सोवियत युनियन आणि रशिया- स्मरणवहीतल्या नोंदी

सुनील बरगे

सोवियत ह्या शब्दाची ओळख खूप जुनी आहे. अगदी लहानपणी ‘सोवियत संघ’ हे हिंदी व ‘सोवियत देश’ नावाचं मराठी मासिक बाबा आणायचे तेव्हापासूनची. सुरुवातीला मराठी मासिकातली चित्रं आणि लहान मुलांसाठी असलेल्या गोष्टी वाचायचो तर हिंदीतलं फक्त ‘जरा ठहर तो बच्चू’ नावाचं कार्टून पाहायचो. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर मात्र खेळाडूंची चित्रं, विविध खेळांबाबत आलेले लेख, माहिती वाचू लागलो. सोवियत देश, रशिया खेळात अग्रेसर असा देश आहे, अशी प्रतिमा मनात निर्माण झाली. १९८२मध्ये सोवियत नेते ब्रेझनेव्ह ह्यांच्या मृत्यूनंतर, पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी ‘कठीण काळी आमच्याबरोबर उभा राहिलेला हा भारताचा सच्चा मित्र’ अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. इंदिराजींचे ब्रेझनेव्हबरोबरचे फोटो पाहिल्यावर आणि पुढे बांगलादेश युद्धाबद्दल वाचल्यानंतर सोविएत देश आपला मित्र देश आहे हे समजलं.

१९८२मध्ये भारतात एशियाड (आशियाई खेळ) झालं तेव्हा आठवीत होतो. रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांबाबत कुतूहल निर्माण होऊ लागलं होतं. आपल्या देशानं रशियाप्रमाणेच मोठी स्पर्धा भरवणं, १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप जिकंणं, १९८४ मध्ये राकेश शर्मा ह्यांचं रशियन अंतराळवीरांबरोबर सोयूझ ११ मधून प्रस्थान आणि सॅल्यूट अंतराळस्थानातून तुम्हांला हिंदुस्थान कसा दिसतोय ह्या इंदिरा गांधींच्या प्रश्नाला ‘सारे जहां से अच्छा’ असं दिलेलं उत्तर ह्या सर्व घटनांमुळे वातावरण भारावलेलं होतं. रशियाबाबतचं, रशियन साहित्याचं वाचन नकळत वाढू लागलं होतं. लवकरच रसायनशास्त्र हा आवडता विषय शिकण्यासाठी मॉस्कोला जावं लागणार आहे, हे मात्र माहीत नव्हतं.

th (3)
मिखाइल गोर्बाचोव

१९८५ पासून मिखाईल गोर्बाचोव ह्यांच्या नेतृत्वाखाली सोवियत युनियनची वाटचाल सुरू झाली. आपल्याकडच्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या ‘पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्त’ ह्या सुधारणांबाबत बातम्या, लेख येत असत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांच्याबरोबरच्या गोर्बाचेव यांच्या शिखर परिषदेबाबत, अण्वस्त्र कराराबाबत लिहिलं जाऊ लागलं. लवकरच जग अण्वस्त्रमुक्त होण्याचा मार्ग खुला होतोय असं वाटू लागलं. भारतात राजीव गांधींचं तरुण, उमदं नेतृत्व पुढं येऊ लागलं होतं. त्यांनी सोवियत युनियनबरोबर मैत्री करार केला. १९८६-८७ भारत-रशिया मैत्री वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. त्या वेळी, ‘सोवियत देश’मध्ये गोर्बाचोव ह्यांच्या टकलावरचा डाग म्हणजे भारत व सोवियत युनियन यांचे राष्ट्रध्वज असं सोवियत शाळकरी विद्यार्थ्यानं रेखाटलेलं चित्र अजूनही लक्षात आहे! १९८६ मध्ये चेर्नोबिल दुर्घटना घडली आणि किरणोत्सर्गाबरोबरच सोवियत युनियनबाबत नकारात्मक, टीकेचा सूरदेखील पसरू लागला. अफगाणिस्तानमधील सोवियत सैन्याबाबत चर्चा होऊ लागली होती. जगात अशा बऱ्याच ऐतिहासिक घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट १९८८ मध्ये मॉस्कोच्या पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीमध्ये मी दाखल झालो आणि जग बदलवून टाकणार्‍या घडामोडींचा साक्षीदार झालो.

युनिव्हर्सिटीची नवीन विद्यार्थ्यांसाठीची व्यवस्था खूप चांगली होती. नव्या मुलांसाठी असलेल्या हॉस्टेल क्रमांक ६ मध्ये आम्हांला रूम्स दिल्या गेल्या. प्रत्येकाला बेड, बेडशीट, दोन गरम ब्लॅंकेट्स असं दिलं गेलं. सकाळ-दुपार-रात्रीच्या भोजनाची सोय केली होती. भारतीय विद्यार्थ्यांसाठी हिंदी-इंग्रजीचं उत्तम ज्ञान असलेल्या आणि दिल्लीमध्ये बरीच वर्षं वास्तव्य केलेल्या अध्यापकाची वरिष्ठ अध्यापक म्हणून नेमणूक केली होती. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रत्येक देशातल्या विद्यार्थ्यांसाठी एकेक वरिष्ठ अध्यापक होते. प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण वैद्यकीय चाचणी केली. प्रत्येकासाठी एक रजिस्टर दिलं गेलं ज्यामध्ये पुढील सहा वर्षं सर्व नोंदी नियमितपणे केल्या जाणार होत्या. प्रीपरेटरी फॅकल्टीचं ओळखपत्र दिलं गेलं. दरमहा शिष्यवृत्ती सुरू झाली. प्रीपेरटरी फॅकल्टीचं उद्दिष्ट सर्वांना रशियन भाषा शिकवणं आणि पुढला अभ्यासक्रम रशियनमध्ये शिकण्यासाठी सक्षम बनवणं हे होतं. त्यासाठी दोन शब्दकोशांसह जवळजवळ २० पुस्तकं देण्यात आली. त्यानंतर आमचे रशियन भाषेचे वर्ग सुरू झाले. भाषा शिकवण्याची पद्धत इतकी चांगली होती की आम्ही ३-४ महिन्यांतच बऱ्यापैकी बोलू लागलो आणि वर्षाअखेरीस रशियन विद्यार्थ्यांसोबत लेक्चर अटेंड करण्यासाठी सक्षम झालो. शिक्षणपद्धती खूपच चांगली होती.

With Praveen, Mishra & Vinay
मित्रांबरोबर सोवियत युनियनमध्ये

इतिहास आणि देशाची ओळख शिकवताना माझ्या माहितीत भर पडत गेली. सोवियत युनियन हा एक देश असून त्यामध्ये १५ रिपब्लिक आहेत तसंच बरेच ऑटोनॉमस ओब्लास्त (रिजन) आहेत, देशाचं संपूर्ण नाव ‘सयुज सवेतस्कीख सात्स्तिअलिस्तीचेसकीख रिस्पुब्लिक’ म्हणजेच “एस.एस.एस,आर.’ आहे (CCCP रशियनमध्ये C चा उच्चार एस आणि P चा उच्चार आर किंवा एर असा करतात) ह्या आणि अशा अनेक गोष्टी.

डिसेंबर १९८८ मध्ये म्हणजेच मॉस्कोत आल्यानंतर चौथ्या महिन्यात आर्मेनियामध्ये भयानक भूकंप झाला. मोठी जीवितहानी झाली. भूकंप झाला त्या दिवशी सोवियत युनियनचे सर्वोच्च नेते गोर्बाचोव अमेरिकेत होते. पुढे रशियन टीव्हीवरील एका चर्चेत चेर्नोबिल दुर्घटनेच्या वेळी ते जर्मनीमध्ये होते अनं कोणीतरी नमूद केल्याचं आठवतं. गोर्बाचोव यांचं देशांतर्गत प्रश्नांपेक्षा जागतिक प्रश्नांकडे कसं जास्त लक्ष होतं, हे सांगण्यासाठी त्यांचे विरोधक १९९० नंतर अशा अनेक योगायोगांचा उल्लेख करत.

जानेवारी १९८९ मध्ये आम्ही १० दिवसांच्या लेनिनग्राड सहलीला गेलो होतो. १० दिवसांच्या वास्तव्यात खूप फिरलो पण शहराच्या लेनिनग्राड ह्या नावाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे असं काहीही जाणवलं नाही. पुढे जुलै-ऑगस्ट १९८९ मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत माल्दाविया रिपब्लिकमध्ये (आत्ताच्या मोल्दोवा देशामध्ये) २१ दिवसांच्या शिबिरासाठी गेलो. त्या वेळी १० दिवस त्यांच्या सार्वजनिक शेतात सफरचंद गोळा करण्याचं कामदेखील केलं. सार्वजनिक शेतात काम करणारे शेतकरी आमच्याशी, तसंच बरोबर आलेल्या रशियन लोकांशी आपुलकीनं वागले. त्यांना रशियन लोकांबद्द्ल तिरस्कार आहे किंवा स्वतंत्र व्हायचं आहे, असं अजिबात जाणवलं नाही. जानेवारी १९९० मध्ये आमची सहल लिथुआनिया रिपब्लिकची राजधानी विलन्यूस इथं गेली होती. तिथं मात्र आमची तरुण व सुंदर गाइड शवेलीया रशियन राज्यकर्त्यांविरुद्ध उघडपणे बोलत होती. विलन्यूसमध्ये सुवरेनिटी म्हणजेच सार्वभौमत्वाची मागणी करणारे बॅनर्स चौकाचौकांत आढळले. अशी मागणी करणारे अल्पमतात आहेत असं आम्हांला सांगितलं गेलं. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे प्रिबाल्टिक रिपब्लिकमधील विद्यार्थीदेखील एकसंध देशाच्या बाजूचे होते. पुढे १९९१ मध्ये घेतलेल्या सोविएत युनियन एकसंध राहावा की नको ह्याबाबतच्या सार्वमतात लिथुआनिया, लात्व्हिया व इस्तोनिया ह्या तीनही प्रिबाल्टिक रिपब्लिकमधील जनतेनं सोवियत युनियन देश एकसंध राहावा ह्या बाजूनंच मतदान केलं.

युनिव्हर्सिटी कॅम्पस, मेट्रो, दुकानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोवियत लोक उघडपणे बोलत. तसंच वर्णद्वेषही कुठं आढळला नाही. १९८९-९० मध्ये आम्हां विद्यार्थ्यांना ९० रुबल शिष्यवृत्ती मिळत असे. तिन्ही वेळा भरपूर पोटभर जेवण, वह्या व इतर साहित्य खरेदी केल्यानंतर देखील २०- २५ रुबल्स शिल्लक राहायचे. कंजूष विद्यार्थ्यांचे तर घसघशीत ४०-४५ शिल्लक राहायचे! दुपारच्या थ्री कोर्स मिल साठी ६० कोपेक पण हेअर कटिंगसाठी दिड ते तीन रुबल्स खर्च व्हायचे त्यामुळे विद्यार्थी केस वाढवणं पसंत करत. सर्वसामान्य सोविएत लोक साधे, सरळ, देशाभिमानी होते अणि आहेत. काही वस्तूंचा तुटवडा असला तरी, कित्येकदा रांगेत उभं राहावं लागत असलं तरी प्रत्येकाकडे जीवनोपयोगी वस्तू व पदार्थ मुबलक प्रमाणात खरेदी करण्याची क्षमता होती. घरी सर्व काही असायचं!

आम्ही हळूहळू रशियन बातम्या ऐकायला लागलो. प्रत्येक रूममध्ये रेडिओ होता. होस्टेलच्या तळमजल्याच्या हॉलमध्ये टीव्ही होता. १९८८ सेऊल ऑलिम्पिक त्या टीव्हीवर पाहिलं. आमच्या सिनियर मित्रांकडे रूममध्येदेखील टीव्ही होता. प्रिपरेटरी कोर्स पास झाल्यानंतर प्रत्येकाला त्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये रूम दिल्या गेल्या. मला Natural sciences साठीच्या हॉस्टेलमध्ये दोन इथिओपियन विद्यार्थ्यांसोबत रूम मिळाली. ३०१ क्रमांकाची ही रूम पहिल्यापेक्षा चांगली होती. पुढील सहा वर्षांसाठीचं ते आमचं घर होतं ! शिक्षण पूर्ण केलेल्या सिनियर्सकडून आम्हांला रंगीत टीव्ही व फ्रिज वारसा हक्कानं मिळाले होते. बऱ्याच महत्त्वाच्या जागतिक घडामोडी व सोवियत युनियनमधील घटना त्या टीव्हीवर आम्हाला दिसणार होत्या.

एकमेव सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षांतर्गत कुरबुरी वाढत चालल्या होत्या. मॉस्कोमध्ये भरपूर घडामोडी घडल्या. बोरीस येल्त्सिन ह्यांनी अमेरिका दौऱ्यात मदिरेच्या नशेत घातलेल्या कथित धुमाकुळाबाबत लेख लिहिल्याबद्दल प्रावदा ह्या वर्तमानपत्राविरुद्ध हिंसक राडेबाज मोर्चा आयोजित केला गेला. बोरीस येल्त्सिन ह्यांनी गोर्बाचोव आणि कम्युनिस्ट पक्षाविरुद्धचा लढा आणखी तीव्र केला. केंद्राला विरोधासाठी विरोध, सवंग लोकप्रियतेसाठी विरोध करण्याचं प्रमाण वाढलं. रशियन राष्ट्रवाद वाढवणार्‍या चिथावणीखोर भाषणांचं प्रमाण वाढलं. वाहतूक व्यवस्था कशी बरोबर नाही, हे दाखवण्यासाठी येल्त्सिन मेट्रोनं प्रवास करत आहेत (कॅमेरा टीम घेऊन) अशा प्रकारच्या सनसनाटी बातम्या दाखवल्या जाऊ लागल्या. विरोधक टीका करत आहेत. पण त्यांच्याकडे समस्यांवर उपाययोजना, पर्यायी कार्यक्रम काय आहे, तो ते कसा राबवणार, हे मात्र सांगत नसत हे खूप जणांच्या लक्षात येत नव्हतं!

Eltsin_M_G
येल्तसिन यांनी गोर्बाचोवना बोलताना मध्येच रोखल्याचा प्रसिद्ध क्षण

१९९० मध्ये बोरीस येल्त्सिन रशियन पार्लमेंटचे स्पीकर म्हणून निवडून आले. १२ जून रोजी त्यांनी रशियाच्या सार्वभौमत्वाचा जाहीरनामा (ठराव) पास केला. ह्यामुळे रिपब्लिकला (स्टेटला) केंद्रापेक्षा जास्त अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जुलै १९९० मध्ये सोवियत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाची २८ वी परिषद झाली. या दरम्यान पक्षामध्ये उघडपणे फूट पडली. येल्त्सिन गटानं स्वतःला लिबरल डेमोक्रॅट म्हणवून घेत राजीनामे दिले. सोवियत टीव्ही चॅनेल्सवरून या कॉन्फरन्सचं तचंच सोवियत पार्लमेंटमधल्या घडामोडींचं प्रक्षेपण दिवसभर व्हायचं. गोर्बाचोव छान बोलत पण नेमकं करतात काय, हे समजायचं नाही.

पेरेस्त्रोइकात अभिप्रेत असलेले आर्थिक सुधारणांबाबतचे कार्यक्रम राबवण्यात गोर्बाचोव कमी पडू लागले. निकोलाय रिझकोव ज्यांच्याबरोबर गोर्बाचोव यांनी पेरेस्त्रोइका कार्यक्रमाची आखणी केली त्या पंतप्रधान रिझकोव ह्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले नाहीत. पंतप्रधान (कौन्सिल मिनिस्टर्सचे चेअरमन) रिझकोव ह्यांनी काही जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा प्रस्ताव मांडला. ही भाववाढ जुजबी होती, कित्येक वर्षांनंतर होत होती. पण तथाकथित डेमोक्रॅट्सनी ह्या भाववाढीला अतिरेकी विरोध केला. आर्थिक सुधारणांना सर्वतोपरी विरोध करून अराजक निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करत होत्या. कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली. रिझकोव ह्यांना काम करणं अशक्य केलं आणि राजीनामा देण्यास भाग पाडलं. आपल्या शेवटच्या भाषणात रिझकोव म्हणाले होते. ‘माझ्या सरकारची लोकांना पुढं कधीतरी आठवण येईल!’

या वेगवान घडामोडी आमच्यापुढे घडत होत्या. एकीकडे आर्थिक सुधारणा होत नसताना गोर्बाचोव ह्यांनी राजकीय सुधारणा करण्यास प्रारंभ केला. सुप्रीम सोविएतच्या चेअरमनपदापेक्षा प्रेसिडेंटपद असावं, असं त्यांना वाटू लागलं. मार्च १९९० मध्ये ते देशाचे प्रेसिडेंट झाले. कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी हे पद मात्र त्यांच्याकडेच राहिले. अनातोली लुक्यानोव्ह हे स्पीकर (सुप्रीम सोविएतचे चेयरमन) झाले.

येल्त्सिन रशियाच्या वेगवेगळ्या भागांत सार्वभौमत्वाबद्दल बोलत फिरू लागले. ऑगस्ट ९० मध्ये तर उफा ह्या प्रदेशात ‘तुम्हांला जेवढं झेपेल, तेवढं सार्वभौमत्व घ्या’ असं म्हणाले. रशियन राष्ट्रवादाबद्दल ते बोलत. पुढे रशियन रिपब्लिकसाठी प्रेसिडेंट हवा असं बोलू लागले. प्रेसिडेंटपद निर्माण करण्यासाठी सार्वमत घेण्याची मागणी जोर धरू लागली. मॉस्को शहराच्या सेंटरमध्ये ‘रेफेरेंदूम – रेफेरेंदूम’ अशा घोषणा देत झालेली निदर्शनं मी पाहिली.

Burbulis_Gaidar 2
येल्तसिन, गैदार आणि बुलबुलिस

मार्च १९९१ मध्ये सार्वमत घेतले गेले. रशियन जनतेला प्रेसिडेंट अवतीर्ण झाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही, असं वाटलं आणि त्यांनी प्रेसिडेंटपदाच्या बाजूनं कौल दिला. १२ जून १९९१ रोजी येल्त्सिन अध्यक्ष म्हणून निवडून आले. केंद्रात आलेले नवे पंतप्रधान पावलोव ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नोटाबंदीनं झाली. ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याच्या आदेशावर २२ जानेवारी १९९१ रोजी गोर्बाचोवनी सही केली. सोवियत नागरिक रांगेत उभे राहिले. आमच्यासाठी युनिव्हर्सिटीमध्ये नोटा बदलून देण्यासाठी व्यवस्था केली होती. आम्हा सर्वसाधारण विद्यार्थ्यांकडे १० व २५ च्या नोटाच असत त्यामुळे आम्हाला ह्या निर्णयाचा त्रास झाला नाही. मात्र नोटाबंदीचा हा प्रयोग अपयशी ठरला.

प्रेसिडेंट गोर्बाचोव जागतिक राजकारणात प्रभावी ठरत होते. जर्मन रियुनिफिकेशन, पोलंड, चेकोस्लाव्हाकिया, युगोस्लाविया ह्या देशांत प्रचंड उलथापालथ झाली. गोर्बाचोवना नोबेल पारितोषिक दिलं गेलं. मात्र ते देशात अपयशी ठरत आहेत किंवा देशासमोरचे प्रश्न सोडवण्यात कमी पडताहेत अशी नागरिकांची धारणा होऊ लागली होती. दुसरीकडे येल्त्सिन रशियाचं पुनरुज्जीवन करण्याचं स्वप्न जनतेस दाखवत होते. समृद्ध लोकशाही, शांतीप्रिय रशिया घडवण्याचं आश्वासन त्यांनी रशियन जनतेस दिलं. कम्युनिस्ट पक्षावर व केंद्र सरकारवर ते जहरी टीका करत. मीडिया त्यांना उचलून धरत होता, हिरो बनवत होता.

सहकारी नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, सार्वभौमत्व अतिरेकी राष्ट्रवाद ह्यांना मुरड घालण्यात गोर्बाचोव अपयशी ठरत होते. त्यांच्या विरोधक नेत्यांनी ऑगस्ट १९९१ मध्ये बंड केलं. येल्त्सिननी तत्परतेनं काही पावलं उचलली. कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालण्याच्या आदेशावर सही केली. ढोंगी, स्वार्थी डेमोक्रॅट्‌सचा कावा लक्षात न आल्याचा म्हणा किंवा त्यांना नकळत साथ दिल्याचा मोठा फटका संपूर्ण सोवियत जनतेस बसला. पुढची दोन दशकं त्यांना अराजकता व दारिद्र्य ह्यांचा सामना करावा लागला. करोडो लोक एका रात्रीत कोणतंच नागरिकत्व नसलेल्या स्थितीत आले. लाखो लोक स्थालांतरित झाले, निर्वासित झाले.

येल्त्सिन आणि त्यांच्या टीमनं शॉक थेरपी, आर्थिक सुधारणा निर्दयीपणे राबवल्या. कच्च्या मालाची निर्यात आणि बटाटे, गाजर, दही, योगर्त, शालेय स्टेशनरी व अलकोहोलिक पेयं ह्यासारख्या वस्तूंची अनियंत्रित आयात करण्याचा सपाटा लावला. काळाबाजार फोफावला. चलनवाढ एवढी जबरदस्त होती की, भाव एका दिवसात दुप्पट होत. सनफ्लॉवर तेलाच्या बाटलीचे भाव दुप्पट झाले, तेव्हा आमच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या वृद्ध ल्योबोव्ह इव्हानोव्हना यांनी विचारलेला – ‘पंचीमु या फचिरा नि कुपीला?’ म्हणजे मी कालच का नाही खरेदी केली– हा प्रश्न काळीज चिरून टाकणारा होता. पोट भरण्यासाठी घरातल्या शोभेच्या वस्तू, मुलांची खेळणी असं सामान मेट्रो स्टेशनबाहेर विकणाऱ्या स्त्रिया बघताना हळहळ वाटायची. सरकारी दुकानातून खरेदी केलेला ब्रेड त्याच दुकान परिसरात किंवा बसस्टॉप, मेट्रो स्टेशनजवळ रात्री दुकान बंद झाल्यानंतर विकणारी मुलं, तरुण पाहणं वेदनादायी होतं.

एकदा तर स्पेस स्टेशनवर खाद्यपदार्थांचा व इतर सामग्रीचा पुरवठा करणारं रॉकेट लॉन्च करण्याकडे दुर्लक्ष झालं आणि अंतराळवीर अवकाशात भुकेले राहिले, असं टीव्हीवर बातम्यात सांगण्यात आलं. जो देश गहू आणि इतर गोष्टी आफ्रिकेतल्या आणि इतर मागासलेल्या देशांना दान करत असे त्या देशाचे राज्यकर्ते पाश्चात्त्य देशाकडे मदतीसाठी डोळे लावून बसू लागले. देशाच्या प्रगतीच्या वल्गना आणि आधीच्या राज्यकर्त्यांवर विखारी टीका करणार्‍या येल्त्सिनच्या भाषणांनी करमणूक होत असे. मात्र अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता. त्याचे चटके बसत होते. रशियन जनतेचा अशा ह्या ‘डेमोक्रॅटिक व शांतिप्रिय’ नेत्यावरचा विश्वास उडायला १९९६ साल उजाडावं लागणार होतं.

जानेवारी १९९२ पासून शहरं, रस्ते, ह्यांची नावं बदलण्याची, पुतळे पडण्याची शर्यत सुरू झाली. ५ फेब्रुवारी १९९२ रोजी आमच्या युनिव्हर्सिटीचं नावही बदललं. ब्रेझनेव्हसारख्या नेत्यावर विनोद करण्याची फॅशन सुरू झाली. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जे केलं त्याच्या विरुद्ध निर्णय आणि काम करणं म्हणजे लोकशाही व विकास असं वातावरण निर्माण झालं होतं. आम्हां परदेशी विद्यार्थ्यांसाठी मात्र रशियन फेडरेशन व सर्व शैक्षणिक संस्थांनी मास्टर्स डिग्रीपर्यंत मोफत शिक्षणाचा केलेला करार पाळण्याची भूमिका घेतली. पण अशी भूमिका इतर रिपब्लिक्स व ईस्ट युरोपियन सोशलिस्ट राजवट कोसळल्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी घेतली नाही.

रशियन सरकारनं ह्या व अशा अनेक बाबतींतल्या करारांचं प्रामाणिकपणे पालन केलं. रशियाचं वेगळेपण, मोठेपण इथं दिसून आलं आणि ते खास अधोरेखित केलंच पाहिजे. शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना अतिरिक्त सुविधा देण्याची प्रथाही पुढं चालू ठेवली. ह्या अतिरिक्त सुविधांमध्ये कॅंटीन कुपन्सचा समावेश असे. महिनाभर चहा-कॉफी स्नॅक्स किंवा दोन आठवड्याचे जेवण त्यातून होऊन जायचे. भाववाढीपायी शिष्यवृत्तीची रक्कम १५ दिवसांतच संपायची. अशा वेळी कुपन्सचा मोठा आधार असायचा. खर्च भागवताना सोशलिझममधली सुरुवातीची तीन वर्षं हमखास आठवायची. माझ्या गाइडनं, तात्याना निकोलायवनानं घरगुती स्ट्रॉबेरी जॅमचे जार दिले होते. आमचे रशियन विद्यार्थिमित्र गावी घरी गेले की परत येताना काही खाद्यपदार्थ आणत असत. तिथं स्थायिक झालेले काही भारतीय वरिष्ठदेखील मदत करत असत.

१९९३-९४ मध्ये सुट्टीत आम्ही इंटरप्रिटेशनची कामं करू लागलो. तब्बल २०००% चलनवाढ झाली होती. शॉक थेरपी सुधारणांचं स्वरूप शॉक प्रचंड व थेरपी फारच कमी असं झालं. उद्योगधंदे बंद पडू लागले व एकंदरीत उत्पादन दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या आक्रमणामुळेदेखील जेवढं घटले नव्हतं, तेवढं घटलं. येल्त्सिन हे रशियन लोकशाहीच्या संस्थापकापेक्षा सोवियत युनियनचे विनाशकर्ते ठरले.

युनिव्हर्सिटीमध्ये सोवियत विद्यार्थ्यांना काय घडतंय ह्याची नीटशी कल्पना येत नव्हती. आत्तापर्यंत एकाच देशाचे नागरिक असलेले आपण अचानक एकमेकांसाठी परके झालो, ह्या भावनेमुळे वातावरणात अस्वस्थता तयार झाली होत. त्या काळात सामाजिक-आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही युनिव्हर्सिटी प्रशासन कर्मचारी, प्राध्यापक या सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांना साहाय्य केलं.

जुलै १९९५ मध्ये शिक्षण पूर्ण झालं. निघताना निरोप समारंभ झाला. त्या वेळी रशिया व इतर रिपब्लिक्सची भरभराट होवो अशी इछा आम्ही सर्वांनी व्यक्त केली. इथं येताना आम्ही सर्व मॉस्को ह्या सोवियत युनियनच्या, एका महासत्तेच्या राजधानीत आलो होतो आणि निरोप मात्र रशियन फेडरेशनच्या राजधानीचा घेत होतो. आमच्या युनिव्हर्सिटीचं नाव तर बदललं होतंच. त्याहीपेक्षा एका मोठ्या देशाचे तुकडे झाले ह्याचं दुःख सर्वांनाच होतं. पुन्हा एकदा रशिया सर्वार्थानं महासत्ता म्हणून उदयास यावा व इतर रिपब्लिक्सही पण समृद्ध व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करत निरोप घेतला.

Irkutsk_ 2012
इर्त्कुत्स्क २०१२

२००९ पासून पुन्हा दर वर्षी कंपनीच्या कामानिमित्त रशिया, बेलारूस दौरे होऊ लागले. या वेळी तिथल्या मुक्कामात मॉस्को, सेंट पिटर्सबर्ग (सोवियत कारकिर्दीतले लेनिनग्राड) इथं आमूलाग्र बदल झाल्याचं जाणवलं. २००८ नंतर रशियामध्ये थोड्याफार सुधारणा सुरू होऊ लागल्या होत्या. मात्र भूतपूर्व सोवियत रिपब्लिक्सच्या धोरणाबाबत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी तत्कालीन सोवियत व त्यानंतर रशियन राज्यकर्ते यांना दिलेल्या शब्दाचं पालन केलं नाही. अण्वस्त्र व इतर शस्त्रनिर्मितीबाबतची धोरणं होती ती. पुतीन-मेदवेदेव ह्या जोडीनं परत एकदा संरक्षणात्मक बाबींवरचा खर्च वाढवला आणि २०१६ पर्यंत देशाला शस्त्रसज्ज बनवलं. आता औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं रशियात पावलं टाकली जात आहेत. रशियाकडे कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही. काहीशा एकध्रुवीय जगाचं द्विध्रुवीय जगात होत असलेलं रूपांतर पाहण्यासारखं असेल. माझ्या स्मरणवहीत १९८८ ते १९९१ हा तिथं अनुभवलेला काळ ठळक अक्षरांत नोंदवून ठेवला आहे, हे नक्कीच!

सुनील बरगे

Sunil Barge

sunilbarge@gmail.com

मूळचे कोल्हापूरचे. बारावीनंतर मॉस्कोमधील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी मधून एम एस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री.
१९९६ पासून मुबई येथे फार्मास्युटिकल क्षेत्रात रिसर्च अँड डेव्हलपमेंट  तसंच  ओव्हरसीस प्रॉडक्ट रजिस्ट्रेशनमध्ये कार्यरत . शिवाय रशियन भाषा शिक्षक, अनुवादक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s