विष्णुदास चापके
२०१०मध्ये मी दिलीप दोंदे यांची मुलाखत घेतली. एकट्यानं जलमार्गे जगप्रवास करणारे ते पहिले भारतीय आहेत. भारतीय नौसेनेनं त्यांना दिलेल्या म्हादेई छोट्या बोटीतून त्यांनी जलमार्गे पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण केली.
ती मुलाखत माझ्यासाठी फारच प्रेरणादायी ठरली.
मुलाखत झाल्यावर ‘मला तुमच्यासारखंच काहीतरी करायचं आहे’ असं मी त्यांना म्हणालो. त्यावर ते हसून म्हणाले की, त्यांनी ‘नेव्हिगेशन’ शिकण्यासाठी तब्बल २० वर्षं व्यतीत केली आहेत. समुद्रात बोट कशी चालवायची यासाठी वाहणारे वारे आणि समुद्र प्रवाह यांचा अभ्यास करावा लागतो असंही त्यांनी मला सांगितलं.
मला हे करणं शक्य नव्हतं. दोंदे नौसेनेशी संबंधित अधिकारी असल्यानं त्यांचा समुद्राशी निकटचा संबंध होता, त्यामुळे त्यांना ही तयारी करणं सहज शक्य होतं.
माझ्याकरता भूमार्ग हाच श्रेयस्कर मार्ग आहे, हे माझ्या लक्षात आलं.
आणि मग कोणतीही आखणी, तयारी न करता माझा जगप्रवास सुरू झाला. मला याचा आनंद आहे की, आत्तापर्यंत तो उत्तम चालला आहे.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या कुटुंबातला मुंबईला स्थलांतरित झालेला मी पहिलाच. म्हणजे खरं तर माझ्या जगप्रवासाची सुरुवात परभणीतूनच झाली. एक दिवस एका मित्रानं मला परभणी ते मुंबई ‘लिफ्ट’ दिली आणि मी मुंबईत दाखल झालो. त्या वेळी माझ्याजवळ अजिबात पैसे नव्हते. मनात फक्त एकच इच्छा होती, दोन वेळेचं अन्न कमावण्याची.
मी दुष्काळग्रस्त कुटुंबातला. असलेली नोकरी सोडण्याचा विचार करणं ही माझ्यासाठी न परवडणारी गोष्ट होती. मी पत्रकार होतो, नोकरी करत होतो. पगारातून पैसे वाचवत होतो. माझी नोकरी ही माझ्या अख्ख्या कुटुंबासाठी पैसे देणारा एकमेव शाश्वत मार्ग होता. नोव्हेंबर, २०१५मध्ये आजारपणामुळे मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. आई-वडिलांच्या जिवाला घोर नको म्हणून मी त्यांना कळवलंही नाही. तीन दिवस मी बिछान्यावर पडून छताकडे एकटक बघत होतो. माझ्या मनात विचार आला ४८ तासांपूर्वी मी ठणठणीत होतो आणि आज मी माझं बूडही हलवू शकत नाही. त्या क्षणी मला वाटलं मी माझं स्वप्न जगायला हवं, जगणं आज आहे उद्या नाही. आयुष्य अशाश्वत आहे, स्वप्न सत्यात उतरवायलाच हवं.

दवाखान्यातून परत आल्यावर मी अभिजित बांगर (आय.ए.एस.पालघर जिल्हा), निर्भय जाधव, अमोल जाधव आणि विजय कुमार या माझ्या मित्रांना माझ्या स्वप्नाविषयी सांगितलं. माझं बचत खातं होतं ज्यात मी पैसे साठवले होते. आजारपणामुळे वैद्यकीय विमा मंजूर झाला होता. एका मित्राबरोबर मी मुंबईबाहेर छोटं घरही घेतलं होतं. या सगळ्याच्या जोरावर मी प्रवास करायचं ठरवलं. अभिजीतनं मला वचन दिलं की; जेव्हा माझे पैसे संपतील, तेव्हा मी जगातून कुठूनही त्याच्या फोनवर एक मिस्ड कॉल द्यायचा, तो मला फोन करेल. मग मी जवळचा विमानतळ गाठायचा. माझ्या तिकिटाची सोय तो करेल. माझ्यासाठी हा प्लॅन झेड, म्हणजे एक्झीट प्लॅन होता.
आपत्कालीन परतीची सोय करण्याचं वचन अभिजीतनं दिलं, इतकंच नाही तर परत आल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करू, ती मिळेपर्यंत माझ्याकडेच राहा असंही तो म्हणाला. निर्भय, विजय या मित्रांनी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचं, निकड लागलीच तर मदत करण्याचं वचन दिलं. मित्रांच्या या पाठबळामुळे मी ठरवलं, निदान म्यानमार-थायलंडपर्यंत चाचणी घ्यायला हरकत नाही. तरलो, यशस्वी झालो तर पुढचा प्रवास नीट आखता येईल.
चाचणी यशस्वी झाली, मी तरलो आणि पुढचा प्रवास सुरू ठेवला. आता मी इक्वेडॉरपर्यंत पोचलो आहे.
नोकरीतून साठवलेली थोडीफार रक्कम मी म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम इथपर्यंत वापरली. चीनला पोचल्यावर माझे पैसे संपले. मग मी फेसबुकवरच्या मित्रांना मला मदत करण्याचं आवाहन केलं. अनेक मित्रांनी त्यांना शक्य होती तितकी रक्कम माझ्या खात्यावर जमा केली. काहींनी मला त्यांचा महिन्याचा पगार दिला.
ऑस्ट्रेलियात पोचल्यावर मुंबईबाहेर घेतलेल्या घरातला माझा हिस्सा मी विकला.

पैशाशिवाय प्रवास शक्य आहे का, असं जर कोणी मला विचारलं तर ‘शक्य आहे’ असं मी म्हणेन, आणि माझा तसा अनुभवही आहे. मी ऑस्ट्रेलियातल्या तीन महिन्यांत जेवणाकरता आणि राहण्याकरता एक रुपयाही खर्च केला नाही.
हे मी कसं केलं?
मी भारतीय कुटुंबासोबत राहतो. ज्या गावाला जायचं आहे तिथं निघण्यापूर्वी मी फेसबुकवरून आवाहन करतो की जर कोणाचे परिचित त्या गावी असतील तर त्यांनी मला त्यांचं नाव, पत्ता आणि मला त्यांच्याकडे राहता येईल का हे कळवावं. अशा रितीनं माझी सोय होते.
मला ज्या वेळी पुढच्या देशासाठी व्हिसाकरता अर्ज करायचा असतो, त्या वेळी मी एखाद्या भारतीय उपहारगृहात जाऊन अन्न आणि निवारा मिळावा यासाठी त्यांना विनंती करतो, त्या बदल्यात मी त्या उपहारागृहाच्या स्वयंपाकघरात संध्याकाळी काम करतो. माझा प्रवास अशा पद्धतीनं पुढं सरकतो आहे.
लॅटीन अमेरिकेत फार थोडे भारतीय आहेत. ब्राझीलमध्ये मी इंडियन हाऊस कलिनेरियाच्या दीपक यांच्यासोबत राहिलो. लिमामध्ये इंडियन्सबारमध्ये राहिलो. पेरूमध्ये रेस्तराँ हिंदू मंत्रा आणि क्विटोमध्ये, तर इक्वेडॉरमध्ये शेर-ए-पंजाबमध्ये राहिलो.
आत्तापर्यंत मी म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, चिली, अर्जेंटिना, ब्राझील, बोलिव्हिया, पेरू आणि आता इक्वेडोरपर्यंतचा प्रवास केला आहे.
प्रत्येक दिवस हा नवा दिवस म्हणून उगवतो आणि नवे अनुभव, नव्या अडचणी घेऊन येतो. अनेक वेळा कुठल्या ना कुठल्या नियमावलीखाली माझ्या बँकेनं माझं ATM कार्ड ब्लॉक केलं. अशा वेळी अनेक अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागलं. तरणं मुश्कील झालं.
चीनमध्ये, शांघायला असताना माझ्याकडे खूप कमी डॉलर्स होते आणि माझं कार्ड ब्लॉक झालं. मला तिथं कोणी भारतीयही भेटेना. शांघायच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेलो, तिथंही मला कोणी मदत केली नाही. शेवटी मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो, त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी माझी रहायची सोय हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांसोबत लगेच केली. मी दोन आठवडे हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांसोबत राहिलो.
चिली देशात असताना माझं कार्ड दुसऱ्यांदा ब्लॉक झालं. तो किस्सा फारच वेगळा. झालं असं की जानेवारी, २०१७ मध्ये चिलीत जंगल-वणवा पेटला. लॅटीन अमेरिकेतला चिली हा देश तुलनेने लहान देश आहे. त्याची लोकसंख्या मुंबईच्या निम्मी आहे. या वणव्याचं मोठ्या आगीत रूपांतर झालं आणि त्यानं इतकं रौद्र स्वरूप गाठलं की रशिया, अमेरिका आणि ब्राझील यांनी पाण्याचे फवारे मारण्यासाठी आणि आग आटोक्यात आणण्यासाठी तिथं विमानं पाठविली. भारतात माझ्या आईला हे समजलं त्या वेळी तिनं मला ‘तू जाऊन मदत कर’ असं सांगितलं. ते काम जोखमीचं होतं. पण मी अत्यंत दुर्गम भागात जाऊन यशाशक्ति मदत केली. माझी रवानगी वैद्यकीय पथकात केली गेली कारण मला आग नियंत्रणात आणण्याचं काहीच प्रशिक्षण नव्हतं, आणि स्पॅनिश भाषाही येत नसल्यानं सूचना कळत नव्हत्या. पण वैद्यकीय पथकातली माझी मदत पाहून चिली देशाच्या राष्ट्रपती माझ्यावर खूश झाल्या. मी त्यांना विनंती केली की, मला तुमच्या देशात एक झाड लावू द्या, आगीमुळे जंगलाच्या काही भागाची राखरांगोळी झाली, मला एक झाड लावून त्याला उत्तर देऊ द्या. त्याला त्यांनी आनंदानं होकार दिला.
त्याच दरम्यान माझं ATM कार्ड ब्लॉक झालं. माझ्यासाठी हा माझा ‘इज्जत का फालुदा’ होणं होतं. एकीकडे एका देशाचे राष्ट्रपती आपल्यावर खूश होतात आणि तिथंच आपलं ATM कार्ड ब्लॉक होतं. मग मी पथकात ज्यांच्याबरोबर काम केलं, त्या डॉ. डानियोला सांडोवाल यांना निवारा देण्याची विनंती केली. माझं ATM पूर्ववत होईपर्यंत मी त्यांच्या आईसोबत त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहिलो.
मी अजून किती देश फिरू शकेन, त्याकरता अजून किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज बांधू शकत नाही. कारण माझ्या प्रवासाला काही नियोजनच नाही. भारतीय पासपोर्ट ही अतिशय विपरीत बाबी असलेली गोष्ट आहे. भूतानपेक्षाही कमकुवत आहे. फार थोडे देश भारतीय नागरिकांना ऑन अरायव्हल व्हिसा देतात. अनेक देश अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील व्हिसा नाकारतात. त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रवासाचा नियोजित मार्ग बदलावा लागतो. प्रवासाची दिशा बदलते आहे. नशीब, मित्रांचा आशीर्वाद आणि त्यांची मदत यावरच हा प्रवास सुरू आहे.
चीनहून मला जपानला जायचं होतं, पण जपाननं व्हिसा नाकारला आणि ऑस्ट्रेलियानं तो दिला त्यामुळे मी जपानला न जाता ऑस्ट्रेलियाला गेलो. ऑस्ट्रेलियात असताना लॅटिन अमेरिकेचा व्हिसा मिळण्याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागला. आत्ता इक्वेडॉरमध्ये मी अमेरिकेच्या व्हिसाची वाट पाहतोय.
सर्वच गोष्टी माझ्या आवाक्याबाहेर आहेत आणि माझे कशावरच नियंत्रण नाही. कशाबद्दलही मी ठाम काहीच सांगू शकत नाही.
भारतीय संस्कृती इतर कोणत्याही देशांतल्या संस्कृतीपेक्षा अतिशय वेगळी आहे. आशिया, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका… कुठलीही संस्कृती भारतीय संस्कृतीसारखी नाही. यात तीन गोष्टी अतिशय उठून दिसणाऱ्या आहेत. भारतीय संस्कृतीमधली लग्नसंस्था, एकत्र कुटुंब पद्धती आणि पैसे साठवण्याची लोकांची पद्धत. आत्तापर्यंत पाहिलेल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये मला या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत.
अनेक देशांमध्ये लग्न ही बाब ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली’ अशी आहे. लोक काही आठवडे किंवा महिने फार तर फार वर्ष एकत्र राहतात आणि वेगळे होतात. भारतात सोशल मिडियावर नवरा-बायको नातं बिनसल्याच्या नाकदुऱ्या काढतात, एकमेकांचा अवमान करतात.
ब्राझीलमध्ये एका मैत्रिणीला मी रविवारी कॉफीसाठी जाऊया का असं विचारलं, त्यावर ती म्हणाली तिची वडिलांसोबत अपॉइन्टमेन्ट आहे रविवारी. सख्या आईवडिलांना भेटण्यासाठी अपॉइन्टमेन्ट घ्यावी लागते आणि इतर कुठलेही कार्यक्रम न आखण्याइतका नात्यातला साचेबद्धपणा बघून मी आश्चर्यचकितच झालो.
भारतात माणसं पैसे साठवतात- वृद्धापकाळाकरता, मुलांकरता, नातवंडांकरता. आत्तापर्यंत पाहिलेल्या देशांपैकी कुठेच मला पैसा संचयाची वृत्ती दिसली नाही. ज्या काही लोकांना मी भेटलो त्यांनी ॲपलचा फोन कर्जावर घेतला होता. भारतात जात-धर्मांच्या शुचितेमुळे लग्नाच्या बाबतीत मुक्तपणा करता येत नाही. ही एक वाईट गोष्ट आहे. लॅटीन अमेरिकेत चिलीचा मुलगा व्हेनिजुएलाच्या किंवा ब्राझीलमधल्या मुलीशी लग्न करतो. या दोन देशांमध्ये व्हिजाची रीतच नाहीये. लॅटिन अमेरिकेतले नागरिक सरकारी ओळखपत्रावर कुठंही जाऊ शकतात.
चिलीतले काही अनुभव थरारक होते. मी लिफ्टसाठी थांबलो होतो, तेव्हा भर रस्त्यावर मला चोरांनी लुटलं. मला अतिशय भय वाटलं. धास्ती आणि भीती यांमुळे दोन आठवडे मी झोपू शकलो नाही. माझे पैसे, मोबाईल सगळंच नेलं चोरट्यांनी. एफ.आय.आर. दाखल करण्यापूर्वी मी चिली पोलिसांकडून त्यांचा मोबाईल घेतला आणि भारतीय दूतावासाला लिहिलं. दूतावासातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माझ्या नावापासून इत्यंभूत माहिती होती. तिथल्या माणसानं चार दिवसांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितलं की, ते ऑफिसमध्ये नव्हते, बाहेरगावी होते. मग विचारपूस केली मी ठीक आहे का याची. त्या वेळी एक क्षण भारतीय परराष्ट्र खात्याच्या मंत्री महोदयांकडे याबद्दल तक्रार करण्याचा विचार मनात आला. पण मी तसं केलं नाही.
मी ज्या देशात जातो तिथं आठवण म्हणून देशाच्या राजधानीत, पर्यावरण खात्याच्या आवारात किंवा राष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या आवारात जिथं परवानगी मिळेल, तिथं झाड लावतो. झाड लावायला मजा येते. जिवंत स्मृती असते ती आणि हवामान बदलाला दिलेलं उत्तरही.

झाड लावण्यापूर्वी त्या देशाला भारतीय दूतावासाकडून संदर्भपत्राची अपेक्षा असते. मी इक्वेडॉर येथील भारतीय राजदूतांच्या कार्यालयाला त्या संदर्भात लिहिलं पण उत्तर आलं नाही. मग युरोपीय युनियन ॲम्बसीने क्युटोच्या पर्यावरण खात्याशी माझ्या वतीनं बोलणी केली. आपली अॅम्बसी तत्परतेनं मदत करत नाही. अपवाद म्हणजे जर तुम्ही माननीय सुषमा स्वराज यांना ट्वीट केलंत तर मात्र लगेच मदत मिळते. पण त्या मंत्री आहेत, सामान्य अधिकारी नाहीत. सामान्य अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना साध्या-साध्या गोष्टींत लक्ष घालावं लागतं, ही भारतासाठी दुर्दैवाची बाब आहे.
अर्थात काही ठिकाणच्या भारतीय दूतावासाचे चांगले अनुभवही माझ्या गाठीशी आहेत. पण परदेशात माझ्यासारख्या फिरस्त्या प्रवाशाला दूतावासाचा आधार वाटणं स्वाभाविकच आहे.
दिलीप दोंदे यांनी भारतीय नौदलाला जागतिक नकाशावर मान मिळवून दिला, मी जर भूमार्गावरचा माझा हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करु शकलो, तर कदाचित तसे करणारा मी पहिला भारतीय, कदाचित पहिला आशियाईदेखील ठरेन आणि मग भारताकडे हे दोन विक्रम असतील, एक जलमार्गे पृथ्वी-प्रदक्षिणा आणि दुसरा भूमार्गे पृथ्वी-प्रदक्षिणा.
वैद्यकीय विमा मंजूर झाल्यामुळे मला पैसे मिळाले. प्रत्येकानं आपला वैद्यकीय विमा उतरवावा अशी माझी वाचकांना विनंती आहे. कारण जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्या एकट्या येत नाहीत. त्यांची मालिकाच येते आणि ती तुम्हांला अकस्मात गाठते. मी आर्थिक बाबींचा फार विचार केला नाही. माझ्याकडे आपत्कालिन पैशांची तजवीज नव्हती, पण आता टाटा एज्युकेशन ॲन्ड डेव्हलपमेन्ट ट्रस्टनं मला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे माझ्याकडे आता इमर्जन्सी फंड आहे आणि हा विक्रम पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही आहे.
अनेक जणांना माझ्यासारखंच काहीतरी करण्याची आकांक्षा असणार, पण उत्पन्नाचा अभाव, स्थैर्याचा मोह त्यांना ते करू देत नाही. माझ्यासमोर अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आदर्श होता. त्यांच्या आर्थिक अडचणीचं उदाहरण होतं. ते थांबले नाहीत, हरले नाहीत, खचले नाहीत. त्यांनी त्यांचे कष्ट, त्यांची कुवत आणि सचोटी यांवर विश्वास ठेवला. माझ्या स्वत:कडून फार अपेक्षा नाहीत, पण माझा माझ्या कुवतीवर, स्वबळावर विश्वास आहे. त्यामुळे आर्थिक भयावर मी मात करू शकलो. माझ्या आईवडिलांची मला मदत करण्याची ऐपतच नाही. त्यांचा स्वत:चाच महिन्याचा खर्च त्यांना कसाबसा झेपतो. मराठवाडा-विदर्भातल्या शेतकऱ्यांची दैना आपण वाचतच असाल. मी इथं जगप्रवास करतोय, पण माझे डोळे कर्जमाफीकडे लागलेले असतात, कारण माझ्या कुटुंबानंही शेतीसाठी कर्ज घेतलं आहे.
माझ्या मित्रांनी मौल्यवान मदत केली मला. त्यांनी मला इथपर्यंत आणलं. माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या ठेवीतली ३/४ रक्कम मला माझ्या जगप्रवासासाठी दिली, मला त्यांची नावं इथे नमुद करायची आहेत, पण त्यांची त्याला परवानगी नाही.
पाच हजार रुपयांचा वैद्यकीय विमा आणि काही लाखांची घरखरेदी, याव्यतिरिक्त मी मैत्र कमावलं. मित्र असोत किंवा अनोळखी व्यक्ती, मी आजपर्यंत अनेकांना मदत केली आहे. कधी दवाखान्यात नेणं, अंध, वृद्ध व्यक्तींना रस्ता ओलांडायला मदत करणं अशी. माझी आई कायम म्हणते की, अशीच मदत एक दिवस देव तुला करेल. ही गुंतवणूक तुला आयुष्यात अनेपक्षित फायदा कमवून देईल. माझ्या आईचे शब्द खरे ठरतायत. परदेशात लोक मला हजारो हातांनी मदत करतायत. हजारो वेळा माझे मित्र प्रायोजकत्वासाठी कंपन्यांना भेटणं, फंडांची माहिती काढणं अशी मदत करतायत. तुम्हांला माहिती असल्यास मला जरूर कळवा.

माझं प्रवासाचं गणित सोप्पं आहे. मी लिफ्ट घेऊन प्रवास करतो. ऑस्ट्रेलियात मी प्रवासासाठी एक रुपयाही खर्च केला नाही. सतरा वेळा लिफ्ट घेऊन मी पर्थ (पूर्व किनारा) ते सिडनी (पश्चिम किनारा) प्रवास केला. तीन महिन्यांत फक्त सात दिवस हॉस्टेलमध्ये राहिलो बाकी ज्यांनी घरात आश्रय दिला त्यांच्याबरोबर.
सुरक्षेच्या कारणांमुळे ब्राझील, बोलिव्हिया, पेरू हे देश वगळता इतर ठिकाणी मी स्थानिक लोकांसोबत राहिलो, त्यांचं अन्न जेवलो, त्यांची कामं केली. इतर काही महत्त्वाच्या शहरांमध्ये मला हॉस्टेल्स मिळाली, तिथं केलेल्या कामाच्या बदल्यात अन्न आणि निवारा मिळाला.
स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, त्यांचा पाठपुरावा करा. मैत्र जोडा, मदत करा, आयुष्य अशाश्वत आहे. स्वप्नं सत्यात उतरू शकतात.
शुभेच्छा !
मूळ इंग्रजी लेख – विष्णुदास चापके
अनुवाद – सविता अशोक प्रभुणे
इ-मेल – wishnew27@gmail.com
विष्णुदास चापके हे शेतकरी, पत्रकार, जगप्रवासी आहेत. ते सध्या जगप्रदक्षिणेला निघालेले आहेत. तत्पूर्वी त्यांनी भारतात पत्रकार म्हणून काम केलं आहे.
अत्यंत धाडसी आणि जिगरबाज प्रवासी आहात आपण आपला प्रवास सुखकर, सहज , आरामात आणि सुरक्षीत होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना अनेक आशिर्वाद… तुमची ईच्छा ईश्वर सदैव पुर्ण करो…🙏
LikeLike
तुमच्या धाडसाला सलाम… पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा. तुमचे जगप्रवासाचे स्वप्न कमी अडथळे येत, सगळीकडे चांगले साहाय्य मिळत पुरे होवो बी ईश्वराकडे प्रार्थना….
LikeLike