भाषा आणि प्रवास

गौरी ब्रह्मे

भाषा हे आपल्या जीवनाचे एक प्रमुख अंग आहे. दैनंदिन जीवनात तर ती लागतेच पण विचारांचे आदानप्रदान, चौकशी, संवाद (सुसंवाद आणि विसंवादही) यासाठी भाषेची गरज असते. एखाद्या वेगळ्या राज्यात किंवा देशात प्रवासासाठी गेलो असताना तिथली लोकल भाषा येत असेल तर  त्याहून अधिक चांगले काहीच नाही. त्यामुळे उत्तम संवाद घडू शकतो, फसवणुकीची शक्यता कमी असते. स्थानिक भाषा येत नसेल तर थोडे कठीण जाते. या लेखात माझे प्रवासातले दोन मजेशीर अनुभव लिहिते आहे. एक अनुभव आहे स्थानिक भाषा येत असूनही झालेल्या फजितीचा आणि दुसरा अनुभव आहे त्या देशाची भाषा अजिबात येत नसल्याने झालेल्या गडबडीचा.

साल २००० मे महिना. आयुष्यातली ही माझी पहिली जर्मनीची ट्रिप होती. एका एक्सचेंज ग्रुपबरोबर मी सहअध्यापिका म्हणुन ड्युसेलडोर्फला गेले होते. जर्मन भाषा चांगली येत असल्यामुळे त्या देशात वावरण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता, थोडासा अति म्हणले तरी चालेल. आम्ही सगळे दिवसभर ग्रुपबरोबर फिरायचो त्यामुळे एकट्यादुकट्याने फिरायची वेळ  अजून आली नव्हती. एका संध्याकाळी मात्र मी एकटीने ड्युसेलडोर्फ जवळ असलेल्या नॉएस या छोटेखानी गावी जायचं ठरवलं. जाताना माझ्या  यजमानांना ट्रेनचे नंबर वगैरे विचारून ठेवले आणि येताना अगदीच अडलं तर “कोणाला तरी विचारू, त्यात काय इतकं” हा भारतीय विचार मनात पक्का ठेवला. जातानाची ट्रेन व्यवस्थित पकडली. नॉयस अगदी  छोटेसे गाव आहे. थोडीफार खरेदी केली, इकडे तिकडे रमतगमत फिरले.

एकटी फिरत असल्याने भलतेच छान वाटत होते. मग रीतसर एका कॅफेमधे जाऊन माझ्या फाडफाड जर्मनमध्ये बोलून एक केक विकत घेतला. विक्रेत्या बाईने आजवर त्या छोट्या गावात बऱ्यापैकी जर्मन बोलणारे “फारीनर” व्यक्तिमत्व पाहिले नसावे. ती जाम इम्प्रेस्ड, मी हवेत! माझा फुगा तसाच तरंगत रेल्वे स्टेशनवर आला. येताना उगाचच आणखी एकाला “रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता हाच ना?” असे फाडफाड जर्मनमध्ये विचारुन घेतलं आणि त्याच्या डोळ्यातले माझ्याबद्दलचे कौतुक मनात साठवून घेत हिंदोळे घेतच स्टेशनवर आले. स्टेशन तसे सुनसान होते.

एका कोपऱ्यात एक तिशी-पस्तिशीतला (ह्या जर्मनांची वये नुसती बघून कधीच समजत नाहीत!) मनुष्य उभा होता. माझा मोर्चा थेट त्याच्याकडे वळवत मी Conjunctive II (हे जर्मन भाषेततील अत्युच्च आदरार्थी वापरला जाणारे व्याकरण) मध्ये त्याला परत माझे जर्मन फाडत विचारले, “महोदय, कृपया आपण मला सांगू शकता का, की ड्युसेलडोर्फला जाणारी ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवरून व किती वाजता सुटेल? मी आपली ऋणी राहीन.” माझं फाडफाड जर्मन ऐकून त्याचे डोळे खरोखरच मोठे झाले. बास! mission accomplished!! “तुम्ही फारच छान जर्मन बोलता हो!” तो मनुष्य उत्तरला. मी (मनातल्या मनात) “कसचं कसचं” म्हणुन अजुन हवेत उडून घेतले आणि त्याला प्रत्यक्षात थँक्स म्हणाले. पुढे येणारा बॉम्ब मात्र अत्यंत अनपेक्षित होता. “तुम्हाला इतकं सुंदर जर्मन बोलता येतं तर ते लिहिता आणि वाचता नक्की येत असेल, नाही का? आमच्या देशात प्रत्येक ठिकाणी सर्व काही माहिती व्यवस्थित देणारे फलक असतात. आपण फक्त जाऊन वाचायचे असते.” माझ्या फुग्यातली हवा नुसतीच फुस्स्स नव्हे तर तो फुगा फुटून धाडकन खाली!

खरेच होते त्याचे म्हणणे. युरोपात सगळ्या ठिकाणी बोर्ड लावून अगदी  अद्ययावत् माहिती टाकलेली असते. पण मुळात आम्हा भारतीयांना वाचायची सवयच कुठे असते? बोर्ड आहे तर माहिती नाही, माहिती आहे तर ती अद्ययावत्  नाही, असला सगळा प्रकार! त्यात “किसीसे पूछ लेंगे” या ब्रीदवाक्याने आपली नाव कायम तरून जातेच. मी मुकाट “हो” म्हणून मान खाली घालून प्लेटफॉर्मच्या माहितीफलकाकडे जाणार, तेवढ्यात तो जर्मन बाबा म्हणाला, “ही बघ आली तुझी ट्रेन, U78. यापुढे लक्षात ठेवशील ना?” (“इतके काही खडूस नसतात हे लोक” हा विचार  करून ) मी ट्रेनमधे बसून त्या रात्री  सुखरूप ड्यूसेलडोर्फला आले.

दुसरा अनुभव आहे चीनमधला. २००९ साली नवरा एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एक वर्ष चीनमध्ये होता. शांघायजवळ असणाऱ्या ख्वाचाओ या गावी  आमचे अपार्टमेंट होते. शांघाय शहरापासून हे ठिकाण थोडे दूर असल्याने  किंवा कदाचित नवीन वसाहत असल्यामुळे, इंग्रजी बोलणारे लोक इथे अजिबात सापडायचे नाहीत. मॉलमध्ये न बोलता काम चालून जाई पण अपार्टमेंटखाली असणाऱ्या छोट्या दुकानदारांशी बोलताना हातवाऱ्यांनीच काम चालवावे लागे. असे बोलायलाही मजा यायची खरी. एकदा तर नवऱ्याने  दुकानदाराशी हातवाऱ्यांनीच  किमतीच्या बाबत  घासाघीस करत चक्क एक सायकल विकत घेतली होती.

चिनी माणसे तशी अगदी साधी आणि वेळेला मदत करणारी असतात. पण ख्वाचाओ सोडून आम्ही कुठे फिरायला गेलो की बस नंबर पहायला (इकडे बोर्ड सगळे चिनी भाषेत असतात, इंग्रजी अजिबात नाही) किंवा टॅक्सीवाल्याशी बोलायला आम्हाला खूप अडचण येई. नवर्‍याच्या ऑफीसमध्ये त्याची एक फ्रेनी नावाची चिनी सहकारी होती. हिला इंग्रजी चांगली अवगत होती. ती बऱ्याचदा आमच्यासाठी दुभाष्याचे काम करे. एरवी ऑफीसमध्ये नवऱ्याला याचा उपयोग होईच पण अनेकदा वीकेंडलासुद्धा आम्हाला तिला त्रास द्यावा लागे. कुठे जायचे असेल तर फ्रेनी आणि टॅक्सीड्रायव्हर यांचे बोलणे आधी घडवून द्यावे लागे. प्रवासाचे भाडे, कुठून कुठे जायचे हे सगळे फ्रेनी ड्रायव्हरशी फोनवर आधी चिनी भाषेत बोलून घेई, मग आम्हाला परत फोनवर इंग्रजीमधे ती सर्व काही समजावे. बिचारी शनिवार रविवारीसुद्धा हे काम न कंटाळता करे.

एका शनिवारी आम्ही सुझोऊ नावाच्या एका ठिकाणी फिरायला गेलो. तिथे टॅक्सी करूनच जावे लागणार होते. जाताना नशिबाने एक तोडकेमोडके इंग्रजी येणारा टॅक्सीवाला मिळाला आणि आमचे काम झालं. सुझोऊ हे गाव एक पर्यटनस्थळ आहे त्यामुळे तिथे वावरतानाही काहीच त्रास झाला नाही. मात्र येताना थोडा अंधार झाला आणि आम्ही चालतचालत जरा वेगळ्या रस्त्यावर आलो. ख्वाचाओ तिथून दीड तासाच्या अंतरावर होते हे आम्हाला माहीत होते. एक टॅक्सीवाला भेटला, पण त्याला इंग्रजी ओ का ठो कळेना. हातवारे करुन “ख्वाचाओ” वगैरे सांगून पाहिल. पण त्यानंतर तो आम्हाला काहीतरी विचारायला लागला आणि ते आम्हाला बिल्कुल कळेना. आजच्यासारखे गूगल मॅप्स तेव्हा वापरात नव्हते. आमच्याकडे आमचा पत्ता चिनी भाषेत लिहिलेला नव्हता. ती आमची सर्वात मोठी चूक होती. अश्या वेळी आमचा आधार फ्रेनीच! पण तिचाही फोन नेमका लागेना. टॅक्सीवाल्याला आमचे भाडे सोडायच नव्हतं. जवळजवळ एक तास आम्ही आणि टॅक्सीवाला एकमेकांकडे बघत उभे होते. फारच विनोदी परीस्थिती होती ती. शेवटी एकदाचा फ्रेनीला फोन लागला आणि आम्ही हुश्श करुन तो टॅक्सीवाल्याला दिला. नंतर आम्हाला कळलं की टॅक्सीवाल्याला फक्त “ख्वाचाओ उत्तर” की “ख्वाचाओ दक्षिण” एवढीच माहीती हवी होती, त्याशिवाय कुठला रस्ता घ्यायचा हे त्याला कळणार नव्हते. ही फजिती लक्षात ठेऊन पुढे आम्ही कायम आमच्याबरोबर चिनी भाषेत लिहिलेला पत्ता ठेवू लागलो.

गौरी ब्रह्मे

18620125_10155259128174593_8020516548041356034_n

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s