इ है बंबई नगरिया…

तन्वीर सिद्दीकी

२००१-२००२ चा सुमार असेल, मुंबईत शिक्षणासाठी आलो होतो तीन वर्षांसाठी. पुढे तीन-एक वर्षे नोकरीही केली. त्या सहा वर्षांचा हा किस्सा…

माझा तारुण्यपूर्व काळ छोट्याशा गावात गेला.. त्यामुळे मुंबई या नावाचे मनात नेहमीच आकर्षण आणि मुंबईविषयी खूप कुतूहल होते. मुंबईत खूप श्रीमंत माणसे राहतात, खूप पैसे कमवतात, खूप सुंदर मुली असतात, मोठमोठ्ठाली घरे असतात, घरामध्ये एसी, फ्रिज ही उपकरणे असतात, गुळगुळीत रस्ते असतात, नामवंत – प्रसिद्ध माणसे, हिरो-हिरोइन्स मुंबईतच राहतात, मुंबईतले शिक्षण आणि गावातले  शिक्षण यांत जमीनअस्मानाचा फरक असतो, मुंबईची माणसे खूप चाणाक्ष आणि हुशार असतात, मुंबईत शिक्षण, नोकरी सहजासहजी कोणाच्या नशिबात येत नाही – मी फार नशीबवान आहे की मला ती संधी मिळते आहे – वगैरे-वगैरे अशा कितीतरी गोष्टी, किस्से, स्वप्ने बॅगेत पॅक करून ‘कोंकणकन्या’ मुंबईत सोडायला आली होती. पहाटे सहा वाजता पोहोचलेले एक ‘स्वप्न’ सूर्यनमस्कार करून ट्रेनिंग सेंटरला निघाले होते! …

आणि सुरुवातीला ऐकीव गोष्टी, स्वप्नछळ आणि मनाच्या खिशात असलेल्या मुंबईबाबतच्या गृहीतकांमुळे मुंबई हळुहळू आवडायलाही लागली होती!

तंत्रज्ञान आणि प्रगती यांच्या दृष्टीने मुंबई खरेच वेगवान आहे. माझा ट्रेनिंगचा बहुतांश कालावधी रिफायनरीमध्ये गेला, ऑटो सेंसरने आपोआप उघडझाप करणारे दरवाजे, बाथरूममध्ये ऑटोफ्लश मुताऱ्या, इंग्लिश कमोड, वातानुकूलित वर्ग, रूम्स, फेसाळलेले इंग्लिश बोलणारी माणसे हे सगळे एकंदरीत सुखावत होते. इथे एक एसटी चुकली की पुढच्या एसटीसाठी तासभर वाट पाहावी लागत नाही, लगेच पुढच्या काही मिनिटांत ‘BEST’ची बस येते. रिक्षाचे मीटर हा प्रकार कस्टमरनिरपेक्ष भाडे घेतो. डोळ्याची पापणी बंद करण्यात वेळ दवडला की तुमची लोकल ‘मिस’ होणार हे जितके खरे, तितकेच पापणी पुन्हा उघडायच्या आत पुढची लोकल हजर! इथल्या माणसांना गॉसिपिंगसाठी वेळ नसतो त्यामुळे दाढी करताना न्हाव्याला तुमची कुंडली सांगावी लागत नाही – अगदीच त्याची तुमच्याबद्दलची सहानुभूती जागृत झाली तर ‘इसके पहले कहाँ बाल कटाये थे बाबू? ठीक नही काटा उसने’ असा एखादा युनिवर्सल प्रश्न येतो. उत्तर हवेच अशी अपेक्षाही नसते. रिक्षावाला बाबा कुठे काम करता वगैरे चौकशी करत नाही किंवा पेट्रोल डिझेलचे दर सांगून सहानुभूती मिळवत नाही, हा पण कधीकधी तुम्ही ‘नया पंछी’ आहात हे त्याला समजले की अगदी बेमालूम मीटर पाहून खिशातून टेरिफ कार्ड काढून टॅक्सीचे टेरिफ मिळवू शकतो !

सलमान खान, शाहरूख खान यांनी घातलेले शेम टू शेम कपडे, चैन, पट्टा, गॉगल, डीओ अगदी वाजवी दरात उल्हासनगरला नाहीतर चर्चगेटला फॅशन स्ट्रीटला, किंवा हाजीअलीला हिरा-पन्नाला, आपल्याला हाक मारून बोलावत असतात आणि आपण हिरो बनणे कठीण नाही, हे समजावत असतात. एखादा चित्रपट रिलिझ झाल्यावर त्याच दिवशी मुंबईत पाहता येतो, हे माझ्यासाठी नवीन होते! कारण मी ‘बिनधास्त’ हा मराठी चित्रपट त्या वेळी महिन्याभरानंतर थिएटमध्ये पाहिला होता, गावासाठी मात्र तो फर्स्ट डे फर्स्ट शो होता बर का! त्या वेळी FM हा प्रकार रेडियोवर नुकताच सुरू झाला होता. रेडियो मिर्ची म्हणा किंवा माय FM म्हणा, आपल्या मूडनुसार गाणी ऐकवत. कधी गावाच्या आठवणी येतील अशी सेंटी गाणी, कधी वर्गातल्या शीतलची आठवण येईल अशी रोमॅन्टिक थीम तर कधी पार्टी करताना लागणारी धांगडधिंगा स्पेशल ! बर, आई-बापसाची खूपच आठवण आली तर एसटीडी बूथ होते, मित्र-मैत्रिणींची आठवण आली, तर एक रुपया दोन मिनिटवाला ‘लाल डब्बा’ होता. मेसेज, मिस कॉल यांच्यासाठी नोकिया २१०० नावाचे त्या वेळचे १२०० रुपयाचे महागडे खेळणे होते. रूमवर रमी खेळायला पत्ते होते, सुरुवातीला शिकताना हवे तेव्हा अभ्यास करण्याची आणि पुढे नोकरी लागल्यावर कधी हवे तेव्हा कामावर जाण्याची, कधी हवी तेव्हा सुट्टी घेण्याची मुभा होती, खिसा भरलेला असताना म्याकडीचे बर्गर, डोमिनोचा पिझ्झा, हाजीअलीचे शिग कबाब, माहीमचा रगडा, दादरचा वडापाव, उल्हासनगरची दाबेली असे सगळे पदार्थ होते तर खिसा फाटल्यावर मॅगी-पावही होते. ना कोणी विचारणारे ना सांगणारे ! एकंदरीत असे वाटत होते की, मुंबई मानवत होती, मला सामावून घेत होती, आवडत होती, एक स्पेस जी तरुण वयात आपल्याला हवी असते ती देत होती, खुशालचेंडू बागडून आपल्याला आपल्याला स्वप्नासाठी, लुप्त-सुप्त इच्छेसाठी, त्याच्या पूर्णत्वासाठी वाटा, वेळ आणि प्रोत्साहन देत होती ! असे वाटत होते की, मुंबईत सेटल होऊ शकतो….पण ही एक बाजू होती!

मुंबई जशी अनुकूल होती तशी प्रतिकूलही होती. याचा अनुभव पुढे नोकरी करताना आला. भले ऑफीसमध्ये ऑटोसेंसर मुतारी, एसी असेल हो, भाड्याच्या घरी तर सार्वजनिक शौचालय ! तुम्हाला तुमचे केविलवाणे तोंड बघून एक वेळ परीक्षेत दोन मिनिटे जास्त देईल पेपर लिहायला, पण इथे? छे, इथे सर्वधर्म-सर्वनोकरी-सर्व’प्रेशर’-समभाव ! अगदी ५२ पिढ्यांची ओळख असणारादेखील तुम्हाला तुमची केविलवाणी अवस्था बघूनही रांगेत पुढे जाऊ देणार नाही, आणि नंबर आल्यावर दोन मिनिटांत दारावर धाडधाड सुरू! लहानपणी बाबा नेहमी सांगायचे की स्वतःच्या पायावर उभा राहिलास ना की कळेल आयुष्य – ते इथे मुंबईत येऊन उमगले – आयुष्य तर म्हणता येणार नाही पण स्वतःच्या पायावर उभे राहणे! नाहीतर काय, खरंच!
सकाळी बसमध्ये उभे, ट्रेनमध्ये उभे, ऑफिसमध्ये उशीर झाल्यावर बॉससमोर उभे, पुन्हा संध्याकाळी ट्रेन, तीच बस, उभेच! कधी लाइट बिलासाठी रांगेत उभे, कधी रेशनला, जीव अगदी मेटाकुटीला आला, थोडी करमणूक करावी तर पिक्चरच्या तिकिटालाही रांगेत! पैसे देऊनही प्रवासात बसायला जागा नाही, लोडशेडिंगच्या नियमाने अर्धा वेळ वीज नाही, सकाळ-संध्याकाळच्या दोन्ही बांधलेल्या वेळा चुकल्या तर पाणीही नाही. स्वतःसाठी बेसिकली वेळच नाही तुमच्याकडे! वरवर मॉडर्न म्हणवणारे हे शहर आतून मात्र गटागटांत विभागलेले आहे. मग ते कुठे जातीचा गट, कुठे धर्माचा, कुठे शिक्षणाचा, कुठे स्त्री-पुरुष, कुठे श्रीमंत-गरीब, कुठे तर भारतीय-काफीर-देशद्रोही वगैरे. सकाळी बसमध्ये चढताना ऑफिसमध्ये उशीर होतो की काय यापेक्षा आज घरी सुखरूप पोहोचेन का याची भीती असते, ट्रेनमध्ये पाकीट चोरीला जाण्याची, ऑफिसमध्ये वाढत्या स्पर्धेने नोकरी जाण्याची..वगैरे वगैरे. शुक्रवारी नमाज पढताना डोळे बंद करून देव आठवताना कुठे बॉम्बबिंब फुटतो की काय ही दहशत, तर रस्त्यात चालताना कोणी अचानक हाक मारली, तर त्याने पत्ता विचारायला हाक मारली आहे की माझे नाव विचारायला याची धास्ती जास्त!

मुंबईत मला प्रत्येक गोष्टीत तफावत सापडली. ती शिक्षणव्यवस्थेत होती, ती जेवणात होती, ती राहणीमानात होती आणि ती भ्रष्टाचारातही होती. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हा फरक तिथे तेव्हाही होता आजही आहे, बॅन्ड स्टॅन्डला चाटून जाणारा रस्ता धारावीतूनही जातो, बांद्रा-कुर्ल्याचा नॅशनल हायवे एका बाजूला हाय प्रोफाइल लाइफ दाखवता दाखवता, जाता जाता नकळत बेहराम पाड्यातली गरिबी दाखवतो.

मुंबईची एक मोठ्ठी पडती बाजू आहे ती म्हणजे वेळेचा अभाव! तसे बघितले तर इथे लोकांकडे वेळ आहे, पण तो असलाच तर फक्त स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी विचार नाही. याचा अर्थ इथली माणसे संवेदनाशून्य आहेत असे नाही, पण संवेदना आणि साहाय्य निभावणे, करणे यात नक्कीच शून्य आहेत याची प्रचिती मला तरी आली – किंबहुना मी मुंबईत असेपर्यंत, मुंबई अंगात भिनल्यावर ती कला माझ्यातही आली. माझ्याकडे पिक्चर बघायला वेळ असे, नातेवाइकांना-मित्रांना भेटायला नाही. मी गणेश चतुर्थी, होळी, ईद, दहीहंडी ह्या सणांना खूप मजा केली आहे, खूप फिरलो आहे, लक्षवधी लोकांची गर्दी बघितली आहे, हाजीअली, माउंट मेरी, मुंबादेवी या ठिकाणी सगळ्या धर्मांच्या माणसांना दर्शन घेताना पाहिले आहे, पण ते वातावरण मला सामाजिक प्रयोजनात आढळले नाही, ते माझ्यातही उरले नाही. मी उरलो होतो फक्त माझ्यापुरता! फक्त मी, माझा अभ्यास, माझी नोकरी, माझे प्रॉब्लम, माझा बॉस, माझी सुखे, माझीच दुःखे, सगळीकडे ‘मी’पणा !

मला झालेला दुसरा एक त्रास म्हणजे राहण्याचे, जगण्याचे स्थैर्य आणि त्याच्या प्रगतीचा अभाव किंवा अगदी संथ, नगण्य वाटचाल! वेळ आल्यावर तुम्हाला जाणवते की जर मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे, स्वमालकीचे घर नसेल; तर राहणीमान संथावते. पण मुंबईत घर घेणे सोपे नाही, शक्यच नाही. लठ्ठ घरभाडे देऊन, पगारात भागवणे, घरी पैसे पाठवणे शक्य होत नाही. तसे आपण काही दिवस, काही महिने, काही वर्षे तडजोड करू शकतो, पण फक्त जीवन पुढे सरकत राहते. आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळत नाही, असा माझा अनुभव! याला समाधान, यावर उत्तर म्हणजे आपण एक पायरी पुढे जावे, अजून पैसे कमवावे, अजून स्वतःची प्रगती करावी, वगैरे-वगैरे; पण तो पर्यायही एका विशिष्ट काळानंतर कामी येत नाही, हे उमगते आणि हीच बेचैनी आपल्या भविष्याच्या वाटा आणखीनच कमकुवत करते आहे, असे मला तरी वाटले.

तिसरी एक बाजू म्हणजे स्त्रियांविषयीच्या आदरभावनेचा अभाव! मुंबईत महिलावर्ग सुरक्षित नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मुली नीट शिक्षण घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती मुंबईतही आहे. शिक्षण घेतले तर त्याच सुशिक्षित मुली सुरक्षितपणे कामावर जाऊ-येऊ शकत नाहीत, बाजारात जाताना भीती, घरी गृहिणी म्हणून एकटे राहताना भीती आणि परिसरात वाईट नजरेच्या बळी; हे दृश्य मी अनुभवले आहे. उद्या मुंबईत आपला संसारही असाच भीतभीत होईल, अशी भीती माझ्या मनातही आली आणि बहुतेक हीच सर्व कारणे मला मुंबईपासून दूर घेऊन गेली.

आता तुम्ही म्हणाल की, ही परिस्थिती चूक आहे, खोटी आहे किंवा भारतात सगळ्या मेट्रो शहरांत हीच परिस्थिती आहे – असेलही ! किंवा आहे ! पण मुद्दा हा आहे की एकंदरीत मुंबई मला आवडली नाही, तिच्याबद्दल अगदी ठासून द्वेष भरला आहे असेही नाही. मुंबईने खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत, खूप मित्र दिले आहेत, पहिली कमाई दिली आहे, जगात कुठेही पोटभर जेवता येईल इतकी हुशारी दिली आहे, चांगले स्पर्धापूर्ण शिक्षण दिले आहे, पण जे मानसिक स्थैर्य शोधत होतो ते नाही दिले, किंवा मला ते माझ्या अक्कलहुशारीने, माझ्या कर्तृत्वाने कमावता आले नाही असे म्हणा हवे तर…बहुतेक ही माझ्यातली उणीव असेल, पण मुंबईच्या वेगवान जीवनाशी मला जमवून घेता आले नाही एवढेच म्हणेन!

बरं मुंबई सोडून मी एक आदर्श स्वप्नवत जीवन जगतो आहे, असेही नाही. पण मुंबईव्यतिरिक्त आयुष्याचा विचार केला, तर तिथे एक सकाळ सोबतीला आहे जिथे धर्माचा वास नाही. एक संध्याकाळ आहे, जी अनुभवायला वेळ आहे. जिवंतपणी हात देणारी माणसे आहेत आणि मेल्यावर खांदा देणारेही आहेत! आई-बहिणीला मान देण्याची सवय आहे, या वातावरणात जे खूप गरजेचे आहे. ना राजकरणाचा जास्त गंध आहे हवेत ना रोजच्या दैनंदिन जीवनात! थोडक्यात सांगावे तर मुंबईसारख्या स्वर्गात भिकारी म्हणून राहण्यापेक्षा इथे नरकात-छोट्या शहरात राजा म्हणून राहणे आवडते आहे !

याचा अर्थ मुंबईत पुन्हा कधीच येणार नाही असा नाही, पण येणार ते एका सुखी जीवनासाठी… जिवाची मुंबई करायला नाही !

आता खूप बदलली आहे मुंबई, असे ऐकून आहे, खरे आहे का? एक सुखी आणि शांत जीवन जगता येणार असेल तर मला नक्की सांगा…. – येईन !

(काल्पनिक)

तन्वीर सिद्दीकी

FB_IMG_1490321896652

 

इ-मेल –

महाराष्ट्रात जन्म आणि शिक्षण, कामासाठी भारतभर भ्रमण आणि आता छत्तीसगढ राज्यात वास्तव्य. सध्या एका दक्षिण कोरियन कंपनीत इंजिनियर/तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत

साहित्यिक प्रवास – ‘अलाहिदा’ आणि ‘अलाहिदा रिलोडेड’ मराठी कवितासंग्रह प्रकाशित. ‘हॉस्टेल लाईफ’ नावाचे विनोदी किस्सेवजा पुस्तक प्रकाशित. सामना वृत्तपत्राच्या फुलोरा पुरवणीत ३-४ वर्षे लेखन. अनेक ई-बुक्स, दिवाळी अंक, मासिके, पाक्षिके, पुस्तके यांत कथा, कविता, लेख प्रकाशित. २ शॉर्ट-फिल्म्ससाठी लेखन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s