अलास्का – एक अनुभव

शिल्पा केळकर-उपाध्ये

भाग १ – ‘स्थिर’

प्रवासाला निघाल्यापासून समुद्र तसा शांतच होता, पण अधूनमधून हलकेच ढवळून निघाल्यासारखे होई. त्या वेळी मात्र बोटीचे ते अजस्र धूड, एखादे वाळलेले पान तरंगता-तरंगता वरखाली व्हावे तसे होई. त्या हलक्याशा धक्क्याने ती दर वेळी भानावर येई आणि जमिनीवर नसल्याची तिची जाणीव तीव्र होई. खरे तर हे हलके आंदोळणे हवेहवेसे वाटणारे होते. ते बालपणीच्या पाळण्यात झुलवलेल्या सुप्त आठवणी जागे करत होते. त्यामुळे गेले २-३ दिवस तिला झोपही अगदी शांत लागली असावी. तिला सारखे वाटत राहिले की, हे बोटीचे हलणे तिला न आठवणार्‍या आठवणींपर्यंत पोचवते आहे. बोटीच्या तळाशी खोलवर आपटणार्‍या त्या लाटा तिच्या मनापेक्षा शरीराला छेडत असंख्य खोल आठवणींचे तरंग तिच्यावर उमटवताहेत. त्या आठवणी होत्या प्रशांत महासागराच्या पोटातल्या, क्लोंडाईक (Klondike) नदीच्या प्रवाहातल्या, सीतानतागू (Sitaantaagu -‘the Glacier Behind the Town’) हिमनदीच्या जडणघडणीच्या, असंख्य लहानमोठ्या हिमनगांच्या प्रवासाच्या आणि इनुईट (Inuit) लोकांच्या संस्कृतीच्या.

अलास्का प्रांतात शिरल्यापासून प्रकाश भरभरून ओसंडत होता. दिवस मोठा आणि रात्र लहान असल्याने भर मध्यरात्री आणि भल्या पहाटे, सपासप मागे पडणारे पाणी आणि फिक्या जांभळट पर्वतरांगा दूरवर दिसू लागत. अगदी धूसर-अस्पष्ट. पाणीही अगदी स्तब्ध, निळ्या शाईसारखे घट्ट. त्याला कापत वाट काढत जाणारी बोट आणि त्यामागे उठणारे तरंग. कधी तैगाच्या (Taiga) हिरवाईने झाकलेले तर कधी बर्फाच्छादित असणारे पर्वतामागून जाणरे पर्वत आणि न संपणारे पाणी. कुठे जायचे आहे याचा तिला हळूहळू विसर पडत चालला. थंडगार हवेच्या झुळका मनसोक्त पिऊन घेत तिचे डोळे आजूबाजूला भिरभिरू लागले. काय काय पाहायचे? माथ्यावरचा निळ्या विशाल आकाशाचा मंडप की पायाखालील गूढ निळ्या पाण्याचा अथांग पसारा? कोस्ट रेंजचे (Coast Range) मजबूत पहाड की त्यांच्या माथ्यावरून खळाळणारे नगेट (Nugget) धबधब्याचे शुभ्र-मऊ फेसाळ पाणी? चिलकूट पासच्या (Chilkoot Pass) दुर्गम डोंगररांगा की त्याच्या पोटात दडलेली गोल्डन-स्टेअरकेस (Golden Staircase)? त्या पर्वतरांगांवरून निथळणारा सोनेरी प्रकाश पाहताना तिची खातरीच पटली की, इथली मातीच सोन्याची आहे तर मग इतके सोने सापडले त्यात नवल ते काय.

11825999_10207126214531934_7941286134602737007_n

लाटेचा शेवटचा बुडबुडा फुटेपर्यंत त्याचा आवाज ऐकत तिने तासन्‌तास डेकवर बसून घालवले. समुद्राच्या खार्‍या हवेने तिच्या दिवसाचा स्वादही वाढवला. त्या लाटांच्या संगीताबरोबर महासागराच्या पोटातून मध्येच डोकावणार्‍या महाकाय देवमाशाने आणि डॉल्फिनने तर तिला वेडच लावले. पाण्याच्या फवार्‍याची बाआदब, बामुलाहिजा अशी ललकारी मारून आगमन करणारे हे देखणे-बुद्धिमान प्राणी. त्या लाटांच्या संगीताला साथ होती ती स्टॉर्म पेट्रेल (storm petrel) या चिमुकल्या सी-बर्डच्या जलतरंगाची. पाण्याच्या पृष्ठभागावर उडणारे आणि आपल्या पायाने आणि फडफडणार्‍या पंख्याच्या वार्‍याने समुद्राच्या अनासक्त पाण्यावर नक्षी रेखणारे हे पक्षी. लांबवर ठळक उठत जाणारी आणि पाहता-पाहता त्यांच्यामागे विरत जाणारी नक्षी पाहून तिला आठवल्या खोलवर आठवणीत दडलेल्या य. म. केळकरांच्या ओळी –
तुला वाटते ठसा उठविला आपण त्यावर शाश्वतसा|
परंतु फिरता पाठ तुझी तो, पुनरपि निर्मळ जसा तसा||

12509785_10154030877021842_60784700029108552_n

ऐन उन्हाळ्याचे दिवस असूनही तिला गरम ब्लँकेटचा मोह बाजूला करवत नव्हता. ट्रेसी आर्मच्या फिओर्डमधून (Tracy Arm, a fjord) उमलणारी सकाळ पाहता-पाहता उषासुक्त म्हणत उरलेले आयुष्य इथेच घालवण्यची तिची इच्छा प्रबळ झाली. जसजशी बोट ढगात बुडालेल्या फिओर्डच्या (fjord) आणि निळ्याशार स्फटिकासारख्या हिमनगांच्या विळख्यात जाऊ लागली तसातसा हवेतला गारवा आणखीनच बोचरा होऊ लागला. हात बाहेर काढला तर हाताला स्पर्श होईल असे जवळ आलेले पहाड. हजारो वर्षांपासून साठलेला बर्फ जेव्हा या पहाडावरून घसरतो, तेव्हा तो त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा पहाडावर सोडतो. स्थानिक लोकांचा ‘ग्लेसिअर चॅटर’ (Glacier chatter) हा शब्द तिला फारच आवडला. निसर्गाने जागोजागी पेरलेले हे संकेत वाचताना तिचे मन भरून आले. पाहता-पाहता समुद्राच्या पाण्यावर जाड साय धरल्यासारखे वाटू लागले – आणि असंख्य हिमनग आणि त्यांचे अंश तरंगताना दिसू लागले. डोंगरकड्यावरून फिकट निळा प्रकाश हळूहळू निथळत असावा असे वाटणार्‍या सॉयर हिमनदीने कड्याआडून दर्शन दिले. १०-१५ हजार वर्षांपासून साचत आलेल्या बर्फाचा नगाधिराज पाहतान तिचे मन थरारून गेले. हिमनदीच्या पायथ्याशी तृप्तीचे तरंग उठवत पसरलेला निळा जलाशय. या सार्‍या भव्यतेत गुरफटलेल्या मनात वर्तमानाच्या भानाने खळबळ उडवून दिलीच. आधुनिक जगाच्या स्पर्शाने हिमनदीचे अपरिहार्य वितळणे तिच्या मनाला चटका लावून गेले. त्या अद्भूत सौंदर्याची ओंजळ भरभरून देताना माणासापुढे माघार घेणार्‍या अनेक थकलेल्या हिमनद्यांच्या आठवणींनी तिचे मन झाकोळून गेले. स्थानिक लोकाचे, समुद्राच्या पोटात राहणार्‍या असंख्य जीवांचे आक्रंदन त्या लाटांवरून अथांग पसरत राहिले.

निसर्गाचे ते आगळे-वेगळे व्यक्तित्व बघत ती बसून राहिली. सूर्यास्ताच्या बुडणार्‍या किरणांनी हिमनदीच्या स्फटिकाला सोनेरी झळाळी आणली, पाहता-पाहता सारा आसमंत काळोखात बुडून गेला. तिने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटले आणि चैतन्याची एक लहर एकदम तिच्या आरपार पोचली. तिने डोळे उघडले तर चंद्राच्या प्रकाशाखाली चमकणारी ती पाण्यावरची लखलख – त्या प्रकाशाखाली स्वतःच्या सौंदर्यावर खूश होऊन पहुडलेला समुद्र. पहाडातल्या सुख-दु:खाचा सुक्ष्म गंध तिने भरभरून घेतला. लाटेच्या हिंदकळण्याबरोबर तिने आपली श्वासाची लय गुंफली. आता तिचा आणि समुद्राचा श्वास एकाच लयीत मिसळला. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार्‍या सामन माशाच्या बरोबरीने दिशा आणि गती पकडत आता ती प्रवाहात असूनही स्थिर झाली!

12512818_10154030876441842_8721431505907328142_n

————————————————————————————————————

भाग २ ‘गती’

प्रवासाला निघाल्यापासून समुद्र तसा शांतच होता. निघण्यापूर्वी तिने अगदी सर्व जय्यत तयारी केली होती. बोट फार हालली तरी त्रास होऊ नये याची सारी तजवीज तिने केलीच होती शिवाय बोटीवरचे सगळे क्लब्ज, अ‍ॅक्टिव्हिटिज आणि शोज यांचे वेळापत्रकही तिने अगदी तोंडपाठ केले होते. त्यामुळे बोटीवर आल्या-आल्या तिने डेक-प्लानवर झडपच घातली. कुठे काय आहे याची माहिती करून घेण्यात ती गढून गेली. आता पुढचे ८ दिवस हेच घर. सगळा दिनक्रम इथेच. अलास्काच्या दूरवरच्या प्रांतात ही बोट घेऊन चालली होती. आणि घरच्या सार्‍या चिंता-विवंचना किनार्‍यावरच सोडून तिने बोटीत पदार्पण केले. मनसोक्त गॅम्बलिंग, क्लबिंग, खाणे-पिणे करता येईल, या कल्पनेने तिचे शिळे झालेले मन मोहरून गेले. सारे अगदी पावलाच्या अंतरावर. कुठे कार घेऊन ड्राइव्ह करायला नको की पार्किंग शोधायला नको.

कॅबिनमध्ये जाऊन पटकन सामान टाकून कॅसिनोकडे पळावे या विचाराने ती लगबगीने चालू लागली आणि बोटीच्या हिंदकळ्यामुळे तिला प्रथमच जाणीव झाली की, आपण जमिनीवर नसून पाण्यात आहोत याची. सामान ठेवताना कॅबिनला लागून असलेल्या बाल्कनीतून दिसणार्‍या पर्वतरांगा आणि अथांग समुद्र यांच्याकडे पाहत ती क्षणभर थबकली. केवळ स्वतःचे प्रतिबिंब समुद्रात दिसते म्हणूनच आपण अस्तित्वात आहोत असे त्या पर्वतांना वाटत असेल का, असा अलिप्त विचार तिच्या मनात आला आणि तो येताच सतत दुसर्‍यांच्याच डोळ्यात आपले अस्तित्व शोधणारर्‍या तिच्या मनाने परत स्वतःला दुमडून घेतले. तिने फर्र्कन पडदा बंद केला आणि त्या देखाव्याने मनावर आलेली उदासीही बाजूला केली. क्लबमध्ये जाण्यासाठी छानसा झगमगीत ड्रेस तिने चढवला आणि दुसर्‍या मजल्यावरच्या डेकवरच्या कॅसिनोकडे आपला मोहरा वळवला.

12510397_10154030823631842_6969890293668924584_n

प्रखर दिव्यांच्या झगमगाटात आणि स्वतःच्या श्वासाचाही आवाज दडपून टाकणार्‍या म्युझिकने तो कॅसिनो भरून गेला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि सिगरेटच्या धुराच्या कडवट वासाने तिला एकदम तरतरी आली. भरसमुद्राच्या मध्यावर असलेल्या बोटीतल्या त्या आधुनिक आणि सुसज्ज कॅसिनोने तिचे डोळे दिपून गेले. तिचे भिरभिरणारे डोळे परिचित स्लॉट मशिन्स आणि ब्लॅकजॅकच्या टेबलवर स्थिरावले. ब्लॅकजॅक तिच्या आवडीचा खेळ. शक्य-अशक्यतेच्या सीमारेषेवर जीव टांगून थ्रिलचा अनुभव देणारा पत्त्याचा डाव तिला खुणावू लागला. पर्समधे कोर्‍या-करकरीत नोटांचे पुडके आहे याची खातरी करत ती बस्ट आणि हीट ह्या खेळात केव्हा रमून गेली, तेही तिला कळले नाही. समुद्राच्या पोटातली अस्वस्थता अध्येमध्ये बोट वरखाली करी. तेवढी हालचाल सोडली तर तिला आपण लास्-व्हेगासच्या स्ट्रिपवर आहोत की अलास्काच्या समुद्रात ह्याचाही विसर पडत चालला. पेल्यातल्या फेसाळणार्‍या सोनेरी मादक द्रव्याचा अंमल वाढत चालल्याने ब्लॅकजॅकमध्ये हरल्याची संवेदनाही बोथट होत चालली. पुडक्यातली शेवटची नोट हाताला लागल्यावर ती नाइलाजाने उठली.

पोटात कावळे ओरडत असल्याने तिने रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असावी असा अंदाज बांधला आणि रेस्टॉरन्टकडे वळली. जगभरातल्या विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली पाहून तिची भूक आणि जीभ चांगलीच चाळवली. पानात विविध पदार्थ मनसोक्त वाढून घेऊन ती काचेच्या मोठ्या खिडकीत येऊन विसावली. क्षितिजापर्यंत अस्वस्थपणे पसरलेला समुद्र त्या संध्याकाळच्या धूसर प्रकाशात दिसत होता. कुठेतरी लांबवर मिणमिणता दिवा तिला दिसला आणि तो पाहून आपण किती दूरवर आलो आहोत, या कल्पनेने तिला एकदम दुर्बल आणि एकाकी वाटू लागले.

तिने समोरच्या काचेत दिसणार्‍या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिले. तिच्या मोठ्या डोळ्यांच्या खोल समुद्राच्या तळाशी दु:खाचे देवमासे धिम्या गतीने फिरताना दिसले. प्रशांत महासागरातील देवमाशांप्रमाणे तेही उफाळून वर येतील या भीतीने ती पटकन उठलीच. थंड पाण्याचे सपकारे मारून थोडी ताजीतवानी झाली आणि तिसर्‍या मजल्यावरच्या थर्स्टी टोड क्लबकडे तिची पावले वळली. क्लबमधल्या मंद प्रकाशात लागलेली तहान असफलपणे भागवत बसलेल्या अनेक थर्स्टी जिवांमध्ये तीही सामील झाली. कोणी स्टँडअप कॉमेडिअन चावून चोथा झालेल्या विषयावर तितकेच बेचव जोक करत होता आणि संवेदना हरवलेले काही महाभाग त्याला टाळ्या देऊन प्रतिसाद देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

पेल्यातल्या द्रवाने तिच्या शरीरात उबेची लहर पसरवायला सुरुवात केली. मंद सुरांचा ताल हळूहळू वाढत चालला आणि आता त्याने चांगलीच गती पकडली. कॅप्टनने बोटीचा स्पीड २१ नॉटवरून २४ नॉट झाल्याचे अनाउन्स केले. तीही उठली. पावलांना थिरकवत तिने आपल्या शरीराची गती त्या संगीताच्या गतीबरोबर एक केली आणि स्वत:ला विसरून अथांग समुद्रात ती एकटीच त्या बोटीच्या गतीने वेगात पुढे सरकू लागली.

भौतिक आणि अभौतिक यांच्या अद्भूत जगात दोघींना नेणार्‍या त्या बोटीचे अजस्र धूड समुद्राचे गूढ पाणी कापत पुढे जात राहिले. आणि मागे उठणारे तरंग समुद्र त्याच्या पोटात सामावून घेऊन त्या प्रवासाची नामोनिशाणी मिटवत राहिला.

तुला वाटते ठसा उठविला आपण त्यावर शाश्वतसा |
परंतु फिरता पाठ तुझी तो, पुनरपि निर्मळ जसा तसा ||

३१ जुलै २०१५

शिल्पा केळकर-उपाध्ये

20108434_10213262231608526_8919224471787755494_n

इ – मेल – kelkarshilpa@gmail.com

मूळची सांगलीची. मग सिंगापुर आणि आता अमेरिकेत राहते. भारताबाहेर राहून आता २५ वर्षे झाली. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टन्ट आहे. वाचन-नाटक-कविता-लिखाण याची आवड. इथे अक्षयभाषा ह्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेत बरेच काम करते. इथल्या स्थानिक तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळातही कार्यरत आहे. भारतात असताना कधीच लांबचा प्रवास केला नव्हता. सुट्टीसाठी काही बघायला जायचे हि कन्सेप्ट नव्हती आणि ते परवडणारेही नव्हते. मात्र भारत सोडल्यावर खूप फिरायला मिळाले. हौस म्हणूनतर बरेच फिरणे होते पण कामानिमित्तही बरेच फिरायला मिळते. सर्वसाधारण पर्यटनापेक्षाही त्या देशाला आणि तिथल्या स्थानिक गोष्टींमध्ये जास्त रस वाटतो. त्यामुळे वेगळ्या प्रकारे प्रवास करतो. स्थानिक पदार्थ आणि लोक हे अनुभवण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न असतो.

2 thoughts on “अलास्का – एक अनुभव

  1. अलास्का प्रवासाची विविध वर्णने इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत वाचलेली असल्याने, स्वत: तोच प्रवास केलेला असल्याने व त्याबद्दल लिहिलेले असल्याने – शिल्पाच्या साहित्यिक भाषेत वाचायची इच्छा बळावली होती. सर्वप्रथम घाइघाइने वाचून काढले आणि परत एकदा तोच प्रवास वेगळ्या वाटेने करून आले. ती निळाई परत अनुभवली.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s