मोना जोशी
काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात, तर काही प्रवास करताना दुसरं कोणी बरोबर असेल तर मजा वाढते. एकट्याने प्रवास करण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून स्वतःची स्वतःशी ओळख होण्याकरिता तरी प्रत्येकाने आयुष्यात एक-दोनदा तरी एकट्याने प्रवास करावाच. अनेक वर्ष कामानिमित्त मी एकटीने खूप प्रवास केला. खूप शिकायला मिळालं. पण मी जेव्हा ॲमस्टरडॅमला राहायला आले, तेव्हा मी ठरवलं की इथे राहून आपण युरोप बघण्यासाठी जो प्रवास करणार, तो एकटीने करायचा नाही. त्या प्रवासासाठी कुणीतरी आपल्याबरोबर असलं पाहिजे. मैत्रीण, मित्र, अगदी नातेवाईकसुद्धा चालेल! आधी ऑफिसमध्ये बरोबर काम करणाऱ्या मैत्रिणींना विचारून पाहायचं ठरवलं. काही लग्न झालेल्या मैत्रिणींना नवरा-मुलांसोबत प्रवास करणं अपेक्षित होतं. अविवाहितांना त्यांच्या बॉयफ्रेंड्सबरोबर जाण्याची सक्ती होती. माझ्याचसारख्या काही एकट्या राहाणार्यांची प्रवासाबद्दलची मतं माझ्याहून वेगळी आहेत, असंही जाणवलं.
मला केवळ पर्यटन स्थळं, म्युझियम्स, स्मारकं बघायला आवडत नाहीत. मला एखादं ठिकाण बघताना तिथल्या इमारती बघण्यापेक्षा तिथली माणसं, बाजार, गल्ल्या-बोळ बघण्याची जास्त उत्सुकता असते. मला रस्त्यावरच्या कॅफेमध्ये बसून लोकांकडे बघायला आवडतं. त्यांचे कपडे, ते काय खातात-पितात हे बघायला आवडतं. क्वचित त्यांच्याशी बोलून तिथल्या संस्कृतीबद्दल माहिती घ्यायला आवडतं. सगळ्यांना ह्या गोष्टींमध्ये रस असेलच असं नाही. काहींना केवळ पर्यटनस्थळं बघून, तिथे फोटो काढण्यातच रुची असते. थोडक्यात काय – अनेक महिने लोटले तरी माझाबरोबर प्रवास करण्यासाजेसं मला कोणी भेटेना.
वाट बघण्यात अनेक मोसम निघून जात होते. काही झालं तरी आपल्याला ट्रॅव्हल कंपॅनियन अथवा ट्रॅव्हल बडी मिळायलाच पाहिजे, असं तीव्रपणे वाटत होतं. एखाद्या ट्रॅव्हल बडीबरोबर प्रवास करण्याची मजा काही औरच असते, असं माझ्या वाचनात आलं होतं. पण तसा प्रवास केलेलं कोणीही माझ्या ओळखीत नव्हतं. तेव्हा असा एखादा प्रवाससोबती वा सोबतीण यांच्याबरोबर प्रवास करण्याचा अनुभव कसा असेल हे विचारायलासुद्धा कोणी नव्हतं. अनुभव घेतलाच नाही तर ते आपल्याला कळणार कसं, असेही वाटून मी प्रवाससोबती शोधायचं ठरवलं.
प्रत्यक्षात तो शोध इतका अवघड असेल असं वाटलं नाही. आधी मी संबंधित वेबसाइट्स बघितल्या. तिथून कदाचित एखादी चांगली सोबतीण वा सोबती भेटलेही असते. पण मला तिथे स्वतःची माहिती पुरवायला जरा भीती वाटली. प्रवासादरम्यान ओळख होईल हे जरी माहिती असलं, तरी एका पूर्णतया अनोळखी व्यक्तीबरोबर प्रवासासारखा जिव्हाळ्याचा अनुभव शेअर करायचा धीर होईना. युथ होस्टेलमध्ये एकटे प्रवासी भेटतील असंही कुणी सुचवलं होतं. पण मला बॅकपॅकिंग करत प्रवास करायचा नव्हता. रितसर विमान किंवा ट्रेन किंवा कारने प्रवास करून ज्या-त्या ठिकाणी व्यवस्थित हॉटेल किंवा बी अँड बीमध्ये राहून गावं फिरायची होती. कदाचित तरूणपणी असे प्रवाससोबती शोधणं जमलंदेखील असतं. पण आता पन्नासाव्या वर्षी ते जमेलच ह्याची खात्री वाटेना!
त्यातही ट्रेव्हल बडी स्त्री असावी का पुरुष ह्याबद्दल मी जास्त विचार केला नव्हता. एखाद्या पुरुषाबरोबर आपली निखळ मैत्री असू शकते ह्यावर माझा ठाम विश्वास आहेच. त्याविषयी पुन्हा कधीतरी लिहीन. त्यातून मी ॲमस्टरडॅममध्ये राहातेय. तेव्हा वाटलं, प्रवाससोबती पुरुष असला म्हणून काय झालं ? परंतु जेव्हा खरंचच शोधायची वेळ आली तेव्हा जाणवलं की ॲमस्टरडॅम हे भारतापेक्षा, पुण्यापेक्षा कितीही जरी मोकळया वातावरणाचं असलं तरी माणसं ही जिकडे तिकडे सारखीच असतात. सिंगल लोकांच्या आयुष्यांबद्दल सर्वांना भयंकर कुतूहल असतं. माझ्या एका लग्न झालेल्या मैत्रिणीने मला थेट विचारलं – “तू एक मध्यमवयीन एकटी बाई, त्यातून भारतीय. तुला पुरुष प्रवाससोबती खरंच चालेल? तुझ्या घरच्यांना कळलं तर? आणि तुलासुद्धा अनोळखी पुरुषाबरोबर हॉटेल रूममध्ये राहताना सुरक्षित वाटेल का? बाथरूम शेअर करताना प्रशस्त वाटेल का? उद्या त्याचं- तुझं पटलं नाही, भांडण झालं आणि त्याने तुझ्यावर हात उगारला, अतिप्रसंग घडला तर ? अशा अनेक प्रश्नांचा मारा केला. मीसुद्धा एवढा खोलवर विचार केला नव्हता. आणि मला पुन्हा एकदा माझ्या ह्या निर्णयाची काळजीयुक्त भीती वाटायला लागली.
आपल्या नशिबात बहुतेक एकटीने प्रवास करण्याचाच योग आहे, असं वाटत असतानाच एके दिवशी मला माझा प्रवाससोबती, बिल त्याचं नाव, सापडला.
ॲमस्टरडॅममध्ये परदेशी व्यक्तींसाठी एक इंटर नेशन्स नावाचा क्लब आहे, तिथे मला बिल भेटला. ह्या क्लबमध्ये बाहेर देशातून कामानिमित्तआलेली सर्व मंडळी वेळोवेळी जमतात. बिल हा मूळचा डच आहे. तो लहान असताना त्याचे आई-वडील कॅनडाला स्थलांतरीत झाले होते. तसा तो सुट्ट्यांमध्ये अनेकवेळा हॉलंडला येत असे. पण यंदा तो हॉलंडमध्ये परत स्थायिक होण्याच्या इराद्याने आला होता. कॅनडामधला बिझिनेस विकून तो जवळजवळ पन्नास वर्षांनंतर ॲमस्टरडॅममध्ये कायमस्वरूपी राहायला आला होता. ॲमस्टरडॅममधल्या व्यक्तींच्या ओळखीपाळखी व्हाव्यात, यासाठी तो आमच्या क्लबमध्ये येत असे. क्लबच्या एक-दोन मिटींग्समध्ये आमच्या गप्पा मस्त रंगल्या. गप्पा फिरून फिरून प्रवासाकडे येत होत्या. त्यालादेखील हॉलंड आणि युरोपमध्ये प्रवास करायचाय आणि त्यासाठी तो देखील सोबत शोधतोय हे कळल्यावर मला त्याच्याविषयी जास्तच उत्सुकता वाटली! गप्पा मारताना कळलं की त्याचा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोनही माझ्यासारखाच आहे. तेव्हा मी त्याच्यापुढे माझा प्रवाससोबती होण्याचा प्रस्ताव मांडला. आणि ट्रायल म्हणून एक दिवसाची रोड ट्रिप करायचं ठरवलं. जर आम्ही एकमेकांना दिवसभर सहन करू शकलो तरच पुढच्या प्रवासांचा विचार करायचा, असं ठरवलं.

आम्ही आमच्या पहिल्या रोडट्रिपसाठी बॉनला चेरी ब्लॉसम्स बघायला जायचं ठरवलं. ॲमस्टरडॅम ते बॉन हे साधारण ३०० किलोमीटरचं अंतर गाडीने ३ तासात पार करण्यासारखं होतं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बिलकडे युरोपमध्ये कुठेही चालणारं ड्रायव्हिंग लायन्सस होतं. इथे आल्यावर त्याने एक छोटीशी कारसुद्धा विकत घेतली होती. आणि इथे राहायला येऊन अनेक वर्ष होऊन गेली तरी मी अजून ड्रायव्हिंग करण्याच्या भानगडीत पडले नव्हते! त्यामुळे बिलबरोबर रोड ट्रिप करणं आणखीनच फायद्याचं ठरलं !
कारचा प्रवास असल्यामुळे हायवेने न जाता, आतल्या रस्त्यांनी, छोट्या छोट्या गावांमधून, हवं तिथे थांबत, कॉफी किंवा बिअर पित, फोटो काढत जाण्याची मज्जा काही औरच असणार होती ! मुख्य म्हणजे बिलला पण असा प्रवास करायला आवडतं, हे ऐकून मला बरं वाटलं. बॉनमध्ये चेरी ब्लॉसम्स साधारण एप्रिल-मे च्या दरम्यान फुलतात. ते मनोरम दृश्य बघायला दरवर्षी लाखो लोक जमा होतात. १९८० साली, केवळ रस्त्यांवर सावलीसाठी बॉन नगरपालिकेने जपानी चेरी ब्लॉसम्सची झाडं लावली. त्या झाडांमुळे रस्त्यांचं गोड गुलाबी समुद्रामध्ये रूपांतर होईल असं त्यांना तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं ! दर वर्षी स्प्रिंग सुरु झाला आणि हवा थोडीशी गरम व्हायला लागली की या झाडांना बहर येतो. हे गुलाबी दृश्य साधारण १-२ आठवडे टिकतं. त्यानंतर फुलांच्या पाकळ्या गळायला सुरवात होते. हे सगळे लक्षात घेऊन आम्ही एका शनिवारी तिकडे जायचे ठरवलं. युरोपमध्ये राहण्याची हीच मजा आहे. ऐनवेळी कुठेही पटकन जात येतं. व्हिसा किंवा तिकिटं काढायचा व्याप नाही! जेव्हा माझं त्या बॉनच्या रस्त्यांवर दोन तास घालवून दीडेकशे फोटो काढणं बिलने सहन केलं, त्याचा सोशिकपणा तेवढा टिकलेला पाहिला, तेव्हा मला माझी प्रवाससोबत्याची निवड योग्य आहे हे जाणवलं. प्रवाससोबती असल्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपलाकडे आपला सोलो फोटो काढायला हक्काचं माणूस असतो. सेल्फी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला विनंती करून आपला फोटो काढावा लागत नाही. आणि फोटो चांगला आला नाही तर तो पुन्हा काढायला सांगताना दडपण येत नाही. अगदी हवे तसे वेडेवाकडे चेहरे करून, पोजेस घेऊन निःसंकोच फोटो काढता येतात!
बॉनच्या मस्त अनुभवानंतर आम्ही आणखीन काही प्रवास करायचं ठरवलं. ह्यावेळी मात्र मोठा वीकएंड पाहून फ्रान्स किंवा जर्मनीतली काही ठिकाणं बघावी असं बिलचं म्हणणं होतं. म्हणजे किमान २-३ दिवसांची ट्रिप असणार. म्हणजे हॉटेलमध्ये राहणं आलं. मग दोन खोल्या घ्यायच्या का एका खोलीत राहायचं? दोघांत एक खोली घेतली तर खर्च नक्कीच कमी होणार होता. पण एका, म्हटलं तर अनोळखी पुरुषाबरोबर एकाच खोलीत राहायचं कसं? मला माझ्या मैत्रिणीने विचारलेल्या प्रश्नांची आठवण झाली. पण बिल मात्र ह्या बाबतीत कूल होता. आधी मला वाटलं की तो गोरा आहे म्हणून कदाचित त्याला असे प्रवास करण्याची सवय असेल. कदाचित पैसे वाचवण्यासाठी त्याला हे चालणार असेल. एव्हाना बॉनच्या ट्रिपच्या निमित्ताने अनेक वेळा भेटल्यामुळे आमची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. तरी आम्ही फक्त मित्र होतो. प्रियकर-प्रेयसी नव्हे, हेदेखील आम्हा दोघांना पक्कं माहीत होतं. त्यामुळे जर मी त्याच्याबरोबर एका खोलीत राहण्याबाबत संकोच व्यक्त केला असता, तर त्याचा गैरसमज झाला असता. मी काहीच बोलायचे नाही असं ठरवलं.

ट्रिपचं नियोजन करायला आम्ही भेटलो तेव्हा पहिल्या दहा मिनिटातच कुठे राहायचं ह्यावर चर्चा सुरु झाली. आपण हॉटेलमधे एका खोलीत राह्यलो तर बऱ्यापैकी पैसे वाचतील, असं तो म्हणाला. आणि मी काही म्हणायच्या आधी आपण दोन स्वतंत्र बेड्सची खोली घेऊया असंही त्यानेच सुचवलं. ते ऐकून मला जरा बरे वाटेपर्यंत, मी घोरत नाही, आणि मला सकाळी लवकर उठून कॉफी बरोबर सिगारेट ओढायला बाहेर जायची सवय आहे, असंही त्याने जाहीर केलं. मी मनात म्हटले, “this does not sound so scary anymore!” एकटी राहत असल्यामुळे माणसांची पारख करायला मी शिकले होते. आणि स्वतःच्या निर्णयक्षमतेवरदेखील माझा विश्वास आहे. आतापर्यंत तरी त्या विश्वासाने मला दगा दिलेला नाहीये. आम्ही लगेच हॉटेलं शोधायला सुरुवात केली.
आमच्या ह्या ट्रिपसाठी फ्रान्समधील नॉर्मंडी भागात थेट मॉंट सेंट मायकेलपर्यंत जायचं ठरलं. ॲमस्टरडॅमहून मॉंट सेंट मायकेल जवळ जवळ ६५० कि.मी आहे. वाटेत अनेक छान छान छोटी गावं लागणार होती. माझ्याकडे इथलं ड्रायविंग लायसन्स नसल्यामुळे सर्व वेळ बिलला एकट्यालाच गाडी चालवावी लागणार होती. तेव्हा २-३ ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं. एकूण ३ रात्र आणि ४ दिवसांची ट्रिप आखली. Lille हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमला लागून असलेले एक छोटेखानी गाव आहे. १७-१८व्या शतकातल्या अतिशय रंगीत आणि सुरेख इमारतींनी नटलेलं. दगडी रस्त्यांच्या या छोट्या गावात चालताना खूप मजा आली. तिथल्या ग्रॅंड प्लेस प्लाझामध्ये किती फोटो काढू असं झालं. बघावं तिथे छोटी दुकानं, बेकऱ्या, वाईनशॉप्स…कॉफी पीत मित्रांशी गप्पा बसलेली माणसं…कुठेही कृत्रिमता नव्हती. Lille मध्ये ३-४ तास घालवून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि Lille पासून ४०० कि मी अंतरावर असलेल्या Caen मध्ये मुक्कामासाठी येऊन पोचलो. Caen हे Lille पेक्षा लहान असलं तरी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं गाव असल्याचं तिथे कळलं. बिलने बराच अभ्यास करून फ्रान्सच्या उत्तर-पूर्व भागातलं हे गाव निवडलं होतं. प्रवाससोबती असण्याचा हा आणखी एक फायदा. एखाद्या ठिकाणाची माहिती लक्षात ठेवायला एकापेक्षा दोन जण असलेले केव्हाही बरे. Caen मधले हॉटेल पण चांगले निघाले. आणि Normandy मधल्या ह्या छोट्याशा गावात बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या हे बाहेर पडल्यावर कळलं.
मॉंट सेंट मायकेलपर्यंत हून परत येताना आधी ब्रुगला येऊन मुक्काम करायचा बेत होता पण तिथून निघायला बराच उशीर झाला. आणि तरी बिल शांत होता! त्यामुळे ४०० किलोमीटरवरचे ब्रुग गाठायला रात्र होऊन गेली असती. म्हणून अलीकडेच कुठे तरी मुक्काम करूया असा विचार करून आम्ही गावं शोधायला लागलो. अंतराचा अंदाज घेऊन आम्ही Rouen ला रात्र घालवायची असं ठरवलं. बिलने ताबडतोप booking.com वर आमच्या बजेटला साजेसे हॉटेल बघून खोली बुक केली. वीकएंड असल्यामुळे रस्त्यात खूपच ट्रॅफिक होता आणि एका ठिकाणी तर आम्हाला चक्क ४० मिनिटं थांबावं लागलं. मजल दरमजल करीत आम्ही रात्री १० च्या सुमारास Rouen ला पोचलो. हवा प्रचंड गरम होती आणि हॉटेल बेताचं होतं. युरोपमध्ये खोल्यांमध्ये पंखे किंवा एसी नसतो! हॉटेलवाल्यांनी दोन स्वतंत्र बेड्सची खोली उपलब्ध नाही, असं जाहीर केलं. आता आली का पंचाईत! आधीच ट्रॅफिकमुळे लांबलेला प्रवास आणि उकाडा ह्यांनी आम्ही वैतागलो होतो. भूक पण लागली होती आणि आता हे. माझा पेशन्स गेला. मी आणखी एक खोली घेऊया असं सुचवलं, तर हॉटेलमध्ये आणखी एकही खोली शिल्लक नव्हती.
रात्रीची वेळ, दोघेही प्रचंड दमलेलो. अशा परिस्थितीत दुसरं हॉटेल शोधणंही शक्य नव्हतं. आता काय करायचं? बिल शांतपणे आम्हाला दिलेल्या खोलीकडे सामान घेऊन निघाला. ते पाहून मला त्याचा जाम राग आला. दोन बेड्सची खोली मिळाली नाही, हा जसा काही माझ्या एकटीचाच प्रॉब्लेम होता. असा त्याचा आविर्भाव. त्याला माझ्या शेजारी झोपायचा चान्स मारायचाय की काय, अशी शंका देखील तेवढ्यात माझ्या मनात येऊन गेली. मी हॉटेलच्या माणसाशी वाद घालायला लागले. तेवढ्यात बिल खोलीत सामान ठेवून खाली आला. आणि त्याने मला शांत राहण्याचा इशारा केला. आजूबाजूची रेस्टॉरंट्स बंद व्हायच्या आत काही तरी खाऊन येऊ या आणि मग खोलीचा प्रश्न सोडवू असं त्याचं म्हणणं होतं. मी निमूटपणे त्याच्याबरोबर बाहेर पडले. जेवून परत आल्यावर हॉटेलमध्ये शिरताच मला खोलीचा प्रश्न सुटलेला नाहीये, हे आठवलं. मी पुन्हा चर्चा सुरु करणार तेवढ्यात मला काहीही न बोलू देता, बिलने शिताफीने मला खोलीकडे नेले. पहाते तो काय? बिलने त्या खोलीतल्या एका बेडला दोनात विभागलं होतं. हाउसकिपिंगला सांगून दोन वेगवेगळी अंथरुणंदेखील घालून घेतली होती. त्याच्यावर मी उगाचच शंका घेतल्याबद्दल मला खूपच ओशाळल्यासारखे झाले. खोलीच्या प्रश्न सुटल्याने दुसऱ्यादिवशी आम्ही Rouen मध्ये थोडे फिरून मगच ॲमस्टरडॅमकडे रवाना व्हायचा बेत आखला.
या एक-दोन ट्रिप्सनंतर आम्हाला एकमेकांबरोबर प्रवास करण्याची सवय झाली. एकमेकांचे स्वभाव,आवडी-निवडी बऱ्यापैकी कळल्या. प्रवासाची मजा यायला लागली. मुख्य म्हणजे एखादी रम्य गोष्ट पहिली किंवा सुंदर देखावा पाहिला की आपल्याबरोबर ‘आहा’ म्हणायला हक्काचं माणूस आहे. आणि तोदेखील आपल्याप्रमाणेच हर्षभरीत होतोय, हा आनंद वेगळाच असतो हे जाणवलं! व्यावहारिक दृष्टीने पहिलं तर प्रवासातल्या प्रत्येक गोष्टीसाठीचा खर्च कमी झाला. हॉटेल, जेवण, टॅक्सी, भाड्याची कार, टूर गाईड सर्व खर्च दोघांमध्ये विभागला गेला. प्रवासात पैसे संपले किंवा चोरीला गेले की आपलं सांत्वन करायला कोणी असणंही महत्वाचं असतं. आमच्या बाबतीत अगदी असंच घडलं नसलं तरी एकदा आमच्या एका छोट्या ट्रीपला जाताना मी माझी पर्स घरी विसरले. ट्रेनचा प्रवास होता आणि तिकीट बिलकडे होतं म्हणून मी बिनधास्त होते. ट्रेनमध्ये बसलो आणि कॉफी घ्यायची वेळ आली तेव्हा बघते, तर पर्स नाही. आधी मला वाटले की चोरीला गेली. थोडी रडारड केल्यानंतर लक्षात आले की मी पर्स बॅकपॅकमध्ये न ठेवता टेबलावरच विसरून आले होते. कॅमेरा, फोन, पैसे सर्व काही त्यामध्ये होतं आणि बॅकपॅकमध्ये फक्त पाण्याची बाटली आणि काही खाण्याच्या वस्तू होत्या. बिल आणि त्याचा कॅमेरा बरोबर होता म्हणून ट्रिप वाया गेली नाही!
गेल्या ६-८ महिन्यांमध्ये आम्ही दोघांनी अनेक लहान-मोठ्या अंतराचे प्रवास केले. त्यात अनेक अनुभव आले. काही चांगले, काही वाईट. Delft ला गेलो असता परत यायला बराच उशीर झाला. स्टेशनवर मध्ये मोजकेच लोके होते. बिल सिगारेट ओढायला स्टेशनबाहेर गेला. मी प्लॅटफॉर्मवर एकटीच होते. तेवढ्यात २-४ तरुण मुलं तिथे आली. त्यांच्या एकूण हालचालींवरून ते खूप प्यालेले होते हे कळत होतं. त्यातला एक मुलगा माझ्याकडे बोट दाखवून ‘रेफ्युजी रेफ्युजी..’ म्हणायला लागला. युरोपमध्ये सिरियाहून येत असलेल्या निर्वासितांबद्दल अनेकांच्या मनात राग होता, हे माझ्या वाचनात आलं होतं. त्या मुलांना बघून मी घाबरले. तेवढ्यात बिल परत आला. त्याला नुसतं बघून ती मुले शांत झाली. एरवी स्त्रीवादी असले तरी अशा वेळी आपल्याबरोबर एक पुरुष प्रवाससोबती आहे म्हणून मला विशेष सुरक्षित वाटलं. कितीही चांगला असला तरी प्रवाससोबत्याबरोबर प्रवासादरम्यान भांडण होत नाहीत असं मात्र नाही.
खाण्यापिण्यावरून मतभेद, कुठली ठिकाणं पाहायची यावरून वादविवाद, पैशावरून गैरसमज आणि अगदी लवकर उठण्यावरूनसुद्धा रुसणं हे सर्व एकत्र प्रवास करताना एकदा तरी अनुभवायला मिळतं. सुरवातीला एकमेकांच्या आवडीनिवडी कळेपर्यंत बिलचे आणि माझे अनेक गोष्टींवरून वाद होत असत. सकाळी किती वाजता बाहेर पडायचं, हा वादविषय. बिल पहाटे उठून फिरायला जाणारा, कॉफी सिगारेट पिऊन तयार होऊन बसणारा. आणि सुट्टीच्या दिवशी लवकर उठायला न आवडणारी मी. टॉयलेट-शॉवर हे सारं किती वेळात उरकायचं, कुठली ठिकाणं पाहायची आणि तिथे किती वेळ घालवायचा, रेस्टॉरंटमध्ये खायचं की सुपरमार्केटमधून जिन्नस आणून हॉटेलवर खायचं अशा छोट्या छोट्या विषयांवर एकमत होण्यात वेळ गेला. आणि ती मतं एकत्र प्रवास केल्याशिवाय कळत नाहीत हेदेखील लक्षात आलं. वाद वाढले की काही जण एकदम शांत होतात. मग संपूर्ण प्रवासात एखाददोन शब्दात उत्तर द्यायला लागतात किंवा बोलेनासे होतात. अशावेळी वाटतं की कशाला आपण एकत्र प्रवास करायच्या भानगडीत पडलो. आमच्या दोघांमध्येही एक-दोनदा असे प्रसंग आले. त्यावर उपाय म्हणून आम्ही चक्क Gin-Tonic विकत आणलं आणि संध्याकाळभर बसून आम्ही आमच्यातली सांस्कृतिक भिन्नता, स्त्री-पुरूष म्हणून दृष्टिकोनातला वेगळेपणा, वयातला फरक, जीवनानुभव यावर गहन चर्चा घडवून आणली. तेव्हापासून आम्हाला दोघांना आमच्यामधल्या मर्यादांची आणि एकमेकांविषयी वाटणाऱ्या आदरयुक्त भीतीची जाणीव झाली, आणि आम्ही एकमेकांना जास्त चांगले समजून घेऊ लागलो.
अनेक वर्ष प्रवास करत असताना माझ्या असं लक्षात आलं आहे की प्रवास स्वतःबद्दलच्या, दुसर्याबद्दलच्या अनेक छुपे गुणदोष, वैशिष्ट्यं निर्दयपणे उघड करत असतो. हा सर्व प्रवासानुभवाचा जरी भाग असला तरी त्याला स्वीकारण्यासाठी संयमाची, मनाच्या मोठेपणाची, मोकळेपणाची गरज असते. आज बिल आणि मी एकमेकांचे ट्रॅव्हल बडीज नाही, तर हक्काचे मित्र-मैत्रीण झालो आहोत. जमेल तेव्हा सिनेमा, संगीत, उत्सव, प्रदर्शनं, व्याख्यानं, सायकलिंग, बोटींग अशा सर्व ठिकाणी एकत्र जातो. त्याला भारतीय जेवण आवडतं म्हणून कधी कधी त्याच्या किंवा माझ्या घरी इतर मित्र-मैत्रिणी जमवून एकत्र स्वयंपाकसुद्धा करतो! माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांवरून मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकेन की प्रवाससोबत्याबरोबर प्रवास करणं छान असतं. यातली कुठलीही गोष्ट एकटीने करता येणार नाही, असं नाही. हे जरी खरं असले तरी बरोबर दुसरं कोणी असण्याने प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो हे नक्की. प्रवासाहून परतल्यावर त्यातले प्रसंग, विनोद, आणखी छोट्या छोट्या गोष्टी आठवून त्यावर गप्पा मारायला, फोटो बघून हसायला प्रत्येकाने एक खास प्रवाससोबती शोधायलाच हवा!
मोना जोशी
इ-मेल – mohnaa@gmail.com
औरंगबादला वाढले. पुण्यात आणि हॉलंडला शिकले. गेल्या १८ वर्षांपासून ग्रामीण समाजशास्त्रज्ञ म्हणून आप्रिका आणि आशियात वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केलं आहे. सध्या अॅमस्टरडॅम इथं रॉयल ट्रॉपिकल इन्स्टिट्यूटमध्ये सल्लागार म्हणून काम करते.
Wah!
LikeLike
Wah!
LikeLike
खूप मस्त !
LikeLike
Khup masta Mona. Vachtana baryach goshti hit a chord…. chaan lihila ahes😊 keep writing
LikeLike
Superb! 🙂
LikeLike
मोना, सुंदर लिहिलं आहेस गं! कधीतरी एकटीने प्रवास आणि प्रवास सोबती हि कल्पना खूप आवडली मला. जेंव्हा एखाद्या प्रवासाला आपण पर्यटन आणि फोटो या पलीकडे जाऊन पाहतो तेव्हा त्यातले बारकावे शेअर करायला तशाच मनोवृत्तीच माणूस हवं.
LikeLike
मोना प्रवास करण्याच्या आवडीबरोबरच लेखनकौशल्यही असंच जप!
प्रवास सोबत्याबरोबरच एक चांगला मित्रही सापडला!
परत भारतात कधी येणारेस? भेटू!
LikeLike
Mast lihile aahe.shakahari lokanchi soy hote ka.
LikeLike
khup chan….
LikeLike
वाह काय मस्त अनुभव आहे! अनोळखी ट्रॅव्हल बडीसोबत प्रवास करण्याची कल्पनाच भन्नाट आहे.
LikeLike
डिजिटल दिवाळी अंकाची सुरुवात रँड्मली करावी म्हणून सुरुवात ह्या लेखाने केली आणि व्वा, काय मजा आली लेख वाचतना. मस्त जमून आलाय लेख. एकट्याने प्रवास करणे ही कल्पनाच फार सुरेख पण सोबतिला असा खास निवडलेला मित्र असेल तर क्या बात!
LikeLike
Very nice article. Please let me know, if you have your own blog.
LikeLike
मला तुमचं प्रवास वर्णन खूपच आवडलं. वर्णन म्हणून छान होतंच, त्या त्या प्रदेशाची आमचीही सैर घडवलीत हे झालंच पण त्याहीपेक्षा मला त्यातलं धाडस, मोकळेपणा आणि मनात आलेले विचार मांडण्याचा बिनधास्तपणा फार भावला. एकटीने प्रवास करण्यात धाडस आहे पण आजकालच्या काळात अनोळखी माणसा बरोबर प्रवास करण्याची कल्पना अमलात आणण्यासाठी खूप मोकळे आणि स्वतंत्र विचार लागतात धाडसाबरोबरच. तुम्ही रिस्क घेतलीत आणि एक चांगला मित्र मिळवलात हे छान वाटले. मस्तच!!
LikeLike
Masta!
LikeLike