देवदत्त राजाध्यक्ष
बालपणी (आणि मोठेपणीही) पुस्तकं वाचताना मनात कल्पनाचित्रं रंगवायचा प्रयोग बहुधा सगळेच करतात. ही चित्रं विविध प्रकारची असू शकतात – पुरातन किंवा ऐतिहासिक काळातील गावं-शहरं, अद्भुतरम्य परीकथांमधील जादुई जागा, समुद्री चाच्यांच्या गोष्टींमधली साहसं, कथा-कवितांमध्ये वर्णन केलेला निसर्ग, किंवा प्रत्यक्षात न पाहिलेला एखादा देश.
माझ्या मनात बालपणीची अशी सर्वाधिक कल्पनाचित्रं होती ती सोविएत रशियाची. १९८० च्या दशकात प्रगती आणि रादुगा प्रकाशनांची मुलांसाठीची पुस्तकं मुंबईत (आणि भारतात इतरत्रही) विपुल प्रमाणात उपलब्ध असत. या पुस्तकांतल्या गोष्टी असत त्या दूर रशियातल्या. परीकथा आणि प्राणीकथा वगैरेंची पुस्तकं छान असतंच, पण त्याहूनही छान वाटत ती समवयस्क मुलांच्या गंमतीजंमतीची, साहसाची पुस्तकं. या पुस्तकांतून सोविएत संघातील शहरं, गावं, मुलं-माणसं, रस्ते आणि घरं, या सर्वांबद्दल बरंच वाचायला मिळालं होतं.
‘देनिसच्या गोष्टी’ या पुस्तकात, देनिस कराब्ल्योव या आठेक वर्षाच्या मुलाच्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. आपले आईबाबा, आजी (आणि नंतर तान्ही बहीण) यांच्यासोबत मॉस्कोमध्ये राहणारा, मिष्का स्लोनोव या वर्गसोबती आणि शेजारी मित्राबरोबर मस्ती करणारा देनिस आमच्या डोळ्यांसमोर उभा केला होता ते विक्तर द्रागुन्स्की यांच्या समर्थ लेखणीने आणि त्याचबरोबर युरी इवानोव यांच्या तेवढ्याच समर्थ कुंचल्याने. या पुस्तकात देनिसच्या चाळीसएक गोष्टी होत्या आणि प्रत्येक गोष्टीसोबत सुंदर, रंगीत आणि समर्पक अशी चित्रंही होती. अभ्यास करणारा, हॉकी खेळणारा, पतंग उडवणारा देनिस या चित्रांतून दिसला, तसाच संध्याकाळी आईची वाट बघत एकटाच बसलेला कष्टी देनिस, मित्राशी भांडण झाल्यावर झोप न लागल्यामुळे तळमळणारा देनिस, सर्कसमधील जिम्नॅस्टला पाहून अचंबित झालेला देनिस अशी रूपेही या चित्रांमधून दिसली. त्यासोबत मॉस्कोतली घरं, अंगणं, शाळा, पार्कमधले बाक असे पार्श्वभूमीचे तपशीलदेखील या चित्रांमध्ये होते. ‘देनिसच्या गोष्टी’ची पारायणं करताना बहुधा हे सर्व मनावर बिंबत गेलं.
‘दोन भाऊ’ हे अजून एक उदाहरण. अर्कादी गैदार या लेखकाच्या या पुस्तकात, मॉस्कोमध्ये आपल्या आईसोबत राहणाऱ्या दोन मुलांचं, आणि आपल्या बाबांना भेटायला जाण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रवासाचं वर्णन आहे. मॉस्कोतील त्यांचं घर, अंगण, रेल्वे स्थानक अशा ओळखीच्या गोष्टींबरोबर तैगामधील बर्फाच्छादित वृक्ष, घोड्याने ओढलेली घसरगाडी अशा अद्भुत वाटणाऱ्या गोष्टींचंही चित्रण या पुस्तकात होतं. श्वेत-श्यामल असूनही ही चित्रं इतकी सुस्पष्ट होती, की चुक आणि गेक या भावांसोबत आपणही मॉस्को ते सैबेरिया प्रवास करतोय असा भास व्हायचा.
ल्येव तल्स्तोय या महान लेखकाच्या ‘मुलांसाठी गोष्टी’, व्लादिमिर बोगोमोलोव या लेखकाची दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील ‘इवान’ ही कादंबरिका, अपोलो-सयूझ चाचणी प्रकल्पाची माहिती देणारं अलेक्सेई लिओनोव्ह या अंतराळवीराचं ‘सूर्यावरचे वारे’ हे पुस्तक, ‘पापा जब बच्चे थे’ हे अलेक्सान्द्र रास्किन यांचं हिंदीमध्ये वाचलेलं पुस्तक, अशा अनेक सोविएत रशियन पुस्तकांचं वाचन त्या काळात झालं. या सगळ्याच पुस्तकांतल्या ओघवत्या वर्णनांमुळे आणि चित्रांमुळे, खरंतर अनोळखी असलेला एक अख्खा देश डोळ्यांपुढे उभा राहिला होता.
अर्थात मन:चक्षूंसमोरच्या या चित्रांमध्ये कल्पनारंजनाचाही भाग होताच. दाचा म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये राहायला जाण्यासाठीचं शहराबाहेरील कुटीर, ही माहिती पुस्तक वाचताना मिळाली होती. पण त्याच्या भवतालची बाग, जवळून जाणारा वळणावळणांचा रस्ता, झाडांमधील पक्षी, वगैरे भर स्वतः घालताना मजा येत असे. वाचकांना पत्रव्यवहारासाठी दिलेल्या ‘१७ झुबोवस्की बुलेवार्द, मॉस्को, सोविएत संघ’ या पत्त्यावर कधी पत्र पाठवलं नाही, पण तो रस्ता, तिथली रादुगा प्रकाशनाची कचेरी कशी असेल, याची चित्रं मात्र मनात रंगवली होती.
तर, एकूण सांगायचं म्हणजे – दाचा, झुबोवस्की बुलेवार्द अशा अद्भुत शब्दांमधलं रशियन जग वाचनातून ओळखीचे झाले होते. प्रत्यक्ष कधीही न पाहिलेल्या रशियाच्या विविध प्रतिमा कळत-नकळत मनात घर करून बसल्या होत्या.
मोठं होताना वाचनाचा पगडा हळूहळू कमी झाला. बालपणीची कल्पनाचित्रं काहीशी धूसर झाली.
आणि अचानक, २०१७ मध्ये काही कारणानिमित्त रशियाला जाण्याचा योग आला.
या अनपेक्षित प्रवासाबद्दल उत्सुकता तर होतीच, पण कुठेतरी साशंकही होतो. एकतर बालपणी वाचलेल्या पुस्तकांमधला काळ हा १९८० पर्यंतच्या दशकांचा होता, आणि तेव्हापासून जग बरंच बदललं होतं. त्यातच, १९९१ मध्ये सोविएत संघाचे विभाजन झाल्यावर तेथील राजवट आणि समाजव्यवस्था बदलली होती. या पार्श्वभूमीवर, आजचा रशिया कसा असेल त्याबद्दल आडाखे बांधणं शक्य नव्हतं. कल्पनेतल्या प्रतिमांच्या तुलनेत भ्रमनिरास होण्याचीच दाट शक्यता होती.
तयारीसाठी आणि संशोधनासाठी फारसा वेळ नव्हता, ते कदाचित माझ्या पथ्यावरच पडले. अति चिकित्सा न करता, जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून निघालो.
मॉस्कोला पोचलो तो विमानतळ कुठल्याही इतर विमानतळाप्रमाणे गजबजलेला होता. तिथले सोपस्कार, टॅक्सीचा प्रवास, हॉटेलमध्ये चेक-इन हे सर्व अगदीच रूटीन प्रकाराने झाले. थोड्या वेळाने एका मीटिंगसाठी बाहेर पडलो आणि हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सांगितलेल्या बसमध्ये बसलो. प्रशस्त आणि आखीव रस्ते, दुतर्फा इमारती असं कोणत्याही मोठ्या शहरात दिसणारं दृश्य बाहेर दिसत होतं.
आणि अचानक, रस्त्याच्या उजवीकडे, क्रेमलिनच्या एका टॉवरवरील लाल तारा दिसला. ‘दोन भाऊ’ या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन आठवले – “संबंध जगात तेवढे सुंदर शहर कुठेही नव्हते. त्या शहरातल्या मनोऱ्यांच्या टोकांवर दिवसरात्र लाल तारे चमकत होते. आणि अर्थातच, त्या शहराचे नाव मॉस्को होते.” बस पुन्हा सुरू होण्यापूर्वी घाईने काढलेल्या फोटोत तांत्रिक सफाई बिलकुलच नव्हती, पण तरीही तो क्षण जादुई होता, आणि फोटोतून जपलेली त्याची आठवण अजूनही जादुई भासते.
त्या दिवशी रात्रीच्या ट्रेनने सेंट पीटर्सबर्गला जाणार होतो. ट्रेन अत्याधुनिक होती, आणि ‘दोन भाऊ’ मध्ये वर्णन केलेल्या १९३९ मधील ट्रेनशी तिचे काहीही साधर्म्य नव्हते; तसे साधर्म्य असण्याची अपेक्षा करणेही चुकीचे होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ट्रेनमधील अटेंडंटने चहा आणून दिला तेव्हा मात्र सुखद आश्चर्याचा धक्का बसला. चहाचा ग्लास धरणे सोपे व्हावे म्हणून तो धातूच्या कपामध्ये फिट्ट बसवला होता – हा प्रकार अगदी ‘देनिसच्या गोष्टी’ पुस्तकात वर्णन केल्यासारखा होता.
रशियामधील जेमतेम सहा दिवसांच्या वास्तव्यात कल्पनाचित्रांना दुजोरा देणाऱ्या अनेक गोष्टी आढळल्या. नक्षीदार रुमाल डोक्याला बांधून फिरणाऱ्या आजीबाया (बाबुश्की), रस्त्यांच्या कडेचे आईसक्रीमचे स्टॉल, क्वचित दिसणाऱ्या ट्रॅम्स, इत्यादी गोष्टी कुठल्या ना कुठल्या पुस्तकात वाचलेल्याप्रमाणेच होत्या. अर्थात दुजोरा देणाऱ्या या क्षणचित्रांची पार्श्वभूमी आधुनिक होती – स्टारबक्स, मॅकडोनल्डस, बर्गर किंग अशा दुकानांची. खरं तर , बालपणीची कल्पनाचित्रं मनात नसती तर भूतकाळातले हे दुवे कदाचित लक्षातही आले नसते.
मॅकडोनल्डस वगैरे आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन्स प्रस्थापित झाल्या असल्या तरी पारंपरिक रशियन खाद्य-पेये सहज उपलब्ध असतात. भारतात रशियन खाद्यसंस्कृतीची रेस्टॉरंट्स नसल्यामुळे, या पदार्थांची ओळख फक्त पुस्तकांमधून झाली होती. ‘देनिसच्या गोष्टी’ मध्ये उल्लेखित क्वास (पाव आंबवून बनवलेले पेय), राय धान्यापासून बनवलेला काळा (खरं तर गडद तपकिरी) पाव, बीटरूटपासून बनवलेले आणि ‘सूर्यावरचे वारे’ मध्ये उल्लेख आलेले बोर्श सूप या पदार्थांचा आस्वाद घेताना ती पुस्तके आठवणे स्वाभाविकच होते.
रशियन पुस्तकांमधल्या खाद्य-संस्कृतीमधील एक खास पैलू होता तो जंगलात, कुरणात जाऊन निवडलेल्या रानमेव्याचा. विविध प्रकारच्या बेरी, अळंब्या (मश्रूम्स) वेचण्याचे संदर्भ बऱ्याच पुस्तकांमध्ये होते. ल्येव तल्स्तोय यांच्या ‘मुलांसाठी गोष्टी’ या पुस्तकात अळंब्या वेचणाऱ्या मुलींबद्दल एक गोष्ट होती. त्यामुळे, भर मॉस्कोमध्ये, एका संग्रहालयामागील मोठ्या बागेत एका आजीबाईंना अळंब्या वेचताना बघून मौज वाटली. आपण अशा करूया, की ‘देनिसच्या गोष्टी’ मध्ये उल्लेखलेली ‘मूखोमोर’ प्रकारची विषारी अळंबी त्या आजीबाईंना सापडली नसेल.
अनुवादित पुस्तकं वाचताना काही शब्द अपरिचित आणि अकल्पनीय वाटत. ‘इवान’ या पुस्तकातला असाच एक संदर्भ होता – चॉकलेटी फेसाच्या ताकाचा. पुढे रशियन आवृत्तीत शोधून ‘ऱ्याझेंका’ हा मूळ शब्द कळला होता. मॉस्कोतल्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट बुफेमध्ये अचानक हे नाव दिसलं, तेव्हा एक कोडे सुटल्यासारखं वाटलं.
सोविएत रशियन पुस्तकांमधून ओळख झालेला अजून एक प्रांत होता तो अंतराळवेधाचा. ‘अंतराळयानाचा प्रवास’, ‘सूर्यावरचे वारे’ अशा पुस्तकांतून स्पुतनिक, गागारिन, तेरेश्कोव्हा, लिओनोव्ह यांची ओळख झाली होती. मॉस्कोतील अंतराळप्रवासाच्या संग्रहालयात या सर्वांशी जणू पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. ‘देनिसच्या गोष्टी’ मध्ये संदर्भ आलेल्या “दूर ग्रहांच्या धुळकट वाटांवर आमच्या पाऊलखुणा राहतील” या अंतराळवीरांच्या गीताची प्रकर्षाने आठवण आली.
सोविएत संघाचा अस्त होऊन पंचवीस वर्षे लोटून गेली असली तरीही त्याच्या खुणा अजूनही पदोपदी दिसल्या. सेंट पीटर्सबर्ग हे नामांतर झाल्यानंतरही तेथील ‘हॉटेल ऑक्टॉबर’ (Oktyabrskaya Hotel) च्या माथ्यावर आजही ‘हिरो सिटी लेनिनग्राद’ ही पाटी दिमाखाने मिरवते आहे. त्या शहरात दुसरीकडे ‘यू एस एस आर कॅफे’ (CCCP Cafe) दिसले, आणि ‘सहावा सोविएत रस्ता’ ही रस्त्याची पाटीही दिसली.मॉस्कोमध्येही शहरातल्या ठिकाणांना आजही ‘क्रांती चौक’ (‘Ploshchad Revolutsii), ‘लेनिन रस्ता’ (‘Leninsky Prospekt’) अशी नावे आहेत. हे सर्व, सोविएत काळातील पुस्तकांतून निर्माण झालेल्या कल्पनाचित्रांशी काहीसं सुसंगत होतं.
रशियाचा निरोप घेण्याची वेळ आली, त्यापूर्वी एक शेवटची महत्वपूर्ण बाब शिल्लक होती. भारतात परतण्यापूर्वी, रशियाशी गट्टी जमवून देणाऱ्या पुस्तकांच्या माहेरघरी जाणे आवश्यक होते.
(देनिसला पाळीव पांढरे उंदीर मिळाले नव्हते त्या अर्बात रस्त्याजवळील) नवीन अर्बात रस्त्यावर ‘दोम क्निगि’ (पुस्तक-घर) या प्रचंड मोठ्या दुकानात गेलो. या दुकानाच्या तळघरात जुन्या पुस्तकांची जणू अलीबाबाची गुहा आहे. बालपणी वाचलेल्या ‘दोन भाऊ’, ‘मुलांसाठी गोष्टी’ या पुस्तकांच्या मूळ रशियन प्रती तिथे मिळणे ही पर्वणीच होती.
त्याशिवाय, ‘रशियन स्टेट लायब्ररी’च्या पौर्वात्य विभागामध्ये जाण्याची संधी मिळाली . तांबड्या विटांच्या या सुबक इमारतीत, मराठीत अनुवादित बऱ्याच सोविएतकालीन पुस्तकांचा संग्रह आजही आहे. तिथली लायब्ररी कार्डस् धुंडाळताना ‘देनिसच्या गोष्टी’, ‘इवान’, ‘मुलांसाठी गोष्टी’, ‘सूर्यावरचे वारे’ अशा बालपणीच्या अनेक मित्रांची मॉस्कोमध्ये पुनर्भेट झाली.
एक चक्र पूर्ण झाले होते. पुस्तकांमधून सुरु झालेल्या कल्पनाचित्रांच्या प्रवासाची इतिश्री पुस्तकांमध्येच झाली होती.
देवदत्त राजाध्यक्ष
पेशाने सनदी लेखापाल (मराठीत सांगायचे तर CA) आणि पक्का – म्हणजे पक्का मुंबईकर – इसम आहे. Books of Accounts किंवा Story Books च्या आसपास ह्याचा अधिवास असतो. रशियन भाषा, रशियन पुस्तके आणि रशियन अभिव्यक्ती (व्यक्ती नव्हे) यांचे त्याला अनाकलनीय आकर्षण आहे.
❤️ खूप सुरस !
रशिया सफर कल्पनारम्य !!
LikeLike
This article brought back all the childhood memories of reading theses books. I had read pretty much all the books mentioned in the article, but ‘Denis chya goshti’ was my most favorite ….read it at least 100 times. Thank you very much for the wonderful article!
LikeLike