माझा डच अनुभव

श्रीशैल पत्की

काही गोष्टी या विधिलिखितच असतात बहुतेक. नेदरलँड्स तसे आपल्याला (भारतीयांना) नवीन नाही. घरोघरी फिलिप्स रेडिओमुळे आपल्या नकळत आपली ओळख डच तंत्रज्ञानाची झालेली असते. त्यात लहानपणी क्रिकेटबरोबरच फुटबॉलची उपजत ओढ असल्यामुळे ‘टोटलफुटबॉल’साठी प्रसिद्ध असणाऱ्या नेदरलँड्सबद्दल कुतूहल तेव्हापासूनच होते. मग नोकरीच्या निमित्ताने Eindhoven (आइंडहोवन) ह्या फिलिप्सच्या माहेरघरी आलो, डच नाही तर बेल्जियन रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी.

तसं आता इथे येऊन मला साडेसात वर्षे झाली आहेत, त्यामुळे मधुचंद्राचा काळ आता संपला आहे. तरी काही गोष्टींबरोबर आपले नाते कधी जुळते आणि ते कसे टिकते हे लक्षातही येत नाही.

२०१० सालच्या  नवीन वर्षदिनी माझे स्वागत (?) नेदरलँड्सने केले. मुंबई २५ अंश आणि आइंडहोवन -१०, एकदम ३५ अशांचा फरक, पण नवीन जागेच्या कुतूहलापुढे हे सर्व नगण्य होते.

सर्वप्रथम लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे डच लोकांची उंची! पुरुष आणि स्त्रिया, दोन्हीही, जगातल्या सर्वांत उंच गणल्या जातात. २ मीटर उंची असणारे कित्येक लोक इथे आहेत म्हणजे ६फूट (१८३cm ) बुटके वाटावेत अशी अवस्था. मी नेहमी गमतीने घरी सांगतो की इथे कोणीही सहज मॉडेल म्हणून खपून जाईल. दुसरे म्हणजे इथली घरे. त्यांच्या खिडक्या पारदर्शक असतात आणि बहुतांश ठिकाणी पडदे असूनही ते बंद नसतात. म्हणजे टीव्ही बघणारी किंवा जेवणारी माणसे बाहेरून सहज दिसू शकतात. पण इथली माणसे, कशाला छोटी मुलेसुद्धा, रस्त्यावरून जाताजाता कधी घरात डोकावून बघत जाताना दिसत नाहीत. आपल्या भाषेत त्यांच्यावर ‘संस्कारच’ तसे आहेत.

DSC_0026

डच लोक त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल (कु)प्रसिद्ध आहेत. हा स्पष्टवक्तेपणा तुसडेपणाच्या जवळ जाणारा असू शकतो, ह्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते. त्यामुळे ते सहज ‘I can’t imagine why they have to go to India to fill up this position’ हे सहजपणे मलाच ऐकवू शकतात. सुरुवातीला मला ते खूप विचित्र वाटले, पण नंतर समजले की त्यांच्यासाठी हे खूपच सामान्य आहे. एखाद्या वाग्दत्त वधूला किंवा वराला लग्नाचे दुरुपयोग किंवा घटस्फोटाच्या गोष्टी किंवा गरोदर स्त्री किंवा तिच्या नवऱ्याला/प्रियकराला डिलिव्हरीच्या गुंतागुंती आणि भयानक अनुभव सांगताना ते सांगणाऱ्याला किंवा हे ज्याला सांगत आहे त्या ऐकणाऱ्याला त्यात काहीच वावगे वाटत नाही, हा म्हणजे अगदी कहर वाटतो. शुभ बोल नाऱ्याचा जयघोष करत फिरावेसे वाटते अशा वेळी. पण ह्याचबरोबर त्यांना ह्या गोष्टींची आमच्यासारख्या परदेशी लोकांनी जाणीव करून दिली आहे आणि ते खुल्या मनाने ऐकण्याचा आणि स्वीकारण्याचा खिलाडूपणासुद्धा त्यांच्याजवळ आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा स्वतःच्या बाबतीतसुद्धा दिसून येतो, कित्येक वेळा मी भारताविषयी बोलताना हातचे राखून बोलतो, म्हणजे उगाच आपले दोष कशाला सांगा म्हणून, पण डच लोकांच्या बाबतीत हे दिसत नाही. उदाहरणार्थ, खाद्यसंस्कृतीचा अभाव किंवा सतत ढगाळ आणि निरुत्साही वातावरणचे वास्तव ते सहजपणे मान्य करतात. कोणतीही गोष्ट आहे तशी स्वीकारण्याचा हा त्यांचा स्वभाव वाखाणण्यासारखा आहे.

स्त्रीपुरुष समानता जागोजागी दिसून येते. रात्री-अपरात्रीसुद्धा तरुण मुली सायकलवरून किंवा चालत घरी जाताना दिसतात. एकदा काही अपघातामुळे आमची शेवटची ट्रेन रद्द करावी लागली असता, त्या छोट्याशा मधल्या स्टेशनवर, अशा अवेळी, पुढे जाणाऱ्या प्रवाशांना बसेसची सोय करून देण्याकरता रेल्वेच्या कर्मचारी महिला ठाम उभ्या होत्या. इथे मुलांच्या संगोपनासाठी आठवड्यातील एक दिवस सुट्टी घेता येते (८०% पगार घेऊन) जेणेकरून तो दिवस तुम्हांला लहान मुलांसोबत घालवता येतो आणि ही सुविधा आई आणि बाबा (mama dag आणि papa dag) दोघांसाठीही आहे. अशा बऱ्याच गोष्टींमधून स्त्रीपुरुष समानता झिरपत असते. देश तसा लहान असल्यामुळे आणि सार्वजनिक परिवाहन (public transport) आणि रस्ते दोन्हीही प्रगत आणि उत्तम असल्यामुळे मग आजी-आजोबासुद्धा (पुन्हा दोन्ही बाजूचे) नातवाच्या संगोपनासाठी हातभार लावतात.

कोणत्याही गोष्टीबद्दल दृढसमज (stereotype) करणे कठीण असते, तसेच या लोकांच्या स्वभावाचे आहे. तसे ह्यांचे जग नवरा, बायको, आई, वडील आणि मुलं या परिघापलीकडे फारसे जात नाही.  या सगळ्यांत कुठेतरी एक प्रकारची तटस्थ (non attachment) किंवा non passionate वृत्ती खटकते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे ते कोणाला जवळ करत नाहीत. हा फरक आपल्या भारतीयांनाच नाही तर दक्षिण युरोपमधल्या लोकांनाही जाणवतो. पण माझ्या आईच्या हिरव्या सलवार कमीजला ट्रेनमधल्या अनोळखी डच महिलेकडून मिळालेली दाद हा अपवाद ठरतो. ट्रेनला २ मिनिटे उशीर झाला म्हणून नाके मुरडणारे लोक काही बिघाडामुळे ट्रेनचा गोंधळ असेल तर चिडचिड न करता रेल्वे कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करतात. हा शांतपणा किंवा ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल तडतड न करणे हा इथला स्थायिभाव आहे, ज्याचा माझ्यावरसुद्धा खूप प्रभाव पडला आहे.

इथे वर्षातून कधीही पाऊस पडतो आणि ते वातावरण फारसे सुखावह नसते. बरे हे काही अपवादात्मक असते असे नाही. इथली पावसाची रिपरिप आणि ढगाळ हवामान ह्यांमुळे वातावरण निरुत्साही बनतं. मग अशा या वातावरणातून जेव्हा केव्हा सूर्यदर्शनाचा योग येतो, तेव्हा सगळे लोक मुलाबाळांना घेऊन बागेत, तळ्याकाठी धाव घेतात. सूर्यदर्शन दुर्लभ असल्यामुळे मग एखाद्या स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी त्यांच्या तोकड्या कपड्यांचा अर्थ कळतो आणि मग ते डोळ्यांना खटकतही नाहीत.

IMG_3163

आपल्या नशिबाने बालकवी महाराष्ट्रात जन्माला आले,  जर नेदरलँड्समध्ये जन्माला आले असते तर त्यांना कदाचित क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ही कविताच सुचली नसती. कारण इथे हा नेहमीचाच प्रकार आहे. एखाद्या स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी मग भीमसेन जोशींचा मल्हार न ऐकणे हाच शहाणपणा, असे मला बाबा नेहमी सांगतात. थोडक्यात इथले वातावरण आणि दुर्मीळ सूर्यप्रकाश आपल्याला उन्हाची महती पटवून देते. मला लहानपणापासून पाऊस जिथे थांबतो ती जागा बघण्याचे खूप कुतूहल होते, मुंबईत किंवा कोकण-गोव्यात ते कधीच शक्य झाले नाही, पण नेदरलँड्समध्ये मात्र माझी ही इच्छा पूर्ण झाली; कारण कधीकधी इथे एखाद-दुसराच पावसाचा ढग असतो. सततच्या पावसामुळे इथे सगळे हिरवेगार असते आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस खरेच जतन करून ठेवावा इतका सुंदर असतो.

आपल्याकडचा मुसळधार पाऊस म्हणजे इथे रेडअलर्ट असतो. पाऊस आणि पावसात चिंब भिजणे हे किती उत्साहवर्धक (refreshing) असू शकते आणि त्यावर आपल्याकडे कविता आणि प्रेमगीते लिहिली जातात; हे मी जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा तर त्यांचा विश्वासच बसला नाही. पावसाळ्यात सह्याद्रीमधील हायकिंग आणि डोंगरमाथ्यावर उतरलेल्या ढगातून वाट काढत जाणे हे किती सुंदर असते, हे कदाचित त्यांना प्रत्यक्ष अनुभवावेच लागेल.

नेदरलँड्स रेल्वे

मालगाडीच्या डब्यासारखे लांबलचक शब्द हे डच भाषेचे एक वैशिष्ट्य. डचमध्ये g चा उच्चार घ च्या जवळ जाणारा आहे.  ch चा उच्चार ख असा केला  जातो आणि हे उच्चार इतर अनेक युरोपीय भाषांना अनभिज्ञ आहेत.  मराठी भाषा प्रगल्भ असल्यामुळे अर्थात आपल्याला  हा प्रश्न येत नाही आणि आपण हे उच्चार डच लोकांसारखेच करू शकतो. दुसरी गमतीशीर गोष्ट म्हणजे डचमध्ये मराठीसारखे आकडे लिहिले आणि उच्चारले जातात. उदाहरणार्थ बावीस (२ आणि वीस) तसे  tweeentwintig (twee en twintig) म्हटले जाते जे इंग्लिशमधील twenty two (वीस आणि २) च्या विरुद्ध आहे.

तुम्ही परदेशी दिसत असलात तरी प्रत्येक डच व्यक्ती ही सुरुवात डचमधूनच करते, ही गोष्ट महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, पुणे आणि मोठ्या शहरातील मराठी भाषिकांना खूप काही शिकवणारी आहे. समोरच्या माणसाला आपले बोलणे समजले नाही तर म्हणून कित्येकदा आपण घराबाहेर पडल्यावर मराठी सोडून इतर भाषेत बोलायला लागतो त्यामुळे मग कधी कधी दोन मराठी व्यक्ती आपापसात हिंदीत बोलतात किंवा आपल्याला मराठमोळ्या लग्नात हिंदी ऐकायला मिळते. मुलींना impress करण्यासाठी मराठीत बोलणे कमीपणाचे ठरते आणि त्यासाठी इंग्लिशचा आधार घेतला जातो. ह्या सगळ्या संदर्भातील आत्मपरीक्षणाची संधी मला माझ्या डच आणि युरोपीय मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करताना मिळाली; कारण स्वतःच्या भाषेत बोलायला वाटणारा कमीपणा किंवा न्यूनगंड ही भावना त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही. आमची तंत्रज्ञानाची भाषा इंग्लिश आहे पण ज्या व्यवसायांचा ग्राहकांशी थेट संबंध येतो (वकील, डॉक्टर, बँक, सुपरमार्केट, रेल्वे, टॅक्सी, इत्यादी) तिथे अजूनही प्रामुख्याने डच भाषाच बोलली जाते. इंग्रजीला पर्याय नाही, हे आता वास्तव आहे पण म्हणून कुठेही डच किंवा इतर युरोपीय भाषकांनी त्यांची स्वतःची भाषा सोडली नाही. इथे बहुतांश लोक अस्खलित इंग्लिश बोलतात. ह्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही, कारण तुमचे कुठेही अडत नाही, पण मग भाषा शिकण्याची सक्तीची गरज राहत नाही. त्यामुळे दक्षिण युरोपातील विद्यार्थी इंग्लिशची सवय व्हावी म्हणून उन्हाळाच्या सुट्टीत काम करण्यासाठी (समरजॉब) नेदरलँड्समध्ये येतात.

Genepper Parken, आइंडहोवन

सायकल हा येथील आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. सायकलवरून कामाला जाता येणे हे इकडचे सर्वांत मोठे सुख आहे. लहान मुलांपासून ते आजीआजोबांपर्यंत आणि नुकतेच नोकरीला लागल्यापासून ते मॅनेजरपर्यंत बहुतांश सगळे सायकलने ऑफिसला जातात. अॅमस्टरडॅम स्टेशनच्या बाहेर तर सायकलचा तीनमजली पार्किंग लॉट आहे. इथे संपूर्ण देशभर सायकल ट्रॅक्सचे जाळे आहे. सायकल पाथ (रस्त्याच्या कडेला इथे सायकलसाठी वेगळे राखीव पट्टे असतात आणि ते वेगळ्या रंगात रंगवलेले असतात ) नाही असा क्वचितच एखादा रस्ता मिळेल आणि माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझा ऑफिसला जाण्याचा सायकलचा रस्ता एका पार्कातून (Genneper Parken) जातो त्यामुळे सकाळची सगळी मरगळ आजूबाजूच्या हिरवळीने आणि कधीकधी तिथे चरणाऱ्या गायी, घोडे आणि तलावातल्या बदकांमुळे कुठल्या कुठे निघून जाते.

शिस्तप्रियता आणि प्रामाणिकपणा हे इथले आणखीन काही गुण. थंड हवामान, शिस्तप्रियता आणि प्रामाणिकपणाचा अतिशय दृढ संबंध आहे असे माझे एक गृहीतक आहे, जे इथे बऱ्याच प्रमाणात खरे ठरते. पाट्या टाकणे हे यांच्या स्वभावात नाही, प्रत्येक काम ते पूर्ण निष्ठेने करतात. योगःकर्म सुकौशलम् असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, पण ह्याची प्रचिती श्रीकृष्ण आणि अर्जुन माहीतसुद्धा नसलेल्या ह्या देशात जागोजागी येते. जर आपल्याला ऑफिसमध्ये काम नसेल किंवा आपले काम लवकर झाले असेल तर सोशल नेटवर्कवर कुचाळक्या करत बसण्यापेक्षा डच लोक स्वतःहून वरिष्ठांकडे जाऊन कामाची मागणी करतात. त्यामुळे पगार देतो आहे म्हणून उपकार करतो आहे किंवा पगार देत आहात म्हणून उपकार करता का, ही भावना अनुक्रमे मॅनेजर आणि कर्मचारी दोघांमध्येही नसते.

शिस्त ही फक्त घरातच नाही तर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, पाळली जाते. मग ते स्वच्छतेच्या बाबतीत असो, वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीत असो किंवा सायकलवरून जाताना असो. पण अपवादानेच जसा नियम सिद्ध होतो तसे वर्षातले काही दिवस हेच शिस्तप्रिय लोक सगळे नियम धाब्यावर बसवून अगदी रस्त्यावर जल्लोष करतात, हे दिवस म्हणजे पूर्वी राणीचा आणि आता राजाचा वाढदिवस तसेच कार्निवल. इथे आबालवृद्धांमध्ये कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर वाढदिवस साजरा करण्याची मजेशीर पद्धत आहे. मजेशीर एवढ्यासाठी की त्यासाठी वयाची अट नसते, म्हणजे अगदी वय वर्षे १ पासून ९१, ९२ वर्षाचा वाढदिवस तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो आणि त्यासाठी ह्यांचे शनिवार-रविवार महिनोन्‌महिने राखीव असतात. त्यामुळे राजासुद्धा ह्याला अपवाद नाही. राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी, पूर्वीच्या बाळासाहेबांच्या सभेला किंवा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आल्यासारखे वाटते, सगळीकडे केशरी, नारिंगी किंवा भगवा रंग. भगव्या रंगाचे कारण इथल्या राजघराण्याचे आडनाव Van Oranje Nassau आहे! साहजिकच राष्ट्रीय सणाच्या किंवा सामन्यांच्या दिवशी सगळे याच रंगांच्या कपड्यात असतात.

इथले लोक खूपच लॉजिकल आहेत. प्रत्येक गोष्ट ते सारासार विचार करूनच करतात. या वेळच्या निवडणुकांमध्ये ही गोष्ट कसाला लागणार असे वाटत होते, पाश्चात्त्य देशात वाढत चाललेल्या कडव्या प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर, रोख अर्थात अमेरिका आणि ब्रिटन, नेदरलँड्समधील जनतेने विद्यमान पंतप्रधानांनाच निवडून दिले आणि खरोखरच ते उदारमतवादी आहेत, हे कृतीने दाखवून दिले. सध्या तरी नेदरलँड्सने (आणि नंतर फ्रान्सने ) नक्कीच ह्या बाबतीत योग्य दिशा दाखवली आहे आणि ब्रिटन अमेरिकेने चालू केलेली साखळी मोडून काढली आहे. इथे मतदानासाठी सुट्टी नसते आणि मतदान केंद्रे रेल्वेस्टेशनवरसुद्धा असतात जेणेकरून लोकांना ऑफिसला जाताना मतदान करता यावे.

अॅमस्टरडॅम कालवा

तसा हा देश लहान असला तरीही अनेक गोष्टी प्रथम सुरू करण्याचा मान ह्या देशाला आहे. उदाहरणार्थ, सध्याची करपद्धती. जगातला पहिला रंगीत टीव्ही आइंडहोवनमध्ये तयार झाला होता. तंत्रज्ञानात फिलिप्स आणि  ASML आहेच पण इथले पाणीतज्ज्ञ आणि पाणीशास्त्रज्ञ जगप्रसिद्ध आहेत. नेदरलँड्सचा बराचसा भाग समुद्रसपाटीखाली आहे. १९५३ मध्ये आलेल्या भयानक पुरानंतर पुरापासून संरक्षण म्हणून त्यांनी डेल्टावर्क्स नावाचा मोठा प्रकल्प बांधला आहे, जो खूपच प्रेरणादायी आहे.

युरोपमध्ये सगळीकडेच जुन्या संस्कृतीला जपण्याकडे कटाक्ष आहे. नेदरलँड्ससुद्धा त्याला अपवाद नाही. शहराच्या ऐतिहासिक भागाला कमीत कमी धक्का लागेल अशीच सगळ्या शहरांची रचना आहे. लोकांकडूनही ह्या इतिहासाचा आदर ठेवला जातो. हल्ली आपल्याकडेसुद्धा तसे बरेच स्तुत्य उपक्रम चालू आहेत. तरीसुद्धा वारसा जपण्याची जी बांधिलकी असते त्याचा आपल्याकडे सर्वसामान्यांमध्ये अभाव दिसतो. अशा अनेक गोष्टी मला खरं तर भारताच्या बाहेर आल्यावर प्रकर्षाने जाणवायला लागल्या आणि मला ही संधी मिळाली ह्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो.

आमच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर एखादा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हांला त्या प्रश्नाच्या पूर्णपणे बाहेर जाऊन विचार करावा लागतो; ह्याचे अगदी तंतोतंत प्रत्यंतर मला भारताच्या बाहेर आल्यावर आले. भारतात राहूनसुद्धा ह्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर सतत होत्या पण कदाचित माझी नजर आणि निरीक्षणशक्ती बधीर झाली होती की काय अशी शंका मला येते. आपल्याकडचे गड-किल्ले, समुद्र किनारे, देवळे, गावे खरे तर किती सुंदर आहेत, ह्या सगळ्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मला युरोपमध्ये आल्यावर मिळाला. मला वाटते ह्या गोष्टीची जाणीव होण्यासाठी तरी ज्यांना जमेल त्यांनी परदेशात राहून बघावे, मात्र खुल्या मनाने आणि संकुचित वृत्ती न ठेवता. पाश्चात्त्य संस्कृतीसमोर पूर्णपणे लोटांगण घालणे किंवा त्याने भारून जाणे किंवा जे काही महान आहे ते भारतातच आहे, असे समजून स्वतःला बंद करून घेणे हे टोकाचे अतिरेक जर टाळता आले, तर परदेशात राहणे आल्हाददायक होते.

तुम्ही भारतीयाला भारताच्या बाहेर नेऊ शकता पण भारताला भारतीयाच्या मनातून काढू शकत नाही त्यामुळे इतकी वर्षे बाहेर राहूनसुद्धा माझे भारताशी असलेले नाते तेवढेच आहे किंबहुना अधिक जवळचे झाले आहे. भारताचे नागरिकत्व ही माझ्यासाठी हृदयाच्या खूप जवळ असलेली गोष्ट आहे त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिकत्व हा विचारसुद्धा माझ्या मनात येत नाही.

सध्याच्या जगात आपले व्यावसायिक आयुष्य हे आपल्या आयुष्याची दिशा ठरवते. माझ्या नशिबाने मला जशी हवी तशी अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी माझ्या नोकरीने दिली आहे पण त्याचबरोबर हया सगळ्या ज्ञानाचा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे नवीन दृष्टिकोणाचा भारतासाठी वापर करावा असे नेहमीच मनात आहे. आता तो योग कधी आणायचा हे मात्र अनिश्चित आहे. तोपर्यंत सध्या तरी नेदरलँड्समध्ये कर्मण्येवाधिकारस्ते…..

श्रीशैल पत्की

DSC_0497

इ-मेल – shrishail92@gmail.com

जन्म मुंबईतला असून शिक्षण आधी भारतात आणि मग अमेरिकेत. प्रवासाची आणि नवीन गोष्टी शोधण्याची ओढ असल्यामुळे भारतात आणि आता नोकरीमुळे युरोपात भटकंती करण्याची हौस. ज्यामध्ये स्पेनमधील आठवडाभराची सायकल भ्रमंती, हिमालयातले ट्रेकिंग ह्यांचा समावेश आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या शरीरातून निर्माण होणाऱ्या लहरी (हृदय लहरी, मेंदू लहरी इत्यादी) वाचू शकणाऱ्या उपकरणांचे (wearables)  डिझाईन ( design, research and development engineer) हे कामाचे स्वरूप आहे.

14 thoughts on “माझा डच अनुभव

 1. खुप सूंदर लेख लिहिला आहेस. आपल्या बालमोहन च्या भाषेत सांगायच तर… जिंकलस मित्रा

  Like

 2. Khupach chan lihilay lekh 🙂 I moved to Eindhoven two months ago for my graduate studies. And I completely agree on all the points you have stated here. Hands down! Amazing piece of writing.

  Like

 3. छान आहे लेख,

  मी स्वतः फ्रान्स-बेल्जियम-नेदरलँड-जर्मनी-ऑस्ट्रिया-इटली असा सायकल प्रवास केला आहे तेव्हा युरोपची स्वच्छता, कला, तंत्रज्ञान, पर्यावरण सजगता व सायकल प्रेम पाहिलं होत.
  त्याच आठवणी जाग्या झाल्या.
  विशेष म्हणजे लेखक तरुण असून “आम्हीच महान” या अभिनिवेशातून लवकर बाहेर पडलाय व मन आणि डोळे दोन्ही उघडे ठेवून जग पाहतोय.

  Like

  1. धन्यवाद! या अंकाचा तोच तर उद्देश आहे की नवनवीन लोकांची मतं, विचार वाचायला मिळावेत.

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s