प्रियांका देवी-मारूलकर
मी खूप प्रवास केला आहे किंवा करते असे म्हणण्याइतपत मी अजून प्रवास केला नाही. मुळात मी जो काही प्रवास केला, तो बहुतांश फ्रान्समध्ये आल्यावरच केला. पण इतके मात्र नक्की की जो काही प्रवास युरोपात केला, तो संस्मरणीय आहे. प्रवास हा खरे तर एकट्यानेच, फारफार तर दुकट्याने करायला हवा असे माझे आणि माझ्या नवऱ्याचे एकमत असल्याने आम्ही सहसा घोळक्याने फिरणे कधीच पसंत करत नाही. त्यामुळे आत्तापर्यंतच्या इथल्या सहली पूर्णपणे आम्हीच आखत आलोय आणि अपवादात्मक प्रसंग वगळता, अथपासून इतीपर्यंत त्या व्यवस्थित पार पडल्या आहेत. बहुतांश वेळा प्रवास आखायचा असला की मग त्या संदर्भात लायब्ररीमधून पुस्तके, नकाशे, यूट्यूबवरील व्हिडिओ, विविध वेबसाइट्स यांवरून माहिती काढणे या सगळ्याला सुरुवात होते. गावातील राहण्याची, खाण्याची, पब्लिक ट्रान्सपोर्ट इत्यादी गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते. हे सगळे करताना आपल्या प्रवासाबद्दल आणि ठिकाणाबद्दल मनात चित्रे तयार होतात. प्रत्येक वेळी आपण ठरवतो तसेच्या तसे सगळे पार पडेल अशी खातरी नसते, पण सहल-आखणी आपली आपण करण्याचे समाधान काही औरच असते.
युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकातील चित्रकलेतील इम्प्रेशनिझम चळवळ सुरू झाली. ती समजून घेण्यासाठी आम्ही फ्रान्समधील काही गावांचा प्रवास केला. अजूनही तो पूर्ण झालाय असे म्हणता येणार नाही, पण गेल्या पाच वर्षांपासून तुकड्या-तुकड्यांत तो सुरू आहे.
कलेची पंढरी पॅरिस आणि फ्रान्स ह्यांच्या इतर प्रांतांमध्येच नव्हे, तर युरोपमधल्या बऱ्याच देशांत इ्म्प्रेशनिझम काळाच्या खुणा विखुरल्या आहेत. पॅरिसमधील ओरसे म्युझियम हे याची समृद्ध खाण आहे. क्लॉद मोने, माने, पिसारो, सेझाँ, रेनुआर या कलाकारांची तोंडओळख पहिल्यांदा ओरसेमध्ये झाली. सूक्ष्म ब्रशस्ट्रोक, गतिशील मांडणी, आधुनिक दृष्टिकोण आणि ऊनसावलीचा अप्रतिम खेळ, ही सगळी वैशिष्ट्ये घेऊन पुढ्यात आलेल्या या कलाकारांच्या चित्रांनी आम्हांला मोहात पाडले. सुरुवातीला अजाणता केलेल्या या प्रवासाला, हळूहळू जाणीवपूर्वक आकार द्यायला सुरुवात केली आणि मग केवळ चित्र पाहणेच नाही तर मग त्या कलाकाराचे आयुष्य जिथे गेले, ज्या गावात आपला बहुतांश कार्यकाळ तो जगला तिथली भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, तिथला इतिहास हे सर्व आपल्या परीने समजून घेण्याचा एक समांतर प्रवासपण त्याबरोबर सुरू झाला.
ओरसे म्युझियममध्ये, फ्रेंच इम्प्रेशनिस्टबरोबरच एका डच कलाकाराची ओळख झाली तो म्हणजे व्हिन्सेंट वॅन गॉग. तिथली व्हिन्सेंट वॅन गॉग ह्याची काही चित्रे पाहिल्यावर पुढे ॲमस्टरडॅममधील वॅन गॉग म्युझियममध्ये मोठा संग्रह पाहिला. दरम्यान माधुरी पुरंदरेंचे ‘व्हिन्सेंट वॅन गॉग’ नावाचे चरित्र वाचले आणि मग फ्रान्समधील त्याच्या कर्मभूमी असलेल्या ‘आर्ल’ (Arles) गावाचा शोध घ्यायचे ठरवले. आर्ल, फ्रान्सच्या दक्षिण भागातले एक जुने टुमदार शहर. शहराच्या मधून ऱ्होन नदी वाहते. पॅरिसहून इथे जाण्यासाठी टीजीव्ही ट्रेन आहे. ही ट्रेन अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रती तास वेगाने पळते आणि साधारण ४ तासांत आर्ल गाठता येऊ शकते. पण जसा या गाडीचा वेग जास्त आहे, तसेच जायचे तिकीटपण महाग असते, त्यामुळे २-३ महिने आधीपासून बुकिंग करावे लागते.

आर्लच्या जवळ साधारण तासाभराच्या अंतरावर मोंपेलीअर नावाचे दक्षिण फ्रान्समधले मोठे शहर आहे. आम्हांला तिथेसुद्धा जायचे होते. आर्लला जाणाऱ्या ट्रेनची तिकिटे महाग असल्याने आम्ही मोंपेलीअरची तिकिटे घेतली आणि तिथून आर्लचा प्रवास कार शेअरिंगने करायचे ठरवले. यात दोन फायदे होते. एक तर आपल्या सोयीची निघायची वेळ ठरवता येणार होती. कार शेअरिंग ट्रेनपेक्षा बरेच स्वस्त असते. आणि ड्रायव्हर बडबड्या/बडबडी निघालेच तर माहिती मिळते आणि फ्रेंच बोलायची सवयही होते. हॉटेल आणि ट्रेन ह्यांचे बुकिंग आणि bla bla car या वेबसाईटवरून कार शेअरिंगचे बुकिंग झाल्यावर आम्ही थोडे निर्धास्त झालो. वॅन गॉगच्या चरित्राची उजळणी आणि पाहायच्या जागांची चेकलिस्ट तयार करायला सुरुवात केली.
आर्ल मध्ये वॅन गॉग आला आणि इथे त्याने झपाटून काम केले. तो त्याच्या चित्रकलेच्या कारकिर्दीमधला बहराचा काळ होता. रोज सकाळी कॅनव्हास, इजल, रंग घेऊन बांबूच्या काड्यांची टोपी (स्ट्रॉ हॅट) घालून तो घराबाहेर पडत असे आणि माळराने, शेती, ओढे अशा जागा शोधून तिथे आपला दिवसभराचा तात्पुरता मुक्काम ठोकत असे. वॅन गॉगच्या सर्वोत्तम चित्रांपैकी अनेक चित्रे आर्ल आणि आसपासच्या परिसरात काढलेली आहेत. ऱ्होन नदीच्या काठावरून दिसणाऱ्या चांदण्या रात्रीचे ‘स्टारी नाईट’ हे चित्र पाहणाऱ्यावर संमोहन करणारे आहे. तो आर्लमध्ये ज्या रेस्तराँमध्ये जेवायचा; तिथली चित्रे, आर्लमधील रस्ते, कलोझियम, रोमन थिएटर आदींची चित्रे त्याच्या कॅनव्हासवर उतरलेली आहेत. एखाद्या चित्रकाराच्या आयुष्याभोवती संपूर्ण गावाची ओळख गुंफलेली असणे अनुभवायला किती छान आहे, याचा प्रत्यय, जिथे त्याने चित्रे काढली, त्या सर्व जागा फिरताना आम्हांला येत होता.
एखाद्या जागेबद्दल आपण ठेवलेल्या अपेक्षा कधीकधी फोल ठरतात तर कधी अपेक्षित नसलेले काहीतरी भन्नाट पाहायला मिळते. आर्लच्या सहलीमध्ये हे दोन्ही अनुभव आम्हांला आले. कलाप्रेमींना प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी आर्लमध्ये ‘वॅन गॉग फाउंडेशन’ उभे राहिले आहे. इथे आम्हांला वॅन गॉगची अजून चित्रे पाहायला मिळतील आणि त्याच्या आयुष्याविषयी अजून काही कळेल अशी अपेक्षा होती. तशा अपेक्षा ठेवून आम्ही इमारतीपाशी पोचलो. बाहेरच्या मोठ्या गेटवर मोठ्या अक्षरात व्हिन्सेंटची सही होती. इमारत अत्यंत आधुनिक स्थापत्यकला असलेली, दोन उंच इमारतींच्या मधोमध खुबीने वसवलेली होती. प्रकाशाचा उत्तम वापर केला होता. परंतु वॅन गॉगचे केवळ एकच चित्र या फाउंडेशनमध्ये होते. आणि इतर सर्व मॉडर्न आर्टची चित्रे होती जी फारशी भावली नाहीत. फाउंडेशनविषयी आम्ही ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या संपूर्ण खऱ्या ठरल्या नाहीत.
सुरुवातीला टुरिस्ट ऑफिसमध्ये गावाचा नकाशा आणि माहिती घेण्यासाठी गेलो असता तिथे एक नवा शोध लागला होता. तो म्हणजे, वॅन गॉगने ‘Bridge of Langlois’ चित्र जिथे काढले तो जुना लाकडी पूल अजूनही सुस्थितीत आहे आणि पाहता येतो. हा पूल गावाबाहेर आहे आणि चालत जाऊन सहज पाहता येतो, अशी माहिती मिळाली होती. हा काय प्रकार आहे तो पाहू या असा विचार करून मग आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. ऱ्होन नदीच्या कडेने चालत-चालत गावाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोचलो होतो. समोर एक मोठा फ्लाय ओव्हर आणि त्याला जोडून नदी ओलांडणारा पूल पडला होता. गाड्यांचे बुंगबुंग आवाज सुरू होते. दिसतोय तो पूल मॅपमधला पूल असावा आणि तिथेच कुठेतरी चित्रातला पूल दिसेल, असे वाटल्याने आम्ही तिथवर पोचलो. पण चित्रातला पूल हा जुना, लाकडी आणि उचलून वर करता येण्यासारखा होता आणि तसा पूल समोर कुठेच दिसत नव्हता. लोखंडी पूल पाहून आमची निराशा झाली. मॅपवरील अंतर, खुणा आणि समोर दिसणारा पूल यांचे काहीच गणित जुळत नव्हते. आम्ही समोर पाहत होतो तो पूल नदीवर होता आणि चित्रातला पूल छोट्या कॅनालवर होता. आसपास एक-दोन जणांना विचारल्यावर त्यांनी अजून पुढे चालत जाण्याचा सल्ला दिला. गावाबाहेर जाणारी बस खूप वेळेच्या अंतराने धावत असल्याने दोन पायांची बस करण्याशिवाय पर्याय नव्हता. निमूटपणे आम्ही लोखंडी पूल पार करून पुढे चालू लागलो. मॅपचा काही उपयोग नाहीये लक्षात आले, तेव्हा आम्ही तो गुंडाळून ठेवला. रस्त्यात कोणालातरी विचारत (तेदेखील फ्रेंच मध्ये!) जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.
बरीच पायपीट केल्यावर, चुकत आणि विचारत-विचारत शेवटी पुलापाशी जाऊन ठेपलो. एका छोटयाशा कॅनॉलवर हा जुना लाकडी पूल निवांत पडला होता. माहिती मिळून चालत तिथे पोहोचण्याच्या उठाठेवीपर्यंत संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्यामुळे पुलापाशी चिटपाखरूदेखील नव्हते. वाहनांचा मागमूस नव्हता. सुदैवाने उजेड असल्याने पाहता येण्याची आणि फलकावर लिहिलेली माहिती वाचता येण्याची शक्यता होती. पुलाजवळचे एक जुन्या बांधणीचे घर आणि आजूबाजूस लांबवर पसरलेली गव्हाची शेती असा शांत सुंदर परिसर होता. गावापासून इतक्या लांबवर रोज चित्रकलेचे सामान अंगावर वाहून आणायचे, झपाटल्यासारखे कॅनव्हास रंगवत सुटायचे यावरून वॅन गॉगला रंगांचे वेड किती मनापासून असले पाहिजे, हे तिथे पोचल्यावर लक्षात आले. अनपेक्षितरीत्या काही वेगळेच पाहायला मिळाले, याच्या आनंदात तिथे थोडा वेळ थांबलो.
आज इम्प्रेशनिस्ट चित्रकारांच्या चित्रांचे विषय पाहिले तर कदाचित खूप आश्चर्य वाटणार नाही. वास्तविक एका लाकडी पुलाचे आणि त्याच्या चित्राचे पायपीट करून पाहायला जाण्याइतके काय महत्त्व आहे, असे वाटू शकते. पण ज्या काळात केवळ बायबलमधील प्रसंगांची चित्रे रंगवली जात होती, ती चौकट मोडताना या चित्रांचे फार महत्त्व आहे. चित्राच्या विषयापेक्षा किंवा त्या वस्तूपेक्षा त्या चित्रकाराचा त्याकडे पाहण्याचा आणि कुंचल्यातून उतरवण्याचा दृष्टिकोण अधिक महत्त्वाचा, हे या इंप्रेशनिझम चळवळीचे फलित म्हटले पाहिजे. विचारांची चक्रे फिरवत, परतीच्या रस्त्याने पुन्हा चालत आणि समाधानात रूमवर परतलो.

आर्लच्या सहलीनंतर एका वीकेंडला पॅरिसच्या उत्तरेला असलेल्या Auvers-sur-Oise (ओवेर सूर उआज) गावाची सहल केली. या गावाची सफर अशासाठी महत्त्वाची होती, कारण एकोणिसाव्या शतकात अनेक चित्रकारांनी या गावात वास्तव्य केले होते. त्यात वॅन गॉग याचादेखील समावेश होता. दुर्दैवाने याच गावात राहत असताना मानसिक अस्थिरतेच्या अवस्थेत, वॅन गॉगने पिस्तुलाने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेपर्यंत वॅन गॉग चित्रकारांच्या वर्तुळात बराच प्रसिद्ध झाला होता. तो ज्या ‘ओवेर सूर उआज’मधील, Auberge Ravoux या हॉटेलमध्ये राहत होता, तिथली त्याची खोली अजूनही तशीच जतन करून ठेवली आहे. शेवटच्या दोन महिन्यांत त्याने जी चर्चची चित्रे, आजूबाजूच्या परिसरातील गव्हाच्या शेतांची चित्रे काढली, तो परिसर आम्हांला पाहता आला. वॅन गॉगच्या आयुष्यात त्याच्या लहान भावाचे, थिओचे खूप महत्त्व होते. थिओ हा व्हिन्सेंटचा आर्थिक आणि मानसिक आधार होता. व्हिन्सेंटच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी थिओचेही निधन झाले. या दोघांची थडगी गावातील सिमेटरीमध्ये शेजारी-शेजारी आहेत. तीदेखील आम्हांला पाहता आली. या प्रकारे ॲमस्टरडॅम, आर्ल आणि ओवेर सूर उआजचा प्रवास अविस्मरणीय होता .
विन्सेंट वॅन गॉगच्या आयुष्याशी निगडित गावांचा जसा प्रवास केला, तसाच क्लॉद मोने ह्या चित्रकाराशी निगडित म्युझियम्स आणि गावे यांचासुद्धा प्रवास गेल्या काही वर्षांत केला.
क्लॉद मोनेला तर इम्प्रेशनिझमचा आद्यप्रवर्तक मानले जाते. पाण्यावर तरंगणाऱ्या वॉटर लिलीजची अनेक चित्रे मोने याने काढली ज्यासाठी तो आज जगभर प्रसिद्ध आहे. १८४० मध्ये मोनेचा जन्म पॅरिसमध्ये झाला. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य सेन नदीच्या काठापाशी घालवले. त्याचे बालपण नॉर्मंडीमधील ‘ल हांव्र’ला गेले तर तरुणपण पॅरिसमध्ये! मोनेला नदीजवळ राहायला खूप आवडत असे. वॉटर लिलीज मालिकेच्या आधी मोनेची हेस्टॅक आणि कॅथेड्रल ही मालिकादेखील बरीचशी गाजली होती. कापणीच्या ऋतूत शेतांमध्ये ठेवलेल्या गवताच्या गंजीची चित्रे आणि ‘रूऑं’च्या कॅथेड्रलची चित्रे प्रसिद्ध झालेली होती. त्याहून वॉटर लिलीजची चित्रे पूर्णपणे वेगळी होती. याची संपूर्ण कल्पना मोनेनी स्वतः रचली होती. १९व्या शतकाच्या शेवटी चितारलेल्या या वॉटर लिलिजने त्याच्या प्रसिद्धीचा कळसाध्याय रचला आणि ही चित्रे कलेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली. एकाच देखाव्याची सूर्यप्रकाश आणि बदलत्या ऋतूनुसार अनेक चित्रे पुन्हापुन्हा चितारणे ही मोनेची खास शैली होती आणि यातूनच फ्रेंच ग्रामीण भागाचे अद्भुत दर्शन त्याने घडवले.
मोनेने जिथे वॉटर लिलीज ही चित्रे रंगवली, त्या जिवर्नी गावाला एकदा तरी भेट द्यावी अशी खूप इच्छा फ्रान्समध्ये आल्यापासून होती. पॅरिसपासून ट्रेनने एक तासाच्या अंतरावर वसलेले हे छोटेसे गाव. दिवसभरात गाव आणि मोनेचे घर पाहून होते त्यामुळे मुक्कामाची गरज नव्हती. टुरिस्ट सिझनमधील गर्दी वगळता एरवी ट्रेनची तिकिटेदेखील पटकन मिळतात. त्यामुळे जिवर्नीची सहल फार आधीपासून आखावी लागली नाही. गावाला भेट देणाऱ्यांमध्ये जास्त संख्या अमेरिकन आणि चायनीज टुरिस्टची असते. त्यामुळे त्यांच्या सोयीने फारसा विचार न कराव्या लागणाऱ्या अनेक गाईडेड टूरदेखील असतात. पण खरेतर त्या महाग टूर घेऊन २० जणांच्या घोळक्यात भरभर फिरण्यापेक्षा आपापल्या गतीने ऑडियो गाईड किंवा पुस्तकांच्या आधाराने शांतपणे फिरणे आम्हांला कधीही जास्त सोयीचे वाटते आणि म्हणूनच आम्ही या गावाची सहल आपली आपणच केली.
जिवर्नी या गावात मोनेने आधी भाड्याचे घर घेतले आणि नंतर घर विकत घेतले. ला रोश ग्वायोन आणि वेर्नोन या गावांमध्ये वसलेले निसर्गरम्य जिवर्नी त्याच्या पसंतीस उतरले. जिवर्नीचे महत्त्व अशासाठी की इथे चित्रे काढण्यासाठी लागणारा निसर्ग मोने याने स्वतः निर्माण केला. घराभोवती दोन मोठ्या जमिनीच्या तुकड्यांमध्ये चित्रांचा देखावा निर्मिला. बागेच्या एका भागात शेकडो जातींची फुलझाडे लावली. या बागेची काळजी तो स्वतः जातीने घेत असे. प्रत्येक उन्हाळ्यात आपल्या आवडीच्या रंगसंगतीची फुलझाडे तो या बागेत लावीत असे. या बागेतील फुलांचीही असंख्य चित्रे मोनेने चितारली. बागेच्या दुसऱ्या भागात त्याने एक मोठे तळे केले आणि त्यात वेगवेगळ्या रंगांची निंफियाजची (वॉटर लिलीची) फुले फुलवली. आजूबाजूला विपिंग विलोज आणि बांबूची झाडे लावली. त्यात जपानी पद्धतीचा एक छोटा पूल बांधला. तब्बल २० वर्षे मोनेने या तळ्यापाशी मोठ्या कॅनव्हासवर लिलीजची चित्रे काढली.
मोनेच्या मृत्यूनंतर काही काळ ह्या घराकडे त्याच्या वंशजांनी लक्ष दिले. त्यानंतर १९८० पासून फ्रेंच सरकार या घराची काळजी घेते आहे. मोनेचे घर आणि बागा आता लोकांना पाहण्यासाठी खुले आहे. त्या काळातील मोनेने लावलेल्या फुलांच्या प्रजाती अजूनही लावल्या जातात. एप्रिल ते सप्टेंबर मधल्या प्रत्येक महिन्यात वेगवेगळी फुले उमलतील अशाप्रकारे लावली जातात. तळ्याचा परिसर आणि पाण्यावरती तरंगणारी फुले अत्यंत मोहक वाटतातच पण त्याहूनही मोनेने काढलेली चित्रे जास्त मोहक वाटतात. बागेबरोबरच मोनेचे घर आणि स्टुडिओदेखील पाहायला मिळतो. बागेजवळील मोनेच्या घरात जपानी चित्रे आणि अनेक जपानी शोभेच्या वस्तू विशेषकरून दिसतात. जपानी चित्रशैलीची त्याला विशेष आवड होती, हे त्याच्या काही चित्रांमधून दिसून येते. चित्रकलेसाठी आणि खासकरून संपूर्ण मोनेसाठी हे गाव वाहिलेले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजही या गावात अनेक चित्रकार येऊन राहतात आणि मोनेच्या इम्प्रेशनिझमकडून प्रेरणा घेतात. गावात फिरताना अनेक छोट्याछोट्या स्टुडिओंमधून, घरांमधून रंगीबेरंगी कॅनव्हास दिसत होते. दुकानांमध्येही मोनेशी निगडित सुवेनिर्सचीच रेलचेल होती.

मोनेने जिवर्नीच्या या घरात जवळपास २५० वॉटर लिलीची चित्रे चितारली. यांतील अनेक चित्रे आता पॅरिसमधील ओरांजरी या संग्रहालयात पाहावयास मिळतात. मोनेचे जिवर्नीमधले घर, वॉटरलिलीचे तळे, घराभोवतीची बाग पाहून आल्यावर खरेतर लगेच पॅरिसमधल्या ओरांजेरी म्युझियमला जायचे होते, पण असेच काही ना काही कारणे निघत ते लांबणीवर पडत राहिले होते. शेवटी एकदा जायचेच असे ठरवून म्युझियमला भेट दिली. जगप्रसिद्ध लूव्र म्युझियमच्या समोर तुलरी गार्डनच्या मोठ्या परिसरात, एका कोपऱ्यात ओरांजरी म्युझियम आहे. लुव्रच्या मानाने या म्युझियमचा आकार लहान आहे आणि सगळी गर्दी लुव्रकडे धावत असल्याने या म्युझियममध्ये कमी गर्दी असते.
१९२७ मध्ये क्लॉद मोनेच्या मृत्यूनंतर त्याच्या वॉटरलिलीज चित्रांचे लोकार्पण झाले. या वॉटरलिली सिरीजमधल्या ८ पॅनेल्सना ओरांजरीच्या पहिल्या मजल्यावर दोन मोठ्या खोल्यांमध्ये लावले आहे. एकदा या खोल्यांमध्ये शिरले की चहूबाजूंनी एकमेकांत सहज मिसळलेल्या रंगांच्या असंख्य छटा आणि आपण! बाकी सगळ्याचा विसर पडतो. मधल्या कोचावरची जागा पकडली की चित्रांकडे किती काळ पाहत राहू, हे कळणारदेखील नाही. वॉटरलिलीच्या चित्रांचे वैशिष्ट्य असे की, यामधील रंगसंगती अत्यंत सुसंगत आहे आणि क्वचित काही चित्रांमध्ये पिवळा आणि केशरी या रंगांचा झुकता वापर वगळता, इतर चित्रांमध्ये बऱ्यापैकी एकसारखी रंगसंगती आहे. निळा, जांभळा आणि हिरवा अशा रंगांच्या छटांचा मुक्त वापर आणि पाण्यामध्ये गुलाबी, पांढरी ठिपक्याप्रमाणे लिलीची फुले! कुठेही करकरीत असे आकार नाहीत आणि जमीन आणि पाणी यांचे अंतर दाखविणाऱ्या ठळक रेषा नाहीत. कधी आभाळातून झिरमिळणाऱ्या विपिंग विलोजच्या पानांचे झुपके आणि एखादे झाडाचे खोड वगळता स्पष्ट असे कोणतेही आकार नाहीत. पाण्याचे नितळपण आणि मध्येच शेवाळपण, सारे काही रंगांच्या कमीअधिक वापरातून जाणवणारे! संपूर्ण चित्र पाहताना नजर कुठेही एकाच भागावर स्थिरावणार नाही, असे चित्रात जाणवणारे कमालीचे प्रवाहीपण! ते प्रत्यक्ष अनुभवायलाच हवे!
वास्तविक मोने आणि वॅन गॉग यांचा साधारण कार्यकाळ एक. काही काळ दोघांनी पॅरिसमध्येही काढला. दोघांची चित्रशैली वेगळी, आयुष्यं तर कितीतरी वेगळी! मोनेला हयात असताना प्रसिद्धीची फळे चाखायला मिळाली तर वॅन गॉगचे एकच चित्र त्याच्या हयातीत विकले गेले. पण दोघांमधला दुवा एकच! रंगांविषयीचे कमालीचे प्रेम आणि झपाटलेपण! आणि यांची चित्रे पाहताना ते पुरेपूर अनुभवायला मिळते. या दोन कलाकारांच्या आयुष्याशी निगडित गावांचा प्रवास आम्ही टप्प्याटप्प्यात केला. तो आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे केला, तुकड्यातुकड्यांत केला, तरी प्रवासाच्या आठवणी आणि या गावांनी जतन केलेल्या त्यांच्या आठवणी, याचे जे एकसंध चित्र मनात कोरले गेले आहे, ते तसेच दीर्घकाळ मनात राहील असे वाटते.
प्रियांका देवी -मारुलकर
मूळची पुण्याची, २०११ पासून शिक्षणासाठी आणि नंतर पोस्टडॉक्टरल रिसर्चसाठी, पॅरिसमध्ये राहत आहे. पिअर आणि मारी क्युरी या विद्यापीठांतून २०१५ मध्ये कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. त्याबरोबरच चित्रकलेची आवड आहे. मुख्यत्वे जलरंगाचे माध्यम जास्त भावते. (ब्लॉग लिंक http://priyanka-devi.blogspot.fr/) विविध देशांच्या भटकंतीमध्ये तिथला इतिहास, संस्कृती, लोककला यांविषयी जाणून घ्यायला आवडते.
छायाचित्रं – प्रियांका देवी – मारूलकर, वॅन गॉग आणि मोने चित्रं – विकीमीडिया कॉमन्स
‘ही वाट दूर जते हा लेख वाचला. खूप मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे ; चित्रकलेची आवड असलेल्या एका होतकरू मराठी तरुणीने Monet आणि Van Gogh यांना लेखणीद्वारे वाहिलेली ही शब्दांजली सुंदर !
LikeLike