हेमंत कर्णिक
तसं पाहिलं, तर ट्रेकिंगमध्ये दर वर्षी काय नावीन्य असणार? पण हिमालय नुसत्या दर्शनानं प्रचंड हुरूप देतो, मन शांत करतो आणि दर वर्षी काहीतरी नवीन अनुभव मिळतोच मिळतो. हा ट्रेक माझ्यासाठी अगदीच वेगळा निघाला!
दर वर्षी ‘ग्रो यंग ट्रेकर्स’ हिमालयात जातात. पूर्वी सामान, स्लिपिंग बॅगा, तंबू आणि शिधा, सगळं स्वतःबरोबर नेत आणि स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत. पण आता ग्रूपचं सरासरी वय पंचावन्नच्या पुढे गेलं. आता मुंबईहूनच गाइड, तंबू, हमाल, वगैरे वगैरे बुकिंग करतात. ग्रूपबरोबर एकदातरी ट्रेक केलेल्यांची संख्या साठ-सत्तर झाली असावी. त्यातले ट्रेकिंगमधून खरोखर निवृत्त झालेले सोडून सर्वांना नवीन ट्रेकचं आमंत्रण देतात. दर वेळी मला संदेश येतो: “हेमू, इस बार हिरामणी जा रहे हैं। तू आयेगा ना?”
याही वर्षी आलं. अत्यंत चोख व्यवस्थेची दीर्घ परंपरा निष्ठेनं पाळली जाण्याची आता शंभर टक्के खातरी असल्यानं ट्रेकच्या ठरलेल्या काळात आपण मोकळे आहोत की नाही, इतकंच बघायचं असतं. मोकळा होतो. गेलो.
दर वर्षीच्या मुंबई-दिल्ली प्रवासाची काय नवलाई! तरी सांगायचं तर या वेळी एकच वेफरची पुडी खाल्ली. एरवी बसल्या-बसल्या वेळ काढण्यासाठी वायफळ खाणं, चहा, असं खूप होतं. या वेळी वाचन केलं आणि दुपारी जेवल्यानंतर झोप काढली. म्हणजे मुंबई ते हजरत निजामुद्दीन, हा प्रवास एसी आणि पुढचा दिल्ली ते काठगोदाम, हा साधा स्लीपर क्लास. त्या प्रवासात भरपूर ‘जनता’ आत डब्यात शिरलेली. त्यांच्या सततच्या हालचाली, त्यांच्या गर्दीतून वाट काढत फिरणारे चहा, खानावाले, त्यांची अखंड बडबड. त्यातल्या दोन (अर्थात बिनरिझर्वेशनवाल्या) प्रवाशांचा सूर समंजस. एक बाई. ‘इस डिब्बेमे लेडीज कंपार्टमेंट नही है क्या?’ असं दरडावणारी. त्या समंजस सूरवाल्यांकडून तिची समजूत. बायकांसाठी कूपे नाही असं कळल्यावर निषेध म्हणून तिला जनरल लेडीज डब्यात जायचं होतं. मग तिला न कळणाऱ्या तिच्या फिरक्या.
या सगळ्या अखंड आवाजानं आनंद कावला. तो झोपला होता, त्या बर्थवर पिशवी (हल्ली सगळ्यांकडे पाठीवर टाकायच्या सॅकच असतात) वा हात ठेवणाऱ्यावर खेकसू लागला. पण मला त्रास होईना! मग लक्षात आलं, हे यूपी! आपल्याला एके काळी याची सवय झाली होती. इथं सामाजिकतेचे आयाम वेगळे. आपलं डोकं त्या मूल्यचौकटीबरहुकूम करून घेतलं नाही तर अखंड मनस्ताप. (अरे पण हे तर थेट मुंबईच्या गणपतीला एका बाजूनं, तर दुसरीकडून सेल्फीमग्न मोबाइल-हेडफोनधारी तरुणाईच्या उंबरठ्यावरच्या पिढीलाही लागू आहे की!)
हे ज्ञान झालं आणि एक चमत्कारिक ओझं माथ्यावरून उतरल्याचा भास झाला.
काठगोदामलाच जायचं, हलद्वानी नको; असा आग्रह संदीप का धरत होता, ते पहाटे पाचला गाडीतून उतरून रस्त्यावरचा प्रवास सुरू करायच्या आधी फ्रेश, वगैरे होण्यासाठी काठगोदाम स्टेशनच्या स्लीपर वेटिंग-रूममध्ये शिरलो, तेव्हा कळलं. अत्यंत स्वच्छ, चकचकीत असे संडास, बाथरूम, बेसिन. मी तर उत्साहात गार पाण्यानं आंघोळपण करून टाकली. चहाबिहा नंतर.
गाड्या आल्या. निघाल्या. गारठा नाही.
भीमताल हे एक टुमदार गावच आहे. इथले रस्ते आता दुपदरी झाले आहेत. त्यामुळे समोरून गाडी आली, तरी थबकण्याची गरज पडत नाही. हां, ओव्हरटेक करताना वेळ साधावी लागते!
मध्येच एकदा गाडीच्या पुढ्यात ओंजळभर होईल एवढा दगड पडला. चालवणारा निवांत. “कल रात बहुत बारीश हुई, इसलिये पत्थर गिर रहे हैं।” मी, काका, संतोष आणि सूर्यकांत सँट्रोत, बाकी जीपमध्ये. मी अर्थात मागे, मध्ये.
एक गाव गेलं. नाव ‘गरम पानी’. पुढे आणखी एक गावः राता पानी. वर डोंगरातसुद्धा होती ही ‘पानी’वाली गावं. का? या डोंगरभागात पाण्याचं अप्रूप नाही, मग गावांना पाण्यावरून नावं का?
हळूहळू निसर्गाचा नक्षा बदलला. नक्षी बदलली म्हणायलाही हरकत नाही. परिचित झाडं कमी होत सूचिपर्णी पाइन वाढले. डोंगरउतारावर ताठ उभे पाइन्स. ‘सूचिपर्णी’ या शब्दाला सुंदर नाद आहे. शब्दाचं रूपही मोहक आहे.
जेवायला टपरीसम ठिकाणी थांबलो. उपाशी राहायचं नव्हतं आणि पुन्हा वळणावळणाच्या चढउतारांमधून बराच वेळ जायचं असल्यानं जास्त खाणंही ठीक नव्हतं. असो. गाडी लागणाऱ्या उलटीवाल्यांनी जेवण केलं नाही; सफरचंद खाल्लं, तिथंच विकत घेऊन. बाकी आम्ही जेवलो. माशाचं कालवण होतं. ‘नदीत मिळतात. छोटेच नाहीत, चांगले दहावीस किलो भरतील असेही मिळतात.’ जेवल्यावर चहा प्यायलो. ‘कटिंग’. शेजारी पीत बसलेला त्या चहावाल्याला म्हणाला, ‘हे मुंबईकर. कटिंग म्हणजे एक बटा दो.’ पुढे चौकोडीत चहा मागताना ‘दो बटा तीन’ सांगितलं, तर तो म्हणाला, ‘हां, मतलब आपको कटिंग चाहिये.’
‘हॉटेल हिमशिखर’च्या बाजूला दोनेक मजली एक छोटेखानी टॉवर. वरून सुंदर हिमशिखरं समोर. फोटो. एकाच्या पेंटेक्स कॅमेऱ्यात १००० एक्स ऑप्टिकल झूम! हा चंद्रावरच्या प्राण्याचा फोटो काढू शकेल! नंतर सूर्य मावळताना त्या बाजूचं आकाश जवळपास निरभ्र झालं आणि दृष्य आणखीच भारी झालं. दूरवर बर्फाचे डोंगर दिसणं कितीसं मोलाचं आहे? पण ‘इथं का येतो?’च्या उत्तरात हेही आहे.
मुक्कामाच्या गावाचं नाव चौकोडी. इंग्रजी स्पेलिंग Chaukori. हॉटेलचं रिसेप्शन वर. तिथून प्रवेश केला तर दोन मजले उतरून रूमवर यायचं. गाडीनं आलं तर एक मजला चढून जायचं. पहाडावरची गावं अशीच सापेक्षतावादी. ‘रूम कितव्या मजल्यावर?’ या प्रश्नाचं उत्तर ‘दुसऱ्या’ हे बरोबर आणि ‘तळमजल्यावर’ हेसुद्धा बरोबर. रस्त्याचा उतार इतका की पायऱ्या उतराव्या तसा झटपट रस्ता उतरतो.
सूर्यास्त होताना ढग जाऊन मस्त हिमशिखरदर्शन झालं. रात्री दहाला झोपल्यावर झोप पूर्ण झाल्यासारखी जाग आली, तेव्हा साडेतीन वाजले होते! डोळे मिटून पडल्यावर पुन्हा डोळा लागला. जागा झालो तर सहा. सातला चहा. आठला ब्रेड ऑम्लेट. साडेनऊला प्रयाण. सकाळी निघताना आसमंतावर पूर्ण पांढरा पडदा. हॉटेलच्या कंपाउंडपलीकडची झाडं दिसेनात. पावसाची अदृश्य पण स्पर्श सांगणारी भुरभुर. हवा गारेगार. अर्धा स्वेटर, अर्धी पँट, फ्लोटर्स बदलावेत असं वाटू लागलं. थंडी भरली की जे छातीत दुखतं, ते मुळीच दुर्लक्षणीय नसतं. पण दुपारच्या जेवणाला मुन्सियारीत असणार, म्हणजे प्रवास थोडका आहे; असं म्हणत काहीच बदललं नाही. तर काय चमत्कार! निघाल्याबरोबर वेदर बदललं आणि स्वच्छ ऊन पडलं. प्रवास सुखाचा झाला. परिसर नयनरम्य होता, वाटेत एका ठिकाणी उतरलो. कारण तिथं काही अंतरावर एक सुंदर धबधबा होता. अजून खरा ट्रेक सुरू झाला नव्हता. म्हणजे, चढाव समोर आला म्हणून चरफडण्याची वेळ दूर होती. मग वरवर चालत जाऊन धबधब्याचं नीट दर्शन घेतलं. इथं आणि यापुढे, निरपवादपणे, जेव्हा म्हणून थांबलो व थबकलो; अशोकनं सिगारेट वा विडी पेटवलीच. ‘घरी अजिबात पीत नाही,’ म्हणत उमाशंकरनं त्याला साथ दिली. तिसरा भिडू गोपाळ! यात तसा वेळ फार गेला नाही; पण रस्ता फारच वळणदार, त्यात अनेक (दुरुस्त केलेल्या) लँडस्लाइड्स यामुळे मुन्शियारी गाठायला दोन वाजले. बसल्याबसल्या करायच्या प्रवासाचं हे शेवटचं गाव. त्यामुळे लहान. लोकांची नजर आणि देहबोली हिलस्टेशनची नाही. आमच्यातल्या काहींचं म्हणणं सीझन अजून सुरू झाला नाही. मला पटलं नाही. सीझन सुरू झाला की दुकानं वाढतील, भरतील, सजतील; देहबोली कशी बदलेल!
या गावच्या रस्त्यांचा स्लोप आणखी भीषण. तरी हिंडलो. खूप उतरून परतताना खूप चढलो. उमाशंकरनं काठ्या विकणारं एकमेव दुकान शोधून काठी घेतली. मग आणखी तिघांनी घेतल्या. हॉटेलच्या गॅलरीतून ‘पंचशूली’दर्शन. हे कालच्यापेक्षा भारी. कालच्यापेक्षा जास्त वेळ आणि सूर्य बुडाल्यावर (समुद्र किनाऱ्यावरची मुंबई सोडून डोंगरात गेल्यावरही सूर्य मावळताना ‘बुडाला’ म्हणणं बरोबर होईल का?) चंद्रप्रकाशात शो पुढे चालू! उद्या चालायला सुरुवात करायची म्हणून लवकर झोपलो. पहाटे पाचपासून लोक उठून गडबड करू लागले. माझा गजर साडेपाचचा. सातला तयार व्हायचं म्हणजे भरपूर अवकाश. मग आजसुद्धा दाढी-आंघोळ केली. आज पाणी बर्फाळ. नंतर कढत पाणी आल्यावर शिवाजीनंही आंघोळ केली. कोरड्या, पातळ चपात्यांबरोबर भेंडीची पूर्ण सुकी, तरी चविष्ट भाजी आणि अरहरची दाल. आज तीन जिपा. निघायला साडेसात. वाटेत पोलीसच पोलीस. ‘सीएम येणार आहे.’ पुन्हा कालच्याच रस्त्यानं मागं आलो. कालच्या धबधब्याच्या थोडं अलीकडे येऊन बरोबर सव्वानऊला काही महिन्यांपूर्वी आजारपणात देवाघरी गेलेल्या कोटियनसाठी दोन मिनिटं शांतता पाळून चालायला सुरुवात.
चालायला म्हणण्यापेक्षा ‘चढायला’ म्हणणं जास्त बरोबर होईल. चढ उभा नाही तरीपण फक्त चढ. एकदाच वीस पावलांपुरता रिलीफ. वाटेत खायला पार्ले-जीचा छोटा पुडा, छोटुकलं कॅडबरी आणि मँगो ड्रिंक. ते संपवताना स्थानिक गाइड महिपाल म्हणाला, ‘आधा हो गया.’ तेव्हा वाटलं, सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी जुजबीच चाल. पण तसं झालं नाही. खूप चढणं झालं. हळूहळू महिपालचं धोरण लक्षात येऊ लागलं. मग त्याला सरळच विचारलं. त्यानंही सरळ उत्तर दिलं, “आपको सब कुछ बता देना ठीक नही होता; आधा बताना ठीक होता है!”
आज सोबतीला खेचरं आणि हमाल-स्वयंपाकी. खेचरांची डबल गडबड. एक म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही काय वेगानं चालू, याचा अंदाज या स्थानिक सोबत्यांनी चुकीचा केला. त्यामुळे सामान उशिरा वर आलं. टेंट लावणं त्यांना नीट जमेना, तेव्हा शिवाजीनं मार्गदर्शन केलं. टेंट लावून झाल्यावर कळलं की दोन खेचरवाले सीएमकडे पळाले. त्यामुळे सगळं सामान वर आलेलंच नाही. कॅरी मॅट्स आणि स्लीपिंग बॅग्स खालीच राहिल्या आहेत. कांदेबटाटेसुद्धा खाली राहिले आहेत. परिणामी आमच्या बॅगा टेंटमध्ये ठेवून आम्ही बाहेर. निसर्गानं कृपा केली आणि पाऊस पाडला नाही. त्यामुळे कपडे बदलून बाहेर वेळ काढत राहिलो तरी फार बिघडलं नाही. गेल्या वर्षी अशीच वेळ आली होती, तेव्हा हात-पाय गारठत असताना जोरजोरात हालचाली कराव्या लागल्या होत्या. त्यात सँड्रा गारठली होती.
आणखी एक. चालायला सुरुवात करताना लघवी करायला गेलो, तर पायात जळवा नाचताना दिसल्या! तेव्हा की नंतर केव्हा, शिरल्याच त्या आत. डाव्या पायावर दोन, उजव्या पायावर एक. पांढरे मोजे आवडत नाहीत म्हणून वापरून टाकायला इथं आणले; तर दोन्ही मोजे लालमलाल! माझं बघून एकेकानं बूटमोजे उतरवले. चारेक जणांच्या पायांना डसलेल्या निघाल्या!
मुक्कामाच्या जागी सर्वत्र शेणाचे पो; पण गुरं दिसेनात. थोड्या वेळानं वरून येऊ लागली. क्वचित गायी, बहुतेक लहानमोठे सांड. बघता-बघता पन्नासेक आले. तंबूभोवती रेंगाळले. त्यांतल्या काहींनी ताजे पो टाकले. हाकलले तरी हलेनात. त्याचं बरोबर होतं, ते नव्हते लोचटपणा करत आमच्याजवळ येत; आम्हीच त्यांच्या हागिनदारीत ठिय्या दिला होता. पण एखादी दुसरी गाय आणि बाकी सारे न खोटलेले वळू, असं कसं? एक उत्तर म्हणजे पाळणाऱ्यांनी दुभत्या गायी ठेवल्या, पण या जंगलभागात सांडांचा काय उपयोग? सोडून दिलं जंगलात. इथल्या हिरव्या गवतावर मस्त माजलेत. चंगळ आहे इथल्या वाघांची आणि अस्वलांची!
हे नीट पटलं नाही. पण वेगळं सारासार स्पष्टीकरण सुचेना. दुसऱ्या दिवशी इथंतिथं हिंडताना खालच्या बाजूला घर केलेल्या दीवानसिंगनं उत्तर सांगितलं: हे बैल खालच्या गावातल्यांचे. इथं, माझ्यापाशी चरायला ठेवलेत. महिन्याभरात मी इथलं घर बंद करून खाली उतरणार.
दीवानसिंगकडून बरीच माहिती मिळाली. ‘पूर्वी गुजर वर येऊन राहायचे. आणखीही कुणी कुणी यायचे. आता सगळे मैदानी प्रदेशात स्थिरावले. आता मी आणि तो पलीकडच्या टेकडीवरचा सोडून कुणीच वर येत नाही. तुम्ही वर जाल तिथं भेटतील दोघे चौघे. पण तेवढेच. पूर्वी चोहीकडल्या प्रत्येक टॉपवर गुरं, शेळ्यामेंढ्या राखणारे असत.’
‘चारसहा महिने माझा मुक्काम वर. पंधरादिवस-महिन्याभरात खाली फेरी टाकून भाजीबिजी घेऊन येतो. इथं बटाटा, मुळा, वगैरे भाज्या लावण्याचा प्रयत्न केला; पण मी एकटा. जागेवर नसलो की फस्त होतं सगळं.’
पलीकडच्या घराभोवती राजमा, मका, भांग, बटाटे लावलेले दिसले.
हे ‘बुग्याल’. जंगलप्रदेशात लहानसा पठारासा गोटा. त्यावर आमचा मुक्काम. चार तंबू. प्रत्येकात तीन जण. माझ्याबरोबर शिवाजी आणि उमाशंकर. झोपताना जरा दाटीच झाली; पण झोप छान लागली. झोपायच्या वेळी गप्पागप्पांमध्ये माझ्या मनातलं एक भलं मोठं टेन्शन उतरलं. शिवाजी म्हणाला, ‘रात्री तंबूमध्ये उठबस करताना धाप लागते,’ तर त्याच्याशी सगळेच सहमत झाले! तोवर मला वाटत होतं, हा आपला प्रॉब्लेम. कदाचित एरवी सुप्त असलेला आणि इथं जागा होणारा आपला क्लॉस्ट्रोफोबिया. या धाप लागण्यामुळेच तर मागे सुंदरडुंगाला तुफान पावसातल्या काळ्याकुट्ट अंधारात जवळपास धीर सुटला होता. पण घाबरायचं कारण नाही; सगळ्यांनाच असं होतं आहे! हुश्श! आता हा फोबिया नाही, हे नक्की झालं तेव्हा आता असं का होतं याची कारणं शोधू! च्यायला, पाठीवर पिट्टू घेऊन तासनतास चढण्याची उमेद बाळगायची आणि तंबूच्या आत नुसती उठबस करताना लागणारी धाप मुकाट भोगायची?
सकाळी कळलं की रात्री झोपायला गेलो तेव्हा साडेआठ वाजले होते! पाच वाजता उठलो. साडेपाचला बेड टी. काल कपड्यांवर पाणी सांडलं आणि आतपर्यंत सगळे कपडे ओले झाले होते. ते अजिबात वाळले नव्हते. रात्री ते बाहेर ठेवणं शक्य नव्हतं, कारण दवामुळे उलट चिंब भिजले असते. तेच परत घालण्याची पाळी आली नाही कारण संदीपचं ऐकून एक एक्स्ट्रा सेट सोबत ठेवला होता. तो चढवून, मोठी सॅक पॅक करून नाश्त्यासाठी तंबूबाहेर पडलो, तर बॅड न्यूज. दत्ता सातोसे घसरून पडला आणि त्याला आता आडव्याचं बसतंही होता येत नाही आहे. त्याला मालिश केलं, आयोडेक्स लावलं, कसलंसं बँडेज चिकटवलं; पण दत्ताच्या असह्य वेदना कमी होईनात. कठीण आणि कठोर निर्णय घेण्याची वेळ आली. बऱ्याच पर्यायांचा विचार झाला. शेवटी दत्ताची पाठ उद्या सकाळपर्यंत दुरुस्त होण्याची काहीच शाश्वती नाही, हे लक्षात घेऊन त्याला तातडीनं मागे पाठवून द्यायचं ठरलं. जायबंदी (लोअर) पाठ घेऊन घोड्यावरून खाचखळगे पार करणं त्याला शक्य झालं नसतं. वाटेत फोटो काढत आणि जमेल तसे whatsapp वर टाकत आलो. पण आज रेंज पूर्ण गायब. परिणामी फोन करून डोली, स्ट्रेचर मागवता येत नाही. आमचं नशीब म्हणून तो बाहेर आला आणि जीव एकवटून पावलं टाकू लागला. मग त्याला एक काँबिफ्लॅम खिलवली आणि काँबिफ्लॅमचीच एक स्ट्रिप सोबत दिली. त्याच्याबरोबर हमालांमधले तीन जण गेले. ते त्याला बागेश्वरच्या बसमध्ये बसवून परत वर येणार. तोपर्यंत आमचा मुक्काम इथंच. म्हणून मग आता ठरलेल्या दोन ग्लेशियरपैकी एकच करायची किंवा एकदम दोन्ही करायच्या. (पण तसं झालं नाही. नंतर कळलं की ‘हिरामणी’ अशी काही ग्लेशियर नाही, ते एक ठिकाण आहे.)
निघताना दत्ता म्हणाला, “सॉरी संदीपशेट, …” पुढे बोलला असता पण त्याचे डोळे भरून आले आणि तो रडू लागला. बांध फुटल्यावर त्याला आवरेना. कसाबसा शांत झाला आणि दोन्ही हात दोन खांद्यांवर टाकून हळूहळू चालू लागला. हे सकाळी आठसाडेआठ वाजता. त्याला बागेश्वरच्या बसमध्ये बसवून हमाल लोक दुपारी साडेतीनपर्यंत वर आलेसुद्धा!
दत्ताबद्दल थोडं सांगायला हवं. पंधरा दिवसांपूर्वी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड करून आलेला दत्ता लगेच आमच्याबरोबर आला होता. ‘आता रिटायर झालो, आता फिरणार!’ असं उजळलेल्या चेहऱ्यानं म्हणत होता. जीपप्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दत्ता माझ्याबरोबर होता, तेव्हा त्यानं कॉमनसेन्स वापरून दुरुस्त केलेल्या क्रॉनिक दुखण्यांच्या कहाण्या मस्त रंगवून सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, एकाला एकाच कुशीवर झोपल्यानं त्या बाजूचे केस विरळ झाले तर असं टेन्शन आलं की, विरळ केसांमुळे आपलं लग्न कसं होणार? मग तो वेगळ्या पद्धतीनं झोपू लागला आणि त्याची जी मान धरली, ती तऱ्हेतऱ्हेचे उपाय करूनही ठीक होईना. मान वाकडी का झाली याचं निदानच होईना. शेवटी दत्तानं त्याच्याशी बोलून त्यानं नेमकी कोणती सवय बदलली हे शोधून काढलं आणि ‘विरळ केसांना पोरगी देणार नाही म्हणून घाबरतोस, वाकड्या मानेला देणार?’ असं म्हणून परत पहिल्यासारखं झोपायला सांगितलं. ‘चार दिवसांत मान दुरुस्त!’ अशाच गोष्टी कुणाकुणाची कंबर धरल्याच्या, पोट बिघडल्याच्या, डिलिवरीच्या. शिवाय स्वत: रात्री खेकडे धरल्याच्या, घरच्या मांजरीसाठी हातानं मासे पकडल्याच्या. दत्ताची वाणी रसाळ, मनोवृत्ती प्रसन्न. ऐकायला मजा आली. एकूणच कुणी गावाकडच्या गोष्टी गावठी परिभाषा वापरत, तपशील देत सांगू लागला की मला आवडतं. मी खूणगाठ बांधली, या माणसाला सोडायचं नाही. तर तोच पहिल्या दिवसानंतर मागे फिरला.
पण ट्रेक म्हणजे माझ्यासाठी सगळी अवधानं मागं ठेवून दहापंधरा दिवस मजेत, हिमालयाच्या परिसरात घालवायचे; असं असलं, तरी शिवाजी, संदीप, अशोक यांच्यासाठी एक टीम सुखरूपपणे नेऊन आणणं महत्त्वाचं होतं. त्यात कठीण निर्णय तत्काळ घेण्याचा अंतर्भाव होता. हाताशी असलेले रिसोर्सेस, हॉस्पिटलपासूनचं अंतर, उलटसुलट टाइम मॅनेजमेंट या सगळ्यांचा विचार होता. परिणामी एक दिवस आराम. थोडं वरच्या बाजूनं, थोडं इकडंतिकडं फिरणं; एक वाढीव सूपपान, एक कॉफीपान, एक भजी असं खाणंपिणं. माझ्यासाठी एक काम खासः हे लिहिणं!
मोकळ्या दिवशी काहीच काम नाही. करायला काही नाही. थोडं खाली जाऊन दीवानसिंगला भेटून आलो. मग एकदा आम्ही चौघं पाय मोकळे करायला निघालो. ऐंशीच्या पुढच्या शिवाजी काकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘वाळकी लाकडं, काटक्या गोळा करायला’. ते काम करत तो गेला पुढेपुढे; बाकी आम्हांला धाप लागली, आम्ही थांबलो. गप्पा करत, फोटो काढत. करताकरता एक क्षण असा आला की, माझ्याबरोबर, मागे-पुढे कोणी नाही आणि मला वेढून शांतता. शांततेचं भव्य लँडस्केप. नीरव हलणारी पानं आणि झाडाझुडुपांच्या लवचीक, सडसडीत डहाळ्या. रानकिड्यांची हलकी किरवट. जणू शांततेच्या कॅनव्हासवर लावलेला पातळ रंग. त्यावर दूर कुठंतरी वाहणाऱ्या झऱ्याचा खळाळ, न दिसणाऱ्या पक्ष्यांची साद. कधी इथून कधी तिथून. पण कुठून? कधी स्पष्ट कधी वाऱ्याच्या झुळकेवर तरंगत आलेली साद. मानवी आवाज शून्य. बरोबरचे सगळे थोडे दमून, थोडे रानाच्या सान्निध्यानं शांत झाले असावेत. लक्ष दिलं तर स्वतःचा श्वास ऐकू यावा.
हे बारीकबारीक क्षण. यात पर्यटनवाले टिका मारतात, तसलं प्रेक्षणीय, वर्णनीय काही नव्हे; पण या असल्या क्षणांसाठीसुद्धा इथं यायचं असतं. प्रत्येक रानाचा जसा वास वेगळा असतो, तशीच प्रत्येक रानातली शांततासुद्धा वेगळी असते. गर्द झाडी, उंच वृक्षांची दाटी, डोक्यावरची टोपी पाडणारी एकेका चढावाची उंची हे सगळं त्या वासात आणि त्या शांततेत सामावलेलं असतं. डोळे मिटले तरी स्पर्शातून, कानातून मिळणारी अनुभूती ‘हिमालयीन’ असते.
संध्याकाळी पाऊस लागला. थांबतोय, वाटेतोवर पुन्हा चालू व्हायचा. मग संततधार चालू झाली. इतकी की जेवण तंबूत बसूनच घेतलं. पाणी प्यायचं जिवावर आलं, कारण धार सोडायला त्या थंडीपावसात तंबूबाहेर जाण्याचा विचारही नकोसा झाला. आत वाट बघत बसलो. यथावकाश पाऊस थांबला. बाहेर पडलो. माहोल असा होता की आता आकाश मोकळं होणार! कसलं काय. पावसानं मोठ्या कृपेनं छोटासा लघवी ब्रेक दिला होता. तंबूत परतलो आणि पाऊस पुन्हा सुरु झाला. बराच वेळ पडला. जोरातही पडला. पण थांबत थांबत पडला. एकच टेन्शन राहिलं की, उद्या बरसाती पांघरून ओल्यात चालावं लागणार की काय.
पण तसं झालं नाही. स्वच्छ उजाडलं. ही एक कृपा आमच्यावर सगळे दिवस झाली. एकदाही पावसाच्या रिपरिपीत, ओल्यात चालावं लागलं नाही. सकाळी पावणेसातला चाल सुरू. ग्रो यंग ट्रेकर्स सकाळची वेळ पाळण्याच्या बाबतीत पक्के. पण रात्री साडे आठला झोपायला गेल्यावर सकाळी पाचला उठून साडेसहाला पाठीवर पिट्टू टाकून तैयार होणं कठीण नसतं. त्यात आंघोळ-दाढी यांची गोळी खायची असल्यावर!
ही पुन्हा उभी चढ. जराही उसंत, सूट नाही. हळूहळू, एक ताल पकडून पुढंपुढं (म्हणजेच वरवर) पाऊल टाकत राहायचं. अक्षरशः प्रत्येक पाऊल मागच्याच्या वरच्या पातळीला. जणू नियम केल्याप्रमाणे आजगावकर बंधू सगळ्यांच्या पुढे. त्यांच्या मागे सूर्यकांत माईणकर. चैतन्य तरुण आणि दांडगा असला तरी गळ्यात कॅमेरा. म्हणून तो रेंगाळणार. शिवाजी ऊर्फ काका या वेळी उत्साहात पुढेपुढे नाही. संदीपची चालही धीमी. संतोष जसा अंगानं भरला, तसा मंदावलादेखील. उमाशंकर मागेपुढे कुठंही. दत्ता परत गेला. उरला हिमालयातच काय, सह्याद्रीतही हाइक न केलेला पहिलटकर रवी. तो बिचारा शेवट पकडून. पॅक्ड लंचच्या नावानं दिलेला चार छोट्या कोरड्या चपात्या आणि कोबीची भाजी, हा खुराक केव्हा खावा, हा प्रश्न विचारता येत नाही कारण मध्यान्हसुद्धा झालेली नाही. एकदाची ती दांडगी चढण संपली आणि ‘टॉप’ आला. टॉप म्हणजे एक चिंचोळी खिंड. खिंडीत एक देऊळ. देवळाची हीच जागा बरोबर वाटते. भरपूर कष्ट केल्यावर भेटणाऱ्या देवाचं स्थान.
तर तिथं पाच-दहा मिनिटं श्वास घेऊन चाल पुन्हा सुरू. आता चढण नाही! दूर एक निळं बांधकाम दिसत होतं. आज तंबूत राहायचं नाही आहे, असं सांगण्यात आलं होतं. आणि नुकतीच दणदणीत चढण पार केली होती. आता सपाटीवर चालायचं आहे, या आशेनं पायात पुन्हा हुरूप आला होता. आता डोंगरी चढउताराबरोबर अधूनमधून ‘बुग्याल’ येऊ लागले. ‘इथं तंबू टाकता येत नाही कारण इथे पाणी नाही,’ असं महिपाल म्हणाला आणि ‘बस, एक और चढाई है; फिर खतम!’ अशी पुस्तीसुद्धा जोडली. इतके आलो, आणखी थोडं; असं म्हणत बुग्याल मागे टाकून पुन्हा समोर आलेली चढण चढू लागलो.
आता ही दुसरी चढण चढण्याचं नवीन, वेगळं वर्णन काय करणार! पण आता ‘तो दिसतो आहे तो टॉप,’ असं वाटतं तिथपर्यंत यावं, तर आणखी एक टेकडी सामोरी. ‘ही आहे आपल्या आवाक्यातली,’ असं म्हणत पुन्हा जोर एकवटून वरवर पावलं उचलावीत; तर वर आहेच आणखी एक टेपाड! शेवटी आशा आणि दम, दोन्हींचा पार खिमा होऊन गेला तरी एकापुढे एक पाऊल एका पातळीवर पडेना! दुसरा कसलाही पर्याय नाही, हेच आपलं भागधेय, असं स्वतःला सांगून पाय उचलत राहिलो. केव्हातरी वरून महिपालची आरोळी आली, आ गया टॉप! तरी त्यानंतर चार पावलं टाकावी लागलीच. भयंकर चढण.
या ठिकाणाचं नाव ‘सुदामखान’. खरंच पक्कं बांधकाम. एका प्रशस्त खोलीत झोपायचं. शेजारच्या खोलीत सामान ठेवायचं. तिथंच स्वयंपाक. अर्थात पोचल्याबरोबर चहा मिळाला. समोर बर्फशिखरांची रांग. थंडी. त्यांची नावं इंटरेस्टिंग. नंदा कोट, नंदा खाट, नंदा गुमटी वगैरे. मध्ये एक वेगळं नावसुद्धा होतं. एका बिनबर्फाच्या शिखराकडे बोट दाखवून महिपाल म्हणाला, ते नंदादेवी ईस्ट.
इथं विशिष्ट ठिकाणी फोनची रेंज. पण आता बराच काळ बिनारेंज राहिल्यानं इकडच्या तुटपुंज्या रेंजचं किती कौतुक वाटू लागलं. अर्थात, ही रेंज सगळ्यांना नव्हतीच. मला होती. मग मी उमाशंकरच्या सांगण्यावरून एक नंबर फिरवला. तर तो लागेना. मग लँडलाइनचा फिरवला. तो लागला. तसंच सूर्यकांतचं झालं.
आमच्या स्थानिक सोबत्यांपैकी चानू का कोणाच्या तोंडून आलं की एक टीम इथूनच नंदाकोट ग्लेशियरला गेली आहे. तेवढ्यात भरपूर ओझं घेऊन असलेला एक तगडा पुरुष आणि उंच नाही, पण रुंद चणीची एक मुलगी, असे वरून आले. ती पुढं होती. बोलकी होती. इथून नंदाकोट ग्लेशियर १५ किमी आहे, म्हणाली. तिथं ते तंबू टाकून राहिले होते आणि आता परत चालले होते. महिपाल तिच्या ओळखीचा होता. मागे एकदा तिच्याबरोबर गेला होता. याचा अर्थ ती सरावलेली ट्रेकर होती. बागेश्वरच्या त्या मुलीबरोबर आणखी एकच मुलगी होती. म्हणजे ‘टीम’मध्ये दोघीच होत्या. तिसरा त्यांचा एस्कॉर्ट होता. दोघी दणकट, आत्मविश्वास असलेल्या आणि अस्सल ट्रेकरप्रमाणे मोकळ्या देहबोलीच्या होत्या. असं कुणीही भेटलं की दर वेळी आम्ही जे करायचो, ते इथंही केलं; ते म्हणजे वयाने ८०च्या पुढे गेलेल्या शिवाजीची ओळख करून देणं! सदा उत्साही दिसणारा शिवाजी ग्रो यंग ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. नंदाकोट ग्लेशियरचं अंतर ऐकून पोटात आलेला गोळा संदीप-अशोकनी घालवला. ‘आपल्याला तिथं जायचंच नाही आहे! उद्या लवकर निघून हिरामणीला पोचायचं आहे. तिथून नंदाकोट, नामिक या दोन्ही ग्लेशियरींचं दुरून दर्शन घेऊन परतायचं आहे. या वेळी बर्फातून चालायचं नाही, हे ऐकून बरं वाटलं. गेल्या वर्षीच्या हामटा पास ट्रेकच्या वेळी बर्फातल्या ट्रेकची आयुष्यभराची हौस फिटून झाली आहे.
इथं झोपणं तुलनेने सुखद होतं. पण थंडी भारी होती. रात्र संपताना कमी झाली. पुन्हा एक चकचकीत सकाळ उजाडली. सगळं उरकून चहा-नाश्ता संपवून पहाटे पावणेसहाला आम्ही वर निघालोसुद्धा.
पुन्हा असह्य चढण! म्हणे तीनच किलोमीटर चढायचं आहे! इथला किलोमीटर अंमळ नव्हे, बऱ्यापैकी लांबोडा आहे, याची आज खातरी झाली. माझी तर पार धुलाई झाली. चढता चढवेना. पन्नास पावलं चालून थांबायचं, असं ठरवून थांबतथांबत पाणी पीतपीत चढलो. घामटा निघाला, असह्य श्वास लागला; पण नेटानं चढत राहिलो. पहिला ढेपाळला रवी. मग अशोक आणि संतोष. शेवटी माझ्या थोडंसंच मागे असलेला उमाशंकरसुद्धा मागचा मागे गेला. ही चढण भयंकर वाटली, याचं एकमेव नसलं तरी प्रमुख कारण अल्टिट्यूड असावं. आज आम्ही बारा हजार फुटांच्या वर होतो.
पण या सगळ्या त्रासाचं पूर्ण परिमार्जन वरती झालं. जसे वरवर चढत गेलो, तशी हिमशिखरं अधिकाधिक जास्त दिसू लागली. संख्येनं आणि आकारानंसुद्धा. अगदी वरून तर या इथं अन् त्या तिथं अशी दोन्हीकडे दिसू लागली. या अख्ख्या ट्रेकमध्ये हवामानानं आमच्यावर विलक्षण कृपा केली होती, ती आताही चालूच होती. आकाश पूर्ण स्वच्छ होतं. नंदाकोट, नंदाटोपी, वगैरे राजे महाराजे तर होतेच; ईस्ट नंदादेवी टोकदार हिमशिखर घेऊन वर आली, शेजारी सुंदरडुंगाची रेंज तळपू लागली आणि उलट्या दिशेला पंचकुली नावाची आणखी एक तेजःपुंज रेंज! डोळ्यांचं पारणं फिटणं यालाच म्हणतात! सुदामखानवरून दृश्य छान दिसतं म्हणून फोटो काढले होते; जसजसं वर चढत गेलो, तसतशी हिमाशिखरं अधिकाधिक भव्य होत गेली. अधिकाधिक तेजस्वी होत गेली. डोक्यावर निळं आकाश, खाली गर्द हिरवं जंगल, पायाखाली ओलसर गवत आणि समोर मोठ्या डौलात, मान वर करून असलेली ही सूर्यप्रकाशात लख्ख झळाळणारी, काळ्या चष्म्याविना डोळ्यांना सहन न होणारी शिखरं! बस्स, फळली की ट्रेक!
वर भरपूर वेळ काढून, तुरळक ढग जमा होऊन आम्हांला वेढणारा पॅनोरमा धुरकट होऊ लागल्यावर उतरलो. महिपालची अपेक्षा होती, एकपर्यंत सुदाम खानच्या ‘घरी’ पोहोचू. तर मी आणि शिवाजी पावणेअकरालाच खाली. साडेअकरापर्यंत बाकी सगळे.
पण याचमुळे घोटाळा झाला. चार जण वरपर्यंत गेलेच नाहीत, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं होतं. ‘एवढ्या लवकर चढून उतरून झाल्यावर कशाला थांबा? त्यापेक्षा उतरून नामिक गावापाशी मुक्काम करू’, अशा विचारानं आम्ही थोडंफार खाऊन-पिऊन बाकी दिवसासाठी तिथं मुक्काम न ठोकता उतरू लागलो.
आणि काय! एकेक जण संपत गेला! बापरेबाप. काय ते अंतर. उमाशंकरचा एक पाय त्याला जुमानेसा झाला. वाटेतल्या गावातच थांबू या, तिथंच कोणाकडे तरी झोपून उद्या सकाळी पुढची मजल मारू या, असा विचार संदीप करू लागला. अशोकची पावलं अत्यंत सावकाश पडू लागली. वस्ती आली, कोणीकोणी भेटू लागलं; तरी किती वेळ तंबू दिसेचनात. यामुळे निराश वाटू लागतं. शेवटी सगळे कसेबसे पोचेपर्यंत व्यवस्थित काळोख पडायला लागला होता. आज पूर्ण थकून सगळे झोपून गेले.
‘आता चढायचं नाही आहे, तेव्हा सकाळी निघायची कसलीही घाई नाही; आरामात उठा,’ असं म्हटलं तरी ट्रेकिंग चालू असताना कोणीच लोळत राहू शकत नाही. सकाळी खाऊन-पिऊन नऊला सगळे चालू लागलो. आजपासून डोंगर चढायचा नाही, असं जरी माहीत असलं, तरी आत्तापर्यंतच्या अनुभवावरून अंगात पकडून ठेवलेला जोर सैल सोडायला मन धजावत नव्हतं. पण आजचा दिवस खरोखरच सुखद निघाला. या ट्रेकमध्ये बर्फच काय, पाणीसुद्धा आडवं आलं नव्हतं. एकदाही बुटात पाणी शिरण्याची वेळ आली नव्हती. आजही आली नाही; पण वाटेत खळाळ वाहणारे झरे, धबधबे आले, त्यांवरचे सुंदर पूल आले. जलप्रवाहांचे संगम आले. माणुसकी असलेले; म्हणजे चढून झाल्यावर पुढे सपाटी असलेले चढ आले. वाटेशेजारी थंडगार, मधुर पाण्याचे ठिबक म्हणा, बोटभर म्हणा; प्रवाह वरून खाली येत होते; त्यांना पान लावून नीट धार बनवता येत होती. कालपर्यंतच्या पायपिटीमुळे मांड्या आणि पोटऱ्या ठणकत नसत्या; तर आजचा दिवस ‘उत्तम ट्रेक कसा असावा,’ याचं उत्तर देणारा होता.
या भागातल्या बायकामुली मोकळेपणानं बोलणाऱ्या होत्या. शिवाजीनं एकीला फोटोसाठी पकडून आणलं, तर तिनं हवे तेवढे फोटो काढू दिले. मला दोघी भारा घेऊन जाणाऱ्या भेटल्या, तर मी तोंड उघडायच्या अगोदर ‘क्यूँ अंकल, थक गये?’ अशी त्यांनीच चौकशी केली. त्यांच्या देहबोलीतही संकोच, अविश्वास नव्हता. या बाजूला शहरी ट्रेकर्स कमी येत असावेत.
घरं लागली, शाळा लागल्या, शाळेत पळतपळत जाणारी मुलंमुली लागले. त्यांच्या मागून सावकाश चाललेले त्यांचे शिक्षक लागले. शाळांच्या इमारती उत्तम होत्या. मुलं, गावकरी; अगदी भले थोरले गवताचे भारे घेऊन चढणारेसुद्धा आनंदी दिसत होते. आपल्या देशाबद्दल प्रेम दाटून आलं. असं करताकरता ट्रेक संपला. विजेचे खांब असलेलं एक छोटुकलं गाव आलं आणि त्यातल्या एका दुकानाच्या मागे दोन खोल्यांमध्ये आमचा मुक्काम असणार होता. एका खोलीत दोन, तर दुसरीत तीन लोखंडी पलंग होते. तिथं जादा गाद्या घालून झोपलो. शांत, हुश्श.
हे गाव गोगिना. इथून सक्काळी बागेश्वरसाठी जिपा निघतात. आम्ही दोन बुक केल्या, तरी त्या सक्काळीच निघणार. कारण इथून बागेश्वरला वा कुठंही जाण्यासाठी हे एकमेव साधन. वाटेत कुठेकुठे एकेक जण जीपची वाट बघत होता. आम्हांला आमच्या जागेवरून न हलवता मागे लटकत येत होता. आपलं ठिकाण आलं की उतरून ड्रायव्हरला पैसे देऊन चालता होत होता. या रितीला मोडता घालण्याचा अधिकार आम्हांला नव्हता. मी एकूण अरुंद चणीचा. मला गाडी ‘लागत’ नाही. जीपच्या मागच्या बाजूला आडवं बसून मला काही त्रास होत नाही आणि गर्दी झाल्यावर ड्रायव्हरच्या बाजूला गियरचे धक्के खात अंग चोरून बसतानादेखील मी अवघडत नाही. तर आज माझी जागा ड्रायव्हरशेजारी.
हा एक विशीच्या आतला पोरगा. ‘किती शिकला?’ विचारल्यावर अभिमानानं म्हणाला, “बी.ए. करतो आहे. एक्स्टर्नल.’ त्याला खूप फोन येत होते. तोही करत होता. वाटेत निरोप देत-घेत होता. एका ठिकाणी एक मुलगी उगीच जीपला आडवी आली. हिचं काय डोकं फिरलं अचानक, असं माझ्या मनात येतंय तो यानं जीप थांबवली आणि तिच्याशी गप्पा केल्या. तिच्याबरोबर आणखीही मुली होत्या; पण त्यांच्यातलं कुणी आलं नाही. यातून लगेच लॉजिकच्या उड्या घेत अर्थ काढू नये; पण ‘आजच्या पिढीत’ असा शब्दप्रयोग करताना शहर-गाव फरक करण्याचं कारण नाही, या माझ्या मताला पुष्टी मिळाली. तसा रस्ता ओळखीचा असल्यानं तो गाडी छान चालवत होता. खड्डे आणि रस्ता यांवरून वेगानं वाहणारं पाणी नीट सांभाळत होता. प्लेयरवर स्थानिक, पहाडी लोकगीतं लावून ठेवली होती. मी विचारलं, ‘या गावात एकदाच जीप येते आणि जाते, तर डाक येते की नाही?’ म्हणाला, ‘येते की. रोज येते. डाकिया रोज चालत येतो, लिटी या खालच्या गावावरून. बारा की किती किलोमीटर!’ ‘रोज?’ ‘हो, रोज. दिसेल आपल्याला.’ थोड्या वेळानं दिसला. एक सावळासा कृश मनुष्य आडवी छत्री धरून, पुढे वाकून धीम्या गतीनं वर चालला होता.
देशाच्या आर्थिक आणि प्रशासनिक व्यवहारांचा गाडा हे लोक चालवतात. हा ड्रायव्हर मुलगा आणि तो पाठीत वाकलेला डाकिया.
बागेश्वर. हे मोठं गाव. शहरच. इथं वाहनांची गर्दी जाम. अध्येमध्ये दोन चाकी चालवणाऱ्या बायकामुली. लहानातल्या लहान गावामध्येसुद्धा दिसून येणाऱ्या कुठल्या-कुठल्या निवडणुकांमधल्या उमेदवारांच्या पोस्टरांची बागेश्वरात दाटी. चकाचक हॉटेल विवेकमध्ये पोचल्यावर गिझरमध्ये तापवलेल्या पाण्यानं लोकांनी आंघोळी केल्या. इथं गारठा अजिबातच नसल्यानं मी गारच पाण्यानं केली. अपवाद लावून घेतला नाही! पुष्कळ दिवसांनी दाढी केली. बेड टी तर ट्रेकच्या पहिल्या दिवसापासून जाग आल्याआल्या मिळतच होता; हे हॉटेलही महिपालनंच दिलं असल्यानं दुसऱ्या दिवशी इथंही मिळाला. पण आता ट्रेक सुरू होताना डोंगराच्या खाली काढून ठेवलेले कपडे मिळाले. ते घालून खाली जाऊन बूफे ब्रेकफास्ट केला. मग गाव फिरायला गेलो. गोमती आणि शरयू यांच्या संगमावरचं गाव. दोन्ही नद्यांवर पूल. पैकी एक पूल डबल; म्हणजे अप आणि डाउन वाहतुकीसाठी वेगळे पूल. दुसरा पूलही डबल. म्हणजे वाहनांसाठी वेगळा आणि पादचाऱ्यासाठी वेगळा. बऱ्यापैकी मोठं गाव; पण खरेदीसाठी बिनकामाचं. या ग्लोबलायझेशनच्या भानगडीत लहानातल्या लहान गावात एका बाजूनं ‘लेस’ वेफर जसे मिळू लागलेत; तसेच स्थानिक वस्तू, पदार्थ जवळपास नाहीसे झालेत. (तरी नाश्त्याच्या वेळी आवडलेली चटणी ‘भांगदान्या’ची आहे कळल्यावर धान्याच्या दुकानात विचारलं, तर तिथं भांगदाना मिळत होता! तो खरेदी केला.) सूर्यकांतनं सिल्वरप्लेटेड पैंजणजोडी घेतली. मी देऊळ बघितलं; संगमाचे, देवळाचे फोटो काढले, वगैरे.
आम्हांला बागेश्वरात एक दिवस जादा मिळाला, त्याचा उपयोग आम्ही पाताळभुवनेश्वर नामक ठिकाणाला भेट देण्यासाठी केला.
उभ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय अनुभव. तो सांगण्याच्या अगोदर तिथल्या व्यवस्थेवर शेरे मारतो.
पाताळभुवनेश्वरचा परिसर अर्थातच नयनरम्य आहे. जंगल आहे, हिमालयातले दांडगे पर्वतकडे आहेत, वातावरण शांत, शीतल आहे आणि आम्ही गेलो तेव्हा कसला सण वा मेला नसल्यामुळे मानवप्राण्याची असमंजस, अडाणी गजबजही एक प्रकारे पवित्र वाटणाऱ्या त्या वातावरणावर ओरखडे पाडत नव्हती. धार्मिक सामान, फोटो, खाद्यपदार्थ विकणारे देवस्थानापासून लांब होते. मन प्रसन्न झालं.
पण पाताळभुवनेश्वर म्हणजे ‘डोंगरात असलेलं आणखी एक शिवाचं मंदिर,’ असं नाही! तिथं डोंगरात खाली उतरत जाणारी एक गुहा आहे. ती अगदी अरुंद आहे. गुहेत शिरण्यासाठी पहिलं पाऊल टाकल्याबरोबर आपण काहीतरी साहसी करत आहोत, अशी भावना होते. वाट दगडी आहे. दगडाचा पृष्ठभाग ओलसर, दमट आहे. गुळगुळीत आहे. बोलणाऱ्याचा आवाज तिथं घुमतो आणि साहसाला रोमांचकारी बनवतो.
श्रद्धा, भक्ती असल्या मद्दड भावनांनी ज्याच्या मनातली चिकित्सक विचारशक्ती पांगळी केलेली नाही, अशा कोणाच्याही मनात उमटावेत, तसे प्रश्न माझ्या मनात उमटू लागले. ही गुहा निसर्गनिर्मित आहे की माणसानं केली आहे? निसर्गनिर्मित असेल तर गुहा तयार होण्याची प्रोसेस काय? माणसानं केली असेल, तर का? कशासाठी? इतिहास किंवा भूगर्भशास्त्रीय पुरावे, यांमधून काय कळतं? वाटेवरचे दगड व्यवस्थित गुळगुळीत झाले आहेत ते वर्षानुवर्षं माणसं इथून सरपटत गेली म्हणून की दुसऱ्या कसल्या कारणामुळे? खालच्या दिशेनं चाललेली वाट जिथं संपते, तिथं प्रशस्त दालन आहे, दगडी भिंती असलेलं. अर्थात, त्या भिंतींना सपाटपणा, गिलावा नाही. सगळं प्रिस्टीन, असंस्कारित आहे. उतरणीवरच्या दगडांचा गुळगुळीतपणा सोडून! दालनाच्या एका बाजूला स्टॅलॅक्टाइट्ससारखी रचना आहे. पण चुनायुक्त पाणी ठिबकताना गोठलं की छतावरून लोंबणारे स्टॅलॅक्टाइट्स तयार होतात. खाली चक्क स्टॅलॅग्माइट्स, म्हणजे जमिनीवर तयार झालेले उलटे स्टॅलॅक्टाइट्स, देखील आहेत. गंमत अशी, की दोन्ही दगडी आहेत, पाण्याचा बर्फ होण्यातून घडलेले नाहीत. जिऑलॉजीत, म्हणजे भूगर्भशास्त्रात या सगळ्याचं काहीतरी तर्कशुद्ध पण सोपं उत्तर असणार. त्या उत्तरातून आपल्याला इथल्या भूरचनेविषयी काहीतरी ज्ञान मिळणार! मग आपल्या उतावळ्या अल्पमतीनुसार आपण ते कुठंकुठं लावणार. त्यातून स्वयंभू ज्ञानाचा प्रकाश पडण्याची शक्यता थोडी असली, तरी वडाची साल पिंपळाला लावता येत नाही; इतका धडा तरी आपल्याला शिकता येणारच! मजा आहे!
पण नाही. अशा मजेवर या देशात बंदी आहे. सांप्रत काळात तर हे असं काही मोठ्यानं बोलून दाखवल्यास गजाआड होण्याची शक्यता आहे. त्याअगोदर जमावाकडून दगडांनी ठेचलं जाण्याचीही जोरदार शक्यता आहेच. स्वतःची स्वतंत्र विवेकबुद्धी वापरून सभोवतालाचा अर्थ लावणं, हा इथं गुन्हा आहे. गुहेच्या प्रवेशापाशी एका सफेद शिळेवर कोरून ठेवलं आहे की या गुहेचा शोध प्रथम राजा ऋतुपर्णानं लावला. मग द्वापार युगात पांडवांनी लावला. मग कलियुगात आदि शंकराचार्यांनी लावला. भंडारी परिवाराकडे या देवस्थानच्या पूजेअर्चेची जबाबदारी आहे आणि आजच्या घडीला त्या परिवारातली अठरावी पिढी ही जबाबदारी सांभाळत आहे. त्यानंच तर आम्हांला आत शिरण्याचं तिकीट दिलं होतं.
आम्हांला आत घेऊन गेलेला गाइड सांगत होता, हे बघा, शिवशंकराचे केस जणू! हे बघा, इथं गणेशमूर्ती दिसते की नाही! हा तर शेषनाग. हे बघा, … आणखी काही.
होय महाराजा. जय भोलेनाथ!
त्याच्या बरळण्याकडे एक तर माझं लक्ष नव्हतं. दुसरं असं की त्या क्षणी माझी शारीरिक स्थिती अस्थिर होती. तेसुद्धा तपशिलात सांगायला पाहिजे. कदाचित माझ्या पाखंडीपणाची ती शिक्षा असेल!
तर आता वैयक्तिक अनुभव. पाताळभुवनेश्वरचं वैशिष्ट्य तिथल्या भुयारात. म्हणजे, वाटेवर दिसणाऱ्या कोलॅप्सिबल ग्रिलमागे एक खाली उतरत जाणारं भुयार. एका वेळी एका माणसापुरती उतरायला जागा. भुयारात थोड्या अंतरावर सीएफएल लँप लावलेले. जनरेटरची सोय असल्यामुळे वाट दिसत राहण्याची शाश्वती. काही लोकांच्या मागून आत शिरून चार पावलं उतरल्यावर माझ्यापुढचा संतोष अडकला. परिणामी मी एका जागी बसून. माझ्यासाठी रस्ता शून्य अवघड होता. पण मला धाप लागली. चूक. धाप नाही; श्वास लागला. थोड्या वेळानं भुयार संपवून आतल्या विस्तृत जागेत उतरलो आणि स्वस्थ मोकळा उभा राहिलो तरी श्वास थांबेना.
मला काही सुधरेना. माझ्या मागून साताठ मुलंमुली आल्या. वय पंधरासोळा. सगळे मोकळे उभे राहतील एवढी जागा आत होती; पण माझ्या मनात आलं, परतताना ही पोरंपोरी माझ्या पुढे निघाली आणि संतोष अडकला, तशी अडकली; तर? पुन्हा त्या काळोख्या, चिंचोळ्या भुयारात एका जागी अडकून राहावं लागलं तर? माझा श्वास तर आत्ता, या क्षणाला, इथं मोकळा उभा असतानासुद्धा घरघर वाजतो आहे! आपल्याला श्वास पुरत नाही आहे, ही जाणीव गेली दोन मिनिटं, एकशेवीस सेकंद गळा आवळते आहे.
आपण किती गोष्टी गृहीत धरत असतो! ‘आपल्याला दर क्षणी पुरेशी हवा दर श्वासागणिक मिळणारच आहे! मग आपण गाणं म्हणू नाही तर डोंगर चढू.’ पण एकामागे एक श्वास घेत राहूनही नाहीच मिळाली पुरेशी हवा, तर? असंच आणखी काही काळ सतत गुदमरल्यासारखं, गळा आवळल्यासारखं होत राहिलं, तर?
‘तर मी मरून जाईन!’
मी सगळ्यांच्या मागे उभा राहिलो, परत फिरताना पहिलं असावं म्हणून. मात्र, आम्हांला घेऊन आलेला गाइड त्याच्या पौराणिक बाता मारत आणखी पुढे सरकू लागला, तसा मी निर्णय घेतला; चला मागे!
मी एकटा परत फिरलो आणि उलटा एकटा वर येऊ लागलो. एका दमात येणं शक्य नव्हतं. अध्येमध्ये थांबावं लागलं. थांबलं की मनावरचा -त्यातून छातीवरचा- ताण वाढायचा. पण न थांबता वर येण्याचा प्रयत्न केला असता, तर नक्की दम तुटून कोसळलो असतो. मग?
च्यायला! नष्टच झालो.
वर बाहेर आलो आणि मोकळ्या हवेत हावरट खोल श्वास घेत बसून राहिलो. बसून कसला राहतो; वर डोकं करून आकाश पाहून घेतलं, झाडं पाहिली, उजेडात जग कसं दिसतं हे निरखलं. नवा जन्म झाला जणू.
तेव्हापासून मी स्वतःला सांगतो आहे, हा क्लॉस्ट्रोफोबिया. फियर ऑफ एन्क्लोज्ड स्पेसेस. जे थोडक्या प्रमाणात मला लिफ्टमध्येही होतं, तेच हे. हा क्लॉस्ट्रोफोबियाच.
म्हणजे हे आईला, बाकरेला झालं ते नव्हे. हा फायब्रॉसिस वा तत्सम प्रकार नव्हे. माझ्या फुप्फुसांना श्वास घेण्यात, श्वासावाटे ऑक्सिजन प्राप्त करण्यात कसलीही अडचण येत नाही.
अजूनही सांगतो आहे.
पण आता एक गोची झाली आहे. पुढच्या ट्रेकला न जाणं मला शक्य नाही. आता हे स्वतःशी सिद्ध करत राहणं हे एक नवीनच काम अंगावर येऊन पडलं.
च्यायला.
हेमंत कर्णिक
इ-मेल – hemant.karnik@gmail.com
मुक्त पत्रकार आणि लेखक.
सर्व छायाचित्रं चैतन्य आठवले यांच्या सौजन्यानं.