इब्न बतुता- एक पुरातन प्रवासी

 सविता दामले

मानव आणि अन्य पशुपक्षी ह्यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे बुद्धी आणि अनावर कुतूहल ह्यांची मानवाला मिळालेली देणगी. ह्या अनावर कुतूहलानेच तर त्याला ‘त्या डोंगरापल्याड काय असेल?’ ‘त्या जंगलापल्याड काय असेल?’ ‘त्या समुद्रापल्याड काय असेल?’ हा शोध घेण्याचा ध्यास लावला. ह्या अनावर कुतूहलामुळेच तर आफ्रिकेत जन्माला आलेला पहिला मानव हळूहळू जगभर पसरला. ह्या कुतूहलामुळेच तर त्या मानवानं ह्या अफाट पृथ्वीचाच नव्हे तर सप्तसमुद्रांचा आणि अगदी ग्रहताऱ्यांचाही वेध घेतला.

दोन-तीन महिने घरात काढले की मला अस्वस्थ व्हायला होतं. ‘कुठंतरी जाऊन आलं पाहिजे’ असा ध्यास मनाला लागतो. रोजच्या जीवनाचं ‘जू’ मानेवरून उतरवून काही काळासाठी तरी ‘रुळलेली’ चाकोरी सोडून नव्या वाटांवर रमतगमत, स्वच्छंद भ्रमंती करावीशी वाटते. परंतु आज एकविसाव्या शतकात मी किंवा अन्य कुणीही प्रवासी प्रवासाचा बेत आखतो, तेव्हा आमच्या दिमतीला इंटरनेट असतं, गुगल मॅप असतं, तिकिट काढणं, हॉटेल किंवा होस्टेल बुकिंग करणं… सगळं-सगळं आमच्या हातांच्या बोटांशी असतं. अशा वेळी मनात येतं की, जुन्या काळी प्रवास करणाऱ्या ह्यु-आन-संग, मार्को पोलो, इब्न बतुता ह्यांनी कसा काय प्रवास केला असेल? नाही धड रस्ते ठाऊक, नाही कसली संपर्कयंत्रणा, जिवाची भीती, घरच्यांची ताटातूट, फार पैसे आणि सामान सोबत घेऊन जायची सोय नाही, लुटारूंची भीती… ह्या सगळ्या-सगळ्यावर मात करून ह्या लोकांनी हे दुर्दम्य भासणारे प्रवास कसे काय केले असतील?

इसवीसनाच्या सातव्या शतकात चीनहून भारतात आलेला ह्यु-आन-संग बौद्ध भिक्षू होता, तर तेराव्या शतकातला मार्को पोलो हा इटलीतील व्हेनिस येथून आलेला व्यापारी होता. रेशीम मार्गावरून प्रवास करून तो चीन आणि मंगोलियापर्यंत पोचला आणि मंगोलियातल्या कुबलाई खानाच्या दरबारात त्याला मानाचं स्थान मिळालं. आपला कथानायक इब्न बतुता हा चौदाव्या शतकात आफ्रिकेतील मूर साम्राज्यातून म्हणजेच आजच्या मोरोक्कोतून बाहेर पडलेला प्रवासी. तो इस्लामी पंडितांच्या घराण्यातून आलेला होता. तत्कालीन इस्लामी जगतात तो फिरला, भारतात आला, एवढंच नव्हे तर त्या जगताबाहेरही गेला.

ह्या तीन प्रवाशांचं समान वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व जण सुशिक्षित विद्वान होते. त्यांनी आपल्या प्रवासाच्या कहाण्या लिहून ठेवल्या. ह्या कहाण्या लिहिताना त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की आपण हा केवढा मोठा सांस्कृतिक ठेवा पुढल्या पिढ्यांसाठी सोडून जात आहोत ते.

bab507c444a62a24a07969c5a096fa94--ibn-battuta-muslimइब्न बतुतानं लिहून ठेवलं आहे की ‘प्रवास तुम्हांला आश्चर्यानं मुग्ध करतो आणि नंतर मग घडाघडा गोष्टी सांगायला भाग पाडतो.’ मलाही वाटलं की ह्या माणसानं कसा काय केला असेल हा सगळा प्रवास? म्हणून त्याची कहाणी मी वाचली. ती कहाणी नुसती वाचूनच मी मुग्ध झाले आणि मग त्याची गोष्ट तुम्हांला घडाघडा सांगितल्याशिवाय त्याच्यासारखंच मलाही चैनच पडेना.

इब्न बतुताचं पूर्ण नाव होतं अबू अब्दुल्ला मुहम्मद इब्न बतुता. तो जन्मानं मोरोक्कन  मुसलमान होता. एक इस्लामी विद्वान आणि जगप्रवासी म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानं जवळजवळ तीस वर्षं प्रवास केला आणि परतल्यावर प्रवासात पाहिलेल्या चित्तचक्षुचमत्कारिक कहाण्यांवर प्रवासवर्णन लिहिलं. ते प्रवासवर्णन ‘रिहला’ ह्या नावानं ओळखलं जातं. त्यानं तत्कालीन ज्ञात इस्लामी जगतात आणि त्याहीपलीकडे जाऊन प्रवास केला. हा प्रवास दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, दक्षिण युरोप आणि पूर्व युरोप एवढ्या भागात केला होताच. पण त्याशिवाय मध्यपूर्व, भारतीय उपखंड, मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि चीन अशा पूर्वेकडील प्रदेशांतही त्यानं मुसाफिरी केली. एवढं अंतर तर त्याच्या पूर्वीच्या प्रवासी लेखकांनी नक्कीच पार केलं नव्हतं.

इब्न बतुताचा जन्म मोरोक्कोतील टॅन्जियर शहरात २५ फेब्रुवारी १३०४ रोजी (म्हणजे हिजरा ७०३) झाला. टॅन्जियर हे मोरोक्कोतलं देखणं शहर जिब्राल्टर सामुद्रधुनीवर वसलेलं आहे. ह्याच ठिकाणी भूमध्यसागर आणि अटलांटिक महासागर ह्यांचं मीलन होतं. ह्याच ठिकाणी आफ्रिका आणि युरोप हे खंड एकमेकांना भेटतात. जगातील सर्वांत जुन्या शहरांत टॅन्जियर शहराचा आठवा क्रमांक लागतो, ह्यावरून हे शहर किती पुरातन आहे ते कळतं. आजही ह्या शहरात मोठमोठ्या अमीर-उमरावांचे आणि अरब जगतातील सुलतानांचे मोठमोठाले बंगले आहेत. भूमध्यसागरी, आल्हाददायक हवामान असलेलं हे शहर आजही तेवढंच प्रेक्षणीय आहे. स्पेनच्या दक्षिणेकडील तारिफा शहर हे युरोप खंडाचं दक्षिण टोक. तारिफा आणि टॅन्जियर ह्यांच्यात अवघं ३९ किलोमीटर अंतर आहे. आज फेरी बोटीनं हा प्रवास नियमित होत असतो.

परंतु त्या काळात काही हे एवढं सोपं नव्हतं. जगज्जेता अलेक्झांडर ख्रिस्तपूर्व ३२० साली मोहिमेवर निघाला तेव्हा टॅन्जियर हे शहर फोनेशियन साम्राज्याचा भाग होतं. तिथलं महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं ते. त्यानंतर कार्थेज, रोमन अशा बऱ्याच राज्यांकडे त्याचं हस्तांतरण झालं. तद्नंतर सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यावर इस्लामी सत्ता आसपासच्या प्रदेशात पसरली, तशीच ती मोरोक्कोच्या मुरांनीही स्वीकारली. ह्या सुंदर, देखण्या नैसर्गिक बंदराच्या शहरात इब्न बतुता जन्माला आला आणि त्यानं निळ्याभोर समुद्राच्या हाकेला ओ दिली.

इब्न बतुता जन्मला, तेव्हा तिथं मरिनी घराण्याचं राज्य होतं. त्या काळात इस्लामी संस्कृतीचा प्रभाव पश्चिम आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्यापासून ते उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व, भारत आणि आग्नेय आशिया एवढा सर्वदूर पसरला होता. शिवाय ह्या संस्कृतीबाहेरच्या सत्तांमध्येही इस्लामी समाजगट राहत होतेच. विशेषतः चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे समाजगट लक्षणीयरीत्या वाढू लागले होते. जुनी साम्राज्यं आणि जुन्या संस्कृती विलयास जाणं आणि त्या जागी नवी साम्राज्यं आणि नव्या संस्कृती उदयास येणं हा तर जगरहाटीचाच भाग आहे. त्यानुसारच ते घडत होतं.

बर्बर कुळात जन्मलेल्या इब्न बतुताचं कुटुंब कायदेपंडितांचं होतं. त्यांच्या घरात शिक्षणाला खूपच महत्त्व होतं. तथापि, उच्च शिक्षणाची आणि परीक्षा देण्याची सोय टॅन्जियरमध्ये नव्हती. त्यामुळे आपण लांबचा प्रवास करून गुरू शोधावेत, उत्तमोत्तम ग्रंथालयं शोधावीत अशी प्रबळ इच्छा विद्यार्थिदशेतील इब्न बतुताच्या मनात निर्माण झाली. परंतु असे गुरू आणि अशी ग्रंथालयं तर त्या काळात अलेक्झांड्रिया, कैरो आणि  दमास्कस इथं होती. शिवाय त्याला मक्केची तीर्थयात्राही करायची होती.

म्हणून मग वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी म्हणजे १४ जून, १३२५ रोजी तो टॅन्जियरमधून प्रवासाला बाहेर पडला. तेव्हा त्याचं वाहन होतं गाढव. आपल्याकडे गाढवाचा वापर स्वतः बसण्यासाठी कुणी करत नाही. करायचा झालाच तर तो गाढवावर उलटं बसवून धिंड काढणं अशा अपमानास्पद पद्धतीच्या शिक्षेसाठी केला जातो. परंतु आफ्रिकेसारख्या आणि मध्यपूर्वेतल्या जेरूसलेमसारख्या खडबडीत पृष्ठभागांवर त्या काळी माणसं गाढवांवर बसून सैर करत असत. खुद्द येशू ख्रिस्तही जेरूसलेममध्ये आला तो गाढवावर बसूनच आला, असा बायबलमध्ये उल्लेख आहे.

इब्न बतुताला मक्केला जायचं होतं. त्याच्या एक शतक आधी जन्मलेला व्यापारी ‘मार्को पोलो’ हा प्रवासी आपल्यासोबत मोठा तांडा घेऊन सफरीला बाहेर पडला होता परंतु इब्न बतुता मात्र एकटाच बाहेर पडला होता.

त्याबद्दल त्यानं आपल्या ‘रिहला’मध्ये म्हटलं आहे की, मी एकटाच निघालो. माझ्यासोबत कुणी सहप्रवासी नव्हता की ज्याच्या सहवासात, गप्पागोष्टी करत चालताना मला आनंद मिळेल. मी कुठल्या तांड्यासोबतही चाललो नव्हतो. परंतु मला जग फिरण्याची, ज्ञान मिळवण्याची तहान लागली होती. ती माझ्यातल्या जिप्सीला एका जागी स्वस्थ बसूच देत नव्हती. ज्या ठिकाणांची माहिती मी फक्त वाचली होती, ती ठिकाणं प्रत्यक्ष बघण्याची ऊर्मी माझ्या अंतरात दाटून आली होती. कित्येक वर्षं ते स्वप्न मी मनात जपून ठेवलं होतं. त्याची पूर्तता करण्यासाठी मी चाललो होतो, पक्ष्यांनी आपलं घरटं सोडून उडून जावं, तसा घर सोडून निघालो होतो.. गृहस्थाश्रमी जीवनात अडकलेल्या माझ्या आईवडिलांना ह्या वियोगामुळे खूप दुःख झालं आणि माझंही काळीज दुःखानं गलबलून गेलं. परंतु काळजावर दगड ठेवून मी निघालो.

map
इब्न बतूताचा प्रवासमार्ग  – विकीपीडिया फोटो

प्रवासवर्णनात लिहिल्यानुसार इब्न बतुताचा एकटेपणा फार काळ टिकला नाही. सुरुवातीला तो पूर्व आफ्रिकेत ट्युनीस येथे गेला. ट्युनीस हे शहर टॅन्जियरपासून साधारण १९५० किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत लागलेल्या एका शहराच्या सरदारानं दान म्हणून त्याला सोन्याच्या मोहरा आणि लोकरी कापड दिलं कारण इस्लाममध्ये दानधर्माला खूप मान्यता होती. ह्या सगळ्या फिरस्तीच्या काळात इब्न बतुता मदरशांमध्ये आणि सुफी धर्मशाळांत राहत असे. ट्युनीसनंतरचा त्याचा मुख्य मुक्काम होता अलेक्झांड्रिया शहरात. भूमध्यसागराच्या किनाऱ्यावरून प्रवास करत त्यानं ते २३०० किमी अंतर कापलं. हा प्रवास करण्यासाठी ट्युनीस येथून मक्केच्या यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या तांड्यात तो सामील झाला. वाटेत फारच कमी लोकवस्ती होती. अधूनमधून कित्येक दिवस त्यांचा प्रवास हिरव्या-करड्या दऱ्याखोऱ्यांतून चालायचा. वाटेत एकही शहर नसे. फक्त बर्बर लोकांचे लहानलहान पाडे आणि उंटांचे कळप चारायला आणणारे गुराखी त्यांना भेटत. सरतेशेवटी त्याला असा तांडा भेटला ज्यात यात्रेकरू होते आणि अन्य प्रवासीही होते. त्यांतले काही जण पायी चालत होते, तर काही जण घोडे, खेचरं, गाढवं आणि उंट यांवर बसून प्रवास करत होते. ह्या नव्या तांड्यातले यात्रेकरू हाज यात्रेबद्दल फारच उत्साही होते. इब्न बतुताच्या दृष्टीनं हा प्रवास म्हणजे तत्कालीन मुस्लीम जगताची शैक्षणिक सहलच होती. धर्म आणि कायदा यांचं ज्ञान मिळवणं, अन्य मुसलमान विद्वानांना भेटणं हे त्यामुळे शक्य होत होतं. एवढं ज्ञान मिळवून आल्यावर त्याला काजी म्हणून नोकरी करायची होती… ह्याच उद्देशानं तर तो बाहेर पडला होता.

अलेक्झांड्रियात त्याची ‘बुऱ्हाण अल दिन’ नामक एका लंगड्या सुफी संतांशी गाठ पडली. त्या संतांना जाणवलं की इब्न बतुता प्रवासाच्या वेडानं झपाटला आहे. म्हणून त्यांनी बतुताला सुचवलं की तू माझ्या तीन सुफी सहकाऱ्यांना भेट, त्यांतले दोन सुफी साधक आहेत हिंदुस्थानात तर एक जण आहे चीनमध्ये. त्याविषयी आपल्या प्रवासवर्णनात बतुतानं लिहिलं आहे की, ‘त्यांनी मला केलेल्या सूचनेमुळे ह्या तिन्ही ठिकाणी जाण्याची इच्छा माझ्या मनात रुजली. मग ह्या तीन सुफी साधकांना भेटेपर्यंत माझा प्रवास थांबलाच नाही. मी त्या तिघांनाही प्रत्यक्ष भेटून ‘बुऱ्हाण अल-दिन’  ह्यांच्या शुभेच्छा दिल्या.’

अलेक्झांड्रिया इथं बतुताची गाठ आणखी एका संताशी पडली. अलेक्झांड्रियाजवळच्या एका गावी शांतपणे जीवन व्यतीत करणाऱ्या त्या संताच्या झोपडीच्या छतावर बतुता एकदा रात्रीचा झोपला होता, दिवस उन्हाळ्याचे होते. झोपेत त्याला स्वप्न पडलं की एक मोठा पक्षी त्याला आपल्या पाठीवरून पूर्वेच्या दिशेनं वाहून नेत आहे. त्यानं त्या संताला आपलं स्वप्न सांगितलं तेव्हा त्या संतानं त्याचा असा अर्थ लावला की, पूर्वेकडे हिंदुस्थानात जाण्याचा योग तुझ्या नशिबात आहे… त्यांनी सांगितलेला अर्थ आणि ‘बुऱ्हाण-अल-दिन’ यानं केलेली सूचना ह्या दोन्ही जुळत होत्या. त्यामुळेच इब्न बतुताच्या प्रवासवेडाला आणखीनच खतपाणी मिळालं. पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी संतमहंतांकडे जाणं ही त्या काळातली फारच प्रचलित प्रथा होती. म्हणजे अगदी राजेलोकही भाकितांचा आधार घेऊन कामं करत होते. अर्थात वैज्ञानिक साधनांच्या अभावामुळे तसं घडत होतं.

तिथून तो पुढे दमास्कसला गेला. तिथल्या तीन पाठशाळा धर्मशिक्षणाबद्दल खूपच प्रसिद्ध होत्या. त्यांतल्या एका पाठशाळेत तो २४ दिवस राहिला. ह्या काळात त्यानं औपचारिक धार्मिक शिक्षण घेतलं. दमास्कस इथं अरब जगतातील अनेक विद्वानांचा रहिवास होता. ते विद्यार्थ्यांना शास्त्रीय ग्रंथ शिकवत असत आणि त्यांची तोंडी परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्रं देत असत. बतुताचा तो अभ्यास घरी झालेला असल्यामुळे त्याला अर्थातच प्रमाणपत्र मिळालं.

तिथून पुढे प्रवास करत-करत एका तांड्यासोबत तो अल्जिअर्स शहराशी आला. तिथं अन्य यात्रेकरूंची वाट पाहत त्यांनी काही काळ तंबू ठोकला. सर्व यात्रेकरू जमल्यानंतर ओक, सेदार वृक्षांच्या जंगलांतून आणि डोंगरदऱ्यांतून प्रवास करत ते बिजाया शहरात पोचले. तिथं पोचल्यावर इब्न बतुता आजारी पडला. इथंच राहून विश्रांती घे, असा सल्ला मिळाला असतानाही त्यानं प्रवास चालूच ठेवला. त्याविषयी त्यानं लिहिलंय की, ‘अल्लाच्या मनात माझा मृत्यू व्हावा असं असेल, तर माझा मृत्यू रस्त्यात व्हावा आणि माझा चेहरा मक्केच्या दिशेने असावा.’

A-Moroccan-stamp-in-commemoration-of-Ibn-Battuta_s-feat
बतूताच्या स्मरणार्थ मोरोक्कोनं काढलेलं टपाल तिकीट – विकीपीडिया फोटो

परंतु सुदैवानं त्याला मरण आलं नाही आणि १४ जून, १३२५ रोजी घर सोडून प्रवासाला निघालेला इब्न बतुता १३२६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात मक्केला पोचला. तिथं त्यानं महिनाभर वास्तव्य केलं. तिथल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांत भाग घेतला. तिथं इस्लामी जगतातून अनेक पंडित आले होते, त्यांच्याशी चर्चा केल्या. खरं तर हा प्रवास झाल्यावर त्यानं परतायला हवं होतं. परंतु त्याच्या मनात अजूनही पुढे फिरावं, हिंदुस्थानात आणि चीनमध्ये जावं अशी तीव्र ओढ निर्माण झाली होती. तद्नुसार त्यानं आपला मोहरा घराऐवजी बगदादच्या दिशेनं वळवला. ह्या वेळेस हाज यात्रेवरून परतणाऱ्या बगदादी यात्रेकरूंच्या तांड्यात तो सहभागी झाला होता.

प्रवासातही इब्न बतुता आपलं जीवन पूर्णांशानं जगला. तो कुराणपठण करत असे, नमाज पढत असेच, पण त्याशिवाय त्यानं आपला ‘काजी’ हा व्यवसायही चालू ठेवला होता. तांड्यातल्या यात्रेकरूंमध्ये होणारे तंटेबखेडे तो सोडवत असे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढत होती. ह्या सात-आठ वर्षांच्या प्रवासकाळात त्यानं कमीतकमी दहा लग्नं केली आणि आफ्रिका-युरेशिया भागात आपली संतती मागे ठेवून तो मार्गक्रमणा करत राहिला. ह्या त्याच्या प्रवासाची काही उदाहरणं जरी पाहिली, तरी त्याच्या जीवनयात्रेविषयीचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतं.. आठ वर्षं वेगवेगळ्या ठिकाणी राहून बतुताने सरतेशेवटी आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेनं वळवला.

अफगाणिस्तानमार्गे बतुता हिंदुस्थानात आला. त्याचा हा मार्ग फारच खडतर होता. तुर्की आक्रमक ह्याच मार्गानं हिंदुस्थानात आले. हिंदुकुश पर्वतरांगांतील उंचावरल्या खिंडी त्याला ओलांडाव्या लागल्या. त्याच्या तांड्यानं तेरा हजार फूट उंचीवरली ख्वाक खिंडसुद्धा ओलांडली. त्याविषयी त्यानं आपल्या प्रवासवर्णनात अशी आठवण लिहिली आहे की, ‘डोंगरद-यांत प्रवास करताना आम्ही भल्या पहाटे निघत होतो आणि सूर्यास्त होईपर्यंत चालत होतो. सोबतच्या उंटांचे पाय बर्फात बुडू नयेत म्हणून आम्ही त्यांच्या पुढ्यात लोकरीच्या गोधड्या अंथरायचो.’

दिल्लीवर तेव्हा मुहम्मद तुघलकाचं राज्य होतं. हा बादशहा अत्यंत विक्षिप्त आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध होता. त्याची चांगली बाजू म्हणजे तो हुशार होता. फारसी कविता लिहायला शिकला होता आणि कलात्मक लेखनाची (कॅलीग्राफीची) कलाही शिकला होता. कायदेशीर, धार्मिक विषयांवर तो विद्वानांशी चर्चा करत असे. कुराण वाचता यावं म्हणून तो अरबी शिकला होता. विद्वानांवर आणि विश्वासातील मुसलमानांवर तो बक्षिसांची खैरात करत असे. परंतु त्यानं असे काही अंदाधुंद निर्णय घेतले की, त्यानंतर तशा निर्णयांना ‘तुघलकी फर्मान’ असं नाव पडलं. त्यातला एक निर्णय म्हणजे त्यानं आपली राजधानी दिल्ली इथून हालवून महाराष्ट्रातल्या दौलतबाद इथं नेण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. ह्या निर्णयातला वाईट भाग असा होता की, त्यानं दिल्लीवासीयांना जबरदस्तीनं दौलताबाद इथं जायला लावलं. त्या प्रवासात बरेच लोक दगावले. शिवाय दौलताबाद हा तसा ओसाड भाग होता, तिथं पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. त्यामुळे सरतेशेवटी राजधानी पुनश्च दिल्ली येथे हलवली गेली. त्यानं घेतलेला दुसरा अविचारी निर्णय म्हणजे चांदीच्या नाण्यांऐवजी तांब्याची नाणी काढण्याचा निर्णय. नव्यानं बनवलेली तांब्याची नाणी एवढ्या कमी दर्जाची होती की लोक त्यांची नक्कल करून जिझिया कर देऊ लागले. त्यामुळे त्याचा खजिना डबघाईला आला. त्या तुटीची भरपाई त्यानं आणखी कर वाढवून केली.

अशा ह्या सुलतानाबद्दल बतुतानं आपल्या ‘रिहला’मध्ये लिहिलंय की ‘हा सुलतान रक्तपात करण्यात मुळीच मागेपुढे पाहत नसे. लहान आणि मोठ्या, कुठल्याही गुन्ह्यांसाठी तो कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे. मग तो माणूस विद्वान पंडित असो, मोठ्या कुळातला असो की सर्वसामान्य असो. त्याच्यावर किंवा त्याच्या धोरणांवर टीका केलेली त्याला मुळीच सहन होत नसे. दररोज शेकडो लोकांना साखळदंड बांधून, बेड्या ठोकून दरबारात आणलं जाई, मग त्यांना फासावर लटकावलं जाई, त्यांचे प्रचंड हालहाल होत किंवा त्यांना मारहाण होत असे. त्यांत मुसलमान होते आणि हिंदूही होते.’

परंतु हे अर्थातच त्याला नंतर प्रत्यक्ष अनुभवल्यावरच कळलं.

तुर्कस्तानातून येऊन दिल्लीपर्यंतच्या भागावर कब्जा केलेले हे सुलतान सुरक्षित नव्हते. भारतातील बहुसंख्य हिंदू त्यांच्याविरुद्ध बंड करून उठत असत. तसंच उत्तरेकडून येणाऱ्या मंगोल टोळ्यांचाही त्यांना धोका होता. ह्या सर्वांचा पाडाव करण्यात आणि त्यांना सिंधू नदीच्या पलीकडे पळवून लावण्यात दिल्लीच्या सुलतानांची शक्ती खर्च होत होती.

परंतु मुस्लीम राज्यकर्त्यांची पकड हिंदुस्थानावर हळूहळू बसू लागली, तेव्हा हिंदूंनी धर्मांतर करून मुसलमान बनण्यास सुरुवात केली आणि त्यांना नव्या सरकारमध्ये प्रतिष्ठेची पदंही मिळू लागली. मुस्लीम धर्म स्वीकारण्यातला आर्थिक फायदा त्यांना कळू लागला. कारण मुस्लीम बनल्यावर कर कमी भरावे लागत होते आणि प्रगतीची संधीही अधिक मिळत होती. परंतु खेड्यापाड्यांतली जनता मात्र हिंदूच होती. त्यांना कर भरावे लागत असले, तरी त्यांचं पूजाअर्चा करण्याचं स्वातंत्र्य अबाधित होतं. राज्यावरची आपली पकड मजबूत करण्यासाठी सुलतानाला मोठ्या संख्येनं काजी, विद्वान पंडित आणि अंमलदार हवे होते. शिवाय त्याची स्तुती करणारे लेखक, कवी आणि करमणूक करणारे कलावंतही हवे होते. ही पदं भरण्यासाठी सुलतान परदेशी लोकांकडे वळला, कारण त्याच्या मनात हिंदूंविषयी संशय होता. ते कधीही आपल्याविरुद्ध बंड करून उठतील अशी शंका होती. म्हणून तो त्या पदांवर परदेशातल्यांची नेमणूक करी आणि त्यांना भरपूर भेटी देई, पगार देई. त्यामुळे फारसी आणि तुर्की इत्यादी बरेच मुसलमान त्याच्या दरबारात गर्दी करत असत. त्या दरबाराची भाषाही फारसीच होती आणि उर्वरित देशापासून त्यांनी स्वतःला वेगळं करून ठेवलं होतं. ह्या अशा मोहम्मद बीन तुघलकाकडे बतुताला नोकरी हवी होती.

अशा माणसाकडे काम करणं धोक्याचं असलं, तरी त्याची बक्षिसीही अफाट होती. सन १३३४च्या अखेरीस इब्न बतुता दिल्लीत पोचला आणि आपण दिल्लीत राहू असा करार त्यानं केला. त्यानं हुशारीनं सुलातानसाठी बरेच उंट, तीस घोडे, बरेचसे गुलाम, बाण आणि अन्य वस्तू नेल्या. कारण सुलतान त्याला मिळालेल्या नजराण्यांची दामदुपटीनं परतफेड करतो, हे त्याला माहीत होतं.

साहजिकच त्याला २००० चांदीचे दिनार परतभेट म्हणून मिळाले, राहायला मोठं घर मिळालं. त्या वेळेस स्वतः मोहम्मद दिल्लीत नव्हता म्हणून त्याला त्याची वाट पाहत थांबावं लागलं. परंतु स्वारीवर असलेल्या तुघलकाला बतुताबद्दलचा खलिता मिळाला होता. त्यानं त्याला न भेटताच त्याची चांदीच्या ५००० वार्षिक दिनारांवर नेमणूक करून टाकली. दिल्लीजवळच्या दोन खेड्यांतून मिळणाऱ्या शेतसाऱ्यातून ती रक्कम बतुताला दिली जाणार होती. त्या काळची तीच पद्धत होती. त्या खेड्यांतले सर्वसामान्य हिंदू शेतकरी महिन्याला पाच दिनार एवढ्या रकमेत स्वतःच्या कुटुंबांचा गुजारा करत होते.

तुघलक जूनमध्ये परतला, तेव्हा बतुता आणि अन्य नवी मंडळी त्याला भेटायला नजराणे घेऊन गेली. सोन्यानं मढवलेल्या सिंहासनावर एक उंच, गोरा माणूस बसला होता. त्याविषयी बतुता लिहितो,

‘‘मी सुलतानाजवळ गेलो, त्यानं माझा हात हातात घेऊन हालवला आणि तो फारसी भाषेत स्वागतपर बोलू लागला, ‘तुमचं आगमन हा आम्हांला आशीर्वादच मिळाला आहे. इथं अगदी निवांतपणे राहा, मी तुमच्यावर बक्षिसांची अशी काही खैरात करीन की, तुमच्या देशबांधवांना ते कळलं तर तेही इथं येतील,’ तो असं बोलला की मी त्याच्या हातांवर ओठ टेकत होतो. अशा तऱ्हेनं मी एकूण सात वेळा त्याच्या हातांवर माझे ओठ टेकले. त्यानंतर त्यानं मला राजवस्त्रं दिली आणि मी मागे झालो.’’

दुसऱ्या दिवशी सुलतानाची दिल्लीतल्या रस्त्यांवरून मोठी मिरवणूक निघाली, तेव्हा हत्तींच्या पाठीवरच्या गोफणींतून सोन्याचांदीची नाणी जमलेल्या प्रेक्षकांवर उधळली जात होती.

अशा तऱ्हेनं बतुता न्यायाधीश पदावर विराजमान झाला. त्याला फारसी भाषा चांगली अवगत नसल्यामुळे सुलतानानं त्याला दोन मदतनीस देऊन म्हटलं, ‘ते तुमचाच शब्द मानतील, सर्व दस्तऐवजांवर सह्याही तुमच्याच असतील.’ त्याशिवाय सुलतान आणि अन्य उमरावांसोबत तो शिकारीच्या मोहिमेवरही जाऊ लागला. अशा मोहिमांवर जाताना हत्ती, तंबू आणि पुष्कळ सेवक लागत. हळूहळू बतुताची जीवनशैली उधळी होऊन तो कर्जबाजारी झाला. परंतु उदार सुलतानानं त्याला कर्ज फेडण्यासाठी आणखी मोहरा दिल्या. त्यानं तर बतुताला ‘कुतुब अल दिन’चा मकबरा सांभाळण्याचं कामही दिलं. त्याच संकुलात कुतुबमिनारही होता. अर्थात त्या मकबऱ्याच्या डागडुजीसाठी लागणाऱ्या पैशांपेक्षा जास्त पैसे बतुता मागत असे आणि ते स्वतःच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी वापरत असे.

परंतु दिल्लीपासून १३०० किमी दूर दक्षिणेला एका सरदारानं बंड केलं आणि सुलतान म्हणून स्वतःची द्वाही फिरवली. त्यानंतरची अडीच वर्षं सुलतान लढाईवर होता. परंतु बतुता मात्र दिल्लीतच राहून न्यायदानाचं कार्य करत राहिला. त्यानं मकबऱ्याची देखभालही केली. परंतु ह्या काळात त्याला वतन म्हणून मिळालेल्या खेड्यांतून शेतसारा गोळा करणं अवघड गेलं कारण १३३५ साली उत्तर भारतात भीषण दुष्काळ पडला. त्याविषयी बतुतानं लिहिलं आहे की, ‘हा दुष्काळ जवळजवळ सात वर्षं चालला. हजारो लोक भुकेनं तडफडून मेले.’ त्यानं स्वतः काही गरिबांना दानधर्म करून त्यांचा जीव वाचवला.

दक्षिणेकडच्या स्वारीत पराभूत झालेला सुलतान दिल्लीला परतला. त्यामुळे दिल्लीजवळचे काही सरदारही बंड करून उठले. तुघलकाचं साम्राज्य खिळखिळं होऊ लागलं. ह्या वेळेस मात्र त्यानं योद्धा म्हणून आपलं शौर्य दाखवलं. बतुता ह्या सगळ्याचा साक्षीदार होता आणि त्यानं ते सर्व लिहूनही ठेवलं. तो म्हणतो की, ‘हत्तीच्या सुळ्यांना लावलेल्या तलवारींतून त्या बंडखोर नेत्यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले आणि त्यांना हवेत भिरकावून हत्तीच्या पायांखाली दिलं गेलं. हे सगळं होताना मोठमोठ्या तुताऱ्या, बिगूल आणि ताशे वाजत होते.’

असेच दिवस जात असताना एकदा बतुता स्वतःच संशयाच्या जाळ्यात अडकला. त्याचं असं झालं की, त्यानं दिल्लीतल्याच एका स्त्रीशी लग्न केलं होतं. तिच्यापासून त्याला एक मुलगीही झाली होती. परंतु त्याची बायको एका बंडखोर सरदाराची मुलगी निघाली. तिच्या वडिलांना सुलतानानं फासावर लटकावलं. तेही एक वेळ चाललं असतं परंतु त्याहून गंभीर समस्या अशी  उद्भवली की, बतुताची एका सुफी साधूशी मैत्री होती. ह्या साधूचं राजकारणाशी काहीही देणंघेणं नव्हतं. त्याला आपलं जीवन धार्मिकतेनं व्यतीत करायचं होतं. त्यानं सुलतानाच्या आज्ञा मानण्यास नकार दिला. त्यावर शिक्षा म्हणून सुलतानानं त्याच्या दाढीचा एकेक केस उपटून काढला आणि त्याला दिल्लीतून हाकलून दिलं. काही काळानं सुलतानानं त्याला दरबारात पुन्हा बोलावलं, तेव्हा त्या साधूनं पुन्हा नकार दिला, तेव्हा त्याला पकडून त्याचा भयंकर छळ केला गेला आणि सरतेशेवटी शिरच्छेद करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सुलतानानं त्या साधूच्या मित्रांची नावं मागितली. त्यात बतुताचं नाव होतं. त्यानंतर नऊ दिवस बतुता नजरकैदेत होता. आपल्यालाही ठार मारतील म्हणून तो खचून गेला होता. त्याबद्दल त्यानं लिहिलंय की, ‘मी ३३००० वेळा कुराणातील आयती म्हटल्या. पाच दिवस सलग उपास केला. सहाव्या दिवशी उपास सोडला आणि परत चार दिवस उपास धरला. सरतेशेवटी तो उपास फळास आला.’ ह्या काळात त्यानं आपल्या सर्व वस्तू लोकांना देऊन टाकल्या होत्या आणि भिकाऱ्याचा वेष परिधान केला होता. चार दिवसांनी त्याला दिल्लीबाहेरच्या एका गुहेत राहणाऱ्या साधूसोबत राहण्याची परवानगी मिळाली. तिथं तो जवळ-जवळ पाच महिने होता.

त्यानंतर बतुताला सुलतानानं पुन्हा राजवाड्यावर बोलावणं धाडलं. तो घाबरत घाबरतच परतला खरा, परंतु त्याचं स्वागत सुलतानानं खूपच आपुलकीनं केलं. आता आणखी संकटं झेलण्याचं त्राण बतुताच्या अंगी उरलं नव्हतं म्हणून सुलतान खुशीत आहे असं पाहून त्यानं सगळं धाडस गोळा करून त्याच्याकडे हाज यात्रेला जायची परवानगी मागितली. परंतु सुलतानानं बतुतासाठी काहीतरी वेगळंच योजलं होतं. बतुताला फिरायला खूप आवडतं, नवीन ठिकाणं पाहायला आवडतं; हे त्याच्या लक्षात आलं होतं, म्हणून चीनमधल्या मंगोल दरबारात आपला राजदूत म्हणून बतुतानं जावं, अशी आज्ञा त्यानं केली. त्याच्यासोबत सुलतान १५ चिनी दूत देणार होता आणि तिथल्या सम्राटासाठी जहाजं भरभरून भेटवस्तूही देणार होता. आता मुहम्मद तुघलकपासून दूर जाण्याची सुवर्णसंधी बतुताला मिळाली होती, शिवाय मोठ्या थाटामाटात तो आणखी एक इस्लामी देशही पाहू शकणार होता. तो प्रस्ताव खूपच रोमहर्षक होता, शिवाय सुलतानाला नकार देणं धोकादायकही होतं.

कलकत्ता येथून इब्न बतुता दोन जहाजं घेऊन सफरीस निघाला. त्यांतलं एक जहाज मोठं होतं. त्यात चिनी सम्राटाला द्यायच्या भेटवस्तू भरल्या होत्या. लहान जहाजात बतुताच्या सगळ्या वस्तू होत्या. त्यांची जहाजं सुटणार त्या दिवशी शुक्रवार होता म्हणून तो नमाज पढायला गेला. त्याच संध्याकाळी मोठ्ठं वादळ आलं आणि मोठं जहाज पाण्यात बुडून गेलं.

लहान जहाजात बतुताचे नोकर-चाकर, रखेल्या, मित्रमंडळी आणि त्याचं स्वतःचं सामानसुमान होतं. ते जहाज मात्र वादळात भरकटत कुठेतरी गेलं. जहाज गेल्यामुळे बतुतापाशी नमाज पढण्यासाठी अंथरायची सतरंजी आणि अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक राहिले. केव्हातरी ही मंडळी आपल्याला भेटतील एवढीच आशा तो करू शकत होता.

अशा तऱ्हेनं त्याचा खडतर प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. त्याचं जहाज सुमात्रातील बिगरमुस्लीम राजाच्या ताब्यात गेलं आहे, हे त्याला नंतर समजलं. परंतु काहीही झालं तरी आपण चीनला जायचं, असं त्यानं ठरवलं होतं. परंतु वाटेत तो मालदीव बेटांवर उतरला.

मालदीव इथं त्याला मनमुराद स्त्रीसहवास मिळाला. आत्तापर्यंतच्या प्रवासात सहसा तो एका वेळेस एका स्त्रीशी विवाह करत असे आणि तिथून निघताना तिला घटस्फोट देऊन निघत असे. शिवाय दिल्लीत त्यानं काही रखेल्या किंवा अंगवस्त्रंही ठेवली होती. ह्या रखेल्या त्याला भेट म्हणून मिळत किंवा तो विकत घेत होता. परंतु मालदीव इथल्या एका बेटावर त्यानं चार स्त्रियांशी विवाह केला. ते कुराणसंमत होतं. त्याविषयी त्यानं आपल्या ‘रिहला’मध्ये लिहिलं आहे की, ह्या बेटांवर विवाह करणं सोपं होतं कारण इथं स्त्रीला द्यावा लागणारा मेहेर कमी होता, तसंच विवाह केल्यामुळे इथल्या समाजात मिसळून जाणं सोपंही होत होतं. इथल्या बेटांवर जहाजं आली की त्यावरील खलाशी तिथल्या स्त्रियांशी विवाह करत आणि मालदीव सोडून जहाजं पुढे निघत, तेव्हा ते आपल्या बायकांना तलाक देत. ही तात्पुरती लग्नव्यवस्था होती कारण ह्या बेटांवरल्या स्त्रिया आपली बेटं सोडून कधीच जात नव्हत्या.

तिथून बतुतानं चीनचा प्रवास जारी ठेवला. परंतु त्याच्या ‘रिहला’मध्ये चीनविषयीचं लेखन केवळ सहा टक्के आहे. शिवाय ते इतकं अर्धवट आणि गोंधळात पाडणारं आहे की, काही विद्वानांना शंका वाटते की बतुता खरोखरच चीनला गेला होता की नव्हता? त्यांना वाटतं की हा पुढला भाग त्यानं थातूरमातूर रचून लिहिलेला आहे. त्यानं दावा केलाय की, तो पार बिजिंगपर्यंत गेला होता. परंतु ते वर्णन तर फारच अंधुक आहे. त्यामुळे तो कदाचित क्वानझाऊपर्यंत गेला असावा. ते काहीही असलं तरी त्यानं लिहून ठेवलं आहे की,‘चीनमध्ये जे काही पाहिलं ते मला समजून घेता आलं नाही. कारण त्याच्या ओळखीच्या मुस्लीम जगताचा ते भाग नव्हतं, शिवाय त्यांची भाषा, चालीरिती सारंच वेगळं होतं. त्यानं त्याविषयी लिहिलं आहे, चीन सुंदर होता, पण त्यामुळे मला आनंद झाला नाही. मूर्तीपूजेनं आणि जुनाट धर्मानं त्या लोकांना ग्रासून टाकलं आहे, ते पाहून मला खूप खेद झाला. मी फिरायला धर्मशाळेबाहेर पडलो की मला खूप विचित्र गोष्टी दिसायच्या. त्यामुळे मी इतका बेचैन झालो की कारणाशिवाय खोलीबाहेर पडेनासाच झालो. मात्र कुठे मुसलमान दिसले की मी माझ्या घरच्यांनाच भेटतो आहे असं मला वाटायचं.’

बतुता १३४९ साली घरी, टॅन्जियरला परतला. पोचल्यापोचल्या त्याला आईच्या कबरीचं दर्शन घ्यावं लागलं कारण तो घरी पोचण्याच्या काही महिने अगोदर प्लेगच्या साथीनं तिचा बळी घेतला होता… परतताना वाटेत दमास्कसलाच त्याला कळलं होतं की, आपले वडील पंधरा वर्षांपूर्वीच निवर्तले. तो टॅन्जियर इथं अगदी थोडा काळ राहिला आणि तिथून पुन्हा उत्तर आफ्रिका, स्पेन आणि माली (पश्चिम आफ्रिका) ह्या प्रवासासाठी बाहेर पडला.

तिथून तो १३५४ साली पुन्हा मायदेशी परतला, तेव्हा त्याचं प्रवासवर्णन लिहिण्यासाठी स्थानिक सुलतानानं इब्न जुझाय नामक एका तरुण साहित्यिक पंडिताची नेमणूक केली. दोन वर्षं खपून त्या दोघांनी ‘रिहला’ हे प्रवासवर्णन लिहिलं. बतुताची स्मरणशक्ती खूपच चांगली होती. परंतु तरीही काही तारखांबद्दल आणि माहितीबद्दल त्यानं घोळ घातला आहेच.

इब्न बतुताला सांस्कृतिक धक्के खूप बसले. नव्यानं मुस्लीम धर्मात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या प्रथा त्याच्या कर्मठ मुसलमान पार्श्वभूमीशी जुळणाऱ्या नव्हत्या. तुर्की आणि मंगोल स्त्रियाचं वागणं आणि मोकळेपणानं बोलणं पाहून तो आश्चर्यचकितच झाला होता. मालदीव आणि सहारा वाळवंटातली कपडे घालण्याच्या पद्धती शरीर पूर्ण झाकून घेणाऱ्या नव्हत्या.

त्यानं आपल्या प्रवासवर्णनात वेगवेगळे खाद्यपदार्थही सांगितले आहेत. दिल्लीच्या सुलतानाच्या शाही भोजनात नान आणि बोकडाचे मटण असे. तुपात भिजलेल्या आणि बदाम-मधाचं सारण असलेल्या पोळ्या असत. मटण तुपात शिजवत, त्यात कांदे आणि हिरव्या मिरच्या, आलं असा मसाला असे. बतुतानं सामोशाचंही वर्णन केलं आहे. पण त्याला तेव्हा ‘सांबुसाक’ असं नाव होतं. त्याशिवाय चिकन बिर्याणी, गोड पक्वान्नं, खिरी अशाही पदार्थांबद्दल त्यानं लिहिलं आहे. जेवणापूर्वी ते लोक सरबत पीत आणि जेवण झाल्यावर बार्लीचं पाणी पीत. त्याशिवाय त्यांच्यात विडे खायचीही प्रथा होती असं बतुता म्हणतो.

तो भारताविषयी लिहितो की, ह्या देशात वर्षातून तीन वेळा भाताचं उत्पादन घेतलं जातं. आंबा, ओलं आलं आणि मिरी ह्यांचं लोणचं, फणस, संत्री, गहू, छोले, तूर अशा पदार्थांबद्दल त्यानं लिहिलं आहे. इथं तीळ आणि ऊस यांचंही उत्पादन होतं. भारतीय लोक सकाळच्या नाश्त्याला पेज खातात, ही पेज त्याला विशेष आवडली होती.

पुस्तक लिहून झाल्यावर त्यानं न्यायाधीशाची नोकरी स्वीकारली. प्रवास थांबवले तेव्हा त्याचं वय पन्नासही नव्हतं, परंतु त्याच्या नंतरच्या जीवनाबद्दल काहीच माहिती नाही. त्यानं पुन्हा लग्न केलं असावं आणि त्याला मुलंही झाली असावीत. तो १३६८ किंवा १३६९ साली मरण पावला. परंतु त्याचं मृत्यूचं ठिकाण आणि कबरीचं ठिकाण अज्ञातच राहिलं.

सुरुवातीच्या काळात मार्को पोलोच्या प्रवासांचा जेवढा प्रभाव जगावर पडला, तेवढा प्रभाव बतुताच्या प्रवासांचा पडला नाही, कारण त्याचं प्रवासवर्णन अरबीत होतं. परंतु १९व्या शतकात त्याच्या प्रवासवर्णनाचं फ्रेंच आणि इंग्लिश भाषांत भाषांतर झालं. आणि त्यानंतर त्याच्या प्रवासवर्णनाला महत्त्व मिळालं.

मार्को पोलोचं प्रवासवर्णन आणि इब्न बतुताचं प्रवासवर्णन ह्यांची तुलना करता काय दिसतं? दोन्ही प्रवासी प्रसंगावधानी होते. दोघांनी नवनव्या अनुभवांचा आनंद लुटला, दीर्घ प्रवास करून परत घरी येण्यासाठी लागणारी चिकाटी आणि अविचल धैर्य त्यांच्या अंगी होतं.

तरीही दोघांमध्ये पुष्कळ फरकही होते. इब्न बतुता शिकलेला होता, वेगवेगळ्या समाजांत वावरलेला, लोकांना धरून राहणारा होता, वरिष्ठ कुळातून आलेला हा तरुण त्याच्या ओळखीच्या मुस्लीम जगतात फिरला. जिथंजिथं गेला तिथं त्याला समविचारी लोक भेटले. परंतु पोलो हा व्यापारी होता, त्याचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं, त्यानं विचित्र, अनोळखी अशा संस्कृतींचा प्रवास केला. तिथं गेल्यावर त्याला पोशाख करण्याच्या, बोलण्याच्या आणि वागण्याच्या नव्या पद्धती कळल्या. इब्न बतुता स्वतःविषयी, भेटलेल्या लोकांविषयी आणि त्यानं स्वीकारलेल्या पदांविषयी सांगतो तर मार्को पोलो निरीक्षण करून मिळालेली अचूक माहिती सांगण्यावर भर देतो. ते काहीही असलं, तरी सातशे वर्षांपूर्वी आतंरखंडीय प्रवास  करणाऱ्या दोन लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्याला वाचायला मिळताहेत हे आपलं केवढं भाग्य!

सविता दामले

11133813_10204469811368941_1463938549453490042_n

इ-मेल – savitadamle@rediffmail.com

लेखिका, अनुवादक. अनेक पुस्तकं प्रसिद्ध. गुलजारांच्या पुस्तकांचा अनुवाद.

सर्व फोटो – इंटरनेट (विकीपीडिया फोटो – स्वामित्व हक्क त्या-त्या स्त्रोताकडे)

Advertisements

9 thoughts on “इब्न बतुता- एक पुरातन प्रवासी

 1. मस्त ! असा प्रवासी माहीतच नव्हता एक जिप्सी ऐतिहासिक फिरस्ता आम्हाला ओळखीचा करून दिल्या बद्दल आभारी आहे तसेच तुमच्या लेखनातून त्याकाळच्या जगाचे, संस्कृतीचे दर्शन होते आहे त्यामुळे जागतिक भूतकाळात आम्हाला फिरवून आणले तीही सफर अद्भूत!

  Like

 2. अतिशय छान माहितीपर वर्णन. जुन्या काळाची सफर एकदम झकास

  Like

 3. छान प्रवास वर्णन, त्याकाळातील मुस्लिम समाज व अापल्या हिंदुस्तानाविषयी वाचताना खूप कुतूहल होते ,पण अपल्या देश्यातील दक्षिणेकडील इतर राजानबद्दल काहीच माहिती नाही ,मिळाली..असो

  Like

 4. नावामुळे कुतूहल चाळवले आणि वाचत गेले . खूपच नवीन आणि मनोरंजक माहिती. मस्त!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s