अंबरीश मिश्र
बऱ्याच वर्षांपूर्वीचं, म्हणजे समजा की पंचवीसेक वर्षांपूर्वीचं सांगतोय. रात्रीच्या प्रहरी लोकल गाडीत एक अंध भिकारी यायचा आणि बासरीवर हिंदी सिनेमाची बरीच गाणी वाजवून प्रवाशांची करमणूक करायचा. बरेच प्रवासी त्याला चारचार-आठआठ आणे द्यायचे. काही जण रुपयासुद्धा.
रात्रीची साडे-बारा वगैरेची वेळ. जागतिकीकरणाची पहाट फुटायची बाकी होती. म्हणून डब्यात आय.टी.-कॉल सेंटरवाले, लॅप-टॉपवाले नसायचे. अन् सेकंड क्लासमध्ये अशी तालेवार माणसं नसणारच. डब्यात बहुतेक जण मोलमजुरी करणारे साधे लोक. हॉटेलातली वेटर मंडळी म्हणा, काही फिरस्ता, गुजराती गुमास्ते, सट्टा-मटकाच्या जगातले नागरिक, मराठी मिल कामगार (त्यांच्या हातात ‘नवाकाळ’ पेपर) आणि रात्रपाळीवरून सुटलेले आमच्यासारखे वार्ताहर. सगळे थकले-भागलेले. अन् सुस्तावलेले…बाहेर काळोख दाटून आलेला. सगळीकडे फिकट पिवळा, पेंगुळलेला उजेड. दादर-माटुंगा सुटलं की मोकळा खारा वारा डब्यात भरून राहायचा आणि वाऱ्याबरोबर बासरीचे सूर…
‘यह रात, यह चांदनी फिर कहां/ सुन जा दिल की दास्तां…’
‘याद किया दिल ने कहां हो तुम…’
‘चल अकेला, चल अकेला, चल अकेला/ तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला…’
‘ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मक़ाम वह फिर नहीं आते…’
असं करतकरत तो अंध बासरीवाला काही सुमार गाण्यांना ठेचकाळत १९८०च्या सुमार दशकाची सफर घाईघाईत उरकून कार्यक्रमाची सांगता करायचा. पाऊणेक तासात डब्यात सुरांचा प्राजक्तसडा पडायचा. सगळे प्रवासी चकित, पुलकित, मोहित झालेले. प्रत्येकाच्या अबोध मनाला सिनेमाच्या सुवर्णकाळाची हुरहुर लागलेली. बासरीवाला कुठं उतरला, कळायचं नाही. माणसं एकदम नवीच दिसू लागायची. लोकल गाडीचा प्रवास सुरू असायचा अन् मनात गाण्यांची ये-जा, ये-जा, ये-जा…
तर सांगायचंय असं की, सुमधुर गीतांची सान-थोर स्टेशनं घेतघेत आजवर हिंदी सिनेमाचा प्रवास झालाय. हे एकदा समजून घेतलं पाहिजे. जात-पंथ-धर्म-भाषा यांत चिंधडाळलेले आपण सगळे. रेल्वे आणि हिंदी सिनेमा-गीतांनी आपल्याला एका सूत्रात बांधलं. ही खरं तर एक मोठी क्रांती होती. तिचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘न्यू थिएटर्स’च्या काननबालाचं गाणं: ‘यह दुनिया….दुनिया तूफान मेल.’
कलकत्त्याच्या (आता कोलकाता) ‘न्यू थिएटर्स’चा मोठा दबदबा, हंडाभर रुबाब. संगीताची बाजू भक्कमपणे सुरेल. पंकज मलिक, तिमिर बरन, काननबाला, के.सी.डे (म्हणजे मन्ना डे यांचे काका), रायचंद बोराल असे दिग्गज गायक-संगीतकार ‘न्यू थिएटर्स’ कंपनीच्या पटावर तेव्हा झगमगत होते. ही १९३५-४५ची गोष्ट. तेव्हापासून सिनेमाच्या नॅरेटिव्हमध्ये गाणं विषासारखं भिनत गेलं.
आणि ते कुंदनलाल सैगल नावाचं जीवघेणं प्रकरण. सैगल नि त्याची गाणी म्हणजे ‘मोतियाचे पाणी रांजण भरीयले…’ सैगलमुळे ‘न्यू थिएटर्स’ चौखूर उधळली. देशभरात कंपनीचा बराच गाजावाजा वगैरे. सिनेमा गीतांना लोकप्रियता लाभली.
तर या ‘न्यू थिएटर्स’च्या मंडळींनी चित्रपट संगीतात बरेच प्रयोग केले. पंकजबाबूंनी, तिमिरबाबूंनी वाद्यवृंदाचा मोठा ताफा आणला. अगदी इंग्लिश पद्धतीचं ऑर्केस्ट्रेशन. ‘प्रभात’मध्ये हे काम केशवराव भोळ्यांनी केलं. ‘न्यू थिएटर्स’नं घोड्याच्या टापांचा ठेका आणला. मगाशी ज्या गाण्याचा उल्लेख केला ते, ‘यह दुनिया…दुनिया तूफान मेल’ हे त्याच ठेक्यातलं गाणं. खूप गाजलं.
किंवा, ‘आई बहार…हा हा हा.’ आणि ‘डोले…डोले…डोले हृदय की नैय्या…’ गंमत पहा, गाण्यात होडीची उपमा असली म्हणून काय बिघडतंय? ठेका मात्र टॉकटॉकटॉकटॉक…हे हिंदी सिनेमावाले काय करतील याचा नेम नाही.
सिनेमाच्या दुनियेत असं म्हणतात की, घोडागाडीचा ठेका म्हणजे गाणं सुपर-हिट होण्याची ‘सोलह आने’ गॅरंटी. गायला सोप्पं ना. लोक गाणं पटकन उचलतात. ह्याच ठेक्यावर तर ओ.पी. नय्यरची कारकीर्द जेट विमानाच्या धुवांधार वेगात धावली. एकदा मी विचारलं नय्यरना की, “कुठनं उचललात हो हा ठेका?”
“कायेय की, लहानपणी ‘न्यू थिएटर्स’चा एकेक सिनेमा किमान पाच-पाचदा पाहायचो. त्या गाण्यांतनं उचलला,” नय्यर म्हणाले, ‘म्हणजे कायेय पहा. स्वातंत्र्यापूर्वी लाहोरला राहणारं ओंकारप्रसाद नय्यर नामक बित्तीभर पोरगं ‘न्यू थिएटर्स’च्या घोडागाडी ठेक्यानं गावभर वारा प्यायलेल्या वासराप्रमाणे हुंदडत फिरतं. लाहोर थेट पश्चिमेला तर कलकत्ता पूर्व सागरकिनाऱ्यापाशी सुस्त पहुडलेलं. कुठं रावीचा तट अन् कुठं बंगालचा उपसागर. गौडबंगालच की सगळं.’
पुढची गंमत अशी की, सैगल कलकत्त्याला स्थिरावला नि नावारूपाला आला आणि तिथं पंजाबात कित्येक तरुण त्याच्याकरता जीव पाखडताहेत. पुढे त्यांपैकी बरेच चित्रसृष्टीत दाखल झाले. का? सैगलसारखं गायचंय म्हणून. राज खोसला, ओमप्रकाश बक्षी (म्हणजे हिंदी सिनेमातला गुणी कलावंत ओमप्रकाश), ओ. पी. नय्यर, एस. डी. नारंग…मुकेश माथुर, सज्जाद हुसेन, तलत महमूदसुद्धा सैगलच्या नावाचा जप करतकरत सिनेमात आले. हा प्रवास घडतो सैगलच्या गीतांमुळे.
किंवा, असं पाहा की, पंजाबची नूरजहाँ कलकत्त्याला जाते नि तिथनं मुंबईत येते. गुजरातेतल्या वलसाड गावचा जयकिशन पांचाळ गाण्याच्या नादापायी मुंबईला येतो. त्याच सुमारास हैद्राबादेतून शंकर मुंबईत येतो. दोघांची जोडी जमते. लखनऊ सोडून नौशाद मुंबईची वाट धरतात तर दिल्लीहून रोशनलाल मुंबईत दाखल होतो. पूर्व बंगालात (आत्ताचं बांगला देश) जन्मलेले अनिल विश्वासही येतात. सगळ्यांना गाणी करायची असतात. गाण्यासाठी केवढी ही पायपीट. ‘गाण्यासाठी दाही दिशा, आम्हां फिरविशी जगदीशा.’
प्रवास आगगाडीचा असो, छकड्याचा किंवा चक्क पायपीट असो, प्रवास हेच श्रेयस नि प्रेयसही. हेच आहे भारतीय तत्त्वज्ञान. ‘प्रभात’च्या ‘कुंकू’त म्हटलंय ना: ‘मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथवी मोलाची/ तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची’. ‘न्यू थिएटर्स’ला तुफान मेलचं, होड्यांचं अप्रूप असू दे, आपले ‘प्रभात’वाले पुण्याचे. आगरकरी वळणाचे. त्यांची भिस्त दोन पायांवर. राज कपूरनं ‘अनाड़ी’त चालताचालता हेच सांगितलं, पण त्याच्या शैलीत. ‘जीना इसी का नाम है…’
आपल्याकडे प्रवासाला फार महत्त्व. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम ही मधली स्टेशनं. आत्म्यानं अखेरीस परमात्म्याकडे जायचं असतं हे आपल्याकडचं मूळ तत्त्व. म्हणजे प्रवासच. ‘काशीस जावे, नित्य वदावे’ ही आस मनात बाळगून रोजचे काबाडकष्ट सोसायचे हा आपला शेकडो वर्षांचा जीवनव्यवहार. ‘चरैति…चरैति.’
‘स्वाभाविक कष्टाळू जिथे रम्य रहाणी, तेथे चल राणी’ किंवा ‘जिथे सागरा धरणी मिळते/ तिथे तुझी मी वाट पाहते’ वगैरे ओळींची नाही म्हटलं तरी मनाला भुरळ पडतेच ना. कविता भले घराच्या किंवा ऑफिसच्या चार भिंतींत सुचली असेल, कवी मात्र ‘हिरवळ आणिक पाणी/ तेथे स्फुरती मजला गाणी’ हेच आपलं ब्रीद मानतो. प्रेमासाठी ‘हिरवे हिरवे माळ मोकळे’ लागतात. अन् त्यावर ‘ढवळ्या ढवळ्या गायी’सुद्धा. हादेखील प्रवासच की. आपला, गायींचा नि गाण्यांचा. ना रिझर्वेशनची कटकट, ना ‘तत्काल’चा रेटा.
हिंदी सिनेमानं हे नेमकं हेरलं आणि भारतीय लोकधर्माशी तो तादात्म्य पावला.
गेल्या आठ दशकांत हिंदी सिनेमाचं गाणं अनेक टप्पे घेतघेत संक्रमित होत गेलं. सुरुवातीची गाणी सरळसोट असायची, जरा जास्तच. दुसऱ्या महायुद्धानंतर हिंदी सिनेमाला आत्मभान आलं. सी. रामचंद्र, नौशाद, अनिल-विश्वास, मास्टर गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, सज्जाद, शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन, मदनमोहन, रोशन, खय्याम, सलिल चौधरी, वसंत देसाई, आर.डी. बर्मन असे दिग्गज संगीतकार इंडस्ट्रीत आले. गाण्याला नवे उन्मेष लाभले.
लोकसंगीत, जनपद संगीत, दादरा-ठुमरी-ग़ज़ल, रागदारी, जॅझ, पॉप, रॉक अॅन्ड रोल अशी कितीतरी वेगळी नि मोहक रूपं घेऊन गाणं शक्तिमान, रूपवान झालं. कितीतरी सुंदर प्रयोग झाले.
साहिर, शक़ील, शैलेंद्र, मजरूह, कैफी आझमी, नीरज, गुलज़ार, इंदिवर अशा श्रेष्ठ गीतकारांनी ‘गुईंया, सैंया, उईमां’ अशा बेगडी शब्दांची हकालपट्टी केली. गीतांना साहित्यिक मूल्यं लाभलं. रचनेच्या आणि तंत्राच्या अंगानं गाण्याचा खूप विचार झाला. गुणी वादक-तंत्रज्ञ आले. लोकप्रियता आणि सद्भिरुची यांतला तोल उत्तम राहिला. रेकॉर्डिंग स्टुडियोत व्यावसायिक शिस्त आली. एक विधा (genre) म्हणून हिंदी सिनेमाच्या गाण्याला प्रतिष्ठा मिळाली. हा प्रवास सुंदर होता.
वास्तविक, प्रवासाशी निगडित अशी बेसुमार सिनेमा-गीतं हांहां म्हणता सापडतील. चर्चगेट-विरार सुपर-फास्टमध्ये मावणार नाहीत, इतकी. ती सगळी गीतं कागदावर उतरवण्यात फार काही हशील नाही. तरीही, काही गीतं आवर्जून आठवावीत अशी आहेत हे खरं.
उदाहरणार्थ, ‘मांग के साथ तुम्हारा/ मांग लिया संसार’ (‘नया दौर’), ‘उपरवाला जानकर अंजान है/ अपनी तो हर आह इक तूफान है’ (‘काला बाजार), ‘दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले’ (‘आन’), ‘यह दिल न होता बेचारा, कदम न होते आवारा’ (‘ज्युएल थीफ’), ‘बदल जाए अगर माली चमन होता नहीं खाली’ (‘बहारें फिर भी आएंगी’), ‘रुख से ज़रा नक़ाब उठा दो’ (‘मेरे हुज़ूर’), ‘कौन है जो सपनों में आया/ कौन है जो दिल में समाया’ (‘झुक गया आसमान’), ‘यूं तो हमने लाख हसीं देखे हैं/ तुमसा नहीं देखा’ (‘तुमसा नहीं देखा’), ‘तुम जो मिल गये हो’ (‘हंसते ज़ख़्म’), ‘जीवन के सफ़र में राही’ आणि ‘मैं चली मैं चली देखो प्यार की गली’ (‘पड़ोसन’). किंवा मुंबईची सफर घडवून आणणारं ते जॉनी वॉकरचं गाणं: ‘यह है बाँबे मेरी जान…’
ही यादी वाचताना तुमच्या लक्षात येईल की, या सर्व गाण्यांत आगगाड्या आहेत, घोडागाडी नि मोटारी आहेत अन् साध्यासुध्या सायकलीदेखील आहेत बापड्या. आणि आहेत चालणारे दोन पाय फक्त. ‘चलते चलते…यूंही कोई मिल गया था…’
गुलज़ार यापुढे जाऊन म्हणतात: ‘इस मोड़ से जाते हैं…’
नुसता रस्ता. बाकी एक मोठं शून्य.
रस्ताच रस्ता. साकल्याचे प्रदेश धुंडाळणारा. असीमतेकडे घेऊन जाणारा.
‘कुछ सुस्त कदम रस्ते/ कुछ तेज़ कदम राहें…’
तर दुसरीकडे आहे मोटरबाइक. ‘ज़िंदगी इक सफ़र है सुहाना’…..
खरं तर ह्या गाण्याचा सज्जड पुरावा म्हणून उपयोग करून ट्रॅफिक पोलिसांनी बेदरकार ड्रायव्हिंगच्या आरोपाखाली राजेश खन्नाला तेव्हा शिक्षा करायला हवी होती. साला आपण मरतो नि बाईलाही खड्ड्यात टाकतो. पण हाच तर आहे ना ‘अंदाज़’चा पेच. हे गाणं नसतं तर ‘अंदाज़’च्या कथेला ‘किक्’ बसलीच नसती. हीच गत ‘चला जाता हूं किसी की धुन में’ ह्या गाण्याची.
अशा प्रवास-गीतांमुळे हिरो-हिरॉइनचं तेव्हा पुष्कळ फावलं. सिनेमे चालले, नाव झालं, पैसा मिळाला. आठवा…आठवा शम्मी कपूरचं ‘किसी न किसी से कहीं न कहीं (‘कश्मीर की कली’) किंवा देव आनंदचं ‘माना जनाब ने पुकारा नहीं (‘पेइंग गेस्ट’) किंवा मीनाकुमारीचं ‘कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी’ (‘आरती’)…लता किती सुरेल आर्जव करतेय संघर्षजर्जर माणसांना–चालत राहा गड्या, धीर ठेव. तूसुद्धा पोचशील रे वसंताच्या मुक्कामी. ‘दूर तो है पर दूर नहीं है/ सितारों की मंज़िल है, राही…’
आणि असं सगळं सुरू असताना येतं ‘मेरे सपनों की रानी’ नामक प्रकरण. १९६९ साली. एकदम भारी गाणं.
राजेश खन्ना जीप काय चालवतोय, त्याचा मित्र सुजीतकुमार केळं आडवं खात असल्याप्रमाणे माऊथ ऑर्गन काय चावतोय आणि ती शर्मिला टागोर. ती ट्रेनच्या डब्यात बसलीये. तिच्या हातात दिग्दर्शकानं मारे अॅलिस्टर मॅक्लीनची कादंबरी दाखवलीये. ती वाचेल तर ना! राजेश खन्नाचे चाळे पाहून शर्मिला चक्क दात काढत्येय. ओळख नाही, पाळख नाही, पण बया प्रेमात पडते.
एक रचना म्हणून ‘मेरे सपनों की रानी’त नावीन्य नसेल, पण ‘आराधना’च्या एकूण व्यवस्थेत ते गाणं थेट मध्यभागी आहे. सिनेमात पुढे शर्मिलाची व्यक्तिरेखा एका जबरदस्त टप्प्यावर पोचते. अकाली वैधव्य येतं तिला अन इतर बऱ्याच कटकटी उपटतात. तरीही विलक्षण धैर्यानं ती आयुष्याचा पहाड खोदते आणि आपलं मूल वाढवते. तर लक्षात घ्यायची गोष्ट ही की, ‘मेरे सपनों की रानी…’ हा तिच्या जीवनप्रवासाचा स्टार्टिंग पॉइंट आहे. दोन प्रेमी जीव चाकावर चालताहेत; त्यांची आयुष्यं, त्यांचं प्राक्तनही चालतंय. पुढे काय होणार? ठाऊक नाही. खरं काय-खोटं काय? माहीत नाही. खरंखुरं आहे ते गाणं, आयुष्याचा प्रवास आणि कालचक्र. हिंदी सिनेमाचा प्रवास असाच असतो. असायचा. त्या काळात तरी.
‘मेरे सपनों की रानी’ची एक आठवण सांगितली जाते. दिग्दर्शक शक्ती सामंतांनी राजेश खन्नाचा भाग कुलू-मनाली की डलहौसीत शूट केला. शर्मिलाबाईंनी सलग तीन महिन्यांच्या तारखा सत्यजित रे यांना देऊन टाकल्यामुळे त्या ‘अरण्येर दिन रात्री’च्या शूटिंगसाठी बिहार-संथाळ वगैरे भागात मुक्काम करून होत्या. त्या मुंबईला परत आल्यावर सामंतांनी मेहबूब स्टुडियोत ट्रेनचा सेट लावला नि बाईंचा भाग शूट करून मूळ गाण्याला जोडला. म्हणजे मेहबूबच्या सेटवर शर्मिलासमोर नव्हता राजेश खन्ना, नव्हती ती जीप, अन् केळं कुरतडणारा (आय मीन, माऊथ ऑर्गन) सुजीतकुमारही नव्हता. तिच्या पुढ्यात फक्त गाणं वाढून ठेवलेलं. हल्लीचे सिनेमे खूप वेगवान असतात, पण प्रेक्षकांची मरगळ काही उतरत नाही. गाण्यांतून कथा पुढं चालवणं हे एक कसब आहे. ते आत्ताच्या मंडळींना जमत नाही ही खरी गोम आहे.
‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों’चंच पहा ना. ‘गुमराह’मधल्या ह्या गीताचा भावाशय हाच ना की, इतःपर आपण (म्हणजे माला सिन्हा आणि सुनील दत्त) आपापल्या वाटेनं जायचं. गाण्यात कसलीच म्हणून हालचाल नाही. सगळं स्थिर नि स्तब्ध. अन् तरीही प्रवास आहे. सुनील दत्त पियानोचे सूर छेडतोय. बस्स.
हिंदी सिनेमा-गीतांना विमानाचं बहुधा वावडं असावं. अपवादरूप असतीलसुद्धा काही गाणी. परंतु, एरवी सिनेमातली गाणी विमानाचा प्रवास टाळतात. एक असं की, विमानात बसून कुणी गातंय ही कल्पना चमत्कारिक वाटते. दुसरं, विमानानं प्रवास करणारा वर्ग हा साधारणपणे श्रीमंत किंवा इंटलेक्च्युअल असतो. ही मंडळी गातबीत नाहीत, असा सिनेमावाल्यांचा पक्का ग्रह आहे अन् तो बरोबरच आहे. गाण्यासाठी बस, ट्रेन, छकडा अशी सर्वहारा वर्गाची नि लोकशाहीप्रधान वाहनं असली पाहिजेत. सगळ्यांत छान होडी. सगळीकडे पाणी आणि गाणारा नावाडी. ‘ओ रे माझी…’ ‘बंदिनी’तलं.
‘बंदिनी’त प्रवासाशी निगडित अशी दोन फूलकोमल गाणी आहेत. नूतनचं आयुष्य धारेला लागलंय. तिचे वडील वारलेत, प्रियकराशी (म्हणजे अशोककुमार) ताटातूट झालीये, त्या प्रेमापायी गावभर बदनामी मात्र झाली. गाव सोडून जायचं असं नूतन ठरवते. रात्रीचा प्रहर. गावावर नीरव शांततेचं गारुड. नूतन घराबाहेर पडते नि दिसेल त्या मार्गानं चालू लागते. ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची’ या वज्रनिश्चयानं.
पण जुन्या आठवणी तिचा पिच्छा पुरवतात. नदीचा घाट, गावातल्या वाटा, बालपणीचे सखेसवंगडी…खूप दूरून तिला ऐकू येतं: ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना/ यह घाट, तू यह बाट कहीं भूल न जाना…’ नूतन मध्येच थबकते नि मागे पाहते. पुन्हापुन्हा…मग जड पावलांनी पुढं चालू लागते. काळजाचे काप काढणारा हा ‘बंदिनी’तला प्रसंग चिरंतन सत्याची खपली काढतो.
‘बंदिनी’चा तो सीन आठवला की, मनात एकदम वर्जिनिया वुल्फ कडाडते. गोष्ट अशी की, एका सकाळी वर्जिनिया नवऱ्याबरोबर समुद्रकिनारी गप्पा मारत बसलेली. घरासमोरच किनारा. बारीकसं काम निघालं म्हणून नवरा ‘घरात डोकावून येतो’ असं म्हणून आत गेला. तेवढ्यात वर्जिनियानं डाव साधला. ती चालतचालत समुद्रात गेली. अन् गेली ती कायमचीच.
अखेरच्या प्रवासाला जाताना, पाण्यातल्या गूढशीतळ काळोखात थेंबेथेंबे विरघळताना एकदा मागे वळून पाहू, असं वाटलं असेल का तिला? पाहिलं असेलही तिनं की नाही? तिच्या अवतीभोवती तरंगत होतं का एखादं गाणं? ‘ओ जानेवाले हो सके तो लौटके आना…’
बिमल रॉयनं ‘बंदिनी’च्या क्लायमॅक्सला एक गाणं टाकलंय. तेही प्रवासाचं. आपल्या नव्या प्रियकराशी लग्न करण्यास उत्सुक नूतन त्याच्या गावी जाण्यासाठी म्हणून बोटीत चढते. अन् तिथं नेमका तिला तिचा पूर्वीचा प्रियकर दिसावा! नूतन कैचीत सापडते. धर्मेंद्रशी लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करू की आजारी, क्षीण अशोककुमारच्या रूपानं पुढ्यात उभ्या भूतकाळात उद्याची स्वप्नं वेचू?
अशोककुमार तिचं पहिलं प्रेम.
मनातली घालमेल फार काळ टिकत नाही. नूतन अशोककुमारबरोबर जाण्याचा निर्णय घेते. मागच्या नेपथ्यातून थोरल्या बर्मनचे दर्दरेशमी सूर:
‘मैं बंदिनी पिया की, चिरसंगिनी साजन की/ मेरा खींचती है आंचल मनमीत तेरी हर पुकार…मेरे साजन है उस पार…मेरे माझी…’
नूतनचा पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. ‘बंदिनी’ मुक्त होते. अन् प्रेक्षकसुद्धा.
मनातल्या प्रवासाशी निगडित अशा दोन थोर गीतांबद्दल न सांगणं मोठं पाप ठरेल. तेवढं सांगून संपवतो.
पहिलं गाणं ‘तीसरी कसम’चं.
राज कपूर वहिदा रेहमानवर जीव पाखडतोय. पण आपल्या प्रेमाला बरकत येईल की नाही याबद्दल तो साशंक आहे. तरीही काळीज आसुसलेलं. वहिदा काही दिवसांसाठी गावात आलीये. नटी ती. तंबूतले प्रयोग करून दुसऱ्या गावी निघून जाईल. चार दिवसांची चैत्रपुनव. मग वैशाखवणवा. सगळा नशिबाचा खेळ.
राज कपूर गातोय. त्याच्या बैलगाडीत ती बसलीये. तिच्या डोळ्यांत बेचैनीची काजळरेघ. त्याचा स्वर आर्त. ‘चिठिया हो तो हर कोई बांचे, भाग न बांचे कोय, सजनवा बैरी हो गये हमार…’ कुठं जाताहेत दोघं? कुठं जायचंय त्यांना? कसला हा प्रवास? मंझिल कोणती?
प्रेम आणि ताटातूट, सुख नि दु:ख, स्थिति-गती या सगळ्यांपलीकडे असतं एक उदास शहाणपण. ते मिळालं की समजावं प्रवास सुखाचा झाला. भारतीय दर्शनशास्त्रातला हा सिद्धान्त शैलेंद्रनं साध्या, परंतु अर्थगर्भ, खोल शब्दांत सांगितलाय. शंकर-जयकिशनची प्रासादिक चाल. सुरुवातीला सतारीचे काय तेज:पुंज स्ट्रोक्स आहेत. जीव घुसमटतो.
दुसरं गाणं ‘गाईड’चं.
देव आनंद तुरुंगातून बाहेर आलाय. कसलेच पाश उरले नाहीयेत. नवी सुरुवात करावी लागेल. रस्ता समोर आहे. चालावं लागेलच. ‘पानी बहता भला, साधू चलता भला.’ चालतचालत एका गावात येतो नि जुलूमजबरदस्तीचा साधू होतो. पण ते नंतरचं. आधी एक विश्रामस्थळ आहे. एस. डी. बर्मन गाताहेत: ‘वहां कौन हे तेरा, मुसाफिर, जाएगा कहां? दम ले ले घडीभर, यह छैंया पाएगा कहां?’
अशा अनमोल गीतांची सावली अधनंमधनं मिळणार असेल, तर मग वाळवंट तुडवायचीही आपली तयारी आहे.
अंबरीश मिश्र
लेखक, संपादक, अनुवादक. अनेक पुस्तकांचं संपादन तसंच अनुवाद. हिंदी चित्रपटांबद्दलच्या प्रेमातून त्यावर आधारित संगीतविषयक कार्यक्रम करतात.
देव आनंद फोटो – इंटरनेट व्हिडिओ – YouTube
अंबरीशजींचा लेख वाचून मी ‘ बिस्मिल्ला’ केला आहे. बहारदार लेख, नेहमीप्रमाणे आधी उत्सुकता वाढवून आणि लेख संपवतांना अनामिक हूरहूर लावून जातात ते. अंक फारच सुंदर आहे. हा अनुभवलेल्या शिवाय दुसरं काही वाचवणाराच नाही.
LikeLike
वाचवणारच*
LikeLike
लेख मस्तच! मी आपली पुस्तकं – बाई, झिम्मा, देवडी ही विकत घेऊन वाचली आहेत.
you may like to update url for:
O Re Maajhi Mere Saajan – Nutan – Dharmendra – Bandini Songs – Ashok Kumar – S D Burman
to:
धन्यवाद.
LikeLike