स्की व्हेकेशन

अश्विनी  डेकन्नवर-दस्तेनावर

व्हेकेशन हा फ्रेंच माणसाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग. फ्रेंच माणूस निगुतीने वर्षातून ४ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी व्हेकेशन किंवा आपल्या भाषेत प्रवासाला जातोच! दर सहा-सात आठवडे काम केल्यावर २ आठवड्यांची हक्काची सुट्टी असे इथले शालेय सुट्टीचे चक्र. इथल्या हवामानाप्रमाणे दर ३ महिन्यांनी ऋतू बदलतो आणि त्या ऋतूप्रमाणे सुट्टीतील उपक्रम बदलतात. हे सगळे इथे एवढे सेट आहे की सुट्टी लागायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या संध्याकाळपासून पॅरिसकडून बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीची तुफान कोंडी होते.

ग्रीष्म, शिशिर, शरद, वसंत म्हणजे इथले समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. प्रत्येक ऋतूचे सौंदर्य वेगळे. ग्रीष्मातील जुलैचा किंवा ऑगस्टचा अतिउकाड्याचा एखादा आठवडा सोडल्यास इतर वेळी अतिशय आल्हाददायी वातावरण असते. एरवी सतत बाळगाव्या लागणाऱ्या गरम कपड्यांपासून फक्त याच वेळी सुटका मिळते.

ऑटममधल्या पानगळीचे सौंदर्य अफलातून. दिवसादिवासाला बदलणारे पानांचे रंग, तो रंगीबेरंगी नजारा आणि शेवटी ती निष्पर्ण झाडे. हिवाळ्यातल्या त्या शुभ्र-धवल डोंगरदऱ्या आणि स्प्रिंगमध्ये निसर्गाने केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण, गवतावर उमललेल्या चुटकुल्या कळ्या, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, सुंदर हवा असे छान वातावरण असते. सर्व काही डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपून स्मृतीत कायमचे साठवून ठेवण्यासारखे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी कडक थंडीचे महिने. फ्रान्समध्ये या काळात तुस्सांत, नोएल आणि प्रांतेम्प्स अशा तीन सुट्ट्या येतात. तुस्सांत म्हणजे आपल्याकडचा पितृपक्ष. लोक ह्या सुट्टीत सहसा प्रवासाला जात नाहीत. कारण नुकतीच समरची २ महिन्यांची सुट्टी संपून शाळा चालू झालेल्या असतात आणि दैनंदिन जीवनाची  घडी बसत असते. फुलांचे बुके घेऊन फ्रेंच त्यांच्या पितरांच्या भेटीसाठी सिमेटरीत जातात आणि त्यांच्या आठवणीच्या स्थानावर फुले वाहतात.

ह्यानंतरच्या सर्व सुट्ट्या अतिशय योजनाबद्ध रितीने वापरल्या जातात. कित्येक जण एकेक वर्ष आधीच विमानप्रवासाचे आणि राहण्याचे बुकिंग करतात. त्यानंतर सुट्टीचे आयोजन अचंबा वाटण्याइतके सूक्ष्म आणि बारकाईने केलेले असते. जगाच्या पाठीवरील भेटीच्या ठिकाणाचे मॅप, अधिक माहिती देणारी पुस्तके जमवली आणि अभ्यासली जातात. इथे पुस्तकांच्या दुकानात पर्यटनावरील पुस्तकांचा खास विभागच असतो.

स्की किंवा विन्टर व्हेकेशनच्या बाबतीत लोक एकदम थ्रील्ड असतात. प्रचंड थंडीत सब झिरो तापमानात डोंगरशिखरांवर स्की केले जाते. फ्रान्समध्ये स्कीसाठी आल्प्स, पिरिनेस, जुरा, वोग्स आणि मास्सीफ सेंन्त्राल अशा पाच डोंगररांगा प्रसिद्ध आहेत. शिवाय आजूबाजूच्या स्वित्सझर्लंड, इटली, बेल्जियम, ऑस्ट्रिया इत्यादी देशांतील पर्वतांवर स्की-स्टेशने आहेत. प्रत्येकाचे वैशिष्ट्य निराळे. फ्रान्समध्ये शामोनी, शेर चेवालिये ला टीन, ला प्लान अशी अनेक प्रसिद्ध स्की स्टेशने आहेत. स्की-व्हेकेशनचे बुकिंग करण्यासाठी काही वेबसाईट आहेत त्यावर सर्व बुकिंग  केले जात.

आवड, बजेट आणि स्कीतले नैपुण्य यानुसार स्की-स्टेशन निवडले जाते. स्कीसाठी काहींना आल्प्सची इटालिअन बाजू आवडते तर काही जण स्विस बाजू निवडतात. स्विसमधली स्की स्टेशने उंच-उंच पर्वतांवरील गावांवर वसली आहेत. रात्रीच्या अंधारात दिव्यांनी सजलेली गावे खूपच सुंदर दिसतात. कुठल्याही स्की स्टेशनला पोचण्यासाठी कमीत कमी ६ ते ८ तासांचा रस्त्याचा प्रवास करावा लागतो.

बऱ्याचदा मार्गावर बर्फ पडल्याने कारच्या टायरवर स्नोचेन बसवाव्या लागतात. आव्हलांश किंवा वादळामुळे स्की-स्टेशनच्या दिशेने जाणारे रस्ते ऐन वेळी सुरक्षिततेसाठी बंद केले जातात. त्यामुळे आपण बुकिंग केलेल्या आठवड्यात तिथली हवा चांगली असणे आणि स्कीस्टेशनवर पुरेशी बर्फवृष्टी होऊन बर्फाची उंची साठलेली असणे, हा नशिबाचा भाग असतो. एखाद्या वर्षी पुरेसा हिमवर्षाव न झाल्यास कृत्रिम हिमवर्षावही केला जातो.

lift to reach ski station from base

इथले लोक प्रचंड थंडीत हिटर लावून घरात बसण्यापेक्षा मोकळ्या हवेत स्की करणे जास्त पसंत करतात. समुद्रसपाटीपासून साधारण ८०० ते २००० फूट उंचीवर स्की-स्टेशने असतात. स्की-स्टेशनवर एकाच वेळी सूर्यप्रकाश आणि बोचरी थंडी यांचा मिलाफ असतो. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या अल्ट्रा विओलेट किरणांपासून संरक्षण म्हणून खास गॉगल्स वापरावे लागतात. शरीराला गरम ठेवणारा खास स्की-सूट, स्की-हेल्मेट, स्की-शूज, ग्लोवज, स्कार्फ ह्या सर्व लवाजम्यानिशी आपली स्वारी खासच दिसते. बुटांवर साधारण २-३ किलो वजनाच्या लांबलचक स्की घालायच्या असतात आणि मग तोल सांभाळायला दोन्ही हातांत काठ्या असतात. सवय नसेल, तर या सगळ्या पेहेरावामध्ये बर्फाच्या थरावरून पाय टाकत चालतानाच दमछाक होते.

स्की स्टेशनच्या उतरंडीवर ‘पिस्ट’ किंवा स्कीचे मार्ग वा पट्टे आखलेले असतात. त्यांची पिवळा, निळा, लाल आणि काळा अशी पातळी असते. हे मार्ग चढत्या क्रमाने कठीण होत जातात. पिस्टवरची बर्फाचीची पातळी एकसारखी करणाऱ्या खास गाड्या सारख्या फिरत असतात. त्यांना स्नो-कॅट म्हणतात.

मी स्की शिकताना क्लास घेतले होते. सर्वांना घ्यावेच लागतात. इथले अनेक लोक मुलाला  चालायला यायच्या आत स्कीवर उभे करतात. १८ महिन्यांच्या बाळापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंतचे स्कीअर्स स्की-स्टेशनवर दिसतात.

कोच वैयक्तिक किंवा ८-१० जणांच्या गटाला प्रशिक्षण देतो. अनेक वेळा दणकन आपटून, थोडा-थोडा तोल सावरत जेव्हा बर्फावरून सर्रकन घसरता येऊ लागते तो आनंद काय वर्णावा. त्या मजेतून निर्माण झालेले चैतन्य आणखी प्रयत्न करायची स्फूर्ती देत. स्की थोडेसे जमू लागले की मग स्की लिफ्ट घेऊन आखलेल्या स्की-पट्ट्याच्या सुरुवातीला पोहोचायचे आणि घसरत खाली यायचे. खाली आल्यावर पुन्हा वर जाणारी लिफ्ट घ्यायची आणि तोच क्रम परत. हे सगळे मी अगदी थोडक्यात सांगितले. ह्या स्की लिफ्टवर चढून बसायचे तंत्र सापडायलाच वेळ लागतो. सतत फिरत राहणाऱ्या ह्या लिफ्टच्या खुर्चीवर ठरावीक ठिकाणी काही सेकंदांचाही वेळी वाया न जाऊ देता हातातील काठ्या विशिष्ट कोनात पकडून टुणकन चढून बसावे लागते. ह्यांतले काही जरी चुकले आणि तुम्ही भांबावलात तर पडलातच समजा. पडल्यावर मग ऑपरेटरला स्की लिफ्ट बंद करावी लागते. दोरीला हाताने लटकून वर नेणारीही लिफ्ट असते तिथेही योग्य तंत्र न जमल्यास लिफ्ट थांबवेपर्यंत फरफटत जावे लागते. लिफ्टवरून उतरतानाचेही असेच. योग्य वेळ साधावी लागते. जमले तर मजा नाहीतर दणकन बर्फावर आपटणे.. चांगल्याच वेदना होतात. अपघात होऊ शकतो.

कुठल्याही खेळात अपघाताचा धोका आलाच. स्कीमध्ये कुठेतरी तोल चुकला किंवा बर्फाची प्रत जरी चांगली नसली, तरी अपघात होऊ शकतो. पाठीमागून आलेल्या स्कीअरचा अंदाज चुकल्यामुळे पुढच्याला धक्का बसल्यानेही अपघात होतो. बऱ्याचदा स्कीअरचा पाय त्या दणकट बुटांच्या आतच मुरगाळतो. हे अतिशय वेदनादायक असते. तरबेज स्कीपटूंचे तसेच परिचयाच्या काही व्यक्तींचे सामान्य अपघातात पायाचे घोटे, पाय, खुबे, अगदी दोन्ही खांदेही मोडलेलेही ऐकिवात आहे. अशा वेळी स्नो-कॅट्स आणि हॅलिकॉप्टर तत्परतेने मदतीला हजर असतात. जगप्रसिद्ध मायकेलं शुमाकरची ताजी कथा आपल्या माहितीची आहेच.

स्की करत शिस्तीत लयबद्धतेने डोंगरावरून खाली उतरणारी रांग किती सुंदर दिसते. त्यांचे ते लयीत डुलणे, गोल वळण घेणे, मध्येच येणाऱ्या बर्फाच्या उंचवट्यावरून सहजपणे उड्या घेणे हे सर्व पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. अनेकदा रात्रीच्या वेळी स्कीअर्स हातात पेटलेल्या मशाली घेऊन गटाने स्की करतात. हे दृश्य दुरून पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. रात्रीच्या वेळी नागमोडी वळणे घेत लयीत पुढे सरकणाऱ्या लुकलुकत्या मशाली अद्भुत वाटतात आणि आकाश जर निरभ्र आणि टिपूर चांदण्यांनी भरले असेल, तर हे सौंदर्य द्विगुणीत होते.

शॅले (लाकडी घरे), किंवा अपार्टमेन्टमध्ये राहण्याची सोय असते. त्यातही १ स्टार ते ५ स्टार अशी सुविधांनुसार वर्गवारी असते. दिवसभर स्की करून थकल्यावर संध्याकाळी स्विमिंग पूल व इतर इन डोर गेम आणि ॲक्टिव्हिटी आयोजित केलेल्या असतात. सकाळचा भरपूर नाष्टा करून बाहेर पडायचे आणि मनसोक्त स्की करून, वेगवेगळे स्की पिस्ट तुडवून संध्याकाळी स्की-स्टेशने बंद झाल्यावर आपल्या शॅलेत परत यायचे. मग हॉट वाईन, हॉट चीज, उकडलेले बटाटे असे सुटसुटीत गरम जेवण जिवाला दिलासा देते. दुपारच्या वेळी उभ्याउभ्या कोल्ड सॅन्डविच खाल्ले जाते. बहुतेक जण संपूर्ण कुटुंबासह स्की स्टेशनवर येतात. बदल म्हणून बर्फाच्छादित डोंगरांवरून चालणे, स्केटबोर्ड, प्राण्यांनी ओढायची स्लेज, बर्फातील हलकेफुलके आणि थरारक खेळ अशा अनेक मनोरंजक ॲक्टिव्हिटी असतात.

युरोप-अमेरिकेत किंवा थंड हवामान असलेल्या इतर देशांत स्कीचा आनंद घेणे सहज शक्य आहे. भारतातही हिमालायात आपण स्की करू शकतो. मी तर पस्तिशीनंतर स्की शिकले आणि मुलांबरोबर त्यांच्याइतकी सफाईदारपणे नाही, तरी प्लेजर अॅक्टिव्हिटी म्हणून स्की करते. गरम कपडे, स्कीसाठीची उपकरणे, स्की लिफ्टचे भाडे, ट्रेनर फी असे करत-करत हे स्कीचे प्रकरण चांगलेच खर्चिक होते. तरीसुद्धा शक्य असेल तर हा रोमांचक खेळ आपणही अनुभवाच.

 

अश्विनी  डेकन्नवर-दस्तेनावर

19396801_10203537416673991_2079763827667053644_n

इ-मेल – ashwini.kushal@gmail.com

गेली १२ वर्ष कुटुंबासह पॅरिसमध्ये राहते.बालपण कोकणातील दापोलीत गेले. चित्रकला आणि प्रवासाची आवड. एका भारतीय कंपनीसाठी इंजिनीअरिंग क्षेत्रात बिझनेस मॅनेजर म्हणून काम करते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s