खाण्यासाठी नाटक आपुले

संजय मोने

“आमच्या तुपाच्या बाबतीत शंका घ्याल तर त्याच तुपात तुमची आहुती पडेल एवढे लक्षात घ्या. दिसतो त्याच्यावर जाऊ नका. वेळेला तीनशे उप्पीटाची कढई बेलपत्रासारखी उचलतोय. गिळा गुपचूप”

माझ्या आयुष्यातल्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या दौ-यावर मी आलो होतो. प्रयोग वगैरे झाला. मुंबईच्या मानाने सगळ्या सोयी यथातथाच होत्या; आजही त्यात फारशा सुधारणा झाल्या नाहीत. त्यामुळे जसा प्रयोग थोडासा ढेपाळतो तसाच झाला. रसिकांची गर्दी ब-यापैकी होती. नाटकाला आणि नाटकानंतरही. त्यांना नाटक आवडल्याचे त्यांनी ठासून सांगितले, त्याच बरोबर असे प्रेक्षक महाराष्ट्रात दुसरीकडे नाहीत हेही सगळे आवर्जून पण आग्रही स्वरात एकवटून सांगत ते बरसते झाले.

सगळ्या प्रेक्षकांची पांगापांग झाली आणि “तबकात उरल्या देठ लवंगा साली”सारखे आम्ही कलाकार आणि रंगकर्मचारी एवढेच उरलो. त्यात आमच्या बसचा ड्रायवर आणि क्लीनरही होते. मी थोडा नवखा होतो. बावरून गेलो होतो. इतक्या अपरात्री या आधी जेवलोच नाही असं नव्हतं. पण अशा कुठल्यातरी परक्या ठिकाणी थोड्याश्या अनोळखी लोकांबरोबर (सोबत नाही) जेवायचे क्षण तसे माझ्या तोपर्यंतच्या आयुष्यात विरळाच होते.

जेवायला सुरुवात केली, आणि आमच्यातल्या एका कलाकाराने त्याला वाढण्यात आलेल्या तुपाबद्दल बारीक शंका व्यक्त केली. प्रश्न फक्त तूप गाईचे का म्हशीचे इतकाच होता. त्यावर खणखणीत आवाजात लेखाच्या सुरुवातीला लिहिलेला शब्दसमूह एखाद्या बाणासारखा त्या कलाकाराच्या दिशेने भिरकावला गेला. माझा घास घशातल्या घशात फिरायला लागला. माझ्या पानातले काही पदार्थ संपले होते; मला अजून हवे होते पण मागायची हिम्मत होईना, निमूटपणे मी पाण्याच्या घोटाबरोबर उरलेली भूक गिळून टाकली.

रात्री बस सुटायच्या आधी जरा निवांतपणे चार झुरके मारतांना दुस-या एका वरिष्ठ कलाकाराला विचारलं.

“हे नेहमी अशीच उत्तरं देतात का?”

“छे!आज जरा स्वारी नरमच होती”

त्यानंतर आजपर्यंत मी त्या गृहस्थांना सामोरा गेलो नाही. नाही म्हणायला एकदा जेवण झाल्यावर त्यांना उगाचच सलगी करायच्या उद्देशाने म्हणालो.

“बापू!आज जेवण झकास होतं हां”

“मोने! नट म्हणून नाव काढाल हां पुढे. काय धडधडीत खोटं बोलता. आज मुद्दाम भिक्कार स्वयंपाक केला होता. मागच्या वेळेला तुमचा व्यवस्थापक पैसे बुडवून पळाला. असं तिखट घातलंय ना. उद्या आठवण येईल त्याला माझी.”

हे आणि यासारखे असंख्य नमुने मला नाटकाच्या दौ-यांमुळे बघायला मिळाले. अजूनही काही झटका देऊन जातात. ठिकठिकाणी प्रयोग करायला मिळाले आणि त्याबरोबरच त्या त्या ठिकाणाचे विविध अनवट खाण्याचे प्रकारही चाखायला मिळाले, अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत (महाराष्ट्रात सामाजिक,तात्विक किंवा आर्थिक नाहीतर राजकीय विषय चर्चेला आला की आवाहन करताना नेहमी हीच दोन गावं का घेतली जातात? ही महाराष्ट्राची लांबी दाखवणारी दोन टोकं आहेत. पण मग महाराष्ट्राला फक्त लांबी आहे? पूर्व पश्चिम अशी रुंदी नाही?) नाटकाच्या निमित्ताने अनेक मित्र लाभले,काही पुन्हा पुन्हा भेटत राहिले, काही काळाच्या ओघात भेटेनासे झाले, काही दुर्दैवाने पुन्हा न भेटण्याइतके दूर निघून गेले. त्यांच्याबरोबर वेळी अवेळी (खरं तर अवेळीच जास्त) कुठेतरी बसून, उभ्याने किंवा त्याहून वेगळ्या अवस्थेत खाल्लेले पदार्थ मात्र कायम मनात घर करून राहिले आहेत.

आज पूर्वी कधीतरी कुठल्यातरी गावात खाल्लेला एखादा पदार्थ आता ते ठिकाणच नाहीसे झाल्यामुळे मिळत नाही म्हटल्यावर मन फार खिन्न होते. आज पूर्वी सारखे नाटकांचे दहा-बारा दिवसांचे दौरे होत नाहीत. बरेचदा मुक्काम होत नाहीत त्यामुळे खाण्याची वेळच येत नाही, त्यात स्वच्छता आणि नेटकेपणा याचे फार स्तोम  माजल्यामुळे पदार्थांना चव राहिली नाही.

मला तर एखाद्या गावात नाट्यगृह कसे आहे ते आठवत नसेल पण तिथे काय काय मिळते हे मात्र स्वच्छ आठवते. अगदी अलीकडची गोष्ट, एका चित्रपटाच्या लिखाणासाठी मी आमचे एक स्नेही श्री.विलास कोठारी यांच्या लोणावळ्याच्या बंगल्यात आठ दिवस मुक्कामाला गेलो होतो. (यात मी  लिहायला गेलो होतो हे महत्वाचं) असाच सहज सक्काळी सक्काळी (“क्क” हे अक्षर मी खूप लवकर उठून गेलो होतो यासाठी) फिरायला गेलो होतो. विचारात मग्न अशा अवस्थेत कुठपर्यंत आलो काही कळलं नाही (कुठलाही सिनेमा लिहायला विचार करावा लागतो हे मनात नमूद करा. अगदी मराठी सिनेमाही), जरा दमलो होतो. बरोबर दिग्दर्शकही का कुणास ठाऊक आला होता. पाच-सहा किलोमीटर तरी चाल झाली असावी (दिग्दर्शकाला वीस किलोमीटर झाली असं वाटत होतं).

एका बंद असलेल्या उपहारगृहाचा कट्टा दिसला. सहज जाऊन टेकलो. आणि अचानक त्या उपहारगृहाचा दरवाजा उघडला. एक तिखट आणि चवदार असा दरवळ (दरवळाला चवदार म्हणणं हे तसं विचित्र वाटेल पण दुसरा शब्द सुचत नाहीये) सर्व इंद्रियांना भेदून गेला. मिसळीशिवाय असा भन्नाट गंध येणंच शक्य नाही. मागे वळून बघितलं तेव्हा नावाची पाटी दिसली, बुवाची मिसळ. स्वच्छ निरलस पाटी. उगाच डायनिंग एक्झोटिका वगैरे बकवास शब्द योजना नाही.

नावाबद्दल काही म्हणायचं नाहीये पण अशा नावाची दिवे लावून काळोख करणारी हॉटेलं (हॉटेल्स नाही हॉटेलंच) मला फारशी आवडत नाहीत. ज्या मुलखात आपण राहतो तिथले पदार्थ आपण खावेत. टीवीवर माफक मिशी आणि तोकडे कपडे घातलेल्या पुरुष वजा स्त्रिया किंवा स्त्रिया वजा पुरुष (बाकी त्यांच्यात पटकन भेद करता येईल असं काहीच नसतं) यमसू!यम्मी! असे उद्गार काढत कुठल्या तरी परदेशातल्या बेचव पदार्थांची स्तुती करताना पाहिलं की माझी तारच सटकते. म्हणजे ते पदार्थ टाकाऊ असतात असं नाही हो पण ते आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य घटक असल्यासारखा त्यांचा जो उद्घोष चालतो त्याला माझा सविनय विरोध आहे.(सविनय विरोध म्हणजे नेमकं काय ते मला माहीत नाही. विरोध आहे इतकं पुरे.)

तर बुवाची मिसळ. तो गंध दरवळला आणि पाठोपाठ त्या उपहारगृहाचा फळीवजा दरवाजा उघडला. आम्ही जे दोघे तिघे आलो होतो ते आत गेलो. तिथे एक दादा आणि आणि त्यांची बायको होती (खरं तर ते जोडपं माझ्याहून तरुण आहे पण तरीही).

त्यांच्याकडे काय आहे आत्ता खायला याची चौकशी केली.

“फक्त चार आयटम. मिसळ, वडा, भजी आणि चहा. पण आत्ता फक्त मिसळ आणि चहा मिळेल”

“द्या मग!”

पाच मिनिटात मिसळ आली. सरळ, साधी आणि सोपी. बरोबर तर्री (तर्री हा शब्द बहुदा “तिखट आहे तरीही” याचं लघुरूप असावं.) साधी मटकी उसळ, एक दोन बटाटाच्या फोडी, थोडे फरसाण आणि मुबलक कांदा व लिंबू यांची पखरण.

पुढच्या पाच मिनिटात तिथे अजून काही ग्रामस्थ आले. बारा पंधरा मिसळीच्या प्लेटी (प्लेट्स नाही बरं का!)आल्या. सगळीकडे नि:शब्द वातावरण पसरलं. अगदी कथेत वर्णन केलेलं असतं तसं. आम्ही सगळे त्यावर तुटून पडलो. त्यांच्याकडे तीन प्रकारच्या मिसळी आहेत. एक अगदी तान्ह्या मुलांसाठी बिनतिखट एक सर्वसामान्यांना रुचेल अशी आणि तिसरी.. जरा तो खास मामला आहे. सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर पसरतो तसा लाल रंग त्या मिसळीवर पहुडलेला असतो (सूर्योदयाच्या वेळीही असा रंग असतो पण हल्ली मुंबईत उंचच उंच इमारतींमुळे सूर्योदय दिसत नाही). काही हिम्मतवान लोक त्यावर लालजहाल तर्री ओतून घेतात. शिवाय तिथे बरोबर मिरचीचा खर्डाही मिळतो. अजून वरच्या दर्जाचे जिगरबाज तोही खातात. पण एकंदरीत मामला चवदार असतो. बटाटेवडाही लसूणवडा होऊन जिभेला सामोरा येत  नाही. पण ते तसं खाणं “येरा गबाळ्याचे काम नोहे”.”तेथे पाहिजे जातीचे”.

ती मिसळ खाऊन मग पुढे पुण्याला नाटकाच्या प्रयोगाला जाणे वगैरे फक्त तपशील वाढवणे आहे.

नाटकाच्या निमित्ताने किंवा चित्रीकरणाच्या कारणांनी गावोगावी जाऊन फार उत्तमोत्तम पदार्थ मला आजवर चाखायला मिळाले आहेत. आणि सुदैवाने अनेक मित्र लाभले तेही मोजकंच पण चवीने खाणारे.

कराडला प्रयोग होता आमचा कुठल्यातरी नाटकाचा. ”कुठल्यातरी” शिवाय त्या नाटकाला दुर्दैवाने दुसरं विशेषण मला चटकन सापडत नाहीये, हे माझं मराठी कमकुवत असल्याचं चिन्ह नसून त्या संहितेचा दुबळेपणा आहे, इतकी नोंद वाचकहो तुम्ही करून घ्या. तरीही ते नाटक दोन तीन वर्ष चालू होतं. आता ही रसिकांच्या दुबळ्या रसिकतेची खूण आहे याची गाठही वाचकांनी मनाशी बांधावी ही नम्र विनंती (ही विनंती बरोबर कायम नम्रला का घेऊन फिरते?तसेच निमंत्रण हे सुद्धा कायम आग्रहाचेच असते.)

तर त्या कराड गावी आम्ही पोचलो. तीन एक तास अगोदर पोचलो होतो. १९८८-८९ सालची गोष्ट. त्यामुळे कराड तसे लहानच होते. प्रवासात भूक लागलेली होती. रसिकांच्या प्रेमाची भूक-बिक लागण्यासारखी माझी अवस्था नव्हती. राजा उमराणी नावाचा माझा मित्र मला तिथल्या एका हॉटेलात घेऊन गेला. बहुदा बॉम्बे रेस्टॉरंट असं त्याचं नाव असावं. आत मध्ये निखळ अस्वच्छता होती. मात्र आतमध्ये असलेले खायक (गाणारे गायक त्यामुळे खाणारे खायकच नाही का?) अनेक पदार्थ दडपण्यात मग्न होते.

इथे मैसूर मसाला स्पेशल आहे, असं मित्राने सांगितलं. आळेफाटा येथे मलेशियन नूडल्स झकास मिळतात असं कोणी तुम्हाला सांगितलं तर कसं वाटेल? अगदी तसं वाटलं मला. पण मित्राच्या गावात आलेलो मी काय बोलणार? काही वेळाने सोनेरी रंगाचा खरपूस मसाला डोसा आला, बरोबर सांबार चटणी, संमेलनाला स्वागताध्यक्ष असतात तसे त्याच्या जोडीने आले, आणि एका छोट्या वाटीत नारंगी रंगाची चटणी आणि लोण्याचा गोळा आला. आजूबाजूला लोक जसे त्याचा वापर करत होते तसा करून पहिला घास घेतला. त्यानंतर पुढे प्रयोग संपवून कधीतरी रात्री बसमध्ये काहीतरी पोटात ढकलले (खाद्यपदार्थ शंभर टक्के नाही) आणि मुंबईला अवेळी पेंगत परत आलो इतकेच आठवते.

एकंदरीत पहाता कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा विभाजनात महाराष्ट्र खाण्याच्या बाबतीत तरी विभागलेला आहे, मग भूगोल इतिहास काहीही म्हणोत. मी आजवर महाराष्ट्रातल्या समस्त  जिल्ह्यात जाऊन प्रयोग केलेले आहेत (महाराष्ट्रात नेमके किती जिल्हे आहेत हे माझे अज्ञान मी समस्त या एका शब्दात, तान्ह्या मुलाला त्याची आई जशी दुपट्यात लपेटून घेते तसे लपेटून घेतलेले आहे. भाषेतील जड शब्द कधी कधी अज्ञान लपवतात ते हे असे. जसे बरेचसे समीक्षक त्यांचे कलाकृतीबद्दलचे अज्ञान …असो.)

नाटकांचे दौरे शारीरिकदृष्ट्या त्रासाचे नक्की होते, आजही थोड्याफार फरकांनी तसेच आहेत. पण आज काही काही वेळा आम्ही बरेच कलाकार प्रयोगाच्या ठिकाणी विमानाने जातो. ब-याच वेळा स्वखर्चाने जातो. कृपया  याचा अर्थ आमच्याकडे बरेच पैसे आहेत असा नाही. तर कलाकारांना जर निर्माता विमान प्रवासाचे पैसे खर्च करून घेऊन जातो तर मग त्यांना सरकारी अनुदान कशासाठी द्यायचे अशी शंका कोणाच्या मनात येऊ नये म्हणून लिहिले आहे. गर्वाने सांगण्यासारखे यात काही नाही. शिवाय या विमान प्रवासात हेल्दी या बिरुदाने सजलेले अत्यंत बेचव खाणे खावे लागते (अर्थात फुकट असेल तर, अन्यथा आपण बुवा नेहमी घरून जेवून निघतो असे सांगायचे असते).

पूर्वी फार झकास बेत असायचा. कुठलातरी प्रयोग उशीरा संपावा. तिथले पाणी आपल्याला पचेल न पचेल या भीतीने त्यात काहीतरी रंगीत द्रवपदार्थ ओतावा. मग अवेळ झाल्यामुळे तिथले जेवण टाळावे आणि थोडीशी भूक उशाला घेऊन बसमध्ये देह लोटावा. पुढच्या प्रयोगाच्या ठिकाणी मुक्कामाला पोचावे. अर्थात अवेळी, भल्या पहाटे. काही काही ठिकाणी पहाटे असे लोक फिरत असतात की पहाटेला भली म्हणायला जीभ रेटत नाही. तर अवेळी उतरून आपली वाटयाला आलेली खोली ताब्यात घ्यावी. हातातले सामान ठेवावे आणि पायात चालायचे बूट घालून चालायला निघावे असा माझा नेहमीचा कार्यक्रम.

बाहेर पडल्यावर बहुसंख्य लोक ज्या दिशेला चालत चालले आहेत त्याच्या विरुद्ध दिशेला जावे. कारण ते सगळे आपला व्यायाम संपवून आरोग्याच्या भलत्याच कल्पना उराशी बाळगून फळांचे वा पानांचे रस पिण्यात आनंद मानणारे असायचे. इतकं जागरण करून किंवा भल्या पहाटे उठून हे का प्यायचे?

औरंगाबादच्या अश्याच एका रपेटीत मला मछली खडकमधल्या उत्तम मिष्टान्न भांडारमध्ये मिळणा-या इमरती आणि कचोरीचा शोध लागला होता.

अर्धा पाऊण तास चाललं की, पोटातली भूक जिभेच्या टोकाला येऊन पोचते आणि मग पदार्थांचा खराखुरा आस्वाद घेता येतो. प्रत्येक गावात उशिरापर्यंत उघडे असणारे आणि सकाळी लवकर उघडणारे प्रत्येकी एकतरी हॉटेल असते. गोव्यात सर्वानुमते आठ साडेआठ वाजता सूर्योदय होतो आणि मग लोक लगेच उठून कामाला लागतात. त्याच गोव्यात पणजीत भोसले कॅफे पावणेसहा ते सहाच्या सुमारास उघडतं तिथे बटाटा, टोमेटो आणि सलाद या नावांनी ओळखल्या जाणा-या तीन भाजा मिळतात. मात्र त्यांना बटाट आणि टमाट भाजी म्हणतात. आणि त्यांची तशीच ऑर्डर द्यावी लागते अन्यथा तिला तशी चव येत नाही असं मी ऐकून आहे. त्याबरोबर नावाचे उणे पण चवीला अधिक लागणारे गोव्याचे खास पाव मिळतात. सकाळच्या भुकेचा पाडाव करून जिभेला आणि पोटाला नेत्रदीपक विजय मिळतो तो तिथेच. शिवाय ओल्या काजूंची बिया भाजीसुद्धा मिळते पण ती खाणे आणि पचवणे “कुणा येरूचे काम नोहे”.”तेथे पाहिजे जातीचे”.

बाकी हल्ली गोव्यात हॉटेलमध्ये राहिलात तर सकाळी न्याहारी म्हणून कॉर्न फ्लेक्स सारखे  पचपचीत आणि छोलेबिले सारखे अघोरी पदार्थही मिळतात. गोव्यात फक्त रस्त्यावर मिळणारा एक पदार्थ आहे मात्र तो संध्याकाळीच खावा. त्याचं नावच मजेशीर आहे, रस ऑम्लेट. एक बशीभर कोंबडीचा खोबरं वगैरे घालून केलेला पातळ (खरं तर पात्त्त्तळ असं लिहिलं पाहिजे) रस्सा आणि त्यात लोळवलेले मस्त मिरच्या बिरच्या घालून केलेले ऑम्लेट.

प्रत्येक रस ऑम्लेटच्या गाडीच्या शेजारी; म्हणजे शेजारी नावाच्या चित्रपटात गजानन जहागीरदार आणि केशवराव दाते राहताना दाखवले आहेत तितकी शेजारी;  लिंबू-सोड्याची गाडी असलीच पाहिजे. एक ऑम्लेट आणि ग्लासभर लिंबू-सोडा एवढ्यात ब-याच गोवेकरांची क्षुधाशांती होते. प्रयोगाच्या आधी जर हे खाल्लं तर प्रयोग फार रंगतो हा स्वानुभव आहे.

एका पीटर नावाच्या माणसाचे हॉटेल गोव्यात रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत तुफान धंदा करून जायचे. खरं तर नेहमीच्या वेळेला अगदी साग्रसंगीत मांडणी केलेला स्वयंपाक हा चविष्ट खाण्यात मोडत नाही जशी नोकरी ही काही जीवनानूभवात मोडत नाही. ती झाली वर्षानुवर्षे न चुकता पार पाडायची एक कंटाळवाणी गोष्ट. इंदौर आणि ग्वाल्हेर या शहरात मी प्रयोग केले आहेत अत्यंत चविष्ट पदार्थ तिथे मिळतात, सकाळी सूर्योदयापासून पासून ते पुढच्या दिवसाचा सूर्य उगवेपर्यंत. आपण सूर्योदय ते सूर्योदय असा एक दिवस मानतो. मध्य प्रदेशातल्या काही शहरात, म्हणजे जिथे जिथे मी प्रयोग केले आहेत तिथे, भूक लागल्यापासून आणि ती भागल्यानंतर पुन्हा भूक भागवेपर्यंत एक दिवस धरला जातो.

इंदौर आणि ग्वाल्हेर येथे माणसांचा श्वास आणि खाण्याची दुकानं अव्याहत चालू असतात.

तिथे अनेक शतकं मराठी माणसं राहात आहेत, त्यामुळे आपल्या काही काही मराठी खाद्य व्यंजनांवर मध्यभारतीय संस्कार होऊन त्यातून काही रुचकर पदार्थ निर्माण झाले आहेत. साबुदाण्याची कांदा लसूण घालून केलेली खिचडी एकदा भोपाळच्या बाजारात मला खलास करून गेली. ग्वाल्हेरच्या एका चौकात एक शंभर सव्वाशे वर्ष जुने पराठा हाऊस आहे. तिथे तीन प्रकारचे पराठे, एक सुकी भाजी (खरं तर सुखी म्हटलं पाहिजे), एक रस्सा भाजी आणि लोणच्याच्या सोबतीने तुमच्या ताटात स्वर्ग बनून येतात. तिथे तुम्ही चमचा वगैरे मागितला तर तुमचा वध करण्यात येतो. हात, तोंड आणि पोट या तीनच गोष्टी त्या पराठ्यांशी निगडीत असल्या पाहिजेत असा त्या मालकाचा हट्ट असतो. लोक तिथे देहभान हरपून त्या पराठ्यांबरोबर लढत असतात आणि बहुतेक वेळा हरतात.

त्याच ग्वाल्हेरात संपूर्ण जेवण आकंठ जेवल्यानंतर शंभर जिलब्या खाणारे गृहस्थ मला शहर दाखवायला आले होते. नाटक पाहिल्यानंतर चर्चा करून समोरच्या कलाकाराला जेरीस आणण्याच्या प्रथेपासून ते चार हात दूरच होते. तीन साडेतीन मिनिटांत त्यांनी संपूर्ण ग्वाल्हेरचा इतिहास माझ्यासमोर उलगडून पुन्हा गुंडाळून ठेवला आणि ठिकठिकाणच्या उत्तमोत्तम खाण्याच्या जागांवर ते मला घेऊन दिवसभर हिंडवत होते. साईच्या दह्यावर चाट  मसाला आणि कोथिंबीर घातलेली एक प्लेट आणि त्याबरोबर गरम जिलब्या कश्या खायच्या ते त्यांनी आधी तीन प्लेट स्वतः खाऊन मला शिकवलं. रात्री त्यांनी एका ठिकाणी डाळिंबाच्या रसात बनवलेली कोंबडी खाऊ घातली. बरोबर मका आणि सातूचे पराठे.

पुढे मागे ह्यावर लेख लिहावा आणि एका दिवाळी अंकात तीन-चार पानं अडवून ठेवावी असा माझा हेतू नसल्यामुळे या सगळ्या जागांची नावं, पत्ते मी लक्षात ठेवले नाहीत. तसेच रात्री बेरात्री कुठेतरी शूटिंग करून येताना रस्ता चुकून भलतीकडे गेलो आणि एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी बंद पडली, भुकेचा आगडोंब उसळला होता आणि कुठल्यातरी खेडूत बाईने माझ्या अंगावरचे ग्रामीण छापाचे कपडे बघून, जे मी भूमिका जगायला मिळावी म्हणून त्या काळात सतत घालत होतो, मला कोणीतरी त्यांच्यापैकीच समजून घरातली तुकडे तुकडे झालेली शिळी भाकरी आणि काहीतरी खाऊ घातलं आणि वर मातीच्या लोट्यातून पाणी प्यायला दिलं अशी माणुसकीचा गहिवर छाप घटना माझ्या आयुष्यात घडली नाही आणि मी घडू देणार नाही. कारण जगण्यासाठी भूमिका करावी, भूमिका जगत बसू नये. आणि त्याचे पैसे घ्यावे या विचारांचा मी आहे.

पोटात अन्न असल्याशिवाय प्रवास करू नये, ते न जमल्यास बरोबर घेऊन ठेवावे.

एक जेष्ठ आणि श्रेष्ठ  कलाकार म्हणाले होते “संजय!प्रयोगाच्या आधी थोडं खाऊन घ्यावं कारण पूर्ण रिकामा आणि पूर्ण भरलेला डबा नीट वाजत नाही.”

ह्या खाण्याच्या प्रवासात जसे काही अफलातून पदार्थ मला खायला मिळाले तसे अफलातून विक्रेतेही भेटले. जळगावला एक कचोरीवाला आहे त्याची खासियत काय आहे?

कचोरी तर आहेच पण त्याला जर गि-हाइकाचा चेहरा आवडला नाही तर तो त्याला कचोरी विकत देत नाही.

“चल हट! कचोरी नही मिलेगी! साली क्या सुरत है तेरी! असं म्हणून तो समोरच्याला हाकलून देतो. आजही मला त्याच्याकडे जायचे धैर्य होत नाही.

तिथेच एकदा जळगावला गेलो होतो, माझा तिथला एक मित्र भैय्या उपासनी म्हणाला, “प्रतापशेठच्या हॉटेलात तरंग चिकन खाऊन मग जा. आता परत तू कधी येणार आणि आपण भेटणार?” फार लाघवी होता भैय्या. त्याचा आग्रह मोडवेना, शिवाय गाडीला तसा थोडा वेळ होता,  सगळं आवाक्यात होतं. आम्ही दोघे गेलो ऑर्डर दिली, मग माझ्या त्या मित्राला तिथे अनेक जण भेटले. गप्पा होता होता गाडीची वेळ झाली आणि तितक्यात समोर ते तरंग चिकन आलं

“मी जातो भैय्या! गाडी चुकेल.”

“मी असताना?” असं म्हणून तो उठला आणि काउंटरवर गेला. तिथून फोन लावून परत आला आणि म्हणाला,

“आरामात होऊ दे.”

“अरे भैय्या काय आरामात होऊ दे? नंतर गाडी नाहीये.”

“माहीत आहे. हीच गाडी वीस मिनिटं मी थांबवून ठेवायला सांगितली आहे मागच्या सिग्नलवर”

त्याने खरंच गाडी थांबवून ठेवली होती. आम्ही जेवलो आणि गाडीत जाऊन मी बसलो त्यावर त्याने कोणालातरी जाऊ दे अशा अर्थाने हात केला आणि गाडी सुटली.

मला सोडायला भैय्याबरोबर स्वतः प्रतापशेठ आला होता. जातांना त्याने एक पुडी माझ्या हातात दिली

“ये रात को खा लेना दादा!”

पुण्यातल्या अनेक विक्रेत्यांचे किस्से आता ऐकून ऐकून फार नीरस झालेत. शिवाय त्यात गंमतीपेक्षा विक्षिप्तपणाची जाहिरातच जास्त आहे. आचरटपणा आणि बावळटपणा म्हणजे हुशारी नाही.

ठिकाण आठवत नाही पण एक खानावळ आहे त्यात भिंतीकडे तोंड करून जेवावे लागते टायपिंग क्लास किंवा सायबर कॅफेत बसल्यासारखे. शिवाय बाजूला लाकडी फळ्या आहेत. त्यामुळे आपल्या ताटाखेरीज दुसरं काहीही दिसत नाही. मान बाहेर काढून आपल्याला हवे आहे ते मागावे लागते. मी तिथे जेवायला गेलो होतो. भाजी संपली म्हणून डोके बाहेर काढून भाजी मागितली, गल्ल्यावरून आवाज आला,

“लाला लजपतरायना बटाटा भाजी आण रे”

भाजी आली. मला काही कळेना म्हणून मी त्या वाढप्याला विचारलं. त्याने बोटाने समोरच्या भिंतीकडे इशारा केला. माझ्या समोर लाला लजपतराय यांचा फोटो होता. प्रत्येकासमोर असे फोटो टांगले होते आणि मालकांचा आवाज येत होता

“लालबहाद्दूर शास्त्रींना चटणी द्या.”

“थोरल्या बाजीरावांना आमटी वाढा”

“महाराजांना भात वाढा”

“राणा प्रताप पोळी मागताहेत”

खरं तर एक कलाकार म्हणून मी गावोगावचे प्रेक्षक, तिथली थिएटर्स याबद्दल लिहिलं पाहिजे नाही का? पण ते लिहिणारे आहेत की खूप. माझी अजून त्यात भर कशाला? कारण अभिनय यावा लागतो, करावा लागतो, त्यावर चर्चा, परिसंवाद घडवून आणावे लागतात, पारितोषिकं मिळवून आणावी लागतात. भूक मात्र आपोआप लागते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खरी असते आणि ती भागवायला खाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो

संजय मोने

45710_427996449126_8270365_n

3 thoughts on “खाण्यासाठी नाटक आपुले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s