प्रवासातली पत्रं

माधवी भट

प्रिय अक्का,

अशा प्रकारे हा बहुप्रतीक्षित प्रवास सुरू झालाय. हे पत्र तुम्हांला मी रेल्वेत बसल्या बसल्याच लिहितेय. का कुणास ठाऊक पण मला निघतानाही तुम्हांला निरोप देणं फार जड जात होतं. म्हणूनच सगळे सी ऑफ करायला येणार होते, तेव्हा मी तुम्हाला नाही म्हटलं. मला ते नको होतं. मला माहीत होतं की सगळे टेक केअर, एंजॉय, काळजी घे, फोन कर, शॉपिंग कर, मजा कर वगैरे हजार सूचना करतील आणि तुम्ही फक्त निश्चळपणे बघत राहाल. आणि ते मला टाळता येणार नाही. अशा वेळी बोलायचं काय असतं? असा प्रश्न तुम्हीच वरून विचारला असता! आणि त्यावर माझ्यापाशी नेहमीप्रमाणे उत्तर नसतंच!

पण आता हा प्रवास सुरू होऊन गेल्यावर मात्र मला तुम्हीच खूप आठवत आहात. आत्ता स्वच्छ दुपार आहे. आमची जेवणं झालीत. गाडी कुठल्याशा गावात काही काळ थांबलीय. तुम्हाला कल्पना असेलच की मी प्रवास सुरू होताच सगळ्यांत वरच्या बर्थवर पथारी अंथरली आहे आणि पुस्तक, आयपॉड, फोन असा ऐवज घेऊन खालच्या जगाशी काडीमोड घेतला आहे. खाली सगळे जण पत्ते खेळतायत. बिग फूल! मला खेळायला यायचा आग्रह झाला. मात्र खाली उतरले असते तर माझी जागा कुणीतरी बळकावली असतीच. शिवाय आपल्या अंथरुणावर कुणी निजावं नि नंतर आपण पुन्हा तिथंच निजावं ते मला आवडत नाही. दुसरं हे की लोक फार भोचक असतात. काय वाचतेयस? काय ऐकतेस म्हणून उगा पुस्तक, आयपॉड वगैरे हुडकून बघू लागले की मला राग येतो. तिसरं कारण हे की, मी जरा पॉझिटीव्हली उतरणार होतेच खाली मात्र तेवढ्यात सुमन मावशीच्या मुलानं ‘तिला असू देत..ती सर्टिफाइड बिग फूल आहे..’ अशी थट्टा केल्यानं मी नाराज झाले. आता तुम्ही म्हणाल की, असं करू नये. सगळ्यांसोबत प्रवासाला आलोत तर मग सोबतच राहायचं. तर सांगते की, त्याआधी मी अगदी तीनेक तास बसून गाण्याच्या भेंड्या खेळले आहे म्हटलं! झालं समाधान?

तर अशा प्रकारे काल रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेला हा प्रवास उद्या सकाळी संपेल. काका म्हणाला त्यावर मी एकदा विचार केला होता की, काहीतरी काम आहे किंवा रजा नाही मिळाली असली थाप मारून डायरेक्ट विमानानं जायचं परवा…मात्र नंतर नको वाटलं. नातलग हा असा विचित्र प्रकार असतो अक्का की; ते हवेसेही असतात आणि नकोसेसुद्धा. म्हणजे हवेसे यासाठी की त्यांच्याशी आपले बालपणाचे बंध असतात आणि एक अदृश्य दुवा असतो बांधून ठेवणारा, तो बरेचदा सुसह्य असतो. शिवाय अजूनतरी आपल्या नातेवाइकांत जबाबदारी टाळण्याची वृत्ती बोकाळलेली दिसत नाहीय…म्हणून!

बरेचदा नसतो…यासाठी की, त्यांना आपल्याबद्दल कारण नसताना अधिकची माहिती असते आणि ते ती फार चुकीच्या रितीनं वापरतात म्हणून! तर ते असो!

तुम्हाला हे नव्हतं सांगायचं. मगाशी गाण्याच्या भेंड्या खेळताना खिडकीशी बसले होते. तेव्हा मला हटकून माधुरी आठवली. मी तुम्हांला माधुरीबद्द्ल कधी बोलले का माहीत नाही. माधुरी आमच्या परिचयातल्या एका कुटुंबात आश्रित म्हणून आली होती. आश्रित हा शब्द कदाचित तुम्हांला आवडणार नाही. मात्र अक्का, ती खरंच आश्रित होती. तिची अवस्था त्या घरातल्या लोकांनी त्याहून वेगळी केली नव्हती. माझ्यासोबतच शाळेत यायची. माझ्याच वर्गात होती. एकदा आम्ही सगळे… म्हणजे, आम्ही आणि आईच्या ऑफिसचे कर्मचारी असे मिळून दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो, तेव्हा माधुरी आमच्याबरोबर होती. हैदराबादेहून पुढचा प्रवास आम्ही रेल्वेनं करणार होतो. त्या वेळी खरं तर माधुरी आधी खिडकीशी बसली होती. मात्र मी जाऊन तिच्याशी भांडले की मला बसू दे…त्या भांडणात चुकून ती मला मारत असतानाच तिच्या काकूनं पाहिलं आणि तिनं सर्वांसमोर माधुरीच्या थोबाडीत मारली. झाला प्रकार सर्वांनी अगदी सुन्न होत पाहिला. मग कुणीतरी म्हणालं की जाऊ द्या मुलं भांडतातच. मात्र त्यानंतर माधुरी प्रवासभर इतकी शांत राहिली की, ती आहे की नाही हेही पुष्कळदा कळत नव्हतं. मला वेगळ्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं की, तिला माझ्यामुळे सर्वांसमोर विनाकारण मार बसला आणि त्यासाठी मी अजूनही तिला सॉरी म्हटलं नव्हतं. आम्ही चेन्नईला गोल्डन बीचवर गेलो असताना मी तिला सॉरी म्हटल्यावर ती मला हसून म्हणाली होती…‘यानंतर मी कधीच खिडकीशी बसणार नाही. हे मात्र नक्की.’

अक्का, आम्ही तेव्हा जेमतेम सहावीत वगैरे असू. मात्र तिच्यात हा निग्रही शांत स्वभाव कसा निर्माण झाला असेल ते मला कळत नव्हतं. ती माझ्याच वयाची असूनही माझ्याहून जराशी मोठी वाटे. शिवाय मला तिच्याबद्दल एक सूक्ष्म असूयाही होतीच. ती अशी की दर वेळी मी आणि ती एकच दृश्य पाहत असलो, तरी तिला त्यातलं काकणभर अधिक कळलं आहे, याची मला खातरी होती आणि ती खातरी मला तिचा चेहरा वाचूनच पटत होती. ते अधिक काय आहे? हे मी तिला कधीही विचारलं नाही. तिनंही कधी ते सांगितलं नाही. मात्र कधीतरी ती काहीतरी बोलून जाई की मला अचानक त्या अनुभवाची आठवण येई आणि कळे की हे तर माधुरीनं त्या दृश्याचे लावलेले अन्वयार्थ आहेत! माधुरी आणि मी एकाच कॉलेजात होतो. मात्र फर्स्ट इयरला असताना ती कॉलेज सोडून तिच्या आई-बहिणीकडे निघून गेली. त्यानंतर ती मला भेटली नाही. मात्र आजही मला अनेक प्रसंगांत ती आठवते, तशी आजही आठवली!

आत्ता जरा वेळ खाली येऊन बसलेय. सगळ्या बायकांना पाय मोकळे करायचेत. त्या फिरतायत खाली! खिडकीबाहेर लहानपणची पळती झाडे नाहीत. इतक्या आडवाटेचं अगदी शांत प्लॅट्फॉर्मचं गाव आहे की, मला इथंच उतरून जावं वाटू लागलं आहे.

असं वाटतं आपण आपलं गाठोडं घेऊन इथंच उतरावं आणि उतरून डोळ्यांत प्राण आणून वाट पहावी…कुणी विचारलं तर सांगावं -‘वाट बघतेय…मेहरू येणार आहे ना… तो इथंच सोडून गेलाय मला, येतो असं सांगून. हे पुनिया गावच आहे ना?’ ‘कुठं जायचंय?’ या प्रश्नावर आपल्याकडे एक गूढ स्मित असावं! कित्येकदा अमुक एखादी घटना घडून गेल्यावर ‘हे असं का अक्का?’ असं मी तुम्हाला वैतागून विचारते, तेव्हा तुम्ही हसता ना? तसं गूढ!

कुठं जायचं? या प्रश्नाचं उत्तर प्रवासाला माहीत असतं का आक्का? असायलाच हवं! मुक्काम काय, हे माहीत नसताना सुरू होणारा प्रवास फक्त आयुष्याचा आणि प्रेमाचा! आगाज पता है..अंजाम नही! असे अलौकिक प्रवास!

मेहरूची वाट पाहणाऱ्या लेकीन सिनेमातल्या रेवाचा प्रवास मला आत्ता आठवतोय! रेवाला फक्त तेवढं वाळवंट ओलांडून तिच्या गावी जायचं आहे. मात्र वाळवंटातल्या वादळात आणि राजाच्या सैनिकांच्या आक्रमणात ती अडकून पडली आहे. तिथंच गतप्राण झाली आहे आणि आता त्याच वाळवंटात ती वाट पाहतेय..मेहरू येणार…त्यासाठी ती मेहरूच्या पुनर्जन्माची वाट पाहतेय. तो आला की या जीवन-मरणाच्या रेषेवरून तिला पलीकडे सोडून देईल, म्हणजे सतत भटकत राहण्याची तिची वणवण तरी संपेल. तिला झोपेतही दिसत असणारा भूतकाळाचा रक्तरंजित, गडद दु:खद स्मृतींचा जाच तरी संपेल. मुक्तता मिळेल! काळाच्या पटावर कितीतरी जीव असेच ताटकाळत असतील का अक्का? ज्यांना त्यांच्या मनातल्या इष्टस्थळी पोचताच आलं नाही. तुमचा विश्वास आहे त्यावर? माझा त्या आत्मा प्रकरणावर नसला तरी त्यांच्या अर्धवट इच्छांवर नक्कीच विश्वास आहे. सततच्या उद्‌घोषणा, फेरीवाले, प्रवाशांची वर्दळ, गाड्यांचे कर्कश भोंगे आणि रंग भरताना सगळेच रंग एखाद्या धक्क्यानं विस्कटतात अशा चित्रासारखं शहरी स्टेशन कुठे आणि हे पराकोटीचं शांत स्टेशन कुठे! या गावात लोक राहत नसतील का? की त्यांना कुठंच जायचं नसेल? कुठंही जायचं नसलेली माणसं कशी असतील? त्यांच्या मनात धावत्या रेल्वे पाहून काय येत असेल, असं मला उगाच वाटू लागलं!

तुम्हाला आठवतं का, आपण दोघी एकदा गप्पा करत बसलो होतो आणि मी तुम्हाला प्रचंड ओशाळं होत एक फजिती सांगितली होती. इजाजत सिनेमा पाहिल्यावर जेव्हा मी प्रथमच वाईला गेले, तेव्हा बस-स्टॉपवरच्या रिक्षावाल्याला रेल्वे-स्टेशनवर सोडा असं सांगितलं आणि तो हसत म्हणाला होता, ‘इथं रेल्वे-स्टेशन नाहीय.’ आणि माझ्या मनात मात्र अशाच शांत स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये बसलेले रेखा आणि नसिरुद्दीन शाह होते! प्यासी हूँ मैं प्यासी रेहने दो…असं गाणारी रेखा होती! तुम्ही तेव्हा कसल्या हसत सुटलात! मी तुम्हाला इतकं हसताना प्रथमच पाहिलं होतं आणि त्या हसण्यानं मी जरा दुखावले आहे आणि गप्प बसले आहे, हे लक्षात येताच तुम्ही म्हटलं होतं, ‘कौतुक वाटलं मला…आपल्या मनात वस्तीला असणाऱ्या कल्पनेतल्याच का होईना, मात्र त्या ठिकाणाचा शोध तुम्हाला घ्यावासा वाटला! मी नसता घेतला…कारण असं काही नसतंच यावर माझा आता ठाम झालेला विश्वास..आणि तुम्ही अजूनही…असं असायला हवं… असेलच… असायला हरकत काय आहे… या सकारात्मक मानसिकतेत! हे जपायला हवं! काळ आपल्याकडून सावकाश हिरावून घेतोच हे सगळं… पण आत्ता जे आहे ते खरंच जपा…’ मला त्या बोलण्याचा केवढा म्हणून आधार वाटला होता अक्का! तुम्हाला कसं सांगू?

आता पुन्हा गाडी सुरू होतेय. मी वर माझ्या जागेवर जाऊन निजते. बाकी पत्र सावकाश लिहीन. आणि उद्या पोचल्यावर तिथूनच पाठवेन.

अक्का,

आत्ता संध्याकाळ झाली आहे. म्हणजे रात्रीकडे झुकलेली संध्याकाळ! आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप दंगा केला. चिडवाचिडवी! कुणाकुणाच्या नकला आणि काय-काय! खाणं तर विचारूच नका… मगाशी गाडी सुरू झाली तेव्हा भेळ… मग घरून आणलेला चिवडा-शंकरपाळी… ते संपत नाही तर काकड्या विकणारा आला. त्याच्याजवळ अगदी पोपटी आणि खूपच देखणे पेरू होते. काकड्या आणि पेरू हे डेडली कॉम्बिनेशन पाहून आम्ही निदान त्याचा अर्धा भार तरी नक्कीच हलका केला… मग सगळ्यांनी सरसावून मदत करायला घेतली. आपापल्या बॅगेतून सुऱ्या काढल्या, मी माझ्यासाठी एक अखंड पेरू घेतला… आणि तोच कचरकचर करत खाऊन घेतला. पेरू अत्यंत गोड होता.. काकडी जेवताना चिरायची म्हणून ठेवली. इतकं खाल्ल्यावर जेवायचं काय, असा प्रश्न माझ्या मनात आला खरा, पण सगळे म्हणतायत की हे बरोबर घेतलेलं इतकं उरलंय, ते कोण खाणार? म्हणून सध्या उशिरा जेवायचं ठरवलं आहे.

मगाशी काही फोटोपण काढले मात्र प्रवासात कव्हरेज नव्हतं त्यामुळे लगेचच पाठवता आले नाहीत. काही खास नाहीत, सहज खिडकीतून केलेले काही रँडम क्लिक्स आहेत. मात्र तरीही पत्राला पोषक ठरेल, ते-ते तुम्हाला पाठवायचं आहे. मगाशी खाल्लेल्या भेळेचा आणि काकड्या-पेरूंचा फोटोही धाडणार! कृपया हसू नये!!!!

मागे पुण्याला गेले असताना शरयूनं मला चार्जिंगवर चालणारा वाचनासाठी उपयुक्त असा नाइट लँप आणून दिला होता. तो आणला आहे आणि जुन्या सत्तरच्या दशकातल्या हिंदी सिनेमाच्या नायिका जशा नायकाच्या बेवफा होण्याचे किंवा त्यानं पत्रातून ‘तुम मुझे भूल जाओ’ लिहिल्यावर झालेल्या दु:खाचे सीन, धावत येऊन उशीत डोकं खुपसून डोळ्यातलं काजळ अजिबात ढळणार नाही आणि डोक्यावर कलाकुसर करून नटवलेलं चुंबळसदृश टोपलं जराही विस्कटणार नाही याची काळजी घेत पालथ्या पडून रडायच्या ना? मी अगदी तशीच तुम्हाला हे पत्र लिहितेय… (यावर तुम्ही नक्कीच हसता आहात…) शरयूनं दिलेला लँप लावला आहे. शम्मा जल रही है वगैरे…खाली काय दृश्य आहे म्ह्णून पाहिलं तर दुपारभर दंगा, गप्पा आणि फिदीफिदी हसणारे सगळे आत्ता पेंगतायत. खाऊन, दमून सुस्त झालेत! गप्पापण सावकाश होताहेत. मी इथं वर बसले म्हणून कुणी काही म्हणेल का, असा विचार आधी माझ्या मनात आला होता मात्र कुणीच काही म्हटलं नाही. उलट मामी वगैरे तर आनंदानं ‘हो’ म्हणाल्या! अशी समजूत वगैरे असणारे लोक्स प्रवासात सोबत असले की बरं वाटतं!

मगाशी पेरू आणि काकड्या घेतानाच अचानक भांडणाचा आवाज आला. आमच्याच कोचात कुठेसं भांडण होत असावं…कुणीतरी ओरडून भेकून शिवीगाळ करत होतं! मग सगळ्या बायका अचानक सावरून बसल्या…मी काकडी चिरून, त्यावर तिखटमीठ भुरभुरून प्लेट्स पास करण्याच्या महत्त्वाच्या कामगिरीवर होते…तेवढ्यात आमच्या कप्प्यात अचानक स्मशानशांतता पसरली. काय झालं हे कळत नव्हतं मात्र तेव्हाच माझ्या पायांना खाली उभ्या असलेल्या कुणीतरी आधारासाठी बर्थला धरल्यामुळे असेल, कुणाचातरी हात लागला… कोण आहे ते पाहिलं तोच ‘सॉरी दीदी…’ असं अगदी सावकाश, अदबीनं चटकन हात काढून घेत त्या व्यक्तीनं म्हटलं…कुरळ्या केसांच्या महिरपींचा अंबाडा, भडक चमकीच्या लाल रंगाचा ब्लाऊज आणि हिरवी-पिवळी अशा अजब रंगसंगतीची साडी, तसलाच भडक मेकप असलेला आणि कपाळावर ठसठशीत लाल कुंकू रेखलेला हिजडा होता तो… मात्र त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानं ते लगेच पालथ्या हातानं निपटून काढलं…मी त्याला ‘इट्स ऑल राईट’ म्हटल्यावर तो मंद हसला…पेरूची फोड दिल्यावर हसला. माझ्या हातावरच्या दोन फोडी उचलत खात खात… पुढं निघून गेला. त्याच्या डोळ्यातलं दुखलेपण मात्र मनावर ओरखडा उमटवून गेलं. विनाकारण त्याला चिडवलं असणार प्रवाशांनी! आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचं निखळ ‘असणं’का स्वीकारत नाहीत लोक? का त्याला आपल्या तर्‍हेनं घडवायचा आग्रह करतो आपण? आणि समजा ती व्यक्ती आपल्या नियमावलीत न बसणारी, वेगळी असेल; तर तिला त्याची टोकदार जाणीव करून देत डिवचून काढण्यात आपल्याला केवढी धन्यता वाटते! विचित्र आहे हे सगळं!

बाकी मी त्याला पेरू दिल्यामुळे आणि त्यानं मला अदबीनं सॉरी म्हटल्यामुळे माझ्यावर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया कोसळल्या! त्या मी चूपचाप ऐकून घेतल्या!

जेवणाचा पुकारा झाला आहे. मी जमल्यास नंतर लिहीन किंवा मग उद्या!

प्रिय अक्का…

सकाळचे नऊ वाजलेत. काल जेवणं आटोपल्यावर मी झोपून गेले. पहाटे चार वाजता आम्ही इथं म्हणजे दिल्लीला उतरलो. आम्हांला घ्यायला वृंदाआत्याकडून लोक आले होतेच. इथं तिच्याकडचं कार्य आटोपल्यावर दिल्लीदर्शन होईल.

सांगायचं हे की आम्ही एका चांगल्या हॉटेलात आहोत. थंडी म्हणाल तर त्या कुठल्याशा गाण्यात ‘प्यार तेरा..दिल्लीकी सर्दी’ म्हणते ती नायिका… तसलीच आहे. पहाटे तर सगळी दिल्ली अगदी ‘आज पहाटे श्रीरंगाने…’ असं म्हणत नुसतं-नुसतं धुकं नेसून शांत, तृप्त पहुडली होती! देखणी दिसत होती! ते पाहून मला क्षणभर दिल्लीची नीज मोडू नये… निदान ते पातक आमच्यावर येऊ नये असं वाटलं होतं.

आम्ही इथं आलो, तेव्हा मला जरा निराश वाटलं. म्हणजे आम्ही इथंच यायला निघालो होतो. त्याप्रमाणे ते ठिकाण आलं होतं, पण प्रवासात हीच मोठी गडबड आहे. तो कधीतरी संपतो.

संपायचाच असतो. संपल्यावर मात्र थांबल्यासारखं वाटतं. त्या प्रवासातली आपली जागा आता कुणीतरी भरून काढली असेल. मी जिथं उशी ठेवून निजले, तिथं कुणी पाय ठेवले असतील. त्या जागेला आपली आठवण येत असेल का की तिला एव्हाना या बदलाची सवय झाली असेल?

प्रत्यक्ष जगतानाही माणसं अशीच बदलली जातात नं अक्का? खरंच ते बदलणं असतं का पण? एका व्यक्तीची जागा दुसरं कुणी घेऊ शकतं का? मला खूप प्रश्न पडतात!

चार दिवसांनी परतीच्या प्रवासात मला तो हिजडा पुन्हा भेटेल का अक्का? त्याला आठवत असेन का मी? पेरू देणारी बाई म्हणून त्यानं माझ्याबद्द्ल सांगितलं असेल का, त्याच्या मित्रांना? जसं त्याच्याबद्द्ल मी तुम्हांला सांगतेय तसं? ते रिकामं एकटं स्टेशन माझी वाट पाहत असेल का? जागा बोलत नसल्या तरी त्या केवढं तरी सांगत असतात..! हो ना?

प्रवास संपला हे माहिती आहे. कारण इथंच यायचं होतं हे ठरलं आहे. मग हुरहुर कशाची आहे? मन सतत गेल्या प्रसंगात का गुंततं आहे? त्यातून मुक्त का होत नाही? असा विचार करतानाच मला पुन्हा लेकीनमधली रेवा अचानक आठवली… जो बीत गया उसे छोड दो… रेवानं भूतकाळ सोडलाच नाहीय… म्हणून तिला पुढं पाऊल टाकता येत नाहीय. मेहरू तर केवळ निमित्तमात्र आहे. फार तर वादळी समुद्रात जहाजावरचं होकायंत्र! रेवालाच पुढं जायचं आहे.

जे सुखावणारं, दुखावणारं, छळणारं, सलणारं मनात आहे; ते गंगार्पण करावं लागेल… त्याशिवाय सुटका नाही. कुणीतरी आपली आठवण काढावी… असं वाटणं साहजिक आहे मात्र तो विचार आत्ता करणं, आपल्या मुक्कामावर पोचल्यावर करणं चूक आहे! म्हणूनच अजूनही… मुक्काम आल्याची जाणीव कदाचित होत नाहीय.

हे कधी संपेल अक्का? सुटका कधी होईल, कळत नाही!

आता थांबते! दिल्लीतली प्रेक्षणीय स्थळं… हे सांगायला पत्र लिहिलं नाहीय. त्यामुळे परत आले की त्याबद्द्ल प्रत्यक्ष सांगेन! बाकी क्षेम!

मर्यादेयं विराजते!

तुमची

मी!

माधवी भट

IMG-20170923-WA0005

इ-मेल – madhavpriya.bhat86@gmail.com

प्राध्यापक-लेखक.  नागपूर विद्यापीठात प्रबंध सादर. मुक्काम चंद्रपूर.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s