मुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर

मनस्विनी प्रभुणे-नायक

जवळ जवळ पंधरा ते वीस वर्षानंतर मी आता स्थिर आयुष्य जगतेय. सरलेली वर्षं बघितली तर कामाच्या निमित्ताने खूप आडवातिडवा प्रवास केलाय आणि त्यातला सर्वात जास्त मुक्काम गोव्यात झालाय.

भारताच्या बहुतेक सर्व सीमांवर वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने जाणं झालंय. पश्चिम बंगाल-गुजरातमध्ये अनेकदा प्रवास झाला. पण एखाद्या अनोळखी गावात आपण थोड्या दिवसांसाठी जातो आणि बघता बघता आपणही त्याच मातीतले बनतो असं काहीसं माझं गोव्याबाबत झालं.

मागे एक वर्ष ओरिसाला- छत्तीसगड आणि झारखंड इथे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाणं व्हायचं. तिथे एक चांगली टीमही तयार झाली होती. एकदा आम्ही सर्व फिल्डवर्कसाठी मयूरभंजच्या संथाल परगण्यात गेलो होतो. तिथे कामाची खूप गरज आहे असं वाटायला लागलं. पण तो प्रोजेक्ट संपल्यावर परत तिथे जाण्याची तशी कधी संधी मिळाली नाही.

ती संधी गोव्याने मात्र वारंवार दिली.

कधी वाटलं नव्हतं पण आता गोव्यातच कायमची स्थायिक झालेय. गोवा, इथली माणसं, त्यांची निसर्गाच्या जवळ जाणारी जीवनशैली.  इथला निसर्ग जास्त आवडला आणि इथल्या मोठ्या वास्तव्यात गोव्याचा वेगळेपणा जाणून घेता आला.

इतके दिवस मुक्कामपोस्ट चिंचवड होतं ते आता मुक्कामपोस्ट पणजी-गोवा झालंय.

मी तशी भटकीच! बाबा सांगतात, मी अगदी लहान होते तेव्हा मला शोधण्यासाठी घरातल्या सर्वांना पायपीट करावी लागायची. आमचं गाव तसं छोटंसंच होतं. त्यामुळे लपाछपी, चोर-पोलीस खेळताना आम्ही कोणती हद्दच ठरवत नव्हतो. कोणत्याही वाड्यात आम्ही सहज लपून बसायचो. त्यामुळे एकदा खेळायला बाहेर पडलं की सापडणं अवघड होऊन बसायचं. मग काय? अंधार पडायला लागला की घरातले सगळे मला शोधायला बाहेर पडायचे. भटकभवानीच होते. हीच आवड नोकरीच्या निमित्त्ताने जोपासली गेली. वाडा सुटला, गाव सुटलं आणि मोठा परिघ, विस्तारलेलं क्षितिज समोर खुणावत होतं. या क्षितिजाला गवसणी घालणं तसं सोप्पं नव्हतं.

जवळ जवळ पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. लोकसत्तामधल्या नोकरीचा करार संपला होता. काही दिवस ब्रेक घेऊन नव्याने नोकरी शोधायला लागावं, असं ठरवलं होतं. तोच एक दिवस बाबांचे मित्र यशवंत ठाकर यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या संस्थेत एका प्रोजेक्टवर काम करायला बोलावलं. प्रोजेक्ट देखील छान होता. पुणे जिल्ह्यातील एकांड्या शिलेदारांविषयी  हा प्रोजेक्ट हा. एकांडे शिलेदार म्हणजे कोणताही आधार-पाठबळ नसताना एकट्या व्यक्तीने उभं केलेलं सामाजिक काम. तर अशा व्यक्तींना भेटून, त्यांचं काम बघून त्यावर एका महिन्यात रिपोर्ट तयार करायचा असं कामाचं स्वरूप होतं. नुसता पुणे जिल्हा म्हणलं तरी तो देखील गोव्याच्या आकारमानाहून मोठा आहे. या कामासाठी मला एक वाहन दिलं होतं. महिनाभर रोज एकटीच कोणत्या न कोणत्या गावात जात होते. कधी भोरमधील आडवळणाची गावं तर कधी राजूरमधील आदिवासी भाग. या छोट्याशा प्रोजेक्टमधून एकटीने फिरण्याचा आत्मविश्वास वाढला, जो मला पुढे कराव्या लागणाऱ्या प्रवासात उपयोगी पडला.

20150803_113603

हा प्रोजेक्ट संपतो तोच पुढचा प्रोजेक्ट वाट बघत होता. परत पत्रकारितेत कार्यरत व्हावं की हेच काम सुरु ठेवावं अशी दोलायमन स्थिती होती. हा दुसरा प्रोजेक्ट गोव्यात होता.

खरं तर तेव्हा मला गोव्याबद्दल विशेष असं काही माहीत नव्हतं. रोज रात्री दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये तापमान सांगताना पणजीचा उल्लेख व्हायचा. त्यामुळे गोव्याची राजधानी पणजी आणि तिथे कायम उष्ण वातावरण असतं एवढंच काय ते जुजबी माहीत होतं. मुळात गोव्याबद्दल अधिक जाणून घ्यावं, असंही कधी वाटलं नव्हतं. पण आपला प्रवासाचा परिघ विस्तारतोय म्हणल्यावर मलाही स्वस्थ बसवेना. चला आता हा ही प्रोजेक्ट करून बघूया म्हणून गोव्याला जायला तयार झाले.

हा प्रोजेक्ट झाल्यावर या कामातून थांबायचं, असं त्यावेळेला ठरवून टाकलं होतं. पण गोव्यातला हा एक प्रोजेक्ट माझं भविष्य बदलून टाकेल असं मात्र वाटलं नव्हतं.

एक-दोन नव्हे तर पुढची पंधरा वर्षे मी गोव्यात येऊन-जाऊन राहिले.

20150813_153857
टिपिकल गोवन जेवण

गोव्यात पणजीत पहिल्यांदा उतरले तो दिवस आज ही जसाच्या तसा आठवतोय. मांडवी नदीवरचा भला मोठा पूल ओलांडून पणजीत केलेला प्रवेश, गोलाकार रचना असलेला पणजीतील कदंब बसस्टॅन्ड, स्टॅन्डबाहेर उभ्या असलेल्या अनोख्या रिक्षा आणि पायलट हे सारं माझ्यासाठी नवीन होतं. महाराष्ट्रात-पुण्यात अशा रिक्षा आणि असे पायलट कधी बघितले नव्हते. प्रवासी बसतात त्या भागात दोन्ही बाजूने उघडणारी पत्र्याची दारं,  त्या दारांना छोट्या खिडक्या, प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यामध्ये पडदा लावलेला,  सर्वात महत्वाचं म्हणजे रिक्षात बसताना आणि उतरताना रिक्षाचालकाने स्वतः दार उघडणं आणि बंद करणं. सगळा कसा शाही थाट! पुण्यातल्या रिक्षाचालकांच्या मुजोरी वृत्तीचा अनुभव असल्यामुळे इथल्या रिक्षात बसणं हे काही वेगळंच होतं आणि पायलट प्रकार तर सर्वार्थाने वेगळा वाटला. पायलट म्हणजे जवळ जवळ दुचाकी रिक्षाच. पायलट म्हणजेच बाईकस्वार, जो तुम्हाला जिथे जायचंय तिथे पोहोचवतो. अर्थातच रिक्षाला जसे आपण पैसे मोजतो तसेच इथे पायलटला द्यावे लागतात. रिक्षापेक्षा ही सेवा स्वस्त असते. वैमानिकाला पायलट म्हणतात हे ठाऊक होतं पण इथे बाईकस्वारही पायलट असतो हे ऐकून मजाच वाटली. या पायलटची इथल्या सरकारकडे नोंदणी केलेली असते. त्याला रितसर पायलट म्हणून लायसन्स दिलं जात. त्यामुळे या पायलटबरोबर प्रवास करणं अगदी सुरक्षित आणि स्वस्त ठरतं. पणजीत पाय ठेवताच किती महत्वाची माहिती मिळून गेली.

अल्तिनो नावाच्या भागात शासकीय गेस्टरुममध्ये आमची निवासाची सोय केली होती. इथल्या अजबगजब रिक्षामधून आम्ही अल्तिनोला जात असताना अर्ध उजाडलेल्या भल्या सकाळी, सोनेरी किरणांनी पणजी शहर चकाकत होतं. फिक्कट पिवळ्या आणि पांढऱ्या, तर कधी निळ्या-पांढऱ्या रंगाची संगत असलेली पोर्तुगीज पद्धतीची घरं या सकाळच्या कोवळ्या प्रकाशात खरोखरी उजळून निघत होती. गोव्यात नाही तर युरोपातल्या एखाद्या गावात आहोत असंच वाटू लागलं.

अल्तिनोच्या रस्त्याला लागण्यापूर्वी पणजीतील आगळी वेगळी रचना असलेलं चर्च दिसलं. चर्चच्या असंख्य पायऱ्यांनी एका क्षणात लक्ष वेधून घेतलं. अल्तिनोचा चढ लागेपर्यंत माहीत नव्हतं की हा एक टेकडीचा भाग आहे. ‘अल्त’ वरून अल्तिनो हे समजायला वेळ लागला. गोवा शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं याच भागात आहेत. शिवाय सर्व शासकीय गेस्टहाऊसेस, पणजी दूरदर्शन, आकाशवाणीदेखील याच टेकडीवर आहे. टेकडीच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी जाताना खाली दरीत शहराची झलक दिसत होती. अल्तिनो टेकडीचा तो वळणदार रस्ता खूप आवडून गेला. या रस्त्यावरून पायी चालत गेलं पाहिजे असं मनोमन ठरवूनही टाकलं. अल्तिनो टेकडी कधी मला पणजीच्या डोक्यातील मुगुट वाटली तर कधी पणजी शहराची पहारेकरीण. अल्तिनोवरील गेस्टहाऊसमध्ये पुढची दहा वर्ष मुक्काम असेल असं त्यावेळेला पुसटसंही वाटलं नाही.

20160214_095357

आमच्या संस्थेकडे गोवा शासनाचे एका मागोमाग एक नवनवे प्रोजेक्ट येत गेले. प्रत्येक वेळी प्रोजेक्ट संपताना वाटायचं की बहुदा आता हा शेवटचाच प्रोजेक्ट. पण परत काही दिवसात नवं काहीतरी पुढे यायचंच. परत नव्या उत्साहाने मी गोव्यात हजर. प्रत्येक वेळी गोव्याची एक वेगळी बाजू उलगडणं सुरू.

एरवी कधी मी गोव्यात जातेय असं कोणाला सांगितलं की ‘अरे वा… मज्जा आहे तुझी’  असं ऐकायला मिळायचं. गोवा म्हणजे मज्जा असं एक समीकरणच लोकांच्या मनात तयार झालंय. गोव्यात मी कामांसाठी जातेय असं सांगितलं तर ‘गोव्यात कोणी काम करायला जातं का? तिथे तर मजा करायला जायचं असतं’ असंही ऐकवायचे. गोवा म्हणलं की चर्च, समुद्रकिनारा आणि दारू या पलिकडे दुसरं काही आहे असं लोकांना वाटतंच नाही.

सुदैवाने मी गोव्यात कधीच पर्यटक म्हणून फिरले नाही. प्रत्येक वेळी इथल्या माणसांशी जोडलेला एखादा प्रश्न, एखादी समस्या, शासनाची योजना लोकांपर्यंत पोहचवणं अशा कामाच्या निमित्ताने अगदी दुर्गम भागातही जायला मिळालं. त्यामुळे ग्लॅमरस गोव्यापलीकडच्या गोव्याचा खरा चेहरा जवळचा वाटला. त्यामुळे गोव्याबद्दल लिहिताना इतरांनी बघितला नाही असा गोवा माझ्या लिखाणातून व्यक्त होत गेला. माझ्याच मित्रमंडळींमधील अनेकजण आहेत जे दर वर्षी गोव्यात एक तरी चक्कर मारतात. पण त्यांना कलंगुट, बागा, माजोर्डा, वार्का, पाळोळे या बीचपलीकडे गोवा आहे, हे माहीतच नाही. एखादा समुद्रकिनारा गाठायचा आणि तिथेच मुक्काम करायचा म्हणल्यावर गोवा कसा कळणार ना!

गोव्यात आल्यावर माझा मुक्काम कायम शासकीय गेस्टहाऊसवर असायचा. एक, दोन नाही. सलग दहा वर्ष मी गेस्टहाऊसला राहिले. छोट्याशा टेकडीवरील या गेस्टहाऊसने मला एकटीला राहायला शिकवलं. वर्षातील अनेक महिने असे जायचे की एकूण २४ पैकी मी सोडून बाकीच्या रूम्समध्ये कोणीच नसायचं. मीच एकटी भुतासारखी इथे असायचे. कधी कधी भीतीही वाटायची. रात्री कुत्री ओरडायला लागली की आणखीनच भीती वाटायची. काही झालं तरी रात्री दार उघडायचं नाही हे पक्कं ठरवून टाकलेलं.

20160302_144847

या गेस्टहाऊसमध्ये एक काळं कुत्रं होतं. त्याला अधूनमधून काही ना काही खायला घालायचे. थोड्याच दिवसात आमची गट्टी जमली. तर या काळूला रात्री रूमवर परतले की काहीतरी खायला द्यायचे. ते खायचं सोडून काळू आधी मला सोडायला वर दुसऱ्या मजल्यावर माझ्या रुमपर्यंत यायचा. मी रुममध्ये गेले आणि दार लावल्याचा आवाज आला की जायचा. एकदा मी तो गेला की नाही बघण्यासाठी दार उघडून बघितलं तर दाराचा आवाज ऐकून हा परत उतरलेल्या पायऱ्या चढून दारासमोर हजर झाला!. असा वेडा होता. कोणी कधी एवढं जीव लावतं का?

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात महिनाभर हे गेस्टहाऊस दिल्लीहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी बुक असायचं. त्या काळात माझा मुक्काम दुसरीकडे असायचा. पण महिनाभराने आल्यावरदेखील काळू कधी ओळख विसरला नाही. तोंडातून चित्रविचित्र आवाज काढून, लाडात येऊन स्वागत करायचा. एक प्रकारे माझा पहारेकरीच झाला होता. त्याला कधी नुसती हाक मारली तरी लगेच असेल तिथून धावत यायचा.

कधीतरी ऑफिसची कामं संपवून लवकर आलेच तर अल्तिनोचा वळणावळणाचा रस्ता पायी चालत उतरून खाली पणजीत यायचे. कधी पणजी चर्चच्या पायऱ्यांवर बसायचे तर कधी कला अकादमीत जायचे. सोबत एखादं पुस्तक असायचं. अंधार पडेपर्यंत पुस्तक वाचायचं. अंधार पडला की जवळच्याच हॉटेलमध्ये काहीतरी थोडंसं खाऊन परत रूमवर जायचे. पणजी चर्चसमोरील पायऱ्या मला खूप आवडतात. अगदी नवीन नवीन इथे आले होते तेव्हा अनेकदा मी या पायऱ्यांवर जाऊन बसायचे. सर्वात वरच्या पायरीवर बसून समोर वाहत जाणाऱ्या गर्दीला, वाहनांना निरखत बसायला आवडायचं. रुमवर गेल्यावर एकटं वाटायचं. मग रूममध्ये स्वतःला कोंडून घेण्यापेक्षा या ठिकाणी येऊन बसू लागले.

सुचेता कडेठाणकर ही माझी लोकसत्तामधील मैत्रीण. लोकसत्तामध्ये आम्ही एकाच दिवशी नोकरीला लागलो आणि एकाच दिवशी तिथून बाहेर पडलो. मैत्री मात्र टिकून राहीलं.  सुचेता एकदा माझ्याबरोबर गोव्यात आली होती. संध्याकाळी आम्ही चर्चच्या पायऱ्यांवर जाऊन बसलो. खूप दिवसांनी शांतपणे गप्पा मारायला मिळाल्या. आजूबाजूच्या जगाचं भानच नव्हतं इतक्या आम्ही गप्पांमध्ये रमून गेलो. एव्हढी वाहनं येत जात होती, पर्यटकांची भरपूर वर्दळ होती. तरीही सारं कसं शांत होतं. कोणताही गोंधळ नाही, गडबड नाही. हॉर्नचे कर्णकर्कश आवाज नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावरच्या चर्चच्या पायऱ्यांवर आम्ही आहोत असं वाटलंच नाही. ‘पुण्यात असं ठिकाणच नाहीये जिथे शांतपणे बसता येईल. जिथे तिथे गोंगाट असतो’ सुचेताला तीव्रतेनं जाणवलं.

नंतर काही दिवसांनी मी एकटीच या पायऱ्यांच्या एका टोकाला पुस्तक वाचत बसले होते. आजूबाजूला तसं लक्ष नव्हतं. नंतर अचानक जाणवलं, कोणीतरी व्यक्ती रस्त्यावर बाईकवर आहे आणि आपल्याला खुणावतेय. पुस्तकातून डोकं वर काढलं तर कोणी अनोळखीच व्यक्ती. वाटलं, पर्यटक असेल, एखादा पत्ता विचारत असेल. पुस्तक मिटून त्याला काय?? असं विचारलं तर ‘येतेस का?’ असं त्याने विचारलं. दोन सेकंद काही समजलंच नाही. त्याने परत तेच उच्चारल्यावर मात्र मी त्याला जोरात ओरडले. उठून उभी राहिले. आजूबाजूचे पर्यटक त्याच्याकडे बघू लागले तसा तो बाईक सुरु करून धुमसटाक पळून गेला. पण मी प्रचंड अवस्थ झाले. पुस्तकात लक्ष लागेना. अरे आपण काय म्हणून इथे बसत होतो आणि या असल्या पुरुषांना काय वाटतंय? या विचाराने काही सुचेनासं झालं. म्हणजे आता इथे बसणंही संपलं तर! या विचारानेच कासावीस होऊ लागले. असा अनुभव पुण्यात रात्रीच्या वेळी बसस्टॉपला उभं राहिल्यानंतरही अनेकदा आला होता. त्यावेळीदेखील ओरडाआरडा करणं, त्या व्यक्तीला योग्य त्या शब्दात सुनावणं असे उपचार करायचे. म्हणजे रात्रीच्या वेळी एकट्या बाईने फिरायचं नाही का? आणि फिरलीच तर तिला अशा अनुभवांना सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे, असंच झालं ना? आणि कदाचित म्हणूनच एकटी बाई प्रवास करायला घाबरते. हे सगळं खूपच अवस्थ करणारं.

20150822_120947

या अनुभवानंतर संध्याकाळचं माझं बाहेर पडणं बंद झालं. चर्चच्या पायऱ्यांवर त्या प्रसंगानंतर मी कधी बसलेच नाही. आजही तिथून जात असताना तो प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही.

काही दिवसांनी लक्षात आलं, की मी असं स्वतःला खोलीत कोंडून घेऊन परिस्थिती बदलणार नाही. त्यापेक्षा त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. शांतपणे वाचत बसण्यासाठी आणखी देखणी जागा सापडली. अल्तिनो टेकडी उतरून खाली आलं की कला अकादमी जवळच होती. पण खूपदा फक्त कार्यक्रमांच्या निमित्तानं जाणं व्हायचं. त्यामुळे थेट नाट्यगृहात जायचं आणि कार्यक्रम संपला की तिथून निघून यायचं. एक दिवस अशीच तिथे गेले असता अकादमीच्या मागच्या बाजूला गेले. मागे मांडवी नदीचा तीर आहे. मांडवी नदी आणि अरबी समुद्र यांचा जिथे संगम होतो, त्या तीरावर कला अकादमीची देखणी वास्तू उभी आहे. इथे संध्याकाळी सूर्यास्त बघत बसता येतं.

पणजी चर्चच्या पायऱ्या सुटल्या आणि ती जागा अकादमीतल्या बाकाने घेतली. अस्ताला जाणारा सूर्य, अधून मधून जाणाऱ्या छोट्या बोट्स, नदीपलीकडील चर्चमधून ऐकू येणारी घंटा आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांची गाज या वातावरणात किती तास उलटून जायचे ते समजायचंच नाही. एकावर एक उसळणाऱ्या लाटा आणि त्यांच्या आड लपू पाहणारा सूर्य बघत बसायचं. चहाची तल्लफ आली तर जवळच्या अकादमीच्या कॅफेतून एक कप चहा घेऊन यायचा आणि परत इथे बसायचं. कला अकादमीच्या वॉचमनची सतत गस्त असल्यामुळे त्या ‘तसल्या’ पुरुषांची भीतीही नव्हती.

इथे बसून परत एकदा गौरी देशपांडे, सानिया, पु शि.रेगेंची ‘सावित्री’ वाचून काढली. इथल्या नीरव शांततेत दिवसभराचा शिणवटा निघून जायचा. अस्ताला जाणारा सूर्य बघायच्या ओढीने अनेक संध्याकाळ इथे घालवल्या. सूर्य तोच असायचा मात्र मावळताना त्याचं सौन्दर्य काही वेगळंच दिसायचं. मावळताना मागे सोडून जाणारा त्याचा सोनेरी केशरी रंग हुरहूर लावून जायचा.  रोज या रंगाची नवीच छटा बघायला मिळायची. तो अस्ताला गेला, तरी त्याच्या खुणा दीर्घकाळ आकाशात रांगोळीसारख्या उमटलेल्या असायच्या.

पणजीतल्या माझ्या मुक्त संचाराला ब्रेक लागला तो ओल्ड गोव्याला स्थलांतर करावं लागल्यावर. अल्तिनोचा परिसर, इथलं गेस्टहाऊस सोडवत नव्हतं. पण गेस्टहाऊसचे वाढवलेले दर, केलेलं खासगीकरण यामुळे तिथे राहणं आर्थिकदृष्टया परवडणारं नव्हतं. पणजी माझं आवडतं शहरं. आपल्याच गावात फिरताना एक आपोआप सहजता येते, तशी मला पणजीमध्ये अनुभवायला आली. इथले सर्व गल्लीबोळ पायाखालून गेले. एकूणएक  रेस्टॉरंटमध्ये खाऊन झालं. ठराविक हॉटेलमधले वेटर, ठराविक रिक्षाचालकदेखील ओळखीचे झाले. आपोआप एक सुरक्षित वर्तुळ आजूबाजूला तयार झालं होतं. हे सगळं सोडून पणजीपासून दूर अकरा किमीवर आडमार्गाला ओल्ड गोव्यात राहायला जाणं जीवावर आलं होतं, पणजी गेस्टहाऊस सोडून जाताना काळू आता भेटणार नाही याचंही वाईट वाटत होतं. थोडीशी नाराजीनेच ओल्ड गोव्याला गेले.

पणजी ते ओल्ड गोवा हा गोव्यातला माझा सर्वात आवडता रस्ता. पणजी सोडली की काही अंतर मांडवी नदी आपल्याला सोबत करत असते. अशी रस्त्याला समांतर भरून वाहणारी नदी मी पहिल्यांदाच बघितली. म्हणजे समुद्राला भरती असली, की रस्त्याच्या काठाला हिचा स्पर्श होतो. अशा काठोकाठ भरलेल्या मांडवी नदीच्या तीरावरून जाणारा रस्ता खूप आवडतो. अगदी पहिल्यांदा मी या रस्त्यावरून जाताना म्हणाले पण होते, की मला इथे कुठे राहायला मिळालं तर खूप आवडेल! इतकी मी या नदीकाठच्या रस्त्याच्या प्रेमात पडले होते. आणि आता जेव्हा तशी संधी आली तेव्हा मात्र मनातून आनंदी नव्हते. थोड्याच दिवसात हा रस्ताही माझा रोजचा रस्ता झाला. रिबंदरमधील आकर्षक वळणदार रस्ता, युरोपातील गावात शोभावीत अशी टुमदार घरं, नदीकाठचं रेस्टॉरंट.. एकेक खाणाखुणा वाढत होत्या. ओल्ड गोव्यातील जगप्रसिद्ध चर्च माझ्या या नव्या घरापासून जवळच होतं.

शिवाय या जुन्या गोव्यात शिरताना मला इथली एक गोष्ट फार आवडायची. इथला गांधीजींचा पुतळा. गांधीजींचा असा पुतळा मी कधीच बघितला नव्हता. एका कोळ्याच्या छोट्याश्या पोरीला जवळ घेणारे गांधीजी या पुतळ्यात अगदी प्रेमळ आजोबांसारखे वाटतात. ती चिमुरडीदेखील त्यांना छान बिलगलीय. तिच्या कडेवर मासळीचं सूप आहे. त्यातली मासळीदेखील त्या शिल्पात ठळकपणे दिसते. गांधीजी आणि त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरचे भाव निव्वळ अवर्णनीय. या रस्त्याने कधीही जाताना अगदी हा पुतळा नजरेआड होईपर्यंत मी त्या दोघांच्या चेहऱ्यावरील भाव टिपून घेण्याचा प्रयत्न करत असे. आता तर पुतळा मला रोजच बघायला मिळणार होता. ओल्ड गोव्यातील वास्तव्य आवडून घेण्यासाठी मीच या अशा आवडत्या गोष्टी परत परत डोळ्यासमोर आणत होते.

ओल्ड गोव्यातला फ्लॅट माझ्या गेस्टहाऊसच्या रूमच्या तुलनेत आलिशान होता. पणजी सोडावी लागल्याची नाराजी काही दिवस मनात राहिली. दूध आणायला दूरवर जावं लागायचं. जवळपास दुकानं नव्हती. इतके दिवस गेस्टहाऊसला परवानगी नसल्यामुळे मी स्वयंपाक करू शकले नव्हते. पण इथे फ्लॅटवर कोणाची आडकाठी असायचा प्रश्नच नव्हता. मी माझ्यापुरतं शिजवू लागले.

20150730_141830-1

काही दिवसात मी इथल्या वातावरणात रुळून गेले. इथली सकाळ फार सुंदर असायची. सोसायटीच्या मागच्या बाजूला जवळजवळ जंगलच होतं. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आवाजाने सकाळी जाग यायची. याच जंगलातून रोज सकाळी हॉर्नबिलची जोडी जाताना दिसायची. त्यांचा आवाज एकदा कानी पडला. मी हातातली कामं बाजूला टाकून बाल्कनीत पळाले आणि आवाजाच्या दिशेने शोध घेऊ लागले. तोवर मी प्रत्यक्ष असं हॉर्नबिलला कधी बघितलं नव्हतं. हॉर्नबिलच्या या जोडीचा रोजचा जायचा यायचा हा मार्ग होता. त्यांची जाण्या-येण्याची पद्धतदेखील अद्भुत होती. शीळ घालत पहिल्यांदा नर हॉर्नबिल एका झाडावर येऊन बसायचा. मग मादी हॉर्नबिल त्याच्या पाठोपाठ त्या झाडावर येऊन बसायची. नर हॉर्नबिल पुढच्या झाडावर गेला की शीळ घालून मादीला बोलवायचा. बहुतेक तो रस्ता सुरक्षित आहे की नाही हे पाहून आपल्या प्रियेला घेऊन जात असावा. अनेक दिवस लक्षपूर्वक त्यांना बघितल्यावर हे सगळं उमजलं. खरोखरी ती त्याला अत्यंत प्रिय असणार. तिच्या काळजीपोटी रस्त्यातील प्रत्येक टप्पा पारखल्याशिवाय तो पुढची झेप घेत नसे. संध्याकाळी अंधारून येण्याआधी परत याच पद्धतीने त्यांची परतवणूक व्हायची. शरीरापेक्षा मोठी असलेली पिवळीधम्मक चोच, पंखांवरचे काळे-तपकिरी पट्टे पटकन लक्ष वेधून घ्यायचे. त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. पण कधी ते कॅमेऱ्यात टिपले गेले नाहीत. या जोडीने मला पुरतं वेड लावून टाकलं. सकाळची त्यांची जाण्याची आणि संध्याकाळी परतण्याची वेळ, संध्याकाळी घरी कधी लवकर आलेच तर मी आवर्जून पाळू लागले. अनेकदा सकाळी मोरांचा आवाज यायचा. आवाजाच्या दिशेनं खूपदा शोधही घेतला. पण मोर काही कधी दिसला नाही. भारद्वाज कायम दिसायचे. पण या हॉर्नबिलच्या जोडीची मात्र सवय होऊन गेली. तीन वर्ष मी या फ्लॅटमध्ये राहिले. पुन्हा तेच. पण हा फ्लॅट सोडताना खूप दुःख झालं.

अल्तिनोला गेस्टहाऊस होतं. इथे घर होतं. इथल्या भितींना आपलेपणाचा वास आपोआप आला. जवळच असलेला रेल्वे ट्रॅक,  रेल्वेची होणारी ये-जा,  रात्रीच्या वेळी रेल्वेइंजिनाचा आवाज याने मला मी चिंचवडच्या माझ्या घरात असल्यासारखं वाटायचं. लाइट गेले की सोसायटी मागच्या जंगलात काजवे चमकताना दिसायचे, रातकिड्यांच्या आवाजाने रात्र भरून निघायची. दुरून दिसणाऱ्या डोंगराचं सौन्दर्य ठराविक अंतराने पालटून जायचं. हे सगळं सोडून मी कशी जाऊ असं वाटत असताना इथूनही स्थलांतर करावं लागलं.

ओल्ड गोव्याच्या रस्त्याने फोंड्याला जात असताना या फ्लॅटकडे आणि त्याच्या आजूबाजूच्या झाडांकडे आपोआप मान वळते. हॉर्नबिलच्या जोडीची आठवण येते. आजही ती दोघं तसाच प्रवास करत असतील? की  माझ्यासारखं त्यांनीही स्थलांतर तर केलं असेल?

मनस्विनी प्रभुणे -नायक

1964829_717314691623052_1127815636_n

इ-मेल – nayakmanaswini21@gmail.com

मूळ पुण्याची. आता गोव्यात कायमची स्थायिक. समदा या दिवाळी अंकाची संपादक. लेखन-संपादनाचं काम करते. अनेक वर्षं वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांशी संबंधित काम.

 ब्लॉग – https://streetfoodinindia.wordpress.com

4 thoughts on “मुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर

    1. मनस्विनी, खूप छान लिहिलं आहेस. मांडवीला समांतर जाणारा रस्ता मी मध्ये गोव्याला आले होते, तेव्हा मला मुग्ध करून गेला होता. मोबाइलच्या कॅमेऱ्यानं व्हिडिओ शूट केलं… आताही कधी वेळ असला, की ते पाहत बसते. पर्यटकांचा गाेवा मलाही बघायचा नव्हताच… तू तो आणखी सुंदर करून जणू तिथे प्रत्यक्ष नेलंस.

      Like

  1. मस्त जमलंय, खूप वर्षांत गोव्याला गेले नाहीये याची तीव्र जाणीव करून दिली तुझ्या लेखाने.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s