उत्तर पूर्व क्वीन्सलँड

श्रुतकिर्ती पुंडे-काळवीट

 ऑस्ट्रेलिया म्हटले कि डोळ्यापुढे येतो समुद्र. त्यातही केर्न्स (Cairns), उत्तर क्विन्सलँड्च्या समुद्रकिनावरचं पर्यटनस्थळ. ग्रेट बॅरिअर रीफचे ( प्रवाळ खडक) प्रवेशद्वार आणि विषुववृत्तीय वर्षा-वने, स्वच्छ सूर्यप्रकाश यासाठी प्रसिध्द झालेलं. वर्षातील जवळ जवळ तीनशे दिवस सूर्यप्रकाश, घनदाट हिरवीगार रेनफॉरेस्टस व रीफपासून जवळ असणं ही याची महत्वाची वैशिष्ट्यं आहेत.

या सगळ्या गोष्टी ब्रिस्बेनला रहायला आल्यापासून कानावर पडत होत्या. २०१५ च्या ख्रिसमस व्हेकेशन्समध्ये या सगळ्याला मूर्तरूप देता आलं. ऑस्ट्रेलियातच राहत असल्याने self driven आणि  self planned  हाच प्रवासाचा मार्ग निवडला गेला आणि तयारीला सुरुवात केली. डिसेंबर हा तसा या प्रदेशाला भेट देण्याचा उत्तम काळ नव्हे, पण सुट्ट्यांमुळे तोच सोयीचा वाटला.

रीफ बघण्यासाठी केर्न्सला जायचेच होते पण इतरही अनेक ठिकाणे सापडत गेली. नेहमीची टूर्स बरोबर दाखविलेली ठिकाणे तर पाहायचीच होती पण स्थानिक क्वीन्सलँडर असल्याने अनेक लोकांनी सुचविलेली अनवट ठिकाणे खास बघायची होती. त्यासाठी केर्न्सहुन कार भाड्याने घेऊन ड्राइव्ह करणे हा उत्तम मार्ग होता. फक्त ग्रेट बॅरियर रीफ मात्र टूर बरोबरच बघावे लागते. स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायविंग करण्याचे ठरले. त्यातूनच रीफ सुंदर दिसते. या सोयी क्रूझमध्ये समाविष्ट होत्या. त्या बरोबरच glass  bottom  boat आणि submarine  टूर सुद्धा.

Mountains and Rain Forest
पर्वत आणि जंगल

हळूहळू माहिती गोळा होता गेली आणि सात दिवसांची केर्न्सची ट्रिप ठरली. केर्न्स शहरातील अत्यंत प्रसिद्ध Esplanade वर हॉटेल बुक केले, ते ठिकाण कार हायर, भारतीय किराण्याचे दुकान, हॉटेल्स आणि समुद्र  या सगळ्यापासून चालत जाण्याच्या अंतरावर होते. जवळ जवळ सर्वच खोल्यांमधून अत्यंत सुंदर समुद्राचा देखावा होता आणि केर्न्सच्या दमट उन्हाळ्यावर उतारा म्हणून छानसे दोन स्विमिंग पूल होते.

सात दिवसात केर्न्सला मध्यवर्ती ठेवून दोन दिवस उत्तरेला, दोन दिवस दक्षिणेला, एक बॅरिअर रीफसाठी व उरलेले जाणे-येणे, शहर बघणे अशी ढोबळ आखणी केली.

ब्रिस्बेन ते केर्न्स असा दोन तासाचा विमानाचा प्रवास करून सकाळी केर्न्सला पोचलो तेच निसर्गरम्य अशा विमानतळावर. एखाद्या द्रोणात ठेवल्यासारखे चारही बाजूने वर्षा-वनांनी वेढलेले विमानतळ पुढच्या ट्रीपची झलक दाखवून गेले. पहिल्याच दिवशी शहर बघायचे ठरवले. Esplanade वरचा कृत्रिम बीच आणि लांबूनच दिसणारे केर्न्सचे iconic फिश, तिथे जमलेली उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा लुटणारी कुटुंबे, पाण्यात डुंबणारे आबालवृद्ध, काठावरच्या बिस्त्रोमध्ये वाहणारी बीअर, जगभरातले पदार्थ खाऊ घालणारी छोटी मोठी रेस्टॉरंटस तुम्ही टुरिस्ट पॅराडाईजला असल्याची साक्ष देत होते. प्रचंड उन्हाळा, समुद्रकिनाऱ्यामुळे दमट हवा या सगळ्याने पाण्याचे सान्निध्य हवेहवेसे वाटत होते. इथल्या उन्हात सनबर्नचे प्रमाण अति आहे, त्यामुळे दिवसभर सनस्क्रीनचे थरावर थर लावून फिरत होतो. मोठी टोपी, सनग्लासेस, पाण्याची बाटली हे त्यामुळे प्रत्येकाच्या बॅकपॅकमधील महत्वाचे सामान झाले.

केर्न्स खऱ्या अर्थाने टुरिस्ट सिटी आहे. इथले जवळजवळ सर्वच व्यवसाय पर्यटनाशी निगडित आहेत. पण कुठेही तुमच्यामागे लागणारे टूर एजन्ट्स, सेल्समन नाहीत. आम्ही आमचे दुकान थाटून बसलो आहोत या आणि चौकशी करा, टोटल ऑस्सि फंडा. येथील नाईट मार्केट्स प्रसिद्ध आहेत. सुवेनियर्स, दागिने, कपडे आणि भले मोठे फूड कोर्ट. स्ट्रीट फूडची एक वेगळीच दुनिया इथे दिसते. छोटे छोटे स्टॉल्स्. दर्जा राखूनही रास्त भाव. कारण स्पर्धा खूप. आईस्क्रीम, मिल्कशेक, ज्युसचे अगणित प्रकार. शाकाहारी असूनही वेगवेगळे प्रकार चाखण्याची माझी हौस या मार्केटने भागवली. चायनीज, थाई, इंडियन, इटालियन या बरोबरच विषुववृत्तीय फळे अप्रतिम होती.

दुसरा दिवस, कुरांडा सिनिक रेल्वे, कुरांडा शहर, आणि स्कायरेल असा ठरवलं होता. कुरांडा हे केर्न्सच्या उत्तरेला असणारे एक गाव. या गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. रेल्वे आणि जंगलाच्या अक्षरशः डोक्यावरून जाणारी स्कायरेल. सकाळच्या पहिल्या कुरांडा सिनिक रेलने जायचे ठरवले.

Sky Rail1
स्काय रेल्वे

१८९१ मध्ये सुरु झालेली हि रेल्वे बॅरन गॉर्ज रुटवरून जाते. १८८६ साली कामास सुरवात झालेला हा प्रकल्प. याचे तीन भाग तीन वेगवेगळ्या काँट्रॅक्टर्सने बांधले. हा मार्ग धोक्याचा, घनदाट जंगलाचा आणि बांधकामाच्या वेळी स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध सहन करतच बांधला गेला. रेल्वेमार्ग बांधणीतील अत्यंत धाडसी आणि महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प. ही सुंदर रेल्वे अक्षरशः शेकडो वळणे घेत, मानवनिर्मित १५ बोगदे आणि ३७ पुलांवरून दोन तासाने कुरांडाला पोचते. युरोपिअन धाटणीच्या बोगी सुविधायुक्त होत्या. मोठ्मोठ्या खिडक्या निसर्ग जणू डब्याच्या आत आणत होत्या. मार्गात लागणारी बॅरन गॉर्ज हि प्रसिद्ध घळ आणि त्यावरचा बॅरन नदीवरचा धबधबा नजरेचे पारणे फिटवतात. आसमंतात घुमणारा धबधब्याचा आवाज उन्हाळ्यात देखील प्रचंड होता.

कुरांडा हे तसे छोटेसे खेडे. अत्यंत देखणे. पिटुकलेच. पर्यटकांसाठी आता विकसित केले गेले असले तरी उसाच्या शेतीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध. छोटी छोटी दुकाने, फार्मर्स मार्केट एखाद्या युरोपिअन खेड्यात असल्याचा भास करून देतात. फक्त हवामान मात्र अजूनही ऑस्ट्रेलियातच आहोत ह्याची पदोपदी जाणीव करून देते. येथील बटरफ्लाय सँकच्युअरी अप्रतिम आहे. विषुववृत्तीय जंगलात प्रचंड प्रमाणात फुलपाखरे आढळतात. त्यांचे हे छोटेखानी अभयारण्यच. मुक्त फुलपाखरांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये पाहणे हा अनुभव वेगळाच आहे.

इटालियन खाणे आवडत असेल तर येथे प्रचंड वैविध्य मिळते. छोट्याश्या इटालियन बिसरोमध्ये मिळणार वुडफायर्ड पिझ्झा खाल्यावर डॉमिनोज किंवा पिझ्झा हटची वाट धरणे मुश्किल जाते. bruschetta आणि buggets  with  trio  dip  म्हणजे ग्रिल केलेला bruschetta  ब्रेड, तीन डिप्स बरोबर हा तर माझा आवडता मेनू बनत चालला होता. विशेष म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये डिप्स वेगळी असत.

परत येताना स्कायरेल घ्यायची होती. उत्कंठावर्धक तितकाच भान हरपून टाकणार हा अनुभव होता. ९० मिनिटे जवळपास ७.५ किलोमीटर जगातील दोन नंबरच्या सर्वात जुन्या वर्षा-वनावरून काचेच्या गोंडोलातून बघताना, ऐकताना, विषुववृत्तीय जंगलाचा वास घेताना तुम्ही त्याचाच एक हिस्सा बनून जाता.

Sky Rail2
स्काय रेल्वे

ही स्कायरेल जगातील सर्वात मोठी गोंडोला केबल कार आहे. दूरवर दिसणारा केर्न्सचा निळाशार समुद्रकिनारा आणि प्रचंड उंच, घनदाट पाचूची जंगले. चारही बाजूंनी छ्प्परं आणि काचेची फरशी. तिथल्या वातावरणात गोंडोलातून होणार्‍या उंचीवरच्या प्रवासाची भीती पळूनच जाते. खालचे अत्यंत घनदाट जंगल. प्रचंड मोठी फर्न्स या जंगलात जागोजागी दिसतात. हिरव्यागार जंगलात मधून मधून आपले नाव सिद्ध करणारी फ्लेम ट्रीज.  ही स्कायरेल  दोन ठिकाणी थांबते रेड पीक आणि बॅरन गॉर्ज. येथे खाली उतरून जंगलातील आखून दिलेल्या पायवाटांवरून फिरण्याची सोय आहे. हि केबल कार वर्षा-वनांची माहिती करून देणे आणि त्यांचे संवर्धन करणे यात मोलाची भूमिका बजावते.

हा मार्ग मुख्यत्वे जंगलात स्वतःहून मोकळ्या झालेल्या जागांना जोडत आखला गेला आहे. त्यामुळे वृक्षतोड होण्यास अटकाव झाला. सर्वात उंच टॉवर हा ४० मीटरचा आहे हे टॉवर्स हेलिकॉप्टरने या जागांवर उतरवण्यात आले होते आणि सर्व कामगार, इंजिनीअर्स रोज पायी चालत बांधकामाच्या ठिकाणी पोचत. निसर्गाचे कमीत कमी नुकसान झाल्यामुळे हा प्रकल्प इकोटुरिझमचा उत्कृष्ट नमुना समजला जातो.

दोन खांबांमधले अंतर बऱ्यापैकी जास्त आहे त्यामुळे हेलकावे खाणारी गोंडोला, खाली वाहणारी नदी, जंगल, भान हरपून टाकत होते. केवळ एका तारेच्या आधारे दोन खांबामध्ये जमिनीपासून ४० मीटरवर आपण लटकलेले आहोत याचं भय विसरायला लावण्याची क्षमता या निसर्गात आहे.

तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम होता केर्न्सच्या उत्तरेचा डेन्ट्री रेनफॉरेस्ट आणि मोसमान गॉर्ज हा भाग ड्राईव्ह करत बघण्याचा. रात्री पाऊस पडून गेल्याने वातावरण अलाहाददायी होते. ढगाळ असले तरी मधून मधून सूर्य डोकावत होता आणि दिवसभर पावसाच्या सरींचा अंदाज होता. आदल्या दिवशी ३५ डिग्रीच्या पुढे असलेल्या हवामानाचं हे घुमजाव आमच्या पथ्यावरच पडलं. हिरव्यागार जंगलांच्या काठाकाठाने  मोसमान नदीतून प्रवास करायला मजा येत होती. त्यातच समोर आली प्रसिद्ध बॅरन गॉर्ज. नर्मदेतल्या गोट्यांची आठवण इथले भलेमोठे दगड करून देत होते. अवाढव्य काळ्या कातळ शिळा आणि त्यातून जबरदस्त वेगाने वाहणारे पाणी घनदाट जंगल घुमवत होते. आरस्पानी पाण्यातून शिळेवर बसल्यावर खालचे दगडगोटे आणि मासे बघतच राहावे वाटत होते. पाणी थंडगार होते पण खनिजांचे प्रमाण फारच अधिक असल्याने पिण्यायोग्य नसल्याच्या पाट्या जागोजागी लावल्या होत्या. अबोरीजनल लोक पूर्वी या नदीत भाला फेकून मासेमारी कां करत हे त्या पारदर्शी पाण्याने लक्षात आणून दिले. तिथून पुढे पोर्ट डग्लसला गेलो. इतिहासात व्यापारासाठी महत्वाचे असणारे हे गाव आता शांत पर्यटन स्थळ बनले आहे. गावात जागोजागी लावलेल्या डेन्ट्री नदीच्या क्रुज आणि क्रोकोडाईल वॉचिंगच्या जाहिरातींनी या गावात फारसे रेंगाळू दिलेच नाही.

Daintree River Crocodile
नदीतल्या कभिन्न मगरी

डेन्ट्री वर्षावने हि जगातील हेरिटेज लिस्टमध्ये तर आहेतच. पण ह्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दोन हेरिटेज साईट्स एकत्र येतात – रीफ आणि रेनफॉरेस्ट. जवळपास ३५०० पेक्षा जास्त जातींची वृक्षसंपदा असणाऱ्या या जंगलात, जगातील सगळ्यात जास्त प्रमाणात फुलणारी झाडे आहेत. ऑस्ट्रेलियात आढळणारे अर्ध्यापेक्षा जास्त पक्षी आणि फुलपाखरे येथे आहेत. आणि खूप प्रजातींचे बेडूक.

इतक्या घनदाट जंगलातही काही ठराविक भागापर्यंत लाकडी वॉक वे  बांधले आहेत. त्यावरून चालताना अनुभवलेलं सदाहरित जंगल,  वाहत्या नदीचं स्वरसंगीत सदैव येणारा नदीचा आवाज, एखादा माणूस हसतोय असे वाटणारा कुकूबरा, मोडून पडलेल्या फांदीवरही असोशीने उगवलेलं फर्न, आदल्याच दिवशीच्या पावसाने झालेला आनंद उच्चरवात व्यक्त करणारे बेडुक… खरंच, हे सारं शब्दांत वर्णन करण्यापलीकडचं.

डेन्ट्री जंगलात मोसमन गॉर्ज आहे. बॅरन गॉर्ज गर्जना करणारी तर ही शांत.  शांत वाहणारं पाणी आणि मोठाल्या शिळांमुळे इथे पोहण्याची ठिकाणे भरपूर आहेत. हा भाग ऑस्ट्रेलियातील कुकू यालांजी या मूळ रहिवाशांच्या वसाहतीचा. या भागात टापूकाई अबोरिजिनल कल्चरल पार्क आहे.

Fig Tree
फिग ट्री वॉल

रेनफॉरेस्ट पीपल म्हणून ओळखली जाणारी हि जमात ५० हजार वर्षांपेक्षा अधिक काळ येथे वास्तव्य करून आहे. अबोरीजनल पुराणकथेनुसार Dreamtime  मध्ये जगाची उत्पत्ती झाली ज्यात प्राणी, पक्षी, वृक्ष आणि मनुष्य यांचे एकत्र आस्तित्व होते. तो इतिहास आणि संस्कृती यांचं दर्शन देणारी ड्रीम टाइम टुर इथे आहे. रात्री ‘टापूकाई बाय नाइट’ या कार्यक्रमात स्वप्नकाळातील आत्मा ‘गोडजा’ याची भेट आपल्याला स्पेशल इफेक्ट्सद्वारे घडवतात. अंधार पडायच्या आधी हॉटेलवर पोचण्याचे उद्दिष्ट असल्याने आमचा हा कार्यक्रम हुकला. त्या ऐवजी ‘ड्रीम टाइम लेजंड वॊक’  घेतला. यात पारंपरिक कुकू यालांजी नाच, डिग्रिडु वाजवणे, बुमरँग फेकणे असे अनेक अनुभव घेतले. डिग्रिडू चा आवाज खूप वेगळा येतो. एवढ्या मोठ्या लाकडी पोकळीत आवाज घुमवायला दमसास देखील प्रचंड लागतो. ठिपक्यांच्या तंत्राने काढली जाणारी देखणी प्रतिकात्मक चित्रे तयार होताना बघून तेथून पाय निघत नव्हता.

डेन्ट्री नदीच्या क्रूझला जाण्यासाठी शेवटी तेथून पाय उचलले. या नदीत मगरी, सुसरी भरपूर. त्यांना बघण्यासाठीच ही सफारी करायची पण घाबरतच. नदीकाठच्या छोट्या ऑफिसात पोचलो. एका मगरीने आदल्या दिवशी पाण्यात ओढून नेलेल्या गायीची चार पाच मगरींची मेजवानी चालू असल्याचं गाइडने सांगितलं.  बोट पहिली तर डिझेलवर चालणारी. फक्त छपरं असणारी अगदी साधी मोटारबोट…. मगरींपुढे हिचा काय निभाव लागणार?  फार कडेला सरकू नका, पाण्यात हात घालू नका, मगरी खूप जवळ येतात या सूचना. भीती वाढली आणि उत्सुकता ताणली गेली.

पहिल्यांदा छोटे पिलू असे सांगितले गेलेले पाच फुटी धूड दिसले. गाईड सांगत होता त्या काठावर डोळे फाडून बघितल्यावर दगडासारखीच दिसणारी ती मगर आहे हे लक्षात आले. तासतास हालचाल देखील न करणाऱ्या या मगरी दुपारची उन्हे खात पहुडल्या होत्या. तेवढ्यात पाण्यात थोड्या अंतरावर हालचाल जाणवली आणि बोट थबकली. पूर्ण वाढ झालेली एक मगर गाईडला जवळच दिसू लागली होती. पाण्यावर दोन डोळे आणि नाकपुड्यांचा उंचावटाच फक्त दिसत होता. जवळ पोहोचूनही आम्हाला ती पूर्ण मगर पाण्याखाली असल्याने दिसत नव्हती. फक्त डोके बघूनच तिच्या अवाढव्य आकाराची जाणीव झाली आणि तिला त्रास ना देता बोटीने आपला मार्ग बदलत काठ गाठला.

येथून Cape Tribulation  ला जाऊन परतण्याचा विचार होता पण पावसाने जोर धरला. अॅलेक्स लुकआऊटला जाण्यासाठी आमची गाडी बोटीत घालून नदीपार आलेलो तसेच परत फिरलो. नदीच्या पाण्याची पातळी वाढली तर गाड्या नेणाऱ्या या बोटींच्या खेपा थांबतात. त्यामुळे या ठिकाणावर पाणी सोडून, मुसळधार पावसातून दिवसभराचा ३०० किलोमीटरचा प्रवास करून केर्न्सला परतलो.

पुढचा प्रवास असाच जवळपास ३५० किमीचा होता. यात अर्थरटन टेबललँड्स आणि त्यातील धबधबे बघायचे होते. सुरुवात पहाटे लेक ड्राईव्हने केली. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या खळग्यातली तळी बघत बघत घनदाट जंगलातील हा ड्राईव्ह होता. लेक इचम हे तबकडीसारखे गोल ज्वालामुखीमुळे तयार झालेले तळे पहिले. हे तळे संरक्षित विभागात येते. आपल्या सुरक्षेसाठी, ठराविक आखून दिलेल्या मार्गाचाच वापर करता येतो. निळेशार, स्वच्छ आणि हिरव्यागार वृक्षांनी वेढलेले हे तळे पावसात बघताना बाकी कशाचेच भान राहत नाही. येथे केर्न्स मधला सुप्रसिद्ध पक्षी कॅसावरी दिसला. ठिकठिकाणी त्याच्यापासून जपून राहा, चोच मारतो अश्या पाट्या होत्या. कोंबडी, बदक, टर्की, मोर या सगळ्यांशीच साम्य असलेला तो पक्षी थोडासा ओंगळच होता.

Mila-Mila Waterfall
मिला-मिला धबधबा

विषुववृत्तीय जंगलात आढळणारे फीग ट्रीज बघण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. उंबर, वड यांच्या प्रजातीत मोडणारी ही पारंब्यांची झाडे हजारो वर्षे जुनी आहेत. कर्टन फीग ट्री हा पडद्यासारखा तयार झालेला वृक्ष बघण्यासाठी लाकडी रस्ता बनवला आहे. त्या भोवती प्रदक्षिणा करत करत हा पारंब्यांचा प्रचंड पडदा पाहताना निसर्गाची कमाल जाणवत राहते.  मोठ्या संख्येने पर्यटक येत असूनही वृक्षांना हानी पोचणार नाही याची  काळजी घेणाऱ्या व्यवस्थापनाचीदेखील कमालच.

हा भाग प्रसिद्ध आहे धबधब्यांसाठी. प्रथम लागला छोटासा डायनर फॉल्स, प्रचंड पाऊस सुरु झाल्याने रस्त्यातूनच परत फिरावे लागले. या सर्व जंगलात ठराविक अंतरापर्यंतच गाडी नेता येते. पुढील प्रवास पायी. खूप निसरडे आणि पाऊस असल्याने या धबधब्याचे लांबूनच दर्शन घेऊन परतलो. नकाशात पुढचा होता तो मिला मिला फॉल्स. हा तरी दिसेल का असे म्हणता म्हणता अचानक पाण्याचा आवाज येऊ लागला ,एका वळणावर समोर अगदी हिंदी सिनेमाचेच दृश्य उभे ठाकले. डोंगराच्या कपारीतून छत्रीसारखा तळ्यात कोसळणारा हा धबधबा अगदी जवळून पाहता आला. काही धाडसी पर्यटक धबधबा कोसळणाऱ्या डोंगरातील कपारीपर्यंत पोचले होते. पोहण्यासाठीही उत्कृष्ट जागा होती आणि सेल्फीसाठी सुद्धा. छत्र्या, जर्किन असूनसुद्धा भिजलेल्या अवस्थेत होतो. रस्त्यावर समोरच एक छोटेसे घरगुती रेस्टॉरंट दिसले. स्वच्छ छोटेखानी कॉटेज होती ती. छानसा मेनू, गप्पा मारणाऱ्या दोन मालकिणी, गॅलरीतून दिसणारा पाऊस आणि चक्क किटलीभर चाय! आणखी काय हवे होते? त्यातच ‘सूप ऑफ द डे’ म्हणून गरमागरम पम्पकिन सूप आणि घरगुती ब्रेडचो लोफ बरोबर आले आणि पोटाबरोबर मन पण तृप्त झाले.

पुढचा टप्पा होता ‘मामू स्कायवॉक’. वुरूनुन नॅशनल पार्कमध्ये असणारा हा आकाशमार्ग.  विषुववृत्तीय वर्षा-वनांतून उंचावरून चालताना दूरवरचा प्रेक्षणीय नजारा दाखवतो. यात पायथ्यापासून वृक्षांच्या माथ्यापर्यंतच्या उंचीवरून जंगल बघता येते. हा मार्ग जगातील सर्वात जुन्या बेसॉल्ट जमिनीवर असलेल्या जंगलातून जातो. पार्किंगला आमची एकमेव कार होती आणि रिमझिम पाऊस चालू झाला होता. पुढे जावे का नाही हा विचार करत असतानाच, दोन- तीन छत्र्या घेऊन एक ऑस्सी काकू आल्या. त्या तेथील सेंटर मध्ये काम करत होत्या. पर्यटकांनी पावसामुळे निघून जाऊ नये म्हणून त्याना छत्र्या देत होत्या. त्यांच्या मोठ्या छत्र्या घेऊन, त्यांनी दाखविलेल्या अर्ध्या किलोमीटरच्या वॉकवेच्या रस्त्याला लागलो.

जमिनीपासून पंधरा किलोमीटरवर उभा केलेला हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. यावर दहा किलोमीटर लांबीची कमान आणि सदोतीस मीटर उंच ऑबझर्व्हशन टॉवर आहे. सेंटरमधुन मिळालेला हेडफोन प्रत्येक ठिकाणाहून दिसणारी दिशा, ठिकाणे, उंची, खालचे जंगल याची माहिती देत होता. बुश जिंजर, बुश बेरीज आणि मश्रूम्स सर्वत्र दिसत होते. लांबवर दिसणारी नॉर्थ जॉन्सन रिव्हर गॉर्ज आणि जंगलातून दिसणारी डोंगराची शिखरे डोळ्यांचं पारणे फेडत होती. पाऊस आणि उतरू आलेल्या ढगांनी हा अनुभव आणखीच संस्मरणीय केला. टॉवर मेटलचा होता आणि वाऱ्यात बऱ्यापैकी हालत होता. पण वरून दिसणाऱ्या नजार्‍यापुढे ही भीती काहीच नव्हती.

या ऑब्झर्वेशन टॉवरचं आणखी एक  वैशिष्ट्य असं की याची फरशी दुधाच्या दोन लिटर दुधाच्या ९ लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या रिसायकल करून तयार केली आहे. काकूंना धन्यवाद देत छत्र्या परत करून परतीच्या मार्गाला लागलो. त्यांनी छत्र्या दिल्या नसत्या तर एवढ्या लांब येऊनही या सुंदर अनुभवाला मुकलो असतो.

परतीच्या मार्गावर केळीच्या बागा आणि उसाची शेते लागली. हा भाग ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी येथे तंबाखूची शेती करत ,युद्धानंतर त्यावर बंदी आली आणि ऊस घेणं सुरु झालं. आता हा भाग ऊसाबरोबरच ट्रॉपिकल फ्रुट पॅराडाइझ आहे. स्थलांतरीत शेतकऱ्यांनी आंबे, केळी, लिची, मलबेरी, पॅशनफ्रूट, स्टार ऍपल अशा अनेक फळांच्या बागा लावल्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या फळांच्या वाईन तयार केल्यात. येथील मरिबा भागात सर्वात कमी आम्लांश असणार्‍या ‘मरिबा गोल्ड’ जातीच्या अननसांचं उत्पादन होतं. हे अननस जगभर जातात. कुरांडामध्ये येथील विषुववृत्तीय फळांची केमिकल्स नसलेली आईस्क्रीम चाखलेलीच होती. पावसातच हॉटेलला परतलो.  दुसऱ्या दिवशी पाऊस पडू नये असं घोकत होतो. कारण जायचे होते, द ग्रेट बॅरिअर रिफला.

ग्रेट बॅरिअर रिफ बघायला जाण्यासाठी लागणारे क्रूझ केर्न्सच्या एस्प्लनेड वरून निघतात. अर्ध्या दिवसाच्या, एक दिवसाच्या अशा या फेरी समुद्रात खोलवर नेऊन एका ठराविक संरक्षित भागातून कोरल रिफचे दर्शन घडवतात. या ठरलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यास मनाई आहे तसेच कोरल्सना हात लावायलादेखील. पावसाचा जोर सकाळी चांगलाच होता. या फेरी हवामानानुसार वेळापत्रक बदलतात. ती रद्द होऊ नये असा मनोमन विचार करताच बुकिंग केले. समुद्र चांगलाच खवळला होता पण दुपारपर्यंत पाऊस थांबेल  आणि रीफ चांगल्या प्रकारे पाहता येईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. हे अंदाज सहसा चुकत नाहीत.

खवळलेल्या समुद्राकडे बघता, बोटीवर चढल्या चढल्याच सी सीकनेसच्या गोळ्यांचे वाटप चालू होते. बोटीच्या पहिल्या मजल्यापर्यंत लाटा उसळत होत्या, बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अनेकांना बोट लागत होती. आता कसले रीफ बघणे असे वाटत असतानाच ग्रीन आयलंडला पोचलो. येथून पुढे समुद्रात बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर बोट जाणार आणि तिथे रीफमध्ये उतरता येते. स्नॉर्केलिंग करायचे आधीच ठरले होते. सगळी साधने आणि पोशाख घेत असतानाच इंस्ट्रक्टर्स तुमचे पोहण्याचे ज्ञानही अजमावत होते. माझा पोहण्याचा यथातथाच अनुभव बघता मला स्पेशल रंगाचे फिन्स आणि मास्क दिला (माझ्यावर लक्ष ठेवता यावे म्हणून).

बोटीतून प्लॅटफॉर्मवर उतरलो. त्याच्या चारही बाजूनी फ्लोटस् चे कुंपण घातले होते, तेवढ्या भागात स्नॉर्केलिंग करू शकत होतो. स्कुबा डायव्हिंगला जरा दूर जावे लागत होते. मनातील भीती, उत्सुकता, पाय टेकत नाहीत अशा सर्व भावना बाजूला करत पाच दहा मिनिटे काठावरच काढली आणि शेवटी मनाचा हिय्या करून पाण्यात डोके घातले. श्वास घेण्याचे तंत्र जमू लागले आणि डोळे उघडल्यावर पाण्यात एक वेगळेच जग दिसले. नॅशनल जिऑग्राफिकची डॉक्युमेंटरीच जणू डोळ्यापुढे दिसत होती. कल्पनाशक्ती बाहेरचे जग होते ते. बोटीचा भोंगा वाजेपर्यंत बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती.

आता वेळ होती ग्लास बॉटम बोटीतून चक्कर मारण्याची. माशांचे रंगीबेरंगी अगणित प्रकार, रंगीबेरंगी कोरल्स नजर ठरत नव्हती. काही ठिकाणी ब्लिच झालेले कोरल्स दिसले आणि हा ठेवा संवर्धन करण्याऐवजी आपण नष्टच करत आहोत याची जाणीव झाली. वेळ संपली तरी मन भरत नव्हते. पाण्याची भीती केव्हाच नाहीशी झाली होती. स्कुबा डायव्हिंग केलेल्यांची वर्णने ऐकताना पुढच्या वेळी मी पण करीन अशी खूणगाठ बांधत केर्न्सला परतले.

Bakul
बकुळीची फुले

शेवटचा दिवस केर्न्स शहर बघून परत फिरणे असा होता. जेवण करून बीचवर फिरत असताना एक परिचित सुगंध आला आणि नजर शोध घेऊ लागली. बीचवर बकुळीची झाडे होती, त्यांचाच तो सुगंध होता.  ओंजळभर बकुळीची फुले, त्यांचा दरवळ आणि मनात ग्रेट बॅरिअर रिफच्या स्मृती घेऊन नवे वर्ष गाठायला घरी परतलो.

श्रुतकिर्ती पुंडे-काळवीट

17353097_1429685720415142_4398281931804479173_n

इ-मेल – shkalvit@gmail.com

संख्याशास्त्र व जपानी भाषेत पदवी घेतल्यानंतर काही वर्षे बँकिंग क्षेत्रात नोकरी करत होते. लग्नानंतर नोकरीनिमित्त अनेक देशात वास्तव्य केले. मुलीला योग्यरित्या शिकवता यावे यासाठी बीएड केले व पुण्यातील एका नामांकित शाळेत पाच वर्षे काम केले. गेली काही वर्षे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे स्थायिक आहे. वाचनाची व प्रवासाची आवड.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s