आशय गुणे
मागच्या वर्षी जुलै महिन्यात ‘प्रथम’मध्ये काम करायचं निश्चित झाल्यावर इंटरव्ह्यू देतानाच मी आश्वासन दिलं होतं की, मला दिलेल्या प्राथमिक जबाबदारीव्यतिरिक्त जिथं कुठं जावं लागेल, तिथं प्रवास करायची माझी तयारी आहे. तेव्हा इतकंच माहीत होतं की ‘प्रथम’ ही एक देशव्यापी संस्था असून सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन हे काम करणार्या मला आणि माझ्या टीममधल्या सहकाऱ्यांना देशात कुठंही, कधीही जावं लागू शकतं. मला एकूण प्रवासाची आवड असल्यामुळे कामाचा एक भाग म्हणून मी ते आनंदानं स्वीकारलं. प्रवासात नवीन काहीतरी बघायला मिळतं, नवीन लोक भेटतात, नवीन जागा सापडतात आणि तिथल्या समाजाची प्रवृत्ती, समाजातल्या लोकांचे स्वभाव, त्यांची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती हे सारं समाविष्ट होतं. परंतु आता माझा कॅनव्हास थोडा बदलणार होता. कारण ह्या सर्व गोष्टींना मला एका महत्त्वाच्या गोष्टीला जोडायचं होतं. ते म्हणजे, शिक्षण!
‘प्रथम’ ही संस्था १९९४ मध्ये मुंबईत सुरू झाली. ह्या संस्थेच्या कामाबद्दल थोडं लिहिणं क्रमप्राप्त ठरतं, कारण माझे प्रवासातले अनुभव हे त्याच्याशी जोडले गेले आहेत. ही संस्था शिक्षणक्षेत्रात काम करते. ‘प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे आणि तिथे त्याला योग्य शिक्षण मिळाले पाहिजे’ हे ह्या संस्थेचं ब्रीदवाक्य! नव्वदच्या दशकात सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे आणि एकंदर बऱ्याच संस्थांच्या योगदानामुळे शाळा ही देशातल्या जवळ-जवळ प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात अविभाज्य घटक बनू शकली. इतकी की आजच्या घडीला भारतात जवळ-जवळ ९६% मुलं शाळेत दाखल झाली आहेत. देशातली एकूण लोकसंख्या पाहता उरलेला ४% हा आकडादेखील मोठा आहे. तरीही एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शाळेत दाखल करणं हे प्रचंड कठीण आणि त्यामुळे कौतुकास्पद आहे! पण आता प्रश्न येतो तो शैक्षणिक दर्जाचा! प्रथमचाच २००५ वर्षापासूनचा वार्षिक ‘असर’ (ASER- Annual Status of Education Report) अहवाल एक चिंताजनक परिस्थिती समोर आणतो. त्यात असं आढळून आलं आहे की, देशातल्या अनेक मुलांना दुसरीत शिकवला जाणारा मजकूरसुद्धा वाचता येत नाही. काहींना तर अक्षरओळखदेखील नाही! अनेक मुलांना साधी वजाबाकीसुद्धा येत नाही. प्रथमचं मुख्य कार्य हा प्रश्न सोडविण्याचं आहे! ह्या कामाची तपासणी, त्यातून होणारे परिणाम आणि शिक्षण हा विषय अनेक अंगांनी समजून घेणं हे माझ्या कामाचं स्वरूप आहे.
तर, ह्या निमित्तानं ह्या वर्षी फेब्रुवारी आणि मे महिन्यांत माझं महाराष्ट्रातल्या अनुक्रमे नंदुरबार आणि छत्तीसगडमधील बस्तर विभाग इथं जाणं झालं. ह्या दोन्ही भागांचं महत्त्व असं की हे सर्व जिल्हे (नंदुरबार आणि बस्तर विभागातले मी गेलो ते बस्तर, दन्तेवाडा, बिजापूर, सुकमा) आदिवासी समाजाचं वास्तव्य असणारे आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनं देशात सर्वाधिक मागास जिल्ह्यांत गणना होणारे. आदिवासी समाज असल्यामुळे तिथं बऱ्याच बोलीभाषाही अस्तित्वात आणि व्यवहारात. नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या दोन्ही राज्यांना चिकटलेला, तर बस्तर विभाग महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओरिसा ह्या तीन राज्यांनी वेढलेला. त्यामुळे नंदुरबारला हॉटेलच्या गाडीचा मराठी ड्रायव्हर जेव्हा ‘कसा आहेस’ या प्रश्नाचं उत्तर देताना ‘मजामा’ असं म्हणाला तेव्हा आश्चर्य वाटलं नाही. तसंच बस्तरमधल्या एका गावात एक लहान मुलगा ‘तुला हे हवं का’ ह्या प्रश्नाला ‘नको’ असं म्हणाला त्याचंही आश्चर्य वाटले नाही. ऐकायला जरी हे मजेशीर वाटलं, तरीही ‘भाषा’ ही शिक्षण घेण्यातली सर्वांत मोठी अडचणदेखील ठरते. कारण शिक्षण एका प्रमाण भाषेत होतं. म्हणजे नंदुरबारमध्ये भिल्ली, पौची, कोकणी अशा अनेक बोलीभाषा असल्या, तरीही सर्वांना शिकवायचं असेल तर मराठी वापरावी लागते. इथं कोणतीही भाषा लादण्याचा प्रश्न नसतो. पण ह्या लोकांना जर मुख्य प्रवाहात आणलं नाही, तर त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येणार नाही आणि तो यायला हवा, नाहीतर शहरातले लोक त्यांचं शोषण करतील.
प्रथमचे कार्यकर्ते बऱ्याचदा लोकांची बोलीभाषा प्राथमिक पातळीवर शिकतात, त्यांच्याशी बोलतात आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात भर पडते इथल्या लोकांच्या असंख्य रूढींची आणि परंपरांची. ‘शिकून काय करायचंय?’ ही वृत्ती अगदी आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत होती. पण हळूहळू बदल घडू लागला.

बस्तरमधल्या त्या जंगलांमध्ये तर अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी अजून शहर कसं दिसतं हेच पाहिलेलं नाही. हे ऐकून मी थक्क झालो! पण अशाही स्थितीतल्या तिथल्या लोकांना शिकावंसं वाटण्याची कारणं काय असतील? एक म्हणजे तंत्रज्ञान. दुसरं म्हणजे प्रथमच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि तिसरं म्हणजे नरेगा किंवा स्वस्तात अन्न-धान्य पुरविणं अशांसारख्या सरकारच्या योजना! तिसऱ्या कारणामुळे शहरातल्या अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. कारण ह्या योजना म्हटलं की ‘आम्ही कर भरतो आणि आमचे पैसे असे वाया जातात’ असं बहुतेकांना वाटतं. पण नंदुरबार आणि बस्तर इथल्या अनेक लोकांनी आम्हांला सांगितलं की, ‘नरेगा’मुळे अनेकांना कामं मिळाली आणि त्यांच्या हातात अधिक पैसे आले. ह्यात अनेक शेतमजुरांचा समावेश होता. शिवाय अन्न-धान्य स्वस्तात मिळू लागल्यामुळे तो पैसा इतर गोष्टी विकत घेण्याकडे वळवता येऊ लागला. इथले लोक ‘मार्केट’शी जोडले गेले आणि ग्राहक बनले. गावात मोबाइल फोन आले, टी.व्ही आले, दुचाकी वाहनं आली. त्यामुळे बाहेरच्या जगाच्या गोष्टी ह्या जंगलांमध्ये पोचू लागल्या आणि लोकांच्या इच्छा, आकांक्षा वाढल्या. बाहेरच्या जगाशी जोडून घ्यायचं असेल तर शिकलं पाहिजे, असं इथल्या लोकांना वाटू लागलं. साहजिकच शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढलं. इथं एका गोष्टीचा उल्लेख करायलाच पाहिजे. ह्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वर्णन करण्यापलीकडे मोठा आहे. भरीव आहे.
नंदुरबार आणि बस्तर ह्या दोन्ही भागांमध्ये महुआच्या झाडांचं प्रमाण प्रचंड आणि त्यामुळेच दारू पिण्याचं प्रमाणदेखील तसंच! नंदुरबारमध्ये तर बऱ्याच वेळेस असं चित्र दिसलं की घराबाहेर पुरुष मंडळी दारू पिऊन पडली आहेत आणि जवळच त्या घरातल्या महिला मुलांचा अभ्यास घेत आहेत. बस्तरमध्ये तर अनेक गावं अशी आहेत जिथं अजून वीज पोचली नाही. तिथंही अंधार होईपर्यंत घरातल्या महिला प्रथमनं दिलेल्या साहित्याद्वारे मुलांचा अभ्यास घेतात आणि हो, ‘आणखी साहित्य द्या’ असंही सांगतात!
बस्तरमधल्या ह्या पालकांनी तर आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. इथं छत्तीसगढ सरकारनं आदिवासी मुलांसाठी विशेष शाळा बांधल्या आहेत. त्यांना ‘पोर्टा-केबिन’ शाळा असं म्हणतात. महाराष्ट्रातल्या आश्रमशाळांशी मिळत्याजुळत्या. जंगलात अगदी आत वसलेल्या गावांतल्या मुलांनी इथं येऊन वर्षभर राहायचं आणि सुट्टीत दोन महिने घरी जायचं ह्या तत्त्वावर ह्या शाळा चालतात. ह्या मुलांनी आई-वडिलांना सोडून इतक्या लांब अगदी पहिलीपासून शाळेत येऊन राहणं योग्य आहे का, हा विचार आपल्याला अस्वस्थ जरी करत असला, तरीही बहुतांश पालक असं करायला तयार होऊ लागले आहेत; हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं मुलांना शाळेचा युनिफॉर्म, दोन्ही वेळचं जेवण, अभ्यासाची आणि खेळांची सामग्री वगैरे सगळं अगदी विनामूल्य दिलं जातं. आठ महिन्यांनंतर जेव्हा ही मुलं घरी जातात, तेव्हा ती आपल्या पालकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना शाळेतल्या जीवनाबद्दल सांगतात आणि आपण ज्या नवीन गोष्टी अनुभवल्या त्याची माहिती देतात. हे ऐकून गावातल्या इतर लोकांमध्येही उत्सुकता निर्माण होते आणि त्यांचं ऐकून आणखी मुलं ह्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. मुलींच्या शाळा वेगळ्या आहेत. अशा प्रकारे शिक्षणाचा प्रसार होऊ लागला आहे. ह्या शाळांमध्ये टीव्ही असतो आणि अनेकदा मुलं एकत्र टीव्ही बघतानाचं चित्र आपल्याला दिसतं. हा टीव्ही मुलांना बाहेरच्या जगाशी आणखी घट्ट जोडतो आणि मुलं-मुली पुढची स्वप्नं पाहू लागतात.
बस्तरच्या ‘सुकमा’ जिल्ह्यात ‘प्रथम’चे ‘हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटर’ आहे. इच्छुक मुलांमध्ये ‘हॉटेल इंडस्ट्री’त नोकरी करण्यासाठी योग्य ते कौशल्य निर्माण करायचं आणि नंतर त्यांची ‘प्लेसमेंट’ करायची हे काम इथं होतं. हॉटेलमध्ये काम करावंसं का वाटलं हे विचारल्यावर तिथल्या बहुतेक मुलांनी ‘आम्ही हे टीव्हीवर पाहिलं’ असं सांगितलं.

ह्या दोन्ही प्रवासांमध्ये मी अत्यंत आवडीनं अनुभवलं ते ह्या समाजात नांदणारं लोकसंगीत. संध्याकाळ झाली की काही घरांच्या बाहेर गावातल्या दोन-तीन ज्येष्ठ महिला गायला बसतात. मध्येच कुणीतरी ढोल वाजवतो आणि समूहात नृत्य सुरू होतं. मी नंदुरबारला गेलो असताना तिकडे होळी अगदी आठवड्यावर होती आणि बस्तरला गेलो असताना तिथला आंब्याचा हंगाम सुरू होता. हे दोन्ही त्या-त्या भागांमध्ये अतिमहत्त्वाचे सण असल्यामुळे एकंदर सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. मी बाहेरचा असल्यामुळे सुरुवातीला थोड्या लाजणाऱ्या आणि किंचित घाबरलेल्या बायका जेव्हा गायला सुरू करायच्या तेव्हा कुमार गंधर्व ह्यांचे शब्द आठवायचे – ‘लोकसंगीत एक श्रेष्ठ दर्जाचं संगीत आहे. इथं कुणालाही खूश करायचं नसतं, स्वतःसाठी गायचं असतं. लोकसंगीताचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या दुनियेत जाऊन आपल्याला ते ऐकावं लागेल.’ आणि ह्यातून ‘धून’ ह्या संकल्पनेकडे आपण एका गूढ भावनेनं पाहू लागतो. कुठून आल्या ह्या धुना? कुणी रचल्या असतील ह्या? आपल्यापर्यंत कशा आल्या? कसा प्रवास असेल ह्यांचा? गावातल्या ज्येष्ठ महिलांना तोंडपाठ असलेल्या ह्या रचना इथल्या तरुण मुलामुलींच्या तोंडी मात्र नाहीत. ह्या गोष्टीनं आपण चिंतीतदेखील होऊ लागतो. पण लगेच लक्षात येतं की ही तरुण मुलंमुली इथल्या मातीतलं संगीत वेगळ्या अर्थानं विकसित करतील. कारण त्याला त्यांच्या विचारांचे प्रवाहदेखील जोडले जातील. ही मुलं पुढं जिथं कुठं जातील तिथं हा प्रवाहही जात राहील. त्यात आणखी काही मिसळून जाईल. कदाचित काही दशकांनंतर ‘विकसित’ संगीत सादर करण्यासाठी ती व्यासपीठावर विराजमानही होतील.
‘प्रवास’ हा बहुतेक वेळेस त्या जागेचे पॉइंट्स, तिथले फोटो, तिथला निसर्ग, तिथले खाद्यपदार्थ ह्यांबद्दल बोलण्यात जातो. ह्या विषयांना धरून अनेक फोटोही काढले जातात. आता तर ह्यात ‘सेल्फीची भर पडली आहे. ह्या सर्व गोष्टी आनंद देणाऱ्याच आहेत आणि महत्त्वाच्याही आहेत. परंतु मला ह्या दोन्ही जागांमध्ये माणसं बघायला मिळाली. माणसांचं दर्शन. त्यांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि स्वप्नं यांचं! त्यांनी घडवून आणलेल्या बदलांचं. ह्या बदलांद्वारे विकसित होणार्या समाजाचं दर्शन घडलं!
हा बदल तर घडतो आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का, हा प्रश्न आहे.
आशय गुणे
इ-मेल – gune.aashay@gmail.com
प्रथम एज्युकेशनल फाऊंडेशन इथे सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन मॅनेजर तसंच संपर्क या संस्थेचा विश्वस्त. संगीत, लिखाण, अनुवाद, वाचन, राजकारण, सामाजिक विषय आणि भटकंती याची आवड.
व्हिडिओ – आशय गुणे