नंदन होडावडेकर
कोकुश्किन या गमतीदार नावाच्या पुलावर येऊन मी थांबलो आहे. पूल कसला, त्याला खरं तर साकव म्हटलेलं अधिक शोभून दिसेल. याच कालव्यावर पुढे काही अंतरावर, असाच एक साकव आहे. डावीकडे या शहरात ठिकठिकाणी आढळणाऱ्या, विशिष्ट रचनेच्या इमारती आहेत. बहुतेक साऱ्या सौम्य, पेस्टल रंगातल्या. खास या शहराच्या अशा बरोक शैलीतल्या. जागोजागी पाहूनही अद्याप त्यांची बांधणी माझ्या नजरेत शिळावलेली नाही. एवढ्या दूर उत्तरेत, उन्हाळी संध्याकाळचा प्रहर हा निवांत ऐसपैस पसरलेला असतो. त्या सौम्य प्रकाशात त्यांचे रंग अधिक गहिरे झाल्यासारखे वाटतात.
गेला आठवडाभर या देशानं, या शहरानं आपल्या भव्यतेनं दिपवलं होतं. आता या पुलावर, या संध्याकाळी आपली किरकोळ खरेदी आटपून संथ पावलांनी घरी निघालेली बाबुश्काही पॉइन्यन्ट वाटते आहे. यात या वेळेचा, खालून वाहणार्या कालव्याच्या संथ पाण्याचा, अबोलपणे जनांचे-अनुभव-पुसता-मोडमध्ये गेलेल्या माझ्या तत्कालीन प्रवासी मनोवृत्तीचा जसा भाग आहे; तसाच त्या जागेचाही. ज्याला ‘रशियन अश्वत्थामा’ असं सार्थपणे म्हणता यावं, असा रास्कोलनिकोव्ह हा दस्तायेवस्कीच्या ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट या कादंबरीचा नायक. त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग आणि त्यापुढचं महाभारत सेन्ट पीटर्सबर्ग शहरातल्या ज्या विभागात उलगडत जातं, तोच हा भाग.
. . .
दस्तायेवस्कीच्या वाङ्मयीन महत्तेबद्दल फारसे शब्द खर्ची घालण्याची काही आवश्यकता नाही. एकोणिसावं शतक हे रशियन साहित्याचं सुवर्णयुग म्हणता येईल. पुश्किन, टॉलस्टॉय, चेकोव्ह, गोगोल, तुर्गेन्येव्ह अशा उत्तुंग मांदियाळीतल्या लेखकांपेक्षा दस्तायेवस्कीचं लेखन अतिशय निराळं आहे. उमराववर्गाच्या मर्यादित परिघात न घुटमळता, ते साहित्यात तोवर बव्हंशी अस्पर्श राहिलेल्या सामान्य माणसांच्या आयुष्याचा वेध घेतेच; पण त्याच वेळी एखाद्या कसलेल्या पण सहृदय मानसोपचारतज्ज्ञाच्या निष्णाततेनं ते माणसाच्या मनातली गुंतागुंत आणि अंतर्विरोध नेमक्या शब्दांत मांडतं. एकाच शास्त्रज्ञानं सूक्ष्मदर्शकाखाली अणुरणिया थोकड्या वस्तू न्याहाळाव्यात आणि त्याच सम्यक दृष्टीनं आकाशाएवढ्या गोष्टींचाही वेध घ्यावा, तशी ही विलक्षण प्रतिभा.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, अभियांत्रिकीची पदवी मिळवलेल्या या मनस्वी तरुणाचं पुढचं आयुष्य फार निराळं होतं. अवघ्या विशीत, ‘मॉक एक्झिक्युशन’सारख्या (झारविरुद्ध राजद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावली जाऊन, तिच्या अंमलबजावणीसाठी वधस्तंभाकडे नेलं जाणं आणि आयत्या वेळी ती रद्द केली जाणं. हा धक्का सहन न होऊन, ‘पेट्राशेवस्की सर्कल’मधल्या दस्तायेवस्कीच्या अनेक सहकार्यांचं मानसिक संतुलन कायमचं ढासळलं.) भयाण मानसिक आणि सैबेरियातल्या लेबर कॅम्पमधल्या तुरुंगवासासारख्या शारीरिक हालअपेष्टा त्यानं सोसल्या. तब्बल दहा वर्षांनी रशियाच्या मुख्यभूमीत परतल्यावर आर्थिक विवंचना दस्तायेवस्कीसमोर आ वासून उभ्या होत्या. देणेकर्यांचे तगादे, त्यापायी मानेवर जू ठेवून नियतकालिकांसाठी वेळच्या वेळी करावं लागणारं लिखाण; अपस्मारासारखा जन्माचा सोबती म्हणून येऊन चिकटलेला विकार; पैशांच्या अभावापायी एकाच शहरात वीसहून अधिक ठिकाणी बदलावी लागलेली बिर्हाडं आणि त्या निमित्तानं सेन्ट पीटर्सबर्गच्या देखण्या मुखवट्यामागच्या दारिद्र्याचं घडलेलं आणि भोगलेलं दर्शन; दगावलेली अपत्ये; धर्म, त्यातले विचार आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांच्यातलं द्वैत; नैतिकता व न-नैतिकता तसंच माणसाची मूळ प्रवृत्ती व संस्कार यांच्यात चाललेला शाश्वत झगडा… या सार्या गोष्टींचं प्रतिबिंब, अपरिहार्यपणे, पण नेमकेपणे त्याच्या लिखाणात पडलेलं दिसून येतं.
रास्कोलनिकोव्हच्या घराजवळ
विशेषतः, सेन्ट पीटर्सबर्गबद्दल बोलायचं झालं तर पुश्किनसारख्या मान्यवर रशियन साहित्यिकांनं रेखाटलेल्या, रशियाच्या या युरोपाभिमुख सांस्कृतिक राजधानीच्या सुबक चित्रणाला दस्तायेवस्कीची वास्तववादी लेखणी (प्रतिमाभंजनाच्या अभिनिवेशाशिवाय) छेद देऊन जाते. मॉस्कोसारख्या काहीशा एकसुरी, सत्ताकेंद्री शहरापेक्षा दस्तायेवस्कीला हे एकाच वेळी कलासक्त आणि किंचित बकाल; युरोपिय चेहऱ्याचं पण तरीही आपली खास रशियन ओळख जपणारं शहर अधिक ओळखीचं वाटावं, हे समर्पकच.
. . .
कालव्याच्या पलीकडे येऊन मी शब्दश: रास्कोलनिकोव्हच्याच रस्त्यानं चालत राहतो. सरावानं लिपी वाचता येऊ लागली असली, तरी गल्ल्यांची लांबलचक नावं अजूनही बो-हो-री-ही-क-ह-र सारखी एक-एक अक्षर जुळवून वाचावी लागतात. कालवा उजव्या हाताला ठेवून चालत असताना ‘स्रेद्नाया पोद्याचेस्काया’ नावाच्या गल्लीत डावीकडे वळतो. जसजसं आत चालत जावं, तसतशी इमारतींची रया जाऊ लागल्याचं दिसतं. स्वच्छ फूटपाथ जाऊन न उचलला गेलेला कचरा, कुठं साचलेलं डबकं नि खड्डे, पोपडे उडालेल्या इमारती, काचा फुटलेल्या खिडक्या, धूळ खात पडलेल्या गाड्या अशा गोष्टी दिसू लागतात. कालव्याजवळची थंड, आल्हाददायक हवा जाऊन दाटीवाटीच्या वस्तीत अपरिहार्यपणे येणारे गंध नाकावर आक्रमण करतात. एखादं विधान लिहून त्यापुढे उद्गारचिन्ह ठेवून द्यावं, तसा स्वत:शीच बडबडत चालत जाणारा एक भ्रमिष्ट माणूस या चित्राची चौकट अधिकच पक्की करतो. (रास्कोलनिकोव्हही याच रस्त्यानं, असाच स्वत:शी बडबडत निघालेला असतो.)
धारावीतला बकालपणा पाहायला टुरिस्ट जसे जथ्थ्यानं येतात; तसेच आपणही नकळत ‘स्लम टुरिस्ट’ झालोय की काय, असं वाटून क्षणभर अपराधी वाटतं खरं; पण त्याच वेळेला दस्तायेवस्कीनं केलेलं या परिसराचं वर्णनही आठवून जातं. गेल्या दीडशे वर्षांत या भागात नक्कीच मोठे बदल झालेत (विशेषतः हर एक कोपर्यावर दिसणारे दारूचे बार/टॅव्हर्न्स बंद झालेत); पण पुस्तकात वर्णन केलेला बकालपणा, कनिष्ठ मध्यमवर्गीय हलाखी मात्र अजूनही जाणवण्याजोगी.
रास्कोलनिकोव्ह आपल्या साऱ्या समस्या सोडवण्याच्या हेतूनं ज्या म्हाताऱ्या सावकारणीच्या घरी पोचतो, ती इमारत आता समोरच आहे. कादंबरीत जरी रास्कोलनिकोव्हच्या घरापासून इथलं अंतर मोजून सातशे तीस पावलांचं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात ते काहीसं अधिक आहे. सुरुवातीला कोकुश्किन पुलावर ओलांडलेला ग्रिबोयेदोव्ह कालवा आता एक झोकदार वळण घेऊन पुन्हा उजवीकडे आला आहे. आता बव्हंशी स्वच्छ असणारा हा कालवा, दस्तायेवस्कीच्या काळात ‘कचराकुंडी’ म्हणून ओळखला (आणि वापरलाही) जाई.
. . .
पहिल्यांदा ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट’ कादंबरी वाचली; तो अनुभव मी कधी विसरेन असं वाटत नाही. ते हिवाळ्याचे दिवस होते; पाचच्या आसपासच अंधार होई. ऑफिस सुटल्यावर जवळच्याच एका कॅफेत बसून जेवणाची वेळ होईपर्यंत पुस्तक वाचण्याचा शिरस्ता होता. मराठी पुस्तकांना वेळ लागत नसे, पण इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाची लय सापडेपर्यंत पहिली पन्नास-एक पानं खर्ची पडत. ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट’चा तो ठोकळा हाती घेतला मात्र आणि कॅफेची वेळ संपेपर्यंत तिथून हलू शकलो नाही. पुढचे काही दिवस हे ‘क्राईम…’मयच होते.
पुस्तकवाचनाच्या छंदातही काही काळानं एक किंचितसं बनचुकेपण येत असावं. ‘क्राईम…’ हाती घेण्यापूर्वी आपण एक वाचक म्हणून निर्ढावत चाललो आहोत की काय, अशी शंका काही वेळा येत असे. आवडणारी पुस्तकं अधूनमधून सापडत; पण जे वाचून आपण अंतर्बाह्य झपाटून जावं, एकीकडे ‘वाट ती चालावी रुळलेली’ छापाचं रुटीन चालू असतानाही त्या पुस्तकाव्यतिरिक्त इतर काही सुचू नये, असा अनुभव विरळाच. अनपेक्षितपणे ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट’ वाचताना तो माझ्या पदरी पडला.
ही निवळ डोळ्यांत बोटं घालून पाणी काढायला लावणारी शोकांतिका वा उपदेशाचा प्रसाद हातावर ठेवणारी बोधकथा नव्हे; ती त्याहून अधिक गुंतागुंतीची आहे. जागतिक साहित्यात ‘रशियन सोल’ म्हणून एक वाङ्मयीन संकल्पना आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वा ती पार पाडण्याचा रशियन दृष्टिकोण हा युरोपिय दृष्टिकोणाहून निराळा असतो. प्रसंगी अतार्किक वाटणारी, कुठल्याही चौकटीत बसवता न येणारी आणि ढीगभर समस्यांना तोंड देऊनही अविचल असलेली ही जी रशियन प्रवृत्ती आहे; तिचं चित्रण नेपोलियनच्या फसलेल्या रशियन मोहिमेनंतर गोगोलादिकांनी जरी केलं असलं, तरी दस्तायेवस्कीनं ते पूर्णत्वास नेलं असं म्हटलं जातं. ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट’ हा त्या वाटचालीतला एक महत्त्वाचा भाग.
मॉस्को मेट्रोचं दस्तायेवस्काया स्थानक – ‘क्राईम अॅन्ड पनिशमेन्ट’मधले विविध प्रसंग
रास्कोलनिकोव्हची ती विमनस्क अवस्था; त्याच्या हातून घडलेले एक नव्हे तर दोन खून; पोर्फिरी पेट्रोव्हिचसोबत होणाऱ्या त्याच्या तात्त्विक चर्चा आणि त्यातच रंगणारा उंदीर-मांजराचा खेळ; मार्मेलेडोव्हसारख्या त्याच्या स्नेह्याच्या कुटुंबाची होणारी वाताहात; त्याला पडणारी ती विलक्षण स्वप्नं आणि वेळोवेळी उसळी घेणारी आत्मघातकी वृत्ती आणि परिणामी त्याच्यावर जीव लावणाऱ्या व्यक्तींची होणारी परवड; सरंजामशाहीला लागलेली उतरती कळा आणि अद्याप दूर असलेली कम्युनिस्ट क्रांती अशा विचित्र संक्रमणकाळातलं ते रशियन समाजजीवन- या साऱ्या गोष्टींनी पुढचे दिवस व्यापून टाकले होते. मनीच्या मृत्यूनंतर लेण्यांतल्या बुद्धमूर्ती पाहत चाललेल्या पांडुरंग सांगवीकराला बुद्धाच्या दु:खाची, करुणेची विशालता एका क्षणी पेलवेनाशी होते; त्या ‘कोसला’मधल्या बुद्धदर्शन भागाची (उदाहरणार्थ) आठवण यावी, असा आपल्या खुजेपणाचा अनुभव. त्या श्रेणीचा नसला तरी त्याच्याशी दुरून नातं जोडू पाहणारा.
केवळ रास्कोलनिकोव्हच नव्हे, तर ‘क्राईम…’मधली बहुसंख्य पात्रं ज्या भागात राहत होती, तिथं हिंडताना, पहिल्या खेपेच्या वाचनाची ती आठवण आता काळाच्या आणि दैनंदिन चाकोरीच्या अपरिहार्य अंतरायानं बरीचशी निवली आहे. ‘वाहत-येईल-पूर-अनावर-बुडतील-वाटा-आणि-जुने-घर’ यासारखे अनुभव आपल्यासारख्या रुटीन जंतूंना बेताबेतानंच यावेत. मर्ढेकरांच्याच शब्दांत सांगायचं तर- ‘आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी, आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी!’
ग्रिबोयेदोव्ह कालव्याचा प्रवाह मागे सोडून मी मुकाट पुढे निघतो.
. . .
हॉटेलवर परत जाण्याऐवजी, नकाशा काही काळ खिशात ठेवून, हे शहर अधिक जवळून पाहण्याची हुक्की येते. कितीही चाललं तरी फारसा शीण जाणवू नये, अशी सुरेख हवाही आहे. थोडंच अंतर गेल्यावर शहराचा तोंडवळा पुन्हा पालटू लागतो. मुख्य रस्ता पुनश्च रुंदावतो आणि पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या मधोमध असलेल्या प्रशस्त पट्ट्यात, लोक ह्या सुदूर उत्तरेतल्या अल्पजीवी उन्हाळ्याचा आनंद आपापल्या तऱ्हेनं उपभोगताना दिसतात.
फिकट निळ्या रंगातलं ‘सेन्ट निकलस नेव्हल कॅथेड्रल’ समोर येतं. या सहलीत काही चर्चेस आतून पाहण्याचा योग आला होता. सिरिलिक लिपीप्रमाणे रशियन चर्चेसवरही ग्रीक ऑर्थोडॉक्स पंथाचा मोठा प्रभाव आहे. तेराव्या शतकातल्या मंगोल आक्रमणानंतर घटलेल्या किएव्हच्या महत्त्वामुळे आणि १४५३ साली झालेल्या कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावानंतर, पौर्वात्य ख्रिश्चन धर्मात रशियाचा तारा अधिक तेजानं तळपू लागला. ‘नवीन रोम’ हा किताब कॉन्स्टॅन्टिनोपलकडून मॉस्कोकडे सरकला. आता कम्युनिझमचा खेळ (ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा!) संपल्यावर नवीन राजवटीतही चर्चच्या प्रस्थाची पुनःस्थापना होते आहे. माझ्या भारतीय दृष्टीला निर्जंतुक, खडतर नि पांढऱ्याफटक अँग्लो-सॅक्सन चर्चेसपेक्षा इथली नक्षीदार घुमटांची, लक्षवेधक मोझेएक्सची आणि आतून प्रसंगी भडकपणाकडे झुकणाऱ्या भरजरी सजावटीतही, धीरगंभीर वाटणारी चर्चेस अधिक ओळखीची वाटतात.
हे कॅथेड्रल पाठीशी ठेवून निव्हा नदीच्या दिशेनं वळतो, आणि थोड्या वेळात फिकट हिरव्या रंगातलं मारिन्स्की थिएटर समोर येतं. कालच या थिएटरमध्ये चायकोव्हस्कीच्या ‘स्वान लेक’ या जगप्रसिद्ध बॅलेचा प्रयोग पाहण्याचा योग आला होता आणि नृत्यकलेबाबत एकंदरीत औरंगजेब असलेला मीही थक्क होऊन गेलो होतो. त्या लयबद्ध प्रयोगाची काल पडलेली भूल आणि आज रास्कोलनिकोव्हच्या घराजवळ असताना डोक्यात माजलेलं विचारांचं काहूर. यात विरोधाभास नसला, तरी या दोन टोकांच्या प्रतिक्रियांतल्या फरकाची माझी मलाच किंचित गंमत वाटते.
. . .
दमित्री (यातल्या ‘द’चा उच्चार अर्धा-पावच) आमचा या शहरातला स्थानिक गाईड. विशीतला, इंग्लिश साहित्यात नुकतीच पदवी मिळवून नोकरीच्या शोधात असलेला. आजचा दिवस हा साऱ्यांसाठी मोकळा असला, तरी त्यानं आमच्या सहलगटातल्या काही उत्साही लोकांना, मारिन्स्की थिएटरजवळच्याच एका खास ठेवणीतल्या, छोटेखानी रेस्तराँमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी बोलावलं आहे.
मी वेळेच्या आधीच तिथं पोचलो आहे. ह्या रेस्तराँचा तोंडवळा तसा घरगुती आहे. रशियन-आशियाई-इराणी-तुर्की अशा संस्कृतिसंगमाच्या चौकात वसलेले आणि त्या खुणा चेहरेपट्टी व पोशाख यांवर बाळगून असलेले काही मध्य आशियाई श्रमिक सोडले; तर बहुसंख्य टेबलं ही विस्तारित रशियन कुटुंबांनी व्यापलेली आहेत. (मालाड किंवा घाटकोपरच्या खाऊगल्लीत इष्टमित्रांसह ‘सहनौभुनक्तु’त रमलेले गुर्जरगण मुंबईकरांनी आठवावेत.) थट्टामस्करी, किस्से सांगणं, टेबलावरले पदार्थ एकमेकांपर्यंत पोचवणं इत्यादी लिळांत सारे मग्न आहेत. आपल्याकडे बिल कुणी द्यायचं, यावरून जशी माफक चढाओढ होते, तशीच इथंही पाहायला मिळते. (अमेरिकेत असलं काही दिसणं हे दुर्मीळच!). तरुण मुलांचे कपडे हे बहुधा अमेरिकन स्पोर्ट्स टीम्सचे (‘शिकागो बुल्स’, ‘अटलांटा फाल्कन्स’) किंवा ब्रॅन्ड्सचे लोगो असणारे आहेत. सांस्कृतिक शीतयुद्धात कुणाचा विजय झाला हे अगदी उघड आहे.
काही दिवसांपूर्वीच पाहिलेलं, मॉस्कोतल्या लाल क्रेमलिन तटबंदीच्या अगदी बाहेरच असलेलं मॅक्डॉनल्ड्स मला आठवतं. कुतूहल म्हणून आत चक्कर मारली असताना ते टीनएजर मुलामुलींनी ओसंडून वाहताना आढळलं. अगदी ढोबळमानानं पाहिलं तर, मॅक्डॉनल्ड्समधलं खाणं आणि कम्युनिस्ट काळातले उपलब्ध सरकारी पर्याय यांमध्ये बरीच साम्यं आढळतील- मोजके पदार्थ – मुख्यत: बीफ आणि बटाटा यांचे, घाऊक निर्मितिप्रक्रिया, स्वस्त दर, लांब रांगा आणि कमी पगारावर राबणारे कर्मचारी. अर्थात, ही तुलना केवळ ‘परिहासविजल्पितम’च्या हेतूनं केलेली असली, तरी राजकीय स्पेक्ट्रम ही केवळ डावीकडून उजवीकडे जाणारी सरळ रेषा नसून, तो स्पेक्ट्रम वास्तविक घोड्याच्या नालेच्या आकाराचा आहे (म्हणजेच, दोन्हीकडच्या अतिटोकांच्या मंडळींतली साम्यं लक्षणीय आहेत); असा एक ‘नातिचरामि’ राजकीय सिद्धान्त आहे, तो कदाचित इथंही किंचितसा लागू व्हावा.
यथावकाश आमचा गट येतो, गप्पा रंगतात. बोर्श्त सूपचे निरनिराळे प्रकार, राय ब्रेड, सशाच्या मांसाची चविष्ट पिरोश्की, हनी केक्स आणि सोबत व्होडका टेस्टिंग अशी साधारण ‘खाणेसुमारी’. मग स्पॅनिशमध्ये ज्याला ‘सोब्रेमेसा’ म्हणतात (शब्दश: अर्थ- टेबलावर; ध्वन्यर्थ- जेवण झालं तरी टेबलावर बसून हात वाळेपर्यंत मारलेल्या गप्पा), तसा गप्पांचा फड रंगतो. बहुसंख्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. गेले दोन आठवडे, चार देशांत आमचा गट एकत्र फिरला आहे. काही काळ एकत्र घालवला तरी, पुन्हा भेटगाठ व्हायची फारशी शक्यता नसणारा हा परिचय तुटपुंजा, अल्पजीवी असला; तरी कदाचित त्याच कारणामुळे ही समानशील मंडळी सैलावून मनमोकळं बोलू लागतात. एक साठीतलं दांपत्य आहे, ते नुकतंच आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातल्या शुश्रूषेनंतर आणि मुलं कॉलेजला गेल्यावर थोडा निवांतपणा लाभलेलं; तर दुसरीकडे एक घटस्फोटित आई आपल्या सासू आणि मुलांसह जग पाहायला बाहेर पडलेली. प्रत्येकाची निरनिराळी कारणं, निरनिराळी तऱ्हा.
अनुक्रमे: पिरोश्की (रशियन मीट पाय), बोर्श्त सूप, कॅव्हिआर
या सहलीच्या सुरुवातीला, आम्हांला रशियात असताना सहसा राजकीय विषयांवर तिऱ्हाइतांशी चर्चा करू नका, अशी सूचना मिळालेली असते. पण हळूहळू भीड चेपते. दमित्रीची उत्तरं सावध असली तरी पुरेशी सूचक, बोलकी असतात. साधारणत: पुतिनची रशियाबाहेर जी ‘कुठल्याही थराला जाऊ शकणारा हुकूमशाही प्रवृत्तीचा राज्यकर्ता’ अशी प्रतिमा आहे, त्याला बरीचशी पुष्टी मिळत जाते. ह्या ढोबळ गोष्टींखेरीज, त्यानं नोंदवलेलं एक निरीक्षण मला महत्त्वाचं वाटतं. त्याच्या मते, अशा राज्यकर्त्यांना सातत्यानं आपण ‘अल्फा मेल’ आहोत, हे सतत ठसवत राहणं भाग आहे. अशा राज्यकर्त्यांच्या प्रेमात आणि धाकात असलेला सामान्य जनतेतला एक वर्ग, मग आपल्या नेत्याच्या अचाट शारीरिक पराक्रमांच्या कपोलकल्पित कहाण्यांचे गोडवे गात बसतो. इथल्या युवावर्गात सध्या बोकाळलेली शारीरिक सौष्ठवाची फॅशनेबल क्रेझही याचाच एक भाग असू शकेल, असा त्याचा कयास आहे. काही साम्यं, काही फरक मी मनातल्या मनात नोंदवतो.
बव्हंशी रशियनांप्रमाणे दमित्रीलाही भारताबद्दल कुतूहल आहे. तो नवीन पिढीतला, पेरेस्त्रोयकोत्तर वातावरणात वाढलेला आहे. (एरवी रशियन माणसांची भारताविषयीची चर्चा ही राज कपूर-आवारा-मेरा नाम जोकर ही ठरावीक स्टेशनं घेत जाते. नव्हे, तसा उल्लेख जर मराठी प्रवासवर्णनात आला नाही; तर बहुतेक तो फाऊल मानला जात असावा!) आमच्या संभाषणाची गाडी हळूहळू प्रादेशिक भाषांतल्या साहित्याकडे वळते. त्रेतायुगात वाचलेल्या ‘देनिसच्या गोष्टीं’ची आठवण निघते. माझ्या मातृभाषेतल्या एका महत्त्वाच्या लेखिकेनं आपल्या एका पात्राचं नाव ‘दिमित्री’ असं ठेवलंय, हे सांगितल्यावर समस्तांस (तसा निष्कारणच) अचंबा वाटतो.
. . .
जेवणानंतर ह्या दोन दिसांच्या स्नेह्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा निव्हा नदीच्या दिशेनं वळतो. काही गल्बल्यानंतर, आता काही येकान्त. चालताचालता अशाच अन्य लेखकांच्या कर्मभूमींना घडलेल्या भेटी आठवत जातात. (अर्थात, अशा वेळी राहून गेलेल्या ठिकाणांची लांबलचक यादीही टोचत असते. त्यात जॉईसच्या डब्लिनपासून ते कडेमनी कंपाउंडपर्यंत अनेक जागा आहेत.) स्टाइनबेकनं ‘टॉर्टिया फ्लॅट’ ही इरसाल व अस्सल व्यक्तिरेखांची लघुकादंबरी जिथं रचली ते कॅलिफोर्नियातलं मॉन्टरे शहर – तिथं आता ‘पैसानोज’ फारसे दिसत नसले; तरी तिथलं ते वेळीअवेळी येणारं धुकं, मासेमारीसाठी गळ टाकून बसलेले म्हातारे आणि हवेत तरंगल्यासारखे उडणारे सीगल्स हे अजूनही जसंच्या तसं आहे. बॉस्टननजीकचं थोरोचं ‘वॉल्डन’ तळं मात्र आता अगदीच शहराजवळ आलं आहे. काही दिवसांपूर्वी, मॉस्कोत पाहिलेलं ‘द मास्टर ॲन्ड मार्गरिटा’ ह्या बुल्गाकोव्हच्या कादंबरीतलं ते प्रसिद्ध ‘पेट्रियार्क्स पॉन्ड’ हेही असंच- पुस्तक वाचून मनात उभ्या राहिलेल्या प्रतिमेपेक्षा अगदी निराळं. कम्युनिस्ट क्रांतीनंतर साऱ्यांना समान स्क्वेअर फूट या न्यायाने, बुल्गाकोव्हला आपल्याच प्रशस्त घरात अनोळखी माणसांसोबत दाटीवाटीनं एका कोप-यात राहून लेखन कसं सुरू ठेवावं लागलं, हे मात्र अंगावर येणारं.
बुल्गाकोव्ह म्युझियम: ‘द मास्टर ॲन्ड मार्गरिटा’तील दोन पात्रं
अमेरिकन ‘सदर्न लिटरेचर’चा ज्याला पितामह म्हणता येईल अशा विल्यम फॉकनरचं ऑक्सफर्ड, मिसिसिपीतलं घरही आठवलं. ते अतिशय सुरेख जागी आहे. भर दुपारीही, तिथं सभोवतालच्या उंचच उंच झाडांमुळे, वातावरणावर निवांततेची एक साय येऊन जमल्यासारखं वाटत राहतं. याच ठिकाणी राहून फॉकनरनं त्याच्या त्या अजरामर ‘यॉक्नापटाफा काउंटी’ला आणि तिच्यातल्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांना जन्म दिला. या घरापासूनच, अगदी हाकेच्या अंतरावर युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी (‘ओल मिस’) आहे. वर्णभेदाविरुद्धच्या चळवळीत हे विद्यापीठ एक धगधगतं ठिकाण होतं. (काही प्रमाणात अजूनही आहे – फक्त कृष्णवर्णीयांना प्रवेश नाकारण्याच्या स्थूल वर्णभेदापासून, ते अलीकडे गुलामगिरीचं प्रतीक असलेला वर्णभेदी, फुटीर राज्यांचा कॉन्फेडरेट झेंडा विद्यापीठावर फडकवावा की फडकवू नये, या सूक्ष्म वर्णभेदविषयक वादापर्यंत प्रगती झाली आहे!)
युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपीत पाऊल टाकणारा पहिला कृष्णवर्णीय विद्यार्थी
अमेरिकन दक्षिणेचा असा हा स्किझोफ्रेनिक स्वभाव – एकीकडे वैयक्तिक संबंधांत मनमोकळा, गोवेकरांसारखा ‘खा-प्या आणि सुशेगात राहा’ असा निवांत आणि त्याच वेळी सामूहिक पातळीवर कडवा, वर्णद्वेषी – फॉकनरच्या ‘ॲब्सलम, ॲब्सलम’ सारख्या स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतल्या, माणसाच्या मनातल्या कोलाहलाची कप्पेबंद विभागणी न करता, त्यातल्या जटिलतेचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्यांत दिसतोच; पण त्याच वेळी फॉकनरच्या त्या घरावरही, त्याच्या विवक्षित ठिकाणामुळे की काय, ह्या द्वैताची छाया पडल्यासारखी वाटते.
याच्या उलट स्थिती मार्क ट्वेनच्या जन्मस्थानाची. मिझुरी राज्यात, मिसिसिपी नदीच्या तीरावरच्या हॅनिबल गावातलं ट्वेनचं ‘बॉयहूड होम ॲन्ड म्युझियम’ मोठ्या हौसेनं पाहायला गेलो असलो; तरी तिथली गरिबांच्या डिस्नेलॅन्डची कळा असलेली (‘पाच डॉलर द्या आणि टॉम सॉयरसारखं कुंपण शिक्षा म्हणून पांढऱ्या रंगानं रंगवा’, हकलबेरी फिन या पात्राच्या नावाला उद्देशून ‘व्हाट द हक!’ असं छापलेले टी-शर्ट्स, हमखास लोकप्रिय अशा घोस्ट टूर्स इ.), बच्चे-का-बाप-भी-खेलेगा छापाची तद्दन बाजारू जत्रा पाहून उबग आला होता. खुद्द ट्वेननंही या तमाशाची आपल्या खास शैलीत रेवडी उडवली असती.
बालकार्व्हर
वाट वाकडी करून अशा ठिकाणांना भेटी देण्याचं सार्थक मात्र क्वचित होतं. वीणा गवाणकरांचं ‘एक होता कार्व्हर’ लहानपणी वाचलं, तेव्हापासून मनात घर करून आहे. मिझुरी राज्यातच, पण दुसऱ्या टोकाला असलेलं, डायमन्ड हे गाव ही जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरची जन्मभूमी. तिथल्या छोट्याशा नॅशनल मॉन्युमेन्टला, एका गडद संध्याकाळी पोचलो होतो. मी आणि तिथला एक कर्मचारी वगळता तिथं चिटपाखरूही नव्हतं. तिथला तो झाडांतला बालकार्व्हरचा पुतळा, निष्पर्ण तरूंच्या राईतलं ते खोपटं आणि हिवाळी संध्याकाळची ती गोठलेली शांतता अजूनही लक्षात आहे. ‘कार्व्हर नॅशनल मॉन्युमेन्ट’च्या भेटीतल्या या प्रतिमा निराळ्या, स्वतंत्र आहेत – पण कुठंतरी त्या गावकुसाबाहेरच्या झोपडीवजा घराचा ‘एक होता कार्व्हर’च्या वाचन-अनुभवाशी सांधा जुळलेला आहे.
. . .
प्रत्यक्ष आणि प्रतिमा हा थोडा सगुण आणि निर्गुण यांच्यासारखा तिढा आहे. दर्शनानं प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यात अधिक उत्कट काय ते पाहता येत असलं तरी ते ‘गोडी अपूर्णतेची’सारख्या हुरहुरीला पूर्णविराम देऊनच. ‘ओळखीचेसे अनोळखी कुणी, नकळत अंतर मंतरणारे’ अशी दोहोंच्या मधली अस्थिर, मृगजळी अवस्था खुणावत राहते.
विचारांचं चाक घरंगळत राहतं. लहानपणी जेव्हा मोठ्या अचंब्यानं रशियन बालकथा वाचल्या, तेव्हा डोळ्यांसमोर उभ्या राहणार्या प्रतिमा काय होत्या? बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्याच देशात घडणारी, पण सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाची ‘क्राईम ॲन्ड पनिशमेन्ट’ कादंबरी वाचली – तेव्हा त्या प्रतिमांत वयाप्रमाणे आणि विषयाप्रमाणे किती बदल झाले होते? मुळात त्या परिसराला निश्चित एक रूप होतं की केवळ धूसरशी बाह्यआकृती मनात उभी होती? त्या प्रतिमांचे गेल्या काही दिवसांत पाहिलेल्या या प्रत्यक्षाशी साधर्म्य किती? ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ वगैरे ठीकच, पण आपल्याला सर्वस्वी अपरिचित असणार्या वातावरणातल्या साहित्यकृती वाचताना आपल्या डोक्यातल्या प्रतिमांना कितपत महत्त्व द्यायचं? पहिलं वाचन जरी असं आपल्या मनातल्या फिकट/चुकीच्या ‘प्रतिमा उरी धरोनि’ होत असलं, तरी प्रत्यक्ष जागेला भेट दिल्यानंतर केलेलं पुनर्वाचन कसं असेल? ‘दृष्टीचा डोळा पाहू गेलीये, तव भीतरू पालटू झाला’ यासारखं काही? शिवाय या प्रतिमा किंवा त्या निर्माण करण्याची क्षमता वाढत्या वयानुसार, मनाच्या निबरपणामुळे उणावते की आजवरच्या अनुभवांमुळे, प्रवासामुळे त्यांच्यात अधिक अचूकता येते? पण त्याच वेळी अशी अचूकता अधिक मोलाची की बालपणातल्या चुकीच्या असल्या तरी अधिक उत्कट, अधिक असोशीच्या गहिऱ्या प्रतिमा? शिवाय भाषेला लगटून येणाऱ्या सांस्कृतिक पर्यावरणाचा भागही आहेच. निदान आपल्या मातृभाषेतलं वाचताना मनात सभोवतीचे अनेक संदर्भ जागे असतात; पण परभाषेतलं काही वाचताना, त्या गाळलेल्या जागा आपण आपल्या वकुबाप्रमाणे नकळत भरून काढत असतो – तो प्रयत्न कितीही प्रामाणिक असला तरी तोकडाच. (अर्थात, मराठीतले सारेच संदर्भ आपण नीट समजून घेतो असं थोडंच आहे? एका कवितेच्या ब्लॉगवर बोरकरांच्या कवितेची – ‘चुडतांच्या शेजेवर’ याऐवजी ‘चुलत्यांच्या शेजेवर पडून, भोगू दे मूक नि:स्तब्धपणा’- असं लिहून वासलात लावलेली पाहून, हसूनहसून हतबुद्ध झाल्याचं आठवतं. दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरही वाचकांच्या अवधानाला ‘तियापरी श्रोतां, अनुभवावी ही कथा, अतिहळुवारपण चित्ता, आणोनिया’ असं आवाहन करतात, ते बहुधा यामुळेच.)
तर या प्रश्नांना निश्चित उत्तरं नाहीत (मुळात असले प्रश्न पडणंच व्यर्थ आहे, असंही काहींना वाटू शकेल); आणि असलीच तर तीही व्यक्तिगणिकच नव्हे तर त्यात्या व्यक्तीचं वय, त्याची मनःस्थिती आणि अन्य कारणांपरत्वे सातत्यानं बदलणारी.
. . .
या तंद्रीतच मी निव्हा नदीच्या किनाऱ्यापाशी येऊन पोचलो आहे. रात्रीचे अकरा वाजले तरी पलीकडच्या काठावर आकाश भळभळत्या जांभूळप्रकाशात नाहून निघालेलं आहे. त्या रेंगाळत्या संधिप्रकाशात किनाऱ्यापाशी बराच वेळ बसून राहतो. थोडा वेळ, कुठलेच प्रश्न पडत नाहीत. कसलाच विचार करावासा वाटत नाही. विसळून पालथं घातलेलं भांडं जसं थेंबाथेंबानं ठिबकत सावकाश कोरडं होत जावं, तशी अनिलांच्या शब्दांत ‘हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू निवळत जाते’. (व्यक्त, मूर्त गोष्टींचा सांधा अमूर्त, अव्यक्त गोष्टींशी जोडण्याचा अनुभव सांगताना एक तर संगीताची मदत घ्यावी लागते नाहीतर कवितेची.)
कुठलाच विचार डोक्यात नाही, अशी जी कोऱ्या पाटीसारखी मनाची अवस्था असते; ती काही क्षणांपुरती का होईना, पण अनायासे जमून गेल्यासारखी वाटते. अर्थात, हे क्षणिकच. त्यानंतर ‘हम भटकतें हैं – क्यों भटकते हैं?’ इथपासून ते उद्या सकाळी करायची तयारी यांसारखे प्रापंचिक प्रश्न जमिनीवर आणतात. निव्हा नदीचा तात्पुरता निरोप घेतो. काही तासांनीच, रात्री दीड वाजता, या सहलीतल्या मित्रकंपूबरोबर पुन्हा इथंच येणार असतो आणि निव्हावरचे पूल एकामागोमाग एक मुडपून, मधोमध उघडून मालवाहू जहाजांना वाट मोकळी करून देतात, तो टुरिस्टी ‘चिमत्कार’ पाहणार असतो.
. . .
प्रवास म्हणजे निवळ एका जागेहून दुसरीकडे जाणं नव्हे. वाचन म्हणजे केवळ कागदावरचे शब्द वाचणं नव्हे. प्रवासवर्णन म्हणजे फक्त त्यात्या जागेची माहिती नव्हे. या तिन्ही गोष्टी तुम्हांला बघ्याच्या भूमिकेतून, काही काळापुरतं का होईना, बाहेर काढतात. ‘का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता’ यासारखं काही. अर्थात, हे नेहमी घडणं नाही. बऱ्याचशा जागा, शब्द, क्षण हे नुसतेच ओघळून जातात. काही वेळा, काही ठिकाणी वा काही ओळींत मात्र अंतरीची खूण अनोळखी जागीही पटल्यासारखी वाटते. ‘अ ब्युटिफूल वूमन विथ डर्टी फीट’ अशा शेलक्या वाक्यानं बोळवण होत असलेल्या सेन्ट पीटर्सबर्गबाबत मात्र, माझ्यासाठी सुदैवानं हा तिय्या जमून आला आहे.
. . .
नंदन होडावडेकर
इ-मेल – nandan27@gmail.com
पेशाने दूरसंचार (टेलिकॉम) अभियंता. मुंबईकर, गेली पंधरा वर्षे शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने अमेरिकेत सॅन डिएगो येथे वास्तव्य. ‘मराठी साहित्य’ या अनुदिनीचा (ब्लॉग) लेखक. वाचन, निरनिराळ्या खाद्यसंस्कृतींशी तोंडओळख करून घेणे आणि प्रवास हे आवडते छंद.