एक प्रवास, समाधान देणारा!

स्वागत पाटणकर

‘ह्या अमेरिकेची पूर्व बाजू बघून ४-५ वर्षं झाली, आता पश्चिम किनारा बघणं स्वागतच्या नशिबात आहे की नाही देव जाणे’ अतिशय बोअर डेली सोप बघून झाल्यावर आईनं त्यातल्याच एका सासूसारखा हा डायलॉग मारला….जरा मोठ्या आवाजात, मला ऐकू जाईल असा!

तसं बघितलं तर मला फिरायची कधी सवय किंवा आवडच नाही… आय मिन कधी असं आठवडाभर सहलीला वगैरे जायची गरजच वाटली नाही. आठवड्यातले ५ दिवस काम आणि खेळ. शनिवार-रविवार वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर खादाडी … हा असाच आयुष्यभर कार्यक्रम… पुणे असो वा शिकागो, आपण बरे आणि आपल्या १० किलोमीटर परिघामधली हॉटेल्स बरी! हा आपला फंडा.

न्यूयॉर्कच्या बाजूला अनेक नातेवाईक राहत असल्यामुळे आई-बाबांना त्यांच्याकडे पाठवून त्यांना इस्ट कोस्ट फिरवण्याच्या जबाबदारीमधून मी माझी मस्त सुटका करून घेतली आणि निश्चिंत झालो होतो. पण पश्चिमेकडे म्हणजेच कॅलिफोर्निया, लास वेगासच्या बाजूला जवळचं असं कोणीच नसल्यामुळे आपल्यालाच सहल मार्गदर्शक व्हावं लागणार, हे माझ्या लक्षात आलं.

Boulder_street artist
बोल्डर स्ट्रीट

एक वेळ मी २९ चा पाढा रोज म्हणायला तयार होईन, पण असं सहल वगैरे आखून सहलीला जाणं आपल्याला अजिबात जमत नाही. पण दिवसभर टीव्हीवर ‘सासू-सून, ‘बाहेरची लफडी’ बघणाऱ्या आईबाबांकडे मला बघवेना… त्यात ह्या वेळेस बायकोचीही सहलीला जायची इच्छा होती.

घरात तिन्ही बाजूंनी अडकल्यावर ऑफिसमधल्या चौथ्या बाजूनं मला सावरलं. डेन्वर का कुठल्यातरी शहरात महिनाभर असाइनमेन्टसाठी जायचंय असं कळलं. गुगलाबाईंना डेन्वरबद्दल विचारल्यावर- डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक शहर, पश्चिमेला रॉकी माउंटन्सची मोठी रांग अशा प्रकारची हाय लेव्हल माहिती मिळाली, काही फोटो बघितले आणि ताबडतोब दिल तो पागल है टाईप ‘हा उपरवाल्याचा इशारा आहे, घरच्यांना फिरव मस्त’ अशी अनाउन्समेन्ट मनात झाली. मग ठरलं, असाइनमेन्ट सुरू होण्याच्या १० दिवस आधी डेन्वरला जायचं… मग डेन्वर – लास वेगास – कॅलिफोर्निया असं फिरण्याचा काहीसा पुसटसा प्लॅन केला, बाकीच्या गोष्टी ऐन वेळी ठरवू अशी ‘स्ट्रॅटेजी’ ठरली.

‘आपण एकदम फ्लेक्सिबल राहू, काही शेड्युल फॉलो न करता बेधुंद फिरू’ असे डायलॉग मारून तुमचा पोरगा किती कूल आहे वगैरे दाखवायचा प्रयत्न केला!

मग एका रविवारी रात्री पाटणकरांची सहल निघाली, शिकागोच्या अतिशय गजबलेल्या एअरपोर्टवरून!

साधारण पंचवीस-एक वर्षांनंतर आई-बाबांबरोबर प्रवास करत होतो. २५ वर्षांपूर्वी मी त्यांच्या ‘कडेवर’ होतो, पण आता मला त्यांची काळजी घेत फिरायचं होतं. त्यांना बाहेरचं आवडेल की नाही, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल, असं उगाचच टेन्शन आलं होतं. कधी-कधी इकडच्या धिप्पाड सिक्युरिटी ऑफिसर्ससमोर घाबरायला होतं म्हणून मी त्यांचं सगळं नीट सुरू आहे ना, हे वळूनवळून बघत होतो. माझ्या चेहऱ्यावरची चिंता बायकोनं अचूक हेरली, ती शांतपणे म्हणाली, ‘आई-बाबा पुण्याहून अमेरिकेला एकटे आले आहेत तेसुद्धा दोनदा, सो तू फार लोड घेतलं नाहीस तर सगळ्यांना आवडेल!!’ एकदम हलकं वाटलं.

आता ट्रिप फक्त एन्जॉय करायची, जास्त विचार करायचा नाही असा ठाम निश्चय करून विमानात बसलो. १० मिनिटांपूर्वी मोठ्या माणसासारखं टेन्शन घेतलेला मी विमानात चढल्या-चढल्या लहान झालो, पळत जाऊन ‘विंडो सीट’ पकडली आणि बायकोला टुक-टुक केलं! हे करताना मनातल्या मनात खुद्कन हसू आलं!! लहानपण देगा देवा ही प्रार्थना बाप्पानं ऐकली की काय !!

विमान निघालं. साधारण दीड तासात डेन्वरला पोचणार होतो. विमानात टाइमपास म्हणून मी समोरच्या मासिकातलं ‘इव्हेंट्स इन डेन्वर’ सेक्शन चाळायला घेतला. पहिलीच जाहिरात बघून उत्साहानं ओरडलो. बोल्डर नावाच्या ठिकाणी उस्ताद झाकीर हुसेन आणि राहुलजी शर्मा ह्यांची कॉन्सर्ट होती! सगळ्यांनी चक्क पहिल्या फटक्यात होकार दिला आणि आमचा पहिला स्टॉप ठरला… बोल्डर!!!

‘फ्लाईट लॅन्ड होतंय, सीटबेल्ट बांधा’ अशी सूचना ऐकू आल्यावर मी अतिशय उत्साहात खिडकीतून बाहेर बघू लागलो. दोन वर्षांच्या बाळापासून ते नव्वदीच्या आजोबांपर्यंत आपलं वय कितीही असलं तरी लॅन्डिंगच्या वेळेस सगळ्यांनाच खिडकीतून खाली बघायला आवडतं. उंच-उंच इमारती लेगोच्या ठोकळ्यांप्रमाणे दिसतात, छोट्या-छोट्या गाड्या मुंग्यांसारख्या तुरुतुरु पळत असतात.

शहर नियोजित असेल तर वरून बघायला खूप भारी वाटतं, रेष आखल्यासारखे सरळ रस्ते…वा!!

डेन्वर कसं दिसत असेल, ह्या उत्सुकतेपोटी मी पण खिडकीत ठाण मांडून बसलो; पण पोपट होणं हे आमच्या नशिबाचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे वर सांगितल्यापैकी अजिबात काहीही दिसलं नाही, नजरेस येत होतं फक्त गवत. बाकी काही नाही. जितकी लांब नजर जाईल तिथं फक्त गवत…

थोडं खाली आल्यावर दुहेरी मार्गिकांचा एक रस्ता तेवढा दिसला!!!

अमेरिकेच्या मधोमध असलेल्या डेन्वरची आणि माझी पहिली नजरभेट ही विनोदनिर्मिती ठरली!

विमान लॅन्ड झाल्यावर लगेच झाकीर हुसेनच्या कॉन्सर्टची तिकिटं बुक केली, गाडी भाड्यानं घेतली आणि जिपीएसमध्ये पत्ता टाकला… बोल्डर! आणि कीक मारली!

विमानातून गवतामध्ये दिसत असेलल्या त्या रस्त्यावरून आम्ही निघालो… डेन्वर एअरपोर्ट शहरापासून २०-२५ किलोमीटर लांब बांधला आहे आणि बघता क्षणीच जाणवतं हा पुढच्या २०-३० वर्षांचा आराखडा आहे. अमेरिकेमधलं हे फास्टेस्ट ग्रोइंग शहर! विमानातून दिसणाऱ्या दृश्यामुळे आलेली निराशा पूर्णपणे निघून गेली. त्याला कारण होतं डोळ्यांत अलगद भरणारी ‘रॉकी पर्वताची रांग आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेलं हिरवंगार गवत.. डोळ्यांसमोर होते चित्रातल्यासारखे त्रिकोणी डोंगर आणि त्यांच्या मधून होणारा सूर्यास्त!! मावळता सूर्य केशरी, गुलाबी अशा विविध रंगांची उधळण करून आमचं स्वागत करत होता. आम्हांला हे सर्व आवडतंय की नाही हे डोंगरामागून हळूच डोकावून बघतही होता!!

या नयनरम्य केकवरची चेरी म्हणजे कापसासारख्या पांढऱ्याशुभ्र बर्फाची ओल्ड फॅशन्ड हॅट घातलेले रॉकी डोंगर. लांबच्या लांब पसरलेलं ते डोंगरे कुटुंब… ‘तुझ्या सह्याद्रीसारखेच आम्ही आहोत रे… फक्त थोडे उंच आहोत आणि केस पिकलेले आहेत, पण तरी आपलंच समजून राहा’ असं आवर्जून सांगायला विसरलं नाही.

Echo alke
इको लेक

समुद्रसपाटीपासून साधारण ७००० उंचीवर असलेलं डेन्वर मला ‘दुसऱ्या नजरेत’ आवडून गेलं होतं. रॉकी पर्वत आणि आपलं लडाख यांची उंची साधारण सारखीच, म्हणजे १२-१४ हजारच्या आसपास.

उंचावर असल्यामुळे हवा खूपच वेगळी, सूर्याच्या आपण अजून जवळ जातो त्यामुळे उन्हात गेलं की चटका लागतो आणि सावलीत गेलं की गार वाटतं. इकडे वर्षातले सहा महिने स्नो फॉल होत असतो पण सूर्यदेवाच्या आशीर्वादानं दुसऱ्या दिवशी सगळा बर्फ वितळलेला असतो… बायको ही माहिती वाचून दाखवत होती. इंटरेस्टिंग वाटलं, कारण शिकागो, न्यूयॉर्क यांसारख्या ठिकाणी स्नो फॉल झाला की रस्त्यावरचा बर्फ दिवसेंदिवस तसाच असतो, घरातून न हालणाऱ्या पाहुण्यांसारखा!

बोल्डरला जाण्यासाठी एका ठिकाणी उजवं वळण घेतलं, आणि डेन्वर डाउनटाऊनचं दर्शन झालं. जेमतेम १५-२० टिपिकल अमेरिकन उंच इमारती असतील.. शिकागोच्या मानानं फारच छोटं असं डाउनटाऊन. पण तो रस्ता मात्र मजेशीर होता.. डावीकडे नैसर्गिक पर्वत आणि उजवीकडे मानवनिर्मित उंच-उंच इमारती, त्यांच्या काचेत पडणाऱ्या प्रतिबिंबामधून आपल्याकडेच बघणारा सूर्य!!

रहदारी खूप होती पण शांत आणि शिस्तशीर. शिकागो, न्यूयॉर्क किंवा पुणं यांच्यासारखी नवख्या माणसाला घाबरवणारी मुळीच नाही… पदोपदी आवडायला लागलं होतं डेन्वर.

साधारण ४०-४५ मिनिटांनंतर झाडांच्या गर्दीत एक इमारत दिसली. मॅप झूम केल्यावर ही बोल्डर युनिव्हर्सिटी आहे, असं समजलं. बोल्डर एग्झिट घेतल्यावर कौलारू युनिव्हर्सिटी बिल्डिंग आणि सायकलवरून इकडे-तिकडे बागडणारे विद्यार्थी दिसू लागले. त्यांचं ते कॅम्पस बघून पुन्हा ॲडमिशन घ्यावी असं वाटलं. संध्याकाळचा उजेड असला, तरी एखादी चादर ओढावी तसं बोल्डर रॉकीजच्या सावलीत लपलं होतं. स्वतःची स्वप्नं पूर्ण करायला दूरदूरवरून आलेल्या या विद्यार्थिरूपी पिल्लांवर रॉकीजनी जणू काही मायेचा हातच ठेवला होता.

बोल्डर हे खूप छोटंस, डोंगराच्या कुशीत वसलेलं एक ‘क्युट’ गाव, कोथरूडपेक्षाही छोटं असेल.

झाकीर हुसेनची कॉन्सर्ट ‘पर्ल स्ट्रीट मॉल’ला होती. आम्ही सरळ तिथंच गेलो. पत्ता वाचून वाटलं एखाद्या मॉलमध्ये वगैरे जायचंय, त्यामुळे त्या जागेबद्दल फारशी काही उत्सुकता नव्हती. पण शितावरून भाताची परीक्षा करू नये. पर्ल स्ट्रीट मॉल एका रस्त्याचं नाव होतं. छोट्याशा गावातला लहानसा रस्ता. एखादा रस्ता किती रम्य, गोड, बाहुलीसारखा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पर्ल स्ट्रीट मॉल. कितीही खोलवर गेलेल्या डिप्रेशनला दूर करण्यासाठी पर्ल स्ट्रीट मॉल म्हणजे नैसर्गिक औषध!

साधारण दोन किलोमीटरचा हा रस्ता.. त्यावर वाहनांना परवानगी नाही. रंगीत फुलांनी नटलेला, विविध प्रकारच्या झाडांनी सजलेला, मध्येच एखादं कारंजं, किंवा वेगवेगळ्या आकारांचे खडक… नजरेला पंचपक्वान्नाची मेजवानीच. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं त्यात मोस्टली आर्ट गॅलरीज आणि ब्र्यूवरीज (Breweries) .. सर्व प्रकारच्या गर्दीनं फुललेला असा हा पर्ल स्ट्रीट!

हवेमध्ये एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली.. एकीकडे अगदी दोन वर्षांची छोटी दुडुदुडु धावतीये, बाजूला ऐंशी वर्षांचं जोडपं पारंपरिक अमेरिकन पोषाखात रोमॅन्टिकपणे बसलं आहे… आयुष्यातली दुःख न उगाळता गोड आठवणी ताज्या करत. त्यांच्या मागे दोन भिन्न देशांतलं प्रेमात पडलेलं जोडपं आईस्क्रीम शेअर करतं आहे.. हे सगळं निरखण्यात खूपच मजा वाटत होती. मध्येच गारगार वा-याची झुळूक गालांना चुंबत होती.. एवढंसं छोटुकलं ठिकाण, पण इथून पाय निघत नव्हते.. चौघांनाही तिथंच बसून राहावं असं वाटत होतं. कॉन्सर्टला अजून वेळ होता, त्यामुळे मस्त कॉफी-आईसक्रीम घेऊन आम्हीपण वॉक करायला घेतला.

थोडं पुढे गेल्यावर स्ट्रीट आर्टिस्ट दिसू लागले, कोणी जादू दाखवून लोकांना चकित करत होता, पुढच्या चौकात एक जण अमेरिकेतले सगळे झिपकोड लक्षात ठेवून ओळखत होता! खूपच मनोरंजक होतं सारं. कलाकार आणि त्यांची कला बघणारे लोक… सगळेच आपापली भूमिका अगदी निरागसपणे निभावत होते. कला बघून झाल्यावर प्रेक्षक स्वतःहून पैशाच्या रूपात दाद देऊन कलाकाराला प्रोत्साहन देत होते, तेही एकदम सढळ हस्ते… आवडीनं आणि समाधानानं!!

त्यातच कानावर पडले गिटारमधून निघालेले, मंत्रमुग्ध करणारे सूर…एक गरीब, खूप दाढी वाढलेला इसम गिटार वाजवत होता, आणि त्याच्याबरोबर उभा होता फक्त एक मुलगा, २-३ वर्षांचा! तो माणूस आपल्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन करत होता. माणसानं सगळ्याच गोष्टी पैशासाठी करायला पाहिजेत असं नाही, अशा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद अनमोल असतो आणि त्याला एक्सपायरी डेट नसते…

थोडं पुढे गेल्यावर एका चांगल्या कुटुंबातले दोन टीनेजर्स घरी तयार केलेलं एक वाद्य वाजवत खूप आनंद लुटत होते, लोकांना आनंद देत होते, समोर त्यांचे आई-बाबा त्यांच्याकडे खुशीनं पाहत होते!! मला त्या आईबाबांचं खूप कौतुक वाटलं. घरची परिस्थिती छान असतानाही मुलांचं स्ट्रीट आर्टिस्ट होणं त्यांना ‘कमीपणाचं’ वाटत नव्हतं.

हे डेन्वर/बोल्डरकर थोडक्यात कोलोरॅडोवासी वेगळ्याच मातीचे बनलेले असतात. निसर्गाच्या जवळ राहणा-या या लोकांची जगण्याची कारणं वेगळी आहेत! या लोकांसाठी उत्सव किंवा आनंदी आयुष्य म्हणजे कुठंतरी गिर्यारोहणाला जाणं किंवा १५-२० मैल सायकलिंग करणं. पण म्हणजे हे लोक संत वगैरे आहेत असंही नाही.. अमेरिकेतल्या सगळ्यांत जास्त ब्र्यूवरिज डेन्वर भागात आहेत, ड्रग्ज इथे ऑफिशिअल आहेत.

पण त्या गोष्टी उपभोगताना माणसाचा दृष्टिकोन महत्त्वाचा!

ह्या ‘हाय अल्टीट्यूडवरच्या’ गावामधल्या लोकांचा ‘लो अटीट्यूड’ मला खूप भिडला! माणसांनी असंच असावं.. कलेसाठी जगावं, कलेसाठी मरावं, खावं, प्यावं आणि व्यायाम करावा!! अजून काय पाहिजे आयुष्यात!

समुद्रसपाटीपासून १०००० फूट उंच राहून जमिनीवर पाय असणा-या कोलोरॅडोवासियांची ही अशी जीवनशैलीही खूपच आवडून गेली!

झाकीरसाहेबांचा कार्यक्रम पाहून लोकं प्रसन्न होतात, पण आज आम्ही आधीच प्रसन्न होऊन त्यांच्या कॉन्सर्टला गेलो. ९० टक्के अमेरिकन्स आणि बाकीच्या भारतीय प्रेक्षकांसमोर झाकीर आणि राहुल शर्मा यांनी आम्हाला तल्लीन करायला सुरुवात केली. राहुलजींनी तर खास पर्ल स्ट्रीट आणि त्या मागचा बर्फाच्छादित डोंगर, या काश्मीरशी साम्य असणा-या लोकेशनसाठी खास काश्मीरी गाणं वाजवलं. त्यातून निघणारा प्रत्येक सूर बोल्डरच्या हवेत सहजेतनं विरघळत होता! त्या लहरी अनुभवता-अनुभवता कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही.. आम्ही कोलोरॅडोच्या स्वरांमध्ये हरवून गेलो होतो.

रूमवर जाताना ते आजी-आजोबा डोळ्यांसमोर दिसत होते, स्ट्रीट आर्टिस्ट आणि उस्तादांचं संगीत यांचं एक जमून गेलेलं कॉकटेल कानात साठून राहिलं होतं!

खूप दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागली!

पुढचे दोन दिवस आम्ही रॉकी माउंटन्समधून ड्राइव्ह, पाईक पिक्सची ट्रेन, चौदा हजार फुटांवर असलेला माउंट इव्हान्स, त्याच्या वाटेत असलेला एको लेक, त्या लेकच्या मागे  ‘घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असं म्हणणारा बर्फानं झाकोळलेला डोंगर अशा काही अफलातून ठिकाणांचं दर्शन घेतलं.

लहानपणापासून जी दृश्यं फक्त कॅलेन्डरवरच पहिली होती, ती प्रत्यक्षात बघायला मिळाली. माउन्ट इव्हान्स उतरताना मात्र छातीत धडधड वाढली, रस्त्याच्या कडेला अजिबात सुरक्षा कठडे नाहीयेत आणि समोर दिसते मृत्यूची दरी, गाडी एखादा इंच जरी बाहेर गेली तर सगळं संपून जाईल!! त्यामुळे डबल फोकस करून हळूहळू खाली आलो. दोन्ही बाजूंना जमीन दिसल्यावर पुन्हा जिवात जीव आला!

ह्या कोलोरॅडोनं निसर्ग आणि माणूस दोघांचही एक वेगळंच रूप दाखवलं, ते मनात भिनलं!!! भारतातून जे लोक अमेरिका फिरायला येतात त्यांना अमेरिकेच्या एकदम मध्ये असलेलं कोलोरॅडो  त्यांच्या कार्यक्रमात बसवता येत नाही, ते खर्चिकही पडतं, सोयीचं वाटत नाही. पण न्यूयॉर्क-कॅलिफोर्निया असे टिपिकल स्पॉट्स बघण्याच्या हट्टापायी ते काही-काही भारी गोष्टींना मुकतात असं मला वाटतं.

असो…आम्ही मात्र मिनी स्वित्झर्लंड म्हणजेच कोलोरॅडोचे ते गोड क्षण कॅमेराद्वारे मनात टिपून घेत विमानानं निघालो लास वेगासला!!

Bellagio

लास वेगास!! वेगासला लॅन्ड झाल्यावर पायलटनं वेलकम टू वेगास वगैरे टिपिकल न बोलता ‘वी आर हिअर, लेट द पार्टी बिगन.. चीअर्स!’ अशी एक वेगळीच अनाउन्समेन्ट करून आपण जगाच्या वेगळ्याच भागात आलोय याची झलक दाखवली!

टॅक्सी केली आणि ज्यासाठी वेगास प्रसिद्ध आहे त्या ‘स्ट्रीप’ रस्त्यावर निघालो. अर्थातच वेगासला गेलो की स्ट्रीपवर जायचं असतं. कोरडी हवा होती, उन्हाचे चटके लागत होते,पण ज्या शहराबद्दल इतकी वर्षं ऐकून आहे,ते खरंच बघायला चाललोय.वाढलेल्या अपेक्षा हे शहर पूर्ण करेल का.. ‘ॲडल्ट’ सिटी बघून आई-बाबाना इथं कुठं आलोय आपण, असं तर नाही ना होणार,असे कित्येक प्रश्न मनात येत होते…

१०-१५ मिनिटांतच स्ट्रीपवर पोचलो. हॉटेलवर जाऊन ताजंतवानं वगैरे व्हायचं ठरवलं होतं, पण संध्याकाळी साधारण ५ वाजता त्या स्ट्रीपवर दिसणारा सळसळता उत्साह बघून बेत बदलला. सामान हॉटेल-लॉबीमध्येच ठेवलं आणि तसेच बाहेर पडलो, स्ट्रीपवर…. वेगळं फ्रेश होण्याची गरजच लागली नाही!

वेगासमध्ये काय करायचं, हा प्रश्न पडत नाही. फक्त चालत राहायचं, एका हॉटेलमधून दुसरीकडे.. प्रत्येक हॉटेल विशिष्ट थीम डोळ्यांसमोर ठेवून बांधलं आहे. डिझाइनर्सनी  अतिशय छोट्या-छोट्या बारकाव्यांवर केलेला अभ्यास चटकन दिसून येतो …बाबो!!!  आपण फक्त आ वासून सगळी हॉटेल्स आतून-बाहेरून बघायची, खूप फोटो काढायचे आणि खूश व्हायचं!..

वेगासला एक मस्त असतं, स्ट्रीपवर छोट्या टपऱ्यांमध्ये कंदीलाच्या आकाराच्या बाटलीत दोन-तीन लिटर्स हवं ते ड्रिंक भरून मिळत. आम्ही मस्त कॉकटेल घेतलं आणि त्याचा आस्वाद घेत-घेत चालत राहिलो! एक युनिक अनुभव!

San Diego _ Mexican food

त्या विशेष अशा झगमगटामध्ये चालताना कुठूनही दृष्टीस पडतो तो रंगीबेरंगी दिव्यांची उधळण सुरू असताना आपल्या लखलखाटानं चैतन्य पसरवणारा आयफेल टॉवर. हॉटेल पॅरिसमध्ये घुसायला हा टॉवर भाग पाडतो. आपण खूश होऊन आत जातो, आणि आत काय जादूनगरी असेल काहीच कल्पना नसते! त्यांनी अख्खं पॅरिस उभं केलं होतं.. जणू काही आपण पॅरिसला आलो आहोत आणि तिकडच्या गल्ल्यांमधून फिरतोय असंच वाटतं, अगदी जशीच्या तशी पॅरिससारखीच हॉटेल्स, रस्ते, दिव्याचे खांब, फूटपाथ, साइन बोर्ड…सगळं पॅरिस!!

पॅरिसचा विजा संपल्यावर मग आमचं फ्लाईट व्हेनेशियन हॉटेलमध्ये शिरलं. इथं या लोकांनी अख्खी इटली उभी केली होती आणि ते कमी म्हणून हॉटेलच्या आत छोटा तलाव करून इटलीची प्रसिद्ध बोट राईड ‘गोंडोला’ ठेवली होती!

हे म्हणजे कमाल होतं… म्हणजे हे असं कसं करू शकतात… किती वाढीव केलंय हे, डोकं चक्रावून गेलं होतं! म्हणजे हे असं करता येईल, अशी कल्पना डोक्यात येणंच किती भारी असेल! आणि अशा हॉटेल्समध्ये फिरताना त्यांनी सिलिंगला आकाशाचा रंग दिला आहे, त्यामुळे काढलेला प्रत्येक फोटो हा प्रत्यक्ष पॅरिसमध्ये किंवा इटलीमध्येच काढल्यासारखा वाटतो! खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं! एकदम पैसे वसूल!

Gandola_Vegas

बेलागीओचं जगप्रसिद्ध कारंजं, पॅरिस, इटली, न्यूयॉर्क, लंडन आय, सिझर्स पॅलेस अशी अनेक हॉटेल्स चालत-चालत फिरलो. काय एनर्जी आहे या शहराची!! एकदम कडक आर्किटेक्चर, रोषणाई, विविध भागांतून आलेले पर्यटक, रस्त्याच्या बाजूला कमीत कमी कपडे घातलेल्या मुली… सगळंच भारी होतं!!

साधारण वीस हजार वगैरे पावलं झाली असतील, पण थकवा कुठंच जाणवत नव्हता. रात्रीचे बारा वाजले होते, पण संध्याकाळचा सळसळता उत्साह आता अजून दुप्पट झाला होता. वेगासची सकाळच होते रात्री!

आई-बाबा फक्त घड्याळात बारा वाजलेत म्हणून ‘आता झोपायला जाऊ’ असं म्हणाले.. मन तृप्त झालं होतं, मग हॉटेलकडे निघालो. लॉबीत घुसल्यावर जेवढी गर्दी रस्त्यावर, तेवढीच आतमध्ये होती! कॅसिनो!! ज्यासाठी वेगास प्रसिद्ध आहे ती गोष्ट! साडेसाती कायमची सुरू व्हायला किंवा कायमची संपायला जी गोष्ट कारणीभूत होऊ शकते अशी गोष्ट!!

आई आणि बायको, दोघी म्हणाल्या इथं शॉपिंगला काही नाही, आपण इकडेच थोडेसे पैसे उडवून बघू!! मग चार नवशिके मध्यमवर्गीय मराठी वेगासमधल्या कॅसिनोकडे वळले. साधारण पहिल्या फटक्यात ५-६ डॉलरच्या मशीनवर खेळून ‘एक्सपेरिअन्सड’ झाल्यावर ‘सेन्ट्स’ वाल्या मशीनकडे वळलो. म्हणजे कमी प्रॉफिट, कमी लॉस, एकदम सेफ! मिळाले तर १० पैसे, गेले तर १० पैसे.. लोड नाही!! मग आमच्या बायका सुटल्याच एकदम ..रपारप सट्टा लावायला लागल्या… आम्हाला दोघांनाही ते पाहून मजा येत होती. आणि हे मशीन बनवणारेही एवढे धूर्त असतात, साधा १ पैसा जरी जिंकलो तरी २०-२५ सेकंद ‘खळ खळ खळ खळ खळ खळ’ असा आवाज येतो. मानसिकतेशी खेळतात राव! तो आवाज ऐकून अजून खेळायची इच्छा होते!! अनकंट्रोलेबल असतं!! पहाटे ५ वाजता आम्ही तिथून उठलो!!

सहल सुरू होताना मी तारुण्यातून बालपणात पोचलो होतो पण आई-बाबांनी साठी ओलांडलेली  असूनही ते मनानं तरुणच आहेत हे दिसलं वेगासमध्ये!

सकाळी उठून ग्रॅन्ड कॅनियनला जायचं ठरवलं होतं, पण मग उठायलाच ११ वाजले.. आपण फ्लेक्सिबल.. तो प्लॅन स्किप केला, आता गाडी भाड्यानं घ्यायची आणि सरळ कॅलिफोर्नियाकडे प्रस्थान करायचं आणि वाटेत काही पाहण्यासारखं असेल तर बघून टाकायचं!

चेक आउट करताना.. काउंटरवरचा तो माणूस…. त्याच्या चेहऱ्यावरचे थकलेले, कोरडे भाव खूप बोलके होते. ‘इथं येणारा प्रत्येक माणूस हा पैसे कमवायला येतो अथवा उडवायला… पण वेगासचं असं कुणीच नसतं… वेगासशी कोणी भावनिकदृष्ट्या जोडलेलं नसतं’ असं काहीतरी सांगत होते.  मी लगेच स्वतःला सावरून पैसे भरून बाहेर आलो. वेगास हे दोन दिवसांसाठीच, पण आयुष्यात एकदा तरी नक्कीच अनुभवण्यासारखं आहे! एकदम कंपलसरी!!

दुपारी १२ च्या उन्हात गाडी भाड्यानं घेतली! पत्ता टाकला सॅन डिएगो.. साधारण ७ तास. त्यात गुगलबाईनीच सजेस्ट केलं ‘व्हॅली ऑफ फायर’ नावाचं अट्रॅक्शन जवळच आहे, ते पण बघ… बाईला ओके म्हटलं आणि सॅन दिएगो व्हाया व्हॅली ऑफ फायर असं ती जिपीएसवरची बाई पुटपुटली!

वेगास सोडल्यावर एक २५ मिनिटांत वगैरेच सगळं वातावरण बदलून गेलं. २० किलोमीटर मागे सुरू असलेला सगळा जल्लोष, दंगा, झगमगाट एका फटक्यात संपला होता आणि आमच्या आजूबाजूला होतं फक्त वाळवंट.. ओसाड जमीन, नजरेत न मावणारी ओसाड जमीन.. बाकी काहीही नाही! त्यात दुपारचं ऊन , सूर्यशेठ पण पेटले होते, स्टिअरिंगवरचं बोट उकळत्या चहात ठेवलंय असं वाटत होतं.

Road to CA from Vegas

व्हॅली ऑफ फायर बघितलं, केशरी रंगाच्या खडकांचे वेगवेगळे आकार निर्माण झाले होते. गाडीतून बघायला छान वाटत होतं पण बाहेर पाऊल ठेववत नव्हतं..

ब्रॅन्डिंग करून अट्रॅक्शन विकायचं हे इथल्या लोकांचं कौशल्य आवडलं.

तासाभरात तिथून निघालो दक्षिणेकडे…. कॅलिफोर्नियाच्या सॅन डीएगोला.

पुन्हा एकदा वाळवंट, ओसाड जमीन, तळपलेला, आग ओकणारा सूर्य…

थोडक्यात, डोळे प्रेमात पडतील असं काहीही नाही!!!

Vally of Fire

या ओसाड परिसराला निसर्गाकडून अशी सावत्र वागणूक का मिळतिये अशी एक शंका मनात येऊन गेली. कधीकधी खूप नातेवाईक घरी राहून गेल्यावर घर कसं खायला उठतं… अचानक तसंच काहीसं झालं, एकदम विचित्र असं.

चारही दिशांना नजर टाकल्यावर लक्षात आलं, त्या अग्निपरीक्षेत आम्ही एकटेच पेपर लिहीत होतो. समोर किंवा मागे एकही गाडी दिसत नव्हती, आजूबाजूला एकही झाड नाही! ‘सजीव’ असे फक्त आम्हीच होतो.

शहरापासून लांब आल्यामुळे मोबाईल सिग्नलही गेला होता… मजेचं रूपांतर उगाचच भीतीमध्ये व्हायला लागलं. नजर माणसं शोधायला लागली!

रस्ता मागे जात होता, गाडी पुढं जात होती… समोर दिसणारं मृगजळ तेवढ्याच सातत्यानं फसवत होतं. गाडीमध्ये सगळे शांत बसले होते… आपापल्या विचारांमध्ये.. अशा वेळेस वाईट विचार आपल्या डोक्याचा ताबा पटकन घेतात. इथं आपल्याला किंवा गाडीला काही झालं तर? असं काहीतरी अचानक डोक्यात यायला लागलं, पटकन बायकोचा हात पकडला घट्ट… तिच्या चेह-यावर ‘याला ह्या वाळवंटामध्ये काय रोमॅन्टिक दिसलं?’ असा प्रश्न दिसला…

रस्त्यावर एक पाटी वाचली लॉस एंजेलिस- १०० माइल्स… म्हणजे दोन तास! मग मी फुल्ल काउंटडाऊन सुरु केलं. पण माणूस हा सवयीचा गुलाम असतो, या कुठंतरी ऐकलेल्या वाक्याची प्रचिती आली.. पुढच्या १५-२० मिनिटांत त्या रखरखाटाची सवय झाली आणि आम्ही त्यातलं सौंदर्य शोधू लागलो!

मग मध्येच लांबवर उडणारी वाळू, वाकडातिकडा होणारा रस्ता, कोरडी माती आणि ओबढधोबड खडक यांच्याबद्दल प्रेम.. फार वेळानंतर जाणारी एखादी गाडी म्हणजे सुखावह गोष्ट वाटायला लागली…

त्यातच मध्ये कुठेतरी सोलर एनर्जीचा मोठा प्लांट दिसला! काय परफेक्ट जागी तो बनवला होता.. इतका वेळ निरुपयोगी, ओसाड, सावत्र वाटणाऱ्या परिसराचा अमेरिकी लोकांनी काय बरोबर वापर करून घेतला होता!! मानलं त्यांना…

त्यानंतर एक पॅच आला, चहूबाजूनी हिरवा रंग घेऊन…जवळ गेल्यावर समजलं ते हिरवे काटे आहेत, कॅक्टसचे!!! आर यु किडिंग मी?? एवढे कॅक्टस कधीच एकत्र पाहिले नव्हते!! निसर्ग हा किती वेगळा आणि धक्के देणारा आहे!! पण हा धक्का शिकवणारा होता… प्रत्येक बॉलला फोर मारायची नसते, काही अवघड बॉल सोडून द्यायचे असतात… ते प्रेशरसुद्धा एन्जॉय केलं तर आयुष्य सोपं होतं…

असे सगळे वेगवेगळे विचार मनात डोकावून जात होते.. गाडीत सुरू असणा-या गाण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं!

पुढे-पुढे जाताना समोर एक डोंगर दिसायला लागला… मग थोडी रोपटी दिसायला लागली मग घरं दिसली, माझ्या चेह-यावरचं हास्य परत आलं… वेग पुन्हा निवांत केला. भीतिदायक नजर बंद करून उघड्या डोळ्यांनी मी पुन्हा बाहेर बघू लागलो..

San diego_Point loma

डोंगर ओलांडल्यावर काय चमत्कार!! चमत्कारच म्हणावा…. कोकणच सुरू झालं. लॉस ॲन्जेलिस शहराचं आउटस्कर्ट सुरू झालं आणि कोकण जवळ आल्यावर जसं वाटतं तसं वाटत होतं!! लांबून कुठूनतरी समुद्राचं वारं आपली वाट बघतंय!! मग दिसली नारळाची झाडं, चहूकडे नारळाची झाडं, त्यांच्याशी लपाछपी खेळणारी लाल, निळ्या अशा विविध स्प्रिंग कलर्सनी नटलेली झाडं.. बेस्ट!!! विषय संपला!! गेलेला उत्साह बीचच्या ओढीनं पुन्हा संचारला…

सॅन डिएगो.. असं म्हणतात की युरोपियन लोकांनी अख्या कॅलिफोर्नियामध्ये सर्वांत पहिल्यांदा सॅन डिएगोचा शोध लावला. कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेला वसलेलं एक मस्त शहर! निळ्या रंगाचा समुद्र, उंच-उंच इमारती, स्वच्छ किनारा आणि मेक्सिको नावाच्या देशापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर.

गेल्या-गेल्या पॉइंट लोमा म्हणून एक जागा आहे, पहिली भेट तिकडेच. छोट्याशा टेकडीवर… संध्याकाळच्या वेळेला तिकडं जायचं… समोर दूरवर पसरलेला पॅसिफिक समुद्र, डावीकडे सॅन डीएगो शहराचं डाउनटाऊन, मस्तपैकी जलविहार करणा-या नौका.. आणि या सगळ्याचा बर्ड व्ह्यू!!

विहंगम दृश्य बघतबघत आपण कितीही वेळ बसू शकतो… तिथंसुद्धा अमेरिकेनं काहीतरी म्युझिअम वगैरे केलं आहेच, पुन्हा ब्रॅन्डिंग! १५४२ साली युरोपियन लोकांनी सॅन डीएगो कसं शोधलं, ह्यांचं मस्त शब्दांत वर्णन केलंय. ते वाचता-वाचता अंगावर काटा येतो!!

इतिहासातून बाहेर येऊन मग मात्र हॉटेलवर जायचं ठरलं…

सॅन डिएगोजवळ ला होया (La Jolla) नावाच्या बीच टाऊनमध्ये हॉटेल बुक केलं होतं. रात्रीचे नऊ वगैरे वाजले होते… पश्चिमेकडून आलेला उजेड मन केशरी करून जात होता…पटकन चेक इन करून बीचवर जायचं ठरलं! आयुष्यात पहिल्यांदाच भेटणा-या पॅसिफिक सागराला कधी एकदा मिठी मारतोय असं झालं होतं! हॉटेलवर गेल्यावर एका सुंदर ताईंनी आमचं स्वागत केलं आणि पुढची १५-२० मिनिटं ती आमच्याशी गप्पा मारत होती.. हॉटेल गेस्टला खराखुणा पाहुणचार मिळत होता! आम्ही काय खाऊन पाहायला हवं, कुठे फिरायला हवं, इथपासून बीचवर चालतच जा… म्हणजे आमचं गाव तुम्हांला कळेल आणि आमच्या गावाच्या नावाचा उच्चार ‘ला जोला’ नसून ‘ला होला’ आहे .. इकडच्या लोकांना आवडणार नाही जोला म्हटलेलं… असा प्रेमळ सल्ला तिनं दिला! वेगासमधली प्रोफेशनल हॉटेल सर्व्हिस आणि इथं आपुलकीनं गप्पा मारणारी ही बया!! एका दिवसात निसर्गासकट माणसाच्या स्वभावातला फरकही अनुभवायला मिळाला!

सॅन डिएगो म्हणजे अमेरिकेची मेक्सिको बॉर्डर! लोकं नुसतं चुकल्यामुळेसुद्धा मेक्सिकोला गेली आहेत! इथल्या काही टेकड्यांवरून मेक्सिको दिसतंही.

आणि अर्थातच इकडचं जेवण मेक्सिकन स्पेशल होतं. बीचवर जाता-जाता वाटेत छोटंसं मेक्सिकन रेस्टो लागलं, त्यातून आलेल्या वासानं आमच्या मनाचा ताबा घेतला, भूक लागली आहे असं बिंबवलं.. मग पावलं तिकडे वळली! वेटरकाकांनी अतिशय प्रेमानं आत बोलावलं, स्पेशल डिशेस आणि स्पेशल मार्गारिटा सजेस्ट केली. मेक्सिकन ब्यूरिटो, चिकन फाहिता आणि टोमॅटोचा तिखट साल्सा खाल्ल्यावर मनापासून ढेकर दिली!!

आमचं ते जेवण बघून हॉटेलचा मालक संतुष्ट वाटत होता!!

मग लगेच बीचवर गेलो. आजूबाजूला छोटे-छोटे बंगले, गल्लीमधून येणार वारा… आणि ‘अहो पाटणकर लवकर या की’ अशी पॅसिफिकनं दिलेली हाक!!

आम्ही चौघंही दमलो होतो तरी बीचवर गेलो. अंधार होता, समुद्र फक्त ऐकू येत होता!! लाटांशी मी मनातून गप्पा मारायला लागलो… दहा हजार फूट उंचीवरून आम्ही त्यांना भेटायला आलो होतो, अख्खा प्रवास त्यांना पुन्हा सांगितला. जणू काही तिला सगळं समजतंय अशा थाटात एका लाटेनं मोठी उडी मारून माझ्या दमलेल्या पायांना भिजवून मसाजच दिला! सुख म्हणजे काय असतं, ते मला कळलं!

तीन दिवसांत तीन वेगळ्या अलटिट्यूडवर वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक, स्वभाव, निसर्ग, रंग, रूप, वेगळं हवामान.. अशा विविधतेनं नटलेली अमेरिका बघायचं भाग्य आम्हांला लाभलं होतं!

समुद्राशी खूप गप्पा मारून शांत झोपी गेलो…

पहाटे गजराशिवाय जाग आली. अशी जाग आली की शांत झोप लागल्याचं समाधान मिळतं. उठल्याउठल्या बीचवर गेलो, आणि एखादा अंधार आपल्यापासून काय लपवून ठेवेल याची प्रचिती आली!!

Sea lion

आम्ही गेलो होतो तो बीच ‘ला होया केव्ह’ नावानं ओळखला जातो. या जागेवर एक मोठं कुटुंब वास्तव्यास आहे, मिस्टर ‘सी-लायन’ असं त्यांचं नाव. केवढा मोठा सुखद धक्का होता हा! समोर शंभर-एक सी-लायन मस्त पहुडले होते. कोणी दगडांवर, कोणी वाळूवर, कोणी कंटाळा आलाय म्हणून पाण्यात चालले होते.. छोटे एकमेकांना त्रास देत होते, आणि त्यांतला एक चक्क आळस देत होता. समुद्रात जाऊ की नको या त्याच्या आयुष्यातल्या सर्वांत कठीण समस्येमध्ये तो गढला होता!!

वेगळ्याच विश्वात आल्यासारखं झालं… किती फोटो काढू आणि किती व्हिडिओ!! आपण काल रात्री इकडे होतो???  ह्यावर विश्वासच बसत नव्हता!!

ते मुके सी लायन कुठल्याही पर्यटकांना त्रास देत नव्हते आणि पर्यटक त्यांना! एकमेकांना गरजेपुरती जागा दिल्यामुळे नात्यांमध्ये किती छान गोडवा येतो, याचं उत्तम उदाहरण आमच्यासमोर होतं.

‘अरे स्वागत, किती बेफाट आहे रे हे !!’ आई-बाबा मला म्हणाले.

बायको तर सी लायनमध्ये हरवून गेली होती…अर्धवट प्लॅन केलेली सहल यशस्वी झाल्याची ती पावती होती!!

अशक्य भारी वाटत होतं… गेल्या ४-५ दिवसांतल्या शिकाऊ, भीतिदायक, गोड आणि आश्चर्यकारक अनुभवांची शिदोरी बांधत असताना ‘आयुष्यभर इथं, समुद्राच्या सान्निध्यात राहायला कसली मजा येईल रे!’ बायको मला म्हणाली. बहुतेक ते ऐकूनच बाजूनं जाणारं एक मराठी जोडपं आमच्याशी बोलायला आलं. आम्ही डेन्वरला जाऊन आलोय असं कळल्यावर, ‘तुम्हांला बरंय राव फिरायला खूप जागा, बघायला डोंगर आहेत. इथं आम्हांला फक्त हा बीचच असतो फिरायला.. इकडंच यावं लागतं!!!’ निराशेच्या स्वरात ते बोलत होते…

मी काहीही उत्तर न देता समुद्राकडे बघायला लागलो आणि समोर पहुडलेला सी लायन ‘अरे तुम्ही माणसं कधीच आनंदी होत नाही राव. जे नाही त्याचं दुःख मानण्यापेक्षा जे हातात आहे त्यातून मौज लुटायला शिका’ असं काहीतरी पुटपुटत पॅसिफिककडे लोळत गेला!!

त्या सुखी जिवाकडे बघत-बघत आम्ही मात्र परतीचा रस्ता पकडला … प्रोजेक्ट्ची डेडलाईन गाठायला, पण अर्थातच चौघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य घेऊन!!

स्वागत पाटणकर

me!

इ-मेल – swagatpatankar@gmail.com
शिकागोस्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर. क्रिकेट अम्पायरिंग करायला, तसंच खाणं , क्रिकेट आणि पुण्याविषयी लिहायला आवडतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s