अनमोल मेघालय

मानसी होळेहोन्नुर

मी एक स्वेच्छेने घरी बसलेली शिक्षित गृहिणी. घर, नवरा, मूल यामध्ये मी कुठेतरी हरवत चालले आहे असं वाटत असताना मी स्वतःला परत भेटायचं ठरवलं. आणि त्यासाठी एकटीनं कुठे तरी भटकायला जायचं ठरवलं. तशी मी आधीपासून थोडी चक्रम म्हणूनच प्रसिद्ध. एके दिवशी उठून त्याला म्हटलं, मी एकटीच कुठेतरी फिरायला जाणार आहे. स्वतःला शांतता मिळावी म्हणून. तोही बिचारा लगेच हो म्हणाला. जवळपास दहा वर्षांनी मी एकटी उठून मला हवं तसं ५-६ दिवस जगणार होते. नुसतंच फिरण्याऐवजी काही चांगलं काम तरी बघ म्हणत आईनी एका सामाजिक संस्थेचा पत्ता दिला. या संस्थेचं मेघालयात बरंच काम चालतं.

ईशान्य भारतातलं हिरवंगार मेघालय बघण्याइतकीच मी न बघितलेला प्रदेश, माणसं, घरदार सोडून भलत्याच ठिकाणी,प्रतिकूल वातावरणात काम करणारे लोक बघायला उत्सुक होते.

शाळेत असताना भूगोलामध्ये वाचलं होतं. मेघालयात गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या असतात. तिथल्या लोकांच्या जमातीवरूनच ही नावं पडली आहेत. केरळ सोडून फक्त मेघालयात असलेली मातृसत्ताक पद्धती, नावानुसारच ढगांचं घर असलेलं राज्य, आणि त्यामुळेच पावसाचा वरदहस्त असलेलं मेघालय. इतका पाऊस की भारतातलं सर्वात जास्त पाऊस नोंदवलेलं ठिकाणदेखील याच राज्यात आहे. या सगळ्यामुळेच हे राज्य कायम एक कुतूहलाचा विषय होतं.

मेघालय, आसामच्या शेजारचं राज्य. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी एक. ख्रिश्चन बहुसंख्य असले तरी स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारं राज्य. शिलॉंग ही या राज्याची राजधानी. भारतीय हवाई दलाचा मोठा तळ इथे आहे. ज्याप्रमाणे आसामी संस्कृतीवर बंगाली छाप दिसून येते तशीच या राज्यावर इंग्रजांची छाप दिसून येते. आज इंग्रज जाऊन आता ६७ वर्ष झाली असली तरी  शिलॉंग शहरात त्यांच्या खुणा जागोजागी मिळतात. मग ते क्रिकेट सोडून फुटबॉल खेळणं असो किंवा पारंपारिक लोकसंगीताबरोबरच रॉक संगीताचा वरचष्मा असो. म्हणूनच शिलॉंगला भारताची रॉक संगीताची राजधानी मानलं जातं.

शिलॉंग या राज्याच्या राजधानीच्या शहरात संमिश्र लोकसंख्या आढळते, खासी, गारो, पनार या स्थानिक जमातीच्या लोकांबरोबरच बंगाली, आसामी आणि थोड्या फार प्रमाणात बिहारी लोकांचं अस्तित्व जाणवतं. शहरात कुठेही भाषेचा अडसर जाणवत नाही, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा वापरून सहज फिरता येतं. उंचसखल भागेत वसलेलं गाव असल्यामुळे कित्येक घरांचे पहिला मजला खालच्या रस्त्यावर तर दुसरा मजला वरच्या रस्त्यावर आलेला आहे. शहरातले रस्ते रुंदीला फारसे वाढवणे शक्य नसल्यामुळे वाहतुकीला आपोआपच शिस्त आलेली आहे. गाडीचालक साऱ्या नियमांचं पालन करतात, कारण जर एकाने चूक केली तर त्याचा परिणाम बाकीच्या गाडीवाल्यांना भोगावा लागून वाहतूक खोळंबून राहते हे स्वानुभावाने सगळ्यांना माहीत झालेलं आहे.

IMG_20170415_171346

जसजसं शिलॉंग मधून बाहेर पडावे तसे वळणवाटांचे रस्ते सोबत अजूनच घट्ट करतात. सुंदर हिरवे डोंगर आणि त्या हिरव्या रंगाला मध्येच छेद देणारे पांढरे शुभ्र धबधबे हे साऱ्या मेघालयाचं वैशिष्ट्य. गारो, खासी आणि जयंतिया या तीन टेकड्यांमुळे इथे पाऊस अडवला जातो आणि त्यामुळे इथली जंगलं कायम हिरवीगार राहतात. इथला स्थानिक माणूस आजही शेतीत रमतो, त्यांच्या स्थानिक सणांमध्ये गातो, नाचतो, पारंपारिक भात, भाज्या, मांसाहार करतो.

पर्यटनाच्या नकाशावर आलेली गावं वगळता आजही इथली गावातली लोकं हिंदी इंग्रजी पासून लांब आहेत, बाहेरच्या लोकांमध्ये ते बुजतात. जरी इथे ख्रिश्चन बहुभाषिक असले तरीही इंग्रजी सगळीकडे समजते असं नाही. आपण उगाचच भाषा आणि धर्म यांची सांगड घालतो. खरंतर त्या दोन वेगळ्या गोष्टी.

आताशा खाजगी मोबाईल कंपन्या सर्वदूर पसरल्या आहेत आणि त्यांचे इंटरनेट, खासगी वाहिन्यांचे जाळे पसरत चालले आहे त्यामुळे हिंदी मालिका बघितल्या जातात. उर्वरित भारताशी त्यांचा संपर्क होत असतो तो याच माध्यमातून. आता आता अनेक गावांतून मुलं शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला, शिलॉंगला गेलेत, किंवा काही आसाम, भारताच्या इतर भागातही जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे गावांची नावं अगदीच अनोळखी नसतात.

कोणतंही शहर जसं स्वतः चालून बघितल्याशिवाय त्याचं दर्शन घडवत नाही तसचं कोणतीही संस्कृती ही प्रत्यक्ष राहायचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.

एप्रिलमध्ये मी अशाच एका जेमतेम तीन हजार वस्ती असलेल्या गावात राहिले.

शहरांमध्ये असणाऱ्या औपचारिकता गावांमध्ये नसतात, तिथे सगळंच मोकळं ढाकळं असतं. त्यामुळेच पहिल्याच भेटीत मला एक दोन जणांनी माझं वय विचारलं, त्यानंतर लग्न झालंय का, हेही. हिंदी मालिका, आणि चित्रपट बघत असल्याचा परिणाम म्हणून त्या लोकांनी लगेच मग मी ‘मांग मध्ये सिंदूर’ नाही लावत का, म्हणूनदेखील विचारलं. मी मंगळसूत्र घालते सांगितल्यावर म्हणजे सगळेच नॉन ट्राईबल्स सिंदूर लावत नाही का, असंही विचारलं.

मला हे ऐकायला खूप मजा वाटली. धर्म, भाषा, यावरून खूप वेळा माझं वेगळेपण दाखवलं गेलं होतं पण यावेळी या सर्वांपेक्षा मी त्यांच्या जमातीची नसणं हे अधोरेखित करून इतर जमातीची प्रतिनिधी म्हणून बघितलं जात होतं.

खूप सारे प्रश्न तिथल्या डोळ्यांमध्ये, ओठांमध्ये होते, तोडक्या मोडक्या मालिकांमधून शिकलेल्या हिंदीमधून ते मला विचारत होते, आणि माझी उत्तरं समजून घेत होते.

सगळ्यांचा एकच लाडका प्रश्न होता मी कोणकोणत्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना भेटले. मला अनेक नवीन गाणी येत नाही हे पाहून त्यांना माझ्या भारतीय चित्रपटसृष्टीबद्दलच्या अज्ञानाची कीव आली. आणि त्यांनी मला बरीच नवीन गाणी शिकवली. कोणाकोणाचं कोणाकोणाशी अफेअर सुरु आहे हेसुद्धा सांगितलं. एकीने सांगितलं, दीदी मला रणबीर कपूर आवडत नाही. कारण त्याने कॅटरीना कैफला नाही म्हटलं. क्रिकेट, आणि सिनेमा या दोन गोष्टी भारतात कोणालाही जोडू शकतात याची परत एकदा खात्री पटली.

रस्ते फक्त गावं जोडण्याची कामं नसतात करत. ते त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनाही जोडत असतात. सुदैवाने मेघालयातच नव्हे तर आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये देखील रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे तिथल्या माणसांशी मन जोडायला वेळ लागत नव्हता.

खासी ही मेघालयातील एक  प्रमुख जमात. मेघालयाच्या लोकसंख्येपैकी ५०% लोक या जमातीचे आहेत. खासी संस्कृतीमधे कोंबड्याला खास महत्व आहे. त्यांच्या मते, कोंबडा जसा सगळ्या जगाला उठवायचं काम करतो तशीच अपेक्षा साऱ्या खासींकडून आहे. अतिशय काटक असलेले हे लोक जात्याच शूरवीर असतात.

तीरोत सिंग यांच्या नेतृत्वाखाली खासी लोकांनी इंग्रजांवर १८२९ साली हल्ला केला होता. खरं तर त्या आधी खासी भागातून रस्ता बांधण्यासाठी तीरोत सिंगनी  इंग्रजांना मदत केली होती, पाठींबा दिला होता, पण जेव्हा त्याला त्यांच्या पाठिंब्याची गरज होती तेव्हा त्यांनी त्याला मदत केली नाही त्यामुळे चिडून त्याने खासी सैन्यासह त्यांच्यावर हल्ला केला, पारंपारिक अस्त्र शस्त्र असणाऱ्या खासी लोकांचा असा किती दिवस निभाव लागणार होता, पण तरीही त्यांनी जीवाची बाजी लावून राजाला साथ दिली. शेवटी राजा तीरोतसिंगने तिथून पळ काढला, लपतछपत तो आत्ताच्या बांगलादेशमध्ये जाऊन पोहोचला, एका फितुरामुळे तो इंग्रजांच्या तावडीत सापडला, पण त्याआधीच त्याने आत्महत्या केली.

इंग्रजांविरुद्ध झालेल्या या बंडाबद्दल या भागाबाहेर फारसं बोललं लिहिलं जात नाही. दुर्दैवाने भारताच्या इतर भागात या लढ्याची माहिती कधी पोहोचलीच नाही.  भारताच्या बहुभाषिक इतिहासामध्ये कायम उत्तरेकडच्या किंवा मुघल इतिहासाला केंद्रस्थानी ठेवून इतिहासाच्या पुस्तकांची मांडणी केलेली आहे आणि त्यामुळेच तिरोत सिंग, आसाममधली अहोम राजसंस्था, अरुणाचल प्रदेशातील इटानगर येतील राजसंस्था यांची माहिती भारताच्या इतर भागातल्या जनतेपर्यंत पोहोचतच नाही.

खासी लोक बोलतात ती खासी भाषा, पण या भाषेला स्वतःची लिपी नाही, त्यामुळे इंग्रजांनी तिला आपलीशी केली आणि त्यांची लिपी दिली. त्यामुळे आजही खासी ही रोमनमध्ये लिहिली वाचली जाते. आता सुधारणांचे वारे या भागापर्यंतही येऊन पोहोचलेत त्यामुळे खासी लोक देखील शिकून शहरांमध्ये जातात, परदेशातही गेलेत. गावागावांमध्ये किमान प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. फक्त खासी माध्यम असल्यामुळे ही मुले अजूनही हिंदी इंग्रजीपासून थोडी लांबच आहेत. बेंगलोर, मुंबई नावाने माहीत असलेल्या इथल्या लोकांना, मुलांना कधीतरी आपणही त्या शहरांमध्ये जावं असं वाटतं. अनेक गावांमधली मुलं शिकण्यासाठी मुंबई पुण्यात येऊन परत गावाकडे नोकरी करायला गेले आहेत, तर काही लोकं अजूनही मुंबई बेंगलोरमधे नोकरीला आहेत. आपल्या गावातल्या या मुलांप्रमाणे आपणही शिकण्यासाठी मेघालयाबाहेर जावं अशी स्वप्नं त्यांच्या त्या निरागस डोळ्यात मला दिसत होती.

खासी लोकं अजूनही समृद्धीपासून कोसो लांब आहेत. मुळात या साध्या सरळ लोकांचा सारा भर आहे शेतीवर, थोडाफार पर्यटन व्यवसाय पसरतोय, पण त्यातही आसामी, बांगलादेशी बाहेरचे लोक येऊन पैसे मिळवत आहेत. इथले मूळ निवासी फक्त त्यांची जागा भाड्याने देतात किंवा शेती एके शेतीच करतात. अजूनही या भागामध्ये फक्त मूळ निवासींनाच फक्त जागा विकत घेता येते. सरकार एक प्रकारे यामुळे मूलनिवासी लोकांसाठी रोजगाराच्या संधी राखून ठेवत आहे.

मुळात हे निसर्गपूजक. यांच्या मते यांचे पूर्वज स्वर्गातून आले होते. फार फार वर्षांपूर्वी स्वर्गातून १६ कुटुंबं दररोज पृथ्वीवर यायची शेतीसाठी. स्वर्ग आणि पृथ्वी यात एक जिना होता, पण एके दिवशी अचानक घडलेल्या काही चुकांमुळे त्यातली ७ कुटुंब पृथ्वीवरच राहिली. त्याच या ७ बहिणी, सेवन सिस्टर्स. खासी लोक आजही या समजुतीवर ठाम आहेत आणि त्यामुळेच रीभोई जिल्ह्यातल्या एका झाडाची ते दरवर्षी पूजा करतात, त्यांचा असा समज आहे की या झाडावरूनच ती स्वर्गाची शिडी सुरु होते. दरवर्षी तिथे पूजा आणि बळीदेखील दिला जातो. पूर्वी नरबळी दिला जायचा पण ब्रिटिशांनी तो बंद करवला.

IMG_20170414_110146

अतिशय साधे, मनाने सरळ असणारे हे खासी लोक स्वतःच्या संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल अभिमानी असतात. मातृभाषेतून बोलणं त्यांना कमीपणाचं नाही तर परंपरा जपल्याचं लक्षण वाटतं. जैनसेम ही त्यांच्या पद्धतीची रोज वापरायची साडी. दोन कापडं दुमडून क्रॉस करून खांद्यावरून बांधली की झाली ही साडी. दिसायला अगदी साधी वाटणारी ही साडी तिथल्या वातावरणासाठी अगदी योग्य आहे. गुडघ्यापर्यंत रुळणाऱ्या या साडीमध्ये त्यांना कुठेही चढता, उतरता येतं. जितक्या सहज एखाद्या ऑफिसमध्ये बायका या साडीत वावरतात तितक्याच सहज त्या शेतामध्येही याच साडीत काम करतात. गुडघ्यापर्यंतच असल्यामुळे पावसात पाणी साठलं तरी सहज चालता येतं. इथे आर्द्रता जास्त असल्यामुळे घाम देखील जास्त येत असतो. ही झाली रोजची साडी. काही खास प्रसंगासाठी जी साडी वापरली जाते तिला म्हणतात धारा. या धारामधले सगळ्यात जास्त वापरले जाणारे रंग म्हणजे लाल आणि पिवळे. हळदकुंकू म्हणून ओळखली जाणारी ही रंगसंगती भारताच्या साऱ्याच राज्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रत्येक बाईकडे या रंगसंगतीची एक साडी किंवा ड्रेस तरी असतोच.

खासी लोकांमध्ये आजही मातृसत्ताक पद्धती आहे. सगळ्यात छोटी मुलगी ही आईच्याच घरी राहते आणि आईवडिलांची काळजी घेते. घरातल्या कोणत्याही महत्वाच्या निर्णयात आईबरोबरच मामाचंही मत महत्वाचं मानलं जातं. एकच आडनाव असणाऱ्या घरात लग्न होत नाही. अनेक खासी आज ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत पण लग्न करताना कुठेच ही अडचण जाणवत नाही. खासी लोकांमध्ये धर्मापेक्षा जास्त महत्व असतं ते खासी असण्याला. त्यामुळे नवरा ख्रिश्चन आणि बायको सेंगखासी, किंवा उलटंदेखील असतं. पण यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही.

नवरा शेतातून विड्याची पानं, सुपारी, झाडूचे तुरे वगैरे आणून देतो, बायका घरबसल्या विड्याच्या पानांची बंडलं बांधायची, झाडूच्या मोळ्या बांधायची कामं करतात. विड्याची पानं, सुपारी, झाडू ही इथली महत्वाची उत्पादनं आहेत. या व्यतिरिक्त फळं, भाज्या, तांदूळ यांची शेती देखील केली जाते. अशा ठिकाणी बायकाही शेतावर जातात. कसलेल्या मालाला बाजारात घेऊन जाणं हदेखील बायकांचेच काम समजलं जातं. अर्थात मग बाजारात सामान विकून मिळालेल्या पैशातून बाजारहाट पण मग ती बाईच करते.

पान आणि सुपारी चघळणं हा इथला सार्वत्रिक छंद म्हणलं तरी हरकत नाही. येता जाता उठता बसता लोक पान त्यावर नखाएवढा चुना आणि कच्ची सुपारी खातात. कोणीही रस्त्यात भेटलं, घरी आलं, तरी त्याचं स्वागत हे पानसुपारीनं होतं. पानसुपारी हे इथलंच नव्हे, तर ईशान्य भारतातल्या लोकांचं आवडतं व्यसन आहे, म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

खासी संस्कृतीमध्ये सणांना अपार महत्व आहे. त्या प्रत्येक सणांना निसर्गाशी जोडलेलं आहे. त्यांचं रोजचं आयुष्य देखील तेवढंच निसर्गाच्या जवळ जाणारं आहे. भात, एखादी रान भाजी, बटाटा किंवा माशाचे कालवण, किंवा चिकन, पोर्क हे त्यांच्या जेवणाचे घटक. हे सगळे एकाच वेळी अर्थातच नाही. सामान्यतःभात आणि भाजी किंवा उकडलेला पाणीदार बटाटा हे सर्वसामान्य खासी माणसाचं अन्न. खरंतर बटाटा आपल्या देशात आलाच एक तीनशे चारशे वर्षांपूर्वी, पण झटपट त्यांनी सगळीकडे हातपाय पसरले. या भागातही बटाटा हा अतिशय महत्वाचा जिन्नस समजला जातो, गरीब श्रीमंत सगळ्यांच्याच स्वैपाकामध्ये.

IMG_20170413_132817

कोणत्याही घरात गेले तर स्वयंपाकघर हे अतिशय सुटसुटीत असतं. मुळात रोजचं जेवण ठरलेलं असतं सकाळ असो, दुपार असो वा रात्र, भुकेची कोणतीही वेळ असो भातच खाल्ला जातो. अजूनही बहुतांश घरांमध्ये चुलीचाच वापर होतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर लाकडं पेटवली जातात किंवा पावसाळी रात्री तर रात्रभर एखादं लाकूड जळत असतं ऊबेसाठी.

बहुतेक घरं लाकडाची किंवा सिमेंटच्या भिंती बांधल्या तरी फरशीसाठी मात्र लाकडाचाच वापर होतो. त्यामुळे चूल ही घराच्या मागच्या बाजूलाच असते. इथे पाणी फारसं  प्यायल जातं नाही कारण थंडी खूप असते, म्हणून पाणी गरम करून त्यात चहा घालून बिनदुधाचा लाल चहा मोठ्या प्रमाणात लोकं पितात. अनेक ठिकाणी गायीगुरं नसल्यामुळे दूध मिळणं अवघड असतं, त्यामुळे आणि सवयीमुळे देखील लोक सर्रास लाल चहाच पितात. कोणाच्याही घरी गेलात तर चहा आणि विड्याच्या पानाला नाही म्हणणं म्हणजे त्या यजमानाचा अपमान समजला जातो.

घराची यजमानीण लोकांच्या हिशोबानं भाताचं भांडं चुलीवर चढवते. भात शिजला की मग अंदाज घेतला जातो कोणकोणत्या भाज्या आहेत याचा. मग जर असली एखादी भाजी तर ठीक नाहीतर बटाट्याच्या मोठ्या फोडी करून, एका भांड्यामध्ये चुलीवर शिजायला ठेवल्या जातात. त्यात थोडी हळद, मीठ घातलं, रसरशीत होईल असं पाणी घातलं की त्या दिवशीची भाजी तयार. तिखटाचा, मसाल्याचा कमीत कमी वापर या घरांमध्ये होतो. ज्या कोणाला जेवताना तिखट हवे असेल तर हिरव्या मिरच्या आणि आल्याचा डबा समोर देतात. मग एखाद दिवशी शेतातून येतानाच एखादी रानटी पालेभाजी, पाला, किंवा काही खास प्रकारच्या गवतांच्या पाती आणल्या जातात, मग त्या बारीक कापून त्यांची बटाटा घालून किंवा तशीच भाजी केली जाते. कधीमधी चव बदल म्हणून मसूर डाळ घट्ट वरणाकरता किंवा एखाद्या भाजीत घट्टपणा येण्यासाठी घातली जाते. कधी अंड्याचे ऑम्लेट, भाजी किंवा माशाचं कालवण केलं जातं. चिकन मटण याचबरोबर इथे बीफ, पोर्क देखील खाल्ल जातं.

IMG_20170413_132854

एक बाई म्हणून मला इथली स्वयंपाकघरं खूप आवडली, हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या बाटल्यांमध्ये त्यांचा सारा पसारा संपत होता. जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा जे सहज मिळत होतं ते खाण्याकडे इथे कटाक्ष होता.

इथे अनेक भागांमध्ये पाऊस इतका जास्त पडतो की माती वाहून जाते. या भागाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बेरी वर्गातली अनेक फळं मेघालयात मिळतात. ती स्थानिक पातळीवरच मिळतात, आणि खाल्ली जातात. चेरीसारखी दिसणारी आंबट गोड फळं, तशीच हिरव्या रंगाची काही फळं होती. गावांमध्ये प्रत्येकाच्या घरात अननसाची झुडूपं, तुतीची झाडं आगंतुकासारखी आलेली होती. या तुतीच्या हिरव्या फळांची आणि वाळवलेल्या माशांची एक चटणी इथे घरोघरी केली जाते.

भाताचे अनेक वेगवेगळे पदार्थ इथे खाताना मला आपल्याकडे केल्या जाणाऱ्या पदार्थांची आठवण झाली. पिठा हा तांदळाच्या भरडीपासून केला जाणारा पदार्थ आसाम, अरुणाचल प्रदेशातही आम्हाला खायला मिळाला. याची चव खूपशी केरळी पुटटूच्या जवळ जाणारी होती. तर एक तांदळाचे पीठ आणि गुळ घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीयन अनारशाचे भाऊबंद किंवा बहिण होती. तशाच प्रकारचा पदार्थ दक्षिण भारतात कज्जाका म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तांदूळ, भात हे साऱ्या भारतीयांचं सर्वसमावेशक अन्न आहे असं मला नेहेमी वाटतं. भाताबरोबरचं कालवण प्रदेशानुसार बदलतं पण भात हा साऱ्या भारताला पुरून उरलेला आहे. जसं पंजाबी ढाब्यांमध्ये दोन तीन भाज्या तयार करून ठेवलेल्या असतात तशाच इथल्या हमरस्त्यावरच्या हॉटेलसदृश्य घरांमध्येही भात आणि सोबत भाजी, चिकन, पोर्क असं तयार मिळतं.  आता इथे देखील भुजिया, शेव, केक, क्रीम बिस्कीट या विकतच्या गोष्टीचं प्रमाण हळूहळू वाढतंय, आणि त्याचबरोबर थोडा थोडा प्लॅस्टिक कचरादेखील आता इथे दिसायला लागला आहे.

गावातच किंवा जवळच मुलगी दिलेली असल्यामुळे प्रत्येक घर हे एकमेकाशी कुठल्यान् कुठल्या नात्यानं जोडलेलं असतं. त्यामुळे कोणीही कोणाच्याही घरी जाऊन सरळ जेवायला बसू शकतात. किती तरी वेळा, घरचा पुरुष बायकोचं घरचा स्वैपाक आवडला नाही म्हणून जवळच असलेल्या आईच्या घरी जाऊन जेवून येतात.  आणि रात्री परत घरी झोपायला येतो. जशी माहेरवाशीण लेक घरी आल्यावर आई तिचे लाड करते, तसेच या माहेरवाश्या ल्योकाचे सुद्धा लाडच होतात.  मिळून मिसळून राहणारे, पैशाचे मागे न लागणारे हे लोक पाहून, त्यांचे समाधानी चेहरे पाहून पटतं आयुष्य सुंदरच आहे फक्त ते अनुभवण्यासाठी उघडे डोळे, उघडं मन हवं. एकदा का ते मोकळेपणाचं सुख अनुभवलं की चेहऱ्यावर तृप्ततेचा जो आनंद येतो तो कोणत्याही पैशांनी विकत घेता येत नाही. अशा सुखी समाधानी जिवांमध्ये राहून मलाच श्रीमंत वाटत होतं.

कोणताही माणूस खरा ओळखू येतो त्याच्या घरात. त्याचं स्वतःच घर हे काही अंशी आरसा असतं त्याच्या व्यक्तिमत्वाचं. साधीसुधी घरं मला खूप आवडतात. त्या घरांमध्ये एक आपुलकी सहजता असते, कोणताही बडेजाव नसतो. मोठ्या घरांमध्ये कित्येकदा हरवायला होतं. कधी कधी तर श्वास ही घुसमटतो.

खासी घरं हा एक वेगळाच विषय आहे. इतकी सुंदर लाकडी घरं, आणि त्यांना कष्टाचा सुंदर आकार आहे. मेघालयाच्या बहुतांश भागातली घरं लोकं स्वतःच बांधतात, लाकडं देखील स्वतःच रानातून आणतात. हा पूर्ण भागच उंचसखल असल्यामुळे कोणतही घर हे एका पातळीवर नसतं. प्रत्येक घर खाली वर असतं. आणि पावसाचं प्रमाणही जास्त असल्यामुळे जमिनीपेक्षा थोड्या उंचीवरच सगळी घरं बांधलेली असतात. स्थानिक उपलब्ध वस्तुंचाच वापर ते रोजच्या जगण्यात करतात. कोणाचंही अनुकरण न करता आपल्या आसपास जे आहे त्याचा सुयोग्य वापर करून आयुष्य सोपं करतात. त्यामुळे सिमेंट मातीच्या घरांपेक्षा इथं बांबू लाकडाची घरं जास्त बघायला मिळाली. घर बांधताना गावच्या पंचायतीकडून, किंवा जातसमुदायाकडून गरजूंना विचारणा केली जाते. मग त्यानंतर ती जागा कधी फुकट तर कधी बाजारभावाने दिली जाते. एकाच समुदायातली लोकं साधारणपणे आजूबाजूलाच राहतात. इथे कॅथलिक, प्रोबेटेरीअन प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन लोकसुद्धा सहसा स्वजातीय लोकांसोबत राहताना दिसले.

घर म्हणजे एक भला मोठ्ठा हॉल, त्याला लागून स्वयंपाकघर, जागा असली तर अजून एखादी खोली बांधतात. भितींना आधार देण्यासाठी मोठे मोठे लाकडाचे ओंडके लावले जातात तर भिंती वेताच्या किंवा लाकडाच्याच केल्या जातात. क्वचित काही ठिकाणी सिमेंटची घरं दिसतात पण ती अगदी तुरळक. माणसाला कायम आपल्याकडे जे नसतं त्याचं अप्रूप असतं. तिथल्या एका घराचं बांधकाम बघत असताना स्थानिक रहिवाशी म्हणाला तुमच्यासारखी आमची घरं, भिंती सिमेंटच्या नसतात, त्याला जास्त पैसे लागतात.

घराच्या पुढे थोडी तरी जागा सोडलेलीच असते, बऱ्याच वेळेला त्या जागेत झाडूचे भारे वाळवायचं,  बांधायचं, काम चालत. काही वेळेला एखादं छोटं डबकं तयार करून त्यात मासे सुद्धा पाळले जातात. मग जागा मिळेल तिथं तमालपत्र, तुती(मलबेरी) ची झाडं, अननसाची झुडपं घराला सोबत म्हणून उगवतातच. गावाजवळून वाहणाऱ्या छोट्या नद्यांमधून गावात पाणी मात्र सगळीकडे आलेलं आहे. तीच गोष्ट विजेची देखील. इथे घरांमध्ये एलइडीचे दिवे दिसतात. तुरळक घरांमध्ये एअरटेलच्या डिश अन्टेना देखील आताशा दिसायला लागल्यात.

इथलं जगणं इतकं साधं आहे की त्यांना कोणत्याही भपक्याची, फर्निचरची गरजच भासत नाही. स्वयंपाकघरात बांबूच्या फळकट्या एकावर एक बांधून सामान ठेवायची सोय केली जाते. अर्थात ह्या फळकुट्या चुलीच्या वरच असतात. आजही अनेक घरांपर्यंत गॅस पोहोचलाच नाहीये. अर्थात त्याचं महत्वाचं कारण गरिबी हे आहेच. आणि एक कारण आहे इथले लोक पटकन स्वतःच्या सवयी, प्रथा मोडायला धजावत नाहीत. त्यामुळेच इथे घरात स्वतंत्र संडास अजून आलेले नाहीत. आताशा घराच्या जवळ संडास बांधतात पण प्रत्येक घरात संडास यायला अजून काही दशके नक्कीच लागतील. अर्थात हे मी ग्रामीण भागाबद्दल  सांगते आहे. अर्थात त्यामुळे स्त्रियांची कुचंबणा होते. कित्येकदा असा पाऊस लागतो एकेकदा की दोन दोन तीन दिवस थांबत नाही पण तरीही लोकांना घरातच एक संडास बांधून घ्यावं, हे वाटत नाही हे ही खरं. नवीन बांधणाऱ्या घरांमध्ये सुद्धा संडास बांधण्याचा विचार केला जात नाही.

सतत पान, चुना आणि कच्च्या सुपारीसोबत खाल्ल्यामुळे इथे तोंडाचे, दाताचे आजार मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. पण तरीही आधुनिक औषधांपेक्षा पारंपारिक औषधांवर जास्त विश्वास. वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये पसरलेल्या मेघालयामध्ये रस्त्यांचं जाळं त्या मानाने कमी आहे. अनेक शेजार पाजारची गावंही रस्त्यांनी जोडली गेलेली नाहीत. त्यामुळे छोट्या भासणाऱ्या अंतरासाठी देखील जास्त वेळ लागतो.

मेघालयच्या प्रेमात पडण्यासाठी मला हे सगळं पुरेसं होतं.

मानसी होळेहोन्नूर

16998835_1617575354938623_3292716344238909690_n

इ-मेल – manasi.holehonnur@gmail.com

सहा वर्षाच्या मुलाच्या वेड्यावाकड्या प्रश्नांची सरळ उत्तरं देणारी आई, अतिथिदेवो भव म्हणत स्वतःची खाण्याची, पाहुणचार करण्याची हौस भागवणारी गृहिणी, अणुरेणूपासून, मंगलयानापर्यंत कशावरही गप्पा मारायला तयार असलेली गप्पिष्ट मैत्रीण, बोलूनही उरलेली बोलण्याची, काहीतरी सांगण्याची उर्मी लिहिण्यातून व्यक्त करण्यासाठी धडपडणारी लेखिका.

One thought on “अनमोल मेघालय

 1. Manasi,
  khuuup sundar lekh.. tu sundar lihitesach.. pan mazya awadtya Sayali Tainchya ankamadhye tu evdha sundar article lihilya baddal tuza vishesh abhinandan 🙂

  Apalya nagar cha nav ajun motha kelas tu 🙂
  Keep it up..

  Amruta Kulkarni Bedare

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s