हिंदोळ्यावर

आनंद पत्की

इटलीमधला एक आठवडा आणि त्यानंतर आता स्वित्झर्लंड. आपलं आपण फिरताना मजा येते, तसा त्रासही होतो. शोधाशोध करण्यात जाणारा वेळ त्रासदायक खरा पण आपलं आपण काही मिळवल्याचं समाधान मोठं असतं. आता इंटरलाकेनला मात्र आमचा तीन दिवस मुक्काम असणार होता. फिरण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण. इथून आसपासची शिखरं बघून होतात. यश चोप्रांची स्मृती जपणारं, मैलोगणती पसरलेल्या दोन अवाढव्य तलावांच्या सान्निध्यातलं हे शहर खूप सुंदर आहे.

इथं आम्ही राहिलो ते हॉटेल एका कुटुंबानं चालवलेलं होतं.  उर्सुला या आमच्या यजमानिणीनं स्वागत केलं. खोल्या वगैरे दाखवून स्थिरस्थावर झाल्यावर तिनं आमचे फिरण्याचे प्लॅन काय याची चौकशी केली. आम्ही गतानुगतिक! युंग फ्राऊचं नाव घेतलं, तर तिनं मुद्द्यालाच हात घातला. तुम्हांला पैसे जास्त खर्च करण्याची इच्छा असेल तर जरूर जा. पण मला वाटत नाही तुमचा तो उद्देश असेल. म्हणून मी तुम्हांला सुचवते की, तुम्ही शिलथॉर्नला जावं. तिनं लगेच नकाशा समोर पसरला. हे शिलथॉर्न आणि समोर हे युंग फ्राऊ. तिथून दिसणारी सगळी शिखरं तुम्ही इथूनही बघणार. पण शिखरापर्यंत पोहोचणं तेवढंच महत्त्वाचं असतं का? आपण शिखर बघायला जातो, तो प्रवासही तितकाच सुखद, अनुभव संपन्न आणि आनंददायी हवा. युंग फ्राऊ छान आहे पण खूप महाग आहे. या ट्रॅव्हल कंपन्यांमुळे सगळे तिकडे धावतात पण शिखराकडे जाणारी रेल्वे बोगद्यातून जाते मग आसपासचा परिसर कसा दिसणार? माझ्या मते तुम्ही शिलथॉर्न जास्त एन्जॉय कराल. आम्हाला न पटण्यासारखं यात काहीच नव्हतं. आम्ही शिलथॉर्नला जाण्याचा बेत पक्का केला.

IMG_5320
शिलथॉर्न

दुसऱ्या दिवशी सकाळी लाउटरब्रुनेनला जाणारी गाडी पकडली. या वेळच्या गाडीचा रंग खूप वेगळा, हिरवा आणि पिवळा. आत्तापर्यंत स्वित्झर्लंडच्या झेंड्याच्या झळाळत्या लाल रंगाची सवय झाली होती. सगळा रस्ता त्या गाडीच्या संगतीत काढल्यावर वाटलं की या इथल्या वातावरणाला किती साजेसा आहे हा रंग! आत्तापर्यंत बर्फाळ शिखरांच्या सान्निध्याची सवय, इथं ती तर होतीच पण इथल्या डोंगरांवर हिरवाई होती. तसा इथं सपाटीचाही प्रदेश होता. त्यामुळे झाडांचा सहवास सुखद वाटत होता. आणि हो, या सगळ्या मार्गावर म्हणजे आम्ही इंटरलाकेन वेस्टपासून सुरुवात केली तिथपासून सोबत केल्यासारखा झुळझुळणारा नदीचा प्रवाह साथीला होता. एकूणच हा निसर्ग तसा मैत्रीपूर्ण वाटणारा, त्यात या हिरव्या रंगाची साथ आणि त्यात मिसळून जाणारा हा गाडीचाही हिरवा-पिवळा रंग! हे निसर्गाच्या तादात्म्याचं भान आपल्याकडेही ठेवायला हवं. तो आपल्याकडच्या डब्यांचा कळकट रंग फार विरूप दिसतो. जाऊ दे. निसर्गाच्या कौतुकात बुडालेलं असतानाच लाउटरब्रुनेन आलं.

आता उतरून केबल कार घ्यायची की मग ग्र्युटशाल्प (Grütschalp). ग्र्युटशाल्पहून आम्हाला रेल्वेनं म्युरेनला जायचं होतं. इथं म्हणे पूर्वी सरळ लाउटरब्रुनेन ते म्युरेन अशी ट्रेन होती. पण हा मधला म्हणजे ग्र्युटशाल्पचा चढ खूप सरळ आहे. त्याकरता ट्रेनऐवजी हा केबल कारचा जास्त सोयीचा पर्याय. लाउटरब्रुनेनहून ग्र्युटशाल्पला वर येताना मध्येमध्ये ते रेल्वेचे अवशेष दिसतात. केबल कारचा प्रवास तसा जेमतेम ५-७ मिनिटांचा. रोमांचक वगैरे अजिबात नाही. सुरुवातीला दिसणारा रस्ता, एखादं-दुसरं वाहन, गाव, कामं करणारी माणसं मागे टाकून पुढे जाताना बराचसा खडकाळ भाग दिसतो. झाडं आहेत पण ती आहेत एवढ्यापुरतंच त्यांचं अस्तित्व. बर्फाळ डोंगरांचं सान्निध्य हा त्यातला चांगला भाग.

ग्र्यूटशाल्पला समोर एक उभा चढ आणि त्यावरून गेलेला रेल्वेमार्ग दिसत होता. इतक्या सरळ चढावर गाडी कशी जात असेल? मनात हा विचार येतो आहे तोच वरून एक डबा येताना दिसला. बोगद्यासारखं काहीतरी दिसत होतं तिथून सरळ खाली येत होता. थोडा वेळ गेला तर खालून वर जाणारा तसाच एक डबा वर चढत होता. दोन्ही ठरावीक वेळी समोरासमोर आले तिथं तो रेल्वेमार्ग दुभागला होता. आपापल्या रस्त्यानं मग त्यांनी एकमेकांना ओलांडलं आणि पुन्हा एकच लाइन असलेल्या मार्गावरून त्यांचं मार्गक्रमण सुरू झालं. लांबून हे सारं बघायला मजा येत होती. आमच्या रमत-गमत जाण्यामुळे या प्रवासाचा आनंद मनसोक्त उपभोगता येत होता.

केबल कार जेव्हा प्लॅटफॉर्मला लागते तेव्हा त्या अचूकतेचं कौतुक वाटतं. बाहेर पडायची दोन्ही बाजूंना असलेली व्यवस्था, एका बाजूला उतरणारी माणसं, ती उतरून रिकाम्या कारमध्ये दुसर्‍या बाजूनं आत चढणारी माणसं. उगीच कल्ला नाही. हे व्यवहार शांतपणे होतात. त्यांना त्यांची स्वतःची गती असते आणि तरीही या सगळ्याला घड्याळाचं बंधन असतं. आपल्याकडे आपण हॉर्न वाजवतो, उतावीळपणे ओव्हरटेक करतो पुढे जातो, तरीही उशिरा पोचतो. मग इथं असं काय आहे की कोणतीही लगबग, ढकलाढकल वगैरे न होता निवांतपणे पण रेंगाळत नव्हे तर स्वतःची एक अंगभूत गती असल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट पार पडते, तीही ठरावीक वेळात?

IMG_5598

केबल कारमधून बाहेर आलो. इथून आता रेल्वेनं म्युरेन. म्युरेन हे तसं आडनिडं गाव. सरळपणे इथं येण्याला वाव नाही. म्हणूनच हा सव्यापसव्य. पण तरीही इथं येण्याकरता एकापेक्षा जास्त पर्याय आहेत याचं आश्चर्य वाटावं. गाव नितांत सुंदर. निद्रिस्त वाटावं असं. ठिकठिकाणी दिसणार्‍या स्किइंगच्या पाट्या त्याचं महत्त्व अधोरेखित करतात. पण हे झालं हिवाळ्याच्या दिवसातलं. आत्ता या त्यांच्या समरमध्ये तिथं फुललेली फुलं, मुक्कामाला असणारे हायकर्स, ग्लायडर्स अशा अनेक गोष्टींमुळे इथं गजबज असते. म्युरेनला ट्रेनमधून उतरल्यानंतर पुन्हा केबल कार घ्यायची होती शिलथॉर्नला जाण्याकरता. पण ते इथून उतरा आणि तिकडे केबल कार असं नव्हतं. विचारण्याची आवश्यकता पडणार नाही अशीच व्यवस्था इथं असते त्यामुळे जागोजागच्या पाट्यांनी केलेल्या दिशादिग्दर्शनानुसार आपण ईप्सित स्थळी पोचतो. पण रस्ता सरळ असला, तरी त्यात इतकी व्यवधानं आहेत की ती १०-१५ मिनिटं २०-२५ कधी होतात ते कळतच नाहीत. घरं खूप सुंदर. प्रत्येकानं जोपासलेली सौंदर्यदृष्टी. जागोजागी वाढवलेली फुलं पानं काय अन्‌ काय! त्यामुळे म्युरेन हे फक्त पार करून जाण्यापुरतं मर्यादित राहत नाही. आपण आपल्या नकळत त्याच्यात गुंततच जातो. साधे तोडून आणलेले लाकडाचे ओंडके घेतले, तरी ते इतके व्यवस्थित रचून ठेवलेले दिसतात. यांच्या रोजच्या जगण्यातसुद्धा गबाळेपणा कुठं असेल असं वाटत नाही. मला आमच्या व्हेनिसमधल्या क्रिस्तिआनोची आठवण झाली. स्विस लोकांच्या याच पिक्चर-परफेक्ट गोष्टीवरून तो उपहासात्मक बोलला होता. कोणाला काय आवडावं हा ज्याचा-त्याचा आणि त्या-त्या वेळेचा प्रश्न असतो. आत्ता इथं तरी मला त्यांचा हा गुण मोहवून टाकणारा वाटला. म्युरेनमध्ये आमच्याबरोबर इतर लोकही असेच गुंगलेले दिसले.

पण या अशा वेडाला पोसणारी अशीच यांची व्यवस्था आहे. कुठंही रेंगाळा. अजिबात काळजीचं कारण नाही कारण या केबल कार्स अव्याहतपणे सुरूच असतात एक गेली तर त्यानंतरची मिळेल याची शाश्वती आहे. आता आम्हांला पुन्हा एक केबल कार घ्यायची होती. केबल कारमध्ये बसताना मला नेहमी भास होतो की, आपण उंच टांगलेल्या एका दोराला लटकत आहोत. हातातलं बळ संपत चाललं आहे आणि आता कोणत्याही क्षणी…….. हा विचार मनात डोकावत असताना मग माझी नजर बाहेर जाते. मघा मागे टाकलेलं सुंदर म्युरेन आम्हांला दुरून हात हलवत टा-टा करत असतं, त्याच्या त्या आश्वस्त हाताकडे मग मी बघत राहतो. मघा म्युरेनच्या रस्त्यावरून येताना खूप वाटत होतं एक तरी दिवस इथं मिळायला हवा होता! हे पण नेहमीप्रमाणेच!

म्युरेन तसं अगदी विचित्र जागी वसलेलं गाव. केबल कार त्यांना लाउटरब्रुनेन व्हॅलीशी जोडते. या कठीण परिस्थितीलाच USP बनवून या लोकांनी त्याला अनन्यसाधारण बनवलं आहे. इतक्या या अवघड जागीही सगळ्या सोयी-सुविधांसह सज्ज अशी हॉटेल्स उभी आहेत. आता खाली दूरवर दिसणारी हिरवी कुरणं, अगदी जवळ वाटावेत असे तुटके कडे, कपारी आणि सभोवताली सर्वदूर पसरलेली बर्फाच्छादित शिखरं. खरं तर आत्तापर्यंत बर्फाचं नावीन्य कमी व्हायला हवं होतं पण देवभक्तांना देवळांचा कंटाळा येऊ नये त्याप्रमाणे आम्ही ओरपून प्यायलासारखं ते सारं नजरेत सामावून घेत होतो. का कोण जाणे पण या वातावरणाचा, या सौंदर्याचा कंटाळा कसा तो येत नाही. इथं बघितलं मग तिथं आणखी वेगळं ते काय असणार असं म्हणणार्‍यांची जात वेगळी. त्याबद्दल व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून सोडून देता येईल पण आम्ही मात्र त्याची मनापासून मजा लुटत होतो.

IMG_5527

बर्गला केबल कार थांबली. थांबण्यापूर्वी अनाउन्समेंट झाली ज्यांना पुढे शिलथॉर्नला जायचं असेल त्यांनी दुसरी केबल कार घ्यावी. म्हणजे अजून पुढे प्रवास होता. आम्ही बाहेर आलो. त्या स्टेशनच्या दुसर्‍या भागातून पुढली कार आम्हांला शिलथॉर्नला घेऊन जाणार होती. हे स्टेशन उभं आहे ते एका प्रचंड शिळेवर. केबल कारची ती अजस्त्र यंत्रणा बघूनही थक्क व्हायला होतं. या अवघड जागी हे मनोरे कसे उभारले असतील. किती अवजड ती यंत्रं, ती फिरणारी चाकं, ते जाड घट्ट असे लोखंडी दोर. याचा मेन्टेनन्स हे कधी करत असतील? आणि कसा? वर्षाचे बारा महिने पर्यटक असताना यांना या सगळ्यासाठी कधी वेळ मिळत असेल? या लोकांकडून पर्फेक्शन, प्रिसिजन या गोष्टी नक्कीच आपण शिकण्यासारख्या आहेत. ‘अशक्य ते शक्य करिता सायास’ असं नुसतं न म्हणता, ‘आधी केले मग सांगितले’ असा त्यांचा बाणा त्यांच्या या सार्‍या कृतीत दिसून येतो.

केबल कार जसजशी पुढे जाऊ लागली तसं आम्ही कुठे होतो ते बघितलं. बाप रे! ती शिळा, ज्यावर ते स्टेशन आहे, तिचं अवाढव्य रूप नजरेसमोर आलं आणि या लोकांच्या इंजिनिअरिंग डोक्याला लवून सलाम केला. या शेवटच्या टप्प्यात आता बर्फ आणि फक्त बर्फच दिसणार होतं. अर्थात आता आम्ही ज्या सुमारे दहा हजार फुटांच्या उंचीवर होतो, तिथं आणखी काय अपेक्षित असणार? चहुबाजूंनी बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेला तो परिसर. याचकरता उर्सुला सांगत होती की युंग फ्राऊ सुंदरच आहे. ते तुम्हांला शिलथॉर्नहून समोर दिसेलच पण तिथं जाणारा मार्ग बराचसा बोगद्यातून गेल्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसत नाही. शिलथॉर्नचं तसं नाही त्यामुळे तुम्हाला शिलथॉर्नचा हा प्रवास नक्की आवडेल. आम्ही तिला मनोमन दाद दिली.

केबल कार थांबली आणि आम्ही बाहेर आलो. शिलथॉर्न आलं होतं. आम्ही बाहेर पडलो ते एक सुंदर गोलाकृती हॉटेल होतं. संथपणे स्वतःभोवती फिरणारं. तुम्ही या, इथं निवांत बसा आणि आमचा धंदा चालवा. आम्ही तुम्हांला कसलेही कष्ट म्हणून देणार नाही. तुम्ही मान फिरवण्याचीसुद्धा गरज नाही. तुम्हांला एखादं शिखर पुन्हा पाहावं वाटलं, ते थोड्या वेळात तुमच्यासमोर आम्ही हजर करू! आम्हाला ही असली श्रीमंती उपभोगण्यापरीस बाहेरचा बर्फ खुणावत होता. बर्फाची चादर नाही तर दुलई होती. हिमशुभ्र म्हणतो त्याचा अनुभव आम्ही इथं घेत होतो. आम्हाला त्या बर्फात जाण्याची आता ओढ होती. इथं येताना एक गोष्ट आम्ही कटाक्षानं केली होती, गरम कपड्यांचं ओझं हॉटेलमध्येच ठेवून आलो होतो. भन्नाट वारा होता, हवा थंड होती पण जोडीला ऊन होतं त्यामुळे काही प्रश्न आला नाही. आम्ही त्यांच्या व्ह्यूइंग गॅलेरीत गेलो.

इथं एक गोष्ट चांगली असते की चारी दिशांना दुर्बिणी होत्या. त्यातून तुम्ही फोकस केलेल्या ठिकाणी कोणतं शिखर दिसतं आहे, त्याचं नाव येत होतं. कोणाला विचारा वगैरे भानगड नाही. काय बघू आणि किती बघू अशी आपली अवस्था होते. समोर पर्वत-शिखरांची रांग दिसते, हिमाच्छादित. दुर्बीण रोखावी, हे टिटलिस (Titlis) हे युंगफ्राऊ (Jungfrau) हे म्यॉन्ख (Mönch) हे आयगर (Eiger) ही रांग बर्निज आल्प्सची ही युरा वगैरे वगैरे. नंतर-नंतर तर ते लक्षात राहणं अशक्य आहे म्हटल्यावर सोडून दिलं. आपलं काम फक्त बघण्याचं. इथं कोणा लेकाला परीक्षेला बसायचं आहे?

IMG_5605

थोडं खाली उतरून गेलं की एक पायवाट होती. काही ठिकाणी तर एका वेळी एकच माणूस जाईल इतकी अरुंद, खाली उतरत जाणारी. पायवाट वगळता सर्वत्र पांढराशुभ्र बर्फ होता. पण उतार इतका होता की, कोणी त्या बर्फावर जाण्याचं धाडस करत नव्हतं. खालच्या बाजूला आणखी एक छोटी गोल व्ह्यूइंग गॅलरी दिसत होती. वरच्या गॅलरीतून दिसणारा हा हिमसाम्राज्याचा श्रीमंती भाग खालून दिसणार नव्हता. तिथं होतं दुसर्‍या दिशेचं दगडी साम्राज्य. विविध आकारांचे कातीव, उभे कडे असणारे ते महाकाय पर्वत. एखादं चुकार बर्फाचं निशाण निसटून तिथं बसलेलं, पण तुरळक. मध्येच दिसणारा हिरवा रंग, तोही नीट बघितला तरच लक्षात यावा असा. इथंही या परिसराचं जवळून आकाशदर्शन घेणारे ग्लायडर्स वीर खूप दिसत होते. इतक्या उंचीवरून खाली बघताना त्यांना काय वाटत असेल या कल्पनेनंच आम्हांला थरथरायला होत होतं. दूर एका शिळेच्या टोकाला घरासारखं काहीतरी दिसत होतं. इथून आता वरचं हॉटेल आणि त्याच्या पुढची खूप मोठी गॅलरी संपूर्ण दिसत होती. भणाणता वारा आणि जोडीला थंड हवा यांमुळे जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं. सगळ्या परिसराला डोळे भरून बघत साठवून ठेवत आम्ही वरल्या दिशेनं परत फिरलो.

इथं जेम्स बॉन्डचा कट आऊट आहे. जेम्स बॉन्डच्या सिनेमाच्या शूटिंगकरता म्हणे इतके मिलिअन किंवा काहीतरी खर्चून स्फोट घडवून आणून त्या ढासळणार्‍या बर्फाचं की डोंगराचं शूटिंग केलं होतं. (ही फिरती गॅलेरी त्या सिनेमाच्या कर्त्यांचं कर्तृत्व आहे.) अवदसाच ही! आता असं कोणी करू गेलं तर त्याविरुद्ध किती आरडाओरडा होईल याची कल्पना केलेली बरी.

सगळी शिखरं पुन्हा एकदा डोळे भरून पाहिली. यातल्या माउंट टिटलिसला आम्ही जाणारच होतो पण बाकीच्या शिखरांचा इथूनच निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची होती.

शिलथॉर्नहून परतीच्या वाटेवरल्या सुंदर, मोहवणाऱ्या म्युरेनला रेंगाळायचं मनात असूनही शक्य नव्हतं. आम्हांला एकतर जिमेलवाल्डला (Gimmelwald) केबल कारनं जाण्याचा पर्याय होता किंवा चालत जाण्याचा. हा मार्ग चालायला छान आहे असं वाचलं होतं आणि उर्सुलाची सूचना पण तशीच होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप लोकं हायकिंग करत शिलथॉर्नला जाणारीही आहेत तरीही या ठिकाणी चढापेक्षा उतार सोपा आहे आणि तो एंजॉय करता येण्याजोगा आहे. त्यामुळे अर्थात आम्ही जरी रेंगाळलो नाही तरी म्युरेन ओलांडून जिमेलवाल्डला जाणार होतो. वाटेत अनेक वेळा डोक्यावरून जाणार्‍या-येणार्‍या केबल कार्स दिसत होत्या. रस्ता तसा व्यवस्थित होता. काही ठिकाणी तर वाहनांचाही होता. आम्ही जसे रमतगमत जात होतो, तशी इतर माणसंही आमच्याप्रमाणे पायी उतरताना दिसत होती. सगळ्या ठिकाणच्या पाट्यांमुळे रस्ता चुकण्याचा प्रश्न नव्हताच.

शांतता हा इथला स्थायिभाव आहे आणि ही बाह्य शांतता आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत उतरत जाते. अशा वेळी मग आपल्याला एरवी सहजपणे समोर येऊनही न जाणवणार्‍या गोष्टी जाणवू लागतात. कदाचित त्या आपल्यापर्यंत किंवा आपल्या आतपर्यंत पोचू लागतात. मनाची कवाडं उघडणं म्हणतात ते हेच असेल का? जागोजागी घरांभोवताली असणारी फुलं, त्यांचं सौंदर्य आता गृहीत धरल्याप्रमाणे सवयीचं झालं होतं.

घरांप्रमाणे जागोजागी दिसणारी खिल्लारं म्हणजे स्वित्झर्लंडचं वैभवच! तसंही हा देश दूधदुभत्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या गायींकडे बघितल्यावर ती समृद्धी जाणवते. पण हे दृष्टिसुख अनुभवण्यापूर्वी आपले कान तृप्त होतात ते गाईंच्या गळ्यात असलेल्या स्विस बेल्सच्या विशिष्ट नादानं. या घंटा बसक्या असतात, आपल्याप्रमाणे गोलाकार नाहीत. धातू मिश्र असावा. काही घंटा पितळेच्या वाटतात तर काही अ‍ॅंटिक लुक असणार्‍या. यांचा नाद ऐकत राहावा असा. आम्ही रेकॉर्ड करायचा केलेला प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही, पण तो कानात मात्र अजूनही रुणझुणतो आहे. या संगीतानं आम्हांला जागोजागी खिळवून ठेवलं.

IMG_5849

खरंतर या घंटानादाप्रमाणे आम्हांला थांबवणारी अनेक प्रलोभनं होती. वाहणारे ओहोळ, खळाळणारे प्रवाह, मध्येच आमच्या भेटीला येणारे हिमाच्छादित पर्वत होते तर काही ठिकाणी असलेल्या गूढरम्य शांततेनं आम्हांला रोखून धरलं होतं. खिळून राहणं म्हणजे काय, त्याचा प्रत्यय आम्हांला येत होता. उतरताना रस्त्यांचे तरी किती प्रकार होते. काही ठिकाणी असलेला पक्का रस्ता मध्येच सोडून द्यायचा आणि जंगलासारख्या दाट झाडीतून उतरणार्‍या पायवाटेला लागायचं. तर मध्येच उतरताना पायर्‍या असत. अशा एकांतात, निसर्गाच्या सान्निध्यात, कोणाही माणसाच्या व्यत्ययाशिवाय आपण आणि आपणच आहोत ही भावनाही किती अनुभवण्याजोगती असते, त्याचा आम्ही प्रत्यय घेत होतो. कित्येकदा शब्दाविना.

जिमेलवाल्ड आलं. इथून पुढं पुन्हा खूपच कठीण उतार आहे. त्यामुळे आम्ही चालत जाण्याच्या फंदात पडलो नाही. इथून केबल कार घेऊन मग स्टेचेलबर्ग. आम्ही स्टेचेलबर्गला आलो आणि जरा पुढे आलो तर तिथं आम्हाला लाउटरब्रुनेनला घेऊन जायला बस उभी होती. चला आजचा दिवस छान गेला. आता आल्या मार्गानं परत. असं आम्ही दोघं म्हणत असताना माझा मुलगा म्हणाला, फार कंटाळला नाहीत ना, तर इथं वाटेत एक ठिकाण आहे ते बघू आणि मग पुढे जाऊ. वाटेतच आहे वगैरे जरी म्हटलं, तरी आता खरं म्हणजे कंटाळा आला होता. इतक्या छान अनुभवानंतर काहीतरी उगीच बाग बघ, हे बघ असा वेळ काढण्याचा अजिबात उत्साह नव्हता. पण त्याचं म्हणणं, ‘सुदैवानं तुम्ही आता आला आहात हा समर आहे (जुलै महिना). या दिवसात इथं येण्याचा मुख्य फायदा हा की, सूर्य खूप उशिरापर्यंत असतो. त्यामुळे आपल्याला खूप उशिरापर्यंत फिरता येतं. इतक्या लांब येऊन आपण वाटेत काय आहे, हे न बघताच कंटाळा करून हॉटेलवर जायचं तर या समरमधल्या मोठ्या दिवसांचा आपण काय फायदा घेणार? रात्री नऊपर्यंत उजेड असतो, त्याचा घेता येईल तेवढा फायदा करून घेऊ.’ कंटाळा ही आमची एक सबबच होती. आणि तिला तो बधणारा नव्हता. आम्ही ठीक आहे म्हणत मुकाट्यानं ट्र्यूमेलबाख (Trümmelbach) वॉटरफॉल्स बघण्यासाठी वाटेत उतरलो.

उतरून बघितलं तर ही भली मोठी रांग तिकिटासाठी. पुन्हा ते १० की १५ युरो द्या. आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये विरोधाच्या जागाच दिसत होत्या किंवा आम्ही त्या शोधत होतो बहुधा. पण त्याला या सगळ्याची सवय झाली असावी. त्याच्या लहानपणी कदाचित त्यानं क्वचित कधीतरी केलेल्या हट्टाकडे आम्ही ज्याप्रमाणे दुर्लक्ष करत असू त्याप्रमाणे तो आमच्या विरोधाला न जुमानता तिकिटांच्या रांगेत उभा राहिला. रांग जरी मोठी दिसत असली, तरी त्यात फार वेळ मोडला नाही. तिकिटं काढून आम्ही पुढे निघालो. एक बंदिस्त असा कॉरिडॉर. तिथं उभे होतो. लिफ्ट आली. सामानाची असावी तशी. पण वर जातानाचा मार्ग ‘दिसत’ होता. म्हणजे त्या मार्गावर पिवळसर प्रकाशाचे दिवे होते. लिफ्ट वर निघाली आणि थांबली.

आम्ही सहाव्या लेव्हलपर्यंत आलो होतो. थांबून बाहेर आल्यावर तसाच पिवळा प्रकाश, अंधार उजळवणारा. प्रचंड आवाज, तुफानी वारा आणि समोर दिसणार्‍या पायर्‍या. एखादी हॉरर फिल्म बघत आहोत हा फील. आम्ही वर जात आहोत आणि सगळं वातावरण धूसर होऊन जातं. आमच्या चष्म्याचा कोणीतरी ताबा घेतं आहे असं वाटतं आणि मग हसू येतं. भणाणता वारा आणि कोसळणार्‍या पाण्याचा प्रचंड प्रपात, सभोवार पाण्याचे तुषार आणि ते कुंद धुरकट वातावरण. दिवे असले तरी तेही पिवळसर आणि प्रखर नव्हेत त्यामुळे इतकं सुंदर गूढरम्य वातावरण तयार झालं होतं. प्रत्येक ठिकाणी पाट्या, ‘निसरड्या पायर्‍या, जपून पाऊल टाका.’ यात भरीला तो सांदीतून आणखी वेगानं घुसून आमच्यावर हल्ला करणारा वारा. खूपच ग्रेट अनुभव आहे. मगाचचा आमचा सगळा नकारात्मक भाव वाहून गेला. आयुष्यात फार कमी वेळा अशा अनुभवता येतात.

IMG_5810

ही एक लेव्हल झाली. खूपच गर्दी या ठिकाणी. अरुंद गॅलरी. त्या डोंगरात इतक्या अशक्य ठिकाणी या सगळ्या सुविधा देणारे ते स्विस लोक धन्य होत! या ठिकाणचं सौंदर्य बघून आम्ही वर गेलो. आता वरच्या गॅलर्‍या आणखी अरुंद. पाण्याचा जोर वाढता. त्याला त्या पर्वताच्या खडकांचा अडथळा. मग त्यातून वाट काढताना त्याची होणारी घुसमट अजून जोरात बाहेर पडते आणि त्या खडकाला भेदून वाट काढते. पाण्याचा आणि त्या पर्वताच्या चाललेल्या त्या आदिम संघर्षातली वार्‍याची भूमिका कोणती ते न कळे. पण त्या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून साकारलेलं शिल्प बघताना आम्ही दिङ्‌मूढ. या ठिकाणी एक सुंदर कोनाडा तयार झाला होता. मग त्यात बसून वरच्या बाजूनं फोटो काढायचे प्रयत्न. पण उडणारे पाण्याचे तुषार सारं व्यर्थ ठरवत होते. बरं वरच्या माणसाच्या सूचना खाली सोडा शेजारच्या माणसाला ऐकू येऊ नयेत इतक्या डेसिबलचा आवाज. तरीही कानठळ्या बसल्या आहेत असं कुठंही जाणवत नव्हतं. आवाजाच्या त्या तीव्रतेमुळे आम्ही दडपणाखाली होतो, पण भारावलेल्या स्थितीत. डोळे आणि कान दोन्ही तृप्त करणारी ती भावावस्था होती. यावरही आणखी एक लेव्हल होती. ती आणखी अरुंद झाली होती. त्याच्यावरून कुठूनतरी धबधब्याची सुरुवात असेल का? हे सारं पाणी येतं कुठून आणि कसं? या प्रश्नांची उत्तरं आम्ही खाली उतरल्यानंतर तिथं असलेल्या माहिती फलकावर वाचली.

पर्वताच्या अंतर्भागात असलेली ही दहा धबधब्यांची मालिका आहे. पर्वताच्या अंतर्भागात लिफ्टनं जाऊन बघता येते अशी ही जगात कदाचित एकमेव असावी. हे धबधबे आहेत. त्यांचं उगमस्थान आहे या हिमनद्या (Glacier waterfalls). भोवताली असणारे युंगफ्राऊ, मॉंख आणि आयगर या हिमशिखरांपासून हे पाणी इथवर येतं आणि आपल्या तांत्रिक भाषेत दर सेकंदाला २० हजार लिटरपर्यंत पाण्याचा विसर्ग होतो. या ठिकाणी जाण्यासाठी या लोकांनी मग बोगदे खणले, लिफ्टची व्यवस्था केली, ठिकठिकाणी गॅलेर्‍या बांधल्या, वर जाण्याकरता त्या दगडांमध्ये पायर्‍या खणल्या, रस्ते तयार केले! ठिकठिकाणी उभं राहून बघता यावं म्हणून सोयीचे प्लॅटफॉर्म्स बांधले.

आपण धबधबे बघतो आपल्या देशातही. पण धबधबा म्हणजे डोंगरात कुठंतरी वरून उडी घेणारं पाणी यापलीकडे आपल्याला बघायला मिळालेलं नसतं. इथं आम्ही डोंगराच्या आत खणलेल्या एका बोगद्यात होतो. सभोवार बाकी काही नाही. फक्त तो डोंगर, जलप्रपात आणि भणाणता वारा. एक दिव्य अनुभव वाटला तो. इतक्या अडचणीच्या ठिकाणी दिवा, लिफ्ट आणि इतर सोयी करणारं ते स्विस सरकार खरोखरीच धन्य होय!

सगळ्या दहा लेव्हलपर्यंत वर जाताना २०० पायर्‍या चढताना घसरण्याची भीती वगैरे भावना नंतर बाजूलाच पडतात. तसेही बरेच जण पहिल्या म्हणजे सहाव्या किंवा सातव्या आठव्या लेव्हलनंतर परत फिरतात. पण प्रत्येक लेव्हलवरून दिसणारं तेच पाणी, पण त्याचं नवीन आक्रंदन आणि पर्वताबरोबर चाललेला त्याचा संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी नवा आहे. सुरुवातीला वाटणारं भय नंतर त्याच्या प्रेमात पडून आपल्याला संमोहित अवस्थेत वर घेऊन जातं ती अवस्था वर्णन करण्याची नाही अनुभवण्याची आहे. वाघ समोर आल्यावर संकट सामोरं असतानाही मोर संमोहित होऊन स्तब्ध उभा रहातो, असं चितमपल्ली यांच्या पुस्तकात वाचलं होतं ते आठवलं.

यानंतर परतीचा प्रवास. त्याला दोन पर्याय. एक आल्या मार्गानं लिफ्ट घ्या आणि उतरून जा. दुसरा मार्ग चालत जाण्याचा. पायर्‍या आहेत. रेलिंग आहे. खाली उतरताना दूरवर दिसणारं दरीमधलं हिरवगार गाव आहे आणि आणि बरंच काही. उतरताना एका ठिकाणी येऊन थबकतोच आपण. तिथं Corckscrew अशी पाटी आहे अक्षरशः पर्वताला पिळवटून काढून ते पाणी बाहेर पडतं. सगळ्या ठिकाणांचे फोटो घेतले, व्हिडिओ काढले पण जे देखिलं, जे अनुभवलं त्याची कणभरही सर नाही.

आम्ही खाली आलो. सुंदर बाग आहे. कॅफेटेरिआ आहे. आहे छानच पण इतक्या दिव्य सौंदर्याच्या धुंदीतून मानवनिर्मित काही बघावं असं वाटेच ना. आम्ही आपले शांतपणे रस्त्यावर स्टॉपजवळच्या एका बिल्डिंगच्या पायर्‍यांवर बसलो. विचार आला मनात सकाळी पाहिलेला शिलथॉर्न, तिथं शुटिंगसाठी निसर्गावरील केलेला अत्याचार, इथं त्याच निसर्गाच्या जवळ जाण्याकरता त्याला फारसं न दुखावता केलेल्या सोयी आणि त्यामधल्या प्रवासात घेतलेला निरामय शांततेचा स्वर्गीय अनुभव यातलं नक्की खरं काय? मन त्या हिंदोळ्यावर डोलत असताना समोरून लाउटरब्रूनेनची बस येताना दिसली.

आनंद पत्की

DSC_0159

इ – मेल – anandpatkie@gmail.com

स्टेट बँकेतून  निवृत्त. प्रवास करणं आणि त्याविषयी लिहिणं हे स्वान्त सुखाय. काही कारणाने  लिहिलेल्या लेखांना ब्लॉगची प्रकाशाची वाट सापडली आणि  हे आता मलाही आवडायला लागलं आहे.

ब्लॉग – : http://anubhawanand.blogspot.in/

One thought on “हिंदोळ्यावर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s