पहाडी लावण्यभूमी: भूतान

रूपा देवधर

रस्त्यावरचा भूतान:

फुनशोलिंगला पोचलो, तेव्हा अंधार पडायला लागला होता. मनात उत्साह आणि आनंद होता. आम्हां मित्र-मैत्रिणींची या रमणीय देशाची सफर उद्यापासून सुरू व्हायची होती.

फुनशोलिंग हे भारत-भूतान सीमेवरचं गाव, भूतानचं प्रवेशद्वार. पण या दोन देशांमध्ये तारेचं कुंपण नाही की निर्मनुष्य जमीनपट्टा नाही. शहरातल्याच एका रहदारीच्या रस्त्यावर एक उंच कमान बांधलेली. खालून ट्रॅफिक चालू. कमानीच्या दोन बाजूंना दोन सैनिक उभे. पण त्यांना फारसं काम नाही. एका बाजूला भूतान तर दुस-या बाजूला भारत. गाड्या इकडूनतिकडे सहजपणे जा-ये करतात. काहींची घरं भारताच्या भागात तर व्यवसाय-नोकरी भूतानच्या भागात किंवा उलट. दोन्ही देशांतली चलनं दोन्हीकडे स्वीकारतात. दुकानातला माल सगळा भारतात दिसतो तोच. भारताची या चिमुकल्या देशाला सर्वच बाबतींत खूप मदत असते.

असा हा सगळा भारताचाच भाग वाटत असताना एक अनुभव आला. रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारायला निघालो. दुकानं बंद झाली होती. रस्त्यावर थोडी वर्दळ. एका चौकापर्यंत जाऊन परत येत होतो. रस्ता क्रॉस करणार, तेवढ्यात वेगानं एक कार आली. आम्ही थांबलो आणि ती कारही थांबली. आम्हांला – पादचा-यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून!

आणि लख्ख जाणीव झाली की आपण ‘परदेशात’ आलो आहोत!!

Tibet Map 2

अशीच सभ्यता, ऋजुता आणि मनाचा सरळपणा सगळीकडे अनुभवाला येतो. नागरिक फार श्रीमंत नसावेत. पण सुबकता आणि स्वच्छता सगळीकडे दिसते. बौद्धधर्माची शिकवण आणि धर्माला महत्त्वाचं स्थान आहे. त्याचा परिणाम एक शांतता अनुभवाला येते. इतर काही देशांत कायद्याच्या जरबेमुळे लोक प्रामाणिकपणे वागतात. इथं तो पापभीरूपणा आतूनच आलाय असं वाटतं. गुन्ह्यांचं प्रमाण खूप कमी आहे. अलीकडे प्रवेश केलेल्या टीव्हीमुळे मात्र ते जरा वाढलंय.

रस्त्यावर जास्त प्रमाणात दिसणारे भूतानी तरुण त्यांच्या पारंपरिक वेशात असतात. किरा-टेगो हा स्त्रियांचा, तर घो हा स्कर्टवजा कपडा पुरुषांचा. हल्ली जगभर आढळणारे जीन्स-टीशर्टही दिसतात. पण परंपरेला महत्त्व फार. आणि कोणत्याही प्रकारचं कामकाज करताना हा वेश आवश्यक! त्यांचा लाडका तरुण राजा, राणी आणि दीड-दोन वर्षांचा राजपुत्र यांचे फोटो लोक आपल्या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये लावतात.

मुख्य व्यवसाय पर्यटन. त्याला अनुकूल अशा गोष्टी आहेत. उंच पर्वतरांगांमधून जाणारे रस्तेही गुळगुळीत, चार पदरी आहेत. कुठंही भय वाटत नाही. आरामशीर हॉटेल्स, आणि सगळी कामं करणा-या मुलीच! कष्टाळू आणि हसतमुख. बॅगा उचलायला, रिसेप्शनवर, जेवण द्यायला आणि नळ का चालत नाही हे बघायलाही! या नाजूक मुली ‘बॅगा आम्ही उचलतो’ म्हटलं तरी थांबत नाहीत. हसत-हसत किराचा घोळ सावरत बॅग उचलून चालू लागतात.

पर्यटनाचे काही महिने सोडले, तर जीवन तसं सोपं नसावं. भरपूर थंडी, पाऊस आणि डोंगराळ प्रदेश. पण धर्मावरच्या श्रद्धेनं यांना मनातून कणखर बनवलंय, आणि ऋजूसुद्धा!

नंतर प्रवास संपत असताना एक आठवण आली, ती कायम लक्षात राहिली.

फुनशोलिंगमधला भारतीय दुकानदार गप्पा मारताना सांगत होता, हे लोक खूप म्हणजे खूपच सरळ आहेत. काही वेळा वाटतं की, त्यांनी जरा व्यवहारी बनावं.

आपल्याला मात्र वाटतं, त्यांनी असंच राहावं. त्यांच्या वैशिष्ट्यांसह. लोभस, हसतमुख, निरागस!

……………………………………………………………………

अल्बम

भूतानमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक रमणीय दृश्यांचे लोलक आपल्या पुढे-मागे हलत असतात. बहुसंख्य प्रवासी पश्चिमेकडील चार भागांतच फिरतात. त्यात प्रसिद्ध ठिकाणं म्हणजे टायगर्स नेस्ट, थिंफूमधली उंच बुद्धमूर्ती, चेलेला पास, डोचुला पासमधले एकशेआठ स्मारकस्तूप आणि काही भव्य झॉन्ग (फोर्ट्रेस). पण मध्य भूतान, पूर्व भूतान अपरिचितच राहतो. तिथं जाणं शक्य नाही का? का तिथं जायची परवानगीच नाही? हा उंच पर्वतांचा प्रदेश गूढच राहणार का?

खरं तर तसं नाही. भूतान सरकारनं आता त्याही भागात रस्तेबांधणी सुरू केलीये. पुढल्या काही वर्षांत तिथं पायाभूत सुविधा निर्माण होतील. सध्या काहीसा अविकसित असलेला हा भाग सर्वांना जाण्यायोग्य आणि खुला होईल. तोपर्यंत काही धाडसी प्रवासी तिथं जाताहेत आणि अस्पर्श सौंदर्याची अनुभूती घेताहेत.

ही सर्व प्रसिद्ध ठिकाणं सुंदर आहेतच, पण या सर्वांच्या आडून-आडून डोकावणारा भूतान खूप मोहक आहे. कितीही बघितला तरी न संपणारा आहे आणि कळला असं वाटलं तरी नव्यानं वर उमटणारा आहे. आपण घरी परतल्यावरही तो अल्बम डोळ्यासमोर येतो, अधनंमधनं उघडत राहतो. त्यातलीच ही काही पानं.

……………………………………………………………………

stamp_0003_small

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्यानं येते एक कोंदट जागा. त्यात मोठाल्या रांगा, तिष्ठणारी माणसं, टेबलावर सांडलेला डिंक आणि एक अस्ताव्यस्तता! हल्ली भारतातल्या पोस्ट ऑफिसांनी कात टाकली आहे म्हणतात, पण तरीही साइट सिइंगच्या यादीत थिंफूमधल्या पोस्ट ऑफिसचं नाव वाचून वाटलं, ठीक आहे, असेल एखादी देखणी इमारत. बघून घेऊ.

कोसळणाऱ्या पावसात आणि कुडकुडायला लावणाऱ्या थंडीत गाडीपासून पळतच थिंफू पोस्ट ऑफिसच्या दारात पोचलो. इतर इमारतींप्रमाणेच ही इमारतही वैशिष्ट्यपूर्ण भूतानी नक्षीकामानं नटली होती. आतमध्ये सुबकता तर होतीच, पण सरकारी ऑफिस न वाटता एखादया टूरिस्ट स्पॉटला जे सुवेनिर शॉप असतं, त्याची आठवण येत होती. तिथल्या दालनात शेल्फांवर वस्तूच वस्तू होत्या. जॅकेटस, टोप्या, की चेन्स, टी शर्ट्‌स, पर्सेस आणि पिक्चर पोस्टकार्डस! भरपूर विदेशी पर्यटक फिरत खरेदी करत होते.

खरंच ते एक सुवेनिर शॉपच होतं. भूतान या स्पॉटचं मार्केटिंग करणारं आणि सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण होती ती कोपऱ्यातली स्टॅम्प विक्री!

पोस्टाचं खरं काम करणारी माणसं वरच्या मजल्यावर होतीच, पण हे दालन खास पर्यटकांसाठी सजवलं होतं. तिथल्या स्टॅम्प विक्रीबद्दल साधारण ऐकून माहिती होतं, पण ही गोष्ट खरी असेल आणि सहज पूर्ण होत असेल असं वाटलं नव्हतं.

दालनाच्या त्या कोपऱ्यात एक चटपटीत तरुणी बसली होती. तिच्यापुढे छोटीशी रांग होती. पर्यटक उत्साहात एकमेकांशी बोलत, हसत, तिला पेन ड्राइव्हवरून किंवा कॅमेऱ्यामधून आपले निवडलेले फोटो देत होते. साधारण दोन मिनिटांत जणू एखादी रंगीत झेरॉक्स काढावी तसा तीनशेसाठ रुपयांत आपल्या फोटोंच्या बारा स्टॅम्पसचा छापील कागद ती देत होती! तिथंच पलीकडून भूतानची रंगीत पिक्चर पोस्टकार्ड्‌स आपण घ्यायची. आपल्या मित्रांना पत्रं लिहायची (हे अनेक वर्षांत केलं नसेल). आपले स्टॅम्प चिकटवून तिथंच पोस्टात टाकायचे. पुढच्या आठ दिवसांत आपल्या सुहृदांच्या घरी ही पत्रं पोचतात. आणि महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्याऐवजी त्यावर आपल्या फोटोंचे स्टॅम्पस असतात!

फक्त भारतातच नाही, तर जगात कुठंही ही पत्रं पोचतात. आमचीही पत्रं भारत, अमेरिका, जर्मनी इथं पोचली. जिवलग कुटुंबियांसाठी हे आनंदमिश्रित आश्चर्य होतं. त्यांनी आणि आम्ही अर्थातच ती अगदी जपून ठेवली आहेत. तो एक मजेदार आनंदाचा ठेवाच आहे!

……………………………………………………………………

झॉन्ग आणि मॉन्क

भूतानच्या सुंदर प्रवासात माझं सारखं लक्ष जायचं, ते जिकडंतिकडं दिसणाऱ्या लालसर कपड्यातल्या बौद्ध भिक्षूंकडे. त्यातही चिमुकल्या भिक्षूंकडे जास्तच! इतक्या प्रमाणावर हे दिसतात की पुन्हापुन्हा जाणीव होते ती इथल्या समाजजीवनावर असणाऱ्या बौद्धधर्माच्या पगड्याची.

सर्व प्रमुख शहरांमध्ये उठून दिसतात ते फोर्ट्रेस किंवा झॉन्ग (Dzong). हे झॉन्ग सत्तेचं प्रतीक आहेत. १५ व्या-१६ व्या शतकात तिबेटी हल्ल्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून बऱ्याच झॉन्गची निर्मिती झाली. पुनखा, थिंफू, परो, सगळीकडे साधारण एकाच प्रकारे बांधलेले झॉन्ग आहेत. बाजूनं वाहणारी नदी आणि जरा उंचावर भव्य मजबूत बांधणीचे किल्ले.

भक्कम मोठं प्रवेशद्वार. आत मोठे-मोठे चौक. शत्रूशी मुकाबला करता यावा अशी रचना. धान्य साठवण्यासाठी कोठारं, भिक्षूंच्या निवासखोल्या, शासकीय कामकाजाच्या आणि धर्मपीठाच्या स्वतंत्र इमारती. सोळाव्या शतकात गुरू शाबद्रुन्ग नवांग नामग्याल यांनी भूतानची घडी बसवताना या दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात केली. ती अजून चालू आहे. भूतानच्या राजकीय निर्णयप्रक्रियेमध्ये या दोघांनाही स्थान आहे. लोकशाही आहे, पण अंतिम निर्णय लोकांना प्रिय असलेल्या तरुण राजाकडे आहे.

झॉन्गच्या आतमध्ये मोठी प्रार्थनागृहं आहेत. बहुतेक ठिकाणी मध्यभागी गौतम बुद्ध आणि दोन्ही बाजूंना गुरू पद्मसंभवा आणि गुरू शाबद्रुन्ग नवांग नामग्याल यांच्या मूर्ती आहेत. इथं फोटो काढायला बंदी आहे.

झॉन्गच्या रचनेत सौंदर्य आणि वैराग्य एकाच ठिकाणी दिसतात. लाकडी नक्षीदार खांब, महिरपीच्या खिडक्या, भिंतींवर बुद्धजीवनावर आधारित विशाल रंगीत चित्रमालिका आणि विशिष्ट प्रकारची– कापडी झिरमिळ्यांची झुंबरं. लाल, पिवळा, सोनेरी, निळा हे रंग सगळीकडे उठून दिसतात.

आणि दिसतात झॉन्गचा अविभाज्य भाग असलेले, सतत इकडून तिकडे जाणारे, काही कामात असलेले भिक्षू.

त्यात काही किशोरवयीन भिक्षू. हे लहान वयातच धर्मविषयक शिक्षण घेण्यासाठी झॉन्गमध्ये राहायला येतात. त्यांना काही आधुनिक शिक्षणही दिलं जातं. त्यांचं राहणं, जेवणखाण, खेळ सगळं तिथंच. सामान्य नागरिकांप्रमाणेच, पण थोडी वेगळी दिनचर्या. त्यांनाही दैनंदिन कामंधामं असतातच, पण प्राधान्यक्रम वेगळे.

परो झॉन्ग पाहून आम्ही बाहेर पडलो. तिथल्या भव्य इमारती, नक्षीकाम डोळ्यांसमोर होतं. बुद्धांचा शांतिसंदेश, अहिंसाविचार हे ऐकून भारावलेल्या मन:स्थितीत होतो. मागच्या पुलापर्यंत चाललो होतो रमतगमत. बाजूच्या इमारतीतून विद्यार्थिभिक्षू बाहेर पडत होते. बहुधा त्यांची मधली सुट्टी झाली होती. भिक्षू झाले तरी मुलंच ती. बारा-तेरा वर्षांचे भिक्षू आपली वस्त्रं सांभाळत इकडूनतिकडं पळत होते. पकडापकडी करत होते. काही जण तर चक्क मारामारी करत होते. त्यांचं खेळणं पाहत असताना ‘द कप’ या नितांतसुंदर सिनेमाची आठवण येत होती.

आणि एकदम एक दृश्य नजरेस पडलं.

त्यातल्या एकाला लाल वस्त्रानं झाडाला बांधलं होतं. आणि बाकीचे त्याला व्यवस्थित बदडत होते. फारसं गंभीर प्रकरण नसावं. लवकरच ते थांबलं. आम्ही अवाक होऊन पाहत राहिलो. बाकी उरलेल्या मुलांचे पळापळीचे उद्योग सुरूच होते.

थोडा वेळ थांबून आम्ही पुढे चालू लागलो. त्यांची सुट्टीही यथासांग चालू राहिली.

मनात आलं, बुद्धाची शांतीची शिकवण नीट आकळण्यासाठी हेही आवश्यक असावं.

……………………………………………………….

टायगर्स नेस्ट आणि तरुण वाघीण

भूतानचा प्रवास टायगर्स नेस्टशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भूतानची दृश्य छबी म्हणजे टायगर्स नेस्ट. टूरिस्टांच्या आणि भाविकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं स्थान. अत्यंत उंच आणि दुर्गम ठिकाणी वसलेलं हे मंदिर. तिथपर्यंत जाण्याचा मार्ग पर्वतातला. मुख्यतः पायी जायचं असल्यामुळे खूप कठीण. अनेक जण हा पर्वत अर्ध्यापर्यंतच चढतात आणि तिथल्या विश्रांतिगृहात थांबून परत येतात.

टायगर्स नेस्ट म्हणजेच तक्तसांग मोनॅस्टरी. तिथली एक आख्यायिका अशी की, गुरू पद्मसंभवा (म्हणजेच गुरु रिंपोचे), ज्यांनी आठव्या शतकात भूतानमध्ये बौद्ध धर्म प्रथम आणला, त्यांनी एकदा या ठिकाणी बसून ध्यानधारणा केली. ती त्यांनी केली तीन वर्षं, तीन महिने, तीन आठवडे, तीन दिवस आणि तीन तास. गुरू इथं आले, ते तिबेटमधून, वाघिणीच्या पाठीवर बसून उडत-उडत! या सगळ्यामुळे हे स्थान पवित्र झालं. सतराव्या शतकात या ठिकाणी मंदिराचं बांधकाम झालं. अत्यंत पवित्र असल्यानं हा पर्वत चढून त्या ठिकाणाचं दर्शन एकदातरी घ्यावं ही भूतानी लोकांची मनीषा असते. आम्ही डोंगर चढत असताना एक स्त्री आपल्या वयस्कर वडिलांना घेऊन आली होती. आयुष्यात एकदातरी ‘तक्तसांग’ला जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण होत होती. ते समाधान त्यांच्या सुरकुतलेल्या भावविहीन चेहऱ्यावरही जाणवत होतं.

इथं किंवा एकूणच भूतानमध्ये फिरताना गोऱ्या फिरंगी लोकांची संख्या खूप दिसते. जगाच्या कानाकोपऱ्यांत भटकायला, प्राचीन गोष्टी धुंडाळायला, धाडसी प्रवास करायला हे लोक नेहमी पुढे असतात. आपल्याला अनेकदा प्रवासात दिसतात.

अशीच लक्षात राहिली, टायगर्स नेस्टच्या चढणीवरची एक तरुण विदेशी आई! गोरी, उंच, सशक्त. एकटीच वाटली, तरी ती एकटी नव्हती. तिच्या पाठीवर होतं तिचं फक्त सहा महिन्यांचं बाळ. सोबतीला एक स्थानिक होता. त्याच्याकडे तिची छत्री, इतर वस्तूंची बॅग होती. आधी वाटलं की असेल कोणीतरी मागेपुढे. पण मग कळलं की ती एकटीच आलीये, बाळाला घेऊन. ऐकून चकित झालो. टायगर्स नेस्ट चढताना अनेकांची दमछाक होते. डोंगरातली वाट निसरडी आहे. वर जाऊ तसं ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं. अशा ठिकाणी पाठीला सहा महिन्यांचं बाळ बांधून जायचं? हे कुठलं साहस? त्या बाळाचा तिनं काही विचार केला होता का? स्त्रियांनी, मुलींनी, सर्व प्रकारची धाडसं नक्कीच करावीत. पण अशा कठीण प्रवासामध्ये इवलुशा बाळाला का दामटवायचं? अनेक अनुत्तरित प्रश्न.

तेव्हाच एक मनात आलं की, असं साहस करताना भारतीय माता सहसा दिसणार नाही. तिला जावंसं वाटलं, तरी बाळाची आजी म्हणेल, ‘ठेव त्याला माझ्याकडे, मी बघते.’

संस्कृतींमधला फरक अशा वेळी नेमका अधोरेखित होतो आणि वाटतं की भारतीय कौटुंबिक नातेसंबंधातला चिवट धागा काही वेळा नकोसा वाटला, तरी बरेचदा तो उपकारकच असतो.

…………………………………………………………………………

DSC_0306

छोटा शेजारी

बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीनं मंगोल तोंडवळ्याची सर्व माणसं एकाच प्रकारात मोडतात. बरेचदा त्यांना चपटे म्हटलं जातं किंवा सरसकट चायनीज. यात नेपाळी, व्हिएतनामीजपासून थाई, जपानी, चिनी सगळे येतात.

पण खरं तर यांच्यात कितीतरी फरक असतात. खूप प्रवास करणाऱ्यांना चेहरेपट्टीवरून ते ओळखता येतात. त्याशिवाय भाषा, खाद्यसंस्कृती, पेहराव यांतही वेगळेपण असतं.

यातल्या काही देशांमध्ये आपसांत मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तर काही जानी दुश्मन आहेत.

यातला सर्वांत मोठा, दबा धरून बसलेला, काही वेळा उघडपणे आक्रमक होणारा प्राणी म्हणजे बलाढ्य चीन!

तिबेटचा घास १९५९ मध्ये घेतल्यानंतर इतर चिमुकल्या देशांना साहजिकच धास्ती वाटू लागली. सर्वांनाच स्वातंत्र्याची ओढ असते. त्यांपैकी सिक्कीमचं विलिनीकरण १९७५ साली भारतात झालं. अर्थात काही बाबतींत विशेष अधिकार स्वतःकडे राखून.

आणि भूताननं स्वतंत्र अस्तित्व ठेवलं, भारत या मित्रदेशाच्या आधारावर. भूतानची स्वतःची रॉयल भूतानीज आर्मी आहे, पण आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण भारतावर सोपवलं आहे. भूतानच्या ‘हा’ व्हॅलीत भारतीय लष्कराचं मोठं केंद्र आहे.

सद्यःस्थितीत, हा लेख लिहीत असताना भारत आणि चीन यांचे संबंध याच कारणावरून ताणले गेले आहेत. चीननं या भागात रस्ताबांधणी सुरू केल्यावर भारताने त्यास हरकत घेतली. चीनच्या मते डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि भारतीय लष्करानं तिथं घुसखोरी केली आहे. तर भारताचं म्हणणं आहे की हा निमुळता भाग भूतानचा आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही भारताची जबाबदारी आहे.

नकाशात बघितल्यावर कळतं की चीन आणि भारत यांनी वेढलेला हा ‘लँडलॉक्ड’ देश आहे. आता चीनमध्ये असलेली तिबेट ही मोठी भूमी भूतानला चिकटून आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या भूतान प्राचीन काळापासून तिबेटशी जोडला गेला आहे, तर आधुनिक काळात तंत्रज्ञान, शिक्षण, संरक्षण, व्यापार या बाबतींत भारताशी. बांगलादेशबरोबरही त्यांचे राजनैतिक संबंध आहेत आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक भूतानी विद्यार्थ्यांची पसंती बांगलादेशलाच असते. चीनशी त्यांचे राजनैतिक संबंध नाहीत. उलट तणावपूर्ण वातावरण आहे. एकीकडे बौद्ध धर्माचे समान धागे, तर दुसरीकडे गिळंकृत होण्याची भीती.

या पार्श्वभूमीवर सामान्य लोकांनाही भारताबद्दलच जास्त आपलेपणा वाटतो. वेगवेगळ्या प्रसंगी तो दिसूनही येतो. पण मला सर्वांत गंमत वाटली ती आमचा मार्गदर्शक सोनमचा किस्सा ऐकून.

ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सोनम टूरिझमसंबंधित एक कोर्स करायला शांघायला गेला होता. कारण भूतानला भेट देणारे चिनी प्रवाशांचेही मोठे घोळके असतात. शांघायमध्ये राहून दोन महिने झाल्यावर सोनमला एक अस्वस्थपणा वाटायला लागला. कोणीच ओळखीचं नाही. कोणीच ‘आपलं’ नाही. ‘आपल्या’ भाषेत बोलता येत नाही. या मन:स्थितीत रस्त्यावरून फिरत असताना त्याला एक भारतीय माणूस दिसला. तो दिसल्यावर सोनमला इतका आनंद झाला की, तो त्या माणसाशी जवळ जाऊन बोलला. हिन्दी-इंग्रजीत थोडेफार हास्यविनोद झाल्यानंतर मग सोनमला जरा बरं वाटायला लागलं म्हणे.

छोटीशीच गंमत. ऐकून आम्ही हसलो, पण अंतर्मुखही झालो. इतर अनेकांप्रमाणे मलाही सोनम ‘चिनी तोंडवळ्याचा’ वाटत होता. पण त्याला मात्र ‘ते’ परके वाटत होते, आणि भारतीय ‘आपले’.

आणि आठवण आली की, खऱ्या अर्थानं जे ‘आपले’ आहेत, ईशान्य भारताचा एक भाग आहेत, त्यांना उर्वरित भारतात आपण ‘तितकंसं’ आपलं समजत नाही. स्वतःच्याच देशात त्यांना हा परकेपणाचा अनुभव घ्यावा लागतो, कधी-कधी ‘विदारक’ या स्वरूपात!

…………………………………………………………………………

गाणाऱ्या स्त्रिया

उंच पर्वतांवरून, वळणावळणाच्या रस्त्यावरून, वाटेत खूप उंचीवरची चेलेला खिंड पार करून ‘हा’ व्हॅलीकडे निघालो होतो. रस्ता सुबक, गुळगुळीत होता. दोन्ही बाजूंना उंचच उंच सूचिपर्णी वृक्ष होते. सायप्रस, ज्युनिपर, ब्लू पाईन, फर, ओक. मध्येच दिसणारी लालचुटुक ऱ्होडोडेंड्रॉनची फुलं. हिरवीगार विस्तीर्ण कुरणं, त्यावर चरणारे याकचे कळप. त्यांच्या गळ्यातल्या घंटा हलकेच वाजत होत्या.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाजूक जांभळ्या प्रिमुला फुलांचे गालिचे पसरले होते. मधूनच फडकणारे रंगीत ध्वज बौद्धधर्मियांच्या काही भावना व्यक्त करणारे होते.

इतक्या सुंदर रस्त्यावर फारसं कोणीच नव्हतं. आमच्या मागेपुढे एकही गाडी नव्हती. आम्हांलाही घाई नव्हती. रमतगमत, थंड हिरव्यागार हवेचा अनुभव घेत, मनसोक्त फोटो काढत पुढं चाललो होतो. ‘हा’ व्हॅलीत होम स्टेचा अनुभव घेण्यासाठी.

मध्येच एके ठिकाणी आमच्या चालकानं गाडी थांबवली. ठोकठोक आवाज येत होता. रस्त्याच्या डावीकडे डोंगरात पारंपरिक भूतानी पद्धतीनं घरबांधणी चालली होती. लाकडाची उत्तम बांधणी, त्यात मध्ये माती ठोकूनठोकून स्त्रिया-पुरुष घराचं बांधकाम करत होते. काम करताना मस्त मजेत गात होते. आम्ही नजर खिळवून पाहत राहिलो. फोटो काढत राहिलो. मध्ये अंतर बरंच होतं. पण तिथून हलावंसं वाटत नव्हतं. शेवटी एकदा निघालो. तेव्हा इतक्या लांबूनही त्या भूतानी स्त्रिया हात हलवून आमचा निरोप घेऊ लागल्या. आणि परत एक गाणं म्हणू लागल्या. ते ऐकून सोनम हसायला लागला. म्हणाला, ‘त्या म्हणतायत, तुम्ही जाऊ नका. इथंच थांबा. तुम्ही गेलात तर आमचं गाणं कोण ऐकेल?’

आम्हांलाही हसू आलं. आम्ही गाडीकडे निघालो आणि त्या परत मजेत काम करत गाणं म्हणू लागल्या.

आणि आम्हांलाही नीट कळलं की त्या काही दुसऱ्या कोणासाठी गात नव्हत्या. त्या स्वतःच आनंदाचा मोर झाल्या होत्या. स्वतःसाठीच गात होत्या.

…………………………………………………………………………

चिमी होम स्टे

आत्तापर्यंतचा सात-आठ दिवसांचा प्रवास रमणीय झाला होता. हिरव्यागार उंचच उंच वृक्षराजीनं नटलेले पर्वत, दूरवरची हिमाच्छादित शिखरं, तऱ्हेतऱ्हेची फुलं आणि आनंदी माणसं. प्रवासात सोबत करणाऱ्या नद्या आणि फुलांनी बहरलेली सफरचंद, पीच, प्लमची झाडं.

सुरेख टुमदार लाकडी घरं. त्यांची बाहेरची ठेवण एकसारखी. परंपरागत भूतानी नक्षीकाम असलेल्या लाकडी पट्टया, चौकोनी ठोकळे आणि खिडक्यांभोवतीच्या महिरपी आवश्यक. तसा नियमच आहे. त्यामुळे घरंच काय, कार शोरूम, पोस्टऑफिस, पोलीस स्टेशन आणि विमानतळाच्या इमारतीलाही हे डिझाइन दिसतं.

भूतानमधली शहरंही निवांत. कोणालाही कसली घाई नाही. गाड्यांची गर्दी नाही. ही आनंदी माणसं सांगतात की थिंफू हे जगातलं एकमेव राजधानीचं शहर आहे की, जिथं ट्रॅफिक सिग्नल नाही, केएफसी नाही आणि मॅक्डोनाल्डही नाही! लोकसंख्या दोन लाख आणि संपूर्ण भूतानची सात लाख!!

हॉटेल्स आधुनिक, सर्व सोयींनी युक्त. जेवण रुचकर.

अशा वातावरणात प्रवास चालू असतानाच पुढचा टप्पा आला – ‘चिमी होम स्टे’. शहरांमधली आरामशीर हॉटेल्स सोडून आता लहानशा गावातल्या होम स्टेचा अनुभव घ्यायचा होता.

अनेक डोंगर-घाट उतरून दरीत वसलेल्या त्या चिमुकल्या डुमचो गावात ‘चिमी होम स्टे’ पुढं दाखल झालो, तेव्हा एप्रिल महिन्यातले दुपारचे तीन-साडेतीन झाले होते, पण भूतानमधल्या त्या सुंदरशा ‘हा’ व्हॅलीत मस्त थंडी होती आणि आमचं स्वागत करण्यासाठी चिमी तिच्या घराच्या अंगणात उभी होती.

DSC_0009 B&Wचिमी म्हणजे घराची मालकीण. शांत, हसतमुख आणि कष्टाळू. ‘हा’ व्हॅलीत यांचं लहानसं गाव. स्वतःच्या शंभर वर्षं जुन्या पारंपरिक लाकडी घरात तिनं पर्यटकांची राहण्याची सोय केली आहे. घराच्या मागेपुढे अंगण. त्याला लाकडी फळ्यांचं कुंपण. घराच्या मागच्या बाजूला आटोपशीर वाडी. त्यात भाज्या, वेली, थोडे बटाटे. त्यापलीकडे खळाळत वाहणारी स्वच्छ पाण्याची नदी. तिचा सतत आवाज येत असतो. त्यापलीकडे हिरवा डोंगर.

घराच्या मागच्या बाजूनं आत प्रवेश केला. एक उंच, अरुंद, उभा शिडीवजा जिना. सांभाळत वर गेलो. भरपूर थंडी होती. अंगात जाड जॅकेट होतं. गरमागरम चहा देऊन चिमीनं आमच्या आतिथ्याला सुरुवात केली. तिचं स्वैपाकघर खूप उबदार होतं. तिथं मध्यभागी एका विस्तवावर भलंमोठं पातेलं. त्यात पाणी उकळत होतं. उद्देश – हवा गरम राहावी आणि लागलं तर स्वैपाकात वापरावं.

स्वैपाकघरातच त्या चुलीभोवती सतरंज्या टाकलेल्या. त्यावर बसून गरम चहा घेताना छान वाटत होतं. तिथंच चिमीचा गुटगुटीत नवरा बसून मंद हसत त्या विस्तवात लाकडाचा एकेक ढलपा लागेल तसा सरकवत होता. चिमीनं त्याला तेवढं एकच काम दिलं असावं. दुसरे दिवशी निघेपर्यंत त्याला वेगळं काही करताना पाहिलं नाही आणि बोलतानाही पाहिलं नाही.

आतल्या घरात लहानमोठ्या खोल्या. स्वच्छ पांढऱ्या चादरी घालून आरामशीर बिछाने तयार होते. भिंतींवर सगळीकडे पारंपरिक शैलीतलं अलंकरण, रंगीबेरंगी ध्वज, बुद्धमूर्ती, बुद्धजीवनावर आधारित चित्रं. त्याशिवाय सगळीकडे दिसणारा राजा-राणी आणि राजपुत्र यांचा फोटो. चिमीची सर्टिफिकेट्स. होम स्टे आणि हॉस्पिटॅलिटीचे कोर्सेस केलेत असं सांगणारी. तिची मुलं शिकायला बाहेर होती. चार पैसे जोडावेत म्हणून तिनं हा व्यवसाय सुरू केला असावा.

IMG_20170419_151812

तिच्याबरोबर भाषेचा प्रश्नच होता. बहुधा जास्त इयत्ता झाल्या नसाव्यात. त्यामुळे एरवी सगळीकडे चालणारं इंग्लिश इथं निरुपयोगी होतं. पण बॉलिवुड हे विद्यापीठ इथंही कानाकोपऱ्यांत पसरल्यानं हिंदीचा आधार होता. त्यावर आमचा जेवणाचा मेनू ठरला. शिवाय स्थानिक झोंगखा भाषेत बोलणारा सोनम आणि चालक अभी हे मदतीला होतेच.

मला वाटलं दहा जणांचा स्वैपाक ही एकटी कशी करणार? कारण अजून एक हैदराबादचं जोडपंही त्या दिवशी मुक्कामाला होतं. पण आम्ही गावात फिरून आलो, तर सातच्या ठोक्याला ‘जेवण तयार आहे’ असा निरोप आला. दोन प्रकारच्या भाज्या, दाल, चिकन करी, एग करी, एमा दातसी हा खास भूतानी प्रकार आणि लाल रंगाचा स्थानिक भात! अतिशय चवदार जेवण. एमा दातसी म्हणजे चीज सॉसमध्ये बनवलेली मिरच्यांची एक डिश. भूतानी लोकांना या मिरच्या अगदी प्रिय. अनेक पदार्थांत घालतात. एमा म्हणजे मिरची. त्याचे भाऊबंद म्हणजे केवा दातसी आणि शामू दातसी. बटाटे किंवा मशरूम घालून. सगळेच प्रकार चविष्ट. कोबी-बटाटा भाजीला मसाला काय घातला विचारलं तर ‘काही नाही’ हे उत्तर! फक्त तिखट आणि मीठ. म्हणजे या भाज्यांनाच स्वतःची चव होती तर! असणारच. भूतानमध्ये फक्त सेंद्रीय शेती आहे. रसायनांचे फवारे भाज्यांवर मारले जात नाहीत.

जेवण छान झालं. बाहेर गडद रात्र झाली होती. आकाश चांदण्यांनी खच्चून भरलेलं. चुलीभोवती सगळे गप्पा मारत बसलेले. हळूहळू गाणी सुरू झाली. गायक कोणीच नव्हतं, पण सोनमचा सगळ्यांना आग्रह. आणि भूतानच्या त्या चिमुकल्या गावात मराठी, तेलुगू, इंग्रजी, भूतानी, हिंदी – सगळ्या भाषांमधली गाणी लहरू लागली. मध्येच चिमीनं जेवणानंतर थोडीशी घेतली जाणारी ‘आरा’ आणली. तांदळाची वाइन. त्यानं जेवणाचा शेवट करायचा म्हणे. बरं. घेतली. होती छान. पण ‘हलकं’ वाटण्यासाठी त्याची काहीच गरज नव्हती. तो निसर्ग, थंडी, ते जेवण, चुलीची ऊब, चिमीच्या आतिथ्याची ऊब, यांमुळे सगळं वातावरण एका उंचीवर गेलं होतं.

आम्ही सगळे प्रवासी. आम्ही पुण्याचे चार मित्र-मैत्रिणी, हैदराबादचं ते तरुण जोडपं, थिंफूच्या शहरी भागातले सोनम-अभी आणि भूतानी खेड्यातले चिमी आणि तिचा नवरा. पुन्हा कुठे कधी भेटणार आहोत?

पण ती रात्र, ते जेवण, ती गाणी आणि तो अनुभव मात्र नेहमी आठवत राहणार आहे.

रूपा देवधर

Profile photo_Roopa Deodhar

इ-मेल – roopa_deodhar@yahoo.com

फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर. क्वचित केलेले नैमित्तिक लेखन दैनिक सकाळ, साप्ताहिक सकाळ, ‘कवडसे’ दिवाळी अंक यात प्रसिद्ध. मुंबईतील आंतरराष्ट्रीय जाहिरात संस्था, तसेच पुण्यातील लहान स्टुडिओपर्यन्त डिझाइनिंग कामाचे अनेक अनुभव. राष्ट्रीय पातळीवरील कॅम्पेनमधील सहभागापासून ब्रोशर्स, इंडस्ट्रियल हाऊसजर्नल्स, बुक कव्हर आणि बुक डिझाईन असे अनेक प्रकार – काही वेळा कॉपी रायटिंगसह केले आहेत. तसेच काही एनजीओजकरता फंड रेजिंग ब्रोशर्सही केली आहेत.

One thought on “पहाडी लावण्यभूमी: भूतान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s