ट्रॅव्हलिंग वेबसाइट्स अॅन्ड अॅप्स

विश्वास अभ्यंकर

यावर्षी जुलै महिन्यात स्पेनमध्ये जायचा योग आला. दहा दिवसांच्या सुट्टीमध्ये व्हॅलेन्सिया, माद्रिद आणि बार्सिलोना या ठिकाणी जायचं ठरलं. सगळी तयारी झाली आणि मी सामानासकट एअरपोर्टला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसलो आणि लक्षात आलं की माझ्याकडे बोर्डिंग पासची प्रिंटच नव्हती. स्वभावानुसार दोन-तीन मिनिटं पॅनिक होण्यात गेली आणि आता काय करायचं हा विचार सुरू झाला आणि एअरपोर्टला पोचेपर्यंत माझ्या हातात बोर्डिंग पास आलासुद्धा! आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं काय शक्य झालं? मला वाटतं की आजकालच्या ‘टेक्नो’युगात सगळं काही शक्य आहे. म्हणजे बघा ना मी ट्रेनमध्ये असताना मी ज्या एअरलाईननं प्रवास करणार होतो त्या एअरलाईनचं अॅप मी माझ्या फोनमध्ये डाऊनलोड केलं, माझ्या ई-मेलमध्ये माझा जो तिकीट बुकिंग रेफरन्स नंबर होता, तो त्या अॅपमध्ये टाकला आणि माझा बोर्डिंग पास माझ्या हातात होता! खरंच इंटरनेटनं आपल्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर गोष्टी किती सोप्या झाल्या आहेत नाही? त्यातलीच एक गोष्ट म्हणजे प्रवासाची तयारी आणि नियोजन.

प्रवास करणं किंवा ट्रॅव्हलिंग हा अनेक लोकांचा छंद असतो. परगावी असलेल्या नातेवाइकाकडे जाताना, निव्वळ भ्रमंती, कॅम्पिंगसाठी केलेला प्रवास, प्रसिद्ध ठिकाणं, प्रसिद्ध देश पाहण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी करतो तो प्रवास या तिन्ही प्रवासांमध्ये ओघानंच विविधता येते! परदेशात जाताना पासपोर्टचं आणि व्हिसाचं काम तर असतंच पण यांपैकी कुठलाही प्रवास करताना सगळ्यात आधी रेल्वे, बोट, बस, मेट्रो, ट्रॅम, विमान यांची तिकिटं काढणं, हॉटेल्स, हॉस्टेल्स, कॅम्पिंग-साइट्स या सगळ्यांची व्यवस्था करणं आणि बुकिंग करणं या गोष्टी आपण करतो. काही लोकांना या तयारीचं आणि नियोजनाचं दडपण येतं, पण मला मात्र हे नियोजन करण्यात किंवा त्यासाठी कुणालाही मदत करण्यात मजा येते. अशाच प्रवासासाठी उपयोगी आणि महत्त्वाच्या वेबसाइट्स आणि स्मार्ट-फोन अॅप्सबद्दल आपण माहिती घेऊ या.

कुठेही फिरायला जाताना आपण अनेक वेळा वेगवेगळ्या जागांविषयीची माहिती पुस्तकांमध्ये किंवा आजकाल तर सरळ Google वर शोधतो, वाचतो आणि मगच एखादी जागा निश्चित करतो. जाणार त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या वास्तू, किल्ले, राजवाडे, संग्रहालयं, रेस्टॉरन्ट्स, हॉटेल्स अशी सगळ्याबद्दलची माहिती आपण आधी मिळवतो. इंटरनेटचा सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे एखादी विमान सेवा किंवा हॉटेल किंवा रेस्टॉरन्ट्स निवडताना त्या सेवेबद्दल, जागेबद्दल, तिथं मिळणाऱ्या सुविधांबद्दल आपल्याला माहिती मिळते, लोकांची त्याबद्दलची मतं आणि त्यांनी दिलेली रेटिंग्स (stars/ratings) आपल्याला जाणून घेता येतात, त्याबद्दलची सत्यता पारखता येते आणि खातरी करून घेता येते. अशा प्रकारे खातरी करून मगच बुकिंग केलेलं बरं! यांमध्ये सर्वांत पहिली आणि सर्वांत जास्त उपयोगाची वेबसाईट आणि अॅप म्हणजे TripAdvisor. या वेबसाईटवर जगातल्या कुठल्याही ठिकाणची खास हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, पब्स, बार, कॅफे, संग्रहालयं, अनोख्या मनोरंजक गोष्टी, उत्तम सेवा देणाऱ्या एअरलाइन्स, किफायती टूर्स या सगळ्याबद्दल आणि इतरही खूप माहिती मिळते; लोकांची मतं जाणून घेता येतात ज्यामुळे एखादा निर्णय घ्यायला मदत होते. इतकंच नाही तर समजा तुम्ही एखादं ठिकाण निश्चित केलं असेल आणि तिथं किती वेळ, किती दिवस घालवायचे हेही ठरलं असेल, पण त्या वेळाचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करायचा, हे तुम्हाला कळत नसेल; तर TripAdvisor वर अनेक वेळा लोकांनी त्यांच्या आयटिनररीज दिलेल्या असतात ज्यांचा फार सुंदर उपयोग तुम्हांला करता येतो आणि तुमची सहल फार छान होऊ शकते. म्हणजे मी जेव्हा माद्रिदला जायचं निश्चित केलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की; मला फक्त एकच पूर्ण दिवस तिथं फिरता येईल. मग त्या वेळात जास्तीत जास्त गोष्टी कशा पाहता येतील यासाठी मी TripAdvisor वर ‘One day in Madrid’ अशी आयटिनररी शोधली आणि ती जवळ-जवळ ६०% तशीच्या तशी वापरली. आमचा माद्रिदमधला दिवस फारच मस्त गेला. ब्रेकफास्टला कुठल्या दुकानात/हॉटेलमध्ये किती वाजता जा म्हणजे काय काय मिळेल आणि काय नक्की खाऊन बघा, कुठल्या संग्रहालयाला नक्की जा असं सगळं त्या आयटिनररीमध्ये वाचलं असल्यामुळे सगळं काही बघता आलं, खाता आलं. ते जर माहीत नसतं तर आमचा निम्मा वेळ शोधाशोध करण्यामध्येच गेला असता.

अशाच प्रकारे बऱ्याच वेळा Google ratings चा उपयोग होतो. तुम्हाला हव्या त्या जागेचं, गावाचं, देशाचं नाव टाईप करून तिथं बघण्यासारख्या जागा, करण्यासारख्या गोष्टी यांबद्दल माहिती मिळू शकते आणि इतर लोकांनी दिलेल्या रेटिंगवरून, अभिप्रायांवरून ती जागा बघायची का किंवा तो पदार्थ खाऊन बघायचा का असे छोटे-छोटे निर्णयही पटकन घेता येतात. आम्ही बार्सेलोनामध्ये प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्रांचं संग्रहालय बघायला गेलो होतो. त्याचं तिकीट बुक करताना त्या संग्रहालयाच्या वेबसाईटवरून तिकीट बुक केलं. दर रविवारी त्या संग्रहालयामध्ये मोफत प्रवेश असतो. ही माहिती त्या वेबसाईटवरही होती, पण म्हणूनच रविवारचा टाईम स्लॉट बुक करताना त्रास होईल असं वाटत नव्हतं. काहीतरी गोंधळ झाला आणि घाईघाईत मी वेगळ्या दिवसाचं तिकीट बुक केलं. त्यानंतर Google ratings बघताना आणि प्रत्यक्ष बार्सेलोनामध्ये गेल्यावर कळलं की, रविवारी मोफत प्रवेश असतो त्यामुळेच कदाचित रविवारचं तिकीट मला काढता येत नव्हतं. त्या संग्रहालयामध्ये फिरत असताना माहिती मिळाली की बार्सेलोनामध्ये Els Quatre Gats नावाचा एक कॅफे आहे जिथे पिकासो आणि त्याचे समकालीन मित्र वरचेवर भेटत असत. मग मनात आलं की वेळ आहे तर तो कॅफेपण बघू या. लगेच Google Maps वर त्याचा पत्ता शोधून तिकडे जायला लागलो; पण एव्हाना दुपारही झाली होती आणि भूकही लागली होती म्हणून त्याच कॅफेच्या आसपास खास स्पॅनिश खाद्यपदार्थ असणारं एखादं रेस्टॉरन्ट आम्ही शोधत होतो. Els Quatre Gats च्या बाजूलाच Melic del Gòtic नावाचं रेस्टॉरन्ट आहे. त्याचं रेटिंग ५ पैकी ४.२ दिसलं. त्याला १९२ लोकांचे अभिप्रायही मिळाले होते. म्हणजेच खूप लोकांनी त्या रेस्टॉरन्टला पसंती दाखवली होती. म्हणून मग आम्हीही तिथंच जेवायला गेलो आणि जेवून आणि अतिशय तृप्त होऊन तिथून बाहेर पडलो.

कुठल्याही लांबच्या प्रवासाची तयारी करताना पहिला प्रश्न असतो तो विमान प्रवासाचं नियोजन करण्याचा. विमानांची तिकिटं बुक करत असाल तर Skyscanner आणि Kayak या वेबसाइट्स आणि त्यांची अॅप्स अतिशय उपयोगाला येतात. Skyscanner वर विमानांचे अनेक पर्याय अगदी तुमच्या सोयीनी तुम्हांला निवडता येतात आणि Kayak वर हॉटेल बुकिंगची सोयही दिली जाते. MakeMyTrip हीदेखील अशीच एक वेबसाईट आहे ज्याद्वारे आपण फ्लाईट बुकिंग्स करू शकतो आणि इतकंच नाही तर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक सवलतीही आपल्याला इथं मिळू शकतात. याशिवाय हॉटेल्स, बस, कॅब्स किंवा टॅक्सीसुद्धा तुम्ही या साईटवरून बुक करू शकता. ग्राहकांना अतिशय वाजवी दरानं सर्वोत्तम सोयी प्राप्त होतील याची MakeMyTrip खातरी देते. त्यांच्या वेबसाईटवर अनेक आकर्षक ऑफर्स असतात ज्यामुळे कमी खर्चात उत्तम सोयी आपल्याला मिळतात. त्यांचा एक ट्रॅव्हल ब्लॉगदेखील आहे, जिथे त्या-त्या मोसमासाठी फिरायला उत्तम अशा ठिकाणांची माहिती तुम्हाला मिळते. सर्वसाधारणपणे अशा सर्वच वेबसाइट्स आणि अॅप्स यांमध्ये एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा आणि परतीचा संपूर्ण प्रवास तुम्ही प्लॅन करू शकता. जर एकापेक्षा जास्त ठिकाणी प्रवास करणार असाल तर Multiple Destinations असा पर्याय पण असतो. त्यामध्ये हव्या त्या शहरांची नावं लिहून तुम्हांला सोयीच्या फ्लाइट्स बघता येतात. तुमची प्रवासाची निश्चित तारीख ठरली नसेल तरी हरकत नाही, कारण Variable Dates या पर्यायाचा वापर करून किंवा कोणत्या महिन्यात तिकिटांचे दर कमी आहेत याचा अंदाज घेऊन प्रवासाच्या तारखा तुम्ही निश्चित करू शकता. हे कमी की काय म्हणूनच आता बहुतेक सर्व वेबसाइट्सवर तुमच्यासाठी एक खास सोय उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे E-mail Alerts. म्हणजे तुम्ही काही तारखांना प्रवास करायचा विचार करत असाल, पण ‘तिकिटांचे दर कमी झाले की करू बुक’ अशा विचारात असाल तर या अॅलर्ट्समुलळे दर कमी झाले की लगेचच एक E-mail तुम्हांला पाठवली जाते आणि मग तुम्ही तिकिटे बुक करू शकता. TravelGuru तर्फे वीक-एन्ड सहली किंवा अगदी आयत्या वेळी मिळणाऱ्या सहली आणि सवलती बघायला विसरू नका. प्रवासासाठी अनेक ऑफर्स तुम्हांला या वेबसाईट्सवर मिळतील.

हॉटेल बुकिंगसाठी भारतात आणि जगभरातही सर्वांत पसंत केल्या गेलेल्या वेबसाइट्स म्हणजे Booking.com आणि Expedia. अनेक वेळा अतिशय स्वस्त दरात तुम्हाला हॉटेल्स बुक करता येतात. या साइट्सवर कधीपासून कधीपर्यंत राहायचं, किती लोक राहणार ते ठरवून अगदी चुटकीसरशी हॉटेल/हॉस्टेल बुक करता येतं. Booking.comचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे बुकिंग करताना तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसलं तरी हरकत नाही; हॉटेलमध्ये पोचल्यावर पैसे भरण्याची मुभा तुम्हांला मिळते. Expedia चाही एक ट्रॅव्हल ब्लॉग आहे जिथे अनेक स्थळांची माहिती तुम्हांला मिळू शकते. Hotel Reservation Service (hrs.com) ही वेबसाईटदेखील हॉटेल रिझर्व्हेशनसाठी चांगली आहे. Trivago वर वेगवेगळ्या ठिकाणच्या हॉटेल्सची तुलना करता येते. Youth Hostels Association of Indiaचं (YHAindia) आजीवन सभासद शुल्क केवळ रु. २०००/- ते रु. २०५०/- आहे. तुम्ही YHAचे सभासद असाल, तर भारतात आणि जगभरात YHA आणि Hosteling International च्या (HI) हॉस्टेल्समध्ये कमी दरामध्ये तुमची राहण्याची सोय होते. फक्त सभासद कार्ड घेऊन जायला विसरू नका! साल २०१० मध्ये आणि नंतर २०१४ मध्ये मी स्वतः, माझी बायको, माझे आई-बाबा आणि इतर काही नातेवाईक व मित्र आम्ही सर्वांनी या Youth Hostelsचा उपयोग करून घेतला आहे. त्या वेळी आम्ही पॅरिस बघायला गेलो होतो. YHA शिवाय hostelworld.com आणि hostelbookers.com या वेबसाइट्स वरूनसुद्धा हॉस्टेल्सच्या अनेक चांगल्या सवलती आपल्याला मिळतात.

गेल्या काही वर्षांत प्रचलित झालेल्या दोन वेबसाइट्स म्हणजे Airbnb आणि HomeAway. या दोन्ही वेबसाइट्सवर स्थानिक लोकांची घरं किंवा काही खोल्या भाड्यावर घेऊन राहायची संधी तुम्हाला मिळते. इतर हॉटेल्स किंवा हॉस्टेल यांपेक्षा अशा जागा अनेकदा खूपच स्वस्त किमतीत मिळतात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं जेवण स्वतः बनवायची सोय मिळते. वयस्कर किंवा डायट-रिस्ट्रिक्शन किंवा पथ्य असलेल्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय असतो. एखाद्या जागेचं बुकिंग केल्यावर ते बुकिंग रद्द करण्यासाठीची धोरणं प्रत्येक जागेची वेगवेगळी असतात आणि त्यानुसार तुम्हांला तुमचं शुल्क परत मिळतं. अनेकदा त्या जागांचे मालक जर तुम्हांला जागा देऊ शकत नसतील, तर बुकिंग केल्यावर लगेच किंवा काही दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत करतात. Incredible India च्या वेबसाईटवरून तुम्ही भारतात हॉटेल्स बुक करू शकताच, पण तुम्हाला फारसे पर्याय मिळत नाहीत. या सर्वच वेबसाइट्सद्वारे चलनामध्ये (currency) किंवा डॉलरमध्ये शुल्क भरण्याची सोय नक्की असते. या सर्व स्थानिक वेबसाइट्सचा अजून एक फायदा म्हणजे एखादं हॉटेल किंवा हॉस्टेल निवडताना किंवा एखादी जागा निवडताना ती जागा त्या गावाच्या किंवा शहराच्या कुठल्या भागात आहे, मुख्य रेल्वे स्टेशन, बस स्टेशन किंवा विमानतळ यांपासून किती दूर आहे, त्या जागेच्या आजूबाजूला कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणती दुकानं आणि रेस्टॉरन्ट्स आहेत, त्या जागेपासून त्या ठिकाणच्या प्रेक्षणीय स्थळांना कसं जात येईल, किती वेळ लागेल या सर्व गोष्टींची माहिती करून घेता येते आणि त्यानुसार आपल्या सहलीचं बजेट ठरवता येतं. भारतात आणि भारताबाहेर सुट्टी घालवायची संधी Club Mahindra कडूनदेखील मिळते. तुम्ही जर Club Mahindra चे सभासद असाल, तर त्यांच्या वेबसाईटवरून चार वेगळ्या मोसमांमध्ये अतिशय खास ठिकाणांची बुकिंग्स तुम्ही करू शकता. तुमच्या सभासदत्वाच्या स्वरूपानुसार आणि तुमच्याकडे जमा झालेल्या पॉइन्ट्सनुसार एखादं पॅकेज कुणालातरी भेट द्यायची सोयही Club Mahindra तुम्हाला देतं. सभासद शुल्क जरी महाग वाटलं तरी मिळणाऱ्या सोयी आणि सुविधा सर्वोत्तम असतात याची हमी तुम्हाला मिळते. बहुतांश वेळा या सर्व वेबसाइट्सवरून बुकिंग्स करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरावे लागतात अथवा त्याची हमी द्यावी लागते. यांपैकी बहुतेक सर्व वेबसाईट्सचं स्वतःचं अॅप आहे. या अॅप्सद्वारे आपल्याला त्या-त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या सवलती, पॅकेजेस कळतात आणि बुकिंग्ससुद्धा करता येतात.

 भारतात जरी प्रचलित नसलं, तरी जगात अनेक ठिकाणी त्या-त्या शहरासाठी आवश्यक आणि उपयोगी अशी Route Planner अॅप्स आणि वेबसाइट्स असतात. त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध असलेली ट्रेन, बस, मेट्रो, ट्रॅम, बोट, त्यांची वेळापत्रकं, यांपैकी काय वापरलं; तर तुम्ही लवकर पोहोचाल, कुठली ट्रेन/मेट्रो/बस/ट्रॅम बदलावी लागेल, किती वेळा आणि कुठून; ही सगळी माहिती अतिशय सुटसुटीत स्वरूपात मिळते आणि एखाद्या अनोळखी शहरात आपलं आपण फिरणं खूपच सोयीचं होतं. या नियोजनासाठीसुद्धा Google Maps वापरता येतं. शिवाय काही मर्यादित वेळांचे, म्हणजे २४-४८-७२ तासांचे पासेस मिळू शकतात, काही ठिकाणी ५-१० तिकिटांची बंडलं तुम्ही घेऊ शकता. बार्सिलोनामध्ये गेल्यावर आमच्या लक्षात आलं की तिथं ३ दिवसांचा पास महाग पडतो आहे मग आम्ही सरळ १० तिकिटांची बंडलं विकत घेतली आणि ते एक स्वस्तात मस्त काम झालं. या सगळ्यांबद्दलची माहिती मात्र त्या-त्या शहरांच्या स्थानिक परिवहन मंडळांच्या, रेल्वेच्या आणि पर्यटन मंत्रालयाच्या वेबसाइट्स वरून, शिवाय बहुतेक वेळा इंग्लिशमध्ये मिळू शकते.

 अनेकदा, विशेषतः अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी, बस, मेट्रो यांपेक्षा गाडीनं जाणं सोपं असतं आणि परवडतं. अशा वेळी इतर प्रवाशांबरोबर एका गाडीतून जाण्याचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. या प्रकाराला carpooling किंवा ride-sharing म्हणतात. यामध्ये जर कोणी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणार असेल, तर तो त्याची जाहिरात देतो आणि त्याच दिशेनं किंवा त्याच ठिकाणी तुम्हीही जाणार असाल, तर तुम्ही तुमची जागा त्या गाडीमध्ये बुक करू शकता. गाडी मालकाची खातरी केल्यावरच त्याची/तिची जाहिरात ग्राहकांना दाखवली जाते. इतर लोकांच्या मतांवरून आणि एकूणच गाडी-मालकाच्या आणि गाडीच्या विवरणावरून तुम्ही सुरक्षिततेची खातरी करून घेऊ शकता. BlaBlaCar.com, carpooling.com (युरोप), orahi.com (भारत), ZimRide, rdvouz.com (अमेरिका), jayride.co.nz (न्यूझिलंड), Noritomosan (जपान) ह्या काही वेबसाइट्स आहेत जिथून तुम्ही त्या-त्या देशामध्ये फिरताना गाडी बुक करू शकता. माझे २ मित्र बेल्जियममध्ये ब्रसेल्समध्ये राहतात. ते जेव्हा आमच्याकडे येतात, तेव्हा अनेक वेळा BlaBlaCar ची कार घेऊन येतात. ट्रेनचं तिकीट १५ युरो असेल, तर कारमुळे ७ युरो भरून ते आमच्याकडे येतात. त्यामुळे अनेकदा एकदम पॉश गाड्यांमधून त्यांची राईड झाली आहे. सोपा आणि किफायती पर्याय!

युरोपात सफर करायची असेल तर Rail Europe, GoEuro या वेबसाइट्स तुम्ही नक्की पडताळून पाहा. GoEuro मुळे एकाच वेळी रेल्वे, बस आणि विमान यांच्या तिकिटांची तुलना तुम्हांला करता येते आणि प्रवासाचं नियोजन करता येतं. जर तुम्ही कमी दिवसांत युरोपातल्या अनेक ठिकाणी फक्त रेल्वेनं प्रवास करायच्या विचारात असाल, तर EuRail pass नक्की वापरा, जर तुम्ही अनेक ठिकाणं फिरणार असाल, तर हा पास खूपच किफायती ठरतो. हा पास जवळ असेल, तर फक्त लांब पल्ल्याच्या किंवा रात्रीच्या रेल्वे प्रवासासाठी सीट रिझर्वेशनचे जास्तीचे (पासच्या किंमती व्यतिरिक्त) पैसे तुम्हांला भरावे लागतात आणि इतर वेळी एखादी ट्रेन पकडली की आत बसल्यावर तुमच्या पासमध्ये त्या ट्रेनची नोंद करायची की झालं! युरोपात रेल्वेला पर्याय म्हणून अनेक लोक बसनं प्रवास करणं पसंत करतात. ते बऱ्याचदा स्वस्तही असतं. त्यासाठी तुम्ही Flixbus, Megabus, Eurolines या कंपन्यांच्या बसेस वापरू शकता.

कुठलाही परदेश प्रवास करताना तिथं बघण्यासारखं आणि करण्यासारखं कायकाय आहे, हे आधीच माहीत असलेलं केव्हाही चांगलंच! त्यासाठी Lonely Planet ही माझी सर्वांत आवडती आणि जगभरात अतिशय प्रसिद्ध अशी वेबसाईट आहे. तिथं खरंच खूप माहिती मिळते. स्वस्त आणि मस्त हॉटेल्सपासून प्रत्यके ठिकाणच्या काही वैशिष्ट्यपूर्ण सफरींची इत्थंभूत माहिती त्या वेबसाईटमध्ये किंवा त्यांच्या गाइड्समध्ये दिलेली असते. काय करू नका, काय नक्की करून पाहा; हेही तुम्हांला कळतं. त्यांचं अॅपपण आहे ज्यामध्ये तुम्ही जाताय त्या ठिकाणची गाइड्स डाऊनलोड करून घेऊ शकता म्हणजे प्रवासात तुम्हांला इंटरनेट मिळालं नाही म्हणून तुमची गैरसोय होत नाही. यासारखीच, मात्र फक्त युरोपसाठी मर्यादित असलेली वेबसाईट आणि अॅप म्हणजे Rick Steve’s Europe. यांचे ऑडिओ गाइड्ससुद्धा फोनमध्ये डाऊनलोड करून घेता येतात. या वेबसाईटवर युरोपातल्या रेल्वे बुकिंग्सबद्दल माहिती, प्रवास करताना कमीत कमी सामानात तुम्ही कसं फिरू शकाल, हे सगळं अगदी छान सांगितलं आहे. त्यांच्याद्वारे युरोपातील बहुतेक सर्व ठिकाणी वॉकिंग टूर्स घेतल्या जातात. अशाच प्रकारच्या वॉकिंग टूर्स युरोपात Sandeman’s tours तर्फेदेखील घेतल्या जातात. Sandeman’sची खासियत अशी की इतरांसारख्या पैसे भरून करता येतील अशा त्यांच्या सहली तर असतातच, पण शिवाय मोफत सहलीही असतात. मोफत सहलीमध्ये ती सहल आणि तुमचा सहल गाईड आवडला (किंवा आवडली) तर त्याला (किंवा तिला) तुम्ही काही पैसे (टीप) देऊ शकता पण कुठलीही सक्ती नाही. याखेरीज युरोपात आणि जगभरात अनेक ठिकाणी वॉकिंग टूर्स घेणारे अनेक छोटे-मोठे ग्रुप्स आहेत. त्यांच्याबद्दल Google वरून आपल्याला माहिती मिळू शकते, फक्त तुमची चालायची तयारी हवी! ज्या ठिकाणी अनेक संग्रहालयं आहेत, अनेक प्रेक्षणीय गोष्टी, ठिकाणं आहेत त्या बहुतांश सर्वच ठिकाणी काही पासेस उपलब्ध असतात. त्या पासमध्ये अनेक तिकिटांवर सवलती मिळतात, अनेक ठिकाणी तिकिटाच्या रांगेत उभं राहावं लागत नाही. उदाहरणार्थ – Holland Pass, New York City Attraction Pass, Barcelona Card, Tokyo Sightseeing Pass इत्यादी. भारतात फिरताना उपयोगी पडतील अशी काही ई-बुक्स आणि AudioCompass तर्फे अनेक ऑडियो गाइड्स Incredible Indiaच्या वेबसाईटवर मिळतात. तुमच्या स्मार्ट फोनवर AudioCompass चं अॅप असलं म्हणजे झालं!

जगात कुठेही आपल्याला हव्या त्या ठिकाणचा छापील नकाशा मिळतोच आणि तो नसेल, तर हल्ली आपण Google Maps तर सर्रास वापरतोच, त्यामुळे चालत फिरणं अतिशय सोपं जातं. कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल पण Google नं पुरवलेल्या My Maps या सुविधेमध्ये प्रवासाला जायच्या आधी तिथल्या महत्त्वाच्या किंवा प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेऊन आपण आपला स्वतःचा नकाशा तयार करू शकतो. आणि ते जरी नाही केलं, तरी आपण जाऊ त्या ठिकाणचा नकाशा फोनमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतो. तो इंटरनेट नसले, तरी आपल्याला वापरता येतो (offline mode). मी असा नकाशा या वर्षी जूनमध्ये जेव्हा जर्मनीत ब्रेमेनला गेलो होतो, तेव्हा वापरला होता.

Google Now, Google Trips, TripIt या आणि अशा अनेक वेबसाइट्समुळे आणि अॅप्समुळे हॉटेल बुकिंग्स, तिकिटं ह्या गोष्टी फोनमध्ये एकाच ठिकाणी आणि सुटसुटीत ठेवणं सोपं झालंय. थोडक्यात काय, तर प्रवास करताना तुमच्या सोयीसाठी इंटरनेट आणि स्मार्ट फोन आता सज्ज आहेत फक्त तुमची तयारी हवी! कुठलीही वेबसाईट किंवा अॅप वापरताना तुमची नावं, प्रवासाचे ठिकाण, फ्लाईट बुकिंगसाठी कधी-कधी पासपोर्टची माहिती, हॉटेल/हॉस्टेल बुकिंगसाठी किती जण राहणार, किती दिवस राहणार ती माहिती द्यावी लागते. खरं तर तुम्हांला एवढीच माहिती लागणार असते आणि त्या साइट्स आणि अॅप्स यांचं डिझाईन (format) साधारण सगळीकडे सारखंच असतं त्यामुळे काहीच अवघड जात नाही. चला तर मग लागा कामाला आणि एका छान प्रवासाचा आणि सुट्टीचा आनंद घ्या!

———————————————————————————————————————-

विशेष टीप १: कुठलीही हॉटेल्स/हॉस्टेल्स बुक करताना किंवा विमानाची आणि रेल्वेची तिकिटं काढताना Incognito Window (Google Chrome वापरणाऱ्यांसाठी) आणि Private Session Window (Mozzila Firefox, Internet Explorer, Microsoft Edge, Safari आणि Opera browsers वापरणाऱ्यांसाठी) यांमधून तिकिटांची माहिती काढावी, त्यामुळे खरे दर कळतात.

विशेष टीप २: EuRail पासवर आणि इतर अनेक ठिकाणी Belgium-Netherlands-Luxemburg या तीन देशांचा सामूहिक उल्लेख Benelux असा केलेला असतो.

विशेष टीप ३: तुम्ही जर अगदी थोड्या दिवसांकरता Netherlands ला जाणार असाल, किंवा तुमच्या दोन flights मध्ये ७-८ तास असतील आणि तुम्ही Netherlands मध्ये असाल, तर KrisEuropeTours ही वेबसाईट नक्की बघा. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या टूर्स घेतल्या जातात.

विशेष टीप ४: युरोपात चालणं खूप होतं, पण तो अनुभव खूप खास असतो कारण तुम्ही कुठल्याही वाहनावर अवलंबून नसता.

——————————————————————————————————————–

सर्वसाधारण माहिती आणि अभिप्राय: Trip Advisor, Google, Lonely Planet

फ्लाईट तिकीट बुकिंग: Skyscanner, Kayak, MakeMyTrip, ClearTrip, TravelGuru

हॉटेल/हॉस्टेल बुकिंग: Booking.com, Expedia, Hotel Reservation Services (hrs.com), Trivago, Youth Hostels Association of India (YHAindia), Hosteling International (HI), Hostelworld.com, Hostelbookers.com, Airbnb, HomeAway

ट्रान्सपोर्ट: Rail Europe, GoEuro, Flixbus, Megabus, Eurolines, BlaBlaCar.com, carpooling.com (युरोप), orahi.com (भारत), ZimRide, rdvouz.com (अमेरिका), jayride.co.nz (न्यूझिलंड), Noritomosan (जपान), route planner, Google maps

गाइड्स: Lonely Planet, Rick Steve

——————————————————————————————————————–

विश्वास अभ्यंकर

7866-BCF_Linked_In

मूळचा पुण्याचा. पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. ‘मायक्रोबायोलॉजी’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅमस्टरडॅम’ मध्ये ‘मायक्रोबायोलॉजी आणि फूड सेफ्टी’ या विषयात पीएच.डी. सध्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ अॅमस्टरडॅम’मध्येच पोस्ट-डॉक्टरल रिसर्चर म्हणून काम करतो. संगीताची, वाचनाची, पर्यटनाची आणि फोटोग्राफीची आवड.

One thought on “ट्रॅव्हलिंग वेबसाइट्स अॅन्ड अॅप्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s