प्रवासलालसा (Wanderlust), सिंदबाद आणि वेडे प्रवासी…

परिणीता दांडेकर

प्रवासी कुणाला आवडत नाहीत. एक काळ होता, अगदी १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत, जेव्हा पृथ्वीच्या गुपितांचा खजिना आबाद होता. जागा नव्या होत्या, जग विखुरलेले होते, कुतूहल ताजे-कुरकुरीत होते. खलाश्यांच्या डोळ्यात तारे होते दूरचे… स्वप्नं होती… तिखट-मसाल्याची, अबलख घोड्यांची, कधीच न अनुभवलेल्या मखमली सुगंधांची (myrrh! frankincense!), झळझळीत रेशमाची, गुलाबकळ्यांच्या अत्तराची… नद्यांच्या उगमाची…

आणि त्यात काही वेडे पीर ज्यांना फक्त आपले जग समजून घ्यायचे होते. लालसा होती ७ वर्षांच्या लहान मुलाची, पोतेभरून प्रश्न होते.. राजू बन गया जंटलमनमध्ये शाहरुख म्हणतो तसे, “पैसा तो नही है, तमन्ना है इतनी बडी!”

रिचर्ड बर्टन निघाला इंग्लंडहून… तो- प्रवासी, लेखक, अभ्यासक, कवी, योद्धा, हेर, अशक्य प्रमाणात दारू चुटकीसरशी रिचवू शकणारा, येताजाता कोणालाही द्वंद्वासाठी आव्हान देणारा! कुठेकुठे नाही गेला.. पर्शियापासून भारत, अरब देश, आफ्रिका, ब्राझील. जेव्हा मक्केत युरोपियन सापडला तर देहदंडाची शिक्षा होती, तेव्हा १८५३ मध्ये, वेश पालटून, अफगाण बनून, शरीरात ‘गरजेचे’ बदल करून, डोळ्यांत सुरमा घालून मक्केत राहिला. या मुसाफिराला वाळवंट प्रिय आणि ब्रिटिश सोसायटी वर्ज्य. म्हणायचा वाळवंटात प्रवास करून, ‘Your morale improves… the hypocritical politeness and the slavery of civilization are left behind you in the city.’ त्याने त्यानंतर लिहिलेले Pilgrimage to El Mecca and Medina हे प्रवासवर्णन म्हणून कमी आणि तिखट साहस म्हणून जास्त खपले!

RichardBurton_WikimedianCOmmons
रिचर्ड बर्टन – विकीमीडिया कॉमन्स फोटो

सिंधमध्ये राहिला अस्खलित सिंधी बनून, हेर बनून. त्याच्या वरिष्ठांनी तिथल्या वेश्यागृहांवर त्याला रिपोर्ट लिहायला सांगितला, तर तो त्याने इतका सुरस, रंगीत आणि बारकाव्यांनिशी लिहिला की इंग्लिश ऑफिसर्सचे कान लाल झाले, मिशा विस्कटल्या! बर्टन अघोरी साधूंबरोबर भांग प्यायला, त्याने विविध तऱ्हांनी चरस ओढलं, अनेकानेक स्त्रिया अनुभवल्या आणि इतके करूनही शेवटपर्यंत लहान मुलासारखा निर्मळ, प्रश्नांनी पछाडलेला राहिला. अरेबियन नाईट्सचा अनुवाद केला. कामसूत्राचा अनुवाद केला. कामशास्त्र सोसायटीची स्थापना केली, अतिशय बुरसटलेल्या ब्रिटनमध्ये! २५ भाषा सहजी बोलायचा, मराठीपण. जानवे घालायचा कधीकधी गंमत म्हणून!

पूर्वेकडील लोकांना जे मागास समजत त्यांच्यावर हसायचा. म्हणायचा तुम्हीच मागास आहात, काय माहितीये तुम्हाला… हादेखील अट्टल प्रवाशांच्या एक स्वभाव… कक्षा रुंदावणे, जग रंगीत होणे, शहाणी-आनंदी समजूत येत जाणे.

इसाबेलबरोबर लग्न ठरल्यावर ब्रिटनहून जे निघाला ते पुढची तीन वर्षे तिला दिसला नाही. आफ्रिकेत अनेक हल्ले पचवले. गालात आरपार भाला गेला. देखणा व्रण मिळाला. टोकाची महत्त्वाकांक्षा. या आगीमुळे आंधळा होत कधी दुष्टासारखा वागला. पण तो पूर्ण बर्टन नाही, त्याचे एक वस्त्र फक्त.

आणि त्यानंतर जॉन हनिंग स्पेकबरोबर नाईल नदीचा उगम शोधत हिंडला. बर्टन जितका रसरशीत जिवंत तितकाच स्पेक शीतल-शांत, अबोल. आपल्यात हरवणारा. बर्टन आणि स्पेक नाईलचे मूळ शोधायला इतर मुसाफिरांप्रमाणे इजिप्तमधून वर नाही चढले. ते उतरले पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍यावर आणि तिथून टांझानियात गेले. वर्षभर अशक्य-अशक्य हाल सोसले… दोघांना डोळ्यांचे बिकट इन्फेक्शन झाले, स्पेक जवळजवळ आंधळा झाला, बर्टनला मलेरिया झाला, त्याचे पाय निकामी झाले, त्यांच्यावर अनेक हल्ले झाले… आणि इतके करून शेवटी दोघे आफ्रिकेतल्या सगळ्यांत मोठ्या Lake Tanganyikaच्या किनारी उभे राहिले! झाले! या महाकाय तळ्याच्या पल्याड नक्कीच नदी निघणार आणि नक्कीच ती नाईल!

पण पल्याड कोणतीच नदी नव्हती. नाईलचा उगम सापडला नव्हता.

दोघांचे इथून पुढे मात्र टिकले नाही. मोहीम हरल्याचा सगळा संताप, सगळी जहाल चिडचिड एकमेकांवर निघाली. बर्टन परत फिरला तर स्पेक तिथून अजून उत्तरेकडे निघाला आणि अद्भुत घडले. १८६२मध्ये स्पेकला लेक विक्टोरिया (त्यानेच आपल्या खडूस राणीचे नाव त्या सरोवराला दिले) सापडले. नाईलचा (White नाईलचा) जन्म जिथे होतो ती जादुई जागा, Diogenesच्या दंतकथेतल्या Mountains of the Moonजवळ! घुम्या स्पेकला हा आनंद अनावर झाला. त्याने याबद्दल अात्मप्रौढीने ओतप्रोत भरलेला असा एक पेपर लिहिला. ब्रिटिश ‘स्टिफ अपर लिप’ जनतेला तो भावला नाही फारसा.

इकडे बर्टनला स्पेकचे जिंकणे सोसले नाही. त्याने स्पेकची भरपूर बदनामी केली. त्यात सगळ्यांत ठळक होते म्हणजे स्पेक तुसडा, घुमा, कोरडा, बोरिंग, सेक्सलेस आणि आतल्या गाठीचा होता. शूर, सेक्सी बर्टनसमोर हा फिकट contrast कसा टिकणार? सरतेशेवटी नाईलच्या उगमाबद्दल बर्टन आणि स्पेक यांच्यामध्ये खुली चर्चा ठेवण्यात आली. स्पेक असा घडाघडा बोलणाऱ्यातला नव्हता. चर्चेच्या आदल्या रात्री तो गेला… स्वतःच्या पिस्तूलमधून गोळी सुटली होती… बर्टन कडू हसत म्हणाला,‘त्याने घाबरून आत्महत्या केली. नाईलचा उगम मीच शोधला, तो थापा मारतोय.’

Hormuzइराणमधील _जिथून सिंदबादच्या अनेक सफरींची सुरुवात झाली Source_Wikimedia Commons
इराणमधलं होर्मुस – जिथून सिंदबादच्या अनेक सफरींची सुरूवात होते. (फोटो – वीकीमीडिया कॉमन्स)

स्पेकने आत्महत्या केली असेलही. पण तो कोरडा नव्हता. अगदीच नाही. असे प्रवासी कधीच कोरडे नसतात. नसानसात वादळ भिनल्याशिवाय प्रवासी होताच येत नसावे. स्पेकचे मूळ पुस्तक फार कोणी वाचले नाही, ना त्याची पत्रे बर्टनसारखी जपली गेली. पण आता-आता कळते आहे की, स्पेक निग्रोंना घृणेने बघत नव्हता, अलिप्त नव्हता. त्याचे प्रेम होते एका १८ वर्षाच्या आफ्रिकन मुलीवर. ‘My true Venus’.  तिचे नव्हते… तिला सोडताना स्पेकने लिहून ठेवले, ‘तिला माहीतही नाही की, तिने मला पुरते संपवले आहे. असो. तिला माझी भाषा कळत नाही म्हणून असेल कदाचित…’

१८६० मध्ये ॲलफ्रिड वॉलस (Alfred Wallace) ब्राझीलला गेला. जीव परतपरत कलंदरासारखा धोक्यात घालत अमेझॉन नदीत हिंडला. नोंदी केल्या, चित्रे काढली, फुलपाखरांचा अभ्यास केला, माशांचा अभ्यास केला, लोकांशी बोलला. त्याची आवडती नदी मात्र रियो निग्रो… अमेझॉनची मोठी उपनदी, शाईसारख्या दाट काळ्या पाण्याची आणि डास नसलेली! आपल्या मित्राला तो लिहितो, “After the muddy, monotonous, mosquito-swarming Amazon, it was with great pleasure we found ourselves in the black waters- black as ink they are, and well deserve their name The Rio Negro!”

Wallaceने केलेला Amazonप्रवासाचा नकाशा Source ScienceforBrazil
वॉलसनं केलेल्या प्रवासाचा नकाशा – सायन्स फॉर ब्राझिलचा फोटो

चार वर्षे रिओ निग्रोवर प्रवास करत तो नदीबद्दल, तिच्यातल्या जिवांबद्दल खूप शिकला. खूप नमुने जमवले आणि आपला खजिना घरी घेऊन येताना त्याच्या बोटीने भर समुद्रात पेट घेतला. सगळ्या नोंदी गेल्या…तो एका लाकडी तराफ्याला १० दिवस कसाबसा चिकटून होता. परत आला आणि दोन वर्षांत मलाय बेटसमूह (archipelago) येथे गेला! परत अशक्य नवे अनुभव घेतले! नैसर्गिक रेशमी धागे इथे आणि अमेझॉनमध्ये त्याच्या हाती आले. पुढे ते डार्विनने फुलवले. हा मात्र कफल्लक राहिला. सदा कर्जात, वैतागलेला.

पण प्रवासाने यालादेखील वेगळेच घडवले… as if he listened to the drum beat of a distant drummer… त्याने ब्रिटनमध्ये आल्यावर समाजकारणावर पुस्तके लिहिली, त्याला जमीनदारी मान्य नव्हती, गुलामगिरी मान्य नव्हती. मानवी विकासाच्या कल्पनांमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कदाचित त्याने सर्वांत आधी बघितला आणि त्यावर पोटतिडकीने लिहिले, त्या वेळी त्याचे हसे झाले. अनेक समाज आणि त्यांची सांस्कृतिक श्रीमंती बघितलेल्या वॉलसला तेव्हाच मूळ धरू लागलेली सु-जननविद्या (eugenics) अजिबात मान्य नव्हती. तो म्हणाला: ‘Those who succeed in the race for wealth are by no means the best or the most intelligent …’. कक्षा रुंदावलेल्या वॉलसला त्या काळात अगदी जनमान्य असलेल्या कल्पना, जसे की स्त्रिया दुय्यम हेदेखील भंपक वाटे. तो स्त्री-मतदान हक्काचा खांदा समर्थक होता. अनेक चढाया बघितलेल्या वॉलसला युद्धे मूर्खांचा बाजार वाटत होती. उरलेले आयुष्य त्याने याविरुद्ध लिहिले.

वॉलसनं चितारलेला रिओ नेग्रो नदीतला मासा

याच्यासारखाच आफ्रिकेतल्या झाम्बेझी नदीचा शोध घेणारा लिव्हिंगस्टन (Livingstone). मिशनरी म्हणून आला, पण ते वेड लवकरच कमी झाले. मग नद्या शोधू लागला. हरवला. तापाने ग्रस्त झाला. झाम्बेझी नदी शोधताना ती कामगिरी अर्ध्यावर सोडावी लागली… होड्या पाण्यातून पुढे जात नव्हत्या, कारण व्यापाऱ्यांनी गुलामांच्या प्रेतांचा खच टाकला होता नदीत… तिथून त्यानेदेखील नाईल नदीचा उगम शोधायचे ठरवले… पण या प्रवासात समोर अमानुष कांड बघून शेवटी उगमाचा शोध सोडून दिला. एक वेळ अशी होती की, याला पिंजऱ्यात ठेवले होते, तिथल्या टोळ्यांच्या करमणुकीसाठी. शेवटी अनेक अनुभव येऊनही लिव्हिंगस्टन म्हणाला की, गुलामांचा व्यापार भयानक आहे. ती माणसेच आहेत आपल्यासारखी. त्यांचा बाजार करणारे आपण अमानुष आहोत, आपण रानटी आहोत.

त्यानंतर तो गायब झाला. ब्रिटनमध्ये काहीच बातमी नाही आणि मग १८६९मध्ये त्याच्या शोधासाठी पाठवले हेन्री मोर्टन स्टॅनली याला!

स्टॅनलीची गोष्ट आणखी वेगळी. तोदेखील असाच भटक्या.. adventurer, explorer… पण त्याच्या अस्थिरतेची कारणे लहानपणात. जन्मतः आईने नाकारले आणि वडिलांचा पत्ता नाही. त्याच्या जन्मदाखल्यावर बास्टर्ड लिहिले होते. जग ते विसरले होते, तो मोठा झाल्यावर, पण स्वतः स्टॅनली मात्र हे कधीच विसरला नाही. हादेखील आफ्रिकेत खूप फिरला. काँगो नदीचा समुद्रापर्यंतचा मार्ग याने धुंडाळला, त्यावर खूप लिहिले आणि मग टांझानियात डॉ. लिव्हिंगस्टन यांचा शोध घेत हिंडला. ते सापडल्यावर दोघेही मरणाच्या दारात असताना स्टॅनलीचे प्रसिद्ध वाक्य आहे; “ Dr.Livingstone, I presume.”

69053c27acdb23054c7539d64bc8096e--quotes-on-war-famous-quotesआणि सगळ्यांत कहर म्हणजे इसवीसनपूर्व ३२५ मधला तरुण वेडा राजा सिकंदर! कुठून कुठे आला. आधी घरून पळण्याची पौगंड-आशा उराशी घेऊन आणि मग त्याला घरी फिरायचेच नव्हते मागे. ज्यांना ग्रीकांनी अमानुष टोळ्या म्हटले, त्या टोळ्यांमधली माणसे याच्या स्वच्छ नजरेत समृद्ध, श्रीमंत, हसणारे-हसवणारे लोक होते! या जगात संस्कृती होत्या अनेक! आपलीच नाही फक्त! तो वेगवेगळ्या टोळ्यांबरोबर जेवायचा, त्यांचे कपडे ल्यायचा, त्यांच्याबरोबर मद्य घायचा. त्याची बायको रोक्साना ही बॅक्टेरिय म्हणजे अफगाणिस्तान-ताझिकिस्तान इथल्या प्रांतातली. तो क्रूरदेखील होताच. कारण नसताना त्याने अनेक-अनेक टोळ्यांना मारले, पण तेवढाच उत्सुकही होता. शेवटी त्याला पंजाबमधून मागे फिरायचे नव्हते, घरी, आईकडे जायचे नव्हते. पण पंजाबच्या नद्यांनी सैनिकांना असे बेजार केले की त्याला परत फिरावेच लागले. सैनिकांनी गंगेपलीकडच्या नंद साम्राज्याबद्दल, तिथल्या हत्तींबद्दल आणि मुख्य म्हणजे तिथल्या भल्यामोठ्या नद्यांबद्दल ऐकले होते. पाच नद्या जीव मुठीत धरून पार केल्यानंतर ते सैनिक गंगेचा विचारदेखील करू शकत नव्हते! सिकंदरने काही महिन्यांतच सिंधूवर तरंगणारे आरमार बांधले आणि पांढऱ्या शिडाच्या डौलदार होड्यांनी सिंधुसागराजवळ पोहोचला. घरी मात्र पोचला नाही राजा. यूफ्रेतीस नदीच्या तीरी टेकला तो संपलाच.

सियांग नदी_परिणीता दांडेकर
सियांग नदी – फोटो – परिणीता दांडेकर

मी ऐकलेली सगळ्यांत जादूची गोष्ट मात्र एका दार्जिलिंगमधल्या शिंप्याची. किंथूप त्याचे नाव. १९व्या शतकाच्या शेवटी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आणि जगातल्या अनेक नकाशाकारांना उत्सुकता होती की ब्रह्मपुत्रा येते कुठून? Yarlung Tsangpo नदी भारतात येते कशी? तीच सियांग होऊन मग ब्रह्मपुत्रा होते का? पण मग मधले एवढे मोठेमोठे डोंगर, नामचा-बारवासारखा अभेद्य सुळका ती कशी काय पार करते? ती पूर्वेला जाऊन इरावती तर होत नाही ना? ही सगळी उत्तरे शोधायला एका चिनी लामाबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्याने पाठवले किंथूप शिंप्याला! का, ती वेगळी गोष्ट. तेव्हा तिबेटमध्ये बाहेरच्यांना प्रवेश वर्ज्य. किंथूप आपला डोके खाली घालून चालत राहिला, मनात नोंदी घेत राहिला.. अशक्य नदी होती… अशक्य धबधबे होते… ५ किमी खोलीची दरी होती! आज याला ग्रँड कॅनियन म्हणतात आणि आजही हे बघणे म्हणजे भाग्याच आहे, इतका हा प्रदेश लपून राहिलेला आहे. इकडे लामाने मात्र किंथूपला फसवून तिथल्या मॉनेस्ट्रीमध्ये गुलाम म्हणून विकून टाकले. अनेक वर्षे किंथूप तिथे एकटाच राहिला आणि एकदा सटकला. आधी त्याने काय केले तर ५०० ओंडके गोळा केले (amazing na!) आणि त्यावर विविध चिन्हे कोरून त्यांना नदीत सोडले. ही ‘कोड भाषा’ त्याची आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची, हेन्री हार्मेनची. हार्मेनला किंथूपचे संकेत कळतील आणि तो आपल्याला सोडवायला येईल, या आशेवर किंथूप त्या अनोळखी जागी वाट बघतच राहिला, दोन वर्षे! त्याने एका विश्वासू माणसाहाती हर्मेनला एक पत्रदेखील पाठवले, आपला आणि नदीचा मार्ग सांगत!

किंथूपच्या प्रवासाचा मागोवा घेणारा नकाशा आरती कुमार राव यांच्या संग्
किंथूपच्या प्रवासाचा मागोवा घेणारा नकाशा आरती कुमार यांच्या परवानगीनं वापरलेला आहे.

पण हर्मेन आसाम सोडून ब्रिटनला कधीच गेला होता! सगळे जण ब्रह्मपुत्रेचे मिशन विसरले होते. पाठवलेले पत्र बंदच राहिले. किंथूपचे ओंडके एकटेच तरंगत राहिले.. Yarlung Tsangpo पासून सियांगमध्ये आणि तिथून ब्रह्मपुत्रेत… आजदेखील परीकथेतली वाटणारी त्यांची गोष्ट कोणीच ऐकली नाही.. किंथूप कसाबसा सुटला आणि चार वर्षांनंतर घरी आला. त्याने नंतर सर्व्हे ऑफिसमध्ये जाऊन आपली गोष्ट अनेकांना सांगितली… पण फाटक्या शिंप्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यानंतर १९१४ मध्ये H. M. Bailey यांनी हीच कामगिरी परत केली आणि किंथूपने सांगितलेले वाक्य-न्‌-वाक्य खरे ठरले!

यांच्यासारखाच लडाखमध्ये जायची भलती तीव्र मनीषा असलेला आणि मेघदूतातल्या एकेका नदीचे रसपूर्णच नव्हे तर शास्त्रीय विश्लेषण करणारा H.H. Wilson.

~~

सिंदबाद आणि त्याच्या सफरी_हंगेरियन पोस्ट तिकीट Source Wikimedia Commons
सिंदबाद आणि त्याच्या सपऱींच्या स्मरणार्थ हंगेरीनं काढलेलं पोस्ट तिकिट – वीकीमीडिया कॉमन्स फोटो

हे सगळे झपाटलेले, प्रवासी, भटके, न अडकणारे. सगळ्यांमध्ये समान दुवा म्हणजे त्यांना घरी स्वस्थ बसता येत नव्हते. आपल्या सिंदबादसारखे त्याला बगदादमध्ये करमत नाही कधी 🙂 प्रवासलालसा (wanderlust) जागांची, माणसांची, अनुभवांची. कलाकार हेच सारे आपल्या डोक्यात करत असतात कदाचित. सतत यात्रा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा

घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा..

सिंदबादची गोष्ट अरेबियन नाईट्समधली… बर्टनच्या शेवटच्या काळात त्याने हा अनुवाद हाती घेतला आणि त्यातल्या सगळ्या रंगेल, उसळणाऱ्या गोष्टी शांत इंग्लिशमध्ये लिहिल्या. जेव्हा ऑस्कर वाइल्डला गे असण्याबद्दल तुरुंगवास झाला होता, तेव्हा बर्टनच्या पुस्तकात त्यापलीकडचे बरेच काही होते! सगळ्यांना वाटले आता बर्टनला कठोर कारावास होणार… आणि असे पुस्तक कोण वाचते आहे ब्रिटनमध्ये!

याच पुस्तकाच्या विक्रमी प्रती खपल्या आणि वर्तमानपत्रांमध्येही याचे खूप कौतुक झाले! ढेपाळलेला बर्टन परत हिरो झाला होता!

त्याच्या सिंदबादच्या अनुवादात मला नेहमी बर्टन स्वतःच दिसतो! म्हणजे एक सफर झाली, अशक्य जिवावर बेतले, बेटा बगदादला परत आला, आणि थोड्याच दिवसांत जीव खालीवर होऊ लागला! वादळात अडकणाऱ्या गलबतावर नाही गेलो, तर कसं होणार माझं?? अगदी बर्टनचीच प्रतिमा! आपल्या शेवटच्या सफरीआधी सिंदबाद म्हणतो: ‘After my return from my sixth voyage, which brought me abundant profit, I resumed my former life in all possible joyance and enjoyment and mirth and making merry day and night; and I tarried some time in this solace and satisfaction till my soul began once more to long to sail the seas and see foreign countries and company with merchants and hear new things.’

मला त्यांच्या बायकांबद्दल नेहमी कुतूहल वाटते. प्रत्येक वेळा अनिश्चितता. पत्राची वाट आणि त्याची भीती. लिव्हिंगस्टनची बायको शेवटी त्याला शोधायला आफ्रिकेत आली आणि गेलीच. बर्टनची इसाबेल मात्र वेगळी. तल्लख. ज्या वेळी इंग्लिश बायका गाऊन आणि पेटीकोट याव्यतिरिक्त दुसऱ्या कशावर बोलत नसत, त्या वेळी तिने बर्टनने केलेला कामसूत्राचा अनुवाद वाचला आणि एका पार्टीत त्याच्यावर मोठ्याने चर्चा केली. तिथल्या पारंपरिक (Victorian) लोकांना झीट आली असेल :). बर्टन खरा प्रवासी. अनेक स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या, पण इसाबेलची जागा वेगळी. तो गेला तेव्हा तिने त्याच्या शेवटच्या पुस्तकाचे – The Perfumed Gardenचे हस्तलिखित जाळून टाकले. कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये, रिचर्डने लिहिलेल्या अर्ध्या शब्दातदेखील फेरफार करू नये म्हणून. लोकांनी तिला निष्ठुर म्हटले. ते वाचून मला सुनीताबाई आठवल्या :). कलंदरांना जगापासून जपणे किती अवघड काम…

तसं म्हणाल तर या नद्यांचे उगम, नद्यांचे मार्ग तिथल्या स्थानिक लोकांना माहीतच होते… भारतातच बघाल तर जवळजवळ प्रत्येक नदीचा उगम आपल्याला नुसता माहीत आहे असे नाही, तर तिथे अतिशय सुंदर मंदिरे आहेत, देवराया आहेत, त्याभोवती कथांचे झगमगते धागे आहेत. पण या सगळ्यांत एकट्या माणसाच्या महत्त्वाकांक्षेचा, ईर्षेचा, ठिणगीचा भाग, त्याच्या कथा कमी. अशा गोष्टी नाहीतच. सगळं एकतर राजाच्या सावलीत किंवा धर्माच्या सावलीत खुरटलेलं. नुसतीच साहसे आवडत नाहीत आपल्याला.

मग या वेड्या प्रवाशांच्या सगळ्या उठाठेवीने आपल्याला नवे ते काय कळले?

या एकाकी प्रवाशांनी रत्ने वाढवली ती आपल्या गोष्टींची, ज्ञानाची, एकमेकांबद्दलच्या कुतूहलाची, आपल्या वेगळेपणाची, सारखेपणाची, गीतांची, पुस्तकांची. हे प्रवासी खरंतर कलाकारच! यांनी सांगितले आहे की, डोळे उघडे ठेवल्यावर खूप काही दिसते. आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे, असे तेच म्हणतात ज्यांनी जग बघितलेले नाही अजून. घराबाहेर पडले की समृद्ध जग आहे समोर. त्यात आपण कल्पना केली नाही अशा गोष्टी आहेत… हिंस्र हत्ती आहेत, क्रूर रानटी माणसे आहेत, नदीच्या खोलखोल दऱ्या आहेत, डास आहेत, गुंगी आणणाऱ्या माश्या आहेत…पण वेगळ्या भाषेतली गाणी आहेत, सोन्याने उजळणारी नदी आहे, न बोलता हसणारे मित्र आहेत, पाहता क्षणी प्रेमात पाडणारी, आत्मनाश करणारी माणसे आहेत.. खजिना आहे खजिना!

समरकंदला उगीच नाही गेले मुसाफिर उंटावरून..

We travel not for trafficking alone;

By hotter winds our hearts are fanned:

For lust of knowing what should not be known

We take the Golden Road to Samarkand…

परिणीता दांडेकर

18920162_10154654000493061_3400172618982268584_n

इ-मेल – parineeta.dandekar@gmail.com

साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम, रिव्हर्स अँड पीपलशी संलग्न. नद्या आणि त्यांच्या इतिहास, भूगोल – कथा हे लेखिकेच्या आवडीचे विषय आहेत.

3 thoughts on “प्रवासलालसा (Wanderlust), सिंदबाद आणि वेडे प्रवासी…

  1. वा, परी, कुठेकुठे नेऊन आणलंय या साऱ्या विलक्षण प्रवाशांसोबत आम्हाला. लौ यू.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s