लॅन्ड ऑफ मॉर्निंग काम- दक्षिण कोरिया

चिन्मय भावे

सृष्टीमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक… ही समर्थांची ओळ मला अगदी पटते.

माझा लाडका डिझायनर म्हणजे वास्तुरचनाशास्त्राचं प्रशिक्षण न घेता जगातल्या महत्त्वाच्या वास्तुविशारदांमध्ये जागा पटकावणारा जपानचा तडाओअंडो.. त्याचंही मत प्रवास म्हणजे खुली शाळा असंच!

आयआयटी मुंबईत डिझाईनचं प्रशिक्षण घेत असताना दक्षिण कोरियन सरकारची शिष्यवृत्ती उपलब्ध आहे असं समजलं आणि मग प्रवासाची आणि शिक्षणाची एकत्र संधी मिळाली. सोलमध्ये असलेल्या दोंगुक विद्यापीठात एक सत्र शिकायचं आणि एक प्रकल्पही करायचा असं ठरलं…

यापूर्वी मी दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, केनिया, सिंगापूर, इंडोनेशिया अशा अनेक देशांत गेलो होतो… पण भारताबाहेर एखाद्या शहरात चार महिने राहण्याचा हा पहिलाच अनुभव.

शिष्यवृत्तीच्या रकमेत सगळं बसवायचं म्हणजे तारेवरची कसरत! त्या वेळी घरीही खूप तणाव होते… बायकोनं निभावून नेलं म्हणून ही संधी स्वीकारता आली… मी चार महिने एकटा निघून जाणार… आम्ही नुकतेच नव्या घरी राहू लागलो होतो… तिच्यावरच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या होत्या… मी विद्यार्थी असल्यानं आर्थिक चणचण तर होतीच… पण माझं जाणं तिला कितीही आवडलं नसलं, तरी माझ्यासाठी तिनं चोख तयारी करून ठेवली होती… कोरियात खाण्यापिण्याचे हाल होतात असं सर्वांचं म्हणणं त्यामुळे जवळ-जवळ पाच किलो थेपले होते… हवामानात बदल झाला रे झाला की मला सर्दी-ताप-खोकला होतो त्यामुळे काढ्याच्या बाटल्याही घेतल्या होत्या.

दोंगुक एक बुद्धिस्ट विद्यापीठ आहे आणि माझ्या प्रकल्पाचा विषयही बौद्ध दृश्यसंस्कृतीशी निगडित असणार होता त्यामुळे… थायलंडचे बौद्ध अवशेष पाहून पुढं जायचं असा विचार करत होतो… परत येताना मला मॅकबुक प्रो विकत घ्यायचा होता… तो हाँगकाँगला स्वस्त मिळतो… मुंबई-सोल अशी थेट फ्लाईटही आहे… जवळ-जवळ आठ तास लागतात पोचायला, पण त्याचं तिकीट होतं पासष्ट हजार रुपये … मी स्टॉपओव्हर प्रवासाचं तिकीट पाहिलं तर फक्त ४४ हजार रुपये पडत होतं… म्हणजे मुंबई-बँकॉक-सोल-हाँगकाँग-मुंबई असं तिकीट घेऊन पंधरा हजार वाचत होतेच शिवाय दोन कामंही साध्य होत होती. यापूर्वी २०११ मध्ये मी कामासाठी नायजेरियाला गेलो होतो, तेव्हा एमिरेट्सनं जाण्याऐवजी मी नैरोबीमार्गे गेलो व परत येताना सप्टेंबर महिना असल्यानं मसाईमारा अगदी स्वस्तात पाहता आलं होतं… इंडोनेशियाला जाताना सिंगापूरमार्गे गेलो आणि तिथं एक वर्कशॉप करून नातलगांनाही भेटता आलं… सगळं जग पाहायला आयुष्य कमी पडणार आहेच आणि पैसेही पुरणार नाहीत, तेव्हा ही क्लृप्ती कामी येते.

bibimbap
बिबिम्बाप

मला मुंबईचा मान्सून विशेष आवडत नाही… म्हणजे कवितांमधला पाऊस कितीही रोमांचक वाटला, तरी सगळं सामान जपत न भिजता किंवा चिंब भिजून मुंबईत कामाची कसरत करणं म्हणजे एक सजा असते, जवळपास चार महिने… जेव्हा इंचॉन विमानतळाच्या बाहेर आलो, तेव्हा अगदी मुंबईत असावं असा पाऊस पडत होता… अक्षांश रेखांश बदलले, तरी आपल्या नशिबात भौगोलिक भोग तेच… मी चडफडलो… दोंगुकमध्ये पोचलो, तेव्हा दुपार झाली होती आणि सामान लावून डॉर्मिटरीच्या कॅन्टीनचं पहिलंवहिलं कोरियन जेवण जेवायला गेलो. मेन्यूवर इंग्लिशमध्ये काहीच दिसेना … तेवढ्यात जून ह्यपक्वॉन हा माझा स्थानिक मित्र तिथं येऊन पोचला! त्यानं मला बिबिम्बाप आणि उचूजान खाण्याचा सल्ला दिला. शिवाय सोबतीला किंबाप होताच… बिबिम्बाप म्हणजे चिकट भाताबरोबर विविध भाज्या आणि खिमची असा कॉम्बो आणि किंबाप म्हणजे भात व भाज्या भरलेला समुद्रीवेलीच्या पानाचा रोल. मी हिंदू आहे हे गृहीत धरून ‘बुलगोगिने’ म्हणजे ‘बीफ नको’, असं बजावायला त्यानं मला शिकवलं.  आमच्या विद्यापीठाच्या मागेच नामसानचा डोंगर आणि सोलचा ब्रॉडकास्ट मनोरा होता. तिथून पाहिलेली संध्याकाळ नेहमी लक्षात राहावी अशी होती. हान नदीच्या पलीकडे सूर्य कधी मावळला आणि चमचमणाऱ्या दिव्यांचा समुद्रच दिसू लागला. विद्यापीठाच्या छतावरून रात्रीचं सोल पाहताना मध्यरात्र कधी उलटून गेली समजलं नाही.

old and new
नव्याजुन्याचा संगम

मी जेव्हा पहिल्यांदा शहरातून फेरफटका मारला, तेव्हा मला खूप प्रकर्षानं जाणवलं की इथं नव्याचा आणि जुन्याचा खूप सुंदर संगम आहे. कितीतरी ठिकाणी प्राचीन कोरियन इमारतींच्या बाजूलाच नव्या आधुनिक वास्तुरचना होत्या… लोकांच्या खाण्यापिण्यात आणि कपड्यांमध्येही हेच जाणवत होतं. एकीकडे अमेरिकन जगातल्या नव्या भन्नाट कल्पना आणि दुसरीकडे कोरियन संस्कृतीतून आलेल्या सवयीचा वारसा. प्रेमात मग्न असलेली जोडपी दिसायची आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन सहल काढणारे लोकही दिसायचे.  दक्षिण कोरिया पूर्वी जपानची वसाहत होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचं उत्तर आणि दक्षिण असं विभाजन झालं… माणसं, नातेवाईक दुरावले… उत्तरेवर साम्यवादी व्यवस्थेचा पगडा तर दक्षिण भांडवलशाहीच्या रस्त्यावर. जर्मनी आणि व्हिएतनाम एकत्र झाले, पण आपण एक होऊ शकलो नाही या गोष्टीची वेदना कोरियन लोकांच्या मनात आजही आहे. कदाचित आजची पिढी याला काही प्रमाणात स्वीकारू लागली आहे. किम जॉन्गऊन याच्यासारख्या माथेफिरू हुकूमशहापेक्षा भांडवलशाही बरी, असा अनेक तरुणांचा रोख होता. पण घरोघरी एक भाऊ उत्तरेत तर एक दक्षिणेत राहिल्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्यांच्या अरिरांग गीतातून या वेदनेची थोडीशी झलक आपल्याला अनुभवता येते. मला शब्द तर समजले नाहीत; पण काहीतरी खूप मौल्यवान,  हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेलं गमावल्यावर जे वाटतं ते भाव या गीतात मी अनुभवले.

जपान आणि कोरिया यांमध्ये अनेक शतकं संघर्ष होता. आरमारी युद्धात जपानी आक्रमक निपुण. त्यांना राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन टक्कर देणाऱ्या आरमारी सेनापतीची, ऍडमिरल यि-सून-शिनची कहाणी मला एक मोठा पुतळा पाहिल्यानंतर समजली. अखेरच्या श्वासापर्यंत लढून यिनं कोरियाला विजय मिळवून दिला. स्वतःच्या राजानं त्याच्यावर संशय घेऊन त्याला तुरुंगात टाकलं तरीही यि-सून-शिनची राष्ट्रनिष्ठा अढळ राहिली. अजून एका पुतळ्यानं माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी तो कोणाचा आहे अशी पृच्छा केली, तेव्हा कोरियन भाषेबद्दल मला एक रोमांचक गोष्ट ऐकायला मिळाली. कोरियात सेजॉन्ग नावाचा राजा होऊन गेला. प्रजाहितदक्ष आणि कनवाळू राजा. पूर्वी कोरियन भाषा चिनी लिपीचा वापर करून लिहिली जात असे. पण निरक्षर सामान्य लोकांना ही लिपी येत नव्हती. शिवाय कोरियन भाषेतले अनेक उच्चार या लिपीनं दाखवता येत नसत. पण कोरियन अभिजनांना चिनी लिपीचं आकर्षण होतं, त्यांचा नव्या लिपीला विरोध होता. हा विरोध मोडून राजाच्या समितीनं हंगूल लिपी निर्माण केली आणि कोरियन संस्कृतीला एक नवी संजीवनी मिळाली. दरवर्षी कोरियन भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरियन टायपोग्राफीतलं मोठं नाव आंग सॅन सु यांना भेटण्याची संधी मला मिळाली कारण माझं आडनाव भावे! त्यांची पत्नी व ते विनोबा भावेंच्या भूदानयात्रेत सहभागी झाले होते. दक्षिण व उत्तर सीमांजवळच्या पाजूबुक सिटीत आज ते शिकवतात. उंच आकाशात उडणारा पक्ष्यांचा थवा पाहून ते मला म्हणाले, ‘यांचं चांगलं आहे, व्हिजा नको की पासपोर्ट नको!’

वसाहतवादी जपानच्या सत्ताधीशांनी कोरियन जनतेचा खूप छळ केला. कोरियाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आठवणी सोलमधल्या सेओडेमून तुरुंगात एका म्युझियमच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत. तर कोरियन युद्धाच्या आठवणी युद्धसंग्रहालयात पाहायला मिळतात. कोरियन युद्धात भारतीय सैन्याच्या डॉक्टरांच्या तुकडीनं जखमींची शुश्रूषा केली होती, त्यामुळे तिथं वॉर मेमोरियलमध्ये आपला तिरंगा फडकवण्यात येतो.

korean war
कोरियन वॉर मेमोरियल

गमतीची गोष्ट अशी की, सोलमध्ये प्रत्येक गोष्टीचं म्युझियम आहे. अगदी कोरियन चिकट भात, कोरियन खिमची आणि कोरियन शाळा यांचंसुद्धा. सोल हे जगातल्या पर्यटकांच्या १० अतिलोकप्रिय शहरांपैकी एक आहे आणि इथं येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं आणि त्यांना खर्च करायला कसं प्रोत्साहित करायचं; हे इथल्या लोकांना अगदी छान जमतं. सोलमध्ये तीन-चार राजवाडे आहेत जिथं पर्यटकांची रीघ लागलेली असते. तिथल्या छपरांना नैसर्गिक रंगांनी सजवलं जातं आणि ते रंग कधी आकाशाच्या निळाईशी सूत जमवतात तर कधी विरोधी रंगांनी आपलं लक्ष वेधून घेतात. चांगदेओकगुंग या राजवाड्यात एक बाग आहे. तिथं तळ्याकाठी उभं राहून झाडांच्या गर्दीकडे पाहताना अनेक शतकं वेळ पुढेच सरकली नाही, असा भास होतो.

माझी खाण्याची सोय तर चांगली झाली होती, पण कधी-कधी पैसे कमी पडत किंवा शिष्यवृत्तीचे पैसे उशिरा मिळत असत, तेव्हा मी चुंगमुरो मेट्रो स्टेशनजवळ  (जिथं माझं विद्यापीठ होतं) एका फेरीवाल्याकडे ऑम्लेट पाव व फीश सूपवर ताव मारायचो. एक आजी-आजोबा ते दुकान चालवत. त्यांना इंग्लिश येत नसे पण मी कसा आहे, ऑम्लेट आवडलं का,  सगळं ठीक आहे का; असं हावभाव करून ते विचारत असत. एक प्रामाणिक आणि प्रसन्न हास्य या दोघांच्या चेहऱ्यावर नेहमी असायचं. कोरियन लोकांना पाळीव प्राणी ठेवण्याचा फार शौक. त्यामुळे ससे,  कुत्री, मांजरं विकणारे फेरीवाले सगळीकडे दिसायचे. ज्या लोकांना ही हौस घरी पूर्ण करता येत नाही त्यांच्यासाठी कॅट आणि डॉग कॅफेसुद्धा आहेत. पण रस्त्यावर ससे विकणं कदाचित बेकायदेशीर असावं, कारण त्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावर मी फोटो काढत असताना ज्वालामुखी भडकला होता.

sejong

सोल शहर कोरियन युद्धात १९५३ पर्यंत चार वेळा बेचिराख झालं होतं. आज मात्र ते कोणत्याही जागतिक कीर्तीच्या शहराला हेवा वाटावा असं शहर आहे. माझ्या बरोबरचे अनेक स्कॉलर युरोपातून आणि अमेरिकेतून आले होते. सोलची परिवहन व्यवस्था पाहून तेदेखील थक्क झाले. मी गेलो होतो तेव्हा, २०१३ साली सोल मेट्रोचे १५ मार्ग होते आणि अजून नवे मार्ग तयार करण्यात येत होते. पाचशेहून अधिक स्टेशनं होती. तुम्ही कुठेही असा ४००-५०० मीटरच्या टप्प्यात मेट्रो स्टेशन मिळेलच. आश्चर्य वाटतं पण तिथल्या चार महिन्यांच्या वास्तव्यात मी फक्त तीनदा टॅक्सी केली असेल. एयरपोर्ट ते सोल मध्यवर्ती स्टेशन अशी एक्स्प्रेस सर्व्हिस आहे जी खूप स्वस्तही आहे आणि जलदही आहे. शहराच्या मधून वाहणारी हान नदी पूर्वेकडून शहरात येते आणि मग पश्चिमेला इंचॉनच्या दिशेनं वाहताना शहराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करते. या नदीवर आज २४ पूल आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंना ६-८ मार्गिकांचे महामार्ग आहेत. हे सगळं आपल्याला मुंबईत नसतं का करता आलं? असा प्रश्न मला अनेकदा पडला आहे. लोकसंख्येचं म्हणाल तर सोलचीही लोकसंख्या अडीच कोटींच्या आसपास आहे आणि जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या घनता असलेल्या भागांपैकी एक सोल मानलं जातं.

मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणेच इथले रहिवासी सोलच्या मेट्रोमध्ये रोज काही तास प्रवास करत असतात. मेट्रोमध्ये लांबचा प्रवास मोबाईलवर डेलीसोप पाहण्यात किंवा फुटबॉल सामने पाहण्यात निघून जातो. बरेच मार्ग भुयारी असले, तरीही नेटवर्क उत्तम असतं. जिथे जाल तिथं तुम्हांला वायफाय मिळेल, असा हा देश आहे. याही बाबतीत मला कोरियातलं द्वैत दिसलं. एका बाजूला मोबाईल स्क्रीन पाहण्यात गढून गेलेले चेहरे तर दुसरीकडे मेट्रोमध्ये सायकल टाकून लांबच्या सफरीला निघालेले फिटनेस फ्रीक लोक.

कोरियन वास्तुशास्त्रात पर्वतांना फार महत्त्व आहे. सोल शहराला डोंगरांनी वेढलेलं असल्यानं या जागेला वसाहतीसाठी पोषक मानलं गेलं. कोरियामध्ये असलेल्या विविध डोंगरांमध्ये ट्रेकिंग, हायकिंग करणं हा इथल्या लोकांचा आवडता उद्योग. मी जेव्हा दक्षिण कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरील सोराकसान या नॅशनल पार्कमध्ये हाईकला गेलो होतो, तेव्हा मला ६०-७० वर्षांवरचे अनेक लोक अगदी उत्साहानं चढताना दिसले. उल्सान बावी हा ग्रॅनाईटच्या सहा डोंगरांचा समूह… त्याच्या पायथ्याशी निबिड अरण्य… त्यातून वाहणारे निर्मळ झरे… आणि या वातावरणात स्थितप्रज्ञ मुद्रेत कमळाच्या आसनावर बसलेली ६२ फुटी बुद्धाची मूर्ती.

तिथं जेवत असताना एका कोरियन माणसानं गप्पा मारायला सुरुवात केली. तो भारतात काही वेळा कामासाठी आला होता…  आग्र्यातील ताजमहाल पाहून तो व त्याची पत्नी कसे मंत्रमुग्ध झाले होते, ही गोष्ट त्यानं खूप उत्साहानं सांगितली. पाहुणचार म्हणून कोरियन राईस वाईन म्हणजे माकोली प्यायला दिली. उत्तप्याप्रमाणे दिसणारा काहीतरी पदार्थ तो खात होता. त्यानं मला तो पदार्थ खाऊन पाहण्याचा आग्रह केला. मी तो कोरियन उत्तप्पा खाल्ला आणि मला तो खूपच आवडला… त्यात कसलंतरी लुसलुशीत सारण होतं. त्या पदार्थाचं नाव सीफूड पंजूओम आणि ते सारण ऑक्टोपसचं होतं, हे मला नंतर समजलं. तेव्हापासून मी एक धडा घेतला… आधी खायचं… ते आवडलं तर विचारायचं की, त्यात कायकाय घातलं आहे. एकदा मी पालक आणि सीफूड सूप ऑर्डर केलं होतं, तेव्हा वेटर बागकामाची कात्री व सूप बोल घेऊन आला. मला काही समजेना… नंतर लक्षात आलं की सूपात पालकाची अख्खी पानं आहेत. हे सगळे नवेनवे खाद्यपदार्थ चाखत असताना मुंबईहून आणलेले थेपले कधी संपले ते कळलंही नाही … माझ्या बायकोनं, मानसीनं दिवाळीचा फराळ पाठवला असल्यानं खाण्याच्या बाबतीत घराची आठवण कधी त्रास देत नसे. कधी वाटलंच तर दुर्गा नावाच्या नेपाळी-भारतीय हॉटेलमध्ये थाळी खाऊन यायचो… पण ते महागडं प्रकरण होतं.

मी भारतीय… म्हणजे गौतम बुद्धाच्या देशातून आलेला… यामुळे लोक अनेकदा फार आत्मीयतेनं वागत असत. अनेकांचं म्हणणं असं होतं की, कोरियामधल्या बौद्धपरंपरेत आणि मूळ बौद्धदर्शनात बरंच साम्य आहे. चीन, थायलंड, म्यानमार किंवा श्रीलंका यांप्रमाणे आम्ही बौद्धविचारात बदल होऊ दिले नाहीत, असं प्रतिपादन दोंगुकमधले भिक्खू करत असत. गौतम बुद्धाच्या शिकवणीचे सार त्रिपिटक कोरियाना नावाच्या ग्रंथात एकत्रित केलं गेलं आहे. जेव्हा-जेव्हा आक्रमक कोरियावर हल्ला करत, तेव्हा-तेव्हा त्रिपिटकाची हस्तलिखितं दूर पर्वतांमध्ये किंवा जंगलात नेली जात. तिथं हेईन-सा नावाच्या मंदिरात त्रिपिटकाची शेकडो वर्षं जुनी आवृत्ती जतन करून ठेवण्यात आली आहे. या आवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे लाकडाच्या छोट्या-छोट्या ठोकळ्यांवर त्रिपिटकाचे श्लोक लिहिण्यात आले आहेत. हेईन-साचं हे मंदिर जागतिक वारसास्थळांपैकी एक आहे. तिथं पर्यटक काही दिवस राहू शकतात आणि बौद्ध भिक्खूचं जीवन जगू शकतात. मोबाईल फोन नाही. लाकडाच्या फरशीवर पातळ चादर अंथरून झोपायचं. सात्त्विक शाकाहारी जेवण आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास उठून केलेलं ध्यान… हा सगळा एक वेगळाच अनुभव होता.

Hyundai steel silo
ह्युंडाइ कारखाना

दक्षिण कोरियाची आध्यात्मिक बाजू जितकी सखोल आहे, तितकाच महत्त्वाचा आहे इथल्या आयुष्यातला इहवाद आणि रोजच्या जीवनातली सुबत्ता. मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारी ही अर्थव्यवस्था आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, गाड्या या क्षेत्रांमध्ये कोरियन ब्रॅन्‌ड्‌स जगभर नाव कमवत आहेत. जहाजबांधणी उद्योगात तर दक्षिण कोरिया जगात अव्वल क्रमांकाच्या स्पर्धेत असतो. दक्षिण कोरियाच्या अवजड उद्योगाची झलक पाहायला आम्ही ह्युंदाई कारच्या आणि स्टीलच्या कारखान्यात गेलो होतो. दिवसाला हजार गाड्या बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये फक्त १०० मजूर होते आणि बाकी सगळं रोबोच्या हवाली… कोळशाचे प्रचंड साठे असलेले सायलो आणि सर्व कारखान्यांना बंदरांशी जोडणारी यंत्रणा… हे सगळं थक्क करणारं होतं.

सोलहून कोरियात किती लांब जाता येईल, असं वाटतं? बुसान हे कोरियाच्या दक्षिण तीरावर असलेलं शहर. साधारण ३५० किलोमीटर अंतरावर असेल. पण केटीएक्स या कोरियन बुलेट ट्रेननं हे अंतर दोन सव्वा-दोन तासांत पार करता येतं. बुसान इथं फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतं आणि त्याला जागतिक मान्यता आहे. माझ्या डिझाईन स्कूलच्या प्राध्यापिका शिल्पा रानडेंनी केलेली फिल्म तिथं पाहून फारच खास वाटलं. रात्री तिथल्या फायरवर्क फेस्टिव्हलची मजा घेतली. बुसान आणि समुद्र यांचं नातं घट्ट आहे. हेऊनदे ह्या बीचवर थंड वाळूत बसून सूर्योदय पाहण्याची गंमत अनुभवली आणि मग जगालची फिशमार्केटमध्ये चक्कर मारली. मुंबईचा फिनिक्स मार्केटसिटी मॉल किती मोठा असेल त्याच्या साधारण दुप्पट आकारचं हे फिशमार्केट. तीन मजले उंच… तळमजल्यावर आपल्यासारखाच मासळीबाजार. पहिल्या मजल्यावर टॅंकमध्ये ठेवलेलं जिवंत सीफूड आणि दुसऱ्या मजल्यावर कोरियन लाइव्ह बार्बेक्यू.

Hallasan
निद्रिस्त ज्वालामुखी

कोरिया आणि जपान यांच्या मध्ये कोरियाच्या मालकीचं जेजू नावाचं बेट आहे. निसर्गाचं निखळ सौंदर्य विविध रूपांमध्ये पाहायचं असेल, तर जेजू पाहायलाच हवं. सगळीकडे सुंदर समुद्रकिनारे आणि बेटाच्या मधोमध मुकुटाप्रमाणे शोभणारा हाला पर्वत. सहा हजार फूट उंच बर्फाच्छादित शिखर असलेला हा पर्वत चढून उतरायला १२ तास लागतात. तिथं राहण्याची परवानगी नाही त्यामुळे दुपारी साडेबाराच्या आत शिखर गाठायचं. तिथल्या निद्रिस्त ज्वालामुखीचं मुख आणि त्रिकोणी अग्निजन्य खडक पाहायचे आणि दुसऱ्या मार्गानं उतरायचं असा प्रवास. ६ इंच बर्फातून सहा हजार फूट चढणं आणि मग लगेच परत उतरणं एक आव्हानच होतं. तिथं शिखराजवळच्या झोपडीत खाल्लेले नूडल्स मी कधीही विसरणार नाही. पण कौतुकाची गोष्ट ही की, प्लॅस्टिकची पिशवी किंवा इतर कोणताही कचरा कोणीही तिथं टाकला नाही. सगळे जण कचरा सोबत घेऊनच पर्वत उतरले. मी सर्व ठिकाणी युथ हॉस्टेलमध्ये राहत असे. स्वस्त दर, इंटरनेटची सोय, उगाचच धांगडधिंगा घालणारे लोक नाहीत आणि विविध देशांतून आलेल्या पर्यटकांना भेटण्याची संधी; त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा हा अनुभव डोळस करणारा होता.

seoul namsan hannamdaegyo

चुंगमुरो म्हणजे कोरियातल्या फिल्म इंडस्ट्रीची पंढरी. दोंगुक त्याच भागात असल्यानं फिल्मचा अभ्यास करण्यासाठी हे एक चांगलं विद्यापीठ मानले जातं. मला डॉक्युमेंट्री फिल्ममेकिंग आणि सिनेमॅटोग्राफी शिकण्याची फार इच्छा होती, पण हे अभ्यासक्रम कोरियन भाषेत होते त्यामुळे कसं जमेल असा प्रश्न होता. तो माझ्या गाईडनं सोडवला. प्रोफेसर जॉन्ग हो पार्क माझे गुरू. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अॅलन देवीयूसारख्या दिग्गज सिनेमॅटोग्राफरकडून प्रशिक्षण घेतलेले. त्यांनी माझ्या एकट्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यांच्या रोजच्या तासापूर्वी ते त्यांच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी वेगळं इंग्लिश सेशन दररोज घेत असत. डॉक्युमेन्ट्री मनोरंजकही असू शकते आणि कथा सांगण्याची भाषा चित्रांची असली पाहिजे आणि सूर्यप्रकाश नीट वापरला तर सुंदर फ्रेम्सनी आपली गोष्ट सांगता येते; या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. कोरियाला ‘लॅन्ड ऑफ मॉर्निंग काम’ असं म्हंटलं जातं. या देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांत मी चार महिने भटकलो असेन. पण या नावाला साजेल असा फोटो काही मला मिळाला नव्हता. परतीचा प्रवास सकाळच्या फ्लाईटनं सुरू केला… विमान इंचॉनहून येलोसीच्या दिशेनं झेपावलं आणि खिडकीतून मला जे दृश्य दिसलं, तेच मॉर्निंग कामचं मूर्त स्वरूप होतं.

चिन्मय भावे

IMG_20141019_192129

इ-मेल – chinmaye.bhave@gmail.com

दृश्य संस्कृति आणि अभिकल्पना (डिझाईन) यांचा अभ्यासक.  टीवी आणि क्रीडा पत्रकारितेत काही वर्षे काम केल्यानंतर  visual ethnography या क्षेत्रात संशोधन सुरु केले. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर येथे  visual communication चे प्रशिक्षण घेतले. स्टिक टू ड्रीम्स या नावाची फिल्म नुकतीच पूर्ण केली आणि आता कोकण किनारपट्टीच्या दृश्य संस्कृतीवर आधारित दर्या फिरस्ती या प्रकल्पाची तो सुरुवात करत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s