ग्रीस – माझी मिथाका

जयश्री हरि जोशी

शून्याहून निळे असे एक रत्नखचित मिथक मनात धरून मी ह्या देशात पाऊल टाकले. आयुष्यभरात अनेक `इथाका‘ मी मनातल्या मनात कोंदणात घालून जपले होते. ग्रीसला येता येता माझ्यापुरती एक ‘मिथाका’यात्रा उलगडत जाते आहे. प्रत्येक प्रवासस्थळ सोडताना एखादी कथा, त्यातलं एखादं मिथकपात्र, एखादं मनोहारी दृश्य, मनात रुतलेली एखादी नितळ संवेदना ह्या माझ्या मिथाका बनत चालल्या आहेत. शांत, गूढ, अज्ञाताच्या निळाईकडे ही यात्रा सुरु झाली. मी ह्या निळ्या समुद्राकडे फक्त पाहते आहे. कुठेही जा, कधीही पहा, इथे ते आश्वासक अस्तित्व आहेच.

ह्या स्वप्नमोहिनीच्या राज्यात पाऊल टाकल्यापासून अनद्यतन भूतकाळ आणि परोक्ष वर्तमानकाळाची घट्ट वीण असलेली एक ठाम जाणीव मला अंतर्बाह्य वेढून आहे. हेलेनिक संस्कृती. चंडप्रचंड विस्तार असलेली भूमी. सूर्याच्या अंतर्गाभ्यातून उतरणारी उन्हे. दिव्य भूतकाळ. हे लोकशाहीचे जन्मस्थान. ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ. ‘ट्रोजन हॉर्स’ हा शब्दप्रयोग कानावरून बऱ्याच वेळा गेलेला आहे. ग्रीक मिथककथांचे तुटक संदर्भ, होमरचं ‘इलियड’ आणि ओदिसे, किंवा ब्रॅड पिटने ‘अकिलस’ साकारला तो ‘ट्रॉय’ हा भव्य सिनेमाही डोळ्यांसमोर तरळून गेलेला. शिवाय जगज्जेता अलेक्झांडर (सिकंदर) आणि शूर पुरु राजा ह्यांच्यातील रोमहर्षक संवाद इथे आल्यावर प्रकर्षानं आठवतोय. अलेक्झांडरची इ.स.पू. ४ थ्या शतकातील जग जिंकण्याची मोहीम त्याच्यानंतर लगेच कोलमडून पडली असली, तरी त्याने संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला होता. अलेक्झांडर तत्कालीन भारताच्या वायव्य सीमेपर्यंत येऊन ठेपला होता, त्यामुळे त्या परिसरात त्यापुढील काही शतके ग्रीक आणि भारतीय संस्कृतीचा अतिशय वेधक मिलाफ निर्माण झाला होता. आता त्यातला काही भाग अफगाणिस्तानात आहे, तर काही भाग पाकिस्तानात.

ग्रीक संस्कृती.  जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, भारतीय आणि ग्रीक. भारतातील संस्कृत आणि संस्कृतोत्भव भाषा ( हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी इ. अ-द्राविडी भाषा) आणि ग्रीक भाषा ह्या दोन्ही इंडो-युरोपिअन भाषासमूहातील भाषा आहेत. लोककथा, परंपरा ह्यांतील साम्यस्थळे आणि भाषांमधल्या साधर्म्य हे आहेच. त्याहीपेक्षा इथला विराट गंभीर सागर, शाश्वत कृपावंत आकाश आणि जाणीवेच्या दिशेला नेणारा लख्ख प्रकाश. त्यांच्या मनोज्ञ मीलनातून निर्माण होणाऱ्या आदिम, गहन शांततेशी माझी नाळ चटकन जोडली जाते आहे.

ग्रीसमधील मिथकांनी फार पूर्वीपासून मनावर एक गारूड केलेलं आहे. कोन्स्तान्तिनोस कवाफीस सांगून गेलाच आहे, की तुझी इथाका सदैव मनात जपून ठेव. तिथे जाऊन पोहोचणं हे तुझं भागधेय आहे. पण घाई करू नकोस, ही यात्रा वर्षानुवर्षे चालू राहायला हवी, म्हणजे, त्या द्वीपापर्यंत पोहोचशील तेव्हा तू परिपक्व झालेली असशील…. ही सुजाण शांतता युगानुयुगांतून संक्रमित होत आलेली. इतिहासाची अनेक दालने उजळत हिचा प्रवास होत झालेला. तिचे बोट धरून मी ग्रीसच्या विलक्षण गतवैभवाची  काठाकाठाने उजळणी करत निघाले आहे.

अफ्रोदिती
अफ्रोदिती

ग्रीसचा  इतिहास हा थुसिडीटीज, लिओनाईडस, पेरिक्लीज, अलेक्झांडर अशा आक्रमक, विजयशाली नेत्यांचा आहे. ग्रीसची बौद्धिक परंपरा ही पायथागोरस, प्लेटो, ॲरिस्टोटल, सॉक्रेटिस ह्यासारख्या विचारवंतांची आहे. पाश्चिमात्य तत्वज्ञान हे प्लेटोच्या ग्रंथांच्या ठराव्यात, इतकं वैचारिक मंथन इथे झालेलं आहे, ग्रीसचा भूतकाळ अशा  तत्त्वचिंतकांनी दैदिप्यमान झाला आहे. ग्रीसचा इतिहास हा अथेन्स, स्पार्टा, कॉरिंथ, थीब्ज अशा शहरांचा आहे. आणि ग्रीसची परंपरा ही शौर्य, लोकशाही, स्वातंत्र्य आणि व्यक्तिवाद अशा आदर्शांची आहे. विज्ञानाच्या विविध शाखा, ललित साहित्य नि कलांचं आद्य निधान हाच देश. तरीही, लोकशाही आणि स्वातंत्र्याची नितांत ओढ असलेल्या अथेन्सच्या उदारमतवादी आदर्शांबरोबरच व्यक्तीपेक्षा राज्य आणि संरक्षण व्यवस्था आणि शिस्तबद्धतेला महत्त्व देणाऱ्या स्पार्टाकडून विसाव्या शतकातील हिटलर आणि मुसोलिनी ह्यासारख्या फॅसिस्ट हुकूमशहांनी प्रेरणा घेतली, ही भळभळती जाणीव इथल्या वर्तमानालाही आहे.

हिरण्यगर्भी किरणांचे आवरण पांघरून दक्षिणेला विसावलेली एजिअन आणि अयोनिअनच्या कुशीतली चिमुकली सुबक बेटे. उत्तरेकडचे तपस्वी पर्वत. स्वमग्न काळसर हिरव्या रंगांत झिलमील करणारी घनदाट अरण्ये. निसर्गाच्या लालित्यपूर्ण विभ्रमांचा विविधरंगी पट असलेला ग्रीस. सूर्य हा ह्या प्रदेशाचा मूळपुरुष. जपाकुसुम संकाशं, महद्‌द्युति, तमोरि अशा सूर्याचे आभामंडळ ह्या महाद्वीपाला गोंजारणारं. ग्रीक संस्कृतीच्या कणाकणातून आजही इतिहास आणि पौराणिक गतवैभवाचा जयघोष चाललेला असतो.

या देशाला ३५०० वर्षाची नोंद असलेला प्राचीन इतिहास आहे. ‘युनेस्को’ने जागतिक वारसा म्हणून वीसहून अधिक जागा संरक्षित केल्या आहेत. त्यात अ‍ॅक्रोपोलिस, ऑलंपिया, डेल्फी, डेलॉस, इपिडॉरस, सामोस, माउंट अ‍ॅथोस, मेरिओरा, मायसीने, ऱ्होडेस यांचा समावेश आहे. हेलीनोस. सूर्याचा देश. ग्रीसमध्ये तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या जवळपास कुठेतरी झूस, आफ्रोदिती किंवा पोशिदोन, डायोनाइसस, अपोलो, ईरोस, एरीस, हरमीस, हेडीस, क्रोनोस, ह्या मूलशक्ती महादेवतांच्या खुणा सापडतात किंवा अलेक्झांडर, हिराक्लीस, पेर्सेस, ओदिसिउस अशा पौराणिक आणि ऐतिहासिक कथापुरुषांची पदचिन्हे दृष्टीस पडतात. संपूर्ण ग्रीसभर अगणित स्थापत्यअवशेष आणि विपुल प्रेक्षणीय स्थळे आहेत,  पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेले प्राचीन शिलालेख आजचा ग्रीक तरुणवर्ग अस्खलितपणे वाचू शकतो. खरे तर ग्रीसचे पर्यटन हे एक पुरातत्वीय सांस्कृतिक पर्यटन मानता येईल. इथल्या दंतकथा, लोककथा, आख्यायिका आणि सुरस कहाण्या इतिहासाच्या संदर्भसाखळीत स्वतःला इतक्या सुगमपणे ओवून घेतात की आपल्या प्रवासावरचा प्रकाशझोत भूतकाळाच्या विविध दालनातून परावर्तित होऊ लागतो.

अक्रोपोलिस म्युझिअम
अक्रोपोलिस म्युझियम

हे सगळंच भौतिक, लौकिक पातळीवर मी जाणून, समजावून घेते आहे. संगती लावू पाहते आहे. पण माझा प्रवास मला कुठेतरी मागे ओढून नेतो आहे. ग्रीसमध्ये काय पाहावे, काय खावे, कुठे खरेदी करावी, प्रवासाची आखणी कशी करावी अशा प्रकारची केवळ संकेतस्थळावरची माहिती तर कुठेही मिळेल, पण मला जो हेलिनोस खुणावतो आहे, तो ह्या अक्षांश रेखांशातल्या ग्रीसच्या पलीकडचा आहे. माझ्या आतला समुद्र पुन्हा जन्मणार आहे, त्यातून तो माझ्याकडे एक अफ्रोदिती भिरकावून देणार आहे. सेफेरी सांगून गेला आहे तसं. The sea will be born again, The waves will again fling forth Aphrodite…

ह्या प्रवासाची सांगता कशात होणार आहे? हा विशाल वैभवशाली देश, इथली सुबक, चिमुकली द्वीपं. निळ्याशार गहन पाण्याशी हितगुज करणारी गलबतं, ओंकाराच्या पलीकडे जाऊन शुभ्र पांढऱ्या वर्खाच्या निळाईत ओथंबून लखलखणारं अनादि आभाळ. किनाऱ्यावर काळी माती. काळोखाचा अर्कलेप. लाल रंगांचे अजस्त्र पर्वत आणि त्यांना भेदून जाणारं समुद्राचं पाणी, लाटांचा लडिवाळ वावर आणि वाऱ्याचा धिंगाणा, अपरंपार निसर्गसौंदर्य, निळ्या डोळ्यांचे देखणे पुरुष, अपोलो किंवा पोशिदोनचं शिल्प जिवंत होऊन चालत निघालंय असं वाटावं असे. नावं तर किती लोभस, कोस्तास, आन्गेलोस, दिमित्रोस…शिवाय ही भूलभुलैया असलेली भाषा, लिपी. काहीतरी कळतंय पण ते तसं नाही, अर्थ काही दुसराच आहे, उच्चार तिसराच, ह्याचा प्रत्यय वारंवार येतो आहे.

माझ्या मिथाकाची पहिली पायरी मी आता चढले आहे, केप सुनिअनला भेट देऊन. इथे मला इथाकातला समुद्रदेव भेटलाय. आख्यायिकेत विणला गेलेला. केप सुनिअन हे समुद्रात शिरलेलं भूशिर. अट्टिका द्वीपकल्पाचं दक्षिण टोक.. एजिअन समुद्रानं तीन बाजूंनी वेढलेली ही टेकडी.  ह्या टेकडीवर ग्रीक मिथकांमधील पोशिदोन (पोसायडन) च्या देवळाचे अवशेष आहेत. पोशिदोन. संतापानं लवथवणारा समुद्रदेव. हे संगमरवरी देऊळ ख्रिस्तपूर्व ४४० च्या काळातलं. ग्रीक मिथकांनुसार हा समुद्राचा देव त्याच्या हातातील त्रिशूळाने समुद्रात वादळे निर्माण करतो. पोशिदोनची कृपा व्हावी म्हणून नाविकांनी इथं प्रार्थना करण्याची प्रथा होती, त्याला शांत करण्यासाठी प्राण्यांचे बळी देत असत. आता तिथे केवळ काही खांबच शिल्लक आहेत. परंतु पूर्वी बाहेरच्या बाजूने डोरिक पद्धतीचे खांब आणि आत गर्भगृह अशी रचना असावी. गर्भगृहात बहुधा ब्राँझचा पोसायडनचा पुतळा.

ह्या समुद्राची अजून वेगळीच कहाणी. आणखी एक ग्रीक मिथक सांगतं की  अथेन्सचा राजा एजिअसचा मुलगा थिसिउस हा मिनोटाउरस या दैत्याचा वध करायला क्रिटी बेटावर गेला असताना एजिअस हा केप सुनिअन येथे त्याची वाट पाहत होता. विजयी होऊन परत येताना थिसिउस विजयाचे प्रतीक म्हणून बोटीला पांढरे शिड लावायला विसरला. परत येणा-या बोटीचं काळं शिड पाहून पुत्रशोकाने एजिअसने केप सूनिअन येथे समुद्रात उडी मारून मरण पत्करले. तेव्हापासून ह्या समुद्राला एजिअन समुद्र हे नाव पडलं. अशा अनेक नवलपरीच्या दंतकथा, कहाण्या, लोककथांनी ग्रीसची श्रीमंत होत गेलेली परंपरा. किती पाहू, किती ऐकू…

ह्या समुद्रासारख्या निळ्या रंगाच्या कोंदणात दोन काळीभोर लंबाकृति वर्तुळे – डोळ्यातल्या बाहुलीसारखी – असं एक शुभसूचक, अशुभनिवारक चिन्ह ग्रीसमध्ये वारंवार भेटतं. शोभेसाठी सजावटीची वस्तू म्हणून लहान आकारात, कानातलं म्हणून, हातगोफात मढवलेलं, गळ्यातल्या माळेतलं पदक. नानापरी.

मला आता जरा वर्तमानात पाऊल टाकायला हवंय. परंपरेच्या चांदण्याचे पाउलठसे सहज सामोरे येणारा हा देश. ह्या देशावर भूतकाळाची एक अभेद्य नीलधूसर सावली पडलेली आहे.  पण तिच्या पलीकडे एक आज आहे. इथली आजची स्पंदने मला जाणून घ्यायची आहेत. वाय रित्सोस त्याच्या moonlight sonata मध्ये म्हणतो तसं…

नाही, चंद्र वगैरे नाही,

हे शहर, त्याचे घट्टे पडलेले हात

रोजगार करणारं शहर

शपथ घेणारं

भाकरीची आणि वळलेल्या मुठीची

आपल्या अस्तित्वाचं ओझं पाठीवर

घेऊन निघालेलं शहर

अक्रोपोलिस म्युझिअमचा दर्शनी भाग
अक्रोपोलिस म्युझियमचा दर्शनी भाग

आजच्या ग्रीसमध्ये लोकशाही नावालाच आहे. खरं तर हुकूमशाहीच आहे. ग्रीस आर्थिकरीत्या पुरा डबघाईला आला आहे. मार्क्‍सवादाचा बुरखा पांघरून  मूठभर नेते जनतेला लुबाडत आहेत. सॉक्रेटिसच्या काळात २५०० वर्षापूर्वी मूठभर लोक लोकशाहीच्या नावावर सर्वसामान्यांना लुबाडत होते. सॉक्रेटिस अथेन्सच्या चौकाचौकात जाऊन जनजागृती करीत होता. त्याने विष पिऊन जीवन संपवलं. ती गुहा, तो तुरुंग.  आज जणू सॉक्रेटिसचा तळमळणारा आत्माच ग्रीक जनतेच्या उद्रेकातून प्रकट होऊ लागला आहे.

थेसालोनिकिचंच एकच उदाहरण पाहू. थेसालोनिकिबद्दल जनमानसात आतवर रुजलेली मत्स्यकन्येची दंतकथा अलेक्झांडरशी निगडीत आहे. त्याच्या एका सैनिकाला अमृतसदृश पाणी सापडलं, ते त्यानं अलेक्झांडरपासून लपवलं, अलेक्झांडरनं ते पाणी एका पेल्यात ठेवलं, त्याची बहीण थेसालोनिकी, तिनं ते पिऊन टाकलं म्हणा किंवा तिच्या हातून ते सांडलं म्हणा, क्रोधित झालेल्या बंधुराजांनी तिला शाप देऊन मत्स्यकन्या बनवलं. पण तिनं त्याचा राग धरला नाही. उलट, अजूनही ती समुद्रातून विहार करत असते आणि नाविकांना एक प्रश्न विचारते – “अलेक्झांडर जिवंत आहे का?” “होय, तो जिवंत आहे, आणि जगज्जेता आहे, साऱ्या जगावर राज्य करतोय!” असं उत्तर देणाऱ्या नाविकांना ती पुढच्या सफरीला जाऊ देते, जर त्यांनी चुकून “तो कधीच मृत्यू पावला” असं उत्तर दिलं तर मात्र ती संतापून त्याचं जहाज बुडवून टाकते. थेसालोनिकि, अलेक्झांडरची सावत्र बहीण, एका प्रश्नचिन्हानं वेढलेली. एका आख्यायिकेची नायिका होऊन माझ्याबरोबर ह्या प्रवासात राहिली.

‘वैभवशाली’ ग्रीसमध्ये सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असं दुसऱ्या  किंवा तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर आणि बंदर असलेलं थेसालोनिकी. कालौघात बंदराची रया गेली आहे. ते  उतरणीला लागले आहे खरे. पण जुन्या गोद्या, इमारती, रस्ते आहेतच. असो, इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस हे जे दक्षिण युरोपीय देश युरोपात स्थलांतर करण्यासाठी ‘सुरक्षित’ समजले जातात त्यात थेसालोनिकीमार्गे ग्रीस आणि ग्रीसमाग्रे युरोप हा मार्ग अधिक निवडला जातो. आर्मेनियन, रशियन, युक्रेनियन आणि पूर्व युरोपातल्या किंवा वायव्य आशियातल्या  स्थलांतरितांची इथे दाट वस्ती आहे. त्यांची आर्थिक, सामाजिक जाळी इथे गुंतत गेलेली आहेत. सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची निवड झाल्यानंतर जुन्या इमारती आणि शहराला नवी झिलई चढवताना ह्या ‘बाहेरून’ आलेल्या स्थलांतरितांना हाकलून दिलं जातंय किंवा त्यांच्यावर अत्याचार सुरू आहेत. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुनर्निर्माण केलं जाताना थेसालोनिकीचा अकृत्रिम, बहुसांस्कृतिक चेहरा पुसला जातो आहे. नवनिर्माणाच्या नावाखाली समूळ उखडले गेलेले, ओळख हरवलेले पुनर्विस्थापित शहरी समूह मनावर आघात करत चालले आहेत. हे वास्तव फार प्रखर वाटतं आहे, गाव, शहर, देश, खंड, पृथ्वी. सर्वत्र हेच. मनाला शीण होतो आहे आणि मी पुन्हा भूतकाळाच्या शीतल आवरणात शिरते आहे.

थेसालोनिकीजवळच सिकंदराचं जन्मस्थान आहे. अलीस्त्रातीसला भूगर्भशास्त्राच्या दृष्टीनं अतीव महत्वाच्या हेलेक्ताइटसच्या गुहा आहेत. ह्याच वाटेवर भूतकाळाचे दुवे शोधत मी निघाले आहे.

सिकंदरचे जन्मस्थळ
सिकंदरचे जन्मस्थळ

सरकारी आणि खासगी तत्वावर चालवली जाणारी अनेक वस्तुसंग्रहालये माझ्या मदतीला धावून आली आहेत. शहरांतून, गावांतून, बेटांवर ती ग्रीसचा सोपपत्तिक इतिहास माझ्यापुढे मांडत आहेत. एका संग्रहालयात बघायला मिळालं एका राजवाड्यातील मोझाइक. राजेशाही भोजनगृहाच्या जमिनीवर शिल्पित केलेलं. ५x९ मीटर आकाराच्या या मोझाइकच्या मध्यभागी सोळा  चौकोनांत फळंफुलं, पक्षी आणि बाजूने वेली व जंगली प्राणी अशी नक्षी होती. कडेने असलेल्या वेलबुट्टीवर भोजनासाठी आसने असत.

अथीनामधल्या अनेक संग्रहालयातून प्राचीन ग्रीसच्या इतक्या जवळ गेले मी, ख्रिस्तपूर्व ६८०० ते ३२०० या काळातील बाणांची टोके, धारदार पाती, हाडांपासून बनविलेली हत्यारे, पाटावरवंटा, भांडी, दागिने. कुठेतरी ख्रिस्तपूर्व ५८०० ते ५३०० मधील एका नवजात बाळाचे अवशेष. त्याचं पार्थिव  उचलून नेण्यासाठी चिमुकली संगमरवरी पालखी. गुहेत दफन करताना बरोबर छोटा संगमरवरी वाडगा आणि एक मातीचं भांडं. अंगावर चर्रकन काटा आला. इतर दफनांच्या ठिकाणीही मिळालेली हत्यारे, भांडीकुंडी, दागदागिने, काही वस्त्रे, हाडे आणि कवट्या मांडून ठेवलेली आहेत, त्यांवरून दफन केलेल्या व्यक्तीच्या पेशाबद्दल अंदाज बांधता येतो आणि त्याकाळच्या समाजजीवनाची ओळखही होते. असेल. पण ते बाळ जसं निर्मळ हसत माझ्या मागे आलं आहे, माझ्या मिथाकायात्रेचा अविभाज्य भाग बनलं आहे, त्याचं बोट मीच घट्ट धरून ठेवलं आहे.

पाषाणयुग. कांस्ययुग. वेगेवेगळ्या दफनभूमीत सापडलेल्या काही वस्तू (ख्रिस्तपूर्व १९०० ते १६००) सोन्याचे दागिने, मुकुट, कर्णभूषणे, कंठ्भूषणे, कंकणे. भांड्यांचे वैविध्यपूर्ण आकार, घडण, रंगसंगती. दाभण, चाकूसुरे, कुर्‍हाडीची व भाल्याची पाती, मासेमारीचे हूक अशी हत्यारं. शिक्के, धातूचे वा काचेचे मणी, दागिने, हस्तिदंताच्या वस्तू. अनेक युगांतील अनेक नाणी. असं बरंच काही मांडून ठेवलंय जागोजागी. उत्कृष्ट प्रकाशयोजना. नेमकी माहिती. तरीही काय, मातीवरती चढणे एक नवा थर अंती!

अथीनाच्या अक्रोपोलीसमधले विविध पुतळे. संगमरवरी. भव्य. एकाकी. शरीरसौष्ठव एकेका सुबक शिल्पात ओतप्रोत भरलेलं. जिवंत, भावपूर्ण  डोळ्यांचे पुतळे. अफ्रोदितीच्या वस्त्रप्रावरणांच्या चुण्यासुद्धा मोठ्या कौशल्यानं शिल्पित केल्या आहेत आणि पोशिदोन पाऊल उचलून निघाला आहे, ती “न ययौ न तस्थौ” अवस्था कांस्य पुतळ्याच्या मूर्तीकारानं नेमकी पकडली आहे, अगदी पायावरच्या ताणलेल्या नसांसकट. शिवाय मोठमोठी संवाददृश्ये, भित्तिचित्रे. पावलापावलावर विविध संस्कृतीच्या प्रभावी खुणा. काही पुतळ्यांचं शिरकाण झालंय, काहींचे हात तुटलेत, काही भंग पावलेत, तरीही पुरातत्त्वखात्यानं मोठ्या निगुतीनं कुशलपणे  संभाळलं आहे. हा देश किती प्रकारची आक्रमणे सहन करत इथपर्यंत आला आहे! बायझंटाइन, तुर्की, वेनिशिअन अंमलाच्या खुणा इथे दिसतात. अशा अनेक जखमा शांततेने कुरवाळत, संयमाने स्वतःचे सांत्वन करत हा देश इथवर आला आहे.

अथीनामध्ये फिरताना तर पावलांखाली प्राचीन संस्कृतीचा गालीचा अंथरलेला असतो. कुठेही साधा रस्ता खणला, कुठल्या पायाभरणीसाठी कुदळ मारली किंवा जरा उंचावरून खाली नजर टाकली की पुरातन काळचा एखादा हमाम, एखादी हवेली किंवा प्रार्थनास्थळाचे अवशेष सापडतात. अक्रोपोलीस म्यूझिअममध्ये तर काचेची जमीन केली आहे आणि तिथे जतन केलेल्या वास्तूंचे अवशेष वरच्या दालनांतल्या वस्तुमात्रांना अक्षय सोबत करत आहेत असं वाटायला लागतं. अगदी विमानतळावरही एक प्रदर्शन मांडलं आहे, “विमानतळाचे बांधकाम सुरु करण्याआधी खोदकाम करताना सापडलेले पुराकालीन अवशेष!”

एजिअन समुद्र
एजिअन समुद्र

अथेन्स ह्या सुप्रसिद्ध शहराला अथीना हे नाव मिळालं अथीना ह्या देवतेवरून. ह्या देवतेचं व्यक्तिमत्व दुहेरी पेडांचं.. अथीना पोलाइस ही बुद्धी, सृष्टी आणि सर्जनाची इष्टदेवता, तर अथीना पल्लास ही युद्ध आणि कौमार्याची इष्टदेवता. पार्थेनोस हे तिचं देऊळ – कुमारिकेचा महाल असा त्याचा साधासुधा अर्थ. तिच्या वृत्तीतील ही दुहेरी वीण मी माझ्यासोबत घेऊन निघाले आहे. सध्या जुन्या पार्थानोनचं पुनरुज्जीवन चालू आहे. एका प्राचीन लोककथेनुसार अथीना आणि पोशिदोन ह्या दोघांत शहराची इष्टदेवता होण्यासाठी स्पर्धा चालली होती. दोन्ही देवतांनी जनतेला आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी कशा प्रकारची लालूच दाखवली ह्याचं वर्णन ह्या  मिथकात आलं आहे. पोशिदोननं आपल्या त्रिशूळाने अक्रोपोलीस ह्या खडकात भेद केला आणि जखमी पृथ्वीच्या उदरातून एक डौलदार घोडा निर्माण झाला. तो घोडा त्यानं अथेन्सच्या जनतेला अर्पण केला. पण अथीनानं त्यांना दिला ऑलिव्हचा वृक्ष. त्यामुळे सर्वांनी अथीना हेच नाव कायम केलं. अखेर दोन देवता अक्रोपोलीसवरती एकमेकांशेजारी गुण्यागोविंदाने नांदू लागल्या. पार्थेनोनच्या पश्चिम त्रिकोणपर्णात ह्या देवतांची लढाई शिल्पित करण्यात आली आहे. अथीना सोडताना माझ्या मिथाकाचं उद्यापन होत आलं आहे.

विशाल एजिअनच्या लाटांवर आंदोळत मी मायकोनोस आणि सांतोरिनीकडे निघाले आहे. तिथेही काही लोककथा माझी वाटच पहात आहेत.. शिवाय अभिनवघननील, पहिल्या नव्या पावसाळी मेघासारखा निळाभोर रंग… वर्तमान वास्तवाच्या दाहक आणि सुदीर्घ कोरडेपणाला इथे मिळेल एक सजल स्वल्पविराम. शिवाय श्यामायमानानि वनानिपश्यन् अशी सावळत जाणारी झाडं. आणि निळाईत रमलेलं आभाळही. अपार, असीम. अस्पर्श. ती  नितळ आभाळमाया  आपल्या माथ्यावर शाश्वत असणं, हे किती विश्वासार्ह आहे!

सांतोरिनी बेट
सांतोरिनी

असं म्हणतात की मायकोन्स ह्या पहिल्या विजीगिषु राजावरून मायकोनोस हे नाव ह्या बेटाला पडलं. हा अपोलो ह्या सूर्यदेवतेचा मुलगा किंवा नातू मानला जातो. सर्वशक्तीशाली झूस आणि अक्राळविक्राळ टायटन राक्षसांबरोबर ह्यांच्यातली लढाई मायकोनोस ह्या ठिकाणी झाली अशी कथा आहे. असंही सांगितलं जातं की ह्या ठिकाणी एराक्लेस (हर्क्युलेस) ह्या महान शक्तिशाली योद्ध्यानं राक्षसांचं निर्दालन केलं. ते ऑलिम्पस शिखराच्या अजिंक्य परिसरात राहायचे, पण एराक्लेसनं त्यांना भुलवून खुल्या मैदानात आणलं आणि त्याचं मायकोनोसवर शिरकाण केलं. बेटावर चहूकडे विखुरलेले खडक म्हणजे त्या भयभीत राक्षसांची प्रेतं असं मानलं जातं. अत्यंत देखण्या ह्या द्वीपावर आजही एखाद्या परीच्या राज्यात असल्यासारखं वाटतं. इथली पांढरीशुभ्र, कधी निळ्या कवाडांची टुमदार बैठी घरं. घरांवर मजले चढवायला कायद्यानं बंदी आहे, आणि ही रंगसंगती सरकारनं ठरवून दिलेली आहे. चिमुकले लखलखते रस्ते, विस्तीर्ण माळरानं, पवनचक्क्या, बेभान वारा, निळ्या आकाशाशी हितगुज करता करता अचानक पाचूच्या रंगात उसळणारा समुद्र. समुद्राच्या लालित्यपूर्ण आवर्तनं घेणाऱ्या लाटा. सर्वत्र एक सळसळता उत्साह. आयुष्य एक उत्सव असल्याची सकारात्मक जाणीव करून देणारा. शुभ्र काही निळ्या स्पन्दाचे…ही माधवीच माझी मिथाका. मोतियाची खाणी.

मायकोनोसपासून अगदी जवळ हे इवलं देलोस. प्राचीन ग्रीक भाषेत देलोस हा अदेलोसचा विरुद्धार्थी शब्द आहे. अदेलोस म्हणजे अदृश्य. देलोस म्हणजे दृश्य, प्रकट, स्वरूप. लेतो ही कोईओस आणि फोएबी ह्या दानवदम्पतीची मुलगी, युरेनस (स्वर्ग) आणि गैया (पृथ्वी) ह्यांची नात. ती अदृश्यतेची देवता. पण योगायोग असा, की ती प्रकटरूपात अतीव लावण्यवती  होती आणि त्यामुळे झूस प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडला. एका लावा पक्ष्याचं (इथे हंस असाही पाठभेद आहे) रूप घेऊन झूस तिच्याशी रत झाला आणि ती गर्भवती झाली. तिचे दिवस भरत आल्यावर झूसच्या पत्नीला, हेराला इतका सवतीमत्सर वाटला की तिनं लेतोच्या पायाखालची सगळी जमीन नाहीशी करून टाकली. तेव्हा लेतोची बहीण अस्तेरिया एक चिमुकलं बेट बनून तिच्या समोर आली. तेच हे सुबक देलोस. इथंच लेतोनं अर्तेमीस आणि अपोलो ह्या जुळ्या मुलांना जन्म दिला. अपोलो हा अतिशय देखणा, प्रकाशाचा देव. देलोसमधला लायन स्ट्रीट – सिंहाच्या शिल्पाकृतींनी नटलेला मार्ग केवळ बघण्यासारखा. देलोस हे बेट ऐतिहासिक, पौराणिक पुरातत्त्वकालीन संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं स्थान. इथे वस्ती जवळपास नाहीच. आणि तेच मला इतकं लोभस वाटलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसांचा जुलूस इथली शांतता ढवळून काढतो आणि मावळतीनंतर मात्र समुद्राच्या कुशीत आपल्या भूतकाळाचा खजिना शांतपणे जपत डहुळत्या पाण्यात स्वतःला बघणारं हे बेट. शब्दावीण लिहिलं गेलेलं नितांत एकांताचं उपनिषद.

हे सांतोरिनी किंवा थिरा. ह्या बेटाच्या उदरात अजूनही ज्वालामुखी निद्रिस्त आहे, केव्हा तिसरा डोळा उघडेल ह्याचा नेम नाही. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकानंतर एका बेटावरची वसाहत नष्ट झाली आणि तिथे एक महाकुंड निर्माण झालं. हा कटाह म्हणजेच उंच दातेरी सुळक्यांनी वेढलेलं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर. एका प्राचीन मिथकानुसार, सांतोरिनीची उत्पत्ती एका चमत्कारातून झाली. जसोन आणि त्याचे साथीदार एका मोहिमेनंतर परतीच्या वाटेवर असताना एजिअन समुद्रातल्या अनापे नामक बेटावर थांबले. ईफेमसनं स्वप्नात एका अप्सरेबरोबर संग केला. ती समुद्रदेवता ट्रायटनची कन्या. तिनं त्याला सांगितलं की तिला गर्भ राहिला आहे. वडिलांच्या भीतीनं तिनं लपायला जागा मागितली, आणि सुचवलं, की अनापेचा एक तुकडा त्यानं समुद्रात फेकावा. ईफेमसला जाग आली आणि त्यानं खुल्या समुद्रात मातीचं एक अवाढव्य ढेकूळ भिरकावून दिलं. अचानक, त्या गर्भिणीला आश्रय देण्यासाठी समुद्रात एक द्वीप निर्माण झालं. ईफेमसचा पुत्र इथे जन्मला, त्याचं नाव थेरास. त्यावरून ह्या जागेचं नाव पडलं थिरा. इथली सतेज निळी पांढरी घरकुलं आणि बिटक्या गल्ल्या अजून मनात घर करून आहेत. नवपरिणीत जोडप्यांचं हे प्रतिनंदनवन. समुद्राचे तीन रंगी किनारे. एकाच बेटावर, वेगवेगळ्या ठिकाणी. नजर पोचावी तिथपर्यंत काळी वाळू, लाल वाळू किंवा पांढरी वाळू. आणि अर्थातच लडिवाळ लाटांचा समुद्र. इथे द्राक्षाचे मळे आहेत, अतिशय महागडी वाईन बनवली जाते, वाईन म्युझिअम ओघानं आलंच. अक्रितोरी, कामारी, थिरा अशी लयबद्ध नावं. सांतोरिनी असं सनईचा मंजुळ सूर उमटल्यासारखं वाटतं हे नाव. इथे सगळं काही बिसतंतूसारखं नाजूक, नखऱ्याचं, सोलीव आणि समारंभी वाटत राहिलं. सांतोरिनीच्या आखीव रेखीव दिमाखात पाऊल अडकून पडलं. ज्वालामुखी पायाखाली निद्रिस्त आहे, कधीही त्याच्या कराल जिव्हा धगधगू लागतील ही निरंतर जाणीव असतानाही आयुष्याचा क्षणन्  क्षण असोशीनं साजरा करत राहण्याची, उपभोगण्याची ही संवेदना माझी मिथाका बनून माझ्यासोबत निघाली आहे.

ग्रीसचा दिमाख आयोनिअन. कोर्फू द्वीप. ग्रीसच्या प्रागैतिहासिक संस्कृतीची चिन्हं मिरवणारं क्रीती. अजून काय काय, किती किती पहायचं, अनुभवायचं राहिलं आहे.  ही तर पहिलीवहिली भेट होती. आता माझ्या मिथाका माझ्या सख्या बनून सोबत आहेत. ही मुळे खोल जातील. मिथाकाच्या फांद्या बहरतील. मी इथे पुन्हा येईन.

तोपर्यंत मी म्हणत राहीन:

If you deconstruct Greece,

you see in the end –

a half broken statuette,

a dilapidated Parthenon,

an olive tree, a grape wine,

a boat remain –

and an eternal sun

a myth so true

and a pristine blue.

Thus she reconstructs you…

जयश्री हरि जोशी

598382_10150968315554588_436685714_n

इ-मेल –  snehjayam@gmail.com

जर्मन सांस्कृतिक संस्था  ग्योएथे-इन्स्टीटूट / माक्स म्यूलर भवनमध्ये गेली वीस वर्षे कार्यरत.
जर्मन भाषा आणि साहित्य ह्यांचा जेएनयूमध्ये अभ्यास, आस्थापना डिप्लोमा. नाट्यशास्त्र आणि बेर्टोल्ट ब्रेष्टवर  एमफिल शोधनिबंध.
कवितालेखन, नाट्यपरीक्षण आणि अवगत भाषांतून साहित्य अनुवाद  – मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन, इंग्लिश.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s