मी एक जिप्सी

अंजली कलभंडे

मी आणि माझ्या सुदैवानं माझा नवराही जग पाहण्याची (पाहण्याची म्हणजे नुसतंच पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची) हौस असणारे आहोत. आमच्या परदेशी राहण्यामागची हीच प्रमुख प्रेरणा आहे, नवनवीन प्रदेश अनुभवून पाहायचे. ‘एक जिप्सी आहे माझ्या मनात दडून’ असं काहीतरी.

जेव्हा ह्या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हाही भारत सोडून कुठंतरी स्थलांतरित व्हायचं हा हेतू नव्हता. आजही नाही. प्रेरणा फक्त मनातल्या जिप्सीनं दिलेल्या हाकेला प्रतिसाद द्यावा हीच होती. संधी दिसताक्षणी असं वाटलं की हा नांगर उचलावा आणि सोडून द्यावं स्वत:ला ह्या समुद्रावर…

कुठं पोचायचं आहे त्याची दिशा ठरलेली नाही, फक्त सुरुवात करू या एवढंच मनात होतं.  कुठंतरी पोचण्यासाठीचा हा प्रवास नाहीच. मुळात प्रवासावरच प्रेम आहे आणि हा प्रवास फक्त प्रवासासाठीच आहे. हे आमचं जहाज शेवटी भारताच्याच किनाऱ्यावर नांगर टाकणार आहे, ही खूणगाठही मनाशी पक्की आहे.

ह्या प्रवासाची सुरुवात लक्झेम्बर्गपासून झाली. (ह्या देशाचा उच्चार फ्रेंचांच्या तोंडून ऐकावा!). पश्चिम युरोपच्या केंद्रस्थानी असलेला हा चिमुकला देश, तिथल्या चार वर्षांच्या वास्तव्यात खुद्द लक्झेम्बर्गबरोबरच बेल्जीयम, नेदर्लन्ड्‌स, फ्रान्स आणि जर्मनीही जवळून अनुभवायला मिळालं.

त्यानंतर जेव्हा पोलंड/चेक रिपब्लिकमध्ये येण्याची संधी मिळाली, तेव्हा ती आम्ही क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारली.

परत एकदा एक नवीन भूप्रदेश, एक नवीन संस्कृती!

पोलंड!!

परदेशस्थ लोकांसाठी फारसा सवयीचा नसलेला, जगातल्या शिकायला अवघड भाषांपैकी एक भाषा असलेला, पूर्व युरोपमधला, कम्युनिस्ट ब्लॉकमधून मोकळा झाल्यानंतर विकासाच्या दिशेनं दमदार पावलं टाकणारा, भारतीयांच्या संदर्भात फारसा अंगवळणी न पडलेला देश. लक्झेम्बर्गमध्ये काही वर्षं घालवल्यानंतर पोलंडमधल्या राहणीमानाशी कसं जमवून घेता येईल? अशीही शंका मनात येत होती.

माझे बेल्जियन सहकारी तर, ‘ही कसं काय असं धाडस करू शकते!’ म्हणून माझ्याकडे आश्चर्यानं पाहत होते. माझ्या फ्रेंच बॉसनं तीनतीनदा बजावून सांगितलं, ‘घर भाड्यानं घेताना हिटिंग तपासून घे, पोलंडमध्ये जाते आहेस.’ एका बेल्जियन सहकाऱ्याची बायको पोलिश आहे. त्यालादेखील पोलंडला जाण्याविषयी विचारलं होतं, पण त्याच्या बायकोनंच ठाम नकार दिला. पश्चिम युरोपमध्ये एकूणच सुबत्ता असल्यामुळे, त्या देशांची सरकारं आपापल्या नागरिकांची चांगली काळजी घेतात, त्या तुलनेत पोलिश सरकारला तेवढी काळजी घेणं जमत नाही. पेन्शन्स अपुऱ्या असतात, वगैरे अनेक कारणांमुळे एकदा पोलंड सोडलेल्या पोलिश लोकांना परत पोलंडमध्ये यायचं नसतं.

आम्ही आमचं सगळं सामान ट्रकवर लादून लक्झेम्बर्गमधून निघून मधला अख्खा जर्मनी ओलांडून पोलंडमध्ये पोचलो.

Wroclaw (व्रोत्सवॉव)  हे जर्मन सीमेकडून पोलंडमध्ये येताना लागणारं पहिलं शहर. देखणं. तिथपासून क्रॅकोपर्यंत हायवे. रस्त्याच्या दर्जात कुठंही कमतरता नाही. रस्त्यावर विपुल प्रमाणात धावणाऱ्या, प्रामुख्यानं जर्मन आणि फ्रेंच बनावटीच्या गाड्या. सुंदर, देखणी घरं.  झोपडपट्टी वगैरे नाहीच. पश्चिम युरोपच्या तुलनेत एखाद-दुसरा खालचा सूर, पण बेसूर नाही, असं काहीसं पहिलं इम्प्रेशन.

आज ह्याला पाच वर्षं झाली, त्यानंतर आजपर्यंत घडलेले बदल आमच्याही लक्षात येतात. सुरुवातीच्या काळात, ट्राम स्टेशनवर एखाद-दुसरा खंगलेला म्हातारा, तिथल्या कचऱ्याच्या टोपलीत काहीतरी शोधताना दिसायचा. अचानक समोर येऊन काही निमित्तानं मदत मागणाऱ्यांची संख्या जास्त होती. सुपरमार्केट्सच्या बाहेर सामानाची ट्रॉली जागेवर ठेवून दोन-पाच झ्लोटीचं नाणं मिळवण्याचा उद्योग करणारेदेखील बरेच दिसायचे. आता प्रमाण कमी दिसतं.

कम्युनिझमच्या काळात ज्यांची कारकीर्द सुरू होऊन संपली त्यांची ह्या स्थित्यंतरामुळे (नियोजित अर्थव्यवस्था ते मुक्त अर्थव्यवस्था) पंचाईत झाली आहे. कम्युनिझमच्या काळात पगार पुरेसे नसायचे, म्हणून बचतीचं प्रमाण कमी. कमीत कमी वस्तूंमध्ये भागवण्याची सवय. अचानक आलेल्या मुक्त बाजारपेठेतल्या असंख्य वस्तूंची रेलचेल असणाऱ्या वातावरणाला ते सरावलेले नाहीत. किमतीही बऱ्याच वाढलेल्या. त्यामुळे निवृत्तीनंतरही काम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आढळतो.

Vistula _PC Ravi
विस्वा नदीच्या काठी – फोटो – रवी जोशी

आम्ही राहतो ते क्रॅको शहर एके काळी पोलंडची राजधानी होतं. विस्तीर्ण, देखणं, पोलंडच्या सांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगणारं, युद्धातल्या बॉम्ब हल्ल्यांची फारशी झळ न पोचलेलं, विस्तूला (उच्चारी विस्वा) नदीच्या काठी वसलेलं, क्रॅको आता स्वत:चं शहर वाटावं इतकं जवळचं झालं आहे. सहाशे पन्नास वर्षं जुनं यागोलोनियन विद्यापीठ ह्याच शहरात आहे. विद्यार्थ्यांचं शहर म्हणूनही ह्या शहराची ओळख आहे. पण त्याचबरोबर छोटे रस्ते, अरुंद गल्ल्या आणि शहराची वाहतूक पेलण्याच्या क्षमतेच्या काही पटीत वाढत गेलेली रहदारी. पश्चिम युरोपच्या तुलनेत (जर्मनी वगळता) इथलं ड्रायव्हिंगही बऱ्यापैकी बेधडक.

क्रॅकोमध्ये ऑफिसच्या वेळांना प्रत्येक सिग्नलला गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसतात. लोक शांतपणे आपल्याला सिग्नल मिळण्याची वाट पाहतात. पण वाहतुकीचे नियम मोडून ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशी घाई नाही. पोलिश माणूस वेळेवर पोचण्यासाठी अर्धा तास आधी निघेल. ह्या वाहतूक कोंडीचा त्रास वाचावा म्हणून सकाळी सहा ते दोन काम करणाऱ्या बायका माझ्या ऑफिसमध्ये आहेत. मी सकाळी सहा वाजता ऑफिसला पोचण्याचं मनातही आणू शकत नाही आणि दुपारी दोन वाजता तर अर्धाच दिवस झाल्यासारखं वाटतं.

an old car in krakow

ह्या लोकांनी एकूणच ‘लवकर निजे लवकर उठे’ हा उपदेश फार मनावर घेतलेला आहे.

‘पोलीश वेळा’ हे काही मला झेपण्यातलं प्रकरण नाही. त्या बाबतीत माझी नाळ इटालियनांशी जुळते.

एकदा मी आमच्या टीमला घरी जेवायला बोलावलं होतं. मी माझ्या परीनं रात्रीच्या जेवणाची वेळ शक्य तितक्या अलीकडे आणत सात ठेवली होती, तर माझा एक सहकारी मला म्हणतो, ‘मी संध्याकाळी सहानंतर काही खात नाही.’ मी हताश होऊन म्हणाले, ‘बाबारे, घरून जेवून ये, संध्याकाळी सहाच्या आत जेवले तर रात्री झोपताना मला परत निदान वरण-भाताचा कुकर तरी लावावाच लागेल.’

पोलंडमध्ये इंग्लिश भाषा येणं अनिवार्य नाहीच. साधारणत: तिशीच्या आत असणारे पोलीश लोक बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात, पण आधीचे नाही. डॉक्टर्सदेखील सफाईदार इंग्लिश बोलू शकत नाहीत. (धर्मप्रसार करत हिंडणाऱ्या जेहोवाज्/येहोवाज् विटनेसच्या प्रसारकांना मात्र अगदी छान इंग्लिश येतं!)

Old Krakow_PC Ravi
जुनं पोलंड – फोटो – रवी जोशी

मला कौतुक वाटतं ते  हे सगळं जागतिक ज्ञान आपापल्या भाषेत आणणाऱ्या युरोपिय देशांचं. एके काळी पोलिश लोकांसाठी रशियन शिकणं अनिवार्य होतं, वयाची साठी ओलांडलेल्या जवळजवळ सर्वांनाच रशियन येतं. एक थोडा ज्येष्ठ पोलिश, याविषयी बोलताना म्हणाला, ‘रशियन लोकांनी आम्हांला त्यांची भाषा शिकायला लावली खरी. पण त्यांना त्यातला धोका कळलाच नाही. जोपर्यंत आम्ही सगळे देश, जे रशियाच्या वर्चस्वाखाली होतो, आपापली भाषा बोलत होतो; तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण जेव्हा आम्हांला बोलायला एक समान भाषा मिळाली, तेव्हा असंतोषाला वाचा फुटली.’

पण पोलिश लोक ज्ञान मिळवण्यासाठी रशियन भाषेवर अवलंबून राहिले नाहीत. उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व ज्ञानशाखांची पुस्तकं पोलिशमध्ये उपलब्ध आहेत. संगणकासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रणाली पोलिश भाषेत आहेत. सरकारी, खासगी क्षेत्रांत सर्वत्र कामकाजाची भाषाही पोलिशच आहे. थोडक्यात पोलिश भाषा एवढी समृद्ध आहे की, ह्या लोकांना दुसरी कोणतीही भाषा शिकण्याची गरज नाही. पोलिश भाषाही प्रांताप्रमाणे बदलते, आणि काही प्रांतांमध्ये ती इतकी वेगळी असते की, दोन प्रांतांतल्या लोकांना एकमेकांची भाषा समजत नाही. ह्यावर तोडगा म्हणून पोलंडनं प्रमाण भाषा मान्य केली असावी.

मला पोलिश येत नाही. ती शिकण्यासाठी कष्ट घेण्याचा मला आळस आहे. आम्ही भाषा न शिकताच कामं धकवून नेतो. दुकानांमध्ये, रेल्वे-बसमध्ये माझी आणि पोलिश माणसांची भाषेशी चालणारी झटापट पाहून कोणीतरी मदतीला धावून येतं. पोलिश लोकांच्या सौजन्याची हद्द म्हणजे एकदा एका भिकाऱ्याचं सगळं बोलणं बाजूनं जाणाऱ्या माणसानं आम्हांला इंग्लिमध्ये समजावून सांगितलं होतं!

IMG_0473
वोडकासाठी भीक मागणारे!

आमची कंपनी तथाकथित मल्टिनॅशनल वगैरे असली, तरी मी एकटीच पोलिश येत नसलेली आहे. त्यामुळे माझी दखल घेऊन इंग्लिशमध्ये सुरू झालेली मीटिंग अचानक पोलिशमध्ये सुरू होते आणि मग पंधरा-वीस मिनिटांची चर्चा कोणीतरी पाच-सहा वाक्यांत इंग्लिशमध्ये सांगून मिटिंग आटोपती घेतात. अर्थात सगळेच पोलिश असताना पूर्ण मिटिंगभर इंग्रजी बोलत राहण्यातली गैरसोय मी नाकारत नाही.

पण हेही खरंच की; भाषा येत नसेल, तर सगळाच देश एखाद्या काचेआडून पाहावा तसा दिसतो.

Krakow from my office
माझ्या ऑफिसमधून दिसणारं क्रॅको

आता दिवस बदलताहेत. सध्याचे पालक आपल्या मुलांना इंग्लिश बोलता यावं यासाठी प्रयत्न करताना दिसतात. इंग्लिश शिकवणी घेणाऱ्या वर्गांच्या जाहिराती जागोजागी दिसतात, तेवढ्या इतर भाषांच्या दिसत नाहीत.

जसं माझं पोलिश भाषेशी जमलं नाही, पोलिश वेळांशी जमत नाही तसंच अजून एका गोष्टीशी जमत नाही, ते म्हणजे पोलिश जेवण. फारच बेचव जेवतात हे लोक. एकतर थंड हवामानाचा प्रदेश असल्यामुळे भारतासारखं भाज्या-फळांचं वैविध्य सर्व ऋतूंत नाही. (पोलिश लोकांना त्यांच्या सफरचंदांचा फारच अभिमान!) अन्नपदार्थांत मांसाहारी प्रकार भरपूर. त्यामुळेही माझे पर्याय खूप मर्यादित होतात. सॅलेड्सचे पोलिश प्रकार म्हणजे व्हिनिगरमध्ये बुडवून ठेवलेला पांढरा कोबी, नाहीतर किसलेलं गाजर. बाकी विशिष्ट पद्धतीनं बनवून सुकवलेले सॉसेजेस, आणि पिकल्ड काकड्या. सर्वसाधारण जेवण म्हणजे मॅश्ड पोटॅटोच्या दोन मुदी किंवा उकडलेल्या अथवा तेलावर परतलेल्या भाज्या, कोणतातरी एक मोठा मांसाचा तुकडा, त्यावर एखादा सॉस आणि सॅलड्स.

Food_6

पोलिश लोक वेगवेगळी सुप्स फार आवडीनं बनवतात आणि खातात. सूप जरा दाटसर असतं, त्यामध्ये उकडलेली अंडी, मांसाचे तुकडे, भाज्या घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे बऱ्याचदा एक पूर्ण जेवण सुपावर भागवता येतं. मला अगदी मनापासून आवडलं ते खास पोलिश, मश्रूम सूप, विशिष्ट ब्रेडच्याच बाऊलमध्ये सर्व्ह केलेलं. अजून एक पदार्थ आवडी-नावडीच्या कुंपणावर बसलेला म्हणजे पिरोगी. चीज-बटाटा, परतलेला कांदा-मश्रूम, पालक-चीज, किंवा स्ट्रॉबेरी असे शाकाहारी प्रकार. गरम-गरम वाफाळलेल्या पिरोगीवर ऑलिव्ह ऑईल घालून चांगली लागते. पण हा पदार्थ सुगरण हातांनी बनवलेला असला पाहिजे, तर त्यात मजा येते.

क्रॅकोमध्येही आता बहुतेक सर्व अन्यदेशीय पदार्थ मिळतात. इटालियन पिझ्झा-पास्ता तर आता त्या-त्या देशांचं स्थानिक खाद्य वाटावं इतकं सहज मिळतं. स्पॅनिश, मेक्सिकन, हंगेरियन आणि भारतीय रेस्टॉरन्टसही क्रॅकोमध्ये आहेत. जपानी ‘सुशी’ खूपच लोकप्रिय आहे. बाकी अमेरिकन फास्टफूड चेन्स आहेतच. पण एकुणातच मूळ पोलिश पदार्थांच्या चवीचा आनंदच आहे. आम्ही आमच्या जिभेच्या चोचल्यांसाठी घरातल्या स्वयंपाकघरावरच अवलंबून आहोत.

भारताप्रमाणेच उद्योगांच्या जागतिकीकरणाचा आणि बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचा मोठा फायदा पोलंडला झाला. भारताकडे सफाईदार इंग्लिश बोलू शकणारं मनुष्यबळ आहे. त्या तुलनेत पोलंडकडे कमी आहे, परंतु पोलंडकडे अन्य युरोपीय भाषा (फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन) बोलू शकणारं मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पश्चिम युरोपच्या तुलनेत पोलिश वेतन कमी आहे. त्यामुळे युरोपात पोलंड हे आउटसोर्सिंग इंडस्ट्रीमध्ये अग्रगण्य आहे.

पोलिश मनुष्य जात्याच शिस्तप्रिय आणि कष्टाळू. ह्या आउटसोर्सिंग इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात पोलिश गुणवत्ता हा हेटाळणीचा विषय होता, (हेटाळणी करणाऱ्यांमध्ये जर्मनांचं, तेही पूर्व जर्मनांचं प्रमाण अधिक, असा माझा वैयक्तिक अनुभव.) पण कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे कमी होणारे आकडे पाहून आता बहुतेक उद्योगांनी पोलंडमधून काम करवून घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

wawel castle_PC Ravi
Wawel castle – फोटो – रवी जोशी

पोलिश लोकांना कोणतंही काम साच्यात बसवून टाकायला फार आवडतं. सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये काम करताना येणारा अनुभव पोलंडमध्येही येतोच. पोलिश माणूस आखून दिलेल्या शिस्तीत काम करणार, तसूभरही बदल करणार नाही; पण थोडं वेगळं काही घडलं, तर त्याच्यातून मार्ग काढताना गडबडून जाणार. भारतीयांमध्ये सर्रास आढळणारी बेशिस्त आणि त्यातून उद्भवणाऱ्या हातघाईच्या परिस्थितीत युद्धपातळीवर काम करण्याची भारतीयांची हातोटी, पोलिश लोकांकडे फारशी नाही. किंबहुना त्यांना अशा परिस्थितीचा तिटकाराच जास्त आहे. नियमांवर बोट ठेवण्यात पोलिश लोकांचा हात कोणी धरणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्येदेखील त्यांना नियम मोडायचे नसतात.

ऑफिसमध्ये गप्पा मारत रमले आहेत किंवा रस्त्यावर गप्पा मारत मित्रांचा घोळका उभा आहे;  असं दृश्य मला फारसं दिसलं नाही. मित्रांना भेटायचं असेल तरीही वेळ ठरवून एखाद्या नियोजित ठिकाणी भेटणार. अपवाद फक्त रेनेकचा (क्रॅकोचं सिटी सेन्टर). शुक्रवारच्या आणि शनिवारच्या रात्री रेनेकमधले रस्ते उत्साहानं ओसंडून वाहत असतात. रविवारची रात्र परत एकदा शांत असते. प्रत्येकालाच ठरावीक चाकोरीतलं, नियमबद्ध, शिस्तबद्ध आणि घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य जगायला आवडतं.

ह्या जागतिकीकरणाच्या रेट्यात, एक गोष्ट मात्र घडली. बाजारात जशी मागणी असेल, तशाच स्वरूपाचं शिक्षण मिळवण्याकडे कल वाढला. मुक्त अर्थव्यवस्थेचं, उपभोगवादाचं हे अपत्य आहे. त्यांच्या मते, कम्युनिझममध्ये प्रत्येकाला त्याच्या आवडीचं शिक्षण घेण्याची मुभा होती, कारण त्यांच्या औपचारिक शिक्षणाच्या आधारावरच चरितार्थ चालवण्याची सक्ती नव्हती,  चरितार्थासाठी कोणतं ना कोणतं काम मिळायचंच.

तरुण मुलामुलींना कम्युनिझमचा अनुभव नाही. पण ज्यांनी दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्था पहिल्या आहेत, त्यांतले बरेच कम्युनिझमची तरफदारी करणारे आढळतात. अनेक कुटुंबांमधून आई-वडील दोघंही काम करायचे, पण आत्तासारखी वैयक्तिक आयुष्यावर आक्रमण करणारी व्यावसायिक स्पर्धा नव्हती. एक मैत्रीण सांगते, ‘माझ्या लहानपणी, मला आठवतंय, आमचे आईवडील आम्हांला घेऊन आमच्या नातेवाइकांकडे जायचे, त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे जायचे. त्यात एक मजा असायची. आमच्या मुलांना ती मजा फक्त मोठ्या सुट्ट्यांच्या काळातच मिळू शकते. कारण एरवी घरी जाऊनही ऑफिसचं काम संपवावं लागतं.’

माझ्या कंपनीची डायरेक्टर एकदा सांगत होती, ‘लहानपणी माझ्याकडे खूप कमी खेळणी होती, कारण मुळात बाजारात फारशी खेळणी मिळायचीच नाहीत, नुसते पैसे असून उपयोग नव्हता. आज माझ्या मुलांची कपाटं खेळण्यांनी भरून गेलेली आहेत, पण खरंच एवढ्या खेळण्यांची त्यांना गरज नाहीये. तरुणपणी मला ज्या वस्तूंचं अप्रूप वाटायचं त्या सर्वच वस्तू माझ्याकडे आता आहेत, पण त्या वापरण्याइतका वेळ मला मिळत नाही आणि कदाचित त्यांची गरजही नाही. फक्त त्या वस्तू आपल्या मालकीच्या असण्याचं समाधान आहे.’

Mahatma Gandhi Road_PV Ravi
महात्मा गांधींच्या नावाचा रस्ता -फोटो – रवी जोशी

‘कम्युनिझमविषयी तुम्हांला काय वाटतं?’ असा सर्वसाधारण प्रश्न विचारला तर त्या काळी बाजारपेठेमध्ये असणारा चैनीच्या वस्तूंचा अभाव आणि गरजेच्या वस्तूंचा तुटवडा ही प्रमुख तक्रार असते. ‘ब्रेड, टॉयलेट पेपर, अशांसारख्या अगदी प्राथमिक गरजांसाठीदेखील तासन्‌तास रांगेत उभं राहायला लागायचं. एखाद्या दिवशी जवळच्या किराणामालाच्या दुकानात केळी येणार असं कळलं की पहाटेपासून रांगा लागायच्या. अगदी किमान गरजेच्या वस्तूदेखील कुटुंबातल्या माणसागणिक मिळायच्या आणि त्यादेखील अत्यंत तुटपुंज्या.’ अशा स्वरूपाच्या तक्रारी ऐकायला येतात.

ह्या तक्रारींचं मूल्यमापन करताना तुम्ही प्रमाण काय मानता, भारत का पाश्चात्त्य जग,  ह्यांवर पोलंडकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोण ठरतो. कम्युनिझम म्हणजे अगदी काळाकुट्ट इतिहास, हे बाहेरच्या जगात असलेलं सर्वसाधारण चित्र पोलंडच्या बाबतीत फारसं खरं नसावं.  आज पोलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा (रस्ते, विद्युतपुरवठा, शिक्षण, आरोग्य, आदी) दिसतात, पण हा सर्व विकास फक्त मुक्त अर्थव्यवस्थेनं दिला नाहीये. ह्यांतल्या बऱ्याचश्या सुविधा आधीपासून होत्याच.

हॉस्पिटल्समध्ये आज जशा रांगा आहेत, तशाच तेव्हाही होत्या. निधीचा तुटवडा आजही तसाच आहे. पायाभूत सुविधांची गुणवत्ता आजच्याइतकीच चांगली अथवा वाईट होती. फरक पडला तर तो असा की, फी भरून जास्त सोयीसुविधा देणाऱ्या खासगी शाळा आल्या, खासगी  हॉस्पिटल्स आली. पण डॉक्टर्सच्या गुणवत्तेविषयी बोलताना अजूनही सरकारी हॉस्पिटल्सचाच उल्लेख होतो.

पोलिश कम्युनिझममुळे नागरिकांच्या धार्मिक निष्ठांना धक्का लागला नाही. क्रॅकोमध्ये, कम्युनिझमच्या काळात सरकारी विरोधाला न जुमानता लोकांनी श्रमदानानं बांधलेलं एक सुंदर चर्च आहे. पोलिश माणूस अत्यंत धार्मिक. कट्टर कॅथालिक. शुक्रवारी कोणत्याही प्रकारचं मांस खात नाहीत, फक्त मासे खातात. विशेषतः इस्टरच्या आधीचा चाळीस दिवसांचा उपास- ‘लेन्ट’  बहुसंख्य पोलिश पाळतात. कोणतेही समारंभ करत नाहीत. गुड फ्रायडे, हा शोक करण्याचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी पोलंड सुट्टी घेत नाही. पुढचा इस्टर मात्र खूप उत्साहानं साजरा करतात. पोलंडमधला इस्टर खरोखरच पाहण्यासारखा असतो. छोट्या-छोट्या सुंदर सजवलेल्या बास्केट्समध्ये, रंगवलेली अंडी घेऊन छान-छान कपडे घालून चर्चमध्ये जाणारी मुलं देखणी दिसतात. पाना-फुलांचा वापर करून सजवलेले उंच स्तंभ- इस्टर पाम, ही खास पोलिश परंपरा. मला पुण्यातल्या मोहरमच्या सजावटीची आठवण येते हे इस्टर पाम पाहून. मला स्वतःला पोलिश ख्रिसमसपेक्षा पोलंडमधला इस्टर जास्त भावतो. थंडीनं गारठून गेलेल्या दिवसांनंतर वातावरण उल्हसित करून टाकणारा हा सण, अजूनही फारसं बाजारीकरण न झाल्यामुळे, एक पारंपरिक ठसा कायम ठेवून आहे.

Easter Market_Street Food
इस्टर मार्केट

क्रॅकोमध्ये, पुण्याच्या मारुतीच्या देवळांशी स्पर्धा करतील एवढी चर्चेस आहेत. अर्थात ही तुलना फक्त संख्येच्या अनुषंगानंच होऊ शकते. इथली चर्चेस सुंदर, सुबक, नेटकी. चर्चेसच्या वास्तुरचनेत आधुनिक प्रयोगशीलताही क्रॅकोमध्ये दिसून येते, एखादं सुंदर फिचर करता येईल एवढं वैविध्य ह्या वास्तुरचनेमध्ये आहे.

शाळांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं. सध्या पोलंडमध्ये सत्तेत असणारा पक्ष (PIS), हा कट्टर उजव्या विचारसरणीचा मानला जातो. त्याचे परिणाम क्रमिक पुस्तकांवर दिसून येत आहेत. ख्रिश्चानिटीच्या धार्मिक धारणा शाळेपासूनच मुलांच्या मनावर बिंबवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. (त्याचबरोबर पुरोगामी लोकांचं त्याविरोधात आवाज उठवणंही चालू आहे.) याशिवाय आई-वडील कटाक्षानं आपल्या मुलांकडून फर्स्ट कम्युनियनची तयारी करून घेतात. ही कॅथलिक चर्चची एक परीक्षा असते. ही परीक्षा वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी प्रत्येक मुला-मुलीला द्यावी लागते. दोन्हीकडचे आजी-आजोबा, आत्या, काका, मावश्या असे सगळे कौतुक करणारे नातेवाईक, भरपूर खाऊ असे सगळे लाड असतात. फर्स्ट कम्युनियन हा मोठा कौटुंबिक समारंभ असतो. आपल्याकडच्या मुंजीशी समांतर. शाळांच्या सुट्ट्यांच्या काळात खूप मुलं ह्या कम्युनियनच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतात आणि नंतर आयांच्या कॉम्प्युटर्सवर ह्या समारंभाचे फोटो झळकत राहतात.

नाताळ सर्व कुटुंबीयांसमवेतच साजरा होतो. पारंपरिक बारा-चौदा पदार्थ असणारं जेवण तयार केलं जातं. ख्रिसमसच्या आधीच्या आठवड्यात सगळी बाजारपेठ भेटवस्तूंनी आणि गर्दीनं ओसंडून वाहत असते. प्रत्येक कुटुंबागणिक ख्रिसमस/इस्टर साजरा करण्याच्या पद्धती थोड्या-थोड्या बदलत राहतात, पण हे सण प्रत्येक कुटुंब हौसेनं साजरं करतं. लहान मुलांच्या तरुण आयादेखील इस्टर/ख्रिसमसचं जेवण, त्या वैशिष्ट्यपूर्ण कुकीज निगुतीनं करतातच. आपल्या मुलांना ह्या परंपरा कळल्या पाहिजेत ह्यावर भर असतो त्यांचा.

wedding
पोलिश लग्न

माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नात मला पोलिश लग्न पाहण्याची संधी मिळाली. तेही एका खेड्यातलं. आम्ही सकाळीच तिच्या घरी पोचलो होतो, तेव्हा मुलीला मागणी घालण्याचा प्रसंग चालू होता. ही एक गमतीशीर परंपरा त्या भागात आहे. पूर्वी इथं मुलीच्या घरच्यांना मुलानं हुंडा देण्याची पद्धत होती. आता ही पद्धत बंद झाली, पण केवळ गंमत म्हणून एखाद्या नाट्यप्रवेशाप्रमाणे ती रूढी सांभाळली आहे. मुलगा जाऊन मुलीच्या आई-वडिलांकडे मुलीची मागणी करतो. मुलीचा बाप विचारतो, किती पैसे देणार? मुलगा म्हणतो, अमुक इतके देईन. मग बाप नाक मुरडतो, आत जातो आणि एखाद्या छोट्या मुलीला घेऊन बाहेर येतो. एवढ्या पैशात फक्त हीच मिळेल असं त्याला सांगतो! मग मुलगा रक्कम वाढवतो. बापाचं समाधान होत नाही, तो आत जाऊन एखाद्या म्हातारीला घेऊन येतो! जोपर्यंत नवरा योग्य दाम देत नाही, तोवर हा खेळ चालू राहतो. शेवटी जेव्हा बापाचं समाधान होतं, तेव्हा नियोजित मुलीला बाहेर आणलं जातं! भाषेच्या अडचणीमुळे नेमक्या किती रकमेवर हा सौदा तुटला ते नक्की कळू शकलं नाही. नंतर आम्ही सगळे चर्चमध्ये जायला निघालो. जातानाच्या प्रत्येक वळणावर गावातली छोटी मुलं जाणाऱ्या गाड्या थांबवून खंडणी वसूल करत होती. आमच्याकडे पाहून, विशेषतः माझ्या साडीकडे पाहून ते थोडे बिचकले, पण नंतर सरावले.

चर्चमध्ये सर्व विधी यथासांग पार पडले. अर्थात आम्हांला भाषेमुळे काही कळू शकलं नाही. ह्यानंतर लग्नाची जंगी पार्टी होती. त्यासाठी गावापासून थोडं लांब, एका निसर्गरम्य हिलस्टेशनवरच्या रिजॉर्टवर आम्ही सगळे गेलो. वधूवर आणि त्यांचे नातेवाईक आणि इतर मोठा आप्त-मित्र वर्ग होता. परदेशी फक्त आम्हीच. प्रथम तिथं जेवण होतं. पोलिश जेवणातलं वैविध्य तिथं पाहायला मिळालं. लग्नाचा केक कापल्यानंतर लाइव्ह संगीताच्या सोबतीनं नाचायला सुरुवात झाली. पहिल्यांदा वधू आणि वधूपिता, वरमाई आपल्या लेकाबरोबर, आणि मग नवीन जोडपं! बिअर आणि व्होडका मुक्तपणे वाहत होत्या! तरुण-म्हातारे, सारे एकत्र नाचत होते. आलेल्या प्रत्येक पाहुण्या पुरुषाबरोबर यजमान कुटुंबातल्या स्त्रियांनी नाचणं आणि पाहुण्या स्त्रीबरोबर यजमान पुरुषांनी, हा पाहुणचाराचाच एक भाग मानला जातो. एक पेला संपवायचा, सोबत काहीतरी खायचं, पुन्हा नाचण्यात सहभागी व्हायचं. दमल्यावर पुन्हा खाणं-पिणं. दुपारी ४ वाजता सुरू झालेला हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता संपला. कधीही विसरणार नाही इतका सुंदर लग्नसोहळा होता तो.

duble rainbow
दुहेरी इंद्रधनुष्य

मी नेहमी विचार करते की, पोलिश माणूस खरंच एवढा रूढीप्रिय आहे का? वास्तविक आम्ही राहतो तो पोलंडचा दक्षिण भाग त्यातल्या त्यात जास्त विकसित आणि औद्योगिकीकरण झालेला आहे. जर ह्या भागात हौसेनं रूढी-परंपरा पाळल्या जात असतील, तर इतरत्र अविकसित भागातही हेच चित्र असावं.

मला ह्या बाबतीत पोलिश माणूस भारतीय माणसासारखा वाटतो. रूढीप्रिय, धार्मिक, देवभक्त. पण एक महत्त्वाचा नोंदवण्यासारखा फरक म्हणजे, एकाही पोलिश कारमध्ये अथवा ऑफिसच्या  टेबलवर जिझसचा किंवा मदर मेरीचा फोटो आहे, अथवा क्रॉस आहे, असं मला दिसलं नाही. अपवाद फक्त हॉस्पिटल्सचा. तिथं मात्र प्रत्येक खोलीत क्रॉसवरचा येशू. रोज सकाळी जवळच्याच चर्चमधला एखादा प्रिस्ट येऊन प्रत्येक खोलीत जातो. तुमच्यासाठी प्रार्थना करू का विचारतो. पेशंटनं परवानगी दिली तर पुढे प्रार्थना वगैरे.

बाकी अन्य बाबतींत, भारताला पोलिश संस्कृती बाकीच्या पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत जास्त जवळची आहे.

अगदी आत्ता-आत्तापर्यंत सर्वसाधारण पोलिश स्त्रीचं आयुष्य भारतीय स्त्रीपेक्षा फार वेगळं नव्हतं. पूर्ण आयुष्य कुटुंबाकडे लक्ष देण्यात घालवायचं. सर्व कुटुंबीयांच्या गरजांच्या उतरंडीच्या तळाशी स्वतःच्या गरजांना ठेवायचं, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं, हीच जगण्याची पद्धत होती.

‘माझी सासू घरी होती नं, म्हणून मुलांना अगदी लाडावून ठेवलं आहे तिनं. माझ्या नवऱ्याचे नेहमी खाण्यापिण्याचे नखरे असतात. जरा म्हणून चालवून घेत नाही’ अशी तक्रार करणारी मुलगी भेटतेच. पण आता त्याचबरोबर, ‘माझा नवरा स्वयंपाक करतो आणि मी स्वच्छता करते, त्याला मी केलेला स्वैपाक आवडत नाही’ असं सांगणाऱ्या मुलीही भेटतात.

कामावर जाणाऱ्या लेकी-सुनांच्या सोयीसाठी, नातवंडांना सांभाळणारे आजी-आजोबा भेटतात. त्यातही घरगुती नात्यांची समीकरणं बऱ्याच अंशी आपल्यासारखीच, सनातन. सासूच्या तक्रारी सांगणारी सून भेटते, तशीच जावयाच्या घरी अवघडल्यासारखं होऊन आपल्या घरी एकांतवासात परतणाऱ्या आपल्या वडिलांची कथा डोळ्यात पाणी आणून सांगणारी एखादी आईविना असलेली मुलगीही भेटते.

Lane to our home
आमच्या घराकडे जाणारा रस्ता

माझ्याकडे घरकामासाठी येणारी एक मुलगी होती, काशा.

पोलंडमधल्या नावांची यादी एक दोन पानांत संपेल. काशा, बाशा, बियता, माग्दा, ओला, गोशा आशा, अग्नेश्का.. नव्वद टक्के स्त्री-समाज ह्या आकारन्त(च) नावांमध्ये संपतो. दारेक, मिहाऊ, राफाऊ,  माचेक, उकाश, अर्तूर, आंजे, जेगोश, बारतेक ह्या नावांमध्ये नव्वद टक्के पुरुषवर्ग.

ही सगळी हाक मारण्याची नावं आहेत, ह्या सगळ्या नावांची मूळ नावं वेगळीच आहेत, म्हणजे शशीधरचं शशी व्हावं किंवा मनोरमाचं मनू किंवा रमा व्हावं तसं काहीसं.

तर सांगत होते काशाबद्दल. हिच्याविषयी लिहायचं तर एक स्वतंत्र प्रकरण होईल. सुमार बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा व्यक्तिविशेष. तिच्या बुद्धिमत्तेपुढे शरण जाण्याचे प्रसंग नेहमीचेच. आमच्या कपड्यांना इस्त्री करणं हे तिचं दर आठवड्याचं काम. मशीनमध्ये धुताना मी कपडे उलटे करून धुते, वाळल्यानंतर तसेच इस्त्रीसाठी ठेवून द्यायचे. इस्त्री करताना ही तशीच कपड्यांच्या उलट्या बाजूनं करायची. मी तिला म्हणाले, ‘काशा, मी कपडे इनसाईड आउट करून धुते, तू आउटसाईड आउट करून इस्त्री करत जा, कपड्याला राईट (right) साईडला इस्त्री व्हायला हवी.’ तिनं मान डोलावली. पुढच्या आठवड्यात सगळ्या कपड्यांच्या फक्त उजव्या (right) भागाला इस्त्री झाली होती, डावा भाग तसाच! आणि तीदेखील उलट बाजूनं!! मला अजूनही कळलं नाहीये की आम्ही अर्ध्याच भागाला इस्त्री केलेले कपडे वापरणार असं तिला कसं काय वाटलं?  त्यानंतर मीच कपडे सुलटे करून ठेवण्याची खबरदारी घ्यायला लागले.

एकदा तिनं आम्हांला सगळ्यांना घरी बोलावलं. खेड्यातलं मोठं, दुमजली, पक्क्या बांधकामाचं घर. चारी बाजूंनी मोठी मोकळी जागा. घरी गाई, कोंबड्या, बदकं, शेळ्या, कुत्री असं सगळं मोठं खटलं. काशाला तिच्या पाठचे चार भाऊ आणि एक बहीण. तिच्यापेक्षा मोठा भाऊ वयाच्या पंचविसाव्या वर्षी मोटारसायकल अपघात गेला. धाकटी भावंडं सगळीच शाळा-कॉलेजमध्ये जाणारी. सगळे एकत्र त्याच घरात राहतात. हा सगळा संसार तिची आई एक हाती चालवते. कम्युनिस्ट काळापासून एका कारखान्यात काम करणारी एक कामगार स्त्री!

आईला तिच्या माहेरून एक मोठा जमिनीचा तुकडा मिळाला. ज्या जमिनीवर तिनं स्वतःचं राहतं घर बांधलं आहे. नवऱ्याचा एकूणच संसारात आर्थिक सहभाग शून्य.  नवरा व्यसनाधीन, बाहेर कोणा स्त्रीशी संबंध. त्याचा घराशी संबंध फक्त झोपायला येण्यापुरता. तेवढ्यासाठी तिनं नवऱ्याला, तळमजल्यावर त्याची त्याला एक स्वतंत्र खोली दिली आहे.

स्वतःच्या हाता-तोंडाशी आलेल्या मुलाच्या मृत्यूचं दु:ख पचवलेल्या, नवऱ्याच्या बेफिकिरीमुळे संसाराचा भार आपल्या समर्थ खांद्यावर उचलणाऱ्या तिचा हसतमुख चेहरा मला कायम आठवत राहतो. आमचं आदरातिथ्य काय अगत्यानं केलं होतं बाईनं! विविध प्रकारची सॅलड्स, चीज, केक, सॅन्डविचेस, फळं… सुरेख बडदास्त ठेवली होती. निघताना, हातात निरशा दुधाची बाटली दिली होती. सगळे आनंद आपल्या मुलांमध्ये शोधणारी, स्वतःचे वैयक्तिक आनंद विसरून गेलेली आई!! नेहमीप्रमाणेच आपल्या संसाराला जखडलेली आणि सर्व उपभोगून नामानिराळा राहिलेला तिचा नवरा. तिच्याविषयी करुणा वाटावी का तिच्या ह्या कर्तृत्वाला सलाम करावा, अशा संदिग्ध मन:स्थितीत आम्ही परतलो होतो.

पोलिश लोक पट्टीचे दारू पिणारे!! व्यसनाधीनतेचं प्रमाण फार जास्त. त्यापुढे पश्चिम युरोपियनांचं दारू पिणं म्हणजे अगदीच भातुकलीतलं. मद्याच्या प्रकारातलं वैविध्य पाहण्यासारखं. विविध प्रकारच्या व्होडका, तसेच बिटर्स, लिक्युअर्स, अपेरिटिफ्स वगैरेंचे वेगवेगळे देशी प्रकार. इथंच मी एकदा ॲबसिन्थ बारमध्ये गेले होते. मात्र व्यसनाधीनता कमी करण्याचे सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत, ते यशस्वीदेखील होत आहेत. आता पोलंडमध्ये रस्त्यात बीअरदेखील प्यायला मनाई आहे. आमच्या कंपनीमध्ये एखादा कामगार दारू पिऊन आलेला आढळला, तर त्याला त्याच क्षणी कामावरून काढून टाकतात.

auschwitz barracks

पोलंडचा विषय चालला आहे आणि ऑश्वित्झचा उल्लेख होणार नाही, हे तर शक्यच नाही. आमच्या घरापासून जवळच असलेली ही दुसऱ्या महायुद्धातली सर्वांत मोठी छळछावणी. याच ठिकाणी जर्मनांनी जवळजवळ ११ लाख लोकांना मारून टाकलं. युद्धकैदी, समलिंगी, भारतीय वंशाचे जिप्सी/रोमानी, काही पोलिश; पण प्रामुख्यानं ९० टक्क्यांच्या आसपास ज्यू. केवळ वंशद्वेषाच्या आधारावर जर्मनांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलेलं हे इतकं मोठं शिरकाण.  बंदुकीच्या गोळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर माणसं मारणं शक्य होणार नाही, हे लक्षात आल्यावर, बहुसंख्य माणसांना विषारी वायूच्या चेंबर्समध्ये मारलं. काही जण भुकेनं कळवळून मेले, काही रोगराईनं आणि काही जणांवर असह्य असे वैद्यकीय प्रयोग केले गेले. सुरुवातीला जेव्हा ह्या कॅम्पविषयीची माहिती दोस्त राष्ट्रांना कळली, तेही ब्रिटनला; तेव्हा ब्रिटिशांनी अतिरंजित आणि अविश्वसनीय म्हणून दुर्लक्ष केलं होतं.

auschwitz birkenau

जवळपास ४०० मृत्यू घडलेली जालियानवाला बाग ही भारतीयांसाठी किती हळवी आठवण असते? आणि इथं अकरा लाख माणसं मेली!

१९४१ ते १९४४ दरम्यान घडलेला हा इतिहास. ही सगळी माणसं, ज्यांना इतका भीषण मृत्यू आला, ती सगळी इथंच राहिलेली, इथंच माझ्या घराच्याच आसपास त्यांचीही घरं असतील, मुलं खेळली असतील, शाळांमध्ये गेली असतील. सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या ह्या सगळ्या ज्यू लोकांना आधी क्रॅको शहरातच एका घेट्टोमध्ये कोंडलं गेलं आणि मग पुढे छळछावणीत रवानगी केली. ऑश्वित्झ- बिर्कनाऊमध्ये जवळ-जवळ तेरा लाख स्त्री, पुरुष, आणि मुलं आणली गेली होती. पैकी अशक्त, रोगी स्त्री-पुरुष आणि लहान मुलं ह्यांना पहिल्यांदा मारून टाकलं.

कारण त्यांचा बाकीच्या कष्टाच्या कामांना काहीच उपयोग नव्हता. पण ह्या छळछावणीत आलेल्या प्रत्येकाचं भवितव्य ठरलेलं होतं, फक्त किती काळ ह्या छावणीत जिवंत राहता येणार आहे; एवढाच काय तो प्रश्न. मला नेहमी वाटतं, ज्या दिवशी एखादा माणूस आत आला असेल, त्या दिवसापासून, त्याच्या मृत्यूपर्यंत, त्याच्या मनावर कोणते-कोणते आघात झाले असतील? आपल्या बरोबरच्या माणसांचे पाहावे लागलेले मृत्यू, त्यांच्या स्वतःच्या शारीरिक वेदना, ते मृत्यूच्या सावलीत घालवलेले दिवस, त्या मरणप्राय थंडीत विवस्त्र अर्धपोटी राहून करावे लागलेले कष्ट!  काय घडलं असेल? कसे दिवस जात असतील त्यांचे, आणि रात्री कशा जात असतील?  रात्री झोपताना काय विचार येत असतील मनात? हा इतिहास केवळ कल्पनेच्या स्तरावरही इतका अस्वस्थ करतो! पोलीश भूमीवर जर्मनांनी केलेल्या अनन्वित अत्याचाराचा हा इतिहास, पोलंडसाठी नेहमीच एक हळवी आठवण बनून राहिला आहे.

अर्थात जे काही घडलं ७०-७५ वर्षांपूर्वी! या सर्व घटनांनंतर पोलिश इतिहासात कम्युनिझमचा अजून एक टप्पा येऊन गेला आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात पोलंडची कायमच कोंडी होत आली आहे. दोन्ही बाजूंना बलाढ्य आणि मोठा दबदबा असलेले शेजारी. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं पोलंडची पार वाताहत केली आणि युद्धानंतर रशियानं पोलंडला आपल्या अंकुशाखाली ठेवलं.

महायुद्धानंतरच्या एका पिढीचं आयुष्य कष्टप्रद आणि असमाधानी असा हा कम्युनिझमचा कालखंड काळाकुट्ट नसला, तरी सुखाचा नक्कीच नसणार. हंगेरी, चेक रिपब्लिकमधील रशियन दडपशाहीमुळे घाबरलेली असंतुष्ट पोलिश जनता काही काळ गप्प बसली. पण ऐंशीच्या दशकात लेक वालेसाच्या नेतृत्वाखालच्या सॉलिदोर्नोश्च संघटनेत एकत्र येऊन प्रस्थापित राज्यव्यवस्थेविरुद्ध बोलू लागली, उठाव करू लागली. तत्कालीन पोलिश सरकारनं दडपशाही केली, पण कत्तली केल्या नाहीत. तोपर्यंत गोर्बाचेव्हच्या आधिपत्याखालील रशियानं आपली पकड सैल केली होती. अखेर सॉलिदोर्नोश्च संघटनेचा विजय झाला. पोलंडमध्ये लोकशाही मार्गानं निवडणुका होऊन सरकार स्थापन झालं. पोलंडनं आपली दारं भांडवलशाहीसाठी, खुल्या अर्थव्यवस्थेसाठी उघडली. आज त्यानंतरची पिढीही मोठी होऊन कामाला लागली आहे. पण एका पिढीचं आयुष्य मात्र असमाधानात गेलंच.

स्वाभाविकच सर्वसाधारण पोलिश माणसाला इंग्लंड, अमेरिका अथवा पश्चिम युरोपचं मोठं आकर्षण आहे आणि जर्मनी-रशियाविषयी तिटकारा.

P_20160331_112917
पोलंडमधली शिल्पं

आता इथल्या लोकांनी भूतकाळाला मागे टाकलं आहे. आज पोलंड हा देश युरोपियन समूहाचा सदस्य आहे. युरोपियन समूहाकडून सर्वांत जास्त मदत पोलंडला मिळते. पोलिश नागरिक आत्मविश्वासानं नवीन जगाकडे पावलं टाकत आहेत. आपल्या देशाला समृद्ध बनवत आहेत. पारंपारिक भूमिकेतून पोलिश स्त्रीही बाहेर पडते आहे. माझ्याच ऑफिसमध्ये सर्व स्तरांवर काम करणाऱ्या स्त्रिया आहेत. पूर्वी फक्त दुय्यम स्वरूपाचं काम करणारी पोलिश स्त्री आता कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारीही उत्कृष्ट पार पाडते आहे.

हे सर्व होत असताना पोलीश माणसानं कलेची कास सोडली नाही. मागच्या पाच वर्षांत उभ्या केलेल्या अनेक नवीन शिल्पाकृती ह्याची साक्ष देतात.

मॉल्समध्ये, रस्त्यांवर पूर्वी अभावानं दिसणाऱ्या भारतीयांचं प्रमाणही आता वाढलं आहे. नुकतंच वाचनात आलं, पोलिश सरकारकडे कामाच्या निमित्तानं व्हिसा मागणाऱ्या भारतीय उपखंडातल्या लोकांची संख्या ह्या वर्षी चार हजारांवर गेली आहे. आत्तापर्यंत ती तीनशे-साडेतीनशेच्या आसपास होती.

मागच्या काही दिवसांमध्ये सगळ्या जगाप्रमाणेच उजव्या शक्ती पोलंडमध्ये डोकं वर काढत आहेत. सध्या निर्वासितांना आश्रय द्यायला नकार दिल्यामुळे पोलंडला युरोपियन समूहाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. पण खरी भानगड अशी आहे की, सीरियामधील निर्वासितांनाही पोलंडमध्ये राहायचं नसतंच. जर्मनी, इंग्लंड ह्याच देशांमध्ये त्यांना पोचायचं असतं. मागच्या काही महिन्यांत पोलंडमध्ये घडलेल्या तुरळक वर्णविद्वेषी हल्ल्यांच्या घटना वाचायला मिळाल्या. पण तरीही पोलंड हा सुरक्षित देश आहे असंच मी म्हणेन. रात्री दोन-अडीच वाजताही तरुण मुलगी क्रॅकोमध्ये एकटी निर्धास्त फिरू शकते. मी पोलिश असते, तर मला ह्याचा निश्चितच अभिमान वाटला असता.

मागच्या पाच वर्षांत मनावर उमटलेली ही काही पोलंडची चित्रं. बरीचशी माओपोलस्का आणि सायलेशिया भागातली.

रात्रीच्या वेळी घाट उतरत असताना घाटाच्या तळाशी असणाऱ्या अंधारात बुडून गेलेल्या शहराचे फक्त काही प्रमुख दिवे दिसावेत, उजळून निघालेल्या इमारती दिसाव्यात, पण छोटे-मोठे रस्ते, घरं हे सारं अंधारातच राहावं तसं हे दर्शन.

सध्या बऱ्याचदा मनात येतंच की बास आता हे! कुटुंबकबिला उचलावा आणि जावं उठून दुसरीकडे…. कुठंतरी, दुसरीकडं जगून पाहावं, वेगळा भूप्रदेश, वेगळी संस्कृती, वेगळं राहणीमान …

पुन्हा एकदा मनातला जिप्सी वर डोकं काढतो आहे …

अंजली कलभंडे

In Forence

इ-मेल – anjali.kalbhande@gmail.com

मूळ पुणेकर आहे. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर काही वर्षे ऑडिटिंग क्षेत्रात काम केले. पुढे बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पहिली दोन वर्षे अमेरिकेत काम केल्यानंतर आता मागील नऊ वर्ष  युरोपात वास्तव्य आहे. युरोपात सुरवातीस लक्झेम्बर्ग मध्ये आणि आता सध्या पोलंड – क्रॅको मध्ये आहे.

One thought on “मी एक जिप्सी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s