्या वाढण्यासाठी हे प्रोत्साहनात्मक आहे. तुम्ही इथं नोकरी करत असाल, तर अर्थात आयकर भरता. तोच भरलेला कर निवृत्तीनंतर तुमच्या कामी येतो कारण निवृत्तीनंतर सरकार तुमचा खर्च उचलते. हेल्थ इंश्युरन्समुळे तुमचा वैद्यकीय खर्च शून्य असतो. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे, तुम्ही एक व्यवस्थित, सुखकर आयुष्य इथं जगू शकता.

इथं नाताळच्या बऱ्याच सुट्ट्या असतात. त्यामुळे जोडून काही सुट्ट्या घेऊन आम्ही दर डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान भारतात सुट्टीवर जातो. कधी जमलं तर वर्षातून दोनदाही जाणं होतं. कधीकधी वाटतं की आमचं इथलं आयुष्य हे भारतातल्या सुट्ट्यांच्या मध्ये जातं. परत आलो की पुढच्या खेपेचं प्लॅनिंग सुरू. तिथं सुट्टीवर जाणं म्हणजे चंगळ असते. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना त्या छोट्या कालावधीत भेटणं हा फार कॉन्सन्ट्रेटेड आणि आल्हाददायक अनुभव असतो. माहेरी, सासरी लाड होतात. त्यामुळे कोणाला आवडणार नाही?

पण इथून भारतात गेल्यावर बऱ्याच गोष्टी जाणवत राहतात. ते म्हणजे आपण खरोखर किती ´मागास´ आहोत. जर्मनीत जातपात तर नाहीच पण धर्माचंही अवडंबर नाही. त्यांचा फोकस शिक्षण, पर्यावरण, नोक-या, तंत्रज्ञान ह्यांवर आहे. त्याउलट भारतात अजूनही जातपात, धर्म, कोणी काय खायचं, कोणी काय खायचं नाही, कोणी काय घालायचं, कोणी काय घालायचं नाही ह्यांवरच भर आहे. कोणी म्हणेल की ह्याला कारण राजकारणी आहेत. पण ते राजकारण करू शकतात कारण सामान्य जनता ते करू देते.

आजही साक्षरता सर्वत्र नाही, लोकांना नोक-या नाहीत, लहान मुलांमध्ये कुपोषणाच्या बाबतीत आपण बऱ्याच देशांच्या पुढे आहोत, धड रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, शिस्त नाही. आणि असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना आपण जातपात, धर्म, आरक्षण हे वर्षानुवर्षं चालत आलेलं दळण दळतोय. मन विषण्ण होतं. विशेषतः बुद्धिमत्ता आणि मेहनत करण्याची तयारी ह्या दोन्ही गोष्टी भारतीयांमध्ये (ढोबळमानाने) असूनही आपण खूप मागे आहोत, ह्याचं जास्त वाईट वाटतं.

पण सतत वाटत राहतं की भारतात बदल होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला विचारपूर्वक, निदान आपला आणि आपल्या कुटुंबाचा दृष्टिकोण बदलावा लागेल तरंच हे शक्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकानं निदान एकदा तरी देशाबाहेर जावं. मनाची क्षितिजं उंचावायला मदत होते. नाहीतर माणूस कूपमंडूक होऊन आपल्या आजूबाजूला चाललंय तेच आयुष्य, असं मानत राहतो आणि त्याचं अवाजवी समर्थन करत राहतो.

ह्यावर कोणी म्हणू शकतं की भारत हा जर्मनीपेक्षा खूपच भिन्न आहे. भिन्न संस्कृती, अनेक भाषा आणि विविधता ह्यांमुळे भारतीयांना कुठल्याही गोष्टीत एकत्र आणणं (भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचचा अपवाद सोडून) कठीण आहे. पूर्णपणे मान्य. भारत हा एक देश असूनही त्याची तुलना जर्मनीशी करता येणार नाही. युरोपशी करता येईल, पण भारत हा त्या खंडाहूनही वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे भारताची जर्मनीशी तशी तुलना होऊ शकत नाही. पण तशी तुलना नाहीच आहे. पण एखाद्या सामान्य माणसाचं दैनंदिन जीवन कसं असावं ह्या बाबतीत दोन देशांमध्ये तुलना नको? राज्यकर्त्यांचा आणि लोकांचा दृष्टिकोन कसा असतो ह्यात तुलना नको? सिव्हिक सेन्स कसा असतो किंवा नसतो ह्यात तुलना नको?

एका व्यक्तीसाठी, मग ती कुठल्याही देशाची किंवा खंडाची असेना का; अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि कुटंबासाठी सुरक्षितता ह्या मूलभूत गरजा आहेत. आणि त्या जर पूर्ण होत नसतील, तर आपलं नक्कीच कुठंतरी चुकतंय आणि ते काय, हे प्रत्येकालाच शोधायला हवं, नाही का?

 

तेजल राऊत

18556353_10154464587456232_17168472636286412_n

इ-मेल –  tejalkraut@gmail.com

सध्या वास्तव्याचं ठिकाण हॅनोव्हर, जर्मनी. मूळची मुंबईची. इलेक्ट्रिकल इंजिनियरची डिग्री आणि नंतर मार्केटिंगमध्ये एमबीए. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत. लिहिण्याचा छंद, फेसबुकवर आणि ब्लॉग्स लिहिते.

ब्लॉग लिंक –  https://wordpress.com/posts/tejalwritesat.wordpress.com

5 thoughts on “प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला

 1. तेजल खूप छान जेर्मेनीबद्दल माहिती दिलीस.
  दीवाळीच्या प्रकाशाप्रमाने तुझे भावी आयुष्य अन तुझी लेखनी उजळत जावो….. Wish u a very happy Dipawali.

  Like

 2. तेजल, तुझे लेखन नेहमीच मनोरंजक , engaging असते … त्यातून जर्मनीची ओळख तू वैयक्तिक अनुभवांचे दाखले देत सहजपणे देऊन परदेशात वास्तव्याच्या नाण्याच्या दोन्ही बाजू (चांगले आणि अपरिहार्य परके) उलगडून सांगितलेस त्यामुळे या देशाबद्दलच माझं कुतूहल आकर्षण परत ठळक झालंय!
  हा थोडक्यात जर्मन प्रवास घडवल्याबद्दल धन्यवाद !! तूला, तुझ्यातील भारतीय ह्रदयाला तेथे येऊन भेटायला , नक्की आवडेल ! Cheers for your journey so far …Herzlichen Glückwunsch!!

  Like

 3. मस्त पोरी. तो सामनचा किस्सा तर कायमच लक्षात राहिलाय माझ्याही. तू वैशाली करमरकरांची पुस्तकं वाचलीयस का, जर्मनीविषयीची? छान आहेत, उपयोगीही. आता या वेळी नाताळच्या सुटीत येशील तेव्हा नक्की भेटू, मागच्या वेळी हुकलीय भेट आपली.

  Like

 4. खूप च छान ओघवत्या भाषेत लिखाण आहे…
  मी अजून भारताबाहेर गेले नाही… माझा नवरा फिरतीवर असतो बरेचदा…पण तो बाहेर च्या देशांबद्दल असं कधी बोलत नाही… ती पण एक शैली असते…प्रत्येक ाला ते जमत नाही..
  आपला लेख आणि फोटो आणि अर्थातच द्रुष्टीकोण आवडला…

  Like

 5. तेजल,
  फारच सुरेख लिहीलं आहेस
  तुलनात्मक विश्लेषण आवडलं
  तुला मनापासून शुभेच्छा

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s