शैलेन भांडारे
‘अव्वल इंग्रजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १९व्या शतकाच्या कालखंडात जे काही मराठी लेखन झाले, त्यात विष्णुभटजी गोडसे वरसईकर यांचे ‘माझा प्रवास अथवा सत्तावनच्या बंडाची हकीकत’ हे एक काहीसे वेगळे असणारे पुस्तक. भटजींनी हा प्रवास केला सुमारे १८५६-५८ या काळात, पण लिखाण केले ते त्यानंतर बऱ्याच वर्षांनी, म्हणजे १८८३-८४ साली. त्यांना लिहिते करण्यात महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध विद्वान श्री. चिंतामणराव वैद्य यांचा सहभाग होता. वैद्यांचे कुटुंब हे भटजींच्या यजमान घराण्यापैकी. वैद्य तरुण असताना भटजी उपाध्येपण करायला त्यांच्या घरी येत, तेव्हा ‘सत्तावनी’संबंधी अनेक मनोरंजक गोष्टी सांगत, सबब भटजींच्या मृत्यूनंतर हा ‘मौखिक पुराव्या’चा ठेवा नष्ट होईल या काळजीपोटी वैद्यांनी भटजींना त्यांच्या आठवणी लिहून ठेवायला सांगितले. शंभर रुपये ‘दक्षिणा’ द्यायची लालूचही दाखवली! केवळ पैशाच्या लालचेपोटी भटजींनी हे काम केले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल; कारण भटजींच्या लिखाणातून त्यांच्या स्मरणांविषयी जी एक प्रकारची आत्मीयता आणि स्पष्टता जाणवते, ती पाहता भटजींनी हे काम त्या आठवणी स्मरून त्यांना शब्दबद्ध करण्याच्या विशुद्ध लेखनानंदापोटीही केले असण्याची दाट शक्यता आहे.

पण सत्तावनचे ‘बंड’ हा विषय इतका ‘सेन्सिटिव्ह’ होता की वैद्यांनी हे लिखाण सत्तावनीच्या पन्नासाव्या वर्षगाठीचा मुहूर्त साधून, भटजींच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. प्रवास केल्यानंतर पंचवीस वर्षांनी त्याबद्दल लिहिताना भटजी जे तपशील नोंदवतात, त्यावरून एकतर त्यांची स्मृती अतिशय तीव्र असावी किंवा केलेल्या प्रवासाबद्दल त्यांच्या हाती काही टिपणे असावीत (किंवा दोन्ही!) असे वाटते; किंबहुना एका ठिकाणी ते ‘स्मरणबुका’चा उल्लेखही करतात. प्रवास करताना आलेले अनुभव हे ‘अलौकिक’ म्हणता येतील या स्वरूपाचे असल्याने ते भटजींच्या मनावर कोरले गेले असावेत असेही असेल; पण भटजींचे हे पुस्तक मराठी भाषेतले एक ‘क्लासिक’ म्हणण्यासारखे आहे, इतके निश्चित! वैद्यांची आवृत्ती प्रसिद्ध झाली तेव्हा काका कालेलकर यांनी ती वाचून ‘हे सर्व खरेच आहे की, तुम्ही कल्पना करून लिहिले आहे’ असा त्यांना प्रश्न केल्याचे वैद्यांनी सांगितले आहे, त्यावरून या लिखाणाच्या ‘अलौकिक’पणाची खातरी पटावी.
वैद्य यांनी पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध केले, तेव्हा त्यात काही न्यूने उतरली – मूळ हस्तलिखित अर्थात मोडी लिपीत आहे, ते देवनागरीत उतरवताना काही चुका झाल्या, काही वाक्ये वैद्यांनी स्वतःच्या पदरची घातली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यांनी पुस्तकातले काही भाग ‘अश्लील’ किंवा ‘नको तितक्या’ तपशिलात लिहिलेले वाटल्यामुळे गाळून टाकले! अर्थात हे करण्यामागे बहुधा वैद्यांची ‘व्हिक्टोरियन’ असलेली संवेदनशीलता कार्यरत होती, आणि तपशिलांचे धनी काही प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती असल्याने चारित्र्यहननासारख्या बाबीवरही वैद्यांनी लक्ष ठेवले असावे. सुदैवाने १९२२ साली ‘प्रवास’चे मूळ हस्तलिखित वैद्यांनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या स्वाधीन केले आणि हे लिखाण खरेच आहे की वैद्यांचे कल्पनारंजन हा विषयही निकालात निघाला.
पुढे मनू पालटला, भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि ‘सत्तावनी’संबंधी सरकारचे भय बाळगायचे दिवस संपून ‘स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून उलट तिच्या सरकारी उदात्तीकरणाचे युग अवतरले. त्या वेळी ‘मंडळा’शी संबंधित असणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी या दस्तऐवजाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून, तितक्याच तोलामोलाच्या नरहर रघुनाथ फाटक या इतिहासकाराची मदत घेऊन शुद्धलेखनाच्या नियमांव्यतिरिक्त ‘काडीमात्रही फरक’ न करता, ‘माझा प्रवास’ची नवीन आवृत्ती सिद्ध केली. ही आवृत्ती ‘व्हीनस प्रकाशन’ने प्रसिद्ध केली आणि तीच अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांतही लावली गेली. तेव्हापासून इतिहास-अभ्यासकांचे या पुस्तकाकडे आणि त्यातल्या ऐतिहासिक तपशिलांकडे सतत लक्ष जात राहिले आहे.
‘सत्तावनी’संबंधी जो काही पुरावा उपलब्ध आहे, तो मुख्यतः वासाहतिक शासनाने तयार केलेले दस्तऐवज किंवा इंग्रज (आणि/किंवा त्यांच्याच पठडीत तयार झालेले) भारतीय इतिहासकार यांनी लिहिलेले इतिहास, यांच्यापुरता मर्यादित आहे. एतद्देशीय लोकांची या बाबतीत काय भावना होती, त्यांचे अनुभव काय होते, हे समजण्याचे मार्ग अतिशय कमी आहेत. भटजींसारखे एखाददोन अपवाद सोडले, तर एतद्देशीयांनी या बाबतीत केलेल्या लिखाणाची वानवाच जाणवते. त्यामुळेच भटजींच्या ‘आंखो देखा हाल’-स्वरूपाच्या लिखाणाला इतिहास-अभ्यासकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आले यात नवल नाही. पण त्याचबरोबर हेही ध्यानात ठेवायला हवे की, या पुस्तकाकडे ‘बंडा’च्याच भिंगातून सतत बघितले गेले. अलीकडेच प्रसिद्ध झालेले इंग्रजी भाषांतर हेही याला ‘१८५७-५८चे मेम्वार’ म्हणूनच ओळखते. वस्तुतः हे लिखाण भटजींनी केलेल्या ‘प्रवासा’चे आहे आणि या लिखाणाची तीही एक ‘ओळख’ आहे, ही बाब या सत्तावनीच्या वरचष्म्यामुळे काहीशी पुसली गेली आहे. दुसरे म्हणजे (पु. ल. देशपांड्यांचे शब्द उचलून म्हणायचे तर) हे जितके ‘भटजींच्या प्रवासा’चे वर्णन आहे, तितकेच ‘प्रवासातल्या भटजींचे’ही वर्णन आहे. या लिखाणामुळे आपल्याला एकंदरीतच ‘प्रवास’ या कृतीची, त्यातल्या मानसिक आणि भौतिक ‘यंत्रणे’ची आणि ज्या सामाजिक परिस्थितीत तो केला तिची विचक्षणा काही ऐतिहासिक संकल्पनांच्या अनुषंगाने करता येते. पण ती करण्याआधी या पुस्तकाच्या विषयाची आणि पार्श्वभूमीची तोंडओळख असणे आवश्यक आहे.
विष्णुभटजी गोडसे हे आत्ताच्या पेण-खोपोली रस्त्यानजीक असलेल्या वरसई या गावचे पिढीजात रहिवासी. त्यांचे वडील दुसऱ्या बाजीरावाच्या ब्राह्मण आश्रितवर्गापैकी होते. पेशवाई बुडून बाजीराव गंगेकाठी ब्रह्मावर्त (बिठूर) इथे जायला निघाल्यावर तेही त्यांच्याबरोबर निघाले, पण प्रकृती साथ देईनाशी झाल्याने नर्मदातीरापर्यंत जाऊन गावी परत आले. पैतृक घराण्याच्या वाटण्या झाल्यावर ते ब्रह्मकृत्यादी कार्ये करून ईशस्मरणात दिवस कंठत असत, पण दिसामासाने उत्पन्न कमी आणि कर्जे जास्त होऊन त्यांच्या घरी गरिबी झाली (भटजींच्या भाषेत सांगायचे तर दारिद्र्य ‘पुढीलदारी-मागीलदारी फुगड्या घालत होते’!) घरात आणखी तीन लहान भावंडे, दोन भाऊ आणि एक बहीण; यांच्या लग्नकार्यात पैसे कर्जाऊ घेऊन ते फेडण्यास काही मार्ग उरला नाही. भटजी स्वतः भिक्षुकी, याज्ञिकी करून थोडेफार पैसे गाठीस लावत. अशात एकदा पुणे येथे यजमानकार्य करण्यासाठी गेले असता ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे –सुप्रसिद्ध महादजींची स्नुषा आणि दौलतराव शिंद्यांची विधवा– या मथुरा येथे ‘सर्वतोमुख यज्ञ’ करणार आहेत, अशी पत्रे शिंद्यांच्या आश्रित ब्राह्मणांकडे आल्याची वार्ता भटजींना समजली. अशी धार्मिक कार्ये चालवण्यासाठी शिंदे यांचा ओढा ‘दक्षिणी’ म्हणजे मराठी ब्राह्मणवर्गाकडे साहजिकच होता, आणि त्यातून दानधर्म वगैरे खूप होऊन त्यातून अर्थप्राप्ती होईल अशी अटकळ भटजींनी बांधली. अल्पावधीत द्रव्य मिळवून कर्जफेड करण्यासाठी दुसरा मार्ग त्यांना दिसेना. त्यांचे गावातच राहणारे एक (चुलत)काका हे बाजीरावाबरोबर ब्रह्मावर्ती गेले होते आणि तिथे त्यांनी होमशाळेत अनेक वर्षे ऋत्विज्यकर्मही केले होते. त्यांना उत्तर हिंदुस्थानची माहिती होती, सबब त्यांना साथीला घेऊन मथुरेला जावे असा बेत भटजींनी केला. आई-वडिलांची परवानगी महत्प्रयासाने मिळवली आणि अर्थार्जन करून परत यायच्या मिषाने ते आणि काका मथुरेला जायला निघाले. पण मध्यप्रांतात महूच्या जवळ पोचल्यावर तिथे धर्मशाळेत सोबतीला उतरलेल्या काही शिपायांकडून त्यांना पुढे होणाऱ्या उत्पाताची खबर मिळाली. महूला दंग्याची ‘झलक’ पाहून उज्जैनमार्गे भटजी आणि काका झांशीला पोचले आणि राणी लक्ष्मीबाईसाहेब (त्यांच्या भाषेत ‘झांसीवाली बाई’) यांच्या पदरी काही काळ राहिले. पुढे बंडाचा वणवा झांशीलाही पोचला. झांशीवर फार मोठे ‘जंग’ झाले, बाईसाहेब झांशीतून निसटून तात्या टोपे आणि नानासाहेब वगैरे समविचारी लोकांकडे गेल्या, आणि त्यांच्या मागे इंग्रज सैन्याने झांशीला कत्तल आरंभली. त्या सर्व दिव्यातून बाहेर पडून भटजी आणि काका हे द्रव्याच्या आशेने काल्पीमार्गे बिठूर आणि पुढे बुंदेलखंडात चित्रकूट येथे गेले. या सर्व प्रवासात बंड आणि बंडवाले शिपाई यांच्याशी त्यांचा या-ना-त्या कारणाने सतत संपर्क येत राहिला. अनेकदा तर ते या बंडवाल्यांच्या सोबतीनेच प्रवास करत राहिले.
प्रवासात त्यांच्यावर अनेक प्रकारची संकटे आली, पण काही वेळा दैवयोगाने तर काही वेळा अंगच्या चतुराई आणि हिकमतीने त्यांनी या संकटांवर मात केली. या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असता यात्रा पुण्यकर्म इत्यादींच्या संधी भटजींनी सोडल्या नाहीत. अयोध्या, नैमिषारण्य, कनोजजवळचे ‘सूर्यावर्त’ नामक स्थान, चित्रकूटजवळची श्रीराम-संबंधित स्थाने अशा अनेक यात्रा त्यांनी केल्या. अनेकदा त्यांना विशिष्ट धर्मविधीपर कार्ये, जी प्रसंगोपात असून कधीतरीच केली जात, ती प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली. प्रसंगी वाट थोडी वाकडी करून एक प्रकारची ‘प्रोफेशनल डेव्हलपमेन्ट’ म्हणून त्यांनी तीही पाहून घेतली. अर्थार्जनाची संधी मावळत जाते आहे, असे पाहून भटजींनी या भागात आलो आहोतच तर काशी-प्रयागाची यात्रा करून माता-पित्यांना गंगोदकाने स्नान घालावे असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे व्रतस्थ राहून गंगाजलाची कावड खांद्यांवर वाहून वरसईस आणली. परतीच्या प्रवासातही शक्य तिथे त्यांनी यात्रा-क्षेत्रे आणि तीर्थस्थाने यांना भेटी दिल्या. अशा प्रकारे सुमारे अडीच वर्षांनंतर भटजी आणि काका दोघेही गावी सुखरूप परत आले. या अडीच वर्षांत भटजींनी किमान साडेतीन हजार किलोमीटर्सचा प्रवास केला, असे त्यांच्या वर्णनावरून दिसते.
भटजींची भाषा आणि प्रवास-वर्णनपर कौशल्य याच्यावर बरेच लिहिले गेलेले आहे. ‘व्हीनस’-आवृत्तीचे संपादकच ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’सारख्या महत्त्वाच्या विषयावर रसपूर्ण लिखाण करणारे असल्याने त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत यासंबंधात टिपण्या जोडल्या आहेत. भटजींची भाषा अतिशय प्रवाही आहे आणि ते त्यांच्या परिसरातले बारकावे अतिशय सुरेख टिपतात. ‘दरेस’ म्हणजे ड्रेस, ‘मेखजीन’ म्हणजे मॅगझिन, ‘टाकिण’ म्हणजे स्टॉकिंग्ज असे इंग्रजी शब्दांचे चमत्कारिक आविष्कार त्यांच्या भाषेत दिसतात, पण काहीकाही शब्द ते इंग्रजीतून आहेत तसेच उचलतात (उदाहरणार्थ: ‘इस्टेट’, ‘सरटीपिकीट’) आणि वापरतात. असे असले, तरी त्यांची भाषा एकंदरीत जुन्या वळणाचीच आहे. त्यांनी लेखन केले, तेव्हा इंग्लिशाळलेल्या ‘नवीन’ तऱ्हेच्या मराठी भाषेत बरेच लिखाण प्रसिद्ध झाले होते; पण त्याची विशेष छाप भटजींच्या भाषेवर पडलेली दिसत नाही. प्रवास करताना येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांतले तपशील भटजींनी व्यवस्थित नोंदवले आहेत, किंबहुना अनेक ठिकाणी या तपशिलांमुळे त्यांच्या वर्णनांना एक प्रकारचा ‘नाद’ उत्पन्न होऊन त्यातून त्या वर्णनांची ‘चक्षुर्वैसत्यता’ अगदी वाचकाच्या मनी प्रभावीपणे ठसते. या तपशिलांतून आणि नादमय भाषेतून एक प्रवासी म्हणून भटजींच्या मनावर कशाकशाचा खोल ठसा उमटला, हे आपण सहज समजू शकतो. असे असूनही, प्रवासातल्या अनुभवांमुळे भटजी वाहवत गेल्याचे कुठेही दिसत नाही, मग ते अनुभव अगदी भीषण का असेनात. लिखाणातली ही एक चमत्कारिक अलिप्तताही एक प्रवासवर्णन म्हणून भटजींच्या आविष्काराकडे बघताना आपल्याला उपयुक्त ठरते, कारण त्यातून भटजींना एक प्रवासी म्हणून आपण अधिक चांगले समजून घेऊ शकतो.
भटजींच्या प्रवासातून सर्वांत प्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे भटजींच्या दृष्टीने ‘उत्तर भारत’ हा एक सर्वस्वी परका असा देश आहे. त्याला ते ‘हिंदुस्थान’ अशा नावाने संबोधत असले, तरी या परकेपणाचे वेगवेगळे आयाम आपल्याला भटजींच्या लिखाणात दिसतात. स्थानिक लोकांची वर्तणूक हा असाच एक आयाम. भटजींच्या घरात आणि परिचयात उत्तरेत राहिलेले लोक आहेत, पण त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मनोवृत्ती या प्रदेशाबद्दल सहानुभूतीकारक नाही. ‘स्वधर्मे निधनं श्रेयं’ असे मत असताना परदेशात जाणे हे भयावह अशा ‘परधर्मा’चाच एक आविष्कार होता. याचे मुख्य कारण म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांच्या चालीरिती आणि त्यातून उत्पन्न होणारे ‘विटाळा’त्मक भय. या भयाची बाधा ब्राह्मण जातीला आणि तेही ‘प्रॅक्टिसिंग ब्राह्मण’ असल्यावर, तर अधिकच. नीती आणि रीती या दोन्ही बाबींच्या दृष्टिकोणातून भटजींना वाटणारी ही भीती त्यांच्या वर्णनात आपल्याला जाणवते. यांतला काही भाग हा लैंगिक आचरणाशीही संबंधित आहे. ‘हिंदुस्थानात भांग वाटून पितात व तिकडे स्त्रिया आपले चातुर्याने पुरुषास वश्य करतात’ ही बाब भटजींचे कुटुंबीय त्यांच्या नजरेला त्यांनी प्रवासाचा प्रस्ताव मांडल्याबरोबर तातडीने आणून देतात! पण आपण त्यांच्या नादी लागणार नाही, असे वचन भटजी आई-वडिलांना देतात आणि या भयातून सर्वांची सुटका करतात.

भटजींचा आणखी एक मनोरंजक दृष्टिकोन म्हणजे ते वैयक्तिक आचरणाचा कार्यकारणभाव एका प्रकारच्या ‘नैतिक पर्यावरणा’शी लावतात, आणि असे करताना नैसर्गिक पर्यावरणातल्या बाबींचा आधार घेतात. उदाहरणार्थ, बुंदेलखंडातल्या स्त्रियांच्या व्यभिचाराचे कारण हे तिथले ‘पाणी’ आहे, असे त्यांचे मत आहे. हे पाणी ‘पुरुषांना वाईट’ आणि त्यामुळे ‘येथे षंढ फार निपजतात’ असे ते सांगतात. अशा प्रकारे पर्यावरणीय बाबीमुळे निष्पन्न होणाऱ्या षंढत्वाची सांगड त्यांनी नैतिक भ्रष्टतेशी घातली आहे. एकंदरीतच, लैंगिक नीतिमत्तेचा अभाव किंवा एक प्रकारची स्वैर सामाजिक नीतिमत्ता हे भटजींच्या ‘परदेश’-संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतीय लोकांचा उल्लेख, ते ब्राह्मण असले तरीही, ‘रांगडे’ असा करतात; किंबहुना ‘रांगडे’ आणि ‘दक्षिणी’ ही त्यांनी वापरलेली एक वर्गीकरणात्मक दुविधा आहे. या शब्दाच्या वापरावरून एकंदरीतच उत्तर भारतीय लोक हे सांस्कृतिकदृष्ट्या काहीसे ‘निम्न’ आहेत, ही त्यांची समजूत दिसते. या सगळ्या बाबी आपल्याला त्यांच्या मते जिथे ते जात होते तो भूभाग त्यांच्या दृष्टीने ‘एलियन’ कसा होता हे दाखवून देतात. वास्तविक पाहता भारतीय भूखंडाच्या सांस्कृतिक ‘एकात्मते’चे आपण नेहमीच वर्णन करत असतो आणि गोडवेही गात असतो. असे असता, या तथाकथित सांस्कृतिक एकात्मतेलाही कसे आणि कुठले जाणिवात्मक पैलू होते, हे भटजींच्या दृष्टिकोणातून आपल्याला दिसते. हे पैलू ‘नेगोशिएट’ करणे हा भटजींच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे.
प्रवास करायचे निश्चित झाल्यानंतर काही गोष्टींनी तो ‘सुखकर’ होईल असे पाहावे लागते – सुविधा, सोबत आणि सुरक्षा या तीन बाबी त्यात महत्त्वाच्या आहेत. या बऱ्याचशा एकमेकांवर अवलंबूनही असतात हे ओघाने आलेच. भटजींच्या काळात प्रवासात ज्या काही ‘सुविधा’ होत्या, त्या बेतास बातच होत्या, पण त्यांच्या लिखाणातून आपल्याला त्यांचे थोडेबहुत दर्शन घडते. यांपैकी सोबत हा कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणायला हरकत नाही आणि याचे प्रत्यंतर आपल्याला भटजींच्या संपूर्ण प्रवासात सतत येते. भटजी वरसईहून निघाले, ते गावातलेच कर्वे यांच्या सोबतीने. कर्वे यांची सून ग्वाल्हेरला असलेल्या वैशंपायन कुटुंबातली माहेरवाशीण होती आणि वैशंपायन हे शिंद्यांच्या पदरी ‘दानाध्यक्ष’ होते. पुण्याला सर्वतोमुख यज्ञाची बातमी कानी पडल्यावर वैशंपायन यांच्याकडून आलेले पत्रच भटजींचा मनोदय प्रवासाकडे लागण्यासाठी कारणीभूत झाला होता.
ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास भटजींनी पुणे-मालेगाव-सातपुडा (करवंदबारी)-महू-उज्जैन-सारंगपूर-सिप्री या मार्गाने केला. वाटेत महू इथेच बंडाची झळ त्यांना लागली आणि त्यानंतर त्यांनी शक्यतो हत्यारबंद शिपायांच्या सोबतीनेच प्रवास करायचे ठरवलेले दिसते. काहीशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे शिपाई बंडवाल्यांपैकी असले काय आणि नसले काय, भटजींनी त्यांची विशेष फिकीर बाळगलेली दिसत नाही! कारण ‘आम्ही निर्भय आहो, काळे लोक धर्माबद्दल भांडणार तर आम्ही तर वेदशास्त्रसंपन्न आहो, आम्हांला भय मुळीच नाही’ अशी त्यांची सुरुवातीपासूनच ठाम समजूत झालेली दिसते. बंडवाल्या शिपायांनीही या ब्राह्मणांना वेळोवेळी सन्मानाने वागवलेले दिसते. सोबत असलेल्या शिपायांचा हेतू काहीही असेना, त्यांच्या हाती असलेली शस्त्रे भटजींना त्यांच्या सोबतीत सुरक्षित वाटण्याला कारणीभूत झाली असावीत असे दिसते. अर्थातच, काही वेळा त्यांना या शिपायांच्या हडेलहप्पीचाही कंटाळा येतो, पण त्या वेळी ते त्यांच्यापासून स्वतःची सुटका चातुर्याने करून घेतात. उज्जैनला पोचल्यावर त्यांच्या लक्षात असे येते की, ‘या बिघडलेल्या लोकांबरोबर आपल्याला सुख व्हावयाचे नाही, कारण ते सर्व जिवावर उदार होऊन हरवक्त मारू मारू या गोष्टीशिवाय त्यांस काहीयेक सुचत नाही, सबब उज्जैन हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे आपण यथाकाळ धार्मिक कृत्ये करण्यास राहणार, तुम्ही तुमच्या वाटेने जावे’ असे सांगून ते शिपायांपासून मुक्तता मिळवतात. प्रवासातली सोबत नेहमीच फायदेशीर होते असे नाही आणि तिच्यावर विसंबूनही राहता येत नाही, याचेही भटजींना थोडेबहुत अनुभव आले. चित्रकूटहून जालवण (जालौन) इथे ब्राह्मणांची सोबत पाहून जात असताना भटजींच्या काकांना अचानक उष्माघात झाला आणि त्यांना चालणे अशक्य होऊन ते मूर्च्छित पडले. सोबतचे ब्राह्मण त्यांची आर्जवे न ऐकता त्यांना तसेच सोडून भाड्याच्या गाडीच्या मुदतीचे कारण सांगून निघून गेले आणि त्यासमयी त्या ब्राह्मणांना शिव्याशाप देण्यापलीकडे भटजींच्या हातात काहीच उरले नाही!
हत्यारबंद शिपायांची सोबत ही एक बाब सोडली, तर प्रवासात इतर प्रकारची सुरक्षा असावी म्हणून एकोणिसाव्या शतकातले लोक काय-काय करत, याची कल्पना आपल्याला भटजींच्या वर्णनांतून येते. सुरुवातीला पायजमा, बंडी वगैरे प्रवासास आवश्यक असा पोशाख करून निघालेले भटजी आणि काका जेव्हा झांशीच्या कत्तलीतून जिवानिशी सुटका झाल्यावर ब्रह्मावर्ताच्या दिशेने जायला निघतात, तेव्हा वाटेने उभे राहिलेले बंडाचे भय पाहून लंगोट्या, फाटके उपरणे, पंचा, बन्यान असा अत्यंत दरिद्री वेश पत्करतात. सर्वांत मूल्यवान वस्तू म्हणजे बोटांतल्या दोन सोन्याच्या आंगठ्या ते लंगोटात काळजीपूर्वक बांधून घेतात. विहिरीतून पाणी काढण्यासाठी सोय म्हणून आंबाडीची रस्सी आणि मातीचे भांडे घेतात. जवळपास अशाच प्रकारचे साहित्य घेऊन ते चित्रकूट ते जालवण हा प्रवासही करतात, पण चित्रकूट इथल्या वास्तव्यात त्यांना थोडीशी धनप्राप्ती झाल्याने त्यांच्या ऐश्वर्यात पितळी कटोरा आणि इतर एक-दोन कपड्यांची भर पडते! उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेला मेथीचा पाला, सत्तूचे पीठ आणि साखर ह्यांची प्रवासी साहित्यात वर्णी लागल्याचे आपल्याला दिसते. वाटेत अनेकदा वेळपरत्वे मातीची भांडी विकत घेतल्याचे उल्लेख भटजी करतात, त्यावरून एकंदरीतच भांडयाकुंड्यांपाठी सामानात त्यांनी विशेष जागा ठेवली नाही आणि विशेष खर्चही केलेला दिसत नाही. प्रवासी माणसाचे आणखी एक महत्त्वाचे वेळ घालवायचे साधन म्हणजे व्यसन! भटजी आणि काका दोघेही तंबाखूचे भोक्ते आहेत, त्यामुळे तंबाखूचा बटवा ते नेहमी जवळ बाळगतात. किंबहुना, झांशीच्या वेढ्याच्या वेळी जिवाचे भय हरल्यावर त्यांना सर्वप्रथम तंबाखूची आठवण होते आणि लुटालूट करायला आलेल्या इंग्रजी फौजेतल्या देशी सोजिरांशी गोड बोलून त्यांच्याकडून ते तंबाखू मागून घेतात.
प्रवासात सुरक्षेची जबाबदारी सर्वस्वी प्रवाशांची असली, तरी भटजींच्या काळाच्या पन्नासेक वर्षे आधी, सरत्या पेशवाईच्या काळात जशी अंदाधुंदी माजली होती, तशी आता माजलेली दिसत नाही. भटजी ठिकठिकाणी धर्मशाळांत उतरल्याचे दाखले आहेत. इंग्रज सरकारने ‘अफूच्या व्यापारासाठी’ जागोजागी उभारलेल्या बंगल्यांचे उल्लेखही ते करतात. भटजी गावाकडे परतू लागले, तेव्हा बऱ्याच ठिकाणी बंडाचा उपशम झालेला होता. मध्य भारतातल्या मुख्य सडकांवर इंग्रज सरकारने चौकी-पहाऱ्याची व्यवस्था केली होती. त्या पहाऱ्यांवरचे शिपाई प्रवासी लोक येताना पाहून ‘मुसाफिर आवत है’ अशी हाळी देत आणि पुढच्या चौकीकडून ‘आवना देव’ असे प्रत्युत्तर मिळाल्याखेरीज प्रवाशांना पुढे पाठवत नसत. परंतु ‘इंग्रजांच्या राज्यात काठीला सोने बांधून खुशाल काशीयात्रा करावी’, अशी सुव्यवस्था झाली होती, हे नेहमी सांगितले जाणारे वाक्य भटजींचे अनुभव लक्षात घेता तितकेसे खरे नव्हते असे दिसते. बंड जोरात असताना तर कायद्याचे राज्य कोलमडलेलेच होते. अशा काळात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे माणसाला सुचले तरच नवल. काल्पीच्या बाहेर थांबले असताना भटजीद्वयाला एका ‘रांगड्या’ लोकांच्या जथ्याने घेरले आणि ते त्यांची कसून तपासणी करायला लागले. तेव्हा भटजींकडे काही रोकड होती. तिच्यापासून त्यांचे लक्ष विचलित करायला म्हणून भटजींनी ‘तुम्ही आम्हांला फतेपूरला जाण्याचा रस्ता सांगाल, तर आम्ही तुम्हांला पांच रुपये देऊ’ असे आमिष त्यांना दाखवले. पण या आमिषाचा त्या चोरट्यांवर काही उपयोग झाला नाही. भटजींच्या जवळचे सगळे धन त्यांनी हरण केले आणि उलट त्यांनाच पाच रुपये खर्चासाठी ठेवायला देऊन ते लोक तिथून चालते झाले!

प्रवासात होणाऱ्या गैरसोयींपैकी अचानक आलेले आजारपण ही मोठीच गैरसोय होय! भटजींच्या प्रवासात त्यांना आणि इतरांना झालेल्या आजारांचे अनेक उल्लेख येतात. उष्माघाताचा प्रसंग वर उल्लेखलेला आहेच, पण जंतुसंसर्गाने उत्पन्न होणारे आजार किंवा साप वगैरेंसारख्या प्राण्यांचे दंश यांचेही भय प्रवाशांना असे. भटजींना या प्रवासात नारू आणि आमांश या रोगांनी जर्जर केले. भटजींचा एक सोबती अचानक रेच होऊन शुष्कातिरेक होऊन दगावला. मरगीसारख्या रोगांच्या साथीमुळे गावात मृत्यूचे थैमान माजून एका मृताला पोचवून येतात तोच दुसऱ्या मनुष्यने अखेरच्या घटका मोजायला लागावे अशी परिस्थिती उद्भवू शके. या आजारांवर तोंडदेखले उपाय करून बाकी हवाला ईश्वरावर सोडून देण्याखेरीज प्रवाशांच्या हाती काहीच नसे! रेच होणाऱ्या सोबत्याला सुंठ, हिंग, मिरे वगैरे औषधे पाजून बरे करण्याचा प्रयत्न त्याचे सहप्रवासी करतात. उष्माघातावर उपाय म्हणून मेथीचा पाला पाण्यात कुस्करून त्याचा लेप काकांच्या सर्वांगाला भटजी देतात. पण अशा आपत्तींतून पार पडायचे म्हणजे ईश्वरी कृपा असल्याशिवाय साध्य नाही, अशी सगळ्याच प्रवाशांची मनोमन खातरी होती. काही वेळा जणू काही ईश्वरी हस्तक्षेप झाल्यासारखे काही लोक या रोग्यांच्या मदतीला येत. भटजींना नारूने पछाडले, तेव्हा असाच एक बैरागी येऊन त्यांच्या दुखऱ्या पायाला कुठल्यातरी वनस्पतीचा लेप देऊन गेला आणि त्यामुळे भटजींच्या दुखण्याला उतार पडला. कावड घेऊन देशी परत येताना भटजींनी अनवाणी चालण्याचे व्रत घेतले होते, पण झाडांची पाने आणि कापूस यांची पादत्राणे या व्रतास संमत होती. ती पादत्राणे घालूनही भटजींच्या पायाला भेगा पडत आणि त्यातून वारंवार रक्त वगैरे वाहे. त्यावर उपचार म्हणून राळ व मेण यांचे ‘लुंकण’ करून भटजी त्या भेगांत भरत.

भटजींना जिवाची भीती पडल्याचेही थोडेथोडके प्रसंग आले नाहीत. पण काही प्रसंगांत भटजींनी त्यातून कधी मिनतवारीने तर कधी हुशारीने आपली सुटका करून घेतल्याचे आपल्याला दिसते. झांशीला कत्तल सुरू झाल्याच्याच दिवशी काही गोरे सैनिक भटजी जिथे राहत होते, तिथे यमदूतांसारखे घुसले; तेव्हा भटजी आणि काका यांनी त्यांच्यासमोर साष्टांग लोटांगण घालून मोडक्यातोडक्या हिंदुस्थानी भाषेत त्यांची आर्जवे करून आपली सुटका करून घेतली. सैनिकांनी त्यांना जीवानिशी मारले नाही, पण त्यांनी जमवलेले अडीचशे रुपये ते घेऊन गेले! काकांना उष्माघात झाल्यानंतर मार्गाने हळूहळू जात असता बंडवाले असल्याच्या संशयावरून त्या दोघांना काही देशी शिपायांनी कैद केले आणि दुसऱ्या दिवशी साहेबापुढे हजर करतो, मग साहेब सोडो अथवा फासावर चढवो, अशा आपत्तीत त्यांनी भटजींना घातले. इंग्रज सरकारच्या भयानक ‘रेट्रीब्युशन’चे प्रसंग आणि सूडकथा भटजींच्या कानावर आल्या होत्या. एका दारुड्या प्रवाशाचे सोंग घेऊन एक इंग्रज अंमलदार आला आणि रात्री त्याने एका गावाबाहेरच्या झाडाखाली निद्रा केली, तेव्हा त्याचे गाठोडे त्या गावातल्या कोणी-तरी चोरले. गाठोडे गायब झाल्याचे पाहून अंमलदाराने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावाला वेढा दिला आणि पहाटे बहिर्दिशेस म्हणून जे-जे लोक गावाबाहेर पडले, त्यांना टिपून ठार केले आणि नंतर गावातल्या सर्व पुरुषांची कत्तल केली वगैरे प्रसंग पुढे भटजींनी वर्णिलेला आहे. त्यामुळे कैद झाल्याच्या प्रसंगी त्यांचे अवसान गळाले असल्यास नवल नाही. परंतु तरीही, ध्रुव नक्षत्र पाहिल्यावर सहा महिने मरण नसते अशा समजुतीने, नक्षत्र पाहायच्या मिषाने त्यांनी दोन शिपायांशी मैत्री केली आणि आपण हे का करत आहोत, हे त्यांना शास्त्रार्थाचा दाखला देऊन सांगितले. इतके झाल्यानंतर हे बंडवाले नसून व्युत्पन्न ब्राह्मण आहेत, अशी त्या शिपायांची खातरी झाली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी भटजींना सोडून देऊन सैनिकी पहारे टाळून जालवणास कसे जावे, त्या गावांची यादी करून दिली. भटजी आणि काका मग त्या मार्गाने जालवणास सुखरूप पोचले.
सुदैवाने भटजींना मृत्यूने कधी मिठी घातली नाही, पण प्रवास करताना मृत्यूची सोबत भटजींना सतत होती. किंबहुना, मृत्यू हा भटजींचा ‘सहप्रवासी’च होता, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! घर सोडल्यानंतर काही दिवसांतच मालेगावी धर्मशाळेत मुक्काम असताना तिथे जमलेल्या प्रवासी लोकांपैकी एका ब्राह्मणाला सर्पदंश होऊन तो एका रात्रीत मरतो. महूच्या छावणीत बंडाचा उद्रेक होतो, तेव्हा शिपाई लोक टपालाची गाडी बळकावतात आणि गाडीवानाला भटजींच्या पुढ्यातच ठार करतात. छावणीत इतस्ततः पडलेली गोऱ्या आणि काळ्या लोकांची प्रेते ओलांडून भटजी मार्गस्थ होतात. पुढे झांशीच्या मुक्कामी तर भटजींनी मृत्यूचे तांडवच अनुभवले. त्या कत्तलींचे प्रत्ययकारी वर्णन भटजींनी केले आहे, ते वाचताना आपल्याला क्रौर्य, असहायता, दीनत्व वगैरे भावनांचे यथार्थ दर्शन होते. झांशीवाल्या बाईचे वडील मोरोपंत तांबे हे झांशीच्या वेढ्यातून जखमी अवस्थेत निसटून जवळच्या दतीया गावी गेले असता तिथल्या राजाने त्यांना कैद करून इंग्रजांच्या हवाली केले. त्यांना इंग्रजांनी झांशीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी ‘काळा जरनेली झेंडा’ लावून ठेवला होता तिथे आणून सर्व जनतेसमक्ष फासावर टांगले तेही भटजींनी पाहिले. रोगांच्या साथी येऊन अख्खी गावे कशी ओस पडत, हे भटजींना ‘बोटके’ नावाच्या गावी आलेल्या अनुभवावरून आपल्याला समजते. मरण आल्यावर वेळप्रसंगी मृताचीही केवढी परवड होत असे, हेसुद्धा भटजींनी वर्णिलेले आहे. झांशीच्या कत्तलीत ठार झालेल्या दोन ब्राह्मण पिता-पुत्रांचे दहन करायला पुरेशी लाकडे नसल्याने घरातल्या फळ्या, पाट, बाजा, दरवाजे वगैरे भरीस घालून अंगणातच त्यांच्या चिता पेटवल्या जातात आणि त्यांच्या विधवा स्त्रियांना शेजारी लोक घरी घेऊन येतात. ‘त्या झांशीच्या प्रसंगात कोणाचे अशौच कोणालाही नाही’ असे भटजींनी नोंदवले आहे. सोबत्याला रेच होऊन त्याचे मरण ओढवल्याचा प्रसंग वर उल्लेखलेला आहे, त्या ब्राह्मणाचे और्ध्वदेहिक भटजी आणि काकाच करतात. त्या गावी लाकडे उपलब्धच नसतात, त्यामुळे गोवऱ्या रचून त्यांचे सरण करावे लागते आणि बिचाऱ्या ब्राह्मणाची त्याच्याच पासोडीतून अखेरची यात्रा होते! पण मृत्यूला इतके जवळून पाहूनही त्याच्याबद्दल अतिशयित भय किंवा घृणा भटजींच्या लिखाणात कुठेही जाणवत नाही. वरसईसारख्या खेड्यात जन्म घालवलेल्या भटजींना नैसर्गिकरीत्या आलेले मृत्यू सोडता मृत्यूची अशी हिंस्रता पाहायला निश्चितच मिळाली नसणार. पण त्यांनी ज्या अलिप्ततेने हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत, ते पाहता त्यांच्या स्वभावात मुळातच एक प्रकारचा धीरोदात्तपणा असावा आणि प्रवासजन्य परिस्थितीतून त्या मुळातल्या स्वभावाला एक प्रकारची धार आली असावी, असे वाटते. प्रवासातून येणारे ‘शहाणपण’ हे अशाही प्रकारचे असू शकते, हे आपल्याला भटजींच्या वर्तनातून दिसते.
‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचारI शास्त्र ग्रंथ विलोकन। मनुजा येतसे चातुर्य फार।’ अशी एक आर्या आहे. पण हे फायदे मनुष्यास आपोआप प्राप्त होत नाहीत. प्रवासात संधी येतात, पण प्रवाशाने त्या संधींचा लाभ घ्यावा लागतो. भटजींनी जो प्रवास केला, त्यात अशा संधींचा लाभ उठवण्यासाठी त्यांनी वेळीप्रसंगी वाटही वाकडी केल्याचे दिसते. वास्तविक भटजी हे काही प्रकांडपंडित नव्हते किंवा विद्वत्तेबद्दल त्यांचा काही नावलौकिक असल्याचे कुठे ज्ञात नाही. पण जे ज्ञान आपणास केवळ पुस्तकी अभ्यासातून माहीत झाले आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा केला जातो, वेगवेगळे टीकाग्रंथ जे आपण अभ्यासले आहेत त्यांतील वचनांचा अर्थ शास्त्रवेत्ते, कार्य-पारंगत ब्राह्मण कसा लावतात वगैरे तांत्रिक बाबींमध्ये भटजींना बराच रस होता. या हेतूंमध्ये काही वेळा अर्थार्जनाचाही हेतू असणार, पण तसा तो नेहमीच नव्हता. धार संस्थानचा राजा मरण पावला असून तिथे मोठा दानधर्म होणार अशी बातमी भटजी उज्जैनला असताना त्यांना मिळाली. तेव्हा ‘मृतासंबंधी दान आपल्याला घ्यायचे नाही’ असे ठरवून या दानधर्माची विधिवत सिद्धता कशी होते, हे केवळ बघायला म्हणून ते उज्जैनहून धारला गेले. योग्य ठिकाणी याज्ञिकीच्या तांत्रिक बाबींमध्ये तिढा उत्पन्न झाला असता स्वतःचे मत देऊन त्यांनी ‘पंडितमैत्री’ही साधली. झांशीला त्यांना लक्ष्मीबाईसाहेबांच्या आश्रित वर्गात स्थान अशाच एका प्रसंगामुळे मिळाले. ‘शास्त्र-ग्रंथ-विलोकन’ करण्याची संधी त्यांनी प्रवासाच्या धांदलीत आणि आजूबाजूला बंडाची धामधूम चालू असतानाही साधली. एका विद्वानाने लिहिलेला एक टीका-ग्रंथ प्रसिद्ध झाल्याचे त्यांना ऐकून माहीत होते, पण त्याची प्रत त्यांना या प्रवासात अचानकच बघायला मिळाली, तेव्हा झालेला आनंद त्यांनी नोंदवला आहे. देशाटन केल्यानेच त्यांना ‘चातुर्य’ आले असे नव्हे, तर ते त्यांच्या अंगी वसत होतेच. कठीण परिस्थितीत शास्त्रांचा योग्य तसा अर्थ काढून त्यांनी कसा मार्ग काढला, त्यावरून याची कल्पना येते. ध्रुव-नक्षत्र-दर्शनाचा प्रसंग वर वर्णन केला आहेच. पण त्याहीपेक्षा चमत्कारिक अशा आणखी एका प्रसंगात भटजी कसे वागले, हे पाहिले तर त्यांच्या या अंगभूत चातुर्याची कल्पना येते. ‘मरगी’ रोगाचा उपसर्ग झाल्याने ‘बोटके’ गावातले लोक पटापट मरत होते, म्हणून भटजी आणि त्यांचे सोबती गावाबाहेर ओढ्याकाठी मुक्काम करतात. गावात जाऊन शिधा वगैर आणून स्वयंपाक करायला सुरुवात करणार, तर जवळ विस्तव नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. तितक्यात ओढ्याकाठी एक प्रेत दहनाकरिता येते, त्याच्याबरोबर आणलेल्या मडक्यात अग्नी असतो. भीडमुर्वत न बाळगता भटजी तो अग्नी मागतात! प्रेतयात्रेतल्या लोकांना ही चमत्कारिक मागणी ऐकून अर्थातच संदेह उत्पन्न होतो, तेव्हा ‘सध्या हा लौकिक अग्नी आहे, सबब आत्ता द्यायला हरकत नाही. प्रेतदहनासाठी या अग्नीला स्थंडिलावर स्थापून सिद्ध करावे लागते, तेव्हा तो क्रव्याद अग्नी होतो आणि त्यानंतर तो देऊ नये’ असा चोख शास्त्रार्थ भटजी त्या लोकांना सांगतात, आणि या उत्तरावर संतुष्ट होऊन ते लोकही भटजींना मडक्यात असलेला विस्तव देतात!
भटजींनी हा सर्व प्रवास कसा पार पडला, याच्या मुळाशी आपण गेलो तर आपल्याला असे दिसते की यात दोन महत्त्वाचा बाबींचा समावेश आहे. ‘संपर्कजाल’ (network) आणि ‘पर्यावर्तन किंवा परिसंचार’ (circulation) या त्या दोन बाबी होत. एखाद्या व्यक्तीच्या भौगोलिक चलनवलनाला सहसा ‘परिभ्रमण’ म्हटले जाते, पण त्या शब्दात एकतर निरुद्देश्य हिंडण्याची किंवा आकाशीय वस्तूंप्रमाणे ठरावीक कक्षेत फिरण्याची अर्थच्छटा जाणवते. अनेक आधुनिकोत्तर आणि उत्तर-संरचनावादी इतिहासकारांनी विवक्षित कारणांमुळे माणसांना करावा लागलेला संचार आणि त्यातून निर्माण होणारे त्या माणसांचे, तसेच त्यांच्या सभोवती असणाऱ्या समष्टीचे ऐतिहासिकत्व, यांचा अभ्यास केला आहे. अशा संचाराला ‘परिसंचार’ असे मराठी नाव अधिक शोभते. भटजींना त्यांच्या प्रवासात उत्तर भारतात राहिलेले ‘दक्षिणी’ लोक सतत भेटले, किंबहुना या लोकांमुळेच त्यांचा प्रवास सोयीस्कर झाला. मराठी (‘दक्षिणी’) ब्राह्मणांचा परिसंचार उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी झाला होता. मुळात ‘दक्षिणी’ असलेले अनेक लोक कारणपरत्वे उत्तरेत स्थायिक झाले होते आणि तसे असले, तरी त्यांचा दक्षिणेतल्या त्यांच्या मूळ स्थानांशी किंवा लोकांशी असा प्रसंगोपात संपर्क होता. वरसईच्या कर्वे-इनामदारांच्या सुनेचे माहेर ग्वाल्हेरला होते. ग्वाल्हेरचे दानाध्यक्ष वैशंपायन यांचे आप्त विष्णुपंत जोशी उज्जैनला राहत. चित्रकूट येथे हरिपंत भावे हे भटजींच्या यजमान-कुळांपैकी असलेले गृहस्थ होते. काशीमध्ये तर मराठी ब्राह्मण पूर्वापार राहत आलेले होते. काही लोकांच्या उदरनिर्वाहाची साधनेच उत्तरेत आणि दक्षिणेत विभागलेली होती त्यामुळे त्यांना असा संचार नित्यनेमाने करावा लागत असे. प्रवासाच्या सुरुवातीला भटजींना मालेगावच्या धर्मशाळेत भेटलेल्या बापूसाहेब संगमनेरकर या गृहस्थांची जहागीर महाराष्ट्रातला नगर जिल्हा आणि नर्मदेपलीकडचे ‘हरदेहांडे’ (होशंगाबाद जिल्ह्यातील हरदा आणि हंडिया ही ठिकाणे) इथे विभागलेली होती, त्यामुळे या दोन भागांत त्यांचे संचरण सतत होत असे. काशीला भटजींच्या सोबत असलेले हिंगणे हे एका ऐतिहासिक कुळाचे वारसदार होते. त्यांचे पूर्वज दिल्लीला मराठ्यांचे वकील म्हणून कार्यरत होते. असे असले तरी हिंगणे यांची आर्थिक परिस्थिती काही विशेष चांगली राहिलेली नव्हती आणि उत्तर भारतात ठिकठिकाणी पसरलेल्या लहानसहान जहागिरींचे खटले निस्तरत ते फिरत होते. या परिसंचारित लोकांमुळे एक प्रकारचे ‘संपर्कजाल’ तयार झाले होते आणि या संपर्कजालाच्या ‘तंतूं’चा फायदा भटजींना प्रवास करताना झालेला दिसतो. कोकणातल्या कुठल्या कोपऱ्यातले ते वरसई गाव, पण या संपर्कजालाच्या माध्यमातून ते उत्तर हिंदुस्थानातल्या अनेक शहरा-गावांशी जोडले गेलेले आपल्याला दिसते.
परिसंचार आणि संपर्कजाल यांच्या घटनेत जात ही महत्त्वाची बाब ‘सिमेंट’ म्हणून वावरत असे. भटजी हे व्युत्पन्न ब्राह्मण आणि पूजा-विधी आदि नित्यनेम पाळणारे; नित्यनेमाच्या आड येणारे ‘शत्रू’ म्हणजे विटाळ आणि त्यातून होऊ शकणारे कार्मिक ‘अधःपतन’. असे असल्याने त्यांचा संबंध बहुशः ब्राह्मणांशीच येत गेल्याचे आपल्याला दिसते. अनेकदा केवळ ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही अमक्याच्या आश्रयाला जाऊन तिथे बिऱ्हाड करा, असाही सल्ला त्यांना मिळाला. झांशी येथे त्यांचा काही महिने मुक्काम झाला, तो केशवभट मांडवगणे यांच्याकडे. या कुटुंबाचे आणि भटजींचे काही नाते नव्हते, पण ते ‘दक्षिणी’ होते आणि ब्राह्मणही, या बाबी भटजींनी त्यांच्याकडे बिऱ्हाड करायला पुरेशा होत्या. याच मांडवगणे कुटुंबाची पुन्हा भेट भटजींच्या परतीच्या मार्गावर ग्वाल्हेर येथे होते. त्या वेळीही आमांशाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या भटजींना ते त्यांच्या वाड्यात जागा देतात, आणि त्यांची मोठ्या प्रेमाने सोय करतात. वेळीप्रसंगी देशस्थ, कराडे किंवा शेणवी अशा अन्य उच्चवर्णीय जातींच्या लोकांचाही संपर्क भटजींबरोबर आलेला दिसतो, पण निम्नवर्णीयांच्या संपर्काचे उदाहरण विरळाच दिसते. या लोकांकडे राहताना त्यांना कमीतकमी तोशीस कशी पडेल याची मात्र हे प्रवासी आश्रित काळजी घेत असे दिसते. कोणाकडे राहिले म्हणून नेहमीच्या जेवणाखाण्याचा भार भटजी त्यांच्या यजमानावर टाकत नसत. ते त्यांचे जेवण स्वतःच करून खात. पण ‘संपर्कजाला’त जात हा महत्त्वाचा दुवा असला, तरी सगळेच काही आलबेल होते असेही नाही. ब्राह्मणा-ब्राह्मणांत असलेली वैमनस्येही भटजींच्या वर्णनात डोकावून जातात. बिलसिया येथील राजाच्या तुलापुरुष-दान समारंभात गौड आणि दक्षिणी ब्राह्मण यांच्यात यज्ञीय कुंडाच्या सिद्धतेवरून वाद झाला. याचे मुख्य कारण ‘हे गौड ब्राह्मण आपले ब्राह्मणाबराबर शुद्ध मनाने नसतात. अनेक प्रकारचे कूटार्थ काढून फसविण्यास पाहतात’ असे भटजींनी दिले आहे.
‘संपर्कजाल’ आणि जात यांच्यातील अन्योन्य संबंधांवरून आपल्याला असे दिसते की, जातीच्या माध्यमातून अनायासेच एक ‘संकल्पनात्मक भूगोल’ तयार होत जात असे. जिथे आपल्या जातीचे लोक आहेत, जिथे त्यांचा संपर्क घडलेला आहे किंवा घडू शकतो, अशाच ठिकाणी प्रवासी लोक जाण्याची अधिक शक्यता असे. भटजींच्या प्रवासाद्वारे आपल्यासमोर जसा त्या काळचा राजकीय आणि प्रादेशिक भूगोल उलगडत जातो, तसाच संपर्कजाल आणि परिसंचार यांच्यातून उभा राहणारा संकल्पनात्मक भूगोलही उभा राहतो. मराठी ब्राह्मण जातींचा परिसंचार कसा आणि कुठल्या ठिकाणी झाला होता, त्याचे चित्र आपल्यासमोर भटजींच्या प्रवासवर्णनातून उभे राहते.
प्रवाशाला ‘विस्मया’ची अनुभूती देणारे अनुभव, हे प्रवासातले सर्वांत महत्त्वाचे आणि लक्षणीय अनुभव म्हणायला हरकत नाही. विस्मयाचे चांगले संस्कृतोद्भव भाववाचक न सुचल्याने इथे आपण मराठीत नेहमी वापरतो त्या ‘अजब’ या फारसी विशेषणाचे ‘अजायब’ हे भाववाचक अनेकवचन आपल्या चर्चेला अधिक उपयुक्त ठरेल. विस्मय हा रंजक असल्याने आणि असे अनुभव दुर्मीळ असल्याने ऐतिहासिक काळातल्या लोकांची ‘अजायब’ ही आवडती अनुभूती होती. ऐतिहासिक दृष्टिकोणातून ‘अजायब’ या कल्पनेची उकल वेगवेगळ्या इतिहासकारांनी केली आहे. ‘हिंद-यावनी’ (Indo-persianate) नावाने ओळखल्या जाणाऱ्या मध्ययुगीन वाङ्मयात ही ‘अजायब’ची भावना अतिशय प्रबळपणे वावरताना आपल्याला दिसते. या भावनेने प्रेरित होऊनच मोगल काळात अकबर-जहांगीरसारख्या मर्मग्राही राजांनी महाभारतासारख्या ग्रंथांची भाषांतरे केली, चित्रविचित्र वस्तूंचा आणि प्राणि-पक्षी यांचा संग्रह केला, त्यांची चित्रे काढून घेतली. अर्थात ही भावना केवळ लेखन या अभिव्यक्तीपुरतीच मर्यादित होती, असे या मानण्याचे कारण नाही. ‘कथन’ या अभिव्यक्तीतूनही ‘अजायब’चा आस्वाद घेतला जाई. परिसंचार आणि संपर्कजाल यांच्याद्वारे लोक एकत्र भेटत तेव्हा ‘कथन’ हीच ‘अजायबा’ची मुख्य अभिव्यक्ती होत असे. देशांतरीच्या कथा, अनुभव, त्यांतून उत्पन्न होऊ शकणारे चांगले-वाईट परिणाम इत्यादींचे संप्रेक्षण एका माणसाकडून दुसऱ्याकडे होई, त्याला अनेकदा ‘अजायब’च्या आस्वादाची पार्श्वभूमी असे.
आधुनिक-पूर्व काळात लिहिली गेलेली प्रवास-वर्णनाची विशुद्ध उदाहरणे मराठीत विशेष नाहीत. नाना फडणीस यांच्या आत्मचरित्रात ते पानिपत-प्रसंगी उत्तरेला गेले असताना त्यांनी मथुरा-वृंदावनची यात्रा केली त्याचे वर्णन आहे. तिथे पोचल्यावर नानांना आलेली दिव्य अनुभूती त्यांनी ‘अजायब’च्या अंगाने वर्णन केली आहे. पण विस्मयरंजक वर्णनाने नटलेले असे भटजींचे हे मराठीतले पहिलेच प्रवास-वर्णन असावे. दृष्टी, श्रुती, स्मरण या बाबतींत भटजी संवेदनशील होते, हे आपले भाग्यच म्हणायला पाहिजे, अन्यथा त्यांना आलेली ‘अजायब’ची अनुभूती त्यांच्या लेखनामार्गे आपल्यापर्यंत इतक्या प्रत्ययकारितेने पोचली नसती. पण इथेही एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे भटजींची ‘ट्रेडमार्क’ अलिप्तता! मृत्यूसारख्या भीषण घटनेचे वर्णन भटजी जसे अलिप्ततेने करतात, तसेच ते या विस्मयकारक गोष्टींचेही करतात. तसे करताना ते कुठेही वाहवत गेल्याचे जाणवत नाही. असे प्रसंग वर्णिताना ते अनेकदा ‘मौज’ या शब्दाचा वापर करतात. इथे ‘मौज’चा अर्थ ‘एन्टरटेनमेन्ट’ असा न घेता ‘स्पेक्टेकल’ असा घेणे अधिक सयुक्तिक ठरते.
भटजींना त्यांच्या प्रवासात आलेल्या ‘अजायब’ अनुभवांचे ‘कथित’ आणि ‘घटित’ असे दोन भाग करता येतील. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला तेव्हाच्या समाजमनाचे अनेक कानेकोपरे विदित होतात. यांतले काही धक्कादायकही आहेत आणि असेच काही तपशील हे वैद्यांनी भटजींच्या लिखाणाचे जे ‘बॉडलरायझेशन’ केले त्यात गाळले गेले होते! ‘सत्तावनी’संबंधी ज्या आठवणी ते नोंदवतात त्यांपैकी अनेक ‘कथिते’च आहेत; प्रवासात असताना कुठेतरी मुक्कामाला उतरले, तेव्हा तिथे भेटलेल्या सहप्रवाशांनी सांगितलेल्या आहेत. काही वेळा हे सांगणाऱ्या प्रवाशांच्या कथनाबद्दल मुळातच विचक्षण असलेल्या भटजींच्या मनात संशय उत्पन्न होतो. ब्रह्मावर्ती भेटलेल्या दोन ब्राह्मणांना ‘तुम्ही काय सांगणे सांगाल ते खरे मात्र सांगावे’ असेही भटजींनी सुनावले आहे. पण इथे त्यांचे काका त्या ब्राह्मणांच्या कथनावर विश्वास न दाखवल्याबद्दल त्यांना रागे भरतात आणि ते ब्राह्मण ‘फार समर्थ प्रामाणिक कधीही खोटे बोलणार नाहीत’ असे त्यांना खडसावतात. असे असूनही भटजींनी नोंदवलेल्या काही-काही घटना केवळ गप्पाच म्हणता येतील अशा आहेत. उदाहरणार्थ, महूच्या छावणीत असताना तिथल्या शिपायांकडून ऐकलेली बंडाचा उद्रेक कसा झाला याची सुप्रसिद्ध ‘काडतूस कथा’ ते व्यवस्थित वर्णन करतात. पण हिंदू धर्म बुडवू घातलेल्या इंग्रज सरकारने ठिकठिकाणच्या राजे-रजवाडे लोकांना कलकत्त्याला बोलावून आम्ही तुमचा धर्म असा बुडवणार म्हणून त्यांच्यासमोर चौऱ्याऐंशी कलमांची यादी वाचली, मग सर्व राजमंडळ ‘आता एकंकार होणार’ म्हणून भयचकित झाले, त्यानंतर इंग्रजांनी त्यांना ह्या यादीद्वारे ‘ब्लॅकमेल’ करून काडतुसांच्या अंमलबजावणीची बाब त्यांच्या गळी उतरवली वगैरे कथा शुद्ध बाजारगप्पा आहेत.
बंडाव्यतिरिक्त भूतकाळातल्या इतर काही गोष्टीही भटजींना प्रवासाच्या माध्यमातून कळत गेल्या. या भूतकाळाची व्याप्ती मागच्या दोन-तीन वर्षांपासून तो थेट दोन हजार वर्षांपर्यंत मागे जाते. अतिप्राचीन अशा उज्जैन किंवा अयोध्या यांसारख्या शहरात ज्याला आपण आज ‘पुरातत्त्वीय तथ्ये’ म्हणू, ती जागोजागी भटजींच्या दृष्टीस पडली. त्यांची कारणमीमांसा भटजी अनेकदा लोककथांच्या संदर्भांतून देतात आणि त्यामुळे अशा तथ्यांकडे शास्त्रीय माहिती उपलब्ध होण्याच्या आधी लोक कुठल्या नजरेने बघत, याचे आपल्याला दर्शन होते. ‘असे म्हणतात की, उज्जनी नगरी उलटी घातली आहे. खणावयास लागले म्हणजे एखादे भिंताड लागते. ते खणून काढले म्हणजे एका इमारतीचे काम होते’, यासारख्या विधानांवरून लोकांची पुरातत्त्वाकडे बघायची दृष्टी दिसते. याचेच पर्यवसान मग ही नगरी उलटी का झाली, यासंबंधी एखादी लोककथा प्रसृत होण्यात होते. अयोध्या येथे गेले असताना तिथल्या पुरावशेषांच्या ढिगाऱ्यातून लोक जळके तांदूळ घेऊन जात असल्याचे भटजींना दिसले. असे जळके तांदूळ किंवा धान्य सापडणे ही पुरातत्त्वात आढळणारी नेहमीची गोष्ट आहे, पण तिथल्या लोकांनी याचा संबंध दशरथ राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञात दिलेल्या आहुतींशी लावला होता. मानव-वंश-शास्त्राच्या अंगाने पुरातत्त्वाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या दृष्टीने अशी माहिती मूल्यवान आहे. पुरातत्त्वीय तथ्यांप्रमाणेच काही नैसर्गिक ‘अजब’ गोष्टींचीही संगती पुराणकथांद्वारे लोक लावत असत. अयोध्येहून काशीला जाताना वाटेत चुनखडीचे डोंगर आणि काटेरी गोखरूशिवाय कुठल्याही वनस्पती नसणारा प्रदेश लागला. या वैशिष्ट्यांचा संबंध पुराणांतरीच्या हरिश्चंद्र-कथेशी लागत असल्याचे स्थानिक लोकांनी भटजींना सांगितले.

भटजींना प्रवासात जाणवलेली विस्मयाची व्याप्ती ही अर्थातच पुरातत्त्वापुरती मर्यादित नाही. वेगवेगळ्या तीर्थांना भेटी देताना तिथल्या काही प्रथा-परंपरा किंवा काही प्राण्यांच्या चमत्कारिक वर्तणुकी यांचेही ‘अजायब’जन्य वर्णन भटजींनी केले आहे. ती वर्णने वाचून काही वेळा पेशवाई काळात लोकांच्या पत्रव्यवहारातून नोंदल्या गेलेल्या ‘चमत्कारां’ची आठवण होते आणि पेशवाई उलटून काही दशके झाली असली, तरी अशा प्रसंगांच्या बाबतीत जनमानस तितकेच भोळेभाबडे असल्याची खातरी पटते. अयोध्या हे रामाचे स्थान म्हणजे तिथे वानरांना लोकांकडून अभय मिळे हे साहजिकच म्हणायचे. भटजी अयोध्येला असताना तिथे परशुरामबाबा म्हणून एक चित्पावन संत राहत होते, त्यांच्या सांगण्यावरून शिंदे सरकारांनी पाच-सहा हजार वानरांना बुंदीच्या लाडवांचे भोजन कसे घातले होते, याची विस्मयकारक माहिती भटजींनी दिली आहे! तसेच त्यांच्याबरोबर यात्रा करत असलेल्या एका विधवेचे गाठोडे एक वानर झाडावर घेऊन गेला आणि जिलबीचा द्रोण आणून दिल्यावर त्याने जिलब्या घेऊन गाठोडे परत दिले, अशीही एक मजेशीर गोष्ट भटजींनी सांगितली आहे.
‘घटित’ प्रकारांतील विस्मयकारक गोष्टींपैकी काहींचे उल्लेख वर येऊन गेले आहेत – उदाहरणार्थ, संकटसमयी ईश्वराने हस्तक्षेप केल्यासारखी मदत अचानक उत्पन्न होणे. काकांना उष्माघात झाल्यानंतर भटजींचे सहप्रवासी ब्राह्मण त्यांना तसेच सोडून देऊन चालते होतात, पण एक गाडीवान तिथे अचानक येतो आणि काकांना नजीकच्या गावाजवळ नेण्यापुरती गाडीची सोय होते. तिथे पोचल्यावर काका-पुतण्यांना उतरून देऊन तो पैसेही न घेता विरुद्ध दिशेने गाडी उधळून चालता होतो, तेव्हा ईश्वरानेच ही कृपा केली आणि गाडीवानाच्या रूपाने आपल्याला दर्शन दिले; अशी भटजींची बालंबाल खातरी होते. अशा चमत्कारांबरोबरच भटजींच्या प्रवासात संकेत, शकुन-अपशकुन, स्वप्ने, पूर्वसूचना वगैरे बाबींचाही त्यांना स्वतःला तसेच अन्य लोकांना या बाबींचा अनुभव सतत येत गेल्याचे त्यांनी नोंदवले आहे. अशा प्रकारांतून भोवतालावर किंवा वस्तुस्थितीवर झालेला परिणाम भटजींनी ‘अजायब’ म्हणूनच नोंदवला आहे. नानासाहेब आणि त्यांचे बंधू कानपुरावर लढाई करण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना झालेल्या अपशकुनांची यादीच भटजींनी दिली आहे. त्यात मांजर आडवे जाण्यापासून घोडा अडणे आणि त्याच्या डोळ्याला पाणी येणे, लाकडे विकण्याकरता बाई समोर येणे; अशा तऱ्हेतऱ्हेच्या अपशकुनांचा समावेश आहे! झांसीवाल्या बाईसाहेबांना शत्रूचा भडिमार शहरावर चालू असताना एक सुवासिनी स्त्री ते तोफेचे गोळे बुरुजावर उभी राहून झेलते आहे आणि झेलता-झेलता काळे झालेले हात बाईसाहेबांना दाखवून ‘बघ, म्हणूनच मी हे गोळे झेलते आहे’ असे चमत्कारिक स्वप्न पडल्याचे त्या त्यांच्या आश्रितवर्गाला एके सकाळी सांगतात. या स्वप्नात एक प्रकारची गूढता असल्याने ‘लोकांस आश्चर्य जाहले’ असे भटजींनी नोंदवले आहे. स्वप्नाचा दुसरा प्रसंग भटजींना स्वतःलाच पूर्वसूचनेचा अनुभव येतो तेव्हा वर्णिलेला आहे. गंगोदकाची कावड वाहून आणताना ती चमत्कार व्हावा त्याप्रमाणे जड होऊ लागते आणि भटजी मेटाकुटीला येतात. आजूबाजूचे लोक या अनुभवावर ‘तुम्ही कावड नेऊ शकणार नाही, कारण तुमच्या मातापितरांचे तेवढे पुण्यच नाही, सबब कावडीतले गंगाजल ओतून द्या’, अशी मखलाशी करतात! त्या दिवशी झोपताना भटजी कुलस्वामिनीची करुणा भाकतात आणि झोपेत त्यांना स्वप्न पडते. त्यात त्यांच्या लहान बहिणीप्रमाणे भासणारी एक मुलगी येऊन ‘दादा, हा तर मी केवळ तुझी परीक्षा बघण्याकरता खेळ केला, पण तू चिंतित होऊ नकोस. तुझ्याबरोबर मी येणार आहे,’ असे सांगते. ती मुलगी साक्षात गंगामाईच होती, यावर भटजींचा विश्वास बसतो आणि ते आश्वस्त होऊन कावड वाहतात.
भटजींच्या मनाची घडण पारंपरिक असल्याने अर्थातच त्यांना जाणवलेल्या विस्मयानंदात तीर्थक्षेत्रे, नद्या, धार्मिक कर्तव्ये वगैरे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. गंगेचे दर्शन त्यांना सर्वप्रथम काल्पीहून ब्रह्मावर्ताला जाताना खिरागाडेश्वर नावाच्या शैव स्थानाजवळ होते; तेव्हा त्यांच्या मनाची जी स्थिती झाली, ती त्यांनी अतिशय दयार्द्रतेने वर्णन केली आहे. ‘आजवर आपण अनेक कष्ट, गरिबी उपभोगिली परंतु गंगादर्शनाने आयुष्याचे सार्थक झाले’ अशी त्यांची भावना झाली. पण या क्षेत्रांत चालणाऱ्या भ्रष्ट चालीही त्यांच्या मनात विस्मय उत्पन्न केल्याशिवाय राहत नाहीत. काशीला हर प्रकारचे गैर धंदे, लांड्यालबाड्या चाललेल्या ते पाहतात; तेव्हा त्यांना साहजिकच इतक्या पवित्र क्षेत्री हे सगळे कसे चालते, असा भाबडा प्रश्न पडतो. पण क्षेत्रस्थ ब्राह्मणांकडे त्याचे उत्तर (अर्थातच!) तयार असते. त्यांच्या मते काशीची पुण्याईच एवढी की तिथे कुठलेही कृत्य गैर ठरतच नाही! या त्रांगड्या तर्कावर भटजी विश्वास ठेवतात, पण त्यांना जाणवलेला किंतु त्यांनी लपवून ठेवलेला नाही.
भटजींच्या लेखनातील ‘विस्मया’चा सर्वोत्कृष्ट आविष्कार हा आपल्याला ते लोकांच्या चालीरिती, आणि त्याही विशेषतः लैंगिक स्वरूपाच्या, वर्णन करतात तेव्हा दिसतो! एकंदरीतच, पूर्वाधुनिक समाजात जे काही लैंगिक वर्तन असावे असे आपले समज असतात, त्यांना पूर्णपणे तडा जाईल अशी भटजींची काही वर्णने आहेत. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भटजींच्या लेखणीतून आपल्याला होणारे ‘स्त्रीत्वा’चे दर्शन. भटजींच्या प्रवासात एका बाजूला आपल्याला गरीब, भाबड्या बायका दिसतात; तर दुसऱ्या बाजूला आपल्या स्त्रीपणाची वेगळीच ओळख पटलेल्या काही वेधक बायका. यांत सर्वांत उठून दिसणारे व्यक्तित्व म्हणजे अर्थातच झांशीच्या लक्ष्मीबाईसाहेब. पुरुष-वेषाने राहणाऱ्या, पंधरा-वीस हांडे कडकडीत पाणी घेऊन नाहणाऱ्या, दागदागिन्यांचा विशेष सोस न करणाऱ्या, भिकाऱ्यांना थंडीत गरम कपडे दान करणाऱ्या, अश्वपरीक्षेत नामांकित असलेल्या, वासना काबूत ठेवण्यासाठी रपेट, मल्लखांब वगैरे व्यायामांचे साधन करणाऱ्या अशा अनेक पैलूंतून भटजी लक्ष्मीबाईंना आपल्यापुढे सादर करतात.
पण लक्ष्मीबाईंची वर्तणूक या बाबतीत शुद्ध असली तरी इतरत्र अशी परिस्थिती नव्हती. पुरुषांमध्ये षंढत्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे (‘शेकडा पंचवीस षंढ समजले पाहिजेत’ – इति भटजी!) बुंदेलखंडातल्या स्त्रिया ‘स्वैरिणी’ बनल्या होत्या. हा स्वैराचार उघड चाले, त्याचे वर्णन भटजींच्याच शब्दात देणे योग्य – ‘येखादा पुरुष स्त्रीचे मनात भोगावा असे आल्यास तिणे आपले नवऱ्यास सांगोन त्या पुरुशापासी त्याणे स्नेह करून मग त्या पुरुषास आपले घरी नेऊन पानसुपारी देऊन त्याजपासी स्नेह वृद्धिंगत करून मग येके दिवसी आपण काही कामाकरिता येकटेच जावे आणि त्याचे स्त्रीने त्या पुरुषाबरोबर क्रीडा वगैरे करावी, असा प्रकारही जागोजाग आढळला’. संध्याकाळी देवदर्शनाच्या मिषाने बाहेर पडावे आणि कुंटणखान्यात जाऊन परपुरुषाचा उपभोग घ्यावा, असे रोज करणाऱ्या स्त्रियाही होत्या! ब्रह्मावर्ती असताना एका सूनबाईला सासूने याच्यावरून काही बोलले असता, तिने ‘आम्ही गंगास्नानास जाते समई एखादे मित्राकडे जातो. परंतु पूर्वी तुमचे उमेदीत माजघरांत चोळी लुगडे सोडून टाकून जिन्यांनी माडीवर जाऊन दिवाणखान्यात पाच-चार मंडळी महाराज श्रीमंतांपासी बसली असतां तेथे जाऊन सर्वांस नमस्कार करून खुंटीवर ठेवलेली पैठणी घेऊन त्याजसमोर नेसून चोळी घालून त्या मंडळीत श्रीमंत सांगतील त्याचे मांडीवर बसून विडा खात असा – असा तर आमचा धिंगाणा नाही ना?’ असे सासूबाईंना उलटे सुनावले! ‘वूमन्स लिब’, ‘सेक्शुअल फ्रीडम’ वगैरे कल्पना आपल्याकडे फारच अलीकडच्या आहेत, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी भटजींची अशी वर्णने डोळे खाडकन उघडवणारीच ठरावीत. पण भटजींचा या बाबतीतला एकंदरीत दृष्टिकोण परंपरा-शरण असाच आहे. एक तर अशी वर्तणूक ही त्यांच्या दृष्टीने समर्थनीय असणे शक्यच नव्हते. किंबहुना म्हणूनच ते हे प्रसंग ‘अजायब’च्या संदर्भात नोंदवतात. झांशीला जी कत्तल झाली, त्याचे स्पष्टीकरण भटजींनी या स्वैराचाराकडे लावून दिले आहे. त्यांच्या मते ही कत्तल म्हणजे झांशीचे ‘शुद्धीकरण’ व्हावे म्हणून ईश्वरानेच घडवून आणलेली क्रिया होती! झालेल्या कत्तलीतून उभ्या झांशी शहराने हे व्यभिचाराविषयीचे प्रायश्चित्त घेतले आणि त्यामुळे ‘पूरवापार दोष मुळीच राहिला नाही’ असे भटजींचे मत आहे.
उपसंहार म्हणून या लेखात मांडलेले काही मुद्दे एकत्र बघू. विष्णुभटजी गोडसे यांचे ‘माझा प्रवास’ हे पुस्तक आजवर अठराशे सत्तावनच्या संदर्भातच विशेषेकरून अभ्यासले गेले आहे. या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेबद्दल एतद्देशीय दृष्टिकोणातून असलेला पुराव्यांचा अभाव हा या अभ्यासाच्या मुळाशी आहे. असे असले, तरी मूलतः हे लिखाण एका प्रवासाचे वर्णन आहे आणि त्याचमुळे त्याही प्रेक्ष्यात ते महत्त्वाचे ठरते, या बाबीकडे लक्ष वेधायचा प्रयत्न इथे केला आहे. एकोणिसाव्या शतकात लोक बहुशः पायी प्रवास कसा करत, त्यांत त्यांना कुठल्या अडचणी येत, कुठल्या सुविधा लागत, वाटेने त्यांची सोय कशी होई, वगैरे बाबतींची प्रत्ययकारक माहिती भटजी आपल्याला पुरवतात. ऐतिहासिक घटनांबाबतच्या पुराव्याची छाननी आणि लेखन करण्यासाठी महाराष्ट्रात तरी ‘पॉझिटिव्हिस्ट’ शैलीचा वरचढपणा राहिला आहे. पुराव्याच्या सत्यासत्यतेवर किंवा प्रामाण्यावर इतिहासाचे शक्य तितके ‘यथातथ्य’ आणि ‘अचूक’ वर्णन काटेकोरपणे करण्यावर ही शैली भर देते. पण उत्तर-आधुनिक शैलीतून इतिहास अभ्यासताना, त्यात इतर सामाजिक शास्त्रांतल्या विविध संकल्पनांद्वारे ऐतिहासिक पुराव्याची संगती कशी लावता येते आणि त्यातून इतिहासाच्या प्रवाहांवर कसा प्रकाश पाडता येतो, या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. ‘माझा प्रवास’वर अशा प्रकारे विश्लेषक संकल्पनांद्वारे विशेष प्रकाश आजवर टाकण्यात आला नव्हता आणि त्यातल्या ‘प्रवासा’चे वर्णन हे काहीसे उपेक्षितच राहिले होते. त्या दृष्टीने या लिखाणावरचा ‘फोकस’ थोडासा ‘शिफ्ट’ करून अशा अंगांतून हे लिखाण कसे विश्लेषित करता येते, हे दाखवण्याचा थोडा प्रयत्न या लेखात केला आहे. ‘संपर्कजाल’, ‘परिसंचार’, ‘अजायब’ किंवा विस्मय, अशा विश्लेषक संकल्पना वापरल्यास आपल्याला ‘माझा प्रवास’चे एक ऐतिहासिक लेखन म्हणून जे महत्त्व आहे, ते वेगळ्या प्रकारे ध्यानात येऊ लागते. हा दस्तऐवज केवळ ‘सत्तावनी’सारख्या ऐतिहासिक घटनेतल्या तपशिलांची सत्यासत्यतेच्या बाबतीत इतर पुराव्यांशी तुलना करण्याच्या मर्यादित कारणाने उपयोजिला जावा, हे काहीसे त्याचे दुर्दैवच आहे, कारण भटजींनी आपल्याला यातून इतर अनेक बाबींचेही मनोज्ञ दर्शन घडवले आहे. त्या दृष्टीने ‘माझा प्रवास’ला त्याचे यथोचित स्थान प्राप्त व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे.
शैलेन भांडारे

Very interesting article. His command over Marathi language is impressive. Enjoyed reading the article.
LikeLike
अप्रतिम जमलंय हे शैलेन. फार आवडलं. अनेक अंगांनी एखाद्या पुस्तकाकडे कसं पाहाता येतं, याचा धडाच जणू. इतकं प्रदीर्घ व तरीही रोचक लिहिल्याबद्दल धन्यवाद.
LikeLike