कल्याणी कुमठेकर
पॅरिसमधील एक छान पावसाळी संध्याकाळ.
‘शाँझे एलिझे’ या सुप्रसिद्ध रस्त्यावर मी आणि माझा नवरा पर्फ्यूमची खरेदी करत हिंडत होतो. अचानक एका मॉलमधल्या ब्रुनो कॅटलॅनोच्या तांबूस–तपकिरी शिल्पाकडे माझं लक्ष गेलं. त्याची खासियत अशी की, ते शिल्प एका प्रवाशाचं होतं. त्याच्या हातात सुटकेस होती, परंतु त्याच्या शरीराचा मधला बराचसा भाग गायब होता. ते पाहून माझी जिज्ञासा वाढली. त्या मूर्तिकाराला नेमकं काय म्हणायचं असेल? त्याच्याच बाजूला असणार्या तपशिलावर माझं लक्ष गेलं. ब्रुनो कॅटलॅनो हा मूळचा मोरोक्कन, वयाच्या बाराव्या वर्षी तो मोरोक्को सोडून फ्रान्समध्ये आला होता. तो खलाशी होता. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये त्यानं वास्तव्य केलं होतं. त्या तपशिलातून त्यानं त्याच्या सुंदर भावना आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मते ‘जेव्हा तुम्ही एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होता, तेव्हा तुम्ही स्वतःमधला काही भाग (आठवणींच्या रूपात) तिथंच सोडून येता किंवा आपल्यातला काही अपूर्ण भाग शोधायला (नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी) पुढील प्रवासासाठी निघता.’
आम्ही दोघंही मूळचे सातारचे. भारत देश सोडून आज आम्हांला ९ वर्ष झाली. मागं वळून पाहताना हे लक्षातच आलं नाही की, आपण हा असा सुटकेसेमध्ये राहायचा निर्णय केव्हा घेतला? आणि हा वेगळा प्रवास काहीही न ठरवता कसा केला? पण असं करताना आम्ही ते कुठल्यातरी उद्दिष्टानं केलं नाही. आमच्यासमोर संधी येत गेल्या आणि मग आम्ही फारसा विचार न करता स्वतःला त्यामध्ये झोकून देत गेलो, पण असं हे स्वतःला मुलांसह प्रत्येक नवीन ठिकाणी झोकून देणं सोपं नक्कीच नव्हतं. परंतु असं करताना हे लक्षात आलं की, जेव्हा तुम्ही स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून सतत अशा अनिश्चिततेच्या रस्त्यावर चालायला लागता ना, तेव्हा तुमच्याही नकळत तुमच्यामध्ये बदल घडत असतात. तुम्ही नवीन आव्हानं स्वीकारता, जणू ते स्वीकारायचं व्यसनचं लागतं. आणि तेव्हाच तुम्हांला तुमच्यामध्ये असणाऱ्या बऱ्या-वाईट गुणांची नव्यानं ओळख होते. तुमचं अनुभवविश्व वाढत जातं.
आमच्या या प्रवासाचा श्रीगणेशा झाला तो जोधपूरच्या वायुसेनादलातून. त्या वायुसेनादलानं आम्हांला जणू पंख आणि प्रवासाचं वरदानच दिलं. त्यानुसार आम्ही अहमदाबाद, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, पुणे, सौदी अरेबिया, इराण, यूएई, आफ्रिका अशी मार्गक्रमणा करत थायलंडमध्ये पोचलो आहोत. भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये इतकी विविधता आहे की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहिल्यामुळे, त्या अनुभवांच्या शिदोरीवर आम्हांला देश बदलताना तितकासा त्रास जाणवला नाही. आपला देश सोडताना वायुसेनादलात आम्ही उचललेल्या खारीच्या वाट्यामुळे अपराधीही वाटलं नाही. हा प्रवास करत असताना आम्हांला वेगवेगळ्या देशांबरोबरच त्यांची संस्कृती, त्यांचे आचार-विचार जसे अनुभवायला मिळाले, तसेच आजूबाजूची ठिकाणं, देशही पाहायला मिळाले. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक तर होतेच पण त्यांच्यासोबत येणाऱ्या कडूगोड आठवणीही होत्या.
‘द किंग्डम ऑफ सौदी अरेबिया’, ‘यूएई’ आणि ‘इराण’ हे आखाती देशांतले वेगवेगळे देश. हे तीनही देश ‘ऑइल रीच’ म्हणजे तेलाच्या संपत्तीच्या जोरावर श्रीमंत झालेले देश आहेत. सौदी तसेच यूएई इथली श्रीमंती थोडीशी अंगावर येणारी वाटते परंतु इराणमधील श्रीमंती ही त्यांनी जपलेल्या कला आणि संस्कृती यांमधून दिसते. तसेच मोझाम्बिक हा आफ्रिकेच्या दक्षिण गोलार्धातला बहुतांश देशांच्या तुलनेनं अतिशय गरीब तरी निसर्गसौंदर्यानं श्रीमंत असलेला एक देश व थायलंड भारताच्या संस्कृतीशी मिळताजुळता असणारा आणि समृद्ध देश.
सौदी अरेबियाच्या राजधानीचं शहर ‘रियाध’ हे पारंपरिक वहाबी संस्कृती व आधुनिकीकरण यांचा सुंदर मिलाफ असणारं शहर आहे. ज्याप्रमाणे रियाधमध्ये किंग्डम टॉवर, फइसेलिया टॉवर यांसारख्या सुंदर वास्तूंचे नमुने तुमचं लक्ष वेधून घेतात, त्याप्रमाणेच यूएईमधलं दुबई शहर तिथल्या आधुनिक वास्तूंच्या नमुन्यासाठी जगभरात ओळखलं जातं. ८३० मीटर उंच बुर्ज खलिफा, बुर्ज-अल-अरब, कृत्रिम बेट ‘द पाम’ तसंच ‘अटलांटीस’ वॉटर पार्क हे त्याचे खास नमुने. भारतात असताना फक्त शोरूम्समध्ये पाहिलेल्या रोल्स रॉयस, फेरारी, लॅम्बोर्गिनी, मासरेटी अशा एक नाही, दोन नाही हजारो गाड्या रस्त्यावर पाहिल्या की या अरब लोकांचा नक्कीच हेवा वाटतो.
सौदी अरेबियाला सौदी न म्हणता ‘किंग्डम’ असंच संबोधतात. मुस्लीम लोकांचं पवित्र ठिकाण असलेले मक्का-मदिना हे सौदी अरेबियामध्येच आहेत. ‘झमझम’ या नदीचं पाणी प्यायल्यानं लोकांमधले रोग, व्याधी नष्ट होतील अशी यांची समजूत. त्यामुळे एअरपोर्टवर मोठमोठे पाण्याचे कॅन्स भरून नेणारे लोक दिसायचे.
सौदीमध्ये जाण्यापूर्वी त्या देशाच्या हकिकती वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या. धर्माच्या नावाखाली स्त्रियांवर असणाऱ्या बंधनांबद्दलही जाणून होते. ती बंधनं जरी जाचक वाटली नाहीत, तरी सवयीची होईपर्यंत नकोशी नक्कीच वाटली. सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना ‘अबाया’ सक्तीचा. फक्त एकच दिवस तो सक्तीचा नाही, ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच किंग्डममध्ये प्रवेश करणार आहात, तेव्हा तिथल्या स्त्रिया डोकं झाकण्यासाठी ‘व्हेल’, तसंच चेहरा झाकण्यासाठी ‘बुरखा’ वापरतात. अगदी आजही या स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी, तसंच घरात परपुरुषासमोर बुरखा घालावा लागतो. सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी नाही. तिथल्या घरांना बाल्कनी नाहीत, घरांमध्येही २ दिवाणखाने, एक पुरुषांसाठी आणि एक बायकांसाठी असायचं. तिथं जाण्यापूर्वी तिथल्या परावलंबी स्त्रियांबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती. पण आश्चर्यकारकरीत्या सौदी स्त्रियांचं वेगळंच रूप समोर आलं. तिथल्या स्त्रियांना, त्या त्याच वातावरणात वाढल्यामुळे ते बंधन वाटत नव्हतं, त्यांच्या ते अंगवळणी पडलं होतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच.
रियाधमध्ये राहत असताना बाहेर फारशी करमणुकीची साधनं नसल्यामुळे शहराच्या जवळच असणाऱ्या वाळवंटात जाऊन quad-biking करणं हा मुलांचा आवडीचा कार्यक्रम असायचा. आम्ही मैत्रिणीही लपूनछपून बाइकिंगचा आनंद घेत असू. पायघोळ अबाया घालून बाइकिंगची मजा इतर कुठे खचीतच अनुभवायला मिळाली असती.
अरब पुरुष हे पांढऱ्या रंगाचा पायघोळ ‘तोब’ वापरतात. डोक्यावर लाल-पांढऱ्या चौकटींचा रुमाल त्याला ‘घुत्राह’ असं म्हणतात, त्यावर पांढऱ्या रंगाची गोल टोपी ‘ताजिया’ आणि ‘ईगल’ हा काळा रोप घालतात. आखाती देशांतल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे घुत्राह वापरतात. म्हणजे सौदी अरेबियामध्ये ते लाल-पांढऱ्या चौकटींचं असतं.तर बाहरेनमध्ये ते शुभ्र पांढऱ्या रंगाचं असतं. तसेच इगलचेही वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये पाहायला मिळतात.
इथे मार्केट्सना ‘सुक’ असं म्हणतात. इथलं ‘गोल्ड सुक’ तर जगभरात प्रसिद्ध.
दुबईमध्ये कोणताही भारतीय माणूस खूप पटकन रुळतो. त्याचं कारण म्हणजे तिथं सहज उपलब्ध होणाऱ्या भारतीय गोष्टी. दुबईमधील शिस्त आणि नियम, जाचक नसले, तरी एखाद्या नाठाळ भारतीय किंवा परदेशी माणसाला शिस्त लावण्याइतके कडक नक्कीच आहेत. खूप आश्चर्य वाटतं जेव्हा आपल्याकडे खाऊन झालं की कचरा रस्त्यावर कुठंही टाकणारे लोक, ट्राफिकचे नियम न पाळणारे लोक, पान खाऊन बिल्डिंगचे कोपरे घाण करणारे लोक या देशामध्ये आल्यावर एकदम शहाण्यासारखे वागायला लागतात.
इराणच्या राजधानीचं शहर असलेल्या ‘तेहरान’मधला पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. हिरव्यागार झाडांमधून जाणारे स्वच्छ, सुंदर रस्ते, निरनिराळ्या रंगीबेरंगी गुलाबांच्या फुलांनी बहरलेल्या बागा आणि समोर ऐटीत उभे असणारे बर्फाच्छादित डोंगर, आणि या डोंगरांच्या कुशीत वसलेलं सुंदर बागांचं तेहरान शहर.
इराण जरी आखाती देशात असला, तरी इथली गोष्टच निराळी. इराणी लोक हे सौंदर्याचे पूजक. नाना प्रकारच्या बारीक कलाकुसरीनं सजलेली भांडी, पेंटिंग्स, गालिचे तसंच ज्वेलरी, म्युझियममध्ये असलेलं मयूर सिंहासन, गुलाबी रंगाचा ‘दारिया-ए- नूर’ (नादीरशहानं भारतातून जिंकून नेलेलं), तिथल्या राजे राजवाड्यांचे हिरे-माणकांनी सजलेले मुकुट, अंगरखे, तलवारी, भाले, कट्यारी, भांडी, मद्याचे पेले, सुरया, तसंच स्त्रियांचे दागिने हे सगळं पाहून त्यांच्या समृद्धीची कल्पना येते.
इराणमध्ये स्त्रियांना अबायाची सक्ती नव्हती. एक लांब कोट (मॉन्टो) आणि डोक्यावर रुमाल (हिजाब) असणं हे मात्र सक्तीचं होतं. तिथल्या मशिदींना भेटी देताना मात्र काळ्या रंगाचं लांब कापड (चादोर) गुंडाळून जावं लागे. काम करताना तो डोक्यावरून घसरू नये म्हणून सुंदरशी, मोठी क्लिप त्या डोक्यावर लावत असत. इराणमधल्या स्त्रियांना मात्र हिजाब सक्तीचा वाटे आणि बरेचदा त्याबद्दल त्या नाराजीही व्यक्त करत असत.
रोमन साम्राज्याच्या आधी सर्व जगावर सत्ता गाजवणारे पर्शिअन होत. हे लोक अतिशय प्रेमळ आणि अगत्यशील. भारतातील गुजराती, पंजाबी लोकांसारखी यांची मधाळ वाणी मोठी गोड. शोमा खुबी? ( तुम्ही कसे आहात?) अझीझा, जाना आणि असे बरेच शब्द अजूनही कानात गुणगुणताहेत. तिथं सामाजिक विषमता जाणवत नव्हती. तुमच्याकडे काम करणारी कामवाली आणि ड्राइव्हर हे तुमच्याच कुटुंबातले एक सदस्य असत. ते तुमच्या बरोबरीनं काम करत. त्याचप्रमाणे तुमच्याबरोबर जेवत, बाहेर सहलीला येत, खरेदीसाठी गेल्यावर सोबत असत. अगदी आपल्यातलेच एक होऊन राहत.
इराण मध्ये ९०% शिया मुस्लीम आहेत, तसेच १०% सुन्नी मुस्लीम आहेत. परंतु इराणनं इतर धर्मांच्या लोकांनाही सामावून घेतलं आहे. जसे इथं झोरॅष्ट्रियन आहेत, तसेच बऱ्याच प्रमाणात ज्यू, ख्रिश्चन आणि बहाईही आहेत. झोरॅष्ट्रियन लोक अग्निदेवतेची पूजा करतात. त्यांच्या मंदिरामध्ये जायची संधी एकदा मिळाली. अगदी हिंदू मंदिरासारखंच असणारं झोरॅष्ट्रियन लोकांचं अग्निदेवतेच मंदिर. मंदिरात कधीही न विझणारा अग्नी तेवत असतो. हा अग्नी सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांवर असते. त्यासाठी ते जर्दाळूच्या आणि बदामाच्या झाडांची लाकडं वापरतात. एका बाजूला ‘आहुरा माझदा’ची मूर्ती. त्याच्यासमोर दिवा, उदबत्ती, प्रसाद, अगदी हिंदू मंदिरांमध्ये असत तसं.
ईशफहान मी माझ्या आवडत्या इराणी मैत्रिणीबरोबर पाहिले, त्यामुळेच कदाचित मला ते जास्त आवडलं. ईशफहानला पूर्वी ‘अर्धं जग’ असं संबोधलं जात असे, कारण इथं असणारे राजवाडे, मस्जिदी, मिनार, मोठे पूल हे सर्व पाहिलं की तुम्ही अर्धं जग पाहिलं असा त्यांचा समज. त्यातलं इमाम स्क्वेअर आणि त्याच्या बाजूच्या मस्जिदी अजूनही तशाच्या तशा डोळ्यांसमोर आहेत. निळ्या, फिरोझी रंगानं बारीक नक्षीकाम केलेल्या त्या सुंदर मस्जिदी म्हणजे सफाविद घराण्यातल्या शहा अब्बासी राजाच्या आठवणी. तिथं असणारा अली कापू पॅलेस, चेहेलो सोतून पॅलेस, सी-ओ-सेह ब्रिज प्रत्येकाचं काही-ना-काही वेगळं वैशिष्ट्य आहे. इमाम स्क्वेअरच्याभोवती असणारा ‘बाजारे बोजोर्ग’ कितीही वेळा भेट दिली तरी कमीच वाटेल इतका सुरेख आहे. तिथं मला उंटाच्या हाडावर केलेली नाजुकशी पेंटिंग्स मिळाली. ईशफहानला गेल्यावर माझी मैत्रीण मला कार्पेट्स बनवणाऱ्या कारागिराकडे घेऊन गेली. तिथले कारागीर लोकर आणि रेशीम यांमध्ये गालिचे बनवत होते. मशीनमध्ये बनवलेल्या गालिच्याची किंमत ही हाताने बनवलेल्या गालिच्याच्या किमतीपेक्षा जास्त होती आणि ती किंमत ठरते ती तो गालिचा बनवण्यासाठी मारलेल्या गांठींवरून. जितक्या गाठी जास्त तितकी त्या गालिच्याची किंमत जास्त. तिथल्या कारागिरानं आम्हांला आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे कार्पेट जेवढं जुनं, तितकी त्याची किंमत जास्त. त्याच्या मते गालिचे बनवताना गाठी मारून तयार झालेली वीण ही काळानुसार अधिक घट्ट होत जाते, त्यामुळे अशा गालिचांना मागणीही प्रचंड आणि त्यांच्या किमतीही कित्येक हजार डॉलर्समध्ये आहेत.
रामसर हे इराणच्या उत्तरेकडलं एक गाव. रामसर हे कास्पियन समुद्राजवळ असणारं गाव. तिथल्या रस्त्यावरून जाताना एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि एका बाजूला अथांग पसरलेला कास्पियन समुद्र असं अनोखं दृश्य पाहायला मिळतं. त्याप्रमाणे मसूले हेदेखील अतिशय देखणं असं गाव एका हिरव्यागार डोंगरावर वसलं आहे. तिथल्या घरांच्या रचना अशा आहेत की एका घराचं अंगण हे दुसऱ्या घराचं छप्पर आहे. खाली-वर जाण्यासाठी पायऱ्याच असल्यानं गाड्यांचा प्रश्नच नाही. आम्ही सर्व भारतीय मित्र-मैत्रिणींनी या सहलीची मजा लुटली होती. डोंगरावर चढताना खूप धुकं आणि अंगाला न बोचणारी थंडी. इथून कधीच परत जाऊ नये असं वाटत होतं.
आखाती देशांपेक्षा पूर्णपणे भिन्न असणारा देश म्हणजे आफ्रिकेमधला मोझाम्बिक. नकाशावर मोझाम्बिक पाहिल्यावर जे दिसलं त्यानं भारावून गेलो होतो, एका बाजूला गर्द हिरवी जंगलं आणि दुसऱ्या बाजूला अथांग हिंदी महासागर. वन्य जीवनानं आणि निसर्गसौंदर्यानं समृद्ध असलेला देश म्हणजे मोझाम्बिक. मोझाम्बिकच्या राजधानीचं शहर ‘मापुतो’. मापुतोपासून ३० किमीवर असणारे समुद्रकिनारे हेच त्या देशाचं सौंदर्य, कारण इथल्या समुद्र किनाऱ्याची लांबी जवळजवळ २,५०० किमी आहे. कमी लोकसंख्या, मर्यादित विकास आणि प्रदूषणविरहित हवा यांमुळे तुम्ही निसर्गाच्या किती जवळ आहात, याची जाणीव आफ्रिकेमध्ये होते.

मोझाम्बिक हा देश दक्षिण गोलार्धात येत असल्यामुळे तिथले ऋतू भारतापेक्षा बरोबर उलटे. आम्ही तिथं पोचलो तो जून महिना होता आणि छानपैकी थंडी पडली होती. सुरुवातीचे दिवस भाषेमुळे जरा कठीणच गेले. तिथं ४७५ वर्षं पोर्तुगिजांनी राज्य केल्यामुळे तिथली भाषा पोर्तुगीज. याच कारणामुळे त्यांची स्वतःची अशी संस्कृती उरलेली नाही, ज्या काही आहेत त्या थोड्याफार रूढीपरंपराच. ‘बांतू’ समाजाचे लोक इथं राहतात. पोर्तुगिजांनी त्यांच्याकडून खूप कष्टाची कामं करवून घेतली. त्यामुळे बराचसा कामकरी वर्ग अजूनही त्याच मानसिकतेत जगतो आहे. या लोकांच्या गरजा खूपच कमी आहेत. प्रचंड गरिबी आणि कुपोषण यांमुळे सुशिक्षित लोकांची संख्या खूप कमी. अजूनही कामकरी वर्गातल्या लोकांना डॉक्टर्स क्लिनिकमध्ये बोलावूनच औषध देतात, कारण ते ती वेळेवर आणि ठरवलेल्या डोसेजेसप्रमाणे घेतीलच याची त्यांना खातरी नसते. इथले लोक नृत्य आणि संगीत यांचे प्रचंड चाहते आहेत. शनिवार-रविवार या त्यांच्या हक्काच्या सुट्टीदिवशी बिअर घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मोठ्यांदा संगीत लावून नृत्य करणं हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम. ‘तिंबिला’ हे झायलोफोनसारखं वाद्य ते स्वतः लाकडातून बनवतात. मुलांच्या शाळेत हे वाद्य वापरून केलेले संगीताचे कार्यक्रम म्हणजे आम्हांला पर्वणीच.
मोझाम्बिकमधले लोक अतिशय कष्टाळू. अगदी लहान-लहान मुलंदेखील कष्टाची कोणतीही कामं करायला तत्पर. आम्ही एका सकाळी अचानक माकानेता या एका जवळच असणाऱ्या बेटाला भेट द्यायचं ठरवलं. मापुतोपासून सर्वांत जवळचा बीच तिथं आहे. तिथं पोचेपर्यंत दुपार झाली. फेरीबोटीतून त्या बेटावर पोचलो, थोडेसंच अंतर पुढे गेलो आणि अचानक धुवाधार पाऊस सुरू झाला. तरीही बीच पाहूनच परतायचं असं ठरवलं. तिथले लोक पोर्तुगीजमध्ये आम्हांला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, परंतु आम्ही त्या देशामध्ये येऊन आठच दिवस झाले असल्यामुळे आम्हांला त्यांचं बोलणं समजलं नाही. आम्ही पुढंपुढं जात राहिलो. बीचवर जाऊन पोचल्याक्षणी लक्षात आलं की, आपण मोठी चूक केली आहे. ज्या बेटावर आम्ही होतो, ते बेट पावसामुळे तसंच समुद्रामध्ये भरती आल्यानं पाण्याखाली जायला लागलं. आम्ही धावतच गाडीकडे गेलो, परत येत असताना आम्हांला कळायच्या आत गाडी अर्धीअधिक पाण्याखाली गेली. आम्ही पटापट गाडीतून उतरलो, पण आजूबाजूला अचानक पाणी वाढत असल्यानं इतके घाबरलो होतो की, थोडंसं अंतर चालून गेल्यावर छोटीशी टेकडी तिथं आहे, हे लक्षातच आलं नाही. तिथली लहान-मोठी मुलं आमच्या मदतीला धावून आली, त्यांनी आम्हांला त्या दलदलीतून बाहेर काढलंच, आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं गाडीही त्या छोट्याशा टेकाडावर चढवायला मदत केली. त्या मुलांचे ते धाडस आणि गाडी बाहेर काढण्यासाठीचे कष्ट पाहून आम्ही खूपच भारावून गेलो होतो. परंतु खरं आश्चर्य तर पुढंच आहे, आम्ही त्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी पैसे देऊ केले तर त्यांनी आम्हांला पेन आणि पेन्सिली असतील तर द्या असं खाणाखुणांनी सांगितलं. डोळ्यांत पाणीच आलं पटकन. इतकी गरिबी, जिथं खाण्याचीही भ्रांत, परंतु या मुलांना शिकायची आस लागली होती.
मोझाम्बिकमध्ये राहताना १९८०च्या दशकातला भारत देश आठवत असे. तशाच बाजारपेठा, घरी ताज्या भाज्या घेऊन येणारी भाजीवाली, कोकण किनारपट्टीची आठवण देऊन जाणाऱ्या गोष्टी. जसे; नारळ, आंबे (हापूस हा मूळचा इथलाच), वेगवेगळ्या प्रकारचं ताजं सी फूड, आणि अतिशय स्वच्छ, प्रदूषण-विरहित हवामान. आफ्रिकेमधले इतर देश जरी तितकेसे सुरक्षित नसले, तरी मोझाम्बिकमध्ये काही ठरावीक भाग सोडले, तर सुरक्षित वाटत असे.
आमची थायलंडशी ओळख जरा गमतीशीरच झाली. आम्ही इथं आलो तेव्हा जुलै महिना सुरू होता. गॅन्ड पॅलेस व ऐमराल्ड बुद्धाची मूर्ती पाहायला गेलो. इथल्या राजाचं वास्तव्याचं ठिकाण, त्याचा राजवाडा आणि इतर मंदिरं पाहत असताना, त्या परिसरात असणाऱ्या रामायणाच्या म्युरलनं आमचं लक्ष वेधलं. एका भव्य महालाच्या प्रवेशद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये पूर्ण रामायणाची आख्यायिका चितारली आहे. गाईडला विचारलं असता त्यानं तिथं घडलेली रामायणातली आख्यायिका सांगायला सुरुवात केली. थायलंडमध्ये रामायणाचा हिरो ‘राम’ नसून ‘हनुमान’ आहे. आणि त्याच्या वानरसेनेनं समुद्रावर सेतू न बांधता, हनुमानानं स्वशक्तीनं स्वतःच्या शेपटीला इतकं लांबवले की, त्याचाच समुद्रावर पूल बनला आणि वानरसेनेनं सीतेला तोकासानच्या (इथल्या रामायणातील रावण) तावडीतून सोडवून आणलं. अशी ही या देशाची ओळख आम्हांला आमच्या आजीनं सांगितलेल्या रामायणालाच बदलवून गेली, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. सध्या आम्ही वास्तव्य करत असलेलं शहर आहे बँकॉक.
थायलंडमध्ये ९५% पेक्षा जास्त लोक बौद्ध आहेत. इथल्या प्रत्येक वास्तूच्या बाहेर मग ते घर असो, दुकान असो किंवा हॉटेल असो, एक छोटंसं का होईना मंदिर असतंच. कधी ते गणपतीचं, बुद्धाचं किंवा शिवाचं असतं तर कधी ब्रह्माचं असतं. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली ती म्हणजे इथं दिवसातून दोन वेळा राष्ट्रगान गायलं जात, तेव्हा बऱ्याच ठिकाणी मुख्यत्वे शाळांमध्ये, सिनेमाघरांमध्ये, बागांमध्ये, तसंच ट्रेन स्टेशनवर तर अगदी दुकानांमध्येही लोक १५ सेकंद स्तब्धता पाळतातच. कमरेतून वाकून एकमेकांना नमस्कार करायची यांची पद्धत समोरच्या नवीन माणसाचं मन जिंकूनच घेते.
गेल्या एका वर्षात थायलंडमधल्या काही मुख्य सणांची मजा लुटता आली. त्यामधला ‘सोंगक्रांत’ हा आपल्याकडल्या होळीशी मिळताजुळता सण. एप्रिल महिना हा सर्वांत जास्त उन्हाळा असण्याचा महिना, त्यामुळे उकाड्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व जण एकमेकांना पाण्यानं भिजवतात. बौद्ध प्रथेप्रमाणे सोंगक्रांतच्या दिवसांमध्ये घरातल्या मोठ्या मंडळींबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे हात आणि पाय पाण्यानं धुण्याची जुनी पद्धत होती. परंतु आता त्याचं रूप पूर्णपणे बदलून गेलं आहे. ‘लॉय क्रथोंग फेस्टिवल’ हा खूप वेगळा सणही अनुभवला. लॉय म्हणजे तरंगणं आणि क्रथोंग म्हणजे पानाफुलांनी व नैवेद्यानं सजलेली बास्केट. ती नदी किंवा तलावात सोडून आपल्या मनातला पाण्यासाठी असणारा आदर व्यक्त करायची अनोखी प्रथा इथंच अनुभवली. या देशाची आणखी एक खासियत म्हणजे इथं वेगवेगळे फेस्टिवल्स वेगवेगळ्या शहरांमध्ये साजरे केले जातात. जसे ‘flower festival’, ‘lantern festival’, ‘buffalo racing festival’ असे वर्षभर चालणारे सण म्हणजे पर्यटकांना पर्वणीच.
हा प्रवास चालू असताना आम्हांला बऱ्याच लोकांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं. काही जणांच्या मते आम्ही हा प्रवास करताना मुलांचा आणि त्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या महत्त्वाच्या वर्षांचा विचार न करता निर्णय घेतो, काहींच्या मते आम्ही प्रचंड धाडसी आहोत. परंतु असं करताना हे आम्हांलाच माहीत असतं की, प्रत्येक नवीन ठिकाणी जाताना आमच्याही मनात असंख्य प्रश्न असतात, खूप वेळा मनातून आम्ही धास्तावलेलेही असतो. पण या सगळ्या प्रवासात मुलांची आम्हांला खूप छान साथ मिळते. याची खातरीच असते जणू की, ती कुठल्याही आणि कसल्याही परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहेत. खूप लहान वयात जरी त्यांनी आपला देश सोडला असला, तरी त्यांना आजीआजोबा, त्यांची भावंडं यांना भेटायची उत्सुकता लागलेली असते. या प्रवासात त्यांचे शाळेतले अभ्यासक्रम प्रत्येक नवीन ठिकाणी बदलत गेले, तरी मिळालेल्या वेगवेगळ्या अनुभवांनी त्यांना खूप काही शिकवलं आहे, जे कदाचित अभ्यासाच्या पुस्तकांनीही त्यांना शिकवलं नसतं.
आम्ही इतर कुठल्याही देशाचं नागरिकत्व घेतलेलं नाही आणि भविष्यातही ते घेणार नाही असं मात्र मनाशी पक्कं ठरवलं आहे. तरीही वर्षातून एकदा भारतात गेल्यावर लक्षात येतं की, तिथल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना आपल्या नसण्याची सवय झाली आहे. तिथं आपल्यासाठी काहीच थांबून राहिलं नाहीये आणि राहणं शक्यही नाही. परंतु हे स्वीकारण्याची मनाची प्रगल्भता प्रवासामुळेच आम्हांला आली आहे. ‘केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार’ या श्लोकातलं सत्यही आमच्या प्रवासातून आम्हांला बऱ्यापैकी उमगलं आहे, असं म्हणणंही अतिशयोक्ती होणार नाही.
सुटकेस घेतलेल्या ब्रुनो कॅटलॅनोच्या खलाशासारखे आपण सर्वच जण आपापला प्रवास करत असताना कुठं-ना-कुठंतरी स्वतःमधला काही भाग आठवणींच्या रूपात मागं ठेवून, विसरून, नवीन अनुभवांच्या शोधामध्ये भटकत आहोत आणि भटकत राहू हेच खरं नाही का?
कल्याणी कुमठेकर
इ-मेल – kalyanikumathekar@gmail.com
मूळची सातारची. सध्या बँकॉकमध्ये वास्तव्य. नवीन ठिकाणं पाहायला जितकं आवडतं, तितक्याच नवीन-नवीन गोष्टी शिकायला आवडतं.
फोटो – कल्याणी कुमठेकर, विकीपीडिया कॉमन्स, पिंटरेस्ट