माझं इंग्लंड…

केतकी पंडित

‘मला कायम पुण्यातच रहायचंय’… हे गेल्या काही वर्षांपर्यंत माझं अतिशय ठाम मत होतं. पुणं सोडून कुठं फिरायला जायचंसुद्धा माझ्या अगदी जिवावर यायचं. लहानापासून मला गाडी आणि बस लागायची, बाहेर गेल्यावर स्वच्छतागृहं कशी असतील? हॉटेलच्या खोल्या स्वच्छ आणि कीटकविरहित असतील का? हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात असल्यानं मी प्रवास टाळायचे.

माझा नवरा शंतनू कामानिमित्त चाळीसहून अधिक देशांमध्ये फिरला आहे. एकदा सुरुवात झाल्यावर माझेही विविध खंडांतले बारा-तेरा देश कधी फिरून झाले कळलंच नाही. देशाटनानं आणि स्थलांतारानं आपण अंतर्बाह्य बदलून जाऊ असं मला कधीच वाटलं नव्हतं. आपले विचार, आपलं वर्तुळ हे किती संकुचित असतं हे मला माझा देश सोडून बाहेर पडल्यावर  जाणवलं. प्रवास आणि स्थलांतार यांमुळे आपण प्रगल्भ तर होतोच पण नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन विचार आणि नवे अनुभव हे सगळं आपला संपूर्ण दृष्टीकोन बदलून टाकतं.

माझा मुलीच्या जन्मानंतर आम्ही इंग्लंडला स्थलांतरित झालो. माझ्या नवऱ्याचं काम मुख्यत्वे युरोपात आणि अमेरिकेत असल्यानं आम्ही काही वर्ष मध्यवर्ती असलेल्या इंग्लंडला राहण्याचा निर्णय घेतला. त्याआधी मी लंडन बघितलं होतं ते माझ्या आई आणि बहिण यांच्याबरोबर युरोप ट्रीपला आले असताना. प्रवासी म्हणून भेट दिली असताना हेच शहर माझ्या मनात का घर करून बसलं होतं, हे आता इथं स्थायिक झाल्यावर कळलं. हा धागा पुढे असा जोडला जाणार होता, हे तेव्हा ठाऊक नव्हतं.

OLYMPUS DIGITAL CAMERA

कालांतरानं हे इंग्लंड ‘माझं इंग्लंड’ कधी झालं हे मला कळलंच नाही. माझ्या आयुष्याच्या फार विचित्र टप्प्यावर मी इथं आले असं मला नेहमी वाटायचं आणि अजूनही कधीतरी वाटतं. पुण्यात स्वतःचं सगळ बस्तान असताना ते सोडून पाच महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन नव्यानं सगळी सुरुवात करायची हा खूपच त्रासदायक विचार होता. आठ महिन्याची गरोदर असताना जिवावर बेतलेला डेंग्यू आजार आणि बाळंतपण यांतून कशीबशी सुखरूप बाहेर पडले आणि त्यातून सावरते तोच समोर हे स्थलांतराच नवीन आव्हान उभं राहिलं. नवीन देश, नवीन माणसं, नव्या सवयी हे सगळं कसं जमणार आपल्याला? असा विचार सारखा मनात यायचा. इतके दिवस मी एकटी होते आता मलाच अजून नवीन असलेल्या या बाळाबरोबर घरच्यांना सोडून मी परक्या देशात कशी राहणार हा प्रश्न सतत भेडसावत होता.

इंग्लंडमध्ये आम्ही Redhill ला राहण्याचं पक्कं केलं. एक तर माझा मामेभाऊ इथं राहतो आणि दुसरं म्हणजे संपूर्ण इंग्लंड या गावाला उत्तम रितीनं जोडलं गेलं आहे. London Victoria आणि London Bridge या दोन्ही ठिकाणी दर अर्ध्या तासानं इथून थेट रेल्वे जाते. बाकी इंग्लंडचा सगळा भागही बस, रेल्वे आणि महामार्गांनी Redhill ला जोडला गेला आहे.

Redhill ला आले, तेव्हा आमच्या घरात फक्त एक बेड होता. बाकी संपूर्ण घर रिकामं. एक दिवस आम्ही IKEA  या मायाजालात गेलो आणि कपाटापासून ते सोफ्यापर्यंत भली मोठी खरेदी करून आल्यावर मला इथला पहिला धक्का बसला….. काय??? हे सगळं सामान आपण जोडायचं??? पुण्यात साधा खिळा ठोकायचा तरी मी सुताराला बोलावते आणि तोही ‘ताई दुपारी येतो’ असं म्हणून दारात उभा असतो. इथं हे काय आता नवीन??  दोन कपाटं, जेवणाचं  टेबल, खुर्च्या, सोफे, हे सगळं आपण दोघंच कसं तयार करणार??… पर्याय नाही हे कळल्यावर मी मदतीला तयार झाले आणि हे सगळं तयार करत असताना एक अविस्मरणीय असा अनुभव घेतला. आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी पहिल्यापासून तयार करण्याचं समाधान काही औरच. पुण्यात गोरदेज इंटेरियोच्या माणसांनी स्वयंपाकघर लावायला दोनाऐवजी चार दिवस घेतले म्हणून घर डोक्यावर घेतलेली मी अशी कशी बदलले? इतका मोठा हा बदल मी इतक्या सहजतेनं कसा घेतला? याचं मला फार नवल वाटलं. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आलो तर आपण खूप काही करू शकतो, याची पहिली प्रचिती मला इथं आली.

घरकाम, साफसफाई, बागकाम, आणि इतर बरचंसं काम इथं स्वतःच करावं लागणार याचा मला आधी फार बाऊ वाटायचा. पण एकदा करायला लागल्यावर हे सगळं आपण अगदी सहजपणे करू शकतो हे जाणवलं. आपल्या देशात आपली सर्व कामं करायला भरपूर लोक उपलब्ध असल्यामुळे आणि वर्षांनुवर्ष घरात नोकरांची सवय झाल्यामुळे मी थोडी आळशी आणि परावलंबी झाले होते, हे मला इथं आल्यावर लक्षात आलं. प्रत्येक काम किती महत्त्वाचं असतं आणि ते करायला किती कष्ट आणि कौशल्य लागतं हे मला इथे राहायला लागल्यावर जाणवलं. सोफ्याखालून सगळा केर घेण्यापासून ते खुर्ची, टेबल तयार करण्यापर्यंत कुठलंही काम कमी दर्जाचं किंवा सोपं नसतं, याची खरी जाणीव झाली. माझ्या पहिल्या काही दिवसांतल्या अनुभवांवरून मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपण आपल्या कोषातून बाहेर येणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपली सर्वार्थानं प्रगती होणं कधीच शक्य नाही.

इथे वर्णद्वेष आहे असा पूर्वग्रह मनात ठेवून आलेल्या मला, Thank you Sweetie, I appreciate, That’s lovely  या वाक्यांनी कधी आपलंसं केलं ते कळलंच नाही. इंग्लंडमधले लोक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळे निघाले. इथं आल्यापासून मला वर्णद्वेषाचा अनुभव एकदाही आला नाही. शिस्त आणि संयम हा या देशाचा श्वास आहे. या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक आणि सामाजिक जडणघडण यांमुळे लोक खूप कणखर आणि स्पष्टवक्ते आहेत. इथल्या लोकांमध्ये आपुलकी मात्र खूप दिसून येते. माझ्या लहान मुलीला pushchair मधून नेताना रेल्वे, रस्त्यांचे चढ-उतार करताना किमान चार-पाच लोक तरी मदतीला सरसावतात. अनोळखी लोकही खूप गप्पा मारतात, येताजाता समोरच्याला प्रसन्न स्मितहास्य करतात. दुकानांमध्ये, मॉलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये दुय्यम वागणूक मिळालीय असा अनुभव अगदी दुर्मीळच.

इथं आल्यावर लगेच दोन दिवसांनी मी जवळच्या Supermarket मध्ये गेले. तिथं बरेच लोक एका मशीनवर स्वतःचं बिल स्वतः बनवून कार्डनं पैसे भरत होते. हा प्रकार मला पूर्णपणे नवा होता. हे सगळं बघत असताना मी त्याच रांगेत उभी आहे, हे मला पटकन कळलं नाही. एक कर्मचारी माझ्याकडे बघून ‘ए हे’ असा मोठ्यांदा ओरडली. हा ‘ए हे’ काय प्रकार आहे मला कळेना. मग ती जवळ आली आणि ‘madam please follow me’ असं स्मितहास्य करत म्हणाली. तिच्याबरोबर जाताना मी तिला ‘तू काय सांगत होतीस ते मला कळलं नाही’ असं प्रामाणिकपणे सांगितलं. ते ‘ए हे’ ‘any help’ होतं हे मला नंतर कळलं. कसं करायचं ते त्या मुलीनं खूप छानपैकी समजावून सांगितलं. मी इथंच थांबते, आज तुम्ही माझ्यासमोर हे करा असा आग्रह तिनं धरला. मी थोडी भांबावले आहे, हे ओळखून तिनं केलेली मदत मला खसंच खूप भावली. ‘इंग्लिश’ ही जरी आपल्या अतिपरिचयाची आणि रोज वापरात येणारी भाषा असली, तरी ती मातृभाषा असलेल्या या देशात तिचा बाज वेगळा आहे, हे कळायला मला दोन आठवडे लागले. ब्रिटिश इंग्लिश हे कळायला तसं सोपं असलं, तरी त्याचं पूर्ण आकलन व्हायला थोडा वेळ जातोच. प्लंबरला प्लमर म्हणायचं ‘H’ या अक्षराचा उच्चार इथं ‘हेच’ असा करायचा या आणि अशा अनेक गोष्टी मला हळूहळू उलगडत गेल्या.

DSC04267

१६ वर्षांपासून ते ८०-८५ वर्षांपर्यंत सर्व वयोगटांतली माणसं इथं काम करताना दिसून येतात. इथं लोकांना कुठलंही काम करायला कमीपणा वाटत नाही. सामाजिक आणि आर्थिक विषमता फार नसल्यामुळे प्रत्येक कामाचा भरपूर मोबदला मिळतो. वरवर बघता हा देश जरी महाग वाटला, तरी कुठल्याही स्तरातल्या माणसाच्या मूलभूत गरजा भागतील याची काळजी अर्थव्यवस्थेनं घेतली आहे. त्यामुळे साधारण आर्थिक परिस्थिती असतानाही रोजच्या आयुष्यात फार अडचणी येत नाहीत. मोफत शालेय शिक्षण, मोफत सार्वजनिक सोयीसुविधा यामुळे कमी पैशांतही समाधानी राहता येईल याची काळजी घेतली गेली आहे. १ पाउंडमध्ये वाटेल ते मिळेल अशी अनेक दुकानं इथं आहेत.

वयस्कर लोक अतिशय स्वावलंबी आणि स्वतंत्र आहेत. इलेक्ट्रिक व्हीलचेअरवर अनेक वृद्ध स्वतंत्रपणे फिरताना सगळीकडे दिसतात. मुलांनी वृद्ध आई-वडीलांजवळ राहणं, त्यांची रोज काळजी घेणं हा प्रकार इथं फारच कमी दिसून येतो, त्यामुळेच वृद्धांसाठी देशात खूप सोयीसुविधा आहेत.  सगळ्यांत वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथल्या वृद्धांचा सकारात्मक दृष्टीकोन. म्हातारपणसुद्धा खूप देखणं असू शकतं, हे मला इथं आल्यावर जाणवलं. ऐंशी वर्षांच्या आजीपण पूर्ण मेकअपशिवाय आणि मॅचिंग कपडे घाल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून बघणाऱ्या सत्तरीच्या अनेक आज्या मी पाहिल्या आहेत. उतारवयात वेळ जात नाही म्हणून आपल्या ऑडीमधून किंवा BMW मधून पिझ्झा डिलिव्हर करणाऱ्या, किंवा प्लंबर, इलेक्ट्रेशियन म्हणून काम करणाऱ्या इथल्या अनेक आजोबांचं मला खूप कौतुक वाटतं.

या देशांमधल्या लोकांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य इथं खूप जपलं जातं. आपल्या देशात आपण प्रत्येक गोष्टीला ‘answerable’ असतो. लग्नाआधी पालकांना आणि नंतर सासरच्यांना, आजूबाजूच्यांना, मित्रमैत्रिणींना आणि ऑफिसमध्ये सहका-यांना आपण प्रत्येक गोष्ट का करतो, हे समजावून सांगावं लागतं. आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असावं लागत नाही, ही संकल्पना आपल्या पचनीच पडत नाही. त्यामुळे सतत सगळ्याची उत्तरं शोधण्याचं खूप बंधन वाटतं आणि तीच अपेक्षा मग आपणही इतरांकडून करतो. इथं एखादी गोष्ट जमणार नाही असं म्हटल्यावर समोरचा का असं विचारात नाही. शाळा शिकल्यावर मला २ वर्षं पैसे कमावून जग बघायचं आहे, या मुलांच्या निर्णयाला पालक सहकार्य करतात. त्यामुळेच लहान वयात मुलं स्वतंत्र होतात.  प्रत्येकानं मोठ्या हुद्द्यावर अथवा डॉक्टर-इंजिनिअर असावं अशी इथल्या पालकांची अपेक्षा नसते. आपल्याला काय वाटतं यापेक्षा मुलाचा कल कुठे आहे याकडे पालक जास्त लक्ष देतात. इथं खूप कमी वेळा एकमेकांना गृहीत धरल जातं आणि असं असूनही कुटुंबव्यवस्था इथली विस्कळीत झालेली नाही. कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र जेवायला जाणं, फिरायला जाणं, आजीआजोबांनी नातवंडांना बघणं हे सगळं आपल्यासारखं दिसून येतं, पण यात कुठंही व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात नाही.

युनायटेड किंगडमचे मुख्यत्वे चार भाग झाले आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दन आयर्लंड. चारीही विभाग रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग आणि समुद्रमार्ग यांनी एकमेकांना उत्तम जोडले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी चांगली आहे की, भारतात असताना गाडीवर अवलंबून असलेल्या मला पहिलं एक वर्ष आपल्याकडे गाडी नाहीये हे जाणवलंही नाही. मधल्या काळात सदर्न रेल्वेमध्ये सतत संप, माणसांची कमतरता यांमुळे रेल्वेची नियमितता भंगली होती, पण आता ती हळूहळू पूर्ववत होत आहे. लंडनमध्ये सर्व जण अंडरग्राऊंड म्हणजेच ट्यूबनं प्रवास करतात. संपूर्ण लंडन ट्यूबनं फार सुंदररित्या जोडल आहे. जगातली सगळ्यात पहिली अंडरग्राऊंड रेल्वे इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि १५० वर्ष जुनं असलेलं हे ट्यूबचं जाळं अजूनही घट्ट पाय रोवून उभं आहे.

इथले वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. अतिशय उत्तम गाडी चालवणाऱ्या माझ्या नवऱ्यालापण ‘समोरून येणाऱ्या वयस्कर बाईला रस्ता ओलांडायला वेळ दिला नाही’ असा शेरा मारून ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पहिल्यांदा अनुत्तीर्ण केलं गेलं होतं. मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या परीक्षेला आला नाही इतका ताण इथं ड्रायव्हिंग टेस्टला येतो, असं आमचे मित्र का म्हणायचे, ते तेव्हा लक्षात आलं. वाहतुकीचे नियम मोडले तर इथल्या शिक्षापण फार कडक असतात. नियम तोडल्यावर इथं लोकांना एक ‘अपघात आणि त्यामुळे होणारं नुकसान’ अशी छोटी डॉक्युमेंटरी दाखवतात. त्यातली दृश्यं इतकी भयानक असतात की, तो माणूस परत नियम तोडायला धजावणार नाही.

इंग्लंडमध्ये आल्यापासून आज वेळ आहे तर काय करू या? हा प्रश्नच कधी आला नाही. याउलट किती बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे, ते कसं आणि कधी बघून होणार असा प्रश्न आम्हांला पडतो. यॉर्कशायर, लेक ड्रिस्ट्रिक्ट, स्नोडोनिया  यांसारखी निसर्गरम्य ठिकाणं; ऑक्सफर्ड, केंब्रिज, बाथ यांसारखी ऐतिहासिक शहरं, कॉर्नवॉलचा समुद्र किनारा; लीड्स कॅसल, हीवर कॅसल, हॅम्प्टन कोर्ट पॅलेस यांसारख्या अनेक भव्य वस्तू, अनेक बागा, नॅशनल पार्क्स, थीम पार्क्स, अनेक उत्तम संग्रहालयं, अशी अनेक आकर्षणं इथं आहेत आणि यांतली काही विनामूल्यपण आहेत. प्रत्येक गावात दर २ किलोमीटरवर एक मोठी बाग असते. यात मुलांसाठी खेळायला जागा, वॉकिंग ट्रॅक, एखादं छोटसं तळं त्यात पोहणारे हंस आणि बदकं दिसतात. या सर्व ठिकाणी उत्तम स्वच्छतागृहं बांधलेली असतात. ‘पिकनिक करणं’ ही संकल्पना इथं फारच रूढ आहे. मोठ्या बागांमध्ये संपूर्ण कुटुंबं, मित्रपरिवार, एकत्र येतात दिवसभर तिथंच थांबून सहभोजन करतात, वेगवेगळे खेळ खेळतात, गप्पा मारतात. मावळतीच्या सुमाराला वापरलेला सर्व परिसर स्वच्छ करून मगच निघून जातात. इंग्लंडमध्ये ऑक्टोबर ते एप्रिल ब-यापैकी थंडी असल्यानं ब्रिटिश समरचे चार-पाच महिने लोक पुरेपूर फिरून घेतात. थंडीचे महिने हे बऱ्यापैकी कंटाळवाणे असल्यानं तेव्हा लोक नाताळची तयारी करणं, एकमेकांच्या घरी जाणं, पोहोणं, जिम अशा वेगवेगळ्या इनडोअर गोष्टींमध्ये मन रमवतात.

इंग्लंडमध्ये भारत, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, युरोप, आफ्रिका अशा अनेक ठिकाणांहून लोक स्थलांतरित झाले आहेत. नेपाळ आपला सख्खा शेजारी असूनही मी भारतात नेपाळी जेवण कुठंही बघितलं नव्हतं किंवा मिळतं असं ऐकलं नव्हतं. इंग्लंडमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नेपाळी लोक स्थलांतरित झाले आहेत आणि त्यांतले बरेचसे लोक इथं अजूनही पारंपरिक नेपाळी वेशात वावरताना दिसतात. इंग्लंडमधे जागोजागी नेपाळी हॉटेलं दिसतात कारण ब्रिटिश लोकांची या जेवणाला खूप मोठी पसंती आहे. भारतीय लोक (काही अपवाद) सोडता इथं सर्व स्थलांतरित मुलांशी आणि कुटुंबांशी मातृभाषेत बोलताना दिसतात. मी सामिकला बागेत नेलं असताना तिच्याबरोबर मराठीतून बोलते याचं एका रोमेनियन बाईला खूप कौतुक वाटलं. ‘तू जयपूरची आहेस का? तिथं मी साधारण अशीच भाषा ऐकली होती,’ असं ती मला म्हणाली. त्यावर मी लगेच माय मराठीविषयीचं माझं लेक्चर सुरू केलं आणि तिनंही ते कौतुकानं ऐकून घेतलं.

इथं राहायला सुरुवात केल्यावर फार कमी वेळात मी इथली झाले. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी, पेहेराव, विचार यात मला फारसे बदल करावे लागले नाहीत. अगदी खरं सांगायचं तर मला वाटलं होती तेवढी पुण्याची आठवणही आता येत नाही. उलट दरवर्षी भारतात गेल्यावर आता काही वर्षांनी परत आल्यावर, इथं आपण कसं रमणार याची थोडी भीती वाटते. मला माझ्या देशाबद्दल आणि शहराबद्दल खरंच खूप प्रेम आहे, पण ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाइफ म्हणतो ते निश्चितच इथं उत्तम आहे. अजूनही भारत हा विषय निघाल्यावर मी भरभरून बोलते, माझ्या देशाविरुद्ध काही ऐकणं मला खूप त्रासदायक वाटतं. माझ्या घरमालकांनी एकदा गप्पा मारताना ‘भारतात अजूनही रस्त्यावर हत्ती, साप तसेच ट्रेनच्या वर बसलेले लोक दिसतात का’ हे विचारल्यावर माझ्यातला भारतीय जागा झाला. आता भारत किती बदलला आहे आणि कुठे आणि कशी प्रगती केलीय, आमची संस्कृती कशी आहे, हे सांगताना माझा अगदी ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातला अक्षय कुमार झाला होता.

पुण्यात परत आल्यावर माझ्या मुलीला मोकळी मैदानं, सुंदर बागा, स्वच्छ वातावरण कुठं आणि कसं मिळूवून देऊ असं वाटतं. घराबाहेर पडल्यावर स्वच्छतागृह मिळणं हे आपल्याकडे केवळ अशक्यच. मागच्या वर्षी कात्रज उद्यानात झालेली गैरसोय आणि एकही न दिसलेला प्राणी असे काही प्रसंग आठवले की प्राणिसंग्रहालय बघणं हा तिचा अगदी आवडता छंद पुण्यात राहून कसा जोपासू असा प्रश्न पडतो. बागेत घेऊन जावं तर डोक्यावर घोंघावणाऱ्या डासांची भीती वाटते. मुलांना सतत मॉलमध्ये घेऊन जाण्याच्या मी विरोधात असल्यानं परत गेल्यावर तिला आत्ता इथं मिळणारा आनंद आणि स्वातंत्र्य हिरावलं जाणार, याची मला खूप भीती वाटते. पुण्यातली बेशिस्त वाहतूक, सार्वजनिक उत्सवाचं नकारात्मक आणि ओंगळवाणं स्वरूप, पाणी, वीज या मुलभूत गोष्टींसाठी करावी लागणारी तडजोड या सगळ्या वातावरणात पुन्हा रुजणं मला खूपच जड जाणार आहे.

DSC_0837

स्थलांतरानं मला काय दिलं? असा विचार केला तर लक्षात येतं की इथं आल्यापासून माझ्यात खूप सकारात्मक बदल झाले आहेत आणि जास्त स्वतंत्रसुद्धा झाले आहे. एकही रात्र घरात सोडा पण खोलीतही एकटी न राहणारी मी आता छोट्या मुलीला घेऊन ८-१० दिवससुद्धा एकटी राहते, तेही दुसऱ्या देशात. पूर्वी माझ्या मतानुसार चूक किवा बरोबर ठरवणारी मी आता प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात त्यामुळे चूक किवा बरोबर असं काहीच नसतं, असा सारासार विचार करते. कुठल्याही स्तरातल्या व्यक्तीला पूर्वीपेक्षा जास्त मान देते आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करते. बदल, स्थलांतर आणि प्रवास याला अतिशय विरोध करणारी मी या गोष्टी आता खूपच सहजतेनं स्वीकारते.

परदेशात स्थलांतर हे प्रत्येकाला शक्य नाही आणि खूप जणांना ते आवडतही नाही. पण मला असं वाटतं की शिक्षण, प्रवास, संशोधन अशा वेगवेगळ्या निमित्तानं प्रत्येकानं परदेश आणि स्वदेशात जास्तीतजास्त प्रवास करावा. बरेचदा आपल्याला नक्की काय हवं आहे, हे आपण आपल्या नेहमीच्या वातावरणापासून लांब गेल्यावर जास्त उत्तमप्रकारे  जाणवतं असं मला वाटत. किमान माझ्या बाबतीत तर हे नेहमी खरं ठरलं आहे. पुण्यात एका संकुचित आयुष्यात वावरताना आणि साचेबद्ध जीवन जगताना तेच पुढे रेटण्याचा मी अट्टहास केला असता, तर फार मोठ्या परिवर्तनाच्या संधीला मी मुकले असते असा मला वाटतं. माझ्यात कधीच घडणार नाहीत पण घडायला तर हवे आहेत, असे सगळे बदल मी इथं आल्यावरच झाले आहेत.

इथं किती दिवस राहणार? भारतात परत कधी जाणार? आत परत जायला आवडेल का? असे अनेक निरुत्तर करणारे प्रश्न सध्या डोळ्यासमोर असले, तरीही या इंग्लंड वास्तव्याच्या दरम्यान बांधलेली माझ्या अनुभवांची तिखट, गोड शिदोरी कायम माझ्याबरोबरच असणार हे नक्की!!!

केतकी पंडित

केतकी पंडित (profile picture)

इ-मेल – ketakipandit@gmail.com

अनेक वर्षं  Head – Human Resource म्हणून विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलं आहे. मुलीच्या जन्मानंतर तिला पहिली काही वर्ष पूर्ण वेळ द्यायचा या विचारानं नोकरीतून काही काळ विश्रांती घेऊन सध्या ‘Paper Quilling artist’ म्हणून काम करतेय. UK QUILLING GUILD या आंतरराष्टीय Quilling संस्थेत ती सध्या काम करते. पाककला, वाचन, गायन, लेखन, गृह सजावट, प्रवास हे छंद.

7 thoughts on “माझं इंग्लंड…

 1. अतिशय मुद्देसूद आणि ओघवते लिखाण !
  खरेखुरे अनुभव शब्दात छान गुंफलेत आणि त्यातील सच्चेपणा जसाच्या तसा!
  नविन स्थलांतरीत माणसांना स्फुर्ती देणारा; प्रवास न आवडणार्या व्यक्तींना त्यांची मानसिकता बदलू लावू पाहणारा हा लेख वाचून किती सहज लंडन ला भेट देऊन आल्यासारखे वाटले!
  अतिशय स्पृहणीय लेखन केतकी!! तुझे विचार जसे ठाम , स्पष्ट आहेत तसेच तुझे लेखनही तंतोतंत!! ❤️😊

  Like

 2. I think one thing that is always learnt by staying abroad is that ‘work is God’. Somehow the Indian habit of evaluating or valuing people by the work they do gets buried quite early over there. In my 11 years in US, that is what I realised, and I think that was the best thing I brought back. Regarding coming to India etc, look, there are things you miss there and there will be things you will miss here. You have to make a decision which ones you don’t mind missing!

  Like

 3. माननीय केतकी पंडित,
  नमस्कार.
  ‘इंग्लंडवारी’विषयी आपण लिहिलेला भावपूर्ण व बहुगुणी लेख वाचला.
  अप्रतिम लिहिलंय तुम्ही!
  सुरेख!
  लेख आवडला!
  मी इंग्लंडचा राजा असतो, तर खुशीनं अख्खाच्या अख्खा Buckingham Palace तुमच्या नावें केला असता!
  असो!
  इकडच्या तुळशीबागेत सध्या भरपूर नवनवीन प्रकार आलेत, बरं का! पण, गर्दी खूप; त्यामुळे जाणे अस्सल पुणेरी शिताफीने टाळले!
  तिकडच्या तुळशीबागेची खबरबात स्वतंत्र लेखाद्वारे अवश्य कळवावी.
  आपला,
  मोहन वैद्य
  मु. पो. पुणे

  Like

 4. केतकी
  अतिशय उत्तम विवेचन केले आहेस इंग्लंडविषयी!
  शाळेत असताना माझा आवडता प्राणी या विषयावर निबंध असायचा तेव्हा जसे मनापासून प्राण्याबद्दल माहीती लिहून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे तसेच लेख वाचताना वाटले.
  आज इंग्लंड व इंग्लिश माणसांबद्दलचा तुझा अनुभव वाचून त्यांच्या बाबतचे अनेक गैरसमज दूर झाले. प्रत्यक्ष इंग्लंड बघितल्याचा आनंद मिळाला.
  असेच लिहीत राहा आणि आम्हाला नवनवीन देशांची भ्रमंती घडवित राहा.

  अतुल फडके
  पुणे.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s