मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका

प्राजक्ता करंबेळकर

सकाळची शांत वेळ असते. बाहेर फक्त पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट. अजितची सकाळची निघायची गडबड आणि माझी लगबग संपलेली आणि अरन गाढ झोपलेला त्यामुळे आताचाच वेळ माझा मला मोकळा मिळतो. काय करावं हा विचार येताच ध्यानात येतं आज बॅग भरायला हवी आहे. शेजारच्या खोलीतल्या कपाटाशी मी स्टूल सरकवून वरून बॅग काढते. धूळ वगैरे बसायचा प्रश्नच येत नाही, एरवी घरी वरून बॅग काढली की आधी पुसून झटकून घ्यावी लागते! चेन उघडल्यावर अरीनचे लहान झालेले कपडे, माझ्या घडीतल्या दोन साड्या, नवेकोरे नॅपकिन, काही कागदपत्रं असा फार न लागणारा ऐवज डोळ्यापुढे येतो. सगळं बाहेर काढून ठेवलं तर तळाशी माझं एक आणि अजितचं एक अशी दोन जडजूड पुस्तकं. अजितचं मेडिकल लायसन्सिंग  एक्झामच्या तयारीचं गाइड कव्हर उघडून पाहते तर माझ्या हस्ताक्षरात त्याचं नाव लिहिलेलं असतं. ते पाहून टाइम मशीन मिळाल्यासारखी चक्र फिरून मी पाच वर्षं मागे जाते.

लग्न ठरायचा वेळी त्यानं सांगितलं, ‘मी युएसएमएलईची तयारी करतो आहे, आत्ता अमेरिकेत जायचं निश्चित नाही, पण एमबीबीएस झाल्यावर मी हातात घेतलेला अभ्यास आणि परीक्षा घरच्या काही अडचणीमुळे अर्धवट राहिल्या, त्या मला आता पूर्ण करायच्या आहेत… ’ त्या वेळी माझ्या आणि घरच्या लोकांच्या मनात ही फक्त एक ‘शक्यता’ होती, अजितचं मात्र स्वप्न होतं! लग्न ठरल्यावर परिचय, मैत्री, प्रेम, जवळीक हे टप्पे पार पडताना मीही नकळत त्याच्यासोबत हे स्वप्न जगू लागले. एकीकडे प्रेमात आकंठ बुडालेली असताना नवीनच रेसिडेन्सी सुरू झाल्यामुळे कामातही तितकीच अडकलेली होते. नागपूरला सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉण्ड पूर्ण करताकरता त्यानं पहिल्या दोन परीक्षा दिल्या. तिसऱ्या परीक्षेच्या वेळी लग्न झालं होतं, त्या वेळी हेच गाइड घेऊन त्याच्यासोबत, त्याला तयारीला मदत म्हणून, मी अभ्यासाला बसायचे. एका वर्षात त्याच्या पुढच्या दोन्ही परीक्षा आणि लायसन्सिंगची प्रक्रिया पूर्ण होताहोता माझी रेसिडेन्सी, डीसीएचची फायनल एक्झाम आणि आई होण्याची चाहूल अशी गाडी आपल्या-आपल्या रुळावरून जात राहिली. अरीनचा जन्म झाल्यावर अजितला न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून फेलोशिपची ऑफर आली, त्या वेळी फक्त एक शक्यता म्हणून दूर असलेली अमेरिका खऱ्या अर्थानं जवळ दिसू लागली.

धुक्यात न्यू यॉर्क
धुक्यातलं न्यू यॉर्क

पाच महिन्यांत कागदपत्रं, फॉर्म्यालिटीज, खरेदी, कपडे-भांडी-खाऊ भरलेल्या बॅग्स मोजून घेणं अशी तयारी करून अजित न्यू यॉर्कसाठी निघाला. पुढच्या तीन महिन्यांत अरीनचा पासपोर्ट, माझ्या पासपोर्टवर नाव बदलणं, व्हिसाचा इंटरव्ह्यू इत्यादी गोष्टी पार पडल्या आणि दिवाळी झाल्यावर मला घेऊन जाण्यासाठी तो भारतात परत आला. २३ नोव्हेंबर २०१५ ला कोल्हापूर-पुणे-मुंबई असा प्रवास करून आम्ही न्यू यॉर्क साठी निघालेल्या विमानात बसलो. निघताना मनात उत्सुकता, आनंद आणि हुरहूर यांचं निराळंच मिश्रण होतं.

पहाटेच्या वेळी, निम्म्याहून जास्त प्रवासी झोपेत असताना आम्हांला चार तास तसंच बसवून फ्लाइट कॅन्सल झाल्याची घोषणा करून पुन्हा उतरवलं!! आपलाच देश आपल्याला ‘जाऊ नको बाळा’ म्हणतोय की काय असं वाटलं! सातआठ महिन्यांचा अरीन, सहा मोठ्या आणि तीनचार छोट्या बॅग्स, कार सीट असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही बारा तास मुंबईच्या विमानतळावर फिरत राहिलो. अरीन सोबत असल्यामुळे पुढच्या फ्लाइटमध्ये आमची सोय करून दिली आणि वीस तासांचा प्रवास करून मी अमेरिकेत पाहिलं पाऊल टाकलं आणि पहिलाच बसलेला धक्का ओसरून मी ‘हुश्श’ केलं! सगळीकडून काचेची दारं लावून बंद ठेवलेल्या विमानतळातून बाहेर पडून कधी एकदा मोकळी हवा भरून श्वास घेतोय असं झालं होतं. काचेतून स्वच्छ चमकणारा सूर्यप्रकाश खुणावत होता.

दार उघडून बाहेर आलो ते बर्फाच्या वाऱ्याचा गोठवणारा झोत भरर्कन अंगावर आला आणि कडकडीत उन्हात थंड गारठ्याचा कॉन्ट्रास्ट पाहून मी दंग झाले! रस्त्याच्या उजव्या बाजूनं भरधाव धावणारी गाडी सतत चुकीची वळणं घेतेय असं वाटून ठोका चुकत होता. पानगळीच्या मोसमात सर्वत्र लाल-पिवळ्या पानांचा खच पडला होता आणि टुमदार घरं मौजेत उभी होती. हे दृश्य मागं टाकून आम्ही लवकरच मिडटाऊन मॅनहॅटनच्या इमारतींच्या जंगलात पोचलो. एका मिनिटात लिफ्टनं बत्तिसाव्या मजल्यावर असलेल्या घरात पोचलो आणि हक्काचं छप्पर मिळाल्याच्या भावनेनं भरून आलं. चार भिंतीतली एकच बंदिस्त खोली आणि आभाळाशी जोडणारी पूर्वेकडची खिडकी. खिडकीतून दिसणारी इस्ट रिव्हर, सावकाश पुढं सरणारी मालवाहू जहाजं, सेकंदाला उंच झेप घेणारी विमानं आणि शेजारच्या मरीन एव्हिएशन सेंटरमधली सीप्लेन… सारं काही पाहून हरखून गेले. जेट लॅग जाऊन सेटल व्हायला एक आठवडा गेला, दुपारी चारच्या सुमारास अंधारून यायचं आणि सकाळी सूर्य लवकर वर यायचा नाही त्यामुळे सतत झोप येत राहायची. ती घालवायला एकतर कॉफी घ्यायची नाहीतर सारखं काहीतरी काम करत राहायचं.

न्यू यॉर्कमधील ख्रिसमस
न्यू यॉर्कमधील ख्रिसमस

दोन दिवसांनी थॅंक्सगिव्हिंगनंतर येणारा ब्लॅक फ्रायडेचा सेल होता आणि झोप घालवायची म्हणून आम्ही खरेदी करायला बाहेर पडलो. दहा-पंधरा मिनिटं चालत गेलं की एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि न्यूयॉर्कमध्ये फॅशनसाठी प्रसिद्ध असलेला फिफ्थ अव्हेन्यू, त्यावरचं अमेरिकेतलं सगळ्यांत जुनं मेसीजचं दुकान. रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी, घमघमणारा हलाल फूडचा वास, जीव दडपून जाईल असा दुकानातला झगमगाट आणि अत्तराच्या वास यांमुळे अगदी गुदमरून गेले. एरवी पुण्यात भरभरून शॉपिंग करणारी मी हरवल्यासारखी अस्वस्थ झाले. आपण कुठं आलो आहोत, किती दूर राहिलं घर, देश आणि एकंदरीत कम्फर्ट झोन! क्षणभर डोळे डबडबून आले. हात धरून अजित आत घेऊन गेला. कुठूनतरी अगदी परिचयाचा वर्गातल्या जुनाट लाकडी डेस्क किंवा जुन्या घरातल्या फडताळी गुळगुळीत दाराचा वास आला, इकडंतिकडं पाहते तो पायाखाली खडखड वाजणारे जुनाट लाकडी एस्केलेटर होते! झटकन हसू आलं आणि पुढचा तासभर आम्ही काही खरेदी न करता हातात हात घेऊन वेड्यासारखे एस्केलेटरवर फिरत राहिलो!! त्या वेळी थोडं दडपण ओसरलं, पण पहिले काही दिवस नवीन लोकांना भेटायचं, अनोळखी लोकांशी किंवा फोनवर बोलायचं म्हटलं की घाबरायला व्हायचं.

अजित मला मुद्दाम ग्रोसरी घ्यायला किंवा कॉफी ऑर्डर करायला एकटीला पाठवायचा, माझं बोलणं समजलं नाही तर आसपास कुणी इंडियन किंवा एशियन असेल, तर ते समजावून सांगत समोरच्या माणसाला. इंडियन लोकांचा बोलण्याचा अॅक्सेंट एशियन लोकांना पटकन कळतो. रस्त्यात, लिफ्टमध्ये भेटलेल्या लोकांना शिष्टाचार म्हणून स्माईल देणं, विचारपूस करणं किंवा कधी गप्पा मारणं या गोष्टी करताना अवघडल्यासारखं व्हायचं. ते हळूहळू अंगवळणी पडलं. थंडीचे तीन महिने मी घरात बसून खिडकीतून बघण्यात काढले. डॉलरच्या नोटा, क्रेडिट कार्ड, लाँड्री कार्ड, प्रवासाचं मेट्रो कार्ड वापरणं आणि बोलण्याची प्रॅक्टिस करणं हे विशेष काम. घरकामाची काहीही सवय नसताना स्वयंपाक, साफसफाई, भांडी घासणं ही सगळी कामं केली. त्यात भरभरून एन्जॉय केलं ते अरीनचं मोठं होणं आणि अजितचा सहवास. आत्तापर्यंत दोघं काम करत असल्यामुळे एकमेकांना हवा तसा वेळ देता आला नव्हता तो मदतीच्या निमित्तानं मिळू लागला. त्याची दिवसभर ड्युटी, इमर्जन्सीज, कॉन्फेरेन्सेस, पेपर्स, शिकण्याची धडपड आणि माझी घर आणि अरीनसाठीची मेहनत, दोघांना एकमेकांचे कष्ट दिसले, दोघं एकमेकांकडे नव्या नजरेनं पाहू लागलो… अमेरिकेनं आम्हांला खऱ्या अर्थानं जवळ आणलं!

वन वर्ल्ड ट्रेड सेंटर
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर

थंडीचे सगळे दिवस घराची ऊब आठवत एकटेपणात काढले. पहिल्यांदा भुरुभुरु बर्फ पडताना पाहून लहान मुलीसारखी रस्त्यात नाचले, न्यू यॉर्कमधला ख्रिसमसचा झगमगाट अनुभवला, न्यू इयरला टाइम स्क्वेअरचा बॉल ड्रॉप इव्हेन्ट पाहिला. शेवटी कधी थंडी सरते असं झालं. थंडीचा ऋतू सरताच मी बाहेर पडू लागले. इंडियन स्टोअरमधून भाज्या, सामान आणायला, संध्याकाळी फिरायला एकटी जाऊ लागले. वॉटरसाइडला चालत गेलं की चारपाच मोठी हेलिपॅड होती. तिथं पिक्चरमध्ये दाखवतात तशी सुटाबुटातले, हातात चपटी ब्रिफकेस घेतलेले लोक चॉपरमधून उतरून रोज कामाला जायचे! एम्पायर स्टेट बिल्डिंगवर रोज निराळ्या रंगाचे लाइट लागत. वॉटरसाइडच्या डेकवरून रोज दिवाळीत उजळल्यासारखी संपूर्ण मॅनहॅटनची स्कायलाइन दिसे.

इतका हाय क्लास एरिया असून राहणारे लोक फार मनमोकळे भेटले. सुरुवातीला वाटायचं काय गावंढळ आहोत आपण, पण जे भेटत ते आस्थेनं चौकशी करत, अरीनशी खेळत, काही लागली तर स्वतःहून मदत करत. बसेस, सबवे ट्रेन, येलोकॅब आणि लोकांची गर्दी यांमुळे मुंबईचा फील आला. ९/११ मेमोरियल, वन वर्ल्ड ट्रेंड सेंटर, ब्रुकलिन ब्रिज, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सेंट्रल पार्क सारं दोन-दोन वेळा पाहून झालं. न्यू यॉर्कसारख्या शहरात एकटीनं फिरल्यामुळे जो आत्मविश्वास आला, तो वेगळाच! बघता-बघता वर्ष संपत आलं आणि पुढचा प्रवास दुसऱ्या ठिकाणी करायचाय हे कळलं. अजितला सिऍटलमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये फेलोशिपची संधी मिळाली. एवढा प्रवास करून आल्यावर हक्काचं छप्पर म्हणून टेकायला मिळालेलं घर, दिवसभर पिल्लाचे बोबडे बोल, माझ्या फोनवरच्या गप्पा आणि आमचं गूज ऐकलेल्या भिंती, तीन महिने जगाशी संपर्क म्हणून राहिलेली आणि जीव की प्राण झालेली खिडकी हे सारं सोडून द्यावं लागलं. गोळा केलेलं थोडंफार सामान अमेरिकन पद्धतीनं रस्त्यात ‘डंप’ केलं आणि भरभरून आठवणी पोतडीत भरून आम्ही ढगांच्या दुलईत आणि निसर्गाच्या कुशीतल्या सिऍटल शहरात आलो. अमेरिकेच्या एका टोकावरून तीन टाइम झोन आणि नऊ तासांचा विमानप्रवास करून दुसऱ्या टोकावर पोचलो. या वेळी आनंद हा की, सोबतीला भारतातून आलेले सासू सासरे होते.

चारही बाजूंनी पर्वताचा वेढा आणि त्यामुळे अडून जमलेले शुभ्र ढग, सतत भुरुभुरु पाऊस, अखंड हिरवळ अशी सुरेख हवा. खूप फ्रेंडली लोक आणि मोकळं वातावरण, शहर असूनही हिलस्टेशनचा भास. युनिव्हर्सिटी पाहण्यासाठी तर दुरून लोक येत. एरवीची हिरवळ, उंच उभा माउंट रेनियर, पानगळीच्या दिवसातले रंग आणि वसंतात फुलांचे बहर, वर्षाचे बारा महिने फिरायला आणि पाहायला निसर्गसौंदर्याची साथ. न्यू यॉर्कच्या मानवनिर्मित सौंदर्यापुढे निसर्गाचा हा अविष्कार नक्कीच सरस आहे. आत्तापर्यंत अमेरिकेच्या एकंदरीत वातावरणात मी रुळले होते. उन्हाळ्याचे तीन महिने जून ते सप्टेंबर फार छान गेले. घरात नव्यानं बदल म्हणजे डिशवॉशर आणि कार्पेट असल्यानं व्हॅक्युम क्लिनर हे दोन नवे साथीदार होते. घराला गच्ची होती. चालत जायच्या अंतरावर दुमजली टुमदार पब्लिक लायब्ररीची शुभ्र इमारत पाहून हरकून गेले. रहिवासी असल्याचं प्रूफ दाखवलं की सगळ्या सुविधा मोफत. लहान मुलांचे रोज काहीतरी कार्यक्रम. अरीनचा वेळ छान जायचा. मोठाल्या स्वच्छ हिरव्यागार बागाही होत्या जवळ. इथंही बसेस आणि उबेर असल्यानं गाडी शिकायची गरज लागली नाही.

ज्यामुळे सिएटल सतत ढगात असते तो माउंट रेनियर
ज्यामुळे सिएटल सतत ढगात असते तो माउंट रेनियर

इंडियन स्टोअर मात्र बरंच लांब होतं. दोनदा बस बदलून दोन तास प्रवास आणि पिठाचं, भाज्यांचं, धान्याचं ओझं उचलून आणावं लागे. इथं शिक्षणासाठी राहणाऱ्या लोकांना कामाचा मोबदला नोकरीइतका मिळत नाही. एरवी भरभरून खर्च करताना, आता विचार करून गरज बघून खरेदी करावी लागते. जिथंजिथं मनुष्यबळाचा प्रश्न येतो, तिथंतिथं त्या सेवांच्या किमती अफाट आहेत. क्लिनर, प्लम्बर, कूक, बेबी सीटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन यांतलं काहीच परवडत नाही. ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे वर्षभर अमेरिकेत राहिलेला माणूस या सगळ्यांत तयार होतो!! एक गोष्ट खूप जाणवली ती म्हणजे ‘गरज ही शोधाची जननी आहे’ हे इथलं ब्रीदवाक्य असावं! एरवी भारतात सहज मिळणाऱ्या वस्तू मिळवायला इथं फार धडपड करावी लागते. गणपती बसवताना मूर्ती बुक करायला फार लांब जावं लागेल म्हणून क्ले आणि हत्यारं मागवून मूर्ती घरीच बनवली. पावभाजीचे पाव, चाटच्या पुऱ्या, कुल्फी, रसमलाई इत्यादी खायची इच्छा झाली की घरी बनवू लागले. मोठा ओव्हन होता, रॉ मटेरियल सहज मिळतं, बेकिंगची आवड लागली. भारतात असते तर या गोष्टी स्वतः करायचा विचारही केला नसता!! अरीन मोठा होत होता, सासू-सासरे होते त्यामुळे माझ्या अभ्यासात, कामात राहून गेलेल्या आवडी जोपासून घेतल्या. दिवाळीही धामधुमीत गेली. एकंदरीत सहा महिने कसे गेले ते कळलं नाही. मधला एक महिन्याचा कठीण काळाचा अपवाद सोडता.

चिमणी खिडकीच्या फटीतून वळचणीला यावी, खिडकी बंद व्हावी आणि ती तडफडत-फडफडत राहावी, अशी अवस्था झाली माझे बाबा आजारी पडले तेव्हा. माझा जुना व्हिसा संपलेला आणि नवीन आला नव्हता त्यामुळे मला देश सोडला तर परत जायची निश्चिती नाही आणि बाबांना ऍडमिट केलेलं. आत्तापर्यंत माझी सारी आजारपणं त्यांनी उशाशी बसून काढलेली, बाळंतपणात अरीनला रात्रभर घेऊन बसत, त्यांना गरज असताना मी मात्र जवळ नाही! बाहेर राहणाऱ्यांचं हे दुःख निराळंच असतं, व्हिसाच्या तांत्रिक अडचणी, त्यातले बारकावे याची कोणाला कल्पना नसते. त्यातून जाणारा कुढत भरडून निघत असतो आणि पाहणाऱ्याला गैरसमज होतात. सुदैवानं आई, भाऊ डॉक्टर आणि मामा-मामी, काका-काकू, आप्तेष्ट सगळे जवळ असल्यानं सगळ्यांनी हे आजारपण धीरानं पार पाडलं. आमच्यावर कोणताही दबाव येऊ नये, ही काळजी घेतली. माझा नि अजितचा जीव अर्धा होऊन अपराधी भावनेनं कुरतडून काढलं होतं.

दुःख जसं तसाच पाठोपाठ आनंदही येतोच. भावाचं लग्न ठरल्याची बातमी आली आणि सासू-सास-यांसोबत मीही परत जायची तयारी सुरु केली. त्यांच्या फ्लाइटमध्ये तिकीट मिळालं नाही त्यामुळे पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास अरीनला घेऊन एकटीनं करण्याची वेळ आली. कोल्हापूर-पुणे-मुंबई हा टप्पा सोडून मी एकटी फारशी फिरलेली नाही. मनात धाकधूक होती. प्रचंड थकवा आला होता, पण मुंबईचे पहाटेचे दिवे विमानातून दिसल्यावर आज खरी दिवाळी असं वाटलं. जमिनीवर पाय ठेवताच आनंदानं रडू आलं. मला पाहून तिथली सफाई कामगार हसू पसरून ‘गुड मॉर्निंग’ म्हणाली तेव्हा तिला ‘सुप्रभात’ म्हणून मीही तोंडभर आणि मनापासून हसले. दोन महिन्यांत वर्षभराची साचलेली कामं, गाठीभेटी, समारंभ आणि खरंखुरं माहेरपण मनसोक्त उपभोगून मी परतीचा रस्ता घेतला.

या वर्षी सिएटल मध्ये हिमवर्षाव झाला !
यावर्षी सिएटल मध्ये हिमवर्षाव झाला !

सिऍटलचे उन्हाचे महिने कधीच संपलेले, उरलेले नऊ महिने फक्त ढगाळ हवा आणि पिरपिर पाऊस, हा पाऊस आभाळ कधीच मोकळं करत नाही. कुंद वातावरणात फक्त आळस आणि उदासी भरून राहते, एकटेपणा डोकावू लागतो. या एकटेपणात आत्तापर्यंत नेहमीच जवळचे अमेरिकेत राहणारे नातेवाईक अजितचे मामामामी, त्याची चुलत आत्या, माझा मामेभाऊ आणि बरेच मित्रमैत्रिणी यांचा खूप आधार वाटत आला आहे. तरीही उरलेल्याची झळ अरीनला लागू नये म्हणून बागेत नेणं, लायब्ररीत गोष्टी ऐकायला नेणं, प्लेडेट अरेंज करणं जेणेकरून तो मुलांत आणि लोकांत मिसळून राहील हे चालू ठेवते. भारतात शेजारी, मित्र-मैत्रिणी सहज मिळतात. इथं मिळवाव्या लागतात. मी धार्मिक वगैरे अजिबात नाही, पण घरात धार्मिक वातावरण, लहानाची मोठी झाले त्या पुराणातल्या मजेशीर गोष्टी ऐकत. पंचतंत्र, रामायण यांतल्या छोट्याछोट्या हनुमान, प्रल्हादबाळ, ध्रुवबाळ, गणपती या मनोरंजक गोष्टी मी त्याला सांगू लागले. होळी, रंगपंचमी ही मजा त्यालाही कळावी म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक आणि फूडकलरची पंचमी खेळून झाली. तो मोठा होईल, तेव्हा त्याच्या स्वतःच्या गॉड आठवणी असतील, पण त्यावर इवलीशी का होईना माझ्या आठवणींची सावली असेल!! नुकतंच सगळ्यांना भेटल्यामुळे आठवणी काढणं, फोटो पाहणं, स्काइप करणं हेतर चालूच होतं. एबीसीडीबरोबर क क कमळाचा चित्र काढून त्याला शिकवला, प्राणी, पक्षी, भाज्या साऱ्यांची इंग्लिश आणि मराठी नावं शिकवली. घरापासून जितके दूर राहतो तितकी नाळ घट्ट राहते, याचा प्रत्यय आला!!

पुन्हा फेलोशिपचं वर्ष संपत आलं आणि आम्ही दुरस्त्यात उभे राहिलो… आता काय? परत तर जायचंय पण आणखी एक संधी खुणावते आहे. फिलाडेल्फियाला थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीमधून बोलावणं आलं आणि आम्ही पुन्हा तयारीला लागलो. आत्तापर्यंत ड्रायव्हिंगची गरज लागली नव्हती पण पुढे लागेल म्हणून महिन्याभरात शिकून लायसन्स काढलं!! गाडी चालवताना सारखं कोणीतरी मध्ये येईल की काय असं वाटून सारखा गियरकडे हात जायचा. पहिल्या प्रयत्नात फेल झाले पुन्हा टेस्ट दिली. जमून गेलं. या वेळी घर म्हणून बरंच सामान जमा केलं होतं. ऑफर अप, लेटगो यांसारख्या ऑनलाइन ॲपवर काही विकलं काही गुडविल स्टोअरमध्ये देऊन टाकलं. पुन्हा सगळं गुंडाळून नवीन शहरात आलो. पहिले काही दिवस घर नव्हतं त्यामुळे एअर बीएनबी करून राहिलो. एकाच घरात आम्ही एक अमेरिकन जोडपं आणि एक चायनीज बाई व तिची अरीनएवढीच मुलगी राहत होतो. हा अनुभवही फार निराळा होता. गाडी करून घर शोधलं. अप्रूव्ह झालं. नवीन घर पुन्हा लावलं. हे तिसरं घर मात्र टिपिकल अमेरिकन गावातलं घर आहे. बाहेर मोठं आवार, खूप नीटनेटकं गवत, खारुट्या, ससे, चिमण्या सारं आहे. मी आणि अरीन खूश. फारशी माणसं दिसत नाहीत. घराजवळ दुकानं नाहीत. सगळं एक ते दीड मैलावर. भरपूर चालावं लागतं. महिन्याभरात सेटल होतोय तोवर भावाच्या लग्नासाठी घरी जायची वेळ आली आहे आणि त्यासाठी आज ही बॅग भरायला हवी.

हातातलं पुस्तक बाजूला ठेऊन मी खरंच विचार केला काय मिळवतो आपण हे सगळं करून? हा विचार या दोन वर्षांत हजारदा शिवून गेलाय. कशासाठी? अमेरिकेतलं मेडिकलचं शिक्षण भारताच्या वीसेक वर्ष पुढं आहे. अजितला ज्या केसेस बघायला मिळतात, ज्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं काम करायला मिळतंय ते काहीतरी वेगळं आहे. यासाठी पाच वर्षांत त्यानं स्वकमाईचे पैसे गुंतवले आहेत. कष्टांची गुंतवणूक त्याहून जास्त आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून येतो, तेव्हा एका बाजूला या वातावरणात दडपून जायला होतं, एका बाजूला फार मोठा अनुभवांचा खजिना हाती येतो. मेडिकल फिल्डमध्ये शिक्षणासाठीची धडपड फार उशिरापर्यंत चालू राहते. तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावरचे आम्ही दोघं कित्येक वेळा विचार करतो आता थांबावं, कोल्हापुरात छानसं घर घ्यावं, नऊ ते चार काम करावं आणि निवांत राहावं; पण त्यात वेगळं काय? पुढे हेच करायचं आहे. परत जायचं आहे, पण अपराधी भावनेनं नाही. ही भावना मला देशाबद्दल कधीच शिवलेली नाही. जे शिकू त्याचा उपयोग स्वतःसाठी तर आहेच पण त्यातून कधी ना कधी देशासाठी काहीतरी करू हे निश्चित.

माझ्या ओळखीचे कित्येक लोक अमेरिकेत राहून भारतात आर्थिक स्वरूपात मदत पाठवतात. आता आपल्या देशाबद्दल माझ्या भावना जेवढ्या तीव्र आहेत, तेवढ्या तिथं राहूनही नव्हत्या. अजितला कित्येक वेळा अपराधी वाटत राहतं, माझ्यासाठी. डॉक्टर असून मला घरी बसून राहावं लागतं म्हणून, अरीनला कुणाकडे सोपवणं जमण्यासारखं नाही. अजित जेव्हा त्याचे अनुभव सांगतो तेव्हा उत्साह येतो, डोळे चमकतात आणि मीही पुस्तक हातात घेते, पण घर समोर दिसू लागतं, अरीनचे विचार येतात आणि पुन्हा अभ्यास बाजूला पडतो! भारतात आणि अमेरिकेत दोन्हीकडे राहण्यात कष्ट आहेत, स्वरूप वेगळं आहे, पण सोपं काहीच नाही. आसपास जवळचे लोक असल्यावर कष्टाची वाट सुखकर होते, काट्याकुट्यांनीं झालेल्या जखमांवर फुंकर घातली जाते, एकटा माणूस स्वावलंबी होतो पण वाट्याला जो एकाकीपणा येतो, तो या जखमा आणखी चिघळून ठेवतो.

अमेरिकेत ऐशोआराम आहे, भरपूर पैसा आहे, सोयीसुविधा आहेत. हे सारं खरं असलं, तरी कष्टही तेवढेच आहेत आणि त्यात शॉर्टकट अजिबात नाही. नुसते शारीरिक आणि मानसिक नाहीत, तर संवेदनशील लोकांना भावनिक कष्ट जास्त आहेत. एवढं करून काय मिळतं? आठवणी, अनुभव आणि आत्मविश्वास. भारतातल्या अंगणातली तुळस अमेरिकेत होली बेसिल म्हणून वाढते, तिला पाहून रोज एकच विचार येतो की,जगाच्या पाठीवर कुठंही गेलं, तरी पायाखालची पृथ्वी, डोक्यावरचं आभाळ, स्वच्छ ऊन, निर्मळ वारा आणि रिमझिम नाचणारा पाऊस; हे सगळं सारखंच असतं. या कोणाची माया कधीच कमी होत नाही, बदलत नाही… कुठंही राहिलो, तरी देशासाठी आम्ही तेच आहोत, दूर राहिलेल्या घराला हृदयात घेऊन फिरणारे प्रवासी.

प्राजक्ता करंबेळकर

13516322_1291560197540753_7705463189346784689_n

इ-मेल – prajakta810@gmail.com

वाचनाची आवड. कॉलेजमध्ये असताना कविता लेखन,स्टुडंट मॅगझिनच्या मराठी विभागाचे संपादन. लग्नापूर्वी शिक्षणात आणि सध्या अडीच वर्षाच्या मुलामध्ये रमल्यामुळे वेळ मिळेल तसे  छंद म्हणून वैयक्तिक ब्लॉग स्वरूपात हलकेफुलके ललित व कविता लेखन. बालआरोग्य तज्ज्ञ.

6 thoughts on “मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका

  1. Kiti sadha, saral, soppa ani netkya shabdat lihilays tu…Mazi pan US madhe alyawarchi dhandal tuzyahun vegli navti…khup athvani jagya zalya…thank you, dil se 🙂

    Liked by 1 person

  2. Last paragraph. . It touches heart. .
    Khup chan shailee.
    Tumchya personal blog chi link milu shakel ka?

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s