स्थलांतरांचा प्रवास

ललिता जेम्स

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी सायली मला म्हणाली होती की, तिच्या डिजिटल दिवाळी अंकासाठी काहीतरी लिही. खरेतर मला लिहायचा खूपच कंटाळा आहे, शिवाय अति धावपळीच्या आयुष्यात वेळात वेळ काढून लिहिणे जमतेच असे नाही, त्यामुळे या ना त्या कारणाने लिहिणे राहून गेले. जुनी मैत्रीण असल्याने तिनेही माझा नाद सुज्ञपणे सोडून दिला. या वर्षी मात्र सायलीने माझा जिव्हाळ्याचा विषयच निवडला. आधी मुंबईला स्थलांतर, त्यानंतर परदेशात आणि प्रवासाचे वेड;असा तिहेरी संगम! मग मीच आपणहून तिला विचारले, मी लिहू का?

“Not all those who wander are lost.” – J.R.R. Tolkien

‘प्रवास’ हा तर माझ्या रक्तात भिनलेला विषय. आपल्याला अत्यंत आवडणारी एखादी गोष्ट आपल्या उदरनिर्वाहाचे साधनही व्हावी, अशा थोडक्या नशीबवान लोकांतली मी एक. माझ्या प्रवासप्रेमाची बीजे खरेतर अगदी नकळतपणे माझ्या मनात बालपणीच रोवली गेली. औरंगाबादसारख्या पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या शहरात माझे लहानपण गेले. घराजवळच्या यूथ होस्टेलचे संचालक असलेल्या रिटायर्ड कर्नल मोडक यांच्या प्रोत्साहनामुळे यूथ होस्टेलमध्ये थांबलेल्या मुख्यत: युरोपिअन प्रवाशांशी कुतूहलमिश्रित संभाषण करता-करता आपणही कधीतरी असेच जगप्रवासाला नक्कीच जावे या भावनेने कोवळ्या अंतर्मनात कुठेतरी घर केले असणार हे नक्कीच. प्रवासी नाना तऱ्हेचे असत. काही एकांडे शिलेदार, काही मित्रपरिवारासोबत निघालेले तर काही जोडीदारांबरोबर आणि काही अगदी सहकुटुंब निघालेले. लहान मुलांना बरोबर बांधून घेऊन प्रवासातच मुलांचा शाळेचा अभ्यास घेत-घेत जगप्रवासाला निघालेली मंडळीही तेव्हा भेटली. आम्हांला त्यांच्याबद्दल होते तितकेच त्यांनाही आमच्याबद्दल कुतूहल वाटत असे. मराठी माध्यमात शिक्षण घेत असल्याने आपल्याला इंग्लिश नीटपणे बोलता येत नाही, या भीतियुक्त गंडावर कुतूहलाने मात केली आणि मी घाबरत, धडपडत इंग्लिश बोलायला शिकले. आम्ही ज्यांच्याशी बोलायला घाबरायचो, त्यांतले इंग्रज व अमेरिकी सोडले, तर इतर युरोपिय लोकांचे इंग्लिशदेखील तितकेच मोडके-तोडके असते, हे कळायला मात्र बरीच वर्षे लागली. असो.

पुढे शिक्षण संपल्यावर औरंगाबादच्याच अजंता ॲम्बेसेडर या पंचतारांकित हॉटेलमधील सेल्स आणि मार्केटिंगची नोकरी सुरुवातीला निवळ कुतूहलापोटी निवडली. मात्र आपल्याला हे क्षेत्र आवडते आहे आणि त्यात पुढे प्रगती करायला वाव आहे, हे लक्षात आल्यावर मात्र मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्रातल्या अग्रस्थानी असलेल्या ओबेरॉय आणि ताज या कंपन्यांमध्ये अर्ज केले. ताजने मला त्यांच्या इंदोरच्या होटेलमध्ये कामाची ऑफर दिली तर ओबेरॉयने मात्र मुंबईतच काम करण्याची संधी दिली. निर्णय अर्थातच सोपा होता. औरंगाबाद सोडून पुन्हा इंदोरसारख्या लहान गावात जाण्यात मला काही स्वारस्य नव्हते. आपले क्षितिज रुंदावायचे असेल, तर मुंबईला पर्याय नाही हे मला पक्के माहीत होते.

“Two roads diverged in a wood and I , I took the one less traveled by.” – Robert Frost.

तर अशा प्रकारे मी मुंबईत आणि पर्यटनाशी जवळून संबंधित क्षेत्रात दाखल झाले. या शहराने मला स्वातंत्र्य दिले, जबाबदारीने राहण्याचे शिक्षण दिले, तारुण्यसुलभ आत्मविश्वासाला खतपाणी घातले. एक तरुण स्त्री, स्वतंत्र विचारांची आणि स्वत:च्या पायावर एकटी स्वतंत्र राहणारी, ही संकल्पना मला वाटते त्या काळात भारताततरी फक्त मुंबईसारख्या शहरालाच झेपू शकत होती.

माझे मामा आणि आत्या मुंबईकर असल्याने हे शहर मला अजिबातच नवखे नव्हते, तरीही स्वतःच्या बळावर इथे जम बसवणे सुरुवातीला तरी अजिबातच सोपे नव्हते. कंपनीने हाउसिंग अलाउन्स देऊ केला होता, पण त्या बजेटमध्ये एकतर दक्षिण मुंबईत कुठेतरी शू-बॉक्स साइज खुराड्यात पेइंग गेस्ट म्हणून राहणे, नाहीतर अंधेरी ते बोरीवली या दरम्यान कुठेतरी फ्लॅट घेऊन रोज नरिमन पॉइन्टला जा-ये करणे हाच पर्याय होता. औरंगाबादच्या भल्या प्रचंड घराची आणि दारात उभ्या असलेल्या गाड्यांची सवय असलेल्या मला हे दोन्ही उपाय पटेनात. पण दुर्दम्य इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. मुंबईत नव्याने भेटलेल्या समवयस्क, समवैचारिक तसेच समदुःखी मित्र-मैत्रिणींची गाठ पडली आणि आम्ही वांद्र्यातील कलानगरमध्ये एक मोठा सुंदर आणि हवेशीर फ्लॅट शेअरिंग बेसिसवर भाड्याने घेतला. आयआयएममध्ये शिकलेले आणि मल्टिनॅशनल बॅंकांत आणि कंपन्यांत काम करणारे माझे फ्लॅटमेट्ससुद्धा माझ्यासाठी एक शिक्षण-संस्थाच होते, असे म्हणायला हरकत नाही. आजतागायत आमचे सख्य हे कुटुंबीयांइतकेच जवळचे आहे.

व्यावसायिक अनुभवांबरोबरच, सांस्कृतिक आणि वैचारिक घडण होण्यामध्ये मुंबईचा मोठा वाटा होता. औरंगाबादमधले माझे विश्व फार सीमित होते. मुंबईत जम बसवायला अधिक परिश्रम करणे आवश्यक होते. इथले वातावरण अतिशय स्पर्धात्मक होते. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा नियम या शहराला तंतोतंत लागू पडतो. पृथ्वी आणि एन.सी.पी.ए.यांसारखी थिएटर्स, जहांगीर आणि इतर छोट्या आणि मोठ्या आर्ट गॅलऱ्या, संगीताचे विविध कार्यक्रम, वाचनालये, अशा अनेक संधींबरोबरच दहा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि व्यवसायांत अग्रेसर असणारी केवळ भारतातलीच नाही तर जगभरातली माणसे मला इथे भेटली. या अनुभवांतून नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. थोडेफार बरे-वाईट अनुभवही आले, पण जगण्यासाठी लागणारी जिगर या शहराने मला दिली.

मुंबईने जरी माझ्या करियरचा पाया उभारण्यास मदत केली, तरी या शहरात कायमचे वास्तव्य करावेसे मात्र मला कधी वाटले नाही. सर्वसामान्य माणसाला उत्तम प्रतीचे आयुष्य मुंबईत जगणे अवघड आहे, असे मलातरी अजूनही प्रामाणिकपणे वाटते. जागेची टंचाई आणि महागाई, अफाट गर्दी आणि गोंगाट, ध्वनी आणि वायुप्रदूषण, घामट्ट उन्हाळा नाहीतर प्रचंड पाऊस असे ‘आल्हाददायक’ हवामान, हे सगळे फार जाचक आहे. जन्मापासूनच मुंबईत वाढलेल्या लोकांना मात्र याचा त्रास होत नाही, किंबहुना या त्रासाशिवाय जगणे त्यांना अवघड वाटते. पुष्कर सिनेमात कमल हासनला जशी आवाजाशिवाय झोप येत नाही, तसंच काहीसं. बाहेरून मुंबईत येणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी. शिवाय जगातील कुठल्याही मोठ्या शहरासाखीच मुंबईही अलिप्त आहे. तुमच्या तिथे असण्याचे किंवा नसण्याचेही तिला काही सोयरसुतक नसते, असे मला वाटते. त्यामुळे कंपनीत मिळालेल्या प्रमोशनबरोबर झालेल्या आधी जयपूर आणि पुढे दिल्ली व लंडन ह्या बदल्यांचे मी स्वागतच करत गेले.

नोकरीमध्ये बढती होत होती, कामाच्या निमित्ताने इंग्लंड, जर्मनी, अमेरिका असे परदेश प्रवासही सुरू झाले होते. प्रत्येक वेळी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाला निघाले की त्याला जोडूनच काही दिवसतरी (जितकी जमेल तितकी) सुटी घ्यायची आणि जिथे जातो आहोत, तिथला आसपासचा प्रदेश जमेल तसा पाहायचा, हा तेव्हा पाडलेला पायंडा मी आजही, पंचवीसएक वर्षांनंतरही तितक्याच उत्साहाने अमलात आणते.

18893097_10213953386175119_3192906212733142495_n

योगायोगाने याच काळात मला माझ्या आयुष्याचा जोडीदारही भेटला. डेव्हिड तर माझ्याहूनही जास्त भटका. मूळचा ब्रिटिश असला तरी व्यवसायाच्या निमित्ताने साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग इत्यादी देशांत राहिलेला. साउथ आफ्रिकेत राहत असताना दोन वर्षे सबॅटिकल (विश्रांती-प्रवास) घेऊन त्याने दक्षिणेत केपटाऊनपासून प्रवासाला सुरुवात करून उत्तरेत इजिप्तपर्यंत संपूर्ण आफ्रिकाखंड, जवळपास पूर्णपणे जमिनीवरचा प्रवास करून पालथा घातलाच, पण तिथूनच पुढे सुएझ कालवा पार करून जॉर्डन, सीरिया, अर्मेनिया, अझरबैजान आणि टर्की या देशांत फिरून, शेवटी बार्सेलोनामधील ऑलिम्पिक स्पर्धांच्या प्रेक्षकांमध्ये उपस्थिती लावून या दोन वर्षांच्या सुटीची सांगता केली (साल १९९२). तेव्हा लागलेले हे ऑलिम्पिक स्पर्धांचे वेड त्याने पुढे १९९६ मध्ये ॲटलांटा आणि २००० मध्ये सिडनीला जाऊन पूर्ण केले. तर अशा प्रवासवेड्या साथीदाराबरोबर मी आसेतु-हिमाचल भारतभ्रमंती केली. पुढे युरोपात परतल्यावरही प्रवासाचे हे वेड चालूच राहिले आणि शेवटपर्यंत राहील.

लग्नानंतर काही दिवस आम्ही डेव्हिडच्या व्यावसायामुळे दक्षिण युरोपात (ग्रीस आणि सायप्रस) राहिलो. तेव्हा तिथला आसपासचा प्रदेश फिरायचे निमित्तच मिळाले. ग्रीस, टर्की, सायप्रस आणि आसपासची एजियन बेटे हा प्राचीन संस्कृती आणि भूमध्य समुद्राच्या सौंदर्याने नटलेला प्रदेश. शिवाय नवीन माणसे, नवीन भाषा, नवीन संस्कृती हे शिकण्या-समजण्यात वेळ गेला. मी भारताचे नागरिकत्व तेव्हा सोडले नव्हते. त्यामुळे माझ्याकडे युरोपिअन वर्क परमिट नसल्याने मी या मोकळ्या वेळाचा पुरेपूर फायदा उठवला. शिवाय संगीत आणि चित्रकला शिकणे, वाचन, स्थानिक लोकांशी जमेल तितका आणि जमेल तसा संवाद साधणे अशी कामे चालूच होती. तिथे भारतीय लोकही नव्हते त्यामुळे आपले खाण्या-पिण्याचे पदार्थ उपलब्ध नव्हते. आपण जेव्हा स्थलांतर करतो, तेव्हा मागचे सगळे मागे ठेवून, जुन्या सवयींना विसरून नवीन जागेला आपलेसे केले आणि नवीन जीवनशैली आत्मसात करता आली तर आयुष्य सोपे, सुसह्य आणि रसपूर्ण होते असे मला वाटते.

इंग्लंडमध्ये स्थायिक होतानाही हीच वृत्ती कामाला आली, त्यामुळे स्थलांतराचा त्रास कधी वाटला नाही. जिथे राहता तिथलेच होऊन राहा, स्थानिक लोकांबरोबर मिळून मिसळून राहा, त्यांच्या चालीरिती समजून घ्या, त्यांचा आदर करा, मग ते लोक आणि तो समाज तुमचे स्वागतच करतात, असा माझा तरी अनुभव आहे. लंडनला परतल्यावर ओबेरॉयनी मला आनंदाने कंपनीत परत सामावून घेतले, त्यामुळे व्यवसायपरत्वे भारताशी कायम संपर्क राहिला. लंडन आणि मुंबई या शहरांच्या स्वभावांमध्ये आणि त्यामुळे राहणीमानात बरेच साम्य आहे, फक्त लंडनमध्ये घाम येत नाही; असे मी नेहमी गमतीने म्हणते. थोडक्यात ‘बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस’ मला मिळालं आहे, हे मी माझे सुदैव समजते.

LJames for DigDiwali-22

मला कामानिमित्ताने युरोपात सतत फिरावे लागते. डेव्हिडने बराचसा युरोप अनेक वर्षांपूर्वीच पाहिलेला आहे. पण म्हणून तो मला थांबवत नाही. कुठल्याही व्यावसायिक दौऱ्यावर निघाले तर तो मला तिथली जवळपासची त्याला आवडलेली ठिकाणे आवर्जून सुचवतो आणि मला तिथे जाण्यास प्रोत्साहन देतो. काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त हॉलंडमध्ये गेले असताना ॲमस्टरडॅम, द हेग आणि रोटरडॅम या कामाच्या ठिकाणांशिवाय आइंडहोवेन, दोरड्रेक्खत, यूटरेक्खट, ॲपलदुर्म इत्यादी गावांना भेट दिली. फ्रान्समध्ये नीस आणि कॅन (आपण ज्याला मराठीत कान्स म्हणतो) इथे कामासाठी गेले तर ऑन्टीब, मार्से, ॲक्स-ऑन-प्रोव्हान्स, ॲव्हिग्न्योन, मॉन्टपेलिए इत्यादी ठिकाणे पालथी घातली. एकटीने भटकायला मला आवडते. नशिबाने ‘एकटी कशी जाशील?’ अशी माझ्या आत्मविश्वासाबद्दल आणि क्षमतेबद्दल शंका घेणारे कोणी नाही हेही खरेच.

मला आवडलेले आठवणीतले प्रवास म्हणजे भूतानमध्ये पारो, थिंपूपासून थेट बुमथांगपर्यंत केलेला प्रवास आणि मला भेटलेले भूतानचे उत्साही आणि आनंदी लोक. भूतानमधल्या कॉन्फरन्ससाठी एका संध्याकाळचा ड्रेस कोड भूतानी पारंपरिक पोशाख होता, त्यासाठी आयोजकांनी आमची सोयही केली होती. पण माझ्या गाइडने, त्सेरिंगने आग्रहाने मला त्याच्या घरी नेले आणि त्याच्या ऐंशी वर्षांच्या आजीने तिचा खास ‘फेस्टिवल किरा’ मला नेसायला काढून दिला होता त्याची आठवण!

इजिप्तमध्ये लाल समुद्रावरील हुरघाडापासून लुक्सॉरपर्यंत जीव मुठीत धरून केलेला प्रवास. आयसिसने गोंधळ घातलेल्या या देशात अतिरेकी हल्ले आणि अपहरणाच्या बातम्या सतत असल्याने ठिकठिकाणी मिलिटरी चेकपोस्ट्स आणि पहारा असताना रेड-सी-डेझर्टमधल्या एकाकी रस्त्यांवर घालवलेले पाच-सहा तास. पण त्याचबरोबर बघितलेले या देशातले अप्रतिम सौंदर्य, नाइल नदीवर वसलेला चार-पाच हजार वर्षांचा जिवंत इतिहास, टूरिस्ट बिझनेस कमी झाल्याने तूतनखामूनच्या टूम्बमध्ये फक्त मी आणि सोबतीला चार हजार वर्षे जुनी या ‘बॉय किंग’ची ‘ममी’, असा अंगावर काटा आणणारा अलौकिक अनुभव! गाइड्सना या टूम्ब्समध्ये जाण्याची परवानगी नाही, ते तुम्हांला दारापाशी सोडतात, आत शिरले तर आतल्या आत्म्याची शांतता भंग पावेल असाही स्थानिक लोकांचा समज आहे. नाइल किनारी खाल्लेला इजिप्शिअन फूल (एका प्रकारची उसळ) आणि उम्म अली नावाची एका प्रकारची अप्रतिम खीर; मोरोक्कोमध्ये परित्यक्ता आणि डोमेस्टिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनी महिलांसाठी चालवलेले अतिशय चवदार मोरोक्कन जेवण देणारे साधे पण सुरेख रेस्टॉरंट. महेश्वरमध्ये ऐन उन्ह्याळ्यात नर्मदेकिनारी एकटीच भटकत असताना भेटलेल्या परिक्रमावासी वृद्धा, त्यांची कर्मकहाणी ऐकून वाटलेली हळहळ पण त्यांच्या नर्मदेवरील अपार श्रद्धेचा वाटलेला हेवा आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचे समाधान पाहून वाटलेला आनंद; इंडोनेशियात लाँबॉक बेटावर सासाक लोकांच्या घरी चाखलेला दुरियान फणस आणि कोकणातल्या लोकांना लाजवतील अशा बाली बेटावरच्या लोकांनी सांगितलेल्या भुताखेतांच्या गोष्टी…. असे एक ना अनेक अनुभव आयुष्याला एक वेगळेच वळण देऊन समृद्ध करून गेले आहेत.

LJames for DigDiwali-13

LJames for DigDiwali-11

प्रवासाचा निम्मा आनंद हा प्रवासाची तयारी करण्यात असतो, अशा अर्थाचा एक इंग्लिश वाक्प्रचार आहे. आमचे प्रवास हे फक्त ढोबळमानाने प्लॅन केलेले असतात. प्रवासाला निघताना साधारणपणे कुठली ठिकाणे पाहायची आहेत, हे आम्ही ठरवतो. काही प्राथमिक हॉटेल आरक्षणं वगैरे केलेली असतात, पण मग फिरताना मात्र आम्ही जसे आवडतील तसतसे बदल करत जातो. पंचतारांकित होटेल्सच्या व्यवसायातच असल्याने बऱ्याच ठिकाणी अशा अद्ययावत आणि आलिशान होटेल्समध्ये आम्हाला राहायला मिळते, पण ऑफ द बीटन ट्रॅक जाऊन अगदी लहान साध्या हॉटेल्समध्ये किंवा होमस्टेजमध्ये राहायला आम्हाला जास्त आवडते. एखाद्या देशात प्रवास करताना एका ठिकाणाहून दुसरीकडे विमानाने न जाता शक्यतो लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणे अधिक आवडते. टॅक्सीपेक्षा बसने किंवा रेल्वेने प्रवास करताना तिथले लोक भेटतात. त्यांना अधिक जवळून भेटायला मिळते, तिथली संस्कृती, तिथल्या चालीरिती अधिक जवळून अनुभवायला मिळतात. या सर्व प्रवासांत आम्ही अक्षरश: मैलोन्‌मैल चालतो. कुठलाही प्रदेश तुम्हाला जवळून पाहायचा, अनुभवायचा आणि समजून घ्यायचा असेल तर पायउतार होण्यासारखे दुसरे उत्तम साधन नाही.

ज्या प्रदेशास भेटी देतो, तिथली खाद्यसंस्कृती जाणून घेण्यात आम्हाला रस आहे. अर्थात हा कदाचित आमच्या व्यवसायाचा गुण असेल. पण युरोपात असताना भारतीय रेस्टॉरंट शोधणे किंवा आफ्रिकेत युरोपिअन जेवणाच्या शोधात जाणे, हे आमच्या प्रवासाच्या संकल्पनेत बसत नाही. त्याऐवजी स्थानिक परंपरागत जेवणाचे पदार्थ किंवा त्या देशाच्या कलोनियल किंवा आंतरराष्ट्रीय इतिहासामुळे किंवा शेकडो वर्षांच्या स्थलांतरामुळे बनलेली खाद्यसंस्कृती हा खूप जिव्हाळ्याचा विषय. कुठेही गेलो तर स्थानिक लोक कुठल्या ठिकाणी जेवतात, याची आम्ही जरूर चौकशी करतो आणि तिथे नक्कीच भेट देतो. कुठलीही खाद्यसंस्कृती किंवा अन्न हे वाईट नसते, ते कदाचित प्रत्येकाच्या प्रकृतीला झेपणारे नसेल, पण स्थानिक लोकांबरोबर स्थानिक अन्नाचा आस्वाद घेण्याचा आनंद हा पट्टीच्या प्रवाशालाच कळतो.

“If you reject the food, ignore the customs, fear the religion and avoid the people, you might better stay at home” असे कुणीतरी म्हटले आहे ते खरेच आहे.

LJames for DigDiwali-1

आत्तापर्यंत बहुधा एक शतांश जगही बघून, अनुभवून झाले नाही. जे काही थोडके पाहिले आहे, त्याबद्दल मी मला भाग्यवान समजते. भटकेपणा किंवा भटका स्वभाव हा ‘नेचर आणि नर्चर’ या दोन्हीचा मिलाप असतो असे मला वाटते. मुळात वृत्ती चौकस असेल आणि थोडा धाडसी स्वभाव जोडीला असेल, तर हे सुरेख जग आणि इथली साधी माणसे आयुष्य सुंदर करतात यात शंकाच नाही.

जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, “We live in a wonderful world that is full of beauty, charm and adventure. There is no end to the adventures we can have if only we seek them with our eyes open.”

फक्त वहिवाट सोडून जाण्याची आणि जगण्याची तयारी हवी…

ललिता जेम्स

LJ Profile Photo for Digital Diwal

ललिता फाटक-जेम्स. सध्या लंडनमध्ये वास्तव्य. ओबेरॉय हॉटेल समूहाच्या सेल्स आणि मार्केटिंग, युरोप विभागाची प्रमुख म्हणून कार्यरत.

3 thoughts on “स्थलांतरांचा प्रवास

  1. ललिता,अतिशय सुंदर content आणि सहज सुंदर शैली !तुझे निवडक अनुभव आणि तुझं त्यावरचं भाष्य अप्रतिम . प्रवासात तू जोडलेल्या सांस्कृतिक श्रीमंतीचं कौतुक वाटलं. तुझं आणि सायलीचं मनःपूर्वक अभिनंदन .

    Like

  2. हाय ललिता, सुरेख लिहिलं आहेस. हा लेख तुझ्या आजवरच्या भटकंतीचा गोषवारा आहे. तुझे अनेक अनुभव एकाच लेखात मावणार नाहीतच. प्रत्येक प्रवासाबद्दल वाचायला खूप आवडेल.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s