प्रवासातल्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास

आरती रानडे

 आपण एक साधं, सरळ, बरं यांपैकी चाकोरीबद्ध, थोडक्यात कमालीचं रुटीन आयुष्य जगतोय असं वाटत असताना अचानक कधीकधी तेच आयुष्य ‘सुरस, चमत्कारिक, अद्भुत’ घटनांनी भरलंय असं वाटायला लागतं. आत्ता, या क्षणी माझ्या छोट्याशा ट्रॅव्हल डायरीतल्या डिसेंबर २०१५ सालच्या ‘किलीमांजारो मोहिमे’च्या नोंदी वाचताना आयुष्याबद्दल माझ्या मनात नेमक्या ह्याच भावना आहेत. ‘या गोष्टी नक्की आपल्याच आयुष्यात घडल्या आहेत ना?’ असा प्रश्न पडत असताना किंवा ‘काही गोष्टी आपल्या हातून मागल्या जन्मात तर घडल्या नाहीत ना!’  असं भासत असताना, या अशा डायरीतल्या नोंदी ‘रीअॅलीटी चेक’ असल्यासारख्या आधार ठरतात. दिलासा देतात.

डिसेंबर २२ ते २७, २०१५. किलीमांजारो, टांझानिया.

या प्रवासातल्या छोट्या-छोट्या नोट्‌सवर, टिपणांवर मी नजर टाकतीये. कधी डायरीची पानं नुसतीच उलटतीये. मधूनच इकडच्या-तिकडच्या चार-दोन ओळी वाचतीये आणि या सगळ्यातून माझ्यासमोर परत एकदा नव्यानं उलगडत जाताहेत प्रवासातल्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. या डायरीच्या पानांतून शब्द हलकेच बाहेर पडून प्रत्यक्ष दृष्याच्या रूपात माझ्यासमोर येताहेत.

 *******

AR_0_killi_machame route map_ARanade
किलीमांजारो क्लाइंबींग,  मचामे रूट नकाशा

२३ डिसेंबर २०१५. मचामे कॅम्पसाईट. किलीमांजारो.

 पहाटेचे पाच वाजलेत. किलीमांजारो हायकिंगचा आजचा दुसरा दिवस. प्रचंड बोचऱ्या थंडीमुळे आणि दुसऱ्या दिवशीच्या हायकिंगच्या नर्व्हसनेसमुळे काल रात्री तशी फारशी नीट झोप लागली नाहीच. मग थोडा वेळ तंबूच्या बाहेर येऊन बसले. मचामे कॅम्पसाईटवर उभे असलेले अनेक तंबू. काल संध्याकाळच्या हालचालीनंतर आता गाढ झोपलेले. वातावरणात पूर्ण शांतता. एखाद्याच तंबूतून येणारा कोणाच्या खोकल्याचा आवाज. कूस बदलल्यानं होणारी खसखस. ढगांच्या आड चंद्र गेल्यावर दाटलेला गर्द काळोख आणि जरा ढग बाजूला झाल्यावर चंद्रप्रकाशात दूरवर चमकणारं किलीमांजारो शिखर. भुरळ पाडणारं, आकर्षून घेणारं आणि काही प्रमाणात भीतिदायकही. उजाडण्यापूर्वीच्या अंधार-प्रकाशाच्या सीमारेषेवर ते चमकणारं बर्फाच्छादित किलीमांजारो शिखर नजरेला पडलं. आणि ‘अनुरारन’ ह्या बंगाली सिनेमातला ‘रात्र होत असताना चंद्राचे पहिले किरण जेव्हा कांचनगंगा शिखर उजळून टाकतात, तेव्हा असं वाटलं की त्या क्षणी तो किरण केवळ माझ्या डोळ्यांना सृष्टीचा हा चमत्कार दाखवण्यासाठी निर्माण झाला होता’ असं पॅशनेटली सांगणारा राहुल बोस अजूनच जवळचा वाटून गेला. याच विचारात असताना हळूहळू सगळ्या कॅम्पला जाग यायला लागलेली जाणवली आणि आमच्या मुख्य स्वयंपाक्याची, सडालाची ‘जिंजर टी इज रेडी’ अशी हाक कानावर पडली. आजवर प्यायलेला सगळ्यांत साधा आणि तरीही सगळ्यांत बेस्ट ‘जिंजर टी’. त्या गारठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत, ९,४०० फूट उंचीवरच्या ह्या हळूहळू विरळ होत जाणाऱ्या हवेत प्यायला मिळालेला गरमागरम ‘आल्याचा चहा’ किंवा खरं तर ‘आल्याचं पाणीच’ म्हणजे निवळ स्वर्गीय अमृत.

AR_1
मचामे गेट, किलीमांजारो नॅशनल पार्क, टांझानिया

एकीकडे चहा पितापिता आम्ही आवराआवरी करतोय. आमच्या टेन्टच्या बाहेर स्लिपिंग बॅग्स आवरून, डफल बॅग्स पॅक करून ठेवल्या आहेत. पुढच्या टप्प्यावर त्या पोचवल्या जातील. आमच्या पाठीवर आता फक्त आजच्या एका दिवसाचं हायकिंगचं सामान. हातात हायकिंग पोल्स. प्रचंड थंडी असल्यानं हातात ग्लोव्हस, कानटोपी, थंडीची जॅकेटं. डोक्यावर माझी लकी ऑरेंज कॅप आणि मनात प्रचंड उत्सुकता. ऑल सेट फॉर टुडे!

पहाटे लवकर उठून, वेळेत तयार होण्याचे फायदे म्हणजे सगळ्यांना देऊन उरलेला थोडा जिंजर टी, मित्रांमधे घोटघोट वाटून पिण्याचं समाधान आणि इतरांचं आवरून होईपर्यंत तुम्हांला तिथल्या वातावरणाशी आणि लोकांशी संवाद करायला मिळणारा वेळ.

आत्तादेखील लवकर तयार झालेले आम्ही ४-५ जण आमच्या आजच्या गाईडशी, रेनॅटसशी गप्पा मारत उभे आहोत. ग्रुपमधला एक-एक जण तयार होऊन तंबूच्या बाहेर सामान ठेवून, पाठीवरच्या पिशवीतल्या पाण्याच्या पखाली भरून समोरच्या उंच शिखराकडे बघतबघतच आमच्या दिशेनं येताहेत. प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता, आजचा दिवस पार पाडायचा ही जिद्द आणि एलेव्हेशनमुळे श्वास घ्यायला त्रास तर होणार नाही ना ही चिंता ह्या सगळ्याचं चेहऱ्यावर उमटणारं मिश्रण.

आजच्या दिवसाचा प्लॅन, हवामान, किती उंची गाठायचीये, किती स्पीड, कोणता भाग निसर्गरम्य, कोणता अवघड, आधीच्या ट्रेकर्सच्या गोष्टी अशा गप्पा मारता-मारता रेनॅटस अचानक माझ्याजवळ येऊन मला म्हणतोय- मी सांगितलेलं तू ऐकणार असशील, तर किलीमांजोरो शिखर सर करायचं एक सिक्रेट माझ्याजवळ आहे, ते मी तुला सांगेन.

AR_3
किलीमांजारो सर करण्याचा सीक्रेट मंत्र सांगणारा रेनॅट्स आणि मी

एक क्षणभर गांगरून गेलेली मी, पुढच्याच क्षणी रेनॅटसला सांगते- ‘चल, डील. दोन प्रॉमिसेस – एक, तू मला जो सल्ला देशील तो मी जसाच्या तसा पाळीन. आणि दुसरं म्हणजे मी जर किलीमांजारो शिखर सर केलं तर माझ्याजवळची काहीतरी स्पेशल गोष्ट मी तुला देईन.’

मग रेनॅटसनं मला बाजूला घेऊन चक्क कानगोष्टी सांगाव्यात तसं माझ्या कानात किलीमांजारो सर करायचं त्याचं खास सिक्रेट, गुपित सांगितलंय.

‘यो! डन’ असं म्हणून त्याला टाळी देईपर्यंत आता सगळा ग्रुप जमलाय आणि आमच्या किलीमांजारो मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीच्या टप्प्याला सुरुवात झालीये. चलो शिरा कॅम्प…

*****

AR_4
शिरा कँप साईट, अविस्मरणीय संध्याकाळ

डायरीच्या पानागणिक उलगडत जाणाऱ्या आठवणी, किस्से, भेटलेली माणसं. एखादा सिनेमा पाहावा तशा माझ्याच आयुष्यात घडून गेलेल्या ह्या काही घटना रिवाइंड करून परत एकदा पाहतीये. अनुभवतीये मी. किलीमांजारो मोहिमेतले सगळे दिवस, सगळे टप्पे एकएक करत डोळ्यांसमोर येताहेत माझ्या.

२२ ते २७ डिसेंबर हा तो मंतरलेला कालावधी. विविध भाषा बोलणारे, विविध ठिकाणांहून एकत्र आलेले आणि अवघ्या काही तासांत एकमेकांचे मित्र बनलेले आम्ही हायकर्स, स्वाहिली भाषा आणि जोडीला तोडकंमोडकं इंग्रजी बोलणारे स्थानिक गाईड्‌स, स्वयंपाकी, सामान वाहणारे पोर्टर्स असा चाळीस-एक लोकांचा मस्त जमलेला ग्रुप. सगळ्यांच ध्येय एकच. किलीमांजारो शिखर सर करण्याचं.

वास्तविक ‘किलीमांजारो’ हे नाव माझ्या ‘हजारो ख्वाइशे ऐसी’वाल्या बकेट लिस्टमध्ये अजिबातच नव्हतं. शिवाय मला डोंगरदऱ्यांत भटकायचं आकर्षण असलं तरी मी काही उच्च प्रतीची, प्रो-हायकर वगैरे नव्ह्ते. पण २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात एके दिवशी अचानक मित्रमंडळींचा फोन आला ‘आम्ही किलीमांजारो क्लाइंम्ब प्लॅन करतोय. तुम्ही येणार का?’ आणि ‘किलीमांजारो जगात नक्की कुठे आहे? त्याची उंची किती? हवामान काय? तयारी काय लागते?’ या कशा कशाचाही विचारही न करता मी त्याच फोनवर ‘होय. आम्ही पण येतोय’ असं सांगूनही टाकलं. झालं ठरलं. किलीमांजारोला जायचं.

नंतर जेव्हा मोहिमेची तयारी करायला लागलो, तेव्हा आमच्या घरात ‘शोले’ सिनेमातला, ‘पार्टनर, हमने कुछ ज्यादा तो नही बोल दिया?’ हा प्रश्न आणि ‘अब बोल ही दिया है तो देख लेंगे’ हे त्याचं उत्तर हा संवाद अनेकदा घडला.

शिवाय अफिक्रेत जात असल्यानं दंडाची चाळणी होण्याइतकी घेतलेली यलो फिवर, हिपॅटायटीस, टायफॉईड, इनफ्लूइनझा अशी विविधं इंजेक्शन्स आणि तोंडाची चव घालवणाऱ्या, पोटाची वाट लावणाऱ्या मलेरियाच्या गोळ्या. किलीमांजारो मोहिमेचं गांभीर्य हळूहळू चांगलंच जाणवायला लागलं.

 ‘ह्या पोरीच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असते’, हे वाक्य माझ्या लहानपणापासून मी आईकडून इतक्या वेळा ऐकलंय. पण हे भटकंतीचं वेड, ही पायाला लागलेली भिंगरी मला कधी किलीमांजारो सर करताना, त्याच्या कठीण चढणीमुळे हायकर्समध्ये ‘व्हिस्की मार्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मचामे मार्गानं ट्रेकिंग करण्याच्या नशेचा अनुभव देईल; असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

AR_5
ढगांच्या खिडक्या उघडताना पाहणं हा एक मॅजीकल मोमेंट @ शिरा कँप साईट

 मोहिमेचा पहिला टप्पा मचामे गेट ते मचामे कॅम्प असा. ५,४०० फूट उंचीवरून चालू करून ९,४०० फूट उंचीवर पोचायला साधारण ११ किमी अंतर पार करण्याचा. हा सगळा रस्ता ‘रेन फॉरेस्ट’मधून म्हणजेच घनदाट जंगलातून जाणारा. आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या एक मैल अंतरावरच आमच्या गाईडनं आम्हांला नियम सांगितला तो म्हणजे, ‘गाईडच्या पुढं जायचं नाही. सगळ्यांत पुढं गाईड तुमचा पेस किंवा चालण्याचा वेग ठरवून देणार. गाईड चालेल त्याच चालीनं, त्याच वेगानं चालायचं. याच वेळी त्यानं आम्हांला ‘पोले पोले’ या शब्दाची ओळख करून दिली. स्वाहिली भाषेतल्या या शब्दाचा अर्थ आहे ‘हळूहळू’. स्लोलीस्लोली.

जसजसं आम्ही अधिकाधिक वरच्या एलेव्हेशनला पोचत गेलो, तसतशी उंची मुळे हवा विरळ होत गेली,  अधिकाधिक अवघड चढणी चढत गेलो तसंतसं ह्या ‘पोले-पोले’चं महत्त्व मनोमन पटत गेलं. ‘किलीमांजारो’ आणि ‘पोले-पोले’ हे समीकरण डोक्यात पक्कं झालं.

AR_9
पोले पोले म्हणजे हळू हळू हा किलीमांजारो सर करण्याचा मंत्र @ बरांको वॉल (२५७ मीटरची सरळसोट उभी ठाकलेली भिंत)

 सगळ्यांत पुढे आमचा त्या-त्या दिवसाचा गाईड आणि त्याच्यामागे शिस्तबद्ध रांगेत एकापाठोपाठ एक चालणारे आम्ही हायकर्स. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी, मचामे कॅम्पसाईट सोडताना रेनॅटसनी सांगितलेलं सिक्रेट मी परत-परत मनात घोळवत होते आणि त्याच्या सल्ल्याचं तंतोतंत पालन करत होते. ह्या सिक्रेट मंत्रामुळे अक्षरशः जादू केल्यासारखा माझा ट्रेक सुलभ आणि खूप जास्त मजेचा होत गेला. गाईडनंतर पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या क्रमांकावर असायचे मी. किलीमांजारो शिखर सर करेपर्यंत चालण्याच्या रांगेतले हे दोन क्रमांक मी अजिबात सोडले नाहीत. इतकं की ह्या दोन क्रमांकांना ग्रुपमधले सगळे ‘हाय अॅचिव्हर्स’ म्हणून गमतीत चिडवायला लागले होते. कळायला लागल्यापासून आयुष्यात आजवर मी ‘का, कसं, ह्यामागचं कारण काय’ असे प्रश्न विचारल्याशिवाय आंधळेपणानं कोणाचं ऐकल्याचं मला फारसं आठवत नाही. पण ह्या ट्रेकिंग दरम्यान ‘का’ हा प्रश्न एकदाही न विचारता मी पुढे असलेल्या गाईडवर संपूर्ण विश्वास ठेवून, त्याच्या पावलावर पाऊल टाकून रस्ता चालत होते.

या ट्रेकिंगच्या दरम्यान चालताना हसतखेळत, चेष्टा मस्करी करत, गाणी म्हणत, विविध देशांतल्या राजकारणापासून ते लग्नव्यवस्था, हुंडा, रितीरिवाज, राहणीमान अशा नानाविध विषयांवर चर्चा करत चालणारे आम्ही, अनेकदा मैलोन्‌मैल एक शब्दही न बोलता चालत असू. एक प्रकारचं मेडिटेशनच होतं की. हत्तीच्या संथ गतीनं, एका लयीत दिवसभर चालत राहताना, बाहेरच्या संपूर्ण शांततेत मनातल्या मनात जो संवाद घडत असे, तो एक अवर्णनीय अनुभव. अशाच एका संवादात मला हे लक्षात आलं की किलीमांजारो हाईकला सुरुवात केल्यावर पहिल्या हजार-दोन हजार पावलांत मी स्वतःला ह्या पर्वताच्या स्वाधीन केलं आहे.  ह्याच्यासमोर हट्ट करून, मी शिखर सर करून दाखवेनच असं त्याला चॅलेंज देऊन काही होणार नाही, हे आपोआपच नकळत कुठेतरी जाणवलं असणार. ह्या पर्वताच्या हातात स्वतःला सोपवायचं आणि तो नेईल, वाट दाखवेल, जी काय निसर्गाची, हवामानाची रूप दाखवेल; ती-ती स्वीकारून त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहायचं. मोमेन्ट ऑफ टोटल सरेन्डर !

माउंटन्स मेक यू एम्टी. पर्वत तुम्हांला रिक्त करतात, असं म्हणतात ते खरंच वाटावं अशी विलक्षण जाणीव. वेगळीच अनुभूती.

किलीमांजारो मोहिमेत मजल दर मजल करत, एक-एक टप्पे पार करत आम्ही शिखराकडे वाटचाल करत होतो. प्रत्येक दिवसाची वेगळी आव्हानं, प्रत्येक दिवशी वेगळी हवा, वेगळा निसर्ग. हर दिन का अपना-अपना अलग नशा.

AR_15

त्यातली शिरा कॅम्पसाईट ही जागाच फार भन्नाट. दिवसभराच्या हायकिंगनंतर ह्या कॅम्प-साईटला अनुभवलेला सूर्यास्त, रात्रीचा चंद्रप्रकाश आणि त्यानंतर उगवणारी पहाट सगळंच अद्भुत. दरीतून घोंघावत येणारं थंडगार वारं. ढगांना चक्क बाजूला सारून स्वतःसाठी वाट करणारा वारा. आणि खिडक्या उघडाव्यात तसे ढग बाजूला झाल्यावर समोर दिसणारा मेरू पर्वत. टांझानियामधला हा मेरू पर्वत किलीमांजारो सर करताना सतत तुमच्या आजूबाजूला असतो. जेव्हा-जेव्हा तो दिसायचा, तेव्हा-तेव्हा मनात आपोआप मारुती स्तोत्रामधल्या ‘तयासि तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे’ या ओळी म्हटल्या जायच्या आणि उगीचच या मेरूचा त्या मेरूशी संबंध असावा काय, असा प्रश्नही उमटायचा.

या सगळ्या प्रवासात मावेन्झी आणि किबो ही पर्वशिखरंही सतत असायची साथीला.

आमच्याबरोबर असणारे स्वयंपाकी, सामान उचलणारे, टेन्ट सेट करणारे पोर्टर ही सगळी तिथली स्थानिक मंडळी दर टप्प्यावर विविध गाणी म्हणायची. यातलं सगळ्यांत प्रसिद्ध गाणं म्हणजे ‘किलीमांजारो किलीमांजारो म्लीना रेफु साना …’. आपण शिखर सर करायला जाताना लांबच लांब रस्त्यानं, मावेन्झी पर्वताला सापासारखा विळखा घालून जाणार, ह्या अर्थाच्या ओळी या गाण्यात आहेत. स्वाहिली भाषेतल्या या गाण्यांमध्ये आजूबाजूच्या निसर्गाचं, आपण कोणता रस्ता घेऊन कुठे पोचलो आहोत याबद्दल वर्णनं असायची. किलीमांजारोची लोकगीतंच ही जणू. प्रत्येक कॅम्प-साइटला पोचल्यावर गायली जाणारी ही गाणी, त्याच्या ठेक्यावर तालावर केलेला नाच; त्या-त्या दिवसाच्या कष्टाचा शीण कुठच्या कुठे पळवून लावणारा.

AR_10
कोसोवो कँप, अखेरच्या चढाई पूर्वीची संध्याकाळ

 किलीमांजारो शिखर सर करण्यापूर्वीचा आमचा शेवटचा बेस कॅम्प होता १५,७५० फूट (४,८०० मीटर) उंचीवरचा ‘कोसोवो कॅम्प’. इथून १९,३४१ फूट उंचीवर असलेलं ‘उहूरू शिखर’ हे अंतर ५ किमीपेक्षाही कमी खरं तर. पण हा सगळ्यांत अवघड टप्पा. समुद्रसपाटीवरची शारीरिक धडधाकटपणाची सगळी गृहीतं फोल ठरवणारा आणि मुख्य म्हणजे त्या त्या दिवशीच्या निसर्गाच्या, हवामानाच्या मर्जीवर अवलंबून असलेला.

या अखेरच्या चढाईला आम्ही मध्यरात्री १२ वाजता सुरुवात केली. एकएक पाऊल जपून टाकत, बॅटरीच्या प्रकाशात वरवर सरकणारी मुंग्यांची रांग.

अंगावर अनेक कपड्यांचे थर शरीराला बोजड बनवणारे. हात-पाय गरम ठेवणारे मोजे, कानटोप्या घालूनही हाडापर्यंत पोचणारी थंडी. शीतदंश होण्याइतका आणि हातापायाच्या संवेदना घालवणारा बोचरा वारा. प्रत्येक पावलागणिक विरळ होणारा ऑक्सिजन, श्वास घ्यायला होणारा त्रास आणि बधिर होत जाणारा मेंदू जागा ठेवण्यासाठी म्हटलेले १ ते ५० आकडे. जवळचं पाणीही गोठून बर्फ झालेलं. घशाला पडलेली कोरड. दर दहा-पंधरा पावलांवर थांबून श्वास घेण्याचा केलेला प्रयास. ही रात्र, हा रस्ता कधीच संपणार नाही असं वाटत असतानाचा, जवळजवळ गुंगी येण्याच्या अवस्थेपर्यंत पोचण्याचा क्षण….. आणि सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक सामोरी आलेली ‘यू आर अॅट स्टेला पॉइंट’ (१८,६०० फूट) ही पाटी. उहूरू शिखर सर करण्यापूर्वीचा हा टप्पा. प्री-समिट पॉइन्ट. सडालाच्या हातचा गरमगरम आल्याचा चहा, उब देणारा, तरतरी आणणारा. इथून पुढच्या शेवटच्या तासाभराच्या अंतरासाठी विश्वास आणि उभारी देणारा.

AR_8
हाडं गोठवणार्‍या पहाटेच्या थंडीत मसाई ब्लँकेट लपेटून जिंजर टी पिणं .. स्वर्गसुख @ बरांको कँप साईट

रात्रभराच्या चालण्यानं शरीरावर आलेला थकवा, पण अवघं ४०० फुटांचं अंतर पार करायचंय समिटला पोचण्यासाठी; ह्या विचारानं मनात प्रचंड उत्साह. बर्फाच्छादित शिखरांवर पसरलेला उगवत्या सूर्याचा आशादायी प्रकाश. एकेक पाऊल टाकत रस्ता चालत असताना आपोआपच मनातल्या भावनांचा कल्लोळ हळूहळू निवळणारा. आता निवळ शांतता. नथिंगनेसचा अनुभव…. आणि आम्ही १९,३४१ फूट उंचीच्या ‘उहूरू’ शिखरावरती उभे. अफ्रिकेतल्या सगळ्यांत उंच शिखरावर. ‘अॅट द रूफ-टॉप ऑफ आफ्रिका’. डोळ्यांतून ओघळलेले काही अश्रू, एकाच वेळी मन भरून येणं – आणि मन संपूर्ण रिकामं असण्याची विचित्र भावना. किलीमांजारो सर करून अवघ्या तासाभरातच परतीच्या मार्गावरचा चालू केलेला प्रवास.

AR_14
किलीमांजारो मोहिम फत्ते @ मावेका गेट

पुढच्या दीड दिवसांत डोंगर उतरतानाच्या मार्गावर माझ्या मनात रेनॅटसनं मला सांगितलेल्या सिक्रेटचा विचार अनेकदा येत होता. आणि मला परतपरत आठवत होती अरेबियन नाईट्समधली बमन, परवेझ आणि परिझाद या तीन भावंडांची गोष्ट.

 बमन आणि परवेझ शिकारीला गेले असताना एक वृद्ध स्त्री त्यांच्या घरी येते. पाहुणचार घेऊन संतुष्ट झालेली ती वृद्ध स्त्री निघताना परिझादला ‘बोलणारा पक्षी, गाणारं झाड आणि सोन्याचं पाणी’ ह्या जगातल्या तीन अत्यंत दुर्मीळ वस्तूंबद्दल माहिती सांगते. ह्या तीन गोष्टी मिळाल्या, तर आपलं घर खऱ्या अर्थानं परिपूर्ण होईल असा परिझादला विश्वास वाटतो. बहिणीचा हा ध्यास, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी बमन आणि मग परवेझ हे दोघे भाऊ एकानंतर एक घराबाहेर पडतात. पण ठरलेल्या मुदतीत घरी परतत नाहीत. ह्या तीन गोष्टी मिळवायला आणि आपल्या भावांचा शोध घ्यायला आता खुद्द परिझाद मोहीम आखते.

मजल दरमजल अंतर कापल्यानंतर तिला एक वृद्ध योगी भेटतो. त्या तीन दुर्मीळ गोष्टींचा पत्ता विचारण्याच्या निमित्तानं तिच्या दोन्ही भावांशी झालेल्या भेटीचा वृत्तान्त तो वृद्ध योगी तिला सांगतो. त्याचबरोबरीनं ज्या अर्थी ते दोघे यशस्वी झाले नाहीत, त्या अर्थी आता ते परत येणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या शोधाचा आणि त्या वस्तू मिळवण्याचा नाद तू सोडून दे, असा सल्लाही तो परिझादला देतो.

पण परिझादचा निश्चय अढळ आहे, हे जाणवल्यावर तो योगी तिला त्या वस्तू कुठे आहेत त्याची माहिती आणि त्या मिळवण्याचं एक सिक्रेट, एक गुपित सांगतो.  ‘तू ज्या मार्गावर चालली आहेस आणि ज्या गोष्टी मिळवायची तुला इच्छा आहे तो मार्ग खूप कठीण आहे. त्या मार्गावर खूप अडचणींचा तुला सामना करावा लागेल. अनेक शूर वीरांनी ह्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते अपयशी ठरले आहेत. पण तरीही तुझा निश्चय पक्का असेल, तर मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वाग.

इथून पुढे गेल्यावर तुला एका पर्वताचा पायथा दिसेल. तिथं घोड्यावरून उतरून पुढचा प्रवास तुला एकटीला पायी करायचा आहे. तू जसजशी पर्वत चढायला लागशील तुझ्या डाव्या-उजव्या बाजूला तुला मोठमोठ्या आकाराचे काळे दगड, शिळा दिसतील आणि सर्व बाजूंनी तुला विविध भीतिदायक आवाज ऐकू यायला लागतील.

तुझ्या क्षमतांबद्दल प्रश्न विचारणारे, शिव्या देणारे, तुला घाबरवणारे, तुला पुढे जाण्यापासून प्रवृत्त करणारे, तुला अडवणारे असे विविध आवाज तुला पर्वताचं शिखर सर करण्याच्या कामात अडथळा निर्माण करतील. तू न घाबरता आणि महत्त्वाचं म्हणजे एकदाही मागे वळून न पाहता पुढंपुढं जात शिखरावर पोचलीस तर तुला बोलणाऱ्या पक्ष्याचा पिंजरा दिसेल. त्या पक्ष्याला तू ताब्यात घेतलंस की तो तुला गाणारं झाड आणि सोन्याचं पाणी मिळवून द्यायला मदत करेल.

पण ह्या मार्गात शिखरावर पोचायच्या आधी तू एकदा जरी मागे वळून पाहिलंस, तर त्या क्षणी तुझं रूपांतर एका काळ्या दगडात होईल आणि तू कायमची शिळा बनून त्या पर्वतावर अडकून राहशील.’

परिझादनं वाटेत आलेल्या अडचणींवर मात करत, तिला परत फिरण्यास सांगणाऱ्या भीतिदायक कर्कश आवाजांवर हुशारीनं आणि घट्ट मनोनिग्रह ठेवून मात करत तो पर्वत सर केला. आणि बोलणारा पक्षी, गाणारं झाड आणि सोन्याचं पाणी या अत्यंत दुर्मीळ वस्तू मिळवण्याचं तिचं स्वप्न तिनं पूर्ण केलं.

 नि माझ्या कानात ‘किलीमांजारो सर करण्याचं सिक्रेट, गुपित मंत्र सांगितल्यापासून मी अरेबियन नाईट्समधल्या परिझादसारखी आहे असं मला वाटायला लागलं आणि बघता-बघता ही परिझाद किलीमांजारो सर करून पायथ्याशी असलेल्या ‘म्वेका पार्क गेट’पर्यंत पोचलेदेखील.

सहा दिवसांपूर्वी अत्यंत उत्सुक तरीही अनुत्साही अशा मनःस्थितीत आम्ही किलीमांजारो मोहिमेला सुरुवात केली होती, ती मोहिम फत्ते करून, उहूरु शिखर सर करून आम्ही पोचलोय; यावर आमच्यापैकी कोणाचाच विश्वास बसत नव्हता. नाही म्हणायला धुळीनं आणि चिखलानं माखलेले कपडे, उन्हातान्हात चालल्यानं रापलेले चेहरे, ग्रुपमधल्या मुलांच्या चेहऱ्यावर वाढलेले दाढीचे खुंट आणि एकूणच सगळ्यांचा कळकट्ट- मळकट्ट अवतार या सात दिवसांच्या खडतर प्रवासाची, कष्टाची ग्वाही देत होता. शिवाय त्याच्या जोडीला होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एक कामगिरी पार पाडल्याचं अतीव समाधान. ह्या सात दिवसांत सगळ्या ग्रुपबरोबर आम्ही इतकी दंगा, मस्ती, हास्यकल्लोळ, चेष्टामस्करी केली की, संध्याकाळी कॅम्पमध्ये पोचल्यावर दिवसभराच्या कष्टापेक्षा ‘आपण किती आणि कशाकशावर हसलोय’ हेच लक्षात राहायचं.  मोहिम फत्ते करून परतलेले आम्ही, सहा दिवसांपूर्वी निघताना होतो तितकेच ताजेतवाने, उत्साही, न थकलेले आणि फूल स्पिरीटमध्ये गप्पा, चेष्टामस्करी विनोद करत होतो. ह्या एनर्जीचं सगळं श्रेय ह्या मस्त भट्टी जमलेल्या, समान ध्येयानं एकमेकांना प्रोत्साहन देत, हसतखेळत मोहिमेचा एकएक दिवस नेटानं पार पाडणाऱ्या आमच्या ग्रुपला आणि म्हणूनच बेस कॅम्पला परत आल्यावर शेवटचा पण महत्त्वाचा कार्यक्रम झाला सगळ्या क्लायबिंग करणाऱ्या ग्रुपला अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आम्हांला गाईड करणाऱ्या, आमच्यासाठी स्वयंपाक करणाऱ्या, आमचं सामान पाठीवर वाहून नेणाऱ्या आमच्या ‘सपोर्ट टीम’ला ‘थँक्स, धन्यवाद’ म्हणण्याचा. तिथल्या स्थानिक पद्धतीप्रमाणे टीममधल्या एकेकाचं नाव पुकारलं जात होतं. प्रत्येक जण नाचत, हसत, टाळ्या वाजवत धमाल-मस्ती करत पुढे येत होता. चियर्स, हुर्रे, किंवा ह्या सहा दिवसांत ‘कॉफी मॅन’, ‘बाबा मुकुलु’, अमेरिकन झॅकचं भारतीयकरण ‘झकमारीबाबा’ असं कोणाला काही खास नाव पडलं असेल, तर त्या नावाचा जल्लोष होत होता.

आमच्या गाईडचं रेनॅटसचं नाव पुकारलं गेलं. सहा फूट उंच, काळा रापलेला रंग, शांत, धीरगंभीर पण चेहऱ्यावर सतत एक हलकंसं स्माईल असलेला रेनॅटस समोर आला आणि त्या क्षणी मला रेनॅटसनं सांगितलेल्या ‘सिक्रेट’ची आणि ‘मी शिखर सर केलं, तर तुला स्पेशल काहीतरी देईन’ ह्या माझ्या वचनाची आठवण झाली.

आमचं सगळं सामान गाडीत भरलं होतं. माझ्याजवळ त्या क्षणी काहीच नाही. मग स्पेशल असं काय देऊ शकेन मी त्याला आत्ता ह्या क्षणी. माझ्या नकळत मनात विचार येऊन गेला. मेंदू कधीकधी किती स्पॉन्टॅनियसली, तुमच्याही नकळत काम करतो आणि निर्णय घेतो. पुढच्या क्षणी मी माझ्या डोक्यावरची माझी खास लकी ऑरेंज टोपी काढली आणि ‘रेनॅटस, थिस इज फॉर यू मॅन’ असं म्हणत त्याच्याकडे भिरकावली. रेनॅटसनी क्षणभर माझ्याकडे पाहिलं. नेहमीचं हलंकच हास्य, त्याचं स्माईल आता त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे पसरलं, अगदी डोळ्यांपर्यंत पोचलेलं मी पाहिलं. रेनॅटसनी टोपीचा कॅच हवेतच घेतला. आता ती ऑरेंज कॅप रेनॅटसच्या डोक्यावर. त्याच्या सिक्रेट मंत्राबद्दल माझ्याकडून एक लहानसं पण तरीही स्पेशल थँक्यू!

 ज्या क्षणी माझ्या डोक्यावरून काढून मी रेनॅटसच्या दिशेनं टोपी फेकली, त्या काही क्षणांत साधारणतः आठ वर्षापूर्वीची ती धुक्यातली अंधारी रात्र माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहिली. मधल्या काळात जी गोष्ट मी पूर्णतः विसरूनही गेले होते, ती लख्खपणे आठवली. साधारण २००७ मधली ही गोष्ट. त्या वेळी मी अॅरिझोनामध्ये राहत होते आणि भारतातून माझे आई-वडील माझ्याकडे राहायला आले होते. अॅरिझोनामध्ये वास्तव्य असेल, तर ग्रॅन्ड कॅनियन जणू तुमच्या बॅकयार्डमध्ये असल्यासारखा. त्यामुळे जवळची एक-दोन मित्रमंडळी, आई-बाबा आणि आम्ही अशा सगळ्यांनी मिळून ग्रॅड कॅनियन, झायॉन, ब्राईस कॅनियन अशी वाळवंटी सहल केली होती. ग्रॅन्ड कॅनियनचे दोन भाग आहेत. साऊथ रीम आणि नॉर्थ रीम. यांतला साऊथ रिम हा भाग पर्यटकांना जास्त माहितीचा. जास्त गजबजलेला. ड्रायव्हिंगसाठी जास्त अॅक्सेसिबल, सोयीचा.

आई-बाबांना घेऊन आम्ही आधी साऊथ रीमला भेट दिली. दिवसभर भटकंती झाली. आणि रात्री निघायच्या वेळी सहज विषय निघाला की साऊथ रीमपेक्षा नॉर्थ रीमचा भाग जास्त निसर्गरम्य, देखणा, कमी गर्दीचा आणि नक्कीच पाहण्याजोगा, नव्हे अनुभवण्याजोगा आहे.

ह्या नॉर्थ रीमच्या सगळ्यांत उंच जागी जाण्यासाठी एक २-३ मैलाचा चालण्याचा रस्ता आहे. दोन्ही बाजूंना दरी आणि मधून जाणारी चिंचोळी वाट. दरीतून वर घोंघावणारा वारा आणि ही वाट ओलांडून पलीकडे गेलं की रस्ताच संपतो आणि समोर तिन्ही बाजूंना फक्त खोल दरी. द ग्रॅन्ड कॅनियन. लाल-करड्या रंगाच्या ह्या दरीच्या खोलवर जाणाऱ्या सरळसोट भिंती. नॉर्थ रीमच्या ह्या सगळ्यांत उंच जागी बसून हातात मस्त वाफाळत्या गरम चहाचा घोट घेत, थंडी अंगावर झेलत, पहाटेचा दिवस होताना, सूर्योदय पाहायला मला प्रचंड आवडलं असतं. रात्रीच्या काळोखात धीरगंभीर, भेसूर भासणाऱ्या कॅनियनच्या मिलियन वर्षं जुन्या भिंती, सूर्याची पहिली किरणं पडली की सोनेरी, लालसर, केशरी रंगांत न्हाऊन निघतात. असा नजारा पाहायला, अनुभवायला मला फार आवडतो. हा अनुभव मला माझ्या आई-बाबांनाही द्यायचा होता. खरं तर वयस्कर आई-बाबांना घेऊन, कोणतंही हॉटेल बुकिंग वगैरे काही सोय नसताना, रात्रीचा ४-५ तासाचा ड्राइव्ह करून ग्रॅन्ड कॅनियन नॉर्थ रीमला पहाटे सूर्योदय पाहायचा हा थोडा हटके, बोल्ड आणि धाडसीच प्लॅन. पण आई-बाबादेखील माझ्यासारखे ‘थ्रील सिकिंग’ असल्यानं ते हसत-हसत तयार झाले आणि आम्ही आमचा आधीचा प्लॅन बदलून नॉर्थ रीमकडे ड्राईव्ह करायला सुरुवात केली.

वाळवंटात रात्री गाडी ड्राईव्ह करणं हादेखील एक वेगळाच अनुभव. दूरवर कुठंही दिवे नाहीत अशा एखाद्या उंच प्रदेशात गाडी पार्क करून गाडीचे दिवे बंद केले आणि गाडीबाहेर पडून वर पाहिलं की अवघी आकाशगंगा तुमच्या माथ्यावर. रात्री असं ताऱ्यांनी खच्चून भरलेलं आकाश अंगावर पांघरून घेण्याचा अनुभव काही विलक्षणच. पण हेच वाळवंटी सरळसोट रस्ते, नॉर्थ रीम जसजशी जवळ येईल तसे आडवळणं घेतात. कॅक्टस जाऊन अचानक सूचीपर्णी वृक्षांच्या रांगा दिसायला लागतात. आणि माथ्यावरच्या अथांग आकाशाच्या जागी उरतो झाडांच्या दुतर्फा रांगांतून डोकावरणारा तुमच्या गाडीबरोबर धावणारा आकाशाचा लांबच लांब निमुळता तुकडा. अशीच रात्री दोन-अडीचची वेळ. अंधारा वळणावळणाचा रस्ता. मध्येच हरणांचा एखादा कळप चरतचरत रस्त्यापर्यंत पोचला असला की दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे त्यांचे भेदरलेले डोळे आणि पाहता-पाहता धुक्यानं भरून गेलेला परिसर. समोरच्या दहा फुटांवरचंही दिसू नये इतकं दाटलेलं धुकं. आणि अचानक गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन आकृती. पाठीवर मोठ्या बॅकपॅक, हातात हायकिंग पोल्स. खरं तर दिवसाची वेळ असती आणि कोणी लिफ्ट मागितली, तर इथं शक्यतो गाड्या थांबवत नाहीत. पण रात्रीची वेळ, त्यात धुकं, कदाचित रस्ता चुकले असतील किंवा ‘निदान काही मदत हवी आहे का, इतकं तरी विचारायला हवं’ असा विचार करून आम्ही थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली. एक मुलगा आणि मुलगी. हायकिंग करताना धुक्यात रस्ता चुकलेले. नॉर्थ रीमच्या जवळ त्यांची कॅम्पसाईट होती, पण गेले काही तास शोधूनही त्यांना तिथपर्यंत पोचायला रस्ता मिळत नव्हता. त्यांना लिफ्ट हवी होती. आम्ही आधीच गाडीत सहा माणसं. पण तरीही कसंबसं अॅडजेस्ट करून त्यांना लिफ्ट द्यायचं ठरवलं. माझ्या कमी उंचीमुळे मी चक्क दोन सीटमधल्या जागेत फ्लोअरवर बसले. गाडीत बसल्यावर त्यांनी ते कसे चुकले, धुक्यामुळे ते परत-परत फिरून एकाच भागात कसे पोचत होते, त्यांच्याजवळचं पाणीदेखील कसं संपलं वगैरे घटना सांगत होते. उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून ते जर्मन असावेत. आम्ही त्यांना नॉर्थ रीमला त्यांच्या कॅम्पसाईटपर्यंत सोडलं. त्यांनी लिफ्ट दिल्याबद्दल आमचे परत-परत आभार मानले आणि आम्ही गाडीचा दरवाजा बंद करून निघणार तितक्यात त्या मुलानं त्याच्या डोक्यावरची ऑरेंज कलरची, ग्रॅन्ड कॅनियन असं लिहिलेली टोपी काढून माझ्या डोक्यावर घातली. ‘जस्त अ सिंपली थँक्यु टु यू!’ असं म्हणत.

AR_2
रात्रीच्या किर्र अंधारात चंद्रप्रकाशाचा खेळ आणि किलीमांजारो पर्वत @ मचामे कँप साईट

काळोख्या, धुक्याच्या रात्री भेटलेल्या त्या दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या मार्गानं निघून गेल्या, आम्ही आमच्या मार्गानं. परत आयुष्यात कदाचित कधीही न भेटण्यासाठी. मागे उरली ती फक्त एक थँक्यू नोट. वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं एक जेश्चर. एक साधीशी पण प्रामाणिक भेट. ग्रॅन्ड कॅनियन लिहिलेली ती ऑरेंज टोपी.

त्या सहलीनंतर ती टोपी माझ्याबरोबर देशोदेशी भटकली. माझ्याबरोबर तिनं अनेक हाइक्स केले. अनेक गावं पाहिली. कुठंही बाहेर जाताना, कोणत्याही साध्या-अवघड हायकिंगमध्ये, पळताना, खेळताना, प्रवासात माझी ‘लकी कॅप’ असल्यासारखी ती माझ्याबरोबर होती. आठ वर्षं. माझ्या आऊटडोअर पर्सनॅलीटीचा एक हिस्सा, माझी आयडेन्टिटी असल्यासारखी.

किलीमांजारो हायकिंगचं पॅकिंग करतानाही भिंतीवर रांगेनं लावलेल्या टोप्यांमधली बरोब्बर हीच टोपी मी आपसूकच निवडली. माझ्या वस्तूंशी बोलण्याच्या सवयीनुसार ‘चलो किली’ असं तिला सहज सांगितलंही

…आणि तितक्याच सहजतेनं माझ्या डोक्यावरून काढून  ‘थँक्यू’ असं म्हणत ती टोपी मी रेनॅटसच्या दिशेनं फेकली.

मला कायम असं वाटत आलं आहे की, जशी माणसांची किंवा सजिवांची डेस्टिनी, प्राक्तन असते तशी निर्जीव वस्तूंचीही असते. आपण कुठे जन्माला येतो, आयुष्यात विविध टप्प्यांवर कोण-कोण माणसं भेटतात, आपण कुठे फिरतो, काय-काय पाहतो, अनुभवतो ही जशी आपली डेस्टिनी. तसंच आपल्या वापरातल्या, आपल्या बरोबरच्या विविध वस्तूंचंही होतं. कुठंतरी रशियात विकत घेतलेला एखादा स्वेटर काही वर्षं भारतात राहून अमेरिकेत स्थायिक होतो.  एखादी पाण्याची बाटली कोणाच्यातरी सोबत सगळं जग फिरून येते. साधे रोजच्या वापरासाठी घेतलेले शूज अवघा युरोप पालथा घालतात किंवा दोन-चार पर्वत सर करून येतात. प्रत्येक वस्तूची एक डेस्टिनी. एक प्राक्तन. ‘थँक्यू नोट’ ही या ऑरेंज टोपीची डेस्टिनी असावी. खरं तर २०१४ मध्ये हवाईला गेले असताना कारची काच फोडून झालेल्या चोरीत पाकिटापासून फोन, कॅमेरॅपर्यंत माझ्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या. बॅक टू स्वेअर वन – अशी  माझी अवस्था झाली होती. ही टोपी मात्र तेव्हाही, त्या धो-धो पावसात माझ्या डोक्यावर होती म्हणून चोरीला गेली नाही. कदाचित माझ्याकडून ती कोणालातरी ‘थँक्यू’ म्हणत दिली जाणं, हाच या टोपीचा मार्ग असणार. अतिशय सहजतेनं ‘धन्यवाद’ म्हणत आपल्या डोक्यावरून काढून ती कोणीतरी माझ्या डोक्यावर ठेवली. माझ्याजवळ होती, तेव्हा ती खूप फिरली, तिनं मला साथ दिली आणि एक दिवस तितक्याच सहजतेनं ‘धन्यवाद’ म्हणत ती माझ्याकडून अजून कोणालातरी दिली गेली. टोपीचा प्रवास चालूच आहे.

प्रवासातल्या गोष्टींइतकाच मला गोष्टींचा प्रवासही फॅसिनेटिंग वाटतो. थ्रिलिंग वाटतो. ऐकावासा आणि सांगावासा वाटतो. आता ती टोपी रेनॅटसपर्यंत पोचलीये. कधीतरी संधी मिळाली तर मला जाणून घ्यायला आवडेल, ती विसावलीये त्याच्याकडेच की संपलंय तिचं आयुष्य की चालू आहे तिचा पुढचा प्रवास … अजूनही… वेगवेगळ्या वाटांवर, अज्ञात जगात, अज्ञात लोकांसोबत.

आरती रानडे

Aarati Ranade_photo

इ-मेल – aaratiranade@gmail.com

सध्या अमेरिकेतील पोर्टलंड, ऑरेगन या शहरात राहते.बायोमेडिकल क्षेत्रात डॉक्टरेट असून व्यवसायानं सायंटिस्ट  आहे. स्टेम सेल्स आणि लिव्हर मॉडेल्स हे रिसर्चचे विषय.  सायन्सच्या बरोबरीनं वाचन, थिएटर, सिनेमे, गाणी हे  आवडीचे विषय. त्याशिवाय फोटोग्राफी, जिगसॉ पझल्स आणि डूडलींग ह्यामधेही प्रयोग चालू असतात. गेली अनेक  वर्षे लहानमोठ्या प्रमाणात गद्य, पद्य लेखन, मेडिकल आणि इतर ट्रानस्लेशन चालू आहे.  हायकिंग,  सायकलिंग,  रनिंग ह्यामधे अ‍ॅक्टीव्ह सहभाग आणि मुख्य म्हणजे  भटकंतीची मनापासून आवड  असल्याने जगभरात  संधी  मिळेल  तसा प्रवास करायला आवडतो.

8 thoughts on “प्रवासातल्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास

 1. wow , खूप सही अनुभव मांडलायस , वर्णन वाचुन तुम्हा लोकांचा प्रचंड हेवा वाटला .पूर्ण ट्रेक नजरेसमोर उभा केलास .

  Like

 2. ड़ोळ्यासमोर संपूर्ण ट्रेक चार ट्रॅक उलगडत गेला , सुंदर चित्राप्रमाणे. छायाचित्रेही छानच.

  Like

 3. Very well written piece. Liked both the perspectives. Curious to read more about the entire trip. Do write when you get a chance.

  Like

 4. Very nicely penned…we could actually almost visited ‘kili’😜…loved to know the story of ur orange cap too…very facinating…thank u for sharing and taking us on such an adventurous and enthralling hike😊

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s