इट्स कॉम्प्लिकेटेड!

मुक्ता परांजपे

तू अँदियाँ (इंडियन) बोलतेस? तुम्ही लोक सगळे शाकाहारी असता? का बरं? तू शाहरुख खानला भेटली आहेस? तुमच्या देशात मुलींना का मारतात? भारतात हुकूमशाही आहे? काही प्रश्न विनोदी, काही विचित्र, क्वचित काही राग आणणारे आणि काही ओशाळवाणं, अस्वस्थ, निरुत्तर करणारे. बूर्ग आँ ब्रेस इथल्या माझ्या वास्तव्यात या आणि अशा अनेक प्रश्नांचा माझ्यावर चक्क माराच होत होता. आणि बरोबरच होतं ते… फ्रान्समधल्या या कोण्या कुठल्या गावात एक खरीखुरी, हाडामांसाची भारतीय मुलगी परत कधी येणार होती? मला तरी प्रत्यक्ष इथं येण्याआधी बूर्ग आँ ब्रेसबद्दल कुठं काही माहीत होतं? लियाँपासून एका तासाभरावर, ब्रेस विभागाचं तालुक्याचं शहर, इतपत मोठं हे गाव, खुद्द फ्रान्समध्येही फारसं प्रसिद्ध नसलेलं. त्याचं नावही आपल्या कानावर कधी पडण्याचं कारण नाही. या छोट्या, अनोळखी गावात माझी रवानगी झाली –तीही सात महिन्यांसाठी– ती ‘आसिस्ताना’मुळे. जगभरातल्या फ्रेंच विद्यार्थ्यांसाठी फ्रेंच शिक्षण मंत्रालयानं चालवलेला आसिस्ताना हा उपक्रम. फ्रान्समध्ये राहून फ्रेंच शाळांमध्ये साहाय्यक भाषा शिक्षक म्हणून काम करायचं. एकीकडे फ्रेंच विद्यार्थ्यांना आपली भाषा (म्हणजे भारतीयांसाठी इंग्लिश) शिकवायची, आणि त्याच वेळी फ्रेंच भाषा आणि संस्कृती यांमध्ये अक्षरशः बुडून जाऊन आपलं फ्रेंच सुधारायचं, ही कल्पना.

बूर्गचं कथेड्रल

आत्तापर्यंतच्या अनुभवातून –फ्रेंच शिकताना आणि आधीच्या फ्रान्सभेटींमधून– फ्रान्सबद्दल काही ठरावीक कल्पना मनात पक्क्या बसल्या होत्या. फ्रान्स म्हणजे भव्य, सुंदर पॅरिस; फ्रान्स म्हणजे नीसची डोळे दिपवणारी छानछोकी; फ्रान्स म्हणजे ऐतिहासिक वास्तू, म्युझियम्स, फॅशन आणि अभिजात खाद्यसंस्कृती. अशी रम्य प्रतिमा डोळ्यांसमोर धरून मी निघाले होते. वाटेत एअरपोर्टहून येताना देखण्या लियाँचं झालेलं ओझरतं दर्शनही त्यात बसणारं होतं. रात्रभराच्या प्रवासानंतर, मजल-दरमजल करत, दोन बॅगा –त्यांतली एक भलीमोठी– घेऊन ट्रेनमधून एकदाची बूर्गला उतरले. बूर्गचा पहिला ठसा म्हणजे अत्यंत सामान्य दिसणारं स्टेशन, एका बाजूला काहीतरी दुरुस्ती/बांधकाम चालू असल्याच्या खुणा, फारशी वर्दळ नाही, आणि प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडायला ना एस्कलेटर, ना लिफ्ट – फक्त जिना. माझ्या कल्पनेतल्या देखण्या, गोंडस प्रोव्हिंशियल फ्रेंच टाउनसारखं इथं काहीच दिसत नव्हतं. थोडीशी हिरमुसून, ‘कुठे आलोय आपण?’ अशा काहीशा भावनेनं (आणि धापा टाकत) मी स्टेशनबाहेर पडले, आणि मला घ्यायला आलेल्या मारी-क्रिस्तीनला (माझं ज्या शाळेत पोस्टिंग झालं होतं, तिथली एक इंग्लिश शिक्षिका) गाठलं. आत्तापर्यंत तिच्याशी बोलणं तर नाहीच, फक्त मेलमधून संपर्क, आणि त्यामुळे तसा औपचारिक, कामापुरताच संवाद झाला होता. पण आत्ता प्रत्यक्ष भेटल्यावर तिनं ज्या आपुलकीनं माझं स्वागत केलं, ओळख करून घेतली, त्यामुळे जरा हायसं वाटलं. गाडीत तिच्याशी गप्पा सुरू झाल्या, आपल्याला तिच्याशी न अडखळता सहज बोलण्याइतपत तरी फ्रेंच येतंय, याची खातरी पटली, आणि तिच्या घरी पोचेपर्यंत माझ्या पोटातला गोळा जवळजवळ गायब झाला होता.

मारी-क्रिस्तीन आणि जोसेफ
मारी क्रिस्तीन आणि तिचा नवरा जोसेफ

मी काम करणार होते त्या शाळेतच माझी राहण्याची व्यवस्था असणार होती. पण मी बूर्गला पोचले होते शनिवारी, सुट्टीच्या दिवशी. त्यामुळे तेवढा एक वीकएंड राहायची सोय मारी-क्रिस्तीनने तिच्या घरीच केली होती. जेवून, थोडा आराम वगैरे करून मग संध्याकाळी ती आणि जोसेफ, तिचा नवरा, मला शहरात फेरफटका मारायला घेऊन गेले. आता प्रवासाचा शीण गेला होता आणि माझ्या होस्ट्सच्या आदरातिथ्यामुळे मी सकाळपेक्षा खूपच चांगल्या मूडमध्ये होते. त्यामुळे आत्ता दिसणारं बूर्ग माझ्या पहिल्या ठशापेक्षा खूपच वेगळं वाटत होतं. अर्थातच हे गाव लियाँ किंवा पॅरिससारखं डोळ्यात भरणारं सुंदर नाही; फ्रान्सच्या मानानं तसं साधंच, पण तरी आता त्याचा फ्रेंचपणा उठून दिसत होता. टुमदार, आखीव-रेखीव घरं, रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी प्रसन्न फुललेली झुडपं, कलात्मक लँपपोस्ट्स, कॉबलस्टोन्सचे रस्ते, आणि सिटी सेन्टरचा गजबजलेला मोठा स्क्वेअर. तेव्हा वाटलं, आता जमलं आपल्याला – हेच तर शोधत होते की!  पुढचे सात महिने बूर्गमध्ये फिरताना, लोकांना भेटताना, या गावाचा अलगद फ्रेंचपणा सतत जाणवत राहिला. आणि थोड्या दिवसांनी, बूर्गमध्ये रुळल्यानंतर, जेव्हा कारफूरमधून ग्रोसरी शॉपिंग करून वाटेतल्या बूलाँजरीमधून– बेकरीमधून ताजा-ताजा बागेत (baguette) विकत घ्यायचा आणि परतीच्या वाटेवरच त्यातला अर्धा संपवून टाकायचा, हा रुटीनचा भाग झाला, तेव्हा बूर्गचा तो फ्रेंचपणा थोडासा आपल्यातही मुरू लागलाय, असं वाटायला लागलं!

लिसे एद्गार कीने, म्हणजे एद्गार कीने हायस्कूल ही माझी बूर्गमधली शाळा. मी इथं इंग्लिश भाषेची साहाय्यक होतेच, पण त्याचबरोबर भारतीय साहाय्यकही होते. मी ज्यांना भेटले त्यांपैकी बहुतेक जण याआधी कधीच कुठल्याच भारतीय व्यक्तीला भेटले नव्हते. यात माझे विद्यार्थी तर आलेच, पण बहुतेक सगळे शिक्षक आणि इतर कामांनिमित्त किंवा सहज झालेल्या ओळखीतले लोकही होते. माझी तयारी असो वा नसो, मी भारताची प्रतिनिधी बनले होते. एकदम खूप जबाबदारी आल्यासारखं वाटलं! लोक कुतूहलानं, पण बहुतेकदा अज्ञानातून कितीतरी प्रश्न विचारायचे. एकीकडे भारत म्हणजे काहीरी गूढ, अतार्तिक प्रकरण आहे, अशी प्रतिमा त्यांच्यासमोर असायची – अहिंसा, योगा, हिंदू धर्म आणि जीवनशैली, आयुर्वेद, शाकाहार अशा या गोष्टी म्हणजे भारत; असा एक समज असायचा आणि त्याबद्दल आकर्षण, उत्सुकताही असायची. आणि त्याच वेळी, भारत म्हणजे गरिबी, असमानता, स्त्रियांवरचे अत्याचार, जातिव्यवस्था; हेही त्यांच्या मनात असायचं. याला काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि पाठ्यपुस्तकं जबाबदार असावीत. या दोन्ही माध्यमांमधून भारताबद्दल बर्‍यापैकी एकतर्फी, ढोबळ चित्रं रंगवलं जातं; त्यातले कंगोरे, त्यातल्या ‘शेड्स ऑफ ग्रे’ मांडल्या जातातच असं नाही. त्यामुळे भारत म्हणजे हे सगळं आणि या सगळ्यांच्या पलीकडंही बरंच काही आहे, हे जमेल तसं, जमेल तेव्हा सांगायचा, दाखवायचा, समजावायचा प्रयत्न मी करत होते. कुठल्याही प्रश्नावरचं माझं उत्तर, बहुतेकदा ‘C’est compliqué’… इट्स काँप्लिकेटेड, या वाक्यानंच सुरू व्हायचं. त्यात माझ्या स्वतःच्या प्रिव्हिलेज्ड बॅकग्राउंडचं भान ठेवून, माझे अनुभव प्रातिनिधिक नाहीत, असा डिस्क्लेमर जोडून, शक्य तितक्या प्रामाणिकपणे कठीण प्रश्नांची उत्तरं देणं, अशी कसरत करायला शिकत होते. नाहीतर ‘भारतात मुलींना का मारतात?’ यासारख्या प्रश्नावर बोलणार तरी काय?

दिवाळी स्पेशल
माझ्या साहाय्यक शिक्षिकांबरोबर दिवाळी

मला भेटले, त्या सर्वांना भारताबद्दल जे माहीत नाही, ते जाणून घ्यायची खरीखुरी इच्छा मात्र होती. मी भारतातून आले आहे, हे कळल्यावर भूगोलाचे एक शिक्षक एकदम खूश झाले. वेळ काढून, आवर्जून त्यांनी मला त्यांच्या वर्गात बोलावलं. मुलांनी आधी थोडी तयारी केली होती. भरपूर गप्पा झाल्या. मुलं विचार करून, अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत होती. अगदी भौगोलिक रचनेपासून अर्थव्यवस्था, राजकारण, आणि सामाजिक प्रश्नांपर्यंत सगळ्या विषयांवर चर्चा झाली. दोन तासांवर मी अखंड बोलत होते; जेवायची वेळ झाली, तेव्हा कसेबसे प्रश्न थांबले. त्या दिवशी मला खरंच काहीतरी चांगली कामगिरी केल्याची भावना होती. मुलांचा उत्साह, उत्सुकता, भारताबद्दलचा एवढा रस बघून छान वाटलंच, शिवाय एका छोट्याशाच गटाचं आणि माझ्या  परीनंच का होईना, पण शंकानिरसन केलं, थोडेफार गैरसमज दूर केले, याचंही समाधान होतं.

फ्रान्समध्ये शिक्षक म्हणून राहण्याचे दोन फायदे. एक तर, शाळेतली नोकरी असल्यामुळे सुट्ट्या भरपूर –माझ्या सात महिन्यांच्या वास्तव्यात मला एकूण दीड महिना सुट्टी होती! आणि दुसरं म्हणजे फ्रान्स शेंगेन देशांमध्ये येत असल्यामुळे फ्रेंच व्हिजावर जवळजवळ अख्ख्या युरोपमध्ये फिरणं शक्य होत. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा घेत, माझ्या दीड महिन्यांच्या सुट्टीमध्ये मी मनसोक्त भटकले. एका वेळी दोन आठवड्यांची सुट्टी असायची. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी किंवा फार-फार तर शनिवारी सकाळी निघायचं, ते थेट सुट्टी संपायच्या आधीच्या वीकएंडला परत यायचं, असा माझा कार्यक्रम असायचा. मी तेव्हा एकटीनं भटकायला शिकले. एक बॅकपॅक खांद्यावर अडकवून, कमीतकमी खर्चातली होस्टेल्स आणि विमान तिकिटं शोधून नवीन शहरात जाऊन थडकायचं. सगळ्यांत आधी जवळचं टूरिस्ट ऑफिस शोधून एक सिटी मॅप मिळवायचा (गूगल मॅप्स असतातच, पण हातात मोठ्ठा नकाशा उलगडून, त्यावर आपली जागा स्पॉट करून, मग आजूबाजूचे रस्ते बघत-बघत हवं ते ठिकाण शोधून काढायचं, हे माझं आवडतं काम.) आणि पायाचे तुकडे पडेपर्यंत फीर-फीर फिरून जमेल तेवढं डोळ्यात (आणि कॅमेर्‍यात) साठवून घ्यायचं. त्यात वॉकिंग टूर्स नावाची एक खूप मस्त पॉकेट-फ्रेंडली संकल्प्ना मला कळली. गाईडबरोबर पायी फिरत शहरातल्या प्रसिद्ध, प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती करून घ्यायची. पूर्णपणे विनाशुल्क. टूर आवडली, मजा आली, तर गाईडला शेवटी टीप द्यायची. नाही दिली, तरी काही हरकत नाही. शिवाय टूरमध्ये सांगितलेल्या माहितीवरून आपल्याला जास्त रस कशात वाटेल, कुठल्या ठिकाणी आत जायचं आहे किंवा परत चक्कर मारायची आहे, तेही ठरवता येतं. रोम, बार्सेलोना, प्राग, फ्लॉरेन्स – फिरले त्या बहुतेक शहरांमधे मी न चुकता वॉकिंग टूर्स घेत होते. संध्याकाळपर्यंत फिरून-फिरून स्टॅमिना संपत आला की जरा बरंसं दिसणारं रेस्टॉरन्ट शोधून स्थानिक जेवणाचा आनंद घ्यायचा, वाटलं तर कधी जलातो खायचा आणि होस्टेलवर परतून दुसर्‍या दिवसासाठी रीचार्ज व्हायचं, अशी अखंड भटकंती.

आसिस्तानामुळे फ्रेंच भाषेची आणि संस्कृतीची जवळून ओळख होतच होती, पण त्याहीपलीकडे, एका बहुसांस्कृतिक वातावरणात राहायचीही संधी मिळाली. मी लिसे एद्गर किनेमध्ये राहत होते, ती वेगवेगळ्या देशांच्या आणि वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या इतर सहा साहाय्यकांबरोबर. जर्मन, इटालियन, स्पॅनिश, रशियन, कोलंबियन आणि अमेरिकन. प्रत्येकीची स्वतंत्र खोली होती आणि स्वयंपाकघर सगळ्यांना मिळून एक. त्यामुळे बहुतेकदा रात्री एकत्र जेवायचो, उशिरापर्यंत गप्पा चालायच्या. अगदी युरोपियन युनियनच्या राजकारणापासून ते गोळ्या-चॉकलेट्सना इंग्लिशमध्ये स्वीट्स म्हणायचं का कँडी इथपर्यंत वाट्टेल त्या विषयांवर. एकत्र वाढदिवस साजरे करायचो, प्रत्येकाच्या देशाचे सणवार साजरे करायचो– दिवाळी, थँक्सगिव्हिंग, एपिफेनी आणि ख्रिसमस तर झालाच. एकदा खास लोकाग्रहास्तव मी चिकन बिर्याणीही करून खिलवली होती आणि एकदा चक्क बटाटेवडे! बूर्गमध्ये आणि परिसरात एकत्र भटकायला जायचो, वीकएंडला संध्याकाळी पबमध्ये वगैरे जायचो. काही नाही, तर स्वयंपाकघरात एकत्र बसून कितीतरी वेळ बोर्ड गेम्स खेळायचो. बोर्ड गेम्स हे फक्त लहान मुलांसाठी नसतात, स्क्रॅबल, मोनॉपोली, आणि पत्ते यांच्या पलीकडेही, मोठ्यांना खेळण्यासाठी गेम्स असतात आणि मोठी माणसं ते भरपूर खेळतात, हा मला तिथं लागलेला शोध होता. सेटलर्स ऑफ कतान, बँग, कार्कासोन आणि असे कितीतरी. आपल्याकडे हे अजून  फारसं दिसत नाही. कुठंतरी एखाद्या कॅफेमध्ये कोपर्‍यात काही जण खेळताना दिसतात कधीतरी, पण ते क्वचितच. एकूणच ग्रुपनं करायच्या ॲक्टिव्हिटीज – घरात बसून असो किंवा बाहेर जाऊन, म्हणझे हायकिंग, सायकलिंग, फुलं-ॲस्पॅरॅगस-मश्रूम-सफरचंद खुडायला जाणं, स्किइंग, कँपिंग वगैरे, हे आपल्याइथे कमीच असतं. बूर्गमध्ये संधी मिळाली तेवढं सगळं करून घेतलं. शाळेतल्या शिक्षकांबरोबर स्की सहलीला जाऊन बर्फावर अनेक वेळा नुसती घसरून आले. एक सहकारी, दोमिनिक आणि तिच्या दोन मुलींबरोबर म्युगे म्हणजे मेफ्लॉवर्स गोळा केली, गावाजवळच्या एका पार्कमधे छोट्याशा हाइकवर गेले.

मेअरी
मेअरी

फक्त मोठी शहरं, गजबजाट, वर्दळ यांची सवय असलेल्या मला बूर्ग आँ ब्रेस यासारख्या गावात रुळणं कठीण जायला हवं होतं कदाचित. पण पहिल्या दिवसापासून, मारी-क्रिस्तीनपासून सतत आपली वाटणारी माणसं भेटत गेली, त्यामुळे एकटं वगैरे वाटायची संधीच मिळाली नाही. साहाय्यकांच्या संघामधल्या काही जणी –जर्मनीची एलिना, इटालियन मिकेला आणि स्पेनची अमाया– तर कायमच्या घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत, बूर्गनंतर आम्ही परत भेटलोय, परत-परत भेटत राहूही. बूर्गमध्ये मात्र परत जायची वेळ येईल असं काही वाटत नाही. मुळात बूर्गची ओळख झाली तीच योगायोगानं – तसाच योगायोग परत यायची शक्यता जवळजवळ नाहीच. परतीच्या प्रवासाला निघाले, शेवटचा निरोप घेतला; तेव्हा ही हुरहुर लागली होती. पण एवढी मात्र खातरी होती की, जर कधी जगाच्या या कोपर्‍यात परत जायची वेळ आलीच, तर इथं आपली माणसं आहेत.

मुक्ता परांजपे

प्रोफाइल फोटो

इ-मेल – mukta.paranjape1@gmail.com

हैदराबादच्या इंग्लिश आणि फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीतून एम. ए. फ्रेंच केलं आणि त्यानंतर आसिस्तानामधून फ्रान्सला गेले. २०१६ मध्ये इंग्लंडच्या डर्‍हम युनिव्हर्सिटीमधून टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंगमध्ये एम.ए. केलं. गेलं जवळजवळ वर्षभर इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून काम करते आहे. फ्रेंच भाषा, भटकंती, फोटोग्राफी, खाणं आणि खायला करून घालणं (त्यातही बेकिंग जास्त), हे काही आवडीचे विषय.

5 thoughts on “इट्स कॉम्प्लिकेटेड!

  1. सुंदर चित्रदर्शी वर्णन …वाचकालाही त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाणारं …ऩेटदिवाळी अंक हा एक स्तुत्य उपक्रम…Halpy Diwali…!

    Like

  2. सुंदर चित्रदर्शी वर्णन …वाचकालाही त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाणारं …ऩेटदिवाळी अंक हा एक स्तुत्य उपक्रम…Happy Diwali…!

    Like

  3. Khup chhan lihilay ga .good Writer .maja aali .amhi pan phiratoye ase watatey . Wah ! Wah ! Awesome

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s