हरवलेल्या पासपोर्टची गोष्ट

आशय दिलीप जावडेकर

आम्ही २०१७ च्या जुलै महिन्यामध्ये अमेरिकेतल्या लॉन्ग वीकएन्डला जोडून युरोप सहल आखली होती. मी, माझी बायको मधुरा, आमची दोन वर्षांची मुलगी अंजोर अमेरिकेतून आणि माझे आई-बाबा भारतामधून असा प्रवास करून आम्ही स्वित्झर्लंडला भेटायचं ठरवलं होतं. तिथून इटली आणि मग फ्रान्स. ही सहल झाल्यावर आईबाबा आमच्याबरोबर अमेरिकेमध्ये येणार होते काही दिवस आणि नंतर घरी, भारतात परत.

आम्ही तीन ठिकाणी Air BnB ने घरं घेतली होती (स्वित्झर्लंड, फ्लोरेन्स आणि रोम) आणि तीन ठिकाणी हॉटेलमध्ये राहणार होतो (मिलान, लियॉन, पॅरिस). सगळी आरक्षणं महिनाभर आधीच केली होती.

स्वित्झर्लंडचा अतिशय रम्य आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा परिसर पाहून जेव्हा आम्ही इटलीमध्ये प्रवेश केला, तेव्हा ट्रेनच्या आतूनच मला अचंबा जाहला. कुठल्याही वेगळ्या देशात आपण आलो आहोत, असं मला वाटतं नव्हतं. आपल्या भारतासारख्याच इमारती, गच्च्या, बाहेर वाळत घातलेले कपडे. त्यामुळे फार काही वेगळं अनुभवतो आहोत असं निदान ट्रेनच्या आतून तरी जाणवलं नाही.

जेव्हा मिलान ट्रेनस्टेशनला उतरलो, तेव्हा बघतो तर दिसायला डिट्टो आपलं मुंबईचं व्हीटी  ट्रेनस्टेशन. खूप गर्दी, खूप प्लॅटफॉर्म्स, जवळजवळ धक्काबुक्कीच. इटलीला जाणार आहोत असं कुणालाही सांगितल्यानंतर कुठल्या गोष्टी बघा, कुठे खा, याच्या कसल्याही सूचना आम्हांला मिळाल्या नव्हत्या. लोकांनी आम्हांला जी एकमेव सूचना दिली ती म्हणजे ‘पाकीट सांभाळा’.  त्यामुळे ते सांभाळत आणि बॅगा ढकलत-ढकलत प्लॅटफॉर्मवरून स्टेशनच्या बाहेर जायला लागलो.

‘सामान उठाऊ क्या?’ अशी हिंदीत एक हाक आली.

हे कोण, असं म्हणून आम्ही गर्दीत बघायला लागलो तर एक बारकुडा साउथ एशियन गृहस्थ एक ट्रॉली घेऊन आमच्याजवळ आला होता. मिलान स्टेशनवर पाहिलंच स्वागत हिंदीमध्ये. आम्ही त्याला नाही वगैरे म्हणून स्वतःच सामान ढकलत बाहेर रस्त्यावर आलो. पाकीट सांभाळण्याची कसरत चाललीच होती. बरीच तरुण कृष्णवर्णीय मुलं (आफ्रिकन) बाहेर हिंडत होती. एक पोलिसांची गाडी होती. आर्मीची गाडी होती. हा सगळा बंदोबस्त दिसेपर्यंत एका आफ्रिकन माणसानं त्याच्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीमध्ये आमच्यासमोरच एक लेडीज पर्स टाकताना मी आणि मधुरानं पाहिलं. अर्थातच ती पर्स त्याची नव्हती. समोरच खिसेकापूची जिवंत करामत पाहायला मिळाली. नंतर तो माझ्या आईच्या शेजारी घुटमळायला लागला, तेव्हा आम्ही जोरात ओरडलो. मग तो पळून गेला. पोलीस छान गप्पा मारत बसले होते. हा जसा खिसेकापू होता, तसे अनेक खिसेकापू तिथं फिरत होते. खिसेकापू ओळखायची हमखास खूण म्हणजे खांद्याला आपल्याकडे असते तशी शबनमची पिशवी, हे आम्हांला इटलीमध्ये उतरल्या-उतरल्या कळलं.

आमचं हॉटेल ट्रेन-स्टेशनपासून खूपच जवळ होतं म्हणून आम्ही टॅक्सी वगैरे न करता सरळ चालत निघालो होतो. ट्रेन-स्टेशनबाहेर अनेक बेघर लोक वळकटी वगैरे टाकून मुक्कामाला बसल्यासारखे बसले होते. फार काही छान परिसर वाटला नाही आम्हांला.

त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एका इटालियन रेस्टॉरन्टमध्ये जायचं ठरवलं. आम्ही अमेरिकेमध्ये बऱ्याच इटालियन रेस्टॉरन्ट्‌समध्ये गेलो आहे, तिथले पास्ते आम्हांला आवडतात. सर्वांत जास्त आवडणारा पास्ता म्हणजे क्रीम आणि पेस्टो सॉस असलेला पास्ता. इटलीमधल्या रेस्टॉरन्टमधला तसा पास्ता खावा म्हणून आम्ही अगदी आनंदानं गेलो.

तिथं पेस्टो सॉसवाला पास्ता मिळाला खरा, पण त्यामध्ये पेस्टो आणि पास्ता सोडून काहीही नव्हतं. म्हणजे आम्हांला पास्तामध्ये खूप भाज्या घालून खायची सवय आहे, पण त्या माणसाला मी भाज्या घाल म्हटलं तर अगदी अपमान झाल्यासारखा तो म्हणाला, ‘No, pesto is pesto. No vegetables.’ असेल बुवा काहीतरी पेस्टोविषयी त्याचं मत. त्याविषयी मला काही प्रॉब्लेम नाही.

नंतर जेव्हा बिल आलं, तेव्हा मात्र खूपच आश्चर्य वाटलं. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळेला त्यानं आमच्यासाठी प्यायला जे पाणी आणलं होतं त्याचे पैसे लावले होते. ते पाणी मिनरल वॉटर वगैरे काहीही नव्हतं. नेहमीचं नळाचं पाणी होतं. फक्त आम्ही ते तिथं बसून प्यायलं त्याचे पैसे. आणि दुसरा एक गमतीशीर चार्ज म्हणजे ‘Coperto’ किंवा ‘Coperti’. म्हणजे काय तर तुम्ही आमच्या रेस्टॉरन्टमधल्या खुर्चीवर बसलात आणि आमची जागा थोड्या वेळासाठी अडवलीत म्हणून भाड्याचे पैसे. तो चार्जसुद्धा प्रत्येक खुर्चीला. हा जो coperto चार्ज असतो, तो प्रत्येक रेस्टॉरन्ट त्यांना जेवढा ‘योग्य’ वाटेल, तेवढा लावतात आणि तो बिलातच येतो. म्हणजे तुम्हांला देण्याशिवाय पर्याय नसतो. आपल्याला माहिती असलेल्या ‘tip’ सारखा तो optional नसतो. हा चार्ज ६–८ युरो प्रत्येक खुर्चीला असू शकतो.

साधारणतः इटालियन रेस्टॉरन्टमध्ये जेव्हा तुम्ही ऑर्डर देता, तेव्हा ती येईपर्यंत, तुम्ही मागितला नसला तरी, ब्रेड आणून देतात. हे अमेरिकेमध्ये सर्रास चालतं आणि त्याचा काही चार्ज नसतो. हाच ब्रेड इटलीमधल्या एका रेस्टॉरन्टमध्येही आला (आम्ही न मागवता), पण जेव्हा तो आला, तेव्हा आम्हांला कुणीही सांगितलं नाही की, त्याचा चार्ज आम्ही नंतर बिलात लावणार आहोत. नंतर बिल आल्यावर मात्र त्यामध्ये ब्रेडचे पैसे लावले होते. पैसे द्यायला मला काही नाही, पण सर्वसाधारणपणे या-या गोष्टीचे तुम्हांला पैसे पडतील असं वेटरनं सांगायची मला सवय आहे. (हे जे काही अनुभव मी सांगतो आहे, हे फक्त इटलीमध्येच आले बरं का! फ्रान्समध्ये नाही, स्वित्झर्लंडमध्ये नाही. फ्रान्समध्ये तर प्रत्येक रेस्टॉरन्टमध्ये बिल आल्यानंतर वेटर येऊन ‘सगळं बरोबर आहे ना? तुम्हांला काही प्रॉब्लेम नाही ना?’ असं आम्हांला विचारून गेला.)

एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. इटलीमध्ये पिझ्झा, पास्ता, तिरामसू फार अफलातून मिळेल असं मला वाटलं होतं, पण असं काही फार impressive वाटलं नाही. चांगल्या होत्या गोष्टी पण क्या बात हैं, काय ग्रेट आहे; असं काही झालं नाही. मला वाटतं इटालियन खाणं या गोष्टीचा एवढा बाऊ करून ठेवला आहे की, आता खूप commercial feel आला आहे त्या गोष्टीला. आपल्याकडच्या नाटकातल्या कलाकारांचा अभिनय कसा १००–२०० प्रयोगांनंतर कृत्रिम वाटायला लागतो, तसं काहीसं वाटलं मला.

image2

मिलानमध्ये सुदैवानं उबर सर्व्हिस होती आणि बरेच चांगले ड्रायव्हर्स होते. त्याचा फायदा झाला. मला असं कळलं की युरोपमध्ये उबर ही कदाचित जरा upper class सर्व्हिस मानली जाते. अमेरिकेत कुणीही स्वतःची गाडी घेऊन उबर चालवतं. त्यामुळे सूटबूट घातलेले ड्रायव्हर्स, Mercedes गाडी वगैरे या गोष्टी जास्त दिसत नाहीत उबरसाठी इथे. पण युरोपमध्ये सगळे उबर ड्राइव्हर सुटाबुटात आणि चकाचक आलिशान गाड्यांमध्ये. उबरचा जितका चांगला अनुभव मिलानमध्ये आला, तितकाच वाईट अनुभव रोममध्ये आला.

मिलानमध्ये आम्ही जेमतेम एक दिवस (म्हणजे दोन अर्धे दिवस) होतो. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही कॅथेड्रल बघायला गेलो.

मिलानमधलं कॅथेड्रल सुंदर आहे. पण आजूबाजूचा परिसर खूपच असुरक्षित वाटतो. एकतर इटलीमधली सर्वच प्रेक्षणीय स्थळं ही साउथ एशियन फेरीवाल्यांनी बोकाळलेली आहेत. दर पाच पावलांनी एक फेरीवाला मागे लागत होता. भारतीय वंशाचे लोक दिसले की हिंदी बोलणं आलंच, त्या मिलान ट्रेन-स्टेशनवर झालं तसं. खिसेकापूपण असणार, पण मिलान ट्रेन-स्टेशनच्या बाहेर जसे पटकन ओळखता आले, तसे दिसत नव्हते.

मिलानहून मग आम्ही ट्रेन पकडून फ्लोरेन्सला आलो. ट्रेन प्रवास उत्तम. तक्रारीला जागा नाही. सामान ठेवायला जागा कमी होती, तेवढीच काय ती अडचण. बाकी काही नाही.

फ्लोरेन्स ट्रेन-स्टेशनला उतरलो. इथं काही कुणी हिंदीत बोलायला आलं नाही. पण ट्रेन-स्टेशन फारच सामान्य, अगदीच निगा न राखलेलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या फरश्या फुटलेल्या, रंगाचे पोपडे निघालेले, बाकं वगैरे अगदीच सामान्य. मिलान ट्रेन-स्टेशनला निदान काहीतरी स्थापत्य होतं. एवढी renaissanceची मातृभूमी असलेल्या फ्लोरेन्समध्ये इतका गलथानपणा का असावा?

image15

फ्लोरेन्समध्ये उबर नाही. फक्त टॅक्सी. टॅक्सीच्या रांगेत उभं राहिलो. बरेचसे लोक रांग सोडून सरळ रस्त्यावर जाऊन पटकन टॅक्सी पकडत होते आणि रांगेतले लोक त्यांना शिव्या घालत होते. रांगेची शिस्त वगैरे फार पाळायच्या भानगडीत कुणीच पडत नव्हतं. शेवटी एक टॅक्सी मिळाली. इथं दुसरी गंमत चालू झाली.

इटलीमध्ये जवळपास सगळे टॅक्सी ड्रायव्हर, दुकानदार इंग्लिश कळत असूनही इंग्लिशमध्ये उत्तर द्यायला टाळतात. काही म्हणजे काहीच इंग्लिश बोलत नाहीत. फक्त इटालियनमधून उत्तरं. तुम्हांला कळो अथवा न कळो. नंतर-नंतर हे इतकं झालं की, मी शेवटी मराठीतून त्यांच्याशी बोलायला लागलो. ते त्यांचा हट्ट सोडायला तयार नाहीत तर घ्या, मला काय? बऱ्याचशा टॅक्सी ड्रायव्हर्सशी मी मराठीतून आणि त्यांची इटालियनमधून उत्तरं ऐकून आम्ही प्रवास केला नंतर.

दुसरा त्रास म्हणजे कुणीही कार्ड पेमेन्ट घेत नाही. सगळीकडे नगद पाहिजे. इटलीमध्ये जे ५ दिवस आम्ही राहिलो त्यामध्ये तीनदा आम्हांला ATM मध्ये जाऊन कॅश काढावी लागली. मग सगळीकडे foreign transaction charge वगैरे भानगडी आल्याच.

फ्लोरेन्समध्ये Air BnB तून एक घर बुक केलं होतं. त्या घराचा मालक, पाओलो, फारच प्रेमळ होता. आम्ही स्टेशनवरून निघालो तेव्हा मी त्याला आधीच whatsapp केला होता, त्यामुळे तो आमची वाटच बघत बसला होता. आम्ही त्याच्या घरी गेलो. एका दगडी इमारतीमध्ये त्याचा ब्लॉक होता.

image5

पुण्यातलं जुनं सदाशिव पेठेतलं घर आणि या पाओलोचं घर, काडीमात्र फरक नाही. तशाच फरशा, तशीच दारं. मी इटलीऐवजी भारतामध्ये आलो आहे की काय, असं वाटावं इतकं साधर्म्य. गच्चीमध्ये व्यवस्थित दोऱ्या टांगल्या होत्या, कपडे वाळवायला वगैरे. डास वगैरे होते. Good night च्या पट्ट्याही होत्या.

पाओलो फारच चांगला होता. फ्लोरेन्समध्ये रात्री ८ नंतर सगळी दुकानं बंद होतात (हा काय प्रकार आहे मला कळलेलं नाहीये अजून. ८ वाजता बंद? मग रात्रीचं जेवण बाहेर करायचं असेल तर कधी करायचं?) आम्हांला पोचायलाच ७ वाजले म्हणून त्यानं आमच्यासाठी ब्रेड, दूध वगैरे आणून ठेवलं होतं. त्यानं आम्हांला भरपूर माहिती दिली. फ्लोरेन्स डाऊनटाऊनमध्ये चालत पोचायला कुठला जवळचा रस्ता वापरायचा ते सांगितलं. ‘Take care of your pockets’ असं दोन-तीनदा बजावलं.

image3
AirBnB चं घर

ही एक गंमत आहे बरं का इटलीमध्ये. चोर तुमचं पाकीट मारणार ही गोष्ट अगदी गृहीत धरली जाते आणि तसं सगळ्यांना बजावलं जातं. म्हणजे मला वाटायचं की फक्त आपलेच जवळचे लोक आपली काळजी म्हणून ते सांगतात, तर तसं नाहीये. इटलीमध्ये सगळीकडे अगदी आवर्जून सांगतात की, खिसेकापूंपासून सावध राहा. म्हणजे इतकं आवर्जून की तुम्ही ट्रेनचं तिकीट काढायला त्यांच्या kiosk वर गेलात की, स्क्रीनवर पहिली सूचना येते की, खिसे सांभाळा. कमाल आहे!

दुसऱ्या दिवशी सकाळी आटपून आम्ही फ्लोरेन्स डाऊनटाऊनला गेलो. तिथं जायचा रस्ता एका अस्वच्छ नाल्याच्या शेजारून होता. तो नाला पार केल्यानंतर पादचाऱ्यांसाठी जमिनीखाली एक बोगदा केला होता तिथून आम्ही तिथपर्यंत पोचलो. तो बोगदा म्हणजे आपल्याकडे नाही का व्हीटीला जमिनीखालून जाणाऱ्या रस्त्यावर वडापावची दुकानं वगैरे असतात, तसा बोगदा होता. पाओलोचा प्रेमळपणा जसा आम्ही घरी अनुभवला, तसा इथं दुकानदारांचा तुसडेपणा अनुभवला. काहीतरी कारणामुळे इटालियन लोक साऊथ एशियन लोकांना कमी लेखतात असं मला सारखं जाणवत होतं. या फेरीवाल्यांच्या त्रासामुळे असेल. त्या बोगद्यातून वरती येऊन आम्ही फ्लोरेन्स डाऊनटाऊनमध्ये प्रवेश केला.

गिरगाव. अगदी गिरगाव. तिळमात्र फरक नाही. तसेच छोटे रस्ते, छोटी दुकानं, छोट्या गल्ल्या. इवलुसा दगडी फूटपाथ. गर्दी. गाड्या, दुचाकी रस्त्याच्या कडेला लावलेल्या. त्यातूनच वाट काढत जाणाऱ्या गाड्या. छोटी एका गाळ्यातली उपाहारगृहं. मध्येच एक एसी बँक. पर्सची दुकानं. एकेका गाळ्यात जेमतेम थाटलेला दुकानदाराचा संसार. कदाचित मागे त्याची राहायची जागा. अगदी तसंच.

image6

आम्ही Piazza della Signoria च्या जवळ फिरत होतो. तिथं एका सुताराच्या दुकानात शिरलो, बर्टोलूची. त्यानं छान-छोटी लाकडाची खेळणी, अगदी सुंदर कलाकुसर वगैरे करून ठेवली होती. फार काही महागही नव्हतं काहीच. आम्ही थोडा वेळ तिथं रेंगाळलो. तिथं जो मुख्य कॅश काउंटर होता तिथं एक बाक ठेवला होता. माझे बाबा तिथं बसले आणि डुलकी काढायला लागले (माझे बाबा इच्छाशयनी आहेत. कुठंही, कधीही, कसंही झोपू शकतात.) त्यांची बॅग त्यांच्या मांडीवर होती.

आमची खरेदी वगैरे झाली आणि आम्ही दुकानाच्या बाहेर पडलो. आम्ही कुठंही रेंगाळलो की तिथून निघताना मी सगळ्या गोष्टी तपासून बघत होतो आणि बाकीच्यांना विचारत होतो. तसंच आत्ताही विचारलं आणि ते विचारता-विचारता बाबांच्या बॅगेकडे बघितलं.

बाबांच्या बॅगेच्या बाहेरच्या कप्प्याची चेन उघडी होती.

‘हे काय? तुमच्या बॅगची चेन का उघडी?’ मी बाबांना सहज विचारलं. मला काही फार गंभीर असेल असं वाटलं नाही.

‘अरे! !!! पासपोर्ट गेला!’ बाबा म्हणाले.

संपलं. सगळे तिथं रस्त्यावर ठप्प. उद्या पिसाचा मनोरा बघायला जायचं, परवा रोम, व्हॅटिकन सिटी, नंतर विमानानं फ्रान्स, लियॉन, पॅरिस, आयफेल टॉवर, मग अमेरिका, मग US immigration पार करायचं, आमचा मित्र श्रीधर मोठी व्हॅन घेऊन येणार घ्यायला, आई-बाबा अंजोरबरोबर खेळणार, आई आणलेल्या लोणच्याला फोडणी घालणार, कच्च्या कैरीच्या फोडी आणल्या आहेत त्याचा मेथांबा करणार, सगळी-सगळी सहल माझ्या डोळ्यांसमोरून सरकन गेली. पासपोर्ट गेला? ज्या डॉक्युमेन्टवर भारताबाहेरचं अस्तिस्त्व अवलंबून आहे ते डॉक्युमेन्ट लंपास? तेही अशा ठिकाणी जिथं इंग्लिश बोलत नाहीत. काय करायचं आता?

मला फार पटकन लक्षात आलं की का झोपलात, कुठे ठेवलं होतं सगळं, तिथं का ठेवलं, लक्ष का नाही ठेवलं नीट, पॅरिसचं काय करायचं, अमेरिकेचं काय हे सगळे प्रश्न आता व्यर्थ होते. बाबा भारतात सुरक्षित पोचणं एवढी एकच गोष्ट महत्त्वाची होती. पण ते करायचं कसं?

एक ऐकलं होतं की पासपोर्टची चोरी ही खरंतर पैशासाठी केलेली असते. चोरांना पासपोर्टशी काही देणंघेणं नसतं. त्यामुळे पैसे घेऊन ते पासपोर्ट फेकून देतात. मग काय, आम्ही आजूबाजूच्या कचरापेट्या उघडणं, मोबाईलचा दिवा वापरून आतमध्ये डोकावून बघणं, असे प्रकार केले. मायकेलँजेलोचा डेविडचा पुतळा तिथं होता, पण त्याच्या खालच्या कचरापेटीमध्ये आम्हांला आता जास्त रस होता. आम्हांला कुणीतरी सांगितलं की, काही वेळेला गाड्यांच्या खाली किंवा आतल्या गल्ल्यांमध्ये जिथं फारशी माणसं नसतात, तिथं पण काही वेळेला पासपोर्ट टाकतात. तर आम्ही तेही शोधलं. म्हणजे फूटपाथवर मस्त छान-छान टेबलांवर बसून माणसं खात होती आणि आम्ही त्यांच्या गाड्यांच्या खाली वाकून बघत होतो. गल्ल्यांमध्ये पण शोधलं. फ्लोरेन्सच्या गल्ल्या आणि नरसोबावाडीच्या गल्ल्या. फार काही फरक नव्हता. या कुठल्याही प्रयत्नांना काही फळ आलं नाही.

image10

मग आम्ही ज्या दुकानात हा पासपोर्ट चोरी झाला असावा तिथं गेलो, ‘बर्टोलूची’. तिथल्या बाईला हे सगळं सांगितलं. तिलाही खूप आश्चर्य वाटलं की, तिच्या दुकानात हे झालं म्हणून. ती म्हणाली हे असं प्रथमच घडतंय तिच्या दुकानात. तिनं आम्हांला सांगितलं की, समोरच्या चौकात पोलीसस्टेशन आहे तिथं जाऊन त्यांना सांगा.

आम्ही तिथं गेलो (Piazza della signoria), पण तिथं पोलीसस्टेशन वगैरे काही नव्हतं. पोलिसाला तिथं काय म्हणतात, तो कसा दिसतो ह्याची आम्हांला काहीच कल्पना नाही. मग तिथल्याच एका छोट्या दुकानात एका तरुण मुलीला विचारलं. तिनं आम्हांला तिच्या iPhoneवर शोधून दिलं. ‘Carabinieri’ म्हणजे पोलीस म्हणे. आणि त्यांचं ऑफिस तिथून एक ५ मिनिटांवर होतं.

आम्ही चालतोय चालतोय, आई, बाबा, मधुरा, मी आणि २ वर्षांची अंजोर तिच्या स्ट्रोलरमध्ये. सुदैवानं माझ्या फोनला व्यवस्थित सिग्नल होता आणि त्यामुळे आम्ही कुठं चाललो आहोत, ते google maps वरून बघू शकत होतो. चालता-चालता कचरापेट्या बघणं चालूच होतं. शेवटी एक मोठी consulate सारखी इमारत दिसली, त्याला एक मोठं लोखंडी दार होतं, आणि ते लॉक होतं. आत कुठून जायचं? सगळे बाहेरच थांबले. मग मला एके ठिकाणी बेल दिसली. मी ती दाबली तर आतून एक गणवेशधारी माणूस आला, आणि त्यानं तिथूनच ते दार उघडलं. मी आत गेलो.

“We are visitors here, and someone just stole my father’s passport. Somebody told us we have to come here to report this to you. What should I do?” मी विचारलं.

“English? No english.” गणवेशधारी carabinieri.

याला इंग्लिश येत नाही? किती प्रवासी, दुसऱ्या देशांची माणसं यानं बघितली असतील? एवढ्या मोठ्या consulate सारख्या इमारतीत ऑफिस आहे याचं, याला इंग्लिश येत नाही?

त्यानं मला कसंतरी खाणाखुणा करून सांगितलं की, इथून अर्ध्या तासावर एक दुसरं पोलीस स्टेशन आहे. तिथं इंग्लिश बोलणारे पोलीस आहेत, तिथं जा. कसंतरी करून त्यानं मला माझ्या iPhone वर पत्ता दाखवला.

मग आमची वरात तिथून त्या इंग्लिश बोलणाऱ्या पोलिसांकडे. शेजारून Ponte Vecchio, अर्नो नदी, नदीकाठीची प्रेक्षणीय स्थळं सगळं दिसत होतं. पण बघायला वेळ नव्हता. इंग्लिश बोलणारे carabinieri शोधायचे होते.

शेवटी ते पोलीस स्टेशन सापडलं. तिथं आत गेलो तर एक वेटिंगरूम होती. मी आत्तापर्यंत भारतातल्या पोलीस स्टेशनची वेटिंगरूम कधी पाहिली नाहीये. इटलीमध्ये प्रथमदर्शन झालं. तिथं जे लोक बसले होते, त्यांच्याबरोबर मी जरासुद्धा, अगदी पत्ता विचारायलासुद्धा कधीही संगत करणार नाही. पण त्यांच्या शेजारी पोलिसांची वाट बघत बसलो. आधी एकतर तिथं गेल्यावर काय करायचं कळेना. म्हणजे वेटिंगरूममध्ये तुम्ही आहात हे पोलिसांना कळणार कसं? काहीतरी तिकीट घ्यायचं, नंबर घ्यायचा असं काही करायचं का? तिथं मी विचारायचा प्रयत्न केला आजूबाजूच्या कुणालाही काही उत्तर देता आलं नाही. तिथंही हिंदी येणारा एक साऊथ एशियन बसला होता, त्यानं मग काहीतरी तोडक्यामोडक्या हिंदीत सांगितलं, ‘नुसते बसा. तो येईल.’ मग वाट बघत बसलो.

थोड्या वेळानं आतून पोलीस आला. आम्हांला बघितल्या-बघितल्या त्यानं विचारलं, ‘Wallet lost?’

किती नेहमीचं असेल बघा त्याच्यासाठी. त्या पोलिसाला विचारही करायला लागला नाही काय झालं ते. पहिलाच  प्रश्न, ‘Wallet lost?’ मी म्हटलं ‘हो’. मग त्यानं एक फॉर्म मला दिला आणि म्हणाला याच्यावर सगळं लिहा, नाव, सिटिझनशिप, काय-काय हरवलं वगैरे. तो फॉर्म अर्थात इटालियन भाषेत होता. इंग्लिश नाहीच ना कुठं. इंग्लिश भाषांतरही नाही फॉर्मवर. मग सारखं-सारखं त्याला विचारा की; काय करायचं, काय लिहू इथे वगैरे-वगैरे. शेवटी तो फॉर्म भरून झाला. मग त्यानं आत बोलावलं.

मला वाटलं आता आत जाऊन काहीतरी चौकशी करेल, कुठं हरवला, कसा हरवला विचारेल. आम्ही अगदी उत्साहानं सगळं सांगायचं आणि हा आम्हांला काहीतरी मदत करणार अशा आशेनं आत गेलो.

त्यानं त्या फॉर्मवर एक शिक्का मारला. त्याची झेरॉक्स काढली आणि मूळ प्रत आमच्याकडे दिली आणि म्हणाला, ‘Bye bye!’

काय? Bye bye काय? आम्हांला काहीच कळेना. आमचा पासपोर्ट परत मिळणार कसा? “What should we do now?” मी त्याला विचारलं.

“You go to your embassy for passport.’’ साहेब.

“And what about our visas?” मी.

“That I don’t know. You ask your embassy.” परत साहेब.

बापरे. आता भारतीय वकिलात (Indian Embassy) शोधायची? ती फ्लोरेन्समध्ये नसेल तर? मिलानमध्ये असली तर. आम्ही तर तिथूनच इथं आलो होतो. परत २ तास प्रवास करून ट्रेननं तिकडं जायचं? सगळ्या बॅगा घेऊन? राहायचं कुठे? छे.

आम्ही तिथून बाहेर आलो. पोलीस काही पासपोर्ट मिळवून देणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं. आम्ही काही तपास करू, तुम्हांला कळवू, तुम्हांला कळवायचं असेल तर तुमचे नंबर द्या, काही-काही विचारलं नाही. नंतर मला कळलं की, आता याच्यापुढे कुठंही पासपोर्टची चौकशी किंवा काहीही करायचं असेल, तर आधी हरवलेल्या पासपोर्टचा पोलीस रिपोर्ट दाखवावा लागतो, फक्त ती औपचारिकता या इंग्लिश carabinieri नं पूर्ण केली. बास! त्यापुढे त्याला काही करायची इच्छा नव्हती आणि असली तरी तो काही करू शकणार नव्हता.

Indian Embassy in Italy असा google search मी केला. दोन results आले. एक मिलानमध्ये, आणि एक रोममध्ये. रोमला आम्ही २ दिवसात जाणारच होतो. मग तिथंच जाऊ असा विचार मी केला आणि त्यांचा जो फोन नंबर दिसत होता तिथं फोन लावला.

इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. जे अमेरिकेत राहतात आणि ज्यांना युरोपला जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी. तुमच्याकडे जर T-Mobileचं नेटवर्क असेल, तर जसा तुम्ही अमेरिकेत unlimited text आणि data वापरता, तसाच तुम्हांला संपूर्ण युरोपभर वापरता येतो. रोमिंगचे चार्जेस वगैरे लागत नाहीत. आम्ही अगदी निघायच्या आधी AT&T मधून नाव काढून घेऊन T-Mobile घेतलं त्याचा अमूल्य फायदा आम्हांला झाला. तसं केलं नसतं तर हा google serach करणं, उबर बोलावणं, फोन करणं वगैरे करू शकलो नसतो.

तर मी रोममधल्या भारतील वकिलातीला फोन लावला. मी आत्तापर्यंत कुठल्याही वकिलातीला फोन लावल्यानंतर कधीही पहिल्या झटक्यात एखादा माणूस फोनवर आलाय असा झालेलं नाहीये. कधीच नाही आणि कुठल्याही देशाच्या वकिलातीला नाही. पण इथं २ रिंग्स वाजल्या आणि एका माणसानं फोन उचलला.

मी त्याला सगळं सांगितलं. तो भारतीय नव्हता. तिथं काम करणारा कुणीतरी इटालियन होता, पण त्याला इंग्लिश कळत होतं आणि बोलताही येत होतं. कदाचित तेच बघून त्याला कामावर ठेवलं असावं. त्यालासुद्धा मी जे काही सांगितलं ते नवीन नव्हतं. तो म्हणाला की तुम्हांला नवीन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल, मी तुम्हांला एक यादी पाठवतो ई-मेलमध्ये, ती कागदपत्रं घेऊन उद्या या, तुमचं काम होईल. मी त्याला म्हटलं की तुम्ही कृपया तो ई-मेल लगेच पाठवा, तो आल्याशिवाय मी काही फोन ठेवणार नाही. त्यानं तो पाठवला, मी फोन चालू असताना inbox चेक केला, ई-मेल आला आहे याची खातरी झाल्यावर फोन ठेवला. (Again, all of this because of T-Mobile. I couldn’t have checked email while talking on phone if it wasn’t for T-Mobile.)

आता ती कागदपत्रं जमवणं हे मोठं काम होतं. पासपोर्टचा अर्ज हा नेहमीसारखाच अर्ज होता. म्हणजे फोटो पाहिजेत, प्रिंटआउट्स पाहिजेत. आता या गोष्टी आपण आपल्या घरी असतो तर सोप्या असतात. माझ्या घरी प्रिंटर आहे, किंवा निदान प्रिंट्स कुठून काढायच्या हे मला माहिती तरी आहे. फोटोचं दुकान माहिती आहे. हे फ्लोरेन्समध्ये कुठे शोधू? एकतर कुणाला इंग्लिश येत नाही. विचारलं तरी कळणार नाही.

सुदैवानं आम्ही असंच रस्त्यावरून चालत असताना एक फोटोचं दुकान दिसलं. तिथं जाऊन त्याला तोडक्यामोडक्या भाषेत आम्ही सांगितलं आणि त्यानं मग फोटो काढून दिले. परत तेच. कॅश पाहिजे, तो जी किंमत सांगणार तीच दिली पाहिजे. ते महागात पडलं का स्वस्तात पडलं मला माहिती नाही, पण फोटो मिळाले.

आता बाकीची कागदपत्रं? सुदैवानं बाबांनी त्यांची सगळी कागदपत्रं स्कॅन करून USB ड्राइव्हवर आणली होती. ती आम्ही गोळा केली. आमच्याकडे लॅपटॉप होता म्हणून हे करता आलं. आमच्या Air BnB च्या घरात इंटरनेट होतं तिथून वकिलातीचा ऑनलाईन फॉर्म भरला. या ऑनलाईन अर्जाचं असं काय असतं मला कळत नाही. ऑनलाईन फॉर्म भरायचा पण नंतर त्याची प्रिंटाऊट द्यायची. मग ऑनलाईन कशाला भरायचा? असो, तर त्या फॉर्मची पीडीएफ मिळवली. मग ती पीडीएफ, बाबांची सगळी कागदपत्रं, आणि एक निबंध लिहायचा होता कसा पासपोर्ट हरवला होता ते. तो निबंध लिहून त्याची पीडीएफ, असं सगळं एकत्र करून सगळ्यांची एक मास्टर पीडीएफ बनवली. आता फक्त प्रिंटआऊट काढणं बाकी राहिलं.

संध्याकाळचे ७ वाजले होते. परत ८ ला सगळी दुकानं बंद होणार. प्रिंटआऊटसाठी कुठल्या दुकानात जायचं माहिती नाही. शेवटी मी पाओलोला (आमच्या Air BnB चा मालक) whatsapp केला. त्यानं लगेच मला सांगितलं की, मला ई-मेल कर, माझ्या घरी प्रिंटर आहे. आमचा जीव भांड्यात पडला. त्याला पीडीएफ ई-मेल केली. १० मिनिटांत तो प्रिंटाऊट घेऊन आला. आता आम्ही वकिलातीमध्ये जायला सुसज्ज झालो.

आमच्या मूळ कार्यक्रमानुसार आम्ही फ्लोरेन्सला ३ रात्री थांबणार होतो. हे सगळं घडलं दुसऱ्या दिवशी. त्यामुळे तिसऱ्या रात्रीचा मुक्काम रद्द करून आम्हांला तडकाफडकी रोमला जावं लागलं पासपोर्टसाठी. पिसाचा झुकता मनोरा हुकला.

image13
ट्रेनचा प्रवास

आम्ही आमच्या फ्लोरेन्सच्या तिसऱ्या दिवशी पहाटे उठून रोमची हायस्पीड ट्रेन पकडली. या ट्रेन्सना तिथे Frecciarossa म्हणतात. ट्रेन्स खूप छान असतात. आम्ही सगळीकडे फर्स्टक्लासची तिकिटे काढली होती. फर्स्टक्लासचे डबे उत्तम, विमानासारखी सेवा असते. म्हणजे पाणी, स्नॅक्स वगैरे आणून देतात.

पण या ट्रेनमध्ये मला एक फार विचित्र अनुभव आला. आम्ही फर्स्टक्लासला चढलो. मी सामान ठेवत होतो, आणि तिथला जो steward होता, म्हणजे जो आम्हांला पाणी आणि स्नॅक्स आणून देणार तो तिथे आला.

“What’s your coach number?” अत्यंत उर्मटपणे त्यानं मला विचारलं.

“3, First Class”, मी म्हणालो.

“First Class, really?” कपाळावरच्या आठ्या तशाच ठेऊन तो परत म्हणाला.

त्याचा विश्वास बसत नव्हता की माझ्याकडे फर्स्टक्लासची तिकिटं होती. तो तिथून चरफडत निघून गेला. मी म्हटलं ना मगाशी की साऊथ एशियन लोकांना हीन दर्जाचे मानतात त्याचा हा अनुभव. गांधींना ट्रेनमधून ढकललं होतं, विवेकानंदांना इंग्लिशवरून चिडवलं होतं त्या सगळ्याची मला आठवण झाली. नंतरसुद्धा हा steward आम्हांला वाईट सर्विस देत होता. आम्ही फर्स्टक्लासमध्ये बसू शकतो, ही कल्पना त्याला पटत नव्हती. (सुधा मूर्तींनासुद्धा असा अनुभव आल्याचं नंतर मी कुठंतरी वाचलं.)

आम्ही रोममध्ये पोचलो. रोमचं स्टेशन जरा बरं होतं. प्रचंड गर्दी होतीच पण थोडं आधुनिक वाटत होतं. आम्ही तडकाफडकी आल्यामुळे आम्हांला एका रात्रीसाठी एक हॉटेल तत्काळ बुक करावं लागलं होतं. तिथपर्यंत जायचं होतं आणि तिथून लगेच एम्बसीला जायचं होतं. इतकं सामान आणि ५ लोक, त्यामुळे टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता. टॅक्सीच्या रांगेत उभे राहिलो.

सगळ्या टॅक्स्या पांढऱ्या रंगाच्या होत्या. बऱ्याचशा टॅक्सीमध्ये ‘फक्त पांढरी टॅक्सी वापरा. बाकी टॅक्स्या बेकायदेशीर आहेत’ असं लिहिलं होतं. त्यामुळे आम्ही पांढरी टॅक्सी शोधत होतो. तर एका ड्रायव्हरनं आम्हांला हात करून बोलावलं.

टॅक्सी तर पांढरी होती. आम्ही आत बसलो. टॅक्सी सुरू झाली. मला लक्षात आलं त्यानं मीटर लावलेला नाही.

“Meter?” मी त्याला विचारलं. पूर्ण वाक्य बोलून तसाही काही फायदा नव्हता.

“No meter. Fixed price.” ड्राइवर.

तो आम्हांला फसवणार हे लक्षात यायला काही वेळ लागला नाही.

“How much?” मी विचारलं.

त्यानं गाडी चालवता-चालवता माझ्या खांद्यावर हात ठेवला, आणि मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये तो म्हणाला,

“I will not take million dollars from you. For 5 people and luggage, thirty eight euros, cash.”

म्हणजे मी काही तुझ्याकडून खूप पैसे घेणार नाही, पण नेहमीपेक्षा जास्त घेणार.

हे इटलीमधले सगळे सर्विस प्रोव्हायडर्स प्रवाशांविरुद्ध कट करून मुद्दाम फसवेगिरी करतात अशी माझी समजूत व्हायला लागली होती.

आम्ही हॉटेलला पोचलो. सामान ठेवून मी आणि बाबा लगेच वकिलातीत जायला निघालो. वकिलात जवळच होती, त्यामुळे चालतच गेलो. वकिलातीजवळ पोचलो. भारताचा झेंडा वगैरे दिसला. अगदी भरून आलं. चला कुणीतरी आता मदत करेल. आम्ही दार ठोठावून आत गेलो. अगदी नेहमीची भारतीय कचेरी कशी असावी, तशी कचेरी होती. आपल्या कचेऱ्यांचं आणि कागदपत्रांच्या ढिगाऱ्यांचं काय नातं आहे मला कळत नाही. काहीतरी अतूट, पवित्र असं काहीतरी असावं. जगामध्ये कुठेही गेलात, तरी ते दिसतं. नशीब आम्ही सकाळी लवकर गेलो असल्यामुळे फार गर्दी दिसत नव्हती. तिथं एक साहेब बसले होते. त्यांच्यासमोर जाऊन बसलो. त्यांच्या टेबलवर ढिगारे होतेच. एकएक कागद घेऊन ते साहेब शिक्के मारत होते. आपला नंबर लागणार ना अशा चिंतेत मी पडलो.

त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, बाबांचा अर्ज पाहिला. त्यावरती पण एक दोन-तीन शिक्के मारले. बाबांच्या अर्जावर थोडी गिचमीड वगैरे केली आणि मग आम्हांला तिथं एक सिंगसाहेब बसले होते त्यांना भेटायला सांगितलं. मग आम्ही त्या सिंगसाहेबांसमोर बसलो.

सिंगसाहेबांनी आम्हांला दोन पर्याय दिले.

१. Emergency Certificate – म्हणजे एक तात्पुरते कागदपत्र ज्याने भारतामध्ये एकदाच प्रवेश करता येईल. यासाठी त्यांनी सांगितलं की भारतात जायची तारीख नक्की पाहिजे आणि त्यांना त्या विमानाच्या तिकीटाची प्रत दिली पाहिजे. याची किंमत १५ युरो. अर्थातच ‘कॅश’. कॅशलेस इकॉनॉमी अजून भारताबाहेरच्या दूतावासापर्यंत पोचली नाहीये बहुतेक.

२. Short Validity Passport- म्हणजे ६ महिन्यांचा नेहमीसारखा पासपोर्ट. यासाठी कुठलंही तिकीट वगैरे दाखवायची गरज नाही. हा पासपोर्ट एकदा मिळाला की ६ महिन्यांच्या आत कधीही भारतात परत जाऊ शकता. याची किंमत ११५ युरो. परत ‘कॅश’.

जर आम्ही Emergency Certificate घेतलं असतं, तर आम्हांला बाबांचं भारताचं तिकीट आधी बुक करायला लागलं असतं आणि बाकीचे सगळे पर्याय (म्हणजे फ्रान्सची सहल, USA ची सहल) हे सोडून द्यावं लागलं असतं. Short Validity Passport मध्ये हे बाकीचे पर्याय कदाचित उपलब्ध तरी होते (अर्थात जर visa परत मिळाला तर) पण तो महाग होता.

मी साधा विचार केला, या कागदांच्या ढिगाऱ्यांच्या कचेरीमधून माझ्या हातात काहीतरी भक्कम असल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. त्यामुळे बाबांचं तिकीट बुक करून परत तिथं येणं वगैरे गोष्टींचा विचार करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे महाग असला तरी आम्ही short validity passpor tचा निर्णय घेतला.

आता कॅश पाहिजे. मग मी बाबांना म्हटलं, ‘तुम्ही इथेच बसा, मी कॅश घेऊन येतो, इथून उठायचं नाही. बाबा तिथेच बसले आणि मी ATM हुडकायला निघालो. एका मोठ्या चौकात ते एकदाचं मिळालं. त्यावरच्या सूचना अर्थातच इटालियन भाषेत. कसेतरी पैसे काढले आणि बाहेर पडायच्या आधी अगदी आतल्या कुठल्यातरी खिशात दडवून ठेवले. परत वकिलातीमध्ये गेलो.

मी जाऊन ३० मिनिटे झाली नसतील, ती वकिलात माणसांनी भरली होती. मी जो Short Validity Passport चा निर्णय घेतला होता, तो बरोबर आहे याची मला खातरी पटली. कारण बाबांचं तिकीट बुक वगैरे करून परत आलो असतो तर नंबर कदाचित लागला नसता. मी ते पैसे त्यांच्या काउंटरला भरले आणि अर्ज पूर्ण केला. शिक्केवाल्या साहेबांनी संध्याकाळी ५ वाजता येऊन पासपोर्ट घेऊन जा, असं सांगितलं. फार काही त्रास न होता काम झालं म्हणून आम्ही यशस्वी मुद्रा घेऊन बाहेर पडलो.

आता बाबांची भारतात परत जायची सोय झाली होती. पण उरलेल्या युरोप सहलीचं आणि अमेरिकेचं काय, हा प्रश्न होताच. पुढचं डेस्टिनेशन फ्रान्स असल्यानं फ्रेंच वकिलातीमध्ये जाऊन visa द्या अशी गळ घालणं, आणि तसंच अमेरिकन वकिलातीमध्ये जाऊन गळ घालणं याशिवाय काही मार्ग नव्हता. जसा पासपोर्टचा अर्ज केला होता तसा त्या दोन्ही ठिकाणी करायला लागणार असं वाटत होतं, आणि कदाचित ते खरंही होतं. संध्याकाळी आम्ही बाबांचा पासपोर्ट घेऊन आलो आणि आता पुढच्या गोष्टींना हात घालावा असं ठरवलं.

आता नवीन प्लॅननुसार पुढचे दोन पूर्ण दिवस रोममध्ये होते. त्या दोन दिवसांत बाबांना फ्रान्सला आणि अमेरिकेला जाता येईल की नाही याचा छडा लावायचा होता. नाहीतर भारताचं तिकीट काढून टाकायचं होतं. आणि हे सगळं करताना जमलं तर रोम आणि व्हॅटिकन सिटी हे पाहायचं होतं. हे दोन दिवसांत जमलं नाही, तर आमची (मी, मधुरा आणि अंजोर) पुढची फ्रान्सची सहल आणि नंतर अमेरिकेमध्ये परतीचा दिवस बदलायची शक्यता होती (Bottomline: अजून भुर्दंड).

रोममध्ये उबर सर्विस होती. त्यामुळे इथं या फ्रेंच आणि अमेरिकन एम्बसीच्या वाऱ्या करायला उबर वापरता येईल यामुळे मला छान वाटत होतं. उबरचा फायदा (टॅक्सीशी तुलना केली तर) तर असा आहे की एकतर तुम्हांला फोनवरून टॅक्सी बोलावता येते, तुम्हांला ती real time कुठं आहे ते कळतं आणि मुख्य म्हणजे तुम्हांला साधारण किती पैसे पडतील तेही कळतं. अजून एक फार महत्त्वाचा फायदा म्हणजे कार्डनं पैसे भरले जातात, कॅशची गरज नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आधी फ्रेंच वकिलातीला कित्येकदा फोन केला. कुणीही उचलला नाही (बघितलंत? मी म्हटलं नव्हतं वकिलातीमध्ये फोन उचलत नाहीत? रोमच्या इंडियन वकिलातीमध्ये उचलला हे केवढं भाग्य!). मग काय, प्रत्यक्ष जाऊन बघू म्हणून तिथं गेलो. तर ती काही कारणानं बंद होती. मग तिथून उबर करून परत यावं म्हणून उबर मागवली.

उबर मागवतानाच मला app नं सांगितलं की तुला नेहमीपेक्षा जास्त पैसे पडणार आहेत, कारण एकदम पीक सिझन आहे. ठीक आहे. ये म्हटलं! उबर मागवली की नेहमी गाडीचा नंबर, गाडीचं मॉडेल, ड्रायव्हरचं नाव आणि ड्रायव्हरचा फोटो या गोष्टी दिसतात. मला फक्त ड्रायव्हरचं नाव दिसत होतं. १० मिनिटांवरती गाडी होती. ती यायला लागली. आम्ही रस्त्यावर वाट बघायला लागलो. गाडी यायला ५ मिनिटं असताना कुठंतरी एके ठिकाणी थांबली. आणि तिथून ती बराच वेळ हलेचना. मला मॅपवरती ती दिसत होती पण तिथून पुढं जात नव्हती. शेवटी मी त्या ड्रायव्हरला फोन लावला.

बराच वेळ संभाषणातून दोघांनाही काही कळेना. शेवटी मला एक वाक्य कळलं.

“You come here!”

काय?? मी मागवलेल्या उबरला शोधत मी पाय तुडवत जाऊ? हा काय वेडेपणा आहे? मी आईबाबांना घेऊन त्याला शोधत गेलो. एका गल्लीमध्ये सिगारेट फुंकत तो उभा होता. जसं काही झालंच नाही असा. गाडीपण यथातथाच होती. तो मग आम्हांला घेऊन निघाला.

आमचं हॉटेल Trevi Fountain नावाची जागा आहे त्याच्या जवळ होतं. त्यानं त्या परिसरात गाडी नेली, रस्त्याच्या कडेला थांबवली आणि आम्हांला म्हणाला, “या गल्लीतून गेलात की Trevi Fountain लागेल.”

म्हणजे? हॉटेलच्या दारात सोडणार नाही? Uber is supposed to be door-to-door, right? किती मूर्खपणा! अडचण अशी की हुज्जत घालत बसलो तर त्याला तसंही काही कळणार नव्हतं. किती वाईट!

तो दिवस गेला. संध्याकाळी आम्ही आमच्या ठरलेल्या Air BnB घरामध्ये गेलो. घर छान होतं. होस्टपण चांगली होती. नीट माहिती वगैरे दिली. सगळं छान. एकच अडचण झाली या घरात की सगळं AC, वॉशिंग मशीन वगैरे एकत्र लावलं की जास्त लोड होऊन सारखी वीज जात होती. त्यामुळे सारखे इलेक्ट्रिक स्विच रीसेट करायला लागत होते. पहिल्यांदा जेव्हा हे झालं तेव्हा रात्र होती आणि काय करायचं काहीच कळेना. पण एकदा ते स्विचचं कळल्यावर सोपं गेलं सगळं.

फ्रेंच वकिलातीत या दोन्ही दिवसांत काहीही यश आलं नाही. न जाणो का पण ते सगळे दिवस फ्रेंच वकिलात बंद होती. आम्ही नुसते टॅक्सीमधून तिथपर्यंत जात होतो आणि बंद दार बघून परत येत होतो. अमेरिकन वकिलातीची तर फारच मजा. मला अमेरिकन वकिलातीकडून कसलीही अपेक्षा नव्हती आणि तसंच झालं.

अमेरिकेची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हांला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असेल तर ‘उपकार’ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, ‘हक्क’ नाही. It’s a favor, not a right. त्यामुळे व्हिसा हरवला, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. हे मी अमेरिकेची बाजू घ्यायची म्हणून बोलतो आहे असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित सगळ्याच देशांच्या बाबतीत हे विधान सत्य आहे. त्यामुळे तुमचा व्हिसा हरवला, तर तुमच्या जुन्या नोंदी बघून आम्हांला परत व्हिसा द्या, अशा विनंतीला कुणीही मान देणार नाही, अमेरिका तर नाहीच नाही. व्हिसा हरवला तर परत अर्ज करा असं ते सांगणार अशी मला खातरी होती आणि तसंच झालं.

आम्ही अमेरिकन वकिलातीत गेलो खरं, पण तिथल्या बाहेरच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या पलीकडेसुद्धा जाऊ शकलो नाही. तिथूनच त्यानं आम्हांला स्पष्ट शब्दांत सांगितलं, ‘If your visa is lost, it’s gone. You have to apply for a new visa now.’ आणि परत पाठवलं. भारतीय नागरिकानं, अमेरिकेच्या व्हिसाला, रोममध्ये अर्ज करून त्याला तो एका दिवसात मिळणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. पैशाचा भुर्दंड हा एक भाग झाला, पण सगळी कागदपत्रं व्यवस्थित असताना भारतात अमेरिकन consulate व्हिसा नाकारते, इथं तर आम्ही भारताच्या बाहेर फक्त short validity पासपोर्टच्या बळावर व्हिसा कसा मिळवणार होतो?

रोममधल्या शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता सगळीकडून नकारघंटा ऐकून आम्ही सगळे घरी परत आलो. आता भारतात परत जाणं याशिवाय काहीही पर्याय नव्हता. मी आणि मधुरा विमानाची तिकिटं बघायला लागलो. Transit व्हिसा वगैरे भानगडी नकोत म्हणून कसलीही ब्रेक जर्नी न करता भारतात जाणारी डायरेक्ट फ्लाईट घ्यावी असं सगळ्यांचं मत झालं. एअर इंडियाची त्याच दिवशी संध्याकाळची ७ वाजताची फ्लाईट आम्हांला दिसली. रोम ते दिल्ली, आणि मग दिल्ली ते मुंबई. आमची फ्रान्सची फ्लाईट दुसऱ्या दिवशी सकाळची असल्यामुळे त्याच्या आधी आई-बाबा भारताच्या विमानात बसणं आवश्यक होतं, नाहीतर आम्ही फ्रान्सला निघून गेलो असतो आणि आई-बाबा रोममध्ये अडकले असते. त्यामुळे आम्ही ती तिकिटं काढली.

आता आई-बाबांबरोबर फक्त ३ तास होते. आईबाबांची यापुढची ३० दिवसांची सहल, ३ तासांवर येऊन ठेपली होती. केवळ एका खिसेकापूच्या काही डॉलर्सच्या हव्यासापायी! तेवढ्या तीन तासांत व्हॅटिकनला तरी जाऊन येऊ, असं आम्ही ठरवलं. अगदी पायी जायच्या अंतरावर ते सगळं होतं म्हणून निघालो.

image16
आम्ही सगळे

व्हॅटिकन सिटीमध्ये हिंडताना पुण्यात हिंडतोय असं सारखं वाटत होतं. परत, काही वेगळं दिसत नाहीये असं जाणवलं. मुख्य सिटीमध्ये शिरताना तर एक रस्ता फॅशन स्ट्रीटसारखा होता. हिंदी बोलणाऱ्या फेरीवाल्यांची इथंही वर्दळ चालूच होती.

“Vatican museum देखना हैं आपको? बोलिये ये लास्ट तिकीट हैं।”

जवळजवळ प्रत्येक दहा पावलांवर एक फेरीवाला हा प्रश्न विचारत होता. सगळ्यांना डावलत आम्ही त्या मुख्य चौकात (Piazza San Pietro) जाऊन नुसते उभे राहिलो. फोटो काढले. आणि मग परतलो.

आमच्या Air BnB च्या होस्टनं आम्हांला एअरपोर्टसाठी गाडी करून दिली होती. ती जरा महाग होती पण परत कुणाकडून फसवून घेण्यापेक्षा २ पैसे जास्त देऊन शांतपणे प्रवास करणं आम्हांला योग्य वाटलं. आम्ही एअरपोर्टला पोचलो. बॅगा जिथं चेक इन करतात त्या रांगेत उभे राहिलो.

काय आश्चर्य! आठवतं? मी जेव्हा ATM मधून पैसे काढून भारतीय वकिलातीमध्ये परत गेलो होतो, तेव्हा वकिलात लोकांनी भरलेली होती. तिथले बरेचसे लोकं त्या रांगेत होते. याचा अर्थ आमच्यासारखे पासपोर्ट हरवलेले भरपूर होते. अशा समदुःखी रांगेतून बॅगा चेकइन करून आम्ही बाहेर आलो.

आता आई-बाबांना निरोप द्यायची वेळआली होती. यापुढची सहल फक्त मला, मधुराला आणि अंजोरला करायची होती. पण आमचा बराचसा उत्साह गेला होता. सगळ्यांचेच डोळे पाणावले. आई-बाबांनी अंजोरला घट्ट मिठी मारली. ‘कधी भेटशील परत?’ असं विचारलं. अंजोरला काही कळत नव्हतं, पण जेव्हा ते तिला सोडून गेटच्या पलीकडे गेले तेव्हा ‘आज्जी, आबा’ अशा तिच्या हाका चालू झाल्या. ते दिसेनासे होईपर्यंत ती बघत राहिली.

आई-बाबा अर्ध्या सहलीमधून भारतात परत गेले. मी, मधुरा आणि अंजोर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लियॉनला गेलो आणि मग नंतर फ्रान्स संपवून अमेरिकेत परत आलो. Italy chapter finished!

‘माझ्यावर संपूर्ण अवलंबून असलेले आई-बाबा’ असा एक मोठा अनुभव मला या सहलीमध्ये मिळाला. आत्तापर्यंत मला ज्यांना कधीही मदत करायला लागली नाही, ते पासपोर्ट हरवल्यावर पूर्णपणे हतबल झाले होते. मी हालचाल केली नसती, तर ते परत जाऊ शकले नसते त्यामुळे कसलेही उलट प्रश्न न करता फक्त त्यांना भारतात परत सुरक्षित पोचवणं या एकाच ध्येयाकडे लक्ष देणं गरजेचं होतं.

image17
आईबाबांना सोडल्यावर

अशा या माझ्या ‘अविस्मरणीय’ सहलीनंतर मी काही इटलीला परत जाणार नाही.

यातून शिकलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे,

१) पासपोर्ट अशा जागी ठेवा जिथून तुमच्या त्वचेला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजे सदैव तुम्हांला जाणवेल की तो तुमच्याबरोबर आहे. मग तो खिसा कुठेही असो. कमरेला आतमध्ये, किंवा छातीवर. कुठंही.

२) तुमची सगळी कागदपत्रं एकत्र ठेवू नका. पासपोर्ट एके ठिकाणी, बाकी पैसे एके ठिकाणी, क्रेडिट कार्डे अजून तिसरीकडे असं. जो खिसा/कप्पा सहज कापला जाऊ शकेल त्या खिशात किंवा बॅगेत फक्त कॅश आणि पाहिजे तर एक क्रेडिटकार्ड ठेवा. बाकी सगळं आतमध्ये कुठंतरी.

४) इटलीचा हा अनुभव ऐकून युरोप सगळं बेकार आहे, असा समज कृपया करून घेऊ नका. आम्ही इटलीहून फ्रान्सला गेलो तिथं आम्हांला अगदी विरुद्ध आणि चांगला अनुभव आला. टॅक्सी ड्रायव्हरनं क्रेडिटकार्ड घेणे, मीटरनुसार जाणं, हॉटेलमध्ये उगाचच भलतेसलते पैसे न लावणं वगैरे. Switzerland was nice too.

५)  जर तुमचे दोन पासपोर्ट असतील, एक जुना आणि एक नवीन आणि जुन्यामध्ये तुमचे व्हिसा असतील, तर ते दोन्ही पासपोर्ट वेगळे ठेवा. म्हणजे नवीन गेला तरी आमच्यासारखा तात्पुरता पासपोर्ट घेऊन तुम्ही ते व्हिसा वापरू शकता. आणि जुना गेला तरी तुमच्याकडे पासपोर्ट राहतो, फक्त व्हिसा जातात. काही वेळेला हे immigration वाले हे दोन्ही पासपोर्ट एकमेकांना स्टेपलरने चिकटवतात, पण तशी गरज नसते.

६) युरोपमधून सहसा परत तुमच्या मूळ देशात जायचा प्लॅन करा. आमच्यासारखा युरोपनंतर अमेरिकेचा (किंवा भारत सोडून कुठंही जिथे वेगळा व्हिसा लागतो त्याचा) प्लॅन केलात, आणि पासपोर्ट गेला तर पुढची सगळी सहलच रद्द होते.

आणि सर्वसाधारणपणे, सावध रहा. तुमचं रक्षण तुमच्याइतकं चांगलं कुणीच करू शकणार नाही.

आशय दिलीप जावडेकर

image11

इ-मेल – ashayjavadekar@gmail.com

२००८  पासून अमेरिकेत स्थायिक. मराठी आणि इंग्लिश चित्रपट, माहितीपट आणि जाहिराती यांची निर्मिती.
केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी, त्याच क्षेत्रात नोकरी.

5 thoughts on “हरवलेल्या पासपोर्टची गोष्ट

 1. उत्तम माहिती. झकास मराठीत लिहिले आहे.अभिनंदन

  Like

 2. Sorry to hear the incident. However, to be fair, all places should be seen as they are and not through the “lense of india” (tulna bharatashi).
  I’ve been to Italy and even lost iPhone (in Uber Cat) was brought back to my Airbnb by the driver in Milan.

  To summarize, we experience what we believe in.

  Happy Diwali!

  Like

 3. its lot of trouble you have to face in Italy.But trust me, its a beautiful country to experience. I have fallen in love with this country. It has so much to offer culture, nature, history …everything. I have been to this country atleast 5-6 times and had good and bad experiences.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s